डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

रात्रंदिन आम्हा परीक्षेचा प्रसंग

परीक्षा पद्धतीचे अवास्तव स्तोम शिगेला पोहोचले होते, तेव्हा म्हणजे 1995 मध्ये लिहिलेली ही हास्यकथा, परीक्षा पद्धतीचे ओझे उतरविले गेल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करणे औचित्यपूर्ण वाटते. - संपादक 

1 :

: आंटीला हाक मार- म्हण, आं...टी.

: आं...टी

: शाब्बास!

: आता ‘मम्मी’ म्हण.

: म...म्मी!

: व्हेरी गुड!

: आता ‘टाटा’ कर आंटीला... म्हणजे तुम्ही थांबा हो. तो कसा करतोय ते दाखवत होते. ‘टाटा’ कर आंटीला-

: नाऽई

: मग आंटी म्हणतील, तुमचा बाला वेडा आहे. म्हण एकदा. फक्त एकदाच.

: राहू द्या हो.

: नाही, नाही. म्हणेल तो. तसा तो नेहमी म्हणतो. त्याच्या मूडवर आहे.

: अँऽऽऽ : पटकन म्हणून टाक बघू- टा ऽ टा

: टाऽटा

: शाब्बास! फारच हुशार आहे हो हा! त्यानं टाटा केलाच आहे तर निघत्ये आता मी.

 2 :

: अंकलना ‘शुभं करोति’ म्हणून दाखव-

: मी नाई जा- : बरं मग, ‘मोरया मोरया’ दाखव-

: मी नाई जा-

: राहू द्या. न का म्हणेना काही...

: पण नेहमी म्हणतो. हे बघ, तू जर ‘शुभं करोति’ म्हटलं तर अंकल तुला चॉकलेट देतील.

: पण मी चॉकलेट आणलेलं नाही

: ती आपली गंमत हो. चॉकलेटचं नाव काढलं की ताबडतोब म्हणायला सुरुवात करतो तो-

: मोलया मोलया मी बाल ताने 

: तुझीच सेवा कलू काय जाणे

: अन्याय माझे कोट्यानु कोटी

: मोलेश्वलया, तू घाल पोटी.

: शाब्बास! आता अंकल तुला उद्या चॉकलेट देतील अं...

: मना चॉकलेट...

: उद्या म्हणून सांगितलं ना...

: फार हुशार आहे हो मुलगा तुमचा. त्याला मी आत्ता बाहेर जाऊन चॉकलेट आणून देतो.

3 :

: अरेच्चा! हा केवढा मोठ्ठा झाला, नाही?... कितवीत आता? एट्‌थमध्ये का?

: एट्‌थ? काहीतरीच काय? अहो, वयानं तो लहान आहे. उंची मात्र अगदी त्या ‘कॉम्प्लान’ जाहिरातीतल्या मुलासारखी नुसती वाढतच चाललीय.

: तो कॉम्प्लान बॉय आणि तुम्ही ‘कॉम्प्लान’ ममी!

: छे हो! मुलांकडं लक्ष द्यायला दिवसाचे चोवीस तास अपुरे पडतात मला!

: म्हणजे?

: आत्ता टर्मिनल आलीय जवळ- शिवाय स्कॉलरशिपची परीक्षा... झालंच तर सकाळी मॅथ्स आणि इंग्लिशसाठी ट्यूशन लावलीय. ‘टिळक  विद्यापीठा’च्या परीक्षांसाठी बसतोय तो. मी ‘साहित्य परिषदे’च्या मराठीच्या परीक्षेलाही बसवलेय त्याला. अलीकडं आपलीच पोरं इंग्रजी माध्यमामुळं मराठीत ‘वीक’ पडत चाल्लीत बघा-

: खरं आहे. : अरे, अंकलना तुझं ते हे सर्टिफिकेट दाखव ना. ‘राष्ट्रभाषा सभे’च्या हिंदीच्या परीक्षेत तो पहिला आला.

: वा वा वा! अब हमको तुम्हारे साथ हिंदी में बोलना पडेगा, क्यों?

: काय रे, त्यांना हिंदीत उत्तर दे ना-

: काय गं तुझं मम्मी?

: असा वैतागतोस काय? तुम्ही विचारा हो तुमचा हिंदी प्रश्न पुन्हा एकदा -  

: ‘वा वा वा!’ हे आता म्हणत नाही, पुढचं म्हणतो फक्त- अब हमको तुम्हारे साथ हिंदी में बोलना पडेगा, क्यों?

: जी हां!

: शाब्बास!

4 :

: ‘टिळकांनी सांगितलं- मी फोलपटं खाल्ली नाहीत- मी काही शेंगा वर्गाच्या बाहेर टाकणार नाही.’

: अरे, असं काय करतोस? शंभर वेळा पाठ म्हणवून घेतलं तरी अजून चुकतोच आहेस तू! टिळकांनी कसं सांगितलं?

: बाणेदारपणे.

: शाब्बास!

: काय सांगितलं? ‘फोलपटं खाल्ली नाहीत’ हे सांगितलं?

: नाही, ‘शेंगा खाल्ल्या नाहीत’ हे सांगितलं.

: शाब्बास! : ‘आणि वर्गाच्या बाहेर काय टाकणार नाहीत’ म्हणाले ते?

: फोलपटं!

: शाब्बास! आता पुन्हा एकदा शेवटचा पॅसेज नीट म्हणून दाखव बघू.

: टिळकांनी बाणेदारपणे सांगितलं- मी शेंगा खाल्ली नाहीत... : ‘खाल्ल्या’ नाहीत... : खाल्ल्या नाहीत, मी काही शेंगा- सॉरी- टरफलं- वर्गाच्या बाहेर टाकणार नाही... असे होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. दिव्य अलौकिक तुमचे जीवन-स्मृतीस तुमच्या शतश: वंदन! जयहिंद!

: शाब्बास! अजून पाच वेळा म्हटलसं तर नक्की वक्तृत्वस्पर्धेत तुझा नंबर येईल.

: होय मम्मी.

: कर पाठ.

5 :

: मम्मी, मम्मी, मी वक्तृत्व स्पर्धेत तिसरा आलो.

: तिसरा का? पहिला का नाही?

: अगं, पहिला मराठी मीडियमच्या मुलाचा आला.

: अरे, पण आफ्टरॉल मराठी इज युवर मदरटंग!

6 :

: मम्मी, मी इंग्रजीच्या परीक्षेत तिसरा आलो.

: मम्मी, स्कॉलरशिपच्या परीक्षेत दुसरा आलो.

: मम्मी, टर्मिनलला सायन्समध्ये दोन मार्क कमी पडल्यानं माझा पहिला नंबर हुकला.

: मम्मी, संगीताच्या परीक्षेत मला भूप ओळखता आला-

: शाब्बास! असाच भूप भूप- सॉरी, खूप खूप मोठ्ठा हो.

7 :

: मम्मी, तू काय करत्येस हे?

: वडे रे- बटाटे वडे. आणि तू आता मध्ये लुडबुडू नकोस.

: मला सारण खायचंय.

: हं, खा- घे. अगोदरच उशीर झालाय. तशात अजून कसलीच तयारी नाही. सगळ्या बायका येण्याची वेळ झालीय. मला तर काय करावं सुचत नाही अगदी. त्या पाटणकरांकडं आम्ही गेलो तेव्हा त्या शैलाताई सारं आवरून तयारीत बसल्या होत्या. गेलो की तळले बटाटेवडे! कसं जमतं एकेकीला कुणास ठाऊक! आमचा म्हणजे सदैव रडा कारभार! कधी वेळेवर आटोपणार नाही!

8 :

: होईल ना रे सारं नीट? एवढे सहा-सात जण पाहुणे म्हणून येणार आहेत!

: मी मदत करू का ममी?

: काही नको. तू न्‌ तुझे पप्पा मदत करायला लागलात की काम वाढलंच म्हणून समजा! कसं व्हायचं कुणास ठाऊक! अगंबाई! सांडलं सगळं पीठ! कामात काम वाढलं आणखीन! लोक काय म्हणतील?

9 :

: लोक काय म्हणतील?

: नातेवाईक काय म्हणतील?

: मित्र काय म्हणतील?

: मैत्रिणी काय म्हणतील?

: सर काय म्हणतील?

: मॅडम काय म्हणतील?

: शेजारचा काय म्हणेल?

: बिल्डिंगमधले काय म्हणतील?

: पाहुणे काय म्हणतील?

: अमुक काय म्हणेल?

: तमुक काय म्हणेल?

: परीक्षा! रात्रंदिन आम्हा परीक्षेचा प्रसंग!

10 :

: मम्मी, तू जा ना! तू येऊ नको माझ्या जवळ.

: अरे, हे बघ, खेड्यातलं दृश्य आहे ना, तेच काढ. सोपं आहे बघ-

: (लाऊडस्पीकरवर घोषणा) पालकांनी आपल्या पाल्यापासून दूर उभे राहावे. त्यांना चित्र काढताना कोणत्याही प्रकारची सूचना देऊ नये. मुलांच्या कल्पकतेला वाव मिळावा म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कृपया पालकांनी-

: हे बघ, खेड्यातलं दृश्य म्हणजे.... अरे, असा बसलायस काय वेंधळ्यासारखा? हे बघ, असा डोंगर काढायचा आणि वर चार चार आकडे काढ. म्हणजे ते पक्षी होतील...  

: चारचे आकडे? : म्हणजे फोर-फोर रे! .................

: अरे अरे, इंग्रजीत फोर काय काढतोस गाढवासारखं? फोरकट कुठला! मराठीत फोर काढायचे! खोड ते-

: मराठीत फोर कसे काढणार?

: बाई, तुम्हाला एवढं जर सगळं मुलाला सांगायचं असेल तर त्याला घेऊन जा बघू घरी. बाळ, आण तो कागद इकडे.

: मम्मी, तुझ्यामुळंच मला स्पर्धेतून हाकलून दिलं.

: हो! तू जर पटापट मी सांगत होत्ये तसं चित्र काढलं असतंस तर कशाला ही वेळ आली असती तुझ्यावर? नुसता बसला होतास ठोंब्यासारखा!

: मला नव्हतंच काढायचं ‘खेड्यातलं दृश्य’... मी ‘सर्कस’ काढणार होतो.

11 :

: छान! छान दिवे लावलेस! ऐंशी टक्के मार्क्स पडून आता कुठं जाणार आहेस? ती दीप्ती बघ... मुलगी असूनसुद्धा मेडिकलला जाईल... तो अमेय... तो आय.आय.टी.ला जाणार आहे... तू काय करणार? हमाली? का भांडी घासणार आहेस? का प्यून होणार कुठं?

: ऐंशी टक्के मार्क्स पडणाऱ्याला कुणी प्यून म्हणून घेत नाही! हॉटेलात भांडी विसळूही देत नाही. हमालीही करू देत नाही.

: बोलतोय बघा कसा चुरूचुरू! मला तर कॉलनीतल्या बायकांना तोंडसुद्धा दाखवण्याची सोय उरली नाही.

12 :

: मम्मी, जिंकलो मी! बँकेच्या परीक्षेत पास झालो, आणि इंटरव्ह्यूतही सिलेक्ट झालो!

: शाब्बास! आता ही नोकरी आयुष्यभर इमानदारीत करा म्हणजे झालं.

: हो मम्मी.

: पेढे आणलेस का?

: हो मम्मी. हे घे-

: थांब थांब- आधी घरातल्या देवासमोर ठेव. मग मला.

: असं कसं मम्मी? आज मी जो काही आहे, तुझ्यामुळं आहे.

: म्हणालास याच्यातच भरून पावलं सारं. आता रुक्मिणीच्या नवऱ्यासारख्या डिपार्टमेंटच्या परीक्षा भराभर देऊन टाक आणि मोठ्ठा ऑफिसर हो.

: होय मम्मी, मला नोकरीला तर लागू दे. मग सुरूच करतो एकापाठोपाठ एक परीक्षा.

: आणि हे बघ, काम थोडं केलंस किंवा नाही केलंस तरी चालेल; पण संपात मात्र सामील होऊ नकोस! नाही तर वर्तानपत्रवाल्यांच्या डोळ्यांवर यायचं!

13 :

: मी बँकेच्या हाऊस जर्नलसाठी मुलाखत घ्यायला आलोय तुमची. प्रथम तुम्ही डिपार्टमेंटल परीक्षेत सर्वप्रथम आलात याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो.

: थँक्यू.

: तुमच्या या यशाचं रहस्य काय आहे?

: खरं सांगू की खोटं?

: दोन्ही सांगा.

: प्रथम खोटं सांगतो. कष्ट आणि अपार कष्ट हेच माझ्या यशाचं रहस्य आहे.

: आणि खरं? : अहो, मला परीक्षा द्यायची इतकी काही सवय लागलेली आहे, की मी जर कोणती ना कोणती परीक्षा देत नसेन, तर मला विलक्षण अस्वस्थ वाटतं. तेव्हा परीक्षा देत राहणं ही माझी गरज आहे.

: पण यश?

: त्याचं सारं श्रेय माझ्या मम्मीला आहे.

: म्हणजे?

: मला यश मिळावं म्हणून ती कायम डोळ्यांत तेल घालून जागरूक असते.

: वा वा! खऱ्याखोट्याची तुम्ही अशी बेमालूम भेसळ केलीय ना!

: त्याचंही श्रेय माझ्या मम्मीला आहे.

: आत्तापर्यंत कोणकोणत्या परीक्षा दिल्या आहेत?

: बाप रे! सांगणं कठीण आहे. एवढंच सांगतो, गणितातल्या परीक्षा देऊनही मला गणित येत नाही; हिंदी, इंग्रजीच्या देऊनही मला त्या भाषा बोलता येत नाहीत. स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसूनही मी स्कॉलर नाही. चित्रकलेच्या परीक्षा देऊन मी चित्रकार नाही. गायनाच्या देऊन गायक नाही. वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊनही आणि नंबर काढूनही मला लोकांसमोर उभं राहून चार शब्द बोलता येत नाहीत.

: उदाहरण देऊ शकाल?

: हो ऽऽ, परवा आमच्या दातेसाहेबांना निरोप द्यायचा होता; पण मी लोकांसमोर उभा राहिलो आणि मला दरदरून घाम फुटला.

: मग?

: मग काय? मी चुकून म्हणालो, आज आपण दातेसाहेबांना श्रद्धांजली वाहायला जमलो आहोत. मम्मी खूप ओरडली मला! म्हणाली, मी लिहून दिलं असतं भाषण तुला... आणि तुम्हांला सांगतो, खरोखरच मम्मीनं लिहून दिलेलं असतं आणि माझ्याकडून घोकून घेतलं असतं तर मला नक्कीच चांगलं भाषण म्हणता आलं असतं.

: बॅड लक.

: कुणाचं? मम्मीचं का माझं? 

14 :

: सगळं मीच करायला पाहिजे का? मीच पुढाकार घ्यायला पाहिजे का?

: अगं पण... : एक नंबरचा माठ आहेस तू! मीच तुला रोज फिरायला बाहेर काढलं. मीच तुझा हात हातात घेतला. कशासाठी?

: कशासाठी?

: आता विचार ना मला- ‘माझ्याशी तू लग्न करशील का’ म्हणून. का तेही मीच पुढाकार घेऊन विचारू?

: नाही... म्हणजे तसं... तसं माझ्या लक्षात आलं, पण...

: पण काय? : पण खरं सांगायचं तर मला तुला विचारायची भीती वाटत होती.

: तू ‘नाही’ म्हणाली असतीस तर?

: तर असं काय आभाळ कोसळणार आहे?

: मम्मी म्हणत्ये, आपण प्रत्येक गोष्टीत यशस्वी व्हायला पाहिजे. लग्नासाठी तू जर होकार देणार नसशील, तर प्रेम करण्यात काय गंमत आहे?

: छान. म्हणजे तुला फक्त लग्नाच्या होकारातच रस आहे! प्रेमकरण्यात तुला गंमत वाटत नाही?

: अं... म्हणजे.... तशी वाटते, पण...

: मला तुझ्यात मुळीच रस नाही. घे अपयश...

: अगं, अगं...

: जरा अपयशाची सवय लाव की स्वत:ला. शेणाचा पो मातीत पडल्यावर जसा माती घेऊनच उठतो तसं पडू तिथून यश घेऊनच उठण्याचा तुझा अट्टाहास का?

: खरं म्हणजे याहून वेगळा मी विचारच करू शकत नाही. मम्मीनंच मला तसं वळण लावलंय. : मग मला तुझा आणि तुझ्या मम्मीचाही एकाच वेळी प्रेमभंग करायला आवडेल...

: अगं, अगं.... माझं ऐकून तर घे... हं.

: गेऽली!

15 :

: देव करतो ते चांगल्यासाठी करतो. नाही तरी मला ती फारशी आवडली नव्हतीच. तशात प्रेमविवाह म्हणजे मुलखाचं दरिद्री लक्षण! वरदक्षिणा, मानपान, कपडे- काहीही नाही. सगळं फुकटात पाडून घ्यायचं. आणि खरं सांगू का, दिसायलाही ती काही एवढी खास नव्हती. अखेर तू माझा एकुलता एक मुलगा आहेस...

: होय मम्मी.

: अखेर आपल्या इतमामाला साजेल असं लग्न झालं पाहिजे.

: पण माझं तिच्यावर प्रेम...

: या वयातली प्रेमं ती कसली प्रेमं? बाबा रे, लग्न म्हणजे मोठी परीक्षा असते. जन्माचा प्रश्न असतो.

: पण लग्न झालं म्हणजे संपल्या का परीक्षा?

: छे छे! अशा परीक्षा कधीच संपत नाहीत. वेळच्या वेळी मुलं होणं, हमखास मुलं होणं, एक मुलगा- एक मुलगी होणं, अशा किती तरी परीक्षा  लगेचच पुढं वाट बघत असतात.

: मग? : मग मुलांच्या ॲडमिशन्स, शाळा, त्यांचा अभ्यास...

: मम्मी, म्हणजे जीवन ही अखंड परीक्षाच आहे म्हण की!

: कसं बोललास! जीवन ही अखंड परीक्षाच आहे आणि माणूस हा सदैव परीक्षार्थी असतो, हे लक्षात ठेव.

: पण या अशा परीक्षा जन्मभर देत राहायच्या? मग जीवनाचा आनंद कधी लुटायचा? की तो लुटायचा नाहीच?

: नाही कसा? लुटायचा की! परीक्षा देण्यात काय आनंद नसतो? तोच लुटायचा!

16 :

: मम्मी, मी फेल झालो. मला बायको काळी मिळाली.

: मम्मी, मी फेल झालो. मला वेळेवर पोर झालं नाही.

: मम्मी, मम्मी मी... जीवनात अपेशी झालो या... परीक्षा देता देता माझा जीव गुदमरायला लागलाय आ... हा... हार्ट ॲटॅक तर नसेल ना? देवा रे देवा!

17 :

: मी नुसताच धापा टाकत धावत राहिलो. सतत दुसऱ्यांच्या ‘सर्टिफिकेट’साठी, दुसऱ्यांकडून मान्यता मिळवण्यासाठी धडपडत राहिलो. स्वत:च्या आनंदासाठी कधी गायलो नाही; कधी चित्रं काढली नाहीत. सारं ‘परीक्षे’साठी केलं. कायम ‘यशा’चं ओझं डोक्यावर बाळगत भीतीपोटी केलं. सतत परीक्षा देत राहिलो आणि धास्तीत जगत राहिलो. सारखं कुठलं तरी शिखर गाठण्याची घाई! वाटचालीतला आनंद, प्रवासातला आनंद मला करंट्याला कधी उमगलाच नाही. त्यामुळं मी जगण्याच्याच आनंदाला पारखा झालो! आऽऽ अगं आई! मेलोऽऽ देवा रे देवा! हा दुसरा ॲटॅक तर नव्हे?

18 :

: आपण जर या धावपळीत जगण्याचा आनंदच गमावून बसणार असू, तर सतत परीक्षा देण्याची ही घाणेरडी सवय लहानपणापासूनच लावता कामा नये. महाभयानक सवय आहे ही! माझ्या मना, यापुढं हे सुभाषित लक्षात ठेव- ‘स्वत:च्या आनंदासाठी जगलास तर जगलास! दुसऱ्याच्याकडून मान्यता मिळवण्यासाठी, त्यांच्याकडून सर्टिफिकेट मिळवण्यासाठी जगलास तर मेलास! अगं मम्मी! मेलोऽऽ! तिसरा हार्ट ॲटॅक! आता आपला खेळ संपला! आऽऽऽ

(मॅजेस्टिक प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या 'हास्यमुद्रा’ या पुस्तकातून साभार.)  

Tags: मॅजेस्टिक प्रकाशन हास्यकथा हास्यमुद्रा मुकुंद टाकसाळे story hasyakatha hasymudra mukund taksale weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मुकुंद टाकसाळे,  पुणे
mukund.taksale@gmail.com

मुकुंद टाकसाळे हे विनोदी लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके