डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हिंदू-मुस्लिम दंग्याच्या पार्श्वभूमीवर पूर्णिमा शाहरूखला राखी बांधतानाचा फोटो "टाइम्स”ने पहिल्या पानावर टाकला. त्यानंतर हिंदी नटांना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधायची, हे चाळीतल्या मुलींनी ठरवूनच टाकलं. हिंदी नटांना आर्थिकदृष्ट्या पुढे पुढे हे त्यांना इतकं काही महागात पडू लागलं, की त्यांनी आपापल्या डायरेक्टरांना विनंती करून रक्षाबंधनाच्या दिवशीचं शूटिंगच कायमस्वरूपी रद्द करून टाकलं. आता मराठी मालिकेच्या निर्मात्यांना चांगलं ठाऊक झालंय की रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला कधीही चाळ शूटिंगसाठी मिळू शकते.

मुंबईला गेल्यानंतर मी सर्वत्र बसनेच फिरतो. शक्य झाल्यास डबल डेकरच्या वरच्या मजल्यावरून. वरून मुंबापुरीचे जे विहंगम दृश्य दिसतं, त्याला तोड नाही. हे दृश्य पाहत असताना अनेकदा मन काहीसं अंतर्मुख होतं. असाच एकदा मी फोर्टातून दादरला चाललेलो होतो. गिरगावातून बस जात असताना माझ्या मनात विचार आला. याच भागात एके काळी माझा मामा राहायचा. त्याने त्याच्या चाळीतली दोन खोल्यांची जागा एका गुजरात्याला विकून दहीसरला तीन खोल्यांचा आलिशान फ्लॅट घेतला. याच गिरगावात कधी काळी माझी आत्या राहायची. त्या काळात किती तरी वेळा मी तिच्याकडे गेलो असेन. आता चाळीतली ती जागा शेट्टी नावाच्या कुठल्याशा उडपी माणसाला विकून ती कल्याणला राहायला गेली. मी मी म्हणणारे "मुंबईकर" आता “मी दहीसरकर", "मी कल्याणकर", थोडक्यात म्हणजे "मी उपनगरकर" अशी स्वतःची ओळख सांगू लागलेले आहेत. असो, आता त्या चाळीही गेल्या आणि त्यांच्याबरोबर ती चाळ-संस्कृतीही गेली.

काळ अशा काही करामती करतो की एकेक गोष्ट तो पार होत्याची नव्हती करून टाकतो. आमचा पुण्यातला वाडा घ्या. ऐन सदाशिव पेठेत वसलेला तो चौसोपी वाडा पेशवाईत कधी तरी बांधलेला होता. 1818 साली पेशवाई नष्ट झाल्यावर या वाड्यात राहणाऱ्या बाळाजीपंत नातू याने शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकवला. त्या नातूची पुण्यात नंतर इतकी काही छी: थू: झाली, की त्याचा वाडा, तो पडेल त्या किंमतीला विकून, सहकुटुंब कुशावर्तास तोंड काळे करता झाला. त्यावेळी आमच्या पणजोबांच्या पणजोबांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. ते दुसऱ्या बाजीरावाकडे पूजा सांगायला जायचे. आता भिक्षुकीतून सुटून सुटून काय सुटणार? पण वाडा स्वस्तात मिळतोय म्हटल्यावर पणजोबांच्या पणजोबांनी त्यांच्या धर्मपत्नीचे दागिने गहाण टाकून तो सौदा पक्का केला. त्यांनी सावकाराकडून कर्ज काढून तो वाडा स्वस्तात पदरात पाडून घेतला. हा पहिला किफायतशीर सौदा केल्यानंतर त्या वाड्यात ते राहायला गेले आणि त्यांची खूपच भरभराट झाली.

हा वाडा विकू नये असे मला फार वाटत होते. नाही म्हटले तरी मराठी माणसाला न साजेल अशा पद्धतीचे व्यवहारकौशल्य आमच्या पणजोबांच्या पणजोबांनी दाखवलेलं होतं. तेव्हा एका अर्थाने आमच्या पूर्वजांच्याच कर्तबगारीचीच ती निशाणी होती. परंतु आमचे दोन बंधू आणि त्यांच्या बायका ह्यांना वाडा विकून मिळणारे लाखो रुपये त्यांच्या डोळ्यांसमोर नाचत होते. दुर्दैव हे की त्या कटात आमच्या मातु:श्री आणि आमच्या सौभाग्यवतीही सामील होत्या. त्यांना भावांनी मध्ये घातल्यावर मला काहीच बोलता येईना. पण तरीही मी माझा क्षीण विरोध नोंदवायचा प्रयत्न केला.

"मला असं वाटतं ही ऐतिहासिक वास्तू बिल्डरच्या घशात घालू नये. इथं टोलेजंग इमारत उभी राहील, त्यात आपल्याला फ्लॅटही मिळतील. पण त्याचबरोबर आपल्या फ्लॅटना चिकटून येतील आपल्या पूर्वजांचे तळतळाट." मी कळवळून म्हणालो.

"उगाच काही तरी वेड्यासारखं बोलू नकोस, वसंता." आई कडाडली, "तुझ्या पणजोबांच्या पणजोबांनी जे व्यवहार कौशल्य त्या काळात दाखवलं तेच आपण आजच्या काळात दाखवत आहोत. त्यामुळे त्यांच्या आत्म्यांना झाला तर आनंदच होईल. ते या व्यवहाराला आशीर्वादच देतील. त्यांचे तळतळाट कशासाठी ते पाठवून देतील? शिवाय आता हा वाडा जुना झालाय. पडझड मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे. नंतर तो विकायचा ठरवला तरी त्याला किंमत येणार नाही."

"पण हे सारं कशासाठी? पैशासाठीच ना? तसं असेल तर आपण हा वाडा नुसता पाहण्यासाठी जनतेला खुला केला तरी लोक पाच पाच रुपयांची तिकिटं काढून वाडा बघायला येतील. रोजचं दोन-तीन हजारांना मरण नाही." म्हणालो.

यावर छद्मी हसत रेखा म्हणजे माझी धर्मपत्नी म्हणाली, "अहो, शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकवणाऱ्या बाळाजीपंत नातूचा वाडा बघायला पाच पाच रुपयांची तिकिटं काढून कोण येईल? तिकिटं काढून शनिवार वाडासुद्धा पाहण्याचा कुणाला उत्साह नाही. उगाच काहीतरी वेड्यासारखं बोलायचं झालं!”

"ठीक आहे. तुम्हांला जे पाहिजे ते तुम्ही करा. पण निदान वाडा पाडण्यापूर्वी त्याचा व्हिडिओ तरी काढून ठेवू. आणि सुधीर गाडगीळलाच मुलाखतीसाठी बोलावू या." मी अट घातली.

"चालेल. जरूर बोलवू. हा सगळा खर्च मी करतो. मग तर झालं?" धाकटा भाऊ गोविंदा ताबडतोब तयार झाला.

त्यानंतर आठवड्यातच गोविंदाने हा व्हिडिओचा घाट घातला. मी वाड्याचा कानाकोपरा चित्रित करायला लावला. त्यासोबत माझी कॉमेन्टरीही त्यानं ध्वनिमुद्रित केली. हेच एवढा वेळ चाललं की आमच्या भावंडांच्या मुलाखती सुरू होण्यापूर्वीच कॅसेट संपली. मग दुसरी कॅसेट कॅमेर्यात भरून मुलाखती सुरू झाल्या.

माझी मुलाखत झोपाळ्यावरच झाली. सुधीरनं पहिलाच प्रश्न अगदी नेमका विचारला, “काका, या वाड्यात तुमचं बालपण गेलं. तुमच्या आजोबांचं, पणजोबांचं खापर पणजोबांचं बालपण गेलं. आज या वाड्याच्या खूप आठवणी तुमच्या मनात दाटून येत असतील ना?"
या पहिल्याच प्रश्नाने माझ्या हृदयाची तार टुंगकन् छेडली. मी सुरुवात केली, "मला माझ्या बालपणीच्या आठवणी येतातच. वडिलांच्या आजोबांच्या, पणजोबांच्या खापर पणजोबांच्या बालपणीच्या आठवणी अजिबातच आठवत नाहीत. पण त्याचं खापर खापर पणजोबा किंवा पणजोबा किंवा आजोबा किंवा वडील यांच्यावर फोडण्यात अर्थ नाही. पहिल्यापासून मला स्मरणशक्ती थोडी कमीच आहे. माझ्या लग्नाच्या वेळची एक आठवण आहे. मला अगदी लख्ख दिसतोय तो प्रसंग. काय झालं..."

त्यानंतर मी आठवणींच्या प्रांतात शिरलो. आमच्या पूर्वजांच्या कर्तबगारीचा समग्र इतिहासच सादर केला. कॅसेट संपल्यावरच मी बोलायचं थांबलो. तिसरी कॅसेट भरताना गोविंदा काचकूच करू लागला. म्हटले, "गोविंदा, आता मागे हटायचं नाही. तू शब्द दिलेला आहेस."

माझ्याच या वाड्यात भावना गुंतलेल्या असल्याने मी आठवणींचा धबधबा मोकळा सोडलेला होता. या धबधब्याखाली मी मनमुराद भिजून घेत होतो. बाकीच्यांच्या तशा तीव्र भावना नसल्याने त्यांना प्रत्येकी एक एक, दोन दोन मिनिटे देऊन सुधीरने फुटवले. अशा रीतीने तीन कॅसेटमध्ये काम भागलं. पण या कॅसेट ट्रान्सफर करून माझ्या रोहितला पाठवाव्यात असा आग्रह मी धरला. रोहित सध्या कॅनडात असतो. गेल्या वर्षीच त्याचं लग्न झालं. लग्नाची व्हिडिओ कॅसेटही त्याला पाठवायची राहिली होती. या तीन कॅसेटबरोबर तीही रवाना करता आली असती. पुन्हा गोविंदा कुरकुरायला लागला. म्हणायला लागला, "इतका खर्च होणार हे ठाऊक असतं तर मी वाडा विकायला परवानगीच दिली नसती. "

त्यावर मी त्याला सडेतोड जबाब दिला, "गोविंदा, उद्या रोहितला मुलगा होईल आणि तो या तीन कॅसेट बघेल तेव्हा त्याला आपल्या घराण्यामागे केवढा दैदीप्यमान इतिहास उभा आहे हे समजेल. अखेर पुढच्या
पिढीपर्यंत इतिहास पोहोचवणं हे खरं महत्त्वाचं. माझ्याकडून मी ते कार्य केलेलं आहे. आता या कॅसेटच्या कॉप्या काढून जोशी घराण्यातल्या सर्व छोट्या मोठ्या वंशजांकडे पोहोचवणं हे तुझं काम."

सांगायचा मुद्दा असा की मला अजूनही जुन्या वास्तूंच्या आठवणीने गहिवरायला होतं. त्या मुंबईच्या डबलडेकरमध्ये बसल्यावर गिरगावचं ते दृश्य पाहिल्यावर मला तेथील मामाच्या आणि आत्याच्या चाळीत घालवलेलं बालपण आठवलं. मामांकडे असताना एका मे महिन्यात माझे कपाळ घरासमोरच्या कठड्यावर आपटून मला खोक पडलेली होती. मामीने लावलेल्या हळदीमुळे माझा पांढरा शर्ट जेजुरीच्या वाघ्याप्रमाणे पिवळा झालेला होता. “आता त्या चाळी काळाच्या उदरात कुठल्या कुठं गडप झाल्या असतील. तशी चाळ पुन्हा दिसणेही नाही" अशी हळहळ मनात वाटून घेत असतानाच खिडकीतून एक भली-मोठी चाळ दिसली. हे स्वप्न तर नव्हे ना? माझ्या वेड्या मनाला होणारा भास तर नव्हे? मी भान हरपून तडक उठलो आणि दुड्दुडू जिना उतरून खाली उतरलो. बेभान होऊन चालत्या बसमधून उतरलो. "हे घाटी लोक कदी सुदरनार नाहीत" असा बसमधल्या प्रवेशद्वारापाशी कुणी तरी मारलेला हिणकस शेरा माझ्या कानावर पडला. पण तोपर्यंत मी उलट्या दिशेने त्या जुन्या चाळीचा शोध घेण्यासाठी निघालोही होतो. ती चाळ कधी एकदा "याची डोळा" पाहतो आहे असे मला होऊन गेले होते. थोडे मागे जाऊन कोपल्यावरल्या पानवाल्याला विचारले. "इथं एक खूप जुनी चाळ आहे का...?"
"म्हंजे, बापुसायबाची चाळ?"
"या बाजूच्या गल्लीतून अश्शे शिद्दे जा. गल्लीच्या टोकालाच भेटंल तुम्हांला बापुसायबाची चाळ. या भागात लई फेमस हाये." पानवाला म्हणाला.

त्याच्या सूचनेबरहुकूम मी गेलो आणि काय आश्चर्य? गल्लीच्या टोकाशी एक मोठं मैदान होतं. तिथे काही पोरं हुतूतू खेळत होती. मी सरळ चाळीच्या दिशेने निघालो. तर एका आडदांड पोराने मला अडवलं.

"कुठे निघालात?" त्याने विचारले. “ती चाळ किती सुंदर आहे हो! ती बघून येतो. काय आहे. माझ्या बालपणाच्या.... "

“त्या तिकडे तिकीट खिडकी आहे. दहा रुपयांचं तिकीट काढा आणि खुशाल दोन तास बघत बसा चाळ." त्याने एका दिशेला बोट दाखवून मला मार्गदर्शन केले.

तिकीट? चाळ बघण्यासाठी तिकीट? मला आश्चर्याचा पहिला धक्का तिथेच बसला. मी "त्या तिकडे" जाऊन निमूटपणे खिडकीच्या रांगेत उभा राहिलो. पुण्याच्या कुठल्याशा प्राथमिक शाळेची शंभरेक पोरांची सहल घेऊन दोन शिक्षक आले होते. ते माझ्या समोरच होते. त्यांनी घाऊक प्रमाणात तिकिटं घेतल्याने त्यांना दर आठ रुपये लावलेला होता. ते तिकीटं काढून रांगेतून बाहेर आले.

"ए... चला... दोन दोनच्या रांगा करून घ्या," एका उग्र दिसणाऱ्या शिक्षकाने फर्मान काढलं.

पोरांचा गलका एकदम वाढला. मीही तिकीट काढून रांगेतून बाहेर पडलो. आता मी त्या सहलीबरोबरच चाळीत प्रवेश केला. बाहेरच्या लोखंडी दरवाज्यापाशी एक स्वयंसेवक तिकीट फाडायला होता. मी चाळीसमोर उभा राहिलो आणि डोळे विस्फारून तिच्याकडे पाहतच राहिलो.

"मुलांनो, ही चाळ नीट पाहून घ्या. एके काळी मराठी संस्कृतीचं हे अविभाज्य अंग होतं. तुम्ही पु.लं. ची "बटाट्याची चाळ" ही कॅसेट ऐकलेली असेल. ऐकलीय ना?"
"होऽऽऽऽऽ" सारी मुलं कोरसमध्ये ओरडली.
"ओ सर, ही 'बटाट्याची चाळ' आहे का?" एका मुलानं सरांना प्रश्न केला. 
“नाही. ही आहे 'बापूसाहेबांची चाळ'. सगळेजण आता माझ्या मागोमाग या." ते सर म्हणाले. ती शंभरेक पोरं दोन दोनच्या रांगा करून एकेका बिर्हाडासमोरून जाऊ लागली. कुठे एखादी आजी भाजी निवडत बसलेली. कुठे दारासमोर आयत्या मिळणाऱ्या प्लास्टिकच्या रांगोळ्या चिकटवलेल्या. कुठे खाटेवर गाद्यांवर गाद्या रचून डोंगर तयार केलेला आणि त्यावर कुणीतरी पुरुष गंजीफ्रॉक आणि पायजम्यावर लोळत पडलेला. एक तरुण चाकरमानी मुलगी समोरच्या चाळीतल्या मुलाला कुठले तरी मराठी भावगीत गुणगुणत आणि खांद्यावरून पुढे आलेल्या शेपट्याशी चाळा करीत डोळे मोडून खुणा करण्यात मग्न होती. तिला, आम्ही 'बघे' तिच्या या चावट कृत्याकडे डोळे फाडफाडून बघतो आहोत, याचं भानच नव्हते. सार्या घरांत टीव्ही चालू होते. सर्व टीव्हीवर मराठी कार्यक्रम चाललेले होते. जिन्यापाशी मुलांचा खेळ चाललेला होता. जरा पलीकडे चाळीचे सार्वजनिक संडास होते. तिथे काही चाळकरी हातात टमरेल घेऊन उभे होते. कुणी बनियान आणि चट्टेपट्टेरी चड्डी घालून उभा; तर कुणी पायजम्याची नाडी लोंबते आहे असा मळका पायजमा घालून आणि कानात काडी घालून कोरीव काम करण्यात मग्न. एकजण बिड्या फुंकत होता. बराच काळ बाहेर असल्याने किरकोळ देहधर्म उरकावा की काय असा विचार मनात आला. मी त्या दृष्टीने रांगेत उभे राहण्यासाठी गेलो.

"उधर- उधर, टुरिस्टों का टायलेट बाहर है." एक मराठी माणूस बेंगरूळ हिंदी बोलत म्हणाला. मी जिना उतरून त्या दिशेने जावं म्हटलं तर खालच्या नळावर दोन-चार बायकांत जोरदार भांडण चालू होते. शाळेतली पोरं वरून हा तमाशा बघण्यात मग्न होती. 
"... यवढी जर जहागिरदाराच्या पोटची असशील तर मरीन ड्राइव्हरला फ्लॅट का घेऊन राहत नाहीस?"
"इथं आम्ही भाडं भरतोय. चिंचोके नाही. आम्हांला पाण्याचा हक्क आहे म्हटलं."
"एवढी कळशी भरून घेऊ का?"
"बायका दिसल्या की आलाच मेला कळशी घिऊन."

मला ते दृश्य पाहून बालपणी मामाच्या चाळीत पाहिलेले काही प्रसंग जिवंत झाल्यासारखे वाटले. माझं बालपणच मला परत भेटल्याचा आनंद झाला. एवढ्यात तिथे तोकडा मळकट कोट, मळकट धोतर आणि वर मळकी काळी टोपी या वेषभूषेतले बाबूराव आलेले पाहून मी तर थक्कच झालो. बाबूराव हे माझ्या आत्याचे मिस्टर ते मंत्रालयात (म्हणजे त्या काळातल्या सचिवालयात) हेडक्लार्क होते.

"बाबूराव..." मी न राहवून त्यांना हाक मारली.
ते माझ्याकडे बघून प्रेमळ हसले. माझ्याकडे येऊन ते म्हणाले, "इतक्या वर्षांनी मला ओळखलंस म्हणजे आश्चर्य आहे!"
"बाबूराव? तुम्ही?" मी आश्चर्याने विचारलं.
"हो. मीच." ते पुन्हा तसंच प्रेमळ हसत हसत म्हणाले.
"म्हणजे आमच्या आत्याचे तुम्ही मिस्टर?" मी खात्री करून घेण्यासाठी विचारलं.
"होऽऽऽ." 
"पण कसं शक्य आहे?"
"का? का नाही शक्य?" त्यांनी विचारले.
"त्यांचा चेहरा अगदी तुमच्यासारखाच आहे. पण ते तुमच्याइतके हसतमुख नव्हते. कायम चेहर्यावर एक तिरसट भाव असायचा. आम्हा पोरांच्या ते कायम अंगावर खेकसायचे."
“वय.... वय माणसाला प्रेमळ बनवतं. वयपरत्वे मी प्रेमळ बनलेलो आहे." माझ्या खांद्यावर प्रेमाने थोपटत ते म्हणाले. त्यांच्यातला हा सुखद बदल पाहून माझे डोळे पाणावले. इतकं प्रेमळ बोलूनसुद्धा ते मला "घरी ये" असे म्हणाले नाहीत, एवढी एकच खूण "ते आत्याचे मिस्टर बाबूरावच" हे सिद्ध करायला पुरेशी होती.

एवढ्यात माझ्यासारख्याच चाळ बघायला म्हणून आलेल्या एका देखण्या तरुणीनं बाबूरावांना "मामाऽऽऽऽ" अशी प्रेमळ हाक मारली. तिचे बाबूराव मामा असावेत. ते प्रेमळ हसण्याचे प्रमाण दुप्पट करून तिच्याजवळ गेले. मग मात्र मी तिथून काढता पाय घेतला.
“तुम्ही मामाच ना?" तिनं विचारलं.
"किती वर्षांनी भेटतोयस तू, मामा" तिचा घसा दाटून आला.
"हो गं हो" बाबूरावांनी तिला प्रेमभराने जवळ घेतलं.
त्यांचा हा संवाद कानावर पडत होताच. एवढ्यात अचानक काही तरी आठवून मी माघारी फिरलो.
"बाबूराव..." मी त्यांच्याजवळ जाऊन हाक मारली. बाबूराव नाईलाजाने त्या तरुणीपासून बाजूला झाले.
"काय?" त्यांनी एकदम हे खेकसत विचारलं. त्यांचे हे खेकसणं मला एकदम परिचित वाटलं. हे खरोखरच बाबूराव तर नव्हे?... माझ्या मनात संशयाची पाल चुकचुकून गेली.
"अं... तुम्ही माझ्या आत्याचे मिस्टर असणं शक्य नाही." मी म्हणालो. 
"का? का? का?"
"अहो, थोडं पुढे गेल्यावर मला अचानक आठवलं की माझ्या आत्याचे मिस्टर दोन वर्षांपूर्वीच गेले." मी म्हणालो.
"गेले? कुठं गेले?" त्यांनी विचारलं...
"अहो, बाबूराव, गेले म्हणजे वर गेले. वारले. मेले. माझे वडील त्यांच्या दहाव्याला गेले होते ना."
"मग ते नक्कीच वेगळे बाबूराव असणार. कारण माझा अजून दहावा झालेला नाही." ते खुलासा करीत म्हणाले.
"तुमचं नाव बाबूराव आहे?" त्या सुंदर तरुणीनं विचारलं.
"होऽऽऽऽ का गं बाळ?" पुन्हा प्रेमळ हसत त्यांनी विचारलं.
"मग तुम्ही माझे "मामा" असणं शक्य नाही. माझे मामा दिसायला अगदी तुमच्यासारखे होते. अशीच काळी टोपी घालायचे. पण त्यांना सारेजण "गजामामा" म्हणायचे. सॉरी. क्षणभर माझी फसगत झाली." ती डोळे पुसत निघून गेली. बाबूराव जरा हिरमुसल्यासारखे झाले.

मी तडक टूरिस्ट लोकांच्या स्वच्छतागृहाकडे आलो. चाळीला न शोभतील एवढं आणि "स्वच्छतागृह" या शब्दाला शोभून दिसेल एवढं ते स्वच्छ होतं. एकूण चाळ ही एक स्वच्छतेचा मुद्दा सोडल्यास कुठल्याही पूर्वीच्या चाळीसारखी दिसत होती. जवळच चाळीला भेट देणार्यांसाठी एक उत्तमशा कॅफेटेरियाची व्यवस्था करण्यात आलेली होती. मी काहीसा निवांतपणे तिथल्या हिरवळीवर जाऊन बसलो.

एवढ्यात लग्नाच्या पंक्तीत यजमानाच्या मुद्रेवर ज्या प्रकारचं हसू असते, त्या प्रकारचं हसू चेहऱ्यावर खेळवत एक गृहस्थ हात जोडून माझ्या दिशेने आले. त्यांच्या अंगावर लग्नातल्याइतकाच चकाचक असा पांढरा सदरा, धोतर, आणि काळा कोट होता. घरचं कार्य असल्याप्रमाणे त्यांनी हात जोडून मला विचारले, "काय पाहिलीत चाळ?"

चेहरा ओळखीचा वाटत होता. परंतु बाबूरावांच्या वेळी केलेली चूक पुन्हा हातून घडू नये म्हणून मी माझ्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह कोरून बाकी चेहरा कोरा ठेवला.
"आपण मला ओळखलेलं दिसत नाही." ते चेंगटपणे माझ्यासमोर बसत म्हणाले.
"अं.... नाही. माझ्या काही लक्षात येत नाही फारसं..." मी प्रामाणिकपणे म्हणालो.

एवढ्यात वेटरने दोन कॉफीचे मग आणून टेबलावर ठेवले. आता या गृहस्थाचं बीलही माझ्याच बोकांडी बसणार याचं मला वाईट वाटले. कॉफीचा मग तोंडाला लावून ते म्हणाले, " मी बापूसाहेब पाटकर. ही चाळ बाहेर "बापूसाहेबांची चाळ" म्हणून ओळखली जाते. तोच मी बापूसाहेब!"
"ओ हो हो हो... अलभ्य लाभ! साक्षात बापूसाहेब, तुम्ही माझ्यासमोर आहात? माझा विश्वासच बसत नाही." मी म्हणालो, "या चाळीचे तुम्ही मालक आहात का बापूसाहेब?".
"नाही, नाही" नम्रपणे बापूसाहेब म्हणाले, "आमची सोसायटी आहे आणि मला आमच्या येथील रहिवाश्यांनी तहहयात “कार्यकारी अध्यक्ष” म्हणून निवडून दिलेलं आहे." 
"माझं नाव प्रकाश जोशी." मी माझी ओळख करून दिली. 
"नाव ऐकल्यासारखं वाटतंय. प्रकाश... जोशी... म्हणजे ते वर्तमानपत्रात लिहितात तेच का?"
"हो हो... तोच मी." मला नाही म्हटले तरी थोडं फुशारल्यासारखं झालं, "गेल्याच आठवड्यात "नवशक्ती”त मी मुंबईत पावसाळ्यात जे पाणी तुंबतं त्यावर एक अभ्यासू लेख लिहिलेला होता." 
"मी वाचलाय तो. आमच्या ऑफिसात सगळे पेपर येतात ना... तुम्ही या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याचा वेध घेतलेला आहे.”
"थँक्यू... थँक्यू" मी चेहऱ्यावर विनयी भाव आणून म्हणालो, “तुमच्या या चाळीवरही लिहिण्याचा विचार आहे.”
"अरे वा वा वा! पण त्या अगोदर तुम्ही आमचा शूटिंग सेक्शन पाहिलात की नाही?" 
"नाही."
“मग तुम्ही काहीच पाहिलं नाही. चला... चला... मी तुम्हांला आधी तो दाखवतो. आम्ही उठलो. मी कॉफीचे पैसे देण्यासाठी खिशातून पैशाचे पाकीट काढलं. त्यावर बापूसाहेब म्हणाले,
"आज तुम्ही आमचे गेस्ट आहात. तेव्हा मी काही तुम्हांला पैसे देऊ देणार नाही. आणि वेटरही तुमचे पैसे घेणार नाही..." 
मी आनंदाने पाकीट खिशात घातलं. 

शूटिंग सेक्शन पाहण्याची वेगळी 50 रुपये प्रवेश फी होती. पण साक्षात बापूसाहेबच बरोबर असल्यानंतर मला कोण विचारणार? आत गेलो तेव्हा लक्षात आलं की ही फारच जुनी चाळ आहे. अगोदर पाहिलेल्या चाळीपेक्षाही. तिथे मोठमोठे लाईटस् खालीवर हलवले जात होते. चाळीतली माणसं तशाच गर्दीत आपल्या दोन दोन खोल्यांच्या बिर्हाडात राहत होती. एक आजीबाई दारात बसून तांदूळ निवडत होत्या. एका घराच्या कठड्यावर पायजमा, लुगडे आणि काही शर्ट, पँट असे कपडे वाळत टाकलेले होते. खाली जे शूटिंग चाललेलं होते, त्यात करिश्मा कपूर होती. तिच्या "करिश्मा : द मिरॅकल्स ऑफ डेस्टिनी" या महामालिकेचं शूटिंग चालू होते. करिश्माने पांढऱ्या केसांचा टोप घातलेला होता. अगदी वेगळीच दिसत होती. बाजूच्या हिरवळीवर काही ज्युनिअर आर्टिस्ट बसलेले होते. करिश्माच्या घरी कोण तरी येतं असं दृश्य होतं. ती त्याचे हसतमुखाने स्वागत करते, एवढाच शॉट होता. करिश्माने एका टेकमधेच तो ओके केला. नंतर ती तिथल्याच एका खुर्चीवर बसून एक कीटकनाशकयुक्त थंड पेय पिऊ लागली. मी तेवढ्यात चपळाई करून माझ्या टेलिफोन डायरीतच तिची स्वाक्षरी घेतली. ती घेत असतानाच माझा आणि तिचा असा एक फोटो एका फोटोग्राफरनं काढला.

वरच्या मजल्यावर काही मराठी मालिकांची, मराठी सिनेमांची चित्रीकरणं चालू होती. एके ठिकाणी उषा नाडकर्णी ही चाळीतली फटकळ बाई चाळीतल्या कुणाचं तरी पोर आजारी पडल्यावर अचानक तिच्या फटकळपणामागे दडलेल्या प्रेमळपणाचं दर्शन घडवते, असा शॉट होता. तिचा अभिनय डोळ्यांत पाणी आणणारा होता.

अगदी बरच्या मजल्यावर आणखी एका मालिकेचं चित्रीकरण चालू होतं. विजय चव्हाण, प्रदीप पटवर्धन ही वयस्क मंडळी डोळे फाडफाडून चाळीत नव्याने राहायला आलेल्या एका सुंदरीकडे बघत असतात. त्याच वेळी त्यांच्या बायका मागून येऊन त्यांचा कान पकडतात, असं विनोदी दृश्य चित्रित केलं जात होतं. या प्रकारचा विनोद तसा मला नवीन नव्हता. चाळीवरल्या अनेक मराठी मालिकांमध्ये मी तो पाहिलेला होता. पण त्याचं चित्रीकरण पाहताना आगळीच मजा येत होती.

शॉट झाल्यावर मी म्हणालो, "चला, आपण निघू या आता."
बापूसाहेबांनी मला विचारलं, "तुम्हांला येथील कलाकारांच्या सह्या नाही का घ्यायच्या?"
"छे छे! मराठी नट-नट्या बाहेर भेटतात कुठंही. हिंदीतल्या नट-नट्यांचं तसं नाही."

आम्ही परत जायला निघालो. "तुम्ही मग गेल्या आठवड्यात इथे यायला हवं होतं. महेश मांजरेकरनं ही आख्खी चाळ बुक केली होती. तिन्ही मजले. आणि संजय दत्त, सुनील शेट्टी आणि त्याची बहीण.... काय बरं तिचं... नाव अगदी डोळ्यांसमोर आहे बघा... 
"सुनील शेट्टीची बहीण? नवीन नटी आहे का कुणी?" मी विचारलं.
"छे हो! काही महिन्यांपूर्वी तिच्या आई-बापांना अंडरवर्ल्डशी संबंध ठेवल्या बद्दल अटक करण्यात आली होती बघा...
"शिल्पा शेट्टी?" मी विचारलं. 
"बरोबर. तीच ती!" बापूसाहेब म्हणाले.
"माफ करा हं बापूसाहेब, पण माझ्या अंदाजाप्रमाणे ती सुनील शेट्टीची बहीण नाही." मी त्यांना दुरुस्त करत म्हणालो.
"मग तुम्ही का माफी मागताय? ती सुनील शेट्टीची बहीण नाही, यात तुमचा काय दोष? नसेलही. मला आपलं त्यांची आडनावं सारखी असल्यानं ते भाऊ- बहीण असावेत असं वाटलं. आपण तिला आडनाव भगिनी म्हणू या." खालचा सगळा एरिया लाईटच्या प्रकाशात नुसता न्हाऊन निघाला होता. एका गाण्याचं शूटिंग करण्यात आलं. गाण्याचे शब्द मोठे मजेशीर होते. काय बरं.. अं... अं... अं. थोडा वेळ "अं.. अं... अं" करत गुणगुणल्यावर त्यांना गाण्याचे शब्द आठवले. "हं... आता आठवले... ऐका....
"तू च्यालवाली पोर
क्यों करती है शोर?
इश्क पर, पोरी,
नहीं है जोर
पोरी, नहीं है जोर"
"वा वा! छान शब्द आहेत. खरंच मी आठवड्यापूर्वीच आलो असतो तर..." मी हळहळत म्हणालो.
"पुढच्या वेळी या. इथं सारखी कुठली ना कुठली शूटिंग चालूच असतात. तुम्हांला ते गाणं ठाऊक आहे ना... "ढगाला लागली कळ... पानी थेंब थेंब गळं?"
"दादा कोंडक्यांच्या सिनेमातलं?" 
"छे हो! त्याचा जो रिमिक्स करण्यात आला ना... पाहिला का तुम्ही? तो या चाळीच्या पुढेच शूट करण्यात आला. त्या नाचणाऱ्यांच्या मागं जी चाळ दिसते ती हीच चाळ आहे आमची." बापूसाहेब म्हणाले.

एवढ्यात समोरून एक आजी आल्या. साधं लुगडं, तसलाच ढगळ झंपर. केसांचा छोटासा बुचडा, कमरेत वाकलेल्या...
"काय करमरकर आजी? डोळे काय म्हणताहेत?" बापूसाहेबांनी विचारलं.
"काय म्हणणार बापू, आता हे शूटिंगचे लाईट सोसत नाहीत डोळ्यांना. घराचं दार बंद करून निवांत झोपावं म्हटलं तर सगळ्या शूटिंगवाल्यांना दार उघडं लागतं. नाही तर ती चाळ कशी वाटणार?"
"खरं आहे." बापूसाहेब सहानुभूतीपर आवाजात म्हणाले.

"परवा तर बापू, गंमतच झाली. मी दुपारी कडकडीत वाळलेले कपडे गोळा करून आत आणले आणि घड्या करून कपाटात ठेवले. तर तो आला की डायरेक्टर म्हणाला, "माँजी, ये आप ने क्या किया? कपडे वहीच रखिए, नहीं तो कंटिन्यूटी का प्रॉब्लेम आ जाएगा." पुन्हा सगळे कपडे कपाटातून काढून घड्या मोडून पुन्हा कठड्यावर वाळत घालावे लागले. त्या डायरेक्टरला मनात म्हटलं, "मेल्या, जळ्ळी तुझी ती कंटिन्यूटी!" आजी त्राग्याने म्हणाल्या.

आजींचा निरोप घेऊन आम्ही पुन्हा कॅफेटेरियामध्ये आलो. आता कॉफीची जरूर होतीच.
"मला आपली छोटीशी मुलाखत घ्यायला आवडेल." मी नम्रपणे म्हणालो.
"जरूर. तुम्ही मोठीशी मुलाखत घेतली तरी माझी हरकत नाही." हसत हसत बापूसाहेब म्हणाले, 
"विचारा... फायर..."

"प्रश्न विचारण्यापूर्वी मी पहिल्यांदा मनमोकळेपणानं सांगून टाकतो की मला तुमची चाळ खूप आवडली. माझ्या बालपणाच्या आठवणी जाग्या झाल्या. माझा मामा अशाच एका गिरगावातल्या चाळीत राहायचा. माझी आत्याही परळमधल्या एका चाळीत राहायची. मे महिना सुरू झाला की आमचा मुक्काम या दोन चाळींमध्ये पडायचा. चाळीतली ती भांडणं, ते हेवेदावे, उत्सवात सादर केले जाणारे विविधगुणदर्शन, ती नळावरची भांडणं, त्या रोज सकाळी हाती टमरेल घेऊन संडासासमोर लागलेल्या रांगा... सारं सारं मला आठवलं. येथील मॅजेस्टिक सिनेमा थिएटरमध्ये आम्ही किती तरी सिनेमे पाहिले आहेत..." मी असं किती वेळ भारावून बोलत बसलो असतो सांगणं कठीण आहे.

पण मला मधेच अडवून बापूसाहेब म्हणाले, “आमची चाळ बघितली की मराठी माणसांची अशीच अवस्था होऊन जाते. कुणी पूर्वी स्वतः चाळीत राहिलेले असतात, कुणाचा काका, कुणाचा मामा, कुणाची मावशी, कुणाची आत्या... चाळीशी संबंध आलेला नाही असा मराठी माणूस विरळा! अगदी लहानपणापासून ब्लॉकात किंवा बंगल्यात वाढलेल्यांनीसुद्धा खरी नाही, तरी पु. लं. ची "बटाट्याची चाळ" तरी पाहिलेली असतेच. त्यामुळे चाळीशी असोसिएशन नाही असा मध्यमवर्गीय माणूस शोधणं कठीण!"

“तुम्हांला ही चाळ जशीच्या तशी इतका काळ कशी काय ठेवता आली?" मी पहिला प्रश्न केला.

"चांगला प्रश्न विचारलात. याचं अर्ध उत्तर मी मघाशी बोललो त्याच्यात आहेच. पण मराठी माणसाला पैशाचा एक अपराधगंड आहे. म्हणजे पैसे मिळून अगदी आलिशान फ्लॅटमध्ये जरी तो राहायला गेला तरी त्याला वाटत राहतं की चाळीतली मजा या फ्लॅटमध्ये नाही. फ्लॅटमध्ये राहतो आहे म्हणजे आपण एखदा गुन्हा करतो आहोत, असंच त्याला वाटत राहातं. खेड्यातून शहरात येऊन चांगली नोकरीबिकरी पटकावून स्वतःची भरभराट करून घेणार्यालाही आपल्या कोकणातल्या छोट्या गावात किती बरं होतं, असंच सतत वाटत राहतं. म्हणजे तो तशी संधी चालून आली तर मुळीच खेड्यात किंवा जुन्या चाळीत राहायला जाणार नाही. पण गहिवर काढायला का होईना, पण त्याला अशी एखादी चाळ लागते."

"अगदी बरोबर आहे तुमचं!" मी त्यांच्या दूरदर्शीपणाला दाद देत म्हणालो, 
"काय झालं, एक दिवस मी पु.लं.ची “बटाट्याची चाळ" पाहिली. मग ही कल्पना मला सुचली. मी आमच्या चाळीतल्यांची एक सर्वसाधारण सभा त्या काळात आयोजित केली. तीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट. मी त्या सभेत मराठी माणसांचा "चाळ" हा कसा विकपॉईंट आहे हे सांगितलं. तेव्हा "आपण चाळ विकून झटपट पैसा करण्याच्या मागे लागण्यापेक्षा ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी जगवू या" असा प्रस्ताव मी मांडला. तो चाळकऱ्यांना मनापासून पटला. आणि ही चाळ आजतागायत शाबूत राहिली."

"पण काळ बदलल्यावर नवीन पिढी लहानाची मोठी झाल्यावर त्यांना चाळ विकावी किंवा ती पाडून त्या जागी आलिशान बहुमजली गगनचुंबी इमारत उभी करावी असा मोह नाही का झाला?" मी पुढला प्रश्न केला.

"उलट झालं. एकीकडे जागोजागच्या चाळी जसजशा उद्ध्वस्त होऊ लागल्या तसतसा आमचा भाव वाढत गेला. "बटाट्याची चाळ" नंतर "संभुसांच्या चाळीत" सारखी नाटकं आली. ती बघून मराठी माणसाला चाळ पाहण्याची आणखी ओढ वाटू लागली. मग चाळ पाहण्यासाठी तिकीट लावण्याची कल्पना पुढे आली. त्याला त्या काळात एवढा प्रतिसाद मिळायला लागला की परदेशातील मराठी माणसंसुद्धा मुद्दाम वेळात वेळ काढून ही चाळ बघण्यासाठी येऊ लागली. त्यामुळे ज्या काळात तरुण पोरं बेकारीमुळे "वासुनाक्या” वर उभी राहायची, त्या काळात आमच्या चाळीतल्या पोरांना चाळीतल्या चाळीतच स्वयंसेवक म्हणून काम मिळू लागलं आणि ते करताना बऱ्यापैकी पैसा सुटू लागला. कुणी तिकीटं विकायला राहिला तर कुणी तिकिटं फाडायला राहिला. कुणी गर्दीचं नियंत्रण करण्याच्या कामावर राहिला. त्यामुळे नव्या पिढीला "चाळ तशीच ठेवली" याचा अधिकाधिक आनंद होऊ लागला."

"तुमची चाळ चित्रीकरणासाठी द्यावी हे तुम्हांला कसं सुचलं?" मी आणखी एक प्रश्न केला.

"मराठी सिनेमाची कथा लिहिणारे मराठी लेखकच होते. त्यामुळे कथेत कुठल्याही पात्राचा नातेवाईक मुंबईत आहे म्हटलं की तो चाळीत राहणार हे उघडच होतं. साहजिकच सुरुवातीला मराठी सिनमांचे निर्माते आम्हांला शूटिंगसाठी चाळ मागू लागले."

"मग भरपूर पैसा मिळाला असेल ना तुम्हांला? कारण त्या काळात बऱ्याच मराठी सिनेमांत चाळ असायचीच. आणि ती चाळ नसली तर तो हमखास तमाशापट असायचा आणि त्यातल्या गायिकेच्या पायात "चाळ" असायचे. त्यामुळे त्या काळात मराठी सिनेमाची अशी एक व्याख्या तयार झाली की "ज्या सिनेमात "चाळ" आहे तोच मराठी सिनेमा." मी माफक कोटी केली.

"क्या बात है!" बापूसाहेबांनी मला टाळी देऊन या कोटीला दाद दिली. नंतर ते म्हणाले, "मराठी सिनेमा त्या काळी खूपच दरिद्री होता. त्यामुळे मराठी निर्माते आम्हांला बऱ्याचदा शूटिंगसाठी चाळ फुकटातच मागायचे. काहीजणांची तर आम्ही त्यांना प्रेमाने पोहे, चहा, कॉफी वगैरे आतिथ्य पुरवावं अशी अपेक्षा असायची. प्रत्येक निर्माता चाळ मागताना अगोदर रडरड रडून घ्यायचा आणि नंतर "मराठी सिनेमांचं भवितव्य आता तुमच्याच हातांत आहे" असं साकडं आम्हांला घालायचा. आम्ही या सार्या प्रकारानं वैतागलो आणि दोन वर्ष कार्यकारी मंडळात "मराठी सिनेमाला चाळ द्यायची नाही” असा ठराव पास केला. त्या काळात “मराठी माणूस मराठी चित्रपटाचा वैरी" अशा शीर्षकाचा आमच्यावर टीका करणारा एक जळजळीत लेख “मराठी चित्रपट निर्माता संघा”च्या एका पदाधिकाऱ्याने "रसरंग" मध्ये "चित्रमित्र" या टोपणनावाने लिहिला होता. तो आमचा "बॅड पॅच" म्हणता येईल. 

"मग ही परिस्थिती कधी बदलली?"
"अलीकडच्या काही वर्षांत ती बदलली. मराठी मालिकांचं पेव फुटलं. आणि त्यात "चाळ" आलीच. जे मुळात अस्तित्वातच नसतं, ते माणसाला हवंहवंसं वाटतं. एकत्र कुटुंबपद्धतीचे केव्हाच तीन-तेरा वाजले. पण एकता कपूरनं तेच कुटुंब तिच्या मालिकांमधून दाखवून खोऱ्याने पैसा ओढला. मराठी माणसालाही या “चाळी"चं याच कारणानं आकर्षण असल्यानं “चाळ नावाची वाचाळ वस्ती" ते "ही चाळ कुरू कुरू” पर्यंत सार्या मालिका बऱ्यापैकी धंदा करू लागल्या. चाळीतली विक्षिप्त, भाबडी, कुचंबणारी, पापभीरू, नुसती भीरू, एरवी मांडणारी पण प्रसंगी जीवाला जीव देणारी माणसं ही प्रत्यक्षात दिसत नसली तरी छोट्या पडद्यावर का होईना, पण त्यांचं दर्शन लाभावं, असं मराठी माणसाला वाटायला लागलं. त्यामुळे एपिसोडमागून एपिसोड आमच्या चाळीत शूट होऊ लागले." 

"पण तुमच्या चाळीतल्या रहिवाश्यांना या शूटिंगचा त्रास होत नाही का?"
"काय झालं, पहिल्यांदा चाळीत शूटींग होतंय, याचंच त्यांना थ्रिल वाटत होतं. काही वेळा “आजी तुम्ही मागंच तांदूळ निवडत बसा" किंवा "आजोबा, तुम्ही कठड्याला रेलून उभे राहा" असं सुरू झालं. काही वेळा तर त्यांनी धरून आणलेल्या कलाकारांपेक्षा आमच्या चाळीतली मंडळी अधिक अस्सल वाटायची. कारण तशी ती होतीच. मग आम्हीच त्यांना माणसं पुरवण्याचं कंत्राट घेतलं. आमच्या चाळकऱ्यांना प्रत्येक शिफ्टचे पैसे द्यायला लावले. आता थोडी गैरसोय सोसून आपण नेहमी वापरतो तसंच स्वतःच्या घरात वावरण्याचे कुणी दोनशे ते पाचशे रुपये द्यायला लागलं तर ते कुणाला नको आहे? तुम्हांला गंमत सांगतो, चाळीतले काही कर्तबगार तरुण चांगल्या नोकऱ्या सोडून बक्कळ पैसे कमवू लागले. त्यांनी उपनगरात फ्लॅट घेतले. आपल्या आई-वडिलांना ते म्हणू लागले, “तुम्हीही आमच्याबरोबर चला,” पण म्हाताऱ्यांचं तिथं मन रमत नाही.

इथं नुसतं संडासाच्या रांगेत टमरेल घेऊन उभे राहण्याचे जर दिवसाकाठी दोनशे-तीनशे रुपये सुटत असतील तर ते कशाला उपनगरात जातील? बरीच माणसं इथं छान रमलेली आहेत. मघाच्याच करमरकर आजी आहेत, त्यांचा मुलगा कॅनडात असतो. आजींना म्हणतो, "चल तिकडं." त्या म्हणतात, "इथं माझी मी स्वावलंबी आहे. माझं मनही या चाळीत आणि शूटिंगमध्ये गुंतलेलं राहतं, मी तिथं कॅनडात येऊन करू काय?" तर असा आमच्या चाळीतला प्रकार आहे."

"म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना एक वेगळाच रोजगार तुम्ही उपलब्ध करून दिलेला आहे तर?"
"तसं म्हणायला हरकत नाही. 'ज्येष्ठ नागरिकांसाठी हे केलं पाहिजे- ते केलं पाहिजे' असं म्हणणारे खूप असतात. आम्ही जे करायचं ते करून दाखवलेलं आहे." बापूसाहेब आत्मविश्वासाने बोलत होते.

"हिंदी सिनेमाचे लोक चाळीकडे कसे काय वळले?" मी विचारलं.

"त्यात आमचं कर्तृत्व शून्य आहे. मध्यंतरी असा एक समज रूढ झाला की चाळीतल्याच निरागस आणि निष्पाप तरुणांना गुन्हेगारी जगतात वापरलं जातं. तेव्हा चाळ आणि गुन्हेगारी यांचा अतूट संबंध आहे, असं हिंदी सिनेमावाल्यांना वाटू लागलं. कदाचित "दगडी चाळ" वगैरे नावांमुळे त्यांचा घोटाळा झाला असावा. तेव्हा त्यांना आमची चाळ फारच सोयीची वाटू लागली. "सत्या"चं शूटिंग आमच्या चाळीतच झालेलं आहे.
"काय सांगताय काय?" मी आश्चर्यानं विचारलं.
"हा पाहा माझा उर्मिलाबरोबरचा फोटो." असं म्हणून त्यांनी खिशातून पाकीट काढून त्यातला फोटोच दाखवला. मला बापूसाहेबांच्या भाग्याचा हेवा वाटल्याशिवाय राहिला नाही. चोर तिच्या खांद्यावर हात ठेवून उभा होता! 

"हिंदी सिनेमावाले दुप्पट पैसे देत असणार." मी शंका प्रकट केली.
"दुप्पट? आम्ही पाचपट-सहापट पैसे त्यांच्याकडून घेऊ लागलो. आम्ही आमच्या चाळकऱ्यांचे मानधनही खूपच वाढवलं. त्यांचं चाळकरी म्हणून दिसणं तर अस्सलच होतं, पण त्यांचं मराठीमिश्रित किंवा मराठी ढंगाचं हिंदीही चाळवाल्या सिनेमात काम करताना "मेन अॅसेट" ठरू लागलं. आता आमच्या चाळीतले ज्येष्ठ नागरिक त्यांच्या एक्झिक्युटिव्ह पोरांपेक्षा जास्त पैसे कमवू लागले."
“तुम्हा चाळकर्यांना पैसे कमावण्याची कलाच अवगत झाली." मी कौतुकानं म्हणालो.
"ते काही विचारू नका. एकदा आमच्या चाळीत शूटिंगसाठी शाहरूख खान आला होता. योगायोगाने तो रक्षाबंधनाचा दिवस होता. आमच्या चाळीतल्या पूर्णिमा नारकरनं एक राखी आणून शाहरूखला बांधली आणि त्याच्या तोंडात पणशीकरांच्या बर्फीचा तुकडा भरवला तर त्यानं भारावून जाऊन खिशातून एक हजाराची नोट काढून तबकात टाकली. आता बोला..."
"काय सांगता काय? एक हजाराची नोट? मी तर ती अजून पाहिलीही नाही." मी आपण होऊन कबुली देऊन टाकली.

"खरी गंमत पुढेच आहे. हिंदू-मुस्लिम दंग्याच्या पार्श्वभूमीवर पूर्णिमा शाहरूखला राखी बांधतानाचा फोटो "टाइम्स” ने पहिल्या पानावर टाकला. त्यानंतर हिंदी नटांना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधायची, हे चाळीतल्या मुलींनी ठरवूनच टाकलं. हिंदी नटांना आर्थिकदृष्ट्या पुढे पुढे हे त्यांना इतकं काही महागात पडू लागलं, की त्यांनी आपापल्या डायरेक्टरांना विनंती करून रक्षाबंधनाच्या दिवशीचं शूटिंगच कायमस्वरूपी रद्द करून टाकलं. आता मराठी मालिकेच्या निर्मात्यांना चांगलं ठाऊक झालंय की रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला कधीही चाळ शूटिंगसाठी मिळू शकते." बापूसाहेब हसत हसत म्हणाले.

"तुम्ही आलेल्या लोकांना पाहण्यासाठी खुली ठेवलेली जी चाळ आहे ती नंतर बांधली का?" मी विचारलं.
"तुम्हांलाही असंच वाटलं ना? ती मूळची चाळ आहे. पूर्वीची चाळ आम्ही शूटिंगलापण द्यायचो. पण येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा नट-नट्यांना फारच त्रास होऊ लागला. शिवाय जे चाळ बघायला म्हणून तिकीट काढून आलेले असायचे, त्यांनाही ती धड पाहता येईना. जिथं शूटिंग चालू आहे त्या भागातून त्यांना सहजपणे जाणं मुश्किल झालं, आणि केव्हाही ते तर आमची पहिली प्रायॉरिटी होते. त्यांना चाळ निवांत पाहता यावी, जुन्या चाळीच्या आठवणी जाग्या व्हाव्यात म्हणून आम्ही नळावरच्या भांडणांपासून सारं काही अॅरेंज केलं. एवढंच नव्हे तर आपला प्रेमळ मामा, प्रेमळ काका, प्रेमळ आत्या, प्रेमळ मावशी, प्रेमळ आजी-आजोबा भेटल्याचा आनंद त्यांना व्हावा म्हणून मुद्दाम तसे "टाइप" बनवले आणि चाळीच्या आसपास वावरायला सोडले. तुम्हांला तुमचा एखादा नातेवाईक भेटला की नाही?" बापूसाहेबांनी मला हसत हसत विचारलं.

"भेटला ना- आमच्या आत्याचा दोन वर्षांपूर्वी वारलेला नवराच साक्षात भेटला." मी त्यांना खिलाडूपणे सांगून टाकले.
"अहो, हे तर काहीच नाही. एक कॅलिफोर्नियातल्या मराठी कुटुंबातली बाई ही चाळ बघण्यासाठी मुद्दाम आली होती. लग्न होऊन तिकडे गेली, त्यानंतर दहा वर्षांनी आली, आणि तिला चाळीत तिचा “आत्येभाऊ" भेटला. तुम्हांला खोटं वाटेल, ती त्याला मिठी मारून ढसाढसा रडली. त्याचा खांदा तिच्या अश्रूंनी पार चिंबचिंब भिजून गेला. ती म्हणाली, इतक्या वर्षांनी चाळ पाहून मला सारखं गहिवरून येतच होतं. पण माझा आत्येभाऊ इथं भेटेल, याची मी कल्पनासुद्धा केली नव्हती. तुम्ही ओळखलं असेलच की तो आमचा चाळकरी आर्टिस्ट होता."
"कमाल आहे!"

“आता हा आनंद जर आलेल्या प्रेक्षकाला पुरेपूर द्यायचा असेल तर शूटिंग तिथं चालू ठेवण्यात अर्थ नव्हता. आमच्याकडे जागा होती. पैसेही खूप जमा झालेले होते. तेव्हा आम्ही एक जुनाट दिसणारी नवी चाळ खास शूटिंगसाठी म्हणून बांधली. तुम्हांला जी जुनी वाटली ती सर्वांत नवी चाळ आहे.” बापूसाहेबांनी खुलासा केला.

“आता शेवटचा प्रश्न. तुमच्या पुढच्या योजना काय आहेत?" मी विचारलं. 
"खूप आहेत. आमची स्वतःची बँक आम्ही स्थापन केलेली आहे. ज्या कुणाला "चाळी"वर चित्रपट किंवा टीव्हीची मालिका बनवायची असेल त्यांना आम्ही अल्प व्याजदराची कर्जे पुरवतो. तेवढंच नाही तर आमच्या चाळीच्या भाड्यात, येथील कलाकारांच्या दरात, कॅफेटेरियाच्या दरात पाच टक्के सूट देतो. आमच्या या योजनेचा फायदा घेऊन सई परांजपे चाळीची पार्श्वभूमी वापरून एक चित्रपट, एक टीव्ही मालिका, एक बालचित्रपट आणि एक नाटक आणते आहे. त्या चारी गोष्टींना आमच्या चाळीच्या बँकेनेच कर्जपुरवठा केलेला आहे. या पाहा आल्याच सई परांजपे.....

सई डोळ्यावरचा गॉगल कपाळाच्याही वर म्हणजे केसांवर सरकवून आमच्याच दिशेने येत होती. “शंभर वर्ष आयुष्य आहे तुम्हांला." बापूसाहेब तिला म्हणाले, "आम्ही तुमच्याबद्दलच बोलत होतो.”

मग त्यांनी सईची अन् माझी ओळख करून दिली. आम्हांला ते म्हणाले, “तुम्ही दोघं बोलत बसा. मी तुमच्यासाठी आणखी दोन कॉफ्या पाठवून देतो. आणि तुम्हांला आमचं प्रेस किट आणून देतो. त्यात चाळीचे फोटो आहेत. माझा स्वतंत्र फोटो आहे. चाळीच्या बॅकग्राऊंडवर काढलेला एक फोटो आहे. शिवाय काही हिंदी सिनेमांचे, मराठी मालिकांचे स्टिल्सही त्यात आहेत. आलोच मी...."

सईला मी तिच्या चाळीची पार्श्वभूमी असलेल्या “कथा" या विनोदी चित्रपटाची आठवण करून दिली. हा चित्रपट अजूनही लोकांच्या लक्षात आहे, हे बघून तिचे मन आनंदाने भरून आलं. ती म्हणाली, जगाच्या पाठीवर कुठंही जाऊन आलो तरी मनानं आपण चाळकरीच असतो. आता माझंच पहा ना... मी आख्खं जग हिंडले पण माझा एक पाय अजून "चाळी”तच आहे. रादर मी तर असं म्हणेन की चाळ अजूनही माझ्या पायात पायात मांजरासारखी येते आहे."

सईचं मांजरप्रेम तिच्या चाळीवरच्या प्रेमाइतकंच जुनं आहे, हे मला ठाऊक होतं. नंतर कॉफी पिता पिता आम्ही दोघेही चाळीच्या जुन्या आठवणींत रंगून गेलो. बापूसाहेब प्रेस किट घेऊन कधी आले ते गप्पांच्या नादात आमच्या लक्षातही आलं नाही. नंतर एका भारावल्या मनःस्थितीतच मी सईचा, बापूसाहेबांचा आणि बापूसाहेबांच्या चाळीचा निरोप घेतला.

मराठी माणूस हा धंद्यात नेहमी मार खातो, असं म्हटलं जातं. पण मराठी माणसाच्या मनात घर करून राहिलेल्या "चाळी"चाच असा धंदा करावा ही कल्पकता दाखवणाऱ्या आणि हा धंदा यशस्वी करून दाखवणाऱ्या बापूसाहेबांना किती दाद देऊ आणि किती नको असं मला होऊन गेलं. बापूसाहेब, मानलं तुम्हांला तुम्ही खरोखरच ग्रेट आहात!
 

Tags: Sai Paranjape Union Jack Shaniwarwada Pune Mahesh Manjrekar Usha Nadkarni Shahrukh Khan Sanjay Dutt Shilpa Shetty Sunil Shetty Paral Girgaon Mumbai Chaal सई परांजपे यूनियन जॅक शनिवारवाडा पुणे महेश मांजरेकर उषा नाडकर्णी शाहरुख खान संजय दत्त शिल्पा शेट्टी सुनील शेट्टी परळ गिरगाव मुंबई चाळ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मुकुंद टाकसाळे,  पुणे
mukund.taksale@gmail.com

मुकुंद टाकसाळे हे विनोदी लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके