डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जिंकण्याची काळजी नसलेली वक्तृत्व स्पर्धा

स्पर्धेत कोण जिंकले, याची काळजी स्पर्धकापासून तर त्यांच्या पालक व शिक्षकांपर्यंत कुणालाच नव्हती. उत्सुकता होती ती कोण किती ताकदीने, अभ्यासपूर्ण आणि अर्थपूर्ण शिवराय ऐकवतात याची! तरीही कु.अलफिया जावेद अन्सारी, आयमन इद्रिस अन्सारी, शोबिया अश्पाक शेख, आसरा हमीद अन्सारी, मुखसीर अहमद अन्सारी या पाच आणि इतरही मुलांनी मोठ्या आत्मविश्वासाने रयतेच्या राजाला कधीतरी संधी मिळाल्यागत जीव तोडून व्यक्त होत अभिवादन केले. उर्दू भाषेचा गोडवा प्रत्येक शब्दात असलेली ताकद आणि हम धर्मनिरपेक्ष लोकराजा शिवाजी महाराजके बारेमे बात कर रहे है। हे प्रत्येकाच्या तोंडातील वाक्य ऐकतांना स्पर्धेचे परीक्षक, शिक्षक, पालक, कार्यकर्ते आणि तरुण विद्यार्थी अक्षरशः सुखावले होते. 

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी औरंगाबाद येथे एकदिवसीय कार्यशाळेत मालेगावचा सुभाष (ताऊ) परदेशी भेटला. कार्यशाळा संपल्यानंतर औरंगाबाद-येवला प्रवासात नेहमीप्रमाणे आमच्या बऱ्याच विषयांवर गप्पा झाल्या. मालेगाव नगरीचे अनेक किस्से ऐकून पोटभर हसल्यानंतर आमची चर्चा एकदम गंभीर मुद्यावर आली. माझ्या मनातली अनेक दिवसाची खदखद व्यक्त करीत मी म्हटलं, ‘‘एवढ्या वर्षांपासून आपण काम करतो, पण मला एकही मुस्लिम मित्र नाही की, जो धर्मनिरपेक्ष विचारांचा पुरस्कर्ता आहे. तुला आहे का असा मित्र? तुमचं मालेगाव एवढं मोठं, मुस्लिमबहुल वस्तीचं शहर. शिवाय तू अनेक वर्षांपासून तिथं विविध आघाड्यांवर कार्यरत आहेस, तुझे तर भरपूर मित्र असतील...?’’ 

प्रश्न संपायच्या आत सुभाष म्हटला, ‘‘नाही ना यार, मी खूप प्रयत्न करतो, पण खरंच एकही असा भेटत नाही, जो धर्मातीत आहे! आम्ही मंडळी हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी सातत्याने कार्यक्रमांचे आयोजन करतो. ती या महाकाय शहराची आणि इथल्या सर्व धर्मीयांची गरजही आहे, बहुतेक जण मोठ्या संख्येने आणि उत्साहाने अशा कार्यक्रमांना उपस्थितही असतात; तथापि धर्मनिरपेक्षतेचा विषय निघाला की, सर्व मुस्लिम मित्र तटस्थ होतात...’’. मग आम्ही बराच वेळ याच विषयावर बोलत राहिलो. खरे तर, ते आमचे चिंतन होते आणि असे म्हणतात की, चिंतन केवळ एकांगी नसते. संबंधित विषयाच्या सर्व बाजूंचा विचार आम्ही एकमेकांशी शेअर करीत होतो. मालेगावातील हिंदू-मुस्लिम संबंधांपासून तर तिथले जनमानसातील गंभीर आणि गमतीदार किस्से मधूनमधून ऐकवून सुभाष चर्चेत रंग भरीत होता. 

साथी निहाल अहमद यांच्या मालेगावमधील तब्बल 50 वर्षांच्या राजकीय- सामाजिक कारकिर्दीवरही आम्ही बोललो. पुन:पुन्हा धर्माचा पगडा, धर्मांधता, जातीयता, स्त्री-पुरुष विषमता, अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी, समाजाची झपाट्याने होत असलेली अधोगती, मूल्यांचा ऱ्हास यांसारख्या विषयावर यथेच्छ चिंता व्यक्त करीत आमची दोघांचीही गाडी प्रबोधनाच्या गरजेवर, त्यातील विखंडित सातत्यावर येऊन थांबली. 

प्रबोधनाचे परिणाम टिकाऊ स्वरूपाचे असतात. प्रबोधनामुळे व्यक्ती आणि समाजमन सदृढ होते. म्हणूनच संत तुकाराम, संत गाडगेबाबा, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आदी संतांपासून फुले-शाहू-आंबेडकर व शिवाजीमहाराज  आदींच्या विचारांनी घडलेल्या महाराष्ट्राला ‘पुरोगामी महाराष्ट्र’ असे म्हटले जाते. मी म्हणालो, ‘‘शाळा- महाविद्यालयांतील तरुणांना सोबत घेऊन रस्त्यावर यायला हवे. गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावरची आंदोलनं विसरल्यात जमा आहेत. कथामाला, शिबिरे, अभ्यास मंडळे, आदी उपक्रमांचे सातत्य ठेवत लोकजागृतीसाठी पथनाट्यासारखं उत्कृष्ट ठरलेलं माध्यम ताकदीने वापरायला हवं.’’ तर ताऊ म्हणाला, ‘‘हरकत नाही, परंतु त्याचे स्वरूप फार कठीण वा व्यापक नसावं.’’ मग नेमका कशावर प्रबोधन कार्यक्रम घ्यावा, यावर आम्ही बोललो. आणि पुन्हा आमचे एकमत झाले, हिंदू- मुस्लिम सलोख्यावर! सरकारी पातळीवरून जाणीवपूर्वक स्फोटक बनविलेल्या वातावरणात जराशी हलकी-फुलकी वाटणारी, परंतु एक सकारात्मक संदेश देणारी प्रबोधनपर मोहीम आम्ही ठरविली. ती म्हणजे- ‘स्वराज्यनिर्मितीच्या कार्यात मुस्लिमांसह अठरापगड जातीच्या लोकांना सहभागी करून घेऊन त्यांना योग्य ती संधी देणाऱ्या धर्मनिरपेक्ष, महापराक्रमी, रयतेचा राजा छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त त्यांचा खरा इतिहास लोकांना सांगायचा- आणि तोही मुस्लिम विद्यार्थ्यांकडून!’ 

मग ताऊने मालेगावातील चार-पाच शाळांमध्ये जाऊन शिवाजीमहाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकणाऱ्या फक्त उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या. त्या कार्यक्रमाला येवल्यातून आम्ही पाच कार्यकर्ते आवर्जून गेलो होतो. उर्दू माध्यमाच्या मुलांच्या तोंडून प्रथमच रयतेचा राजा ऐकून आम्ही सर्व जण प्रभावित झालो. या स्पर्धा येवल्यात घेण्यासाठी राष्ट्र सेवादल आणि इतरही पुरोगामी संघटनांच्या साथी मित्रांची एक बैठक झाली. त्यात येवला महाविद्यालयाचे उपप्राचार्य व अ.भा.समाजवादी अध्यापक सभेच्या येवला शाखेचे अध्यक्ष प्रा.डॉ.भाऊसाहेब गमे, अंनिसच्या येवला शाखेचे अध्यक्ष प्रा.डॉ.अजय विभांडिक, येवला मर्चन्ट बँकेचे व्हा.चेअरमन राजेश भांडगे, डॉ.सुरेश कांबळे, प्रा.पुरुषोत्तम पाटील, दिनकर दाणे, कॉ.भगवान चित्ते, ॲड.दिलीप कुलकर्णी, राजेंद्र बारे, नंदू गायकवाड, अविनाश पाटील, प्रा.गुमानसिंह परदेशी, प्रा.डॉ.जिभाऊ मोरे, बापूसाहेब पगारे, ॲड.दत्तात्रय चव्हाण आदी आवर्जून हजर होते. 

शिवाजीमहाराजांच्या जीवनचरित्रावर उर्दू माध्यमातील मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्याचा प्रस्ताव ठेवताच उपस्थित सर्वांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे दाद दिली. त्या सर्वांना हा विषय किंवा प्रबोधनाची ही पद्धत मनापासून आवडली. ‘छत्रपती शिवाजीमहाराज यांचे सामाजिक, धार्मिक आणि राजकीय विचार’ असा स्पर्धेचा विषय निश्चित करण्यात आला. दुसऱ्या दिवशी लगेचच येवले शहरातील अँग्लो उर्दू हायस्कूल आणि अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलमधे आम्ही काही कार्यकर्ते गेलो. मालेगावात झालेल्या स्पर्धांची माहिती दिली आणि येवल्यातही तुमच्या सहभागाने अशा स्पर्धा ठेवाव्यात, असे सांगितले. मुलांच्या परीक्षेचे दिवस जवळ येऊन ठेपले होते, तरीही या स्पर्धा केवळ उर्दू माध्यमातील मुलांसाठीच ठेवल्या असल्यामुळे ‘अस्सल शिवाजी बताना हैं तो हम पीछे नहीं हटेंगे’, असे म्हणत दोन्ही हायस्कूलमधील शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने संपूर्ण सहकार्य करण्याचा शब्द दिला आणि तयारी सुरू झाली. 

या वक्तृत्व स्पर्धेत 21 विद्यार्थ्यांनी नावे नोंदविली. शिवाजीराजाचा खरा इतिहास या मुलांच्या वक्तृत्वातून येण्यासाठी कॉ.गोविंद पानसरेलिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या 25 प्रती बोलविण्याचा निर्णय झाला. मात्र पुस्तक मराठी भाषेत असल्याने ते या उर्दू भाषेत शिकणाऱ्या मुलांना समजण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. या पुस्तकाची हिंदी आवृत्ती आहे का आणि ती कशी मिळू शकेल, यासाठी साधनाच्या संपादकांकडे फोनवर विचारणा करताच त्यांनी तत्काळ लोकवाङ्‌मय प्रकाशनाचा फोन नंबर दिला. लोकवाङ्‌मयाशी संपर्क केला असता त्यांनी हिंदीच कशाला, उर्दू भाषेतही या पुस्तकाचे भाषांतर उपलब्ध असल्याचे सांगताच आम्हा सर्वांना खूप आनंद झाला. लोकवाङ्‌मय गृहाचे श्री.विकास पालवे यांनी ताबडतोबीने उर्दू भाषेत भाषांतर केलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या 25 प्रती पाठवून दिल्या. त्यामुळे शिक्षकांचं काम आणखी सोपं झाल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसला. 

विशेष बाब म्हणजे, दोन्ही शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्यासाठी उत्साहाने खूप परिश्रम घेतले. दि. 8 एप्रिल रोजी म्हणजे ऐन गुढी पाडव्याच्या दिवशी (वर्षबलिप्रतिपदा) या स्पर्धा येवला महाविद्यालयात अपूर्व उत्साहात पार पडल्या. येवल्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री.शरद मंडलिक यांनी या स्पर्धेचे उद्‌घाटन केले. या वेळी ते म्हणाले, ‘‘राज्यभर असे हिंदू-मुस्लिम सलोखा घडविणारे कार्यक्रम व्हायला हवेत. शिवाजीमहाराज खऱ्या  अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांनी आपल्या स्वराज्यात इथल्या वृक्षांची, पीक-पाण्याची, पशू-पक्षांची, नदी- नाल्यांची, महिलांची आणि एकूणच सर्व धर्मीयांची विशेष काळजी घेतली. असा लोकराजा पुन्हा झाला नाही. मात्र फक्त लढाया करणारा राजा अशी प्रतिमा इतिहासलेखकांनी रंगवून इथल्या बहुजनांवर फार मोठा अन्याय केला.’’ स्पर्धेत कोण जिंकले, याची काळजी स्पर्धकापासून ते त्यांच्या पालक व शिक्षकांपर्यंत कुणालाच नव्हती. 

उत्सुकता होती ती कोण किती ताकदीने, अभ्यासपूर्ण आणि अर्थपूर्ण शिवराय ऐकवतात याची! तरीही कु.अलफिया जावेद अन्सारी, आयमन इद्रिस अन्सारी, शोबिया अश्पाक शेख, आसरा हमीद अन्सारी, मुखसीर अहमद अन्सारी या पाच आणि खरे तर सर्वच मुलांनी मोठ्या आत्मविश्वासाने रयतेच्या राजाला कधी तरी संधी मिळाल्यागत जीव तोडून व्यक्त होत अभिवादन केले. उर्दू भाषेचा गोडवा, प्रत्येक शब्दात असलेली ताकद आणि ‘हम धर्मनिरपेक्ष लोकराजा शिवाजी महाराजके बारेमे बात कर रहे है।’ हे प्रत्येकाच्या तोंडातील वाक्य ऐकताना स्पर्धेचे परीक्षक, शिक्षक, पालक, कार्यकर्ते आणि तरुण विद्यार्थी अक्षरशः सुखावले होते. शि

वाजीमहाराजांनी आपले स्वराज्य स्थापताना स्वधर्माचा अभिमान बाळगतानाच इस्लाम, शीख, ख्रिश्चन, पारसी अशा सर्व धर्मांचा मान राखला. महाराजांचे वर्तन न्यायाचे, नीतीचे, पराक्रमाचे व परधर्मसहिष्णुतेचे होते. कुराण वा अन्य धर्मीयांचे धर्मग्रंथ सापडले तर आदराने, जपणूक करीत योग्य त्या व्यक्तीच्या स्वाधीन करण्याचे महाराजांचे आदेश सैन्य(मावळे) प्रामाणिकपणे पाळीत असे... इथंपासून महाराजांनी विविध जाती-धर्मांतील कर्तबगार व्यक्तींचे गुण ओळखून त्या पद्धतीचे काम त्यांच्यावर पूर्ण विश्वासाने सोपविले होते. शिवरायांच्या सैन्यात मुस्लिमही होते. मात्र त्यांनी कधीही फंदफितुरी केली नाही किंवा सैन्यातील हिंदू सरदारांचा द्वेषही केला नाही. महाराजांच्या पदरी विजापूर आणि गोवळकोंड्याहून 700 पठाण सामील झालेले होते... अशी अत्यंत वास्तव वक्तव्ये धाडसाने करीत या स्पर्धकांनी आपले म्हणणे ठासून मांडले. 

स्पर्धेत पहिल्या आलेल्या कुमारी अलफिया जावेद अन्सारी या मुलीने तर कमालच केली. तिने आपल्या दमदार वक्तृत्वात, शिवाजीमहाराजांच्या सैन्यात असलेल्या अत्यंत विश्वासू अशा मुस्लिम सरदारांची नावे सांगत महाराज मुस्लिमांचा द्वेष करत नव्हते, तर त्यांच्यावर विश्वासाने जबाबदाऱ्या सोपवीत होते, हेच स्पष्ट केले. ती  म्हणाली, ‘‘नूरखान बेग हा सरनोबत या अत्यंत महत्त्वाच्या पदावर होता. अफजलखान वधाच्या वेळी महाराजांबरोबर जे 10 अंगरक्षक होते, त्यांपैकी एक होता सिद्दी इब्राहिम हा मुस्लिम अंगरक्षक. काझी हैदर नावाचा वकील, मदारी मेहतर, दौलत खान, सुलतान खान, शमा खान, दर्या सारंगी, सिद्दी मिस्त्री, सिद्दी वाहवा, दाऊत खान, सिद्दी अंबर वहाब, चित्रकार मीर महमद, मौनी बाबा, याकूब बाबा असे सरदार होते. एकूण सैन्याच्या 57 टक्के मुस्लिम सैनिक होते.’’ 

येवल्यात साधना साप्ताहिकाचे शंभरावर वर्गणीदार आहेत. या वाचकांच्या वतीने 9 एप्रिल रोजी सायं. 4 वाजता साधना वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वाचक मेळाव्यासाठी संपादक स्वतः येणार होते. हीच संधी साधून त्याच दिवशी सायंकाळी 6.३0 वाजता येवल्याच्या टिळक मैदानावर म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या साक्षीने या उर्दू भाषिक मुलांच्या वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ठेवला होता. टिळक मैदानावर कार्यक्रम होणार किंवा झाला तर येवलेकरांच्या भुवया उंचावतात, कारण हे तसे मध्यवर्ती व ऐतिहासिक ठिकाण आहे. शिवाय हा असा कार्यक्रम की, जिथे साक्षात मुस्लिम मुलांच्या तोंडून शिवरायांना ऐकावे लागणार होते. 

‘बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरक्षेच्या दृष्टीने एखाद्या हॉलमध्ये ठेवण्यात यावा, असा आग्रह आमच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने बैठकीत धरला. ‘उगीचच फजिती नको. बाहेर वातावरण अत्यंत गढूळ आहे.’ असा सूर त्यांनी लावला. (अर्थात त्यामागे मोठी पार्श्वभूमीही आहे. एक तर आरएसएसच्या नागपूर राजधानीनंतर सुमारे 40/50 वर्षे येवला हा त्यांचा बालेकिल्ला राहिला आहे. या मंडळीची मोठी ताकद शहरात होती. शहरातील नगरपालिका, मर्चन्ट बँक या प्रमुख संस्थांवर त्यांचेच अधिराज्य होते. अशा वातावरणात कुणी त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीही करायला धजत नसे. मात्र तरीही आम्ही सुमारे 25 वर्षांपूर्वी प्राच्यविद्यापंडित, थोर इतिहास संशोधक कॉ.शरद पाटील यांचे येवल्यात व्याख्यान ठेवले होते. यानिमित्ताने त्या साऱ्या आठवणी ताज्या झाल्या.) तरीही हा कार्यक्रम टिळक मैदानावरच ठेवायचा, असा बहुतेक कार्यकर्त्यांनीही आग्रह धरला. 

मग पुन्हा एकदा सर्व बाजूंनी सखोल चर्चा करण्यात आली. राजकीय चढाओढींच्या भुंग्याने येवल्याच्या एके काळच्या आरएसएसच्या घट्ट युनिटला एव्हाना पोखरले असल्याची वास्तवता मी सर्वांच्या लक्षात आणून देताच, काहीही झाले तरी हा कार्यक्रम टिळक मैदानावरच करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार पक्का झाला. साधनाचे संपादक श्री.विनोद शिरसाठ, पाचोरा तालुक्यातील आडावद गावचे सरपंच व राष्ट्रसेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.खलिल देशमुख, कॉ.अशोक अप्पा परदेशी यांच्या प्रमुख उपस्थित आणि येवल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ॲड.माणिकराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या आगळ्या-वेगळ्या स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडले. या समारंभास येवला मर्चन्ट बँकेचे चेअरमन गोल्डनमॅन पंकज पारख, बँकेचे ज्येष्ठ संचालक सुशीलभाई गुजराथी, बँकेचे व्हा.चेअरमन राजेश भांडगे, अंजुमन तालिम-ए-निसवा या संस्थेचे अध्यक्ष सनाऊल्ला फारुकी, उर्दू गर्ल्स हायस्कूलचे अध्यक्ष मुश्ताकभाई पटेल, शहर काझी रफुद्दीन, सलीम काझी, पत्री सरकारचे पत्रकार आयूब शहासर, गेल्या अनेक वर्षांपासून स्वखर्चाने शिवाजी जयंती साजरी करणारे सुभाष पाटोळे, सूरज पटणी, मा.नगरसेवक संतोष परदेशी आदी सर्वपक्षीय हिंदू-मुस्लिम कार्यकर्ते, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. 

सध्याच्या असहिष्णू, मनगटशाही आणि जाती- धर्माच्या राडेबाजीला बढावा देणाऱ्या वातावरणाला प्रबोधनाची पणतीच उत्तर ठरू शकेल, या आत्मविश्वासाने राष्ट्र सेवा दल आणि तत्सम सर्व पुरोगामी-परिवर्तनवादी कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने या प्रबोधन मोहिमेत सहभागी झाले होते. 

Tags: rashtra seva dal राष्ट्र सेवा दल वक्तृत्व स्पर्धा विनोद शिरसाठ muslim girl speech on shivaji maharaj shivaji maharaj chhatrapati shivaji छत्रपती शिवाजी हिंदू मुस्लिम yewala arjun kokate येवला अर्जुन कोकाटे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके