डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

काजळलेल्या भागातील विकासाची पहाट

धुळे येथील श्री. व्यंकटराव रणधीर यांची मुलाखत

प्रश्न: अण्णा, रोहिणीसारख्या अवघ्या 700-800 लोकांची वस्ती असलेल्या संपूर्ण आदिवासी गावात जाणं तुम्हाला कसं सुचलं?
उत्तर: सन 1960 ला बोराडीत आदिम जाती सेवा संघाचे अधिवेशन झाले होते. मी त्या संघाचा सन्माननीय सर्ववेळ सेवक आहे. मोरारजीभाईंच्या सांगण्यावरून काही काळ मी ओरिसातल्या राजेंद्र आश्रमात काढला. तेथून परत आलो आणि ठरवलं की रोहिणीत काम करायचं.

प्रश्न: एकदम?
उत्तर: नाही. रोहिणीच्या जवळपास 10-11 गावांचा समूह आहे. सर्वश्री जगन्नाथ बडगुजर, पांडे, डॉ. राणे, आदींनी माझ्या सांगण्यावरून या गावांची सामाजिक-आर्थिक पहाणी केली. 12 सप्टेंबर 1970 ला मी रोहिणीत एक सभा घेतली. शेतीविषयक एक प्रदर्शन भरवलं आणि त्याच दिवशी सायंकाळी निर्णय घेतला की इथेच राहायचं, या सर्व परिसराला एक आकार येईपर्यंत.

प्रश्न: सोबत कोण होतं? 
उत्तर: कोणी नव्हतं. तशी कुणाची जरूरही नव्हती. 

प्रश्न: पण सामान-सुमान?
उत्तर: एक खाटलं आणि दोन बादल्या. सुरुवातीला एवढंच. 8-10 दिवसांनी थोडी लाकडं जमाकरून एक झोपडं उभारलं. नाव दिलं ‘महात्मा गांधी आश्रम’. जागा अगदी स्मशानाजवळ. 100 वर्षांत बहुधा तेथे कुणी वस्तीला राहिला नसेल. भोवताली गोखरूचं जंगलच जंगल होतं. 

प्रश्न: गाव कसा होता?
उत्तर: रोहिणीच काय, जवळपासची खामखेडा, हिगांव, वरला, हिवरखेडे, इत्यादी 8-10 गावं ‘सर्व हरवून बसलेली’ होती. त्यांना जणू जीवनाची स्पंदनं माहीतच नव्हती. डोंगरी भिल्ल शिंगाडेवाले वंजारी, पावरा, खाटीक, कोडित यांचीच मुख्य वस्ती. क्वचित एखाद-दुसरं ब्राह्मणाचं, एखादं मारवाड्याचं घर आढळायचं. शिक्षणाचा गंध नाही, वीज नाही, रस्ते नाहीत, पोस्ट नाही, साधं टपालसुद्धा नाही.

प्रश्न: टपाल नाही? 1970 सालात?
उत्तर: अहो डॉक्टर, साधा न्हावीसुद्धा या 8-10 गावांत महिन्यातून एकदा यायचा. हातेडहून. 10 दिवस राहून सर्वांची श्मश्रू करून जायचा. पुन्हा महिन्यानेच परत एकदा एक साधं कार्ड मिळावं म्हणून वणवण फिरलो. मारवाड्याने सांगितले, शंभर रुपयांची नोट मिळेल, पण कार्ड मिळणार नाही.

प्रश्न: पण मग लोकांना एकमेकांची ख्याली-खुशाली वगैरे...?
उत्तर: सर्व कामं सांगोवांगी चालायची. माणसं निरोप आणायची, पोहोचवायची.

प्रश्न: अण्णा, मग तुम्ही या रोहिणीत केलंत काय? कामाला सुरुवात कशी केली?
उत्तर: सकाळी भल्या पहाटे उठायचो. मुख्य काम ग्रामसफाईचं. रस्ते झाडायचो, लहान मुलांनी केलेली घाण उचलायची. माती टाकायचो. उकिरडे हटवायचो. दुपारी गावातल्या मुलांना घेऊन नदीवर जायचो. त्यांना आंघोळ घालायचो. 

प्रश्न: कपडे?
उत्तर: कुठले कपडे? बहुतेक मुलं नंगधडंग! मग मी बाजारच्या दिवशी शिरपूरला जायचो. लोकांकडे नव्याजुन्या कपड्यांची भिक्षा मागायचो. धान्य गोळा करायचो. एक पोतभर लाह्या माझ्या झोपडीत नेहमी असायच्या. मुलांना त्या द्यायच्या, पाढे शिकवायचे. प्रार्थना म्हणायची. त्यांना आपण हिंदू आहोत याची सतत जाणीव द्यायची.

प्रश्न: म्हणजे?
उत्तर: त्यावेळी त्याभागात ख्रिश्चनांचे प्राबल्य फार होते. झपाट्याने धर्मांतर होई. कुठेतरी थांबवणं भाग होतं. गावच्या सभा आकार घेऊ लागल्या. ठिकठिकाणी लोक जमायचे. मुख्यतः मी त्यांना शेतीविषयक माहिती द्यायचो. आरोग्याविषयी सांगायचो. नव्या जगाची ओळख व्हावी म्हणून थेट शिरपूरला मुलगा पाठवून आदल्या दिवसाची वर्तमानपत्रे मी मागवी. एकेका गावात त्याचं वाचन होई. पुन्हा ती वर्तमानपत्रं रोहिणीत परत येत. टपाल आणणारा रनर तरी निदान तेथे यावा याकरिता प्रचंड धडपड करावी लागली. बहुगुणांची जवळची ओळख होती. त्यांच्या माध्यमातून थेट पोस्टाच्या डायरेक्टर जनरलपर्यंत पत्रव्यवहार केला. त्यांना गावाची अंतरं, स्थिती कळवली. विधानसभेच्या 300 सदस्यांना पत्रं पाठवली. स्वतः प्रत्येक गावात बसून लोकांची शेकडो पत्र लिहिली. कोटा पूर्ण व्हावा म्हणून माझ्या संस्थेमार्फत एकाच पोस्टातून कार्डपाकिटं खरेदी करण्याचा पायंडा पाडला. तेव्हा कुठे रोहिणीत पोस्टाची पेटी आली.

प्रश्न: आज? 
उत्तर: आज टेलिफोनही आरामात करता येतो.

प्रश्न: या सर्व परिसरातलं संस्थात्मक जीवन कसं होतं? 
उत्तर: संस्थाच नव्हत्या तर संस्थात्मक जीवनाचा प्रश्नच कुठे? फक्त एका गावाला ग्रामपंचायत, दोनचार सोसायट्या त्या सर्व बुडीत, कर्जबाजारी. लोकांच्या पुनःपुन्हा बैठका घेतल्या. ग्रामपंचायतीची पुनर्रचना केली. काही दूध सोसायट्या बनल्या. शेतीकामासाठी मदत मिळण्याची व्यवस्था केली. शेतकर्‍याला तगाई त्याच्या घरी मिळावी, त्यासाठी त्याला ऑफिसमध्ये जावं लागू नये याकरिता अक्षरशः भांडावे लागले. तगाई घरी मिळू लागली, परिणामी, मधली दलाली तुटली.

प्रश्न: आज रोहिणी आणि खंबाळे येथे फर्स्ट ग्रेड शाळा आहेत. त्यावेळी काय स्थिती होती अण्णा?
उत्तर: एक मराठी प्राथमिक शाळा होती, पण गुरुजी नसायचे. बाकी सर्वत्र अंधारच होता. त्या शाळेत पटावर मुलं 23, गुरुजी एक. लोकांना सतत सांगून सांगून मुलं शाळेत पाठवायला सुरुवात केली. रोहिणीतला पहिला शिक्षक व्यंकटराव. दीड वर्षांत तेथे पूर्ण प्राथमिक शाळा झाली. मुलांची संख्या 300. प्रत्येक गावात आता बालवाडी आहे. त्यांना ग्रॅंट मिळते. हळूहळू सर्व ठिकाणी शाळा झाल्या. दर रविवारी आम्ही परिसरातल्या सर्व शिक्षकांना बोलवायचो. त्यांना पुस्तकं आम्ही शिकवायचं, सामाजिक प्रश्नांची चर्चा करायची. चक्र सारखं सुरूच असायचं, रात्रीची भजनी मंडळं प्रत्येक गावात उभी केली. त्यातून प्रौढ साक्षरतेचे वर्ग सुरू केले. खामखेड्यासारख्या गावात महिलांची 100 टक्के उपस्थिती असायची. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या गाव समूहांपैकी कुठल्याही गावात साधी पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. लोक नदीवरून पाणी आणत. रोहिणीत प्रथमतः विहीर खोदण्यात आली. आज सर्व गावांमध्ये लहान-मोठ्या विहिरी आहेत, पाट आहेत, दळणवळणाची तर जवळपास सर्व साधनं पोहचत आहेत.

प्रश्न: अण्णा, या जीवनाच्या आवश्यक गरजा होत्या. तुमच्या अपार परिश्रमाने त्या पुष्कळ अंशी पूर्ण होऊ शकल्या. पण त्यामुळे रोहिणी परिसरात काही सामाजिक स्थित्यंतर झाली? परंपरागत रूढी, मान्यता बदलल्या?
उत्तर: होय बुवाबाजी त्या भागात भयंकर होती. धनर्‍याबुवा नावाचा मांत्रिक म्हणजे त्यांचा परमेश्वर. माणसं मरून जात पण धनर्‍याबुवावरचा विश्वास सांडत नसत. एकदा मी त्याला बोलावलं मग झोपडीसमोरच्या एका खांबाला बांधून त्याची यथेच्छ पूजा केली. 700-800 फुटावर उभा राहून सगळा गाव थरथर कापत ते दृश्य बघत होता, पण दुसर्‍या दिवसापासून जादूटोणे, जंतरमंतर, गंडेताईत गायब झाले. शिरपुरच्या डॉक्टरांना मग मी दर रविवारी त्या भागात नेऊ लागलो. औषधोपचार व्हायचा. औषधं दिली जायची.

वंजारी बायकांच्या डोक्यावर एक काठी असते. त्यांना त्याचा भयंकर त्रास व्हायचा, पण कुणालाही सांगायची सोय नसायची. काठी काढायला पुरुषांची संमती नसायची. त्यापायी मारठोकही व्हायची. वसंत जाधव आणि कमलाबाई हे माझ्या ओळखीचं जोडपं. आधी त्यांना समजावलं. नंतर बायकांची एक सभा घेतली. ह्या काठीची काही जरूर नाही, ती काढल्याने कुठलंही पाप लागत नाही. असं वारंवार समजावून सांगितलं. शेवटी कशाबशा 5 बायका तयार झाल्या. त्यांनाही समाजाचा, नवर्‍यांचा धाक होताच. समारंभपूर्वक आम्ही त्या काठ्या काढून टाकल्या. जो विरोध झाला तो मोडून काढला. आता त्या समाजात अशा काठ्या वापरण्याचं प्रमाण त्याभागात तरी नगण्यच आहे.

प्रश्न: इतर बाबतीतही लोकांमध्ये काही जागृती झाली? 
उत्तर: ती माणसंच आहेत. तुमच्या आमच्यासारखी, संवेदनशील. पण त्यांना आधी कसला आधारच नव्हता. माणूस मिळाला आणि त्यांची हिंमत वाढली. गावातली दारू बंद करण्यात आली. चिंतामण वना भिल, श्रावण सारखी डाकू मंडळीसुद्धा बदलली. खामखेड्यातल्या एका कोळी स्त्रीवर सरकारी अधिकार्‍याने बलात्कार केला. या अशिक्षितांचा मोर्चा थेट शिरपूर पोलिस कचेरीवर गेला. वर्तमानपत्रातून रान उठलं. अधिकार्‍याची बदली करण्यात आली तेव्हाच लोक थांबले. त्यावेळीही बेठबिगार चालायची. आय. जी. कामटे शिकारीला आले. जनावर नेतात तशी माणसं धरून नेली. मी सर्वांना पुन्हा परत घेऊन आलो. निरोप पाठवला, ‘माणसं येत नाहीत, जे करायचं असेल ते करा.’ काही झालं नाही.

आपल्यावरच्या अन्यायाविरुद्ध उभं राहता येतं, हे ती साधीसुधी माणसं शिकली. तिथल्या शाळांमधून भिल्लांची, वंजार्‍यांची पोरं शिकून मोठी झाली. शिक्षक म्हणून पुन्हा त्या शाळांमध्ये आली. एक तर आमच्या महाविद्यालयात प्राध्यापक आहे.

अवघ्या 8-10 वर्षापूर्वीसुद्धा, वीज गावात आली म्हणून रात्रभर धुंद होऊन ही माणसं नाचायची, इतका त्यांना आनंद व्हायचा. आज तर रोहिणीपासून 40 किलोमीटरच्या परिसरात 4 महाविद्यालयं आहेत, अनेक शाळा आहेत, आधुनिक जीवनाच्या सुखसोईंची साधनं आहेत. अवघ्या 12-14 वर्षांपूर्वी अज्ञानाचा व शोषणाचा जो भयंकर अंधार त्यांच्या जीवनात होता, त्याचा आज मागमूसही नाही.
 

Tags: आय. जी. कामटे वेठबिगारी महाविद्यालय प्राथमिक शाळा विधानसभा शिरपूर हिंदू ख्रिश्चन टपाल खाटीक पावरा वंजारी खामखेडा भिल्ल महात्मा गांधी मोरारजीभाई देसाई आदिम जाती सेवा संघ रोहिणी व्यंकटराव रणधीर आदिवासी I. G. Kamte Vethbigari Forced Labour College Primery School Vidhansabha Shirpur Hindu Cristian Mail Tapal Khatik Pawara Khamkheda Wanjari Bhilla Mahatma Gandhi Morarajibhai Desai Adim Jati Seva Sangh Rohini Vyakatrao Ranadhir Adivasi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके