सेवादलाच्या लोकांना सुखाचे जीवन सोसत नाही असे दिसते. आवाबेननी घर बांधले त्यात त्यांना राहता काही आले नाही. अंबिकेंच्या जीवनात असेच झाले. लालजींचा सत्कार केला, मोपेड दिली की दोन महिन्यांत लालजी आजारी पडले. सेवादलातली पोरे मंत्री झालेली पहावी म्हणून भाऊसाहेब मुंबईला निघाले तर त्यांना कोणा धटिंगणाने उचलून फेकून दिले.
1945 ते 1957 या बारा वर्षांत लालजींच्या प्रत्यक्ष प्रभावाखाली मी सेवादलाचे, समाजवादी पक्षाचे थोडे काम करत होतो. 1957 ते 62 नांदेडला प्राध्यापकी केली. 1962 पासून गेली 17 वर्षे उदगीरला प्राचार्य आहे. नांदेड आणि उदगीरला लालजी कधी आले नाहीत. पण माझ्या मनावर ते नेहमी प्रभावशाली होते.
विश्रांतीसाठी, इकडची प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी या म्हणून त्यांना मी लिहिले होते. त्यांनी येण्याचे कबूलही केले होते पण जमले नाही. पुण्याचा संबंध तुटल्यावर कधीमधी पुण्यात गेलो तर मुद्दाम गेले पाहिजे अशी दोनच ठिकाणे पुण्यात होती. एक साधना प्रेस आणि दुसरे लालजींचे घर!
42 च्या आंदोलनातून लालजी जेलमधून सुटल्यावर त्यांनी राष्ट्र सेवा दलाचे काम स्वीकारले. त्यांच्या सहवासात माझ्यासारखी त्यावेळची अनेक शाळकरी मुले आली आणि त्यानंतर त्यांचीच बनली. लालजींचा व्याख्यानांवर, वैचारिक चर्चांवर फारसा विश्वास नव्हता. चारित्र्य, साधेपणा, तत्वज्ञानावर एकनिष्ठा, शिस्त यावर त्यांचा भर असायचा. माणसामाणसातले संबंध ही त्यांच्या कार्याची गुरुकिल्ली होती.
सेवा दलाच्या सैनिकांची व त्यांची मनजुळणी तर असेच पण सैनिकांच्या घरच्या वडिलधाऱ्या लोकांशीही ते घनिष्ठ संबंध प्रस्थापित करत असत. माझ्या घरी ते यायचे आणि मी नसलो तर बाहेरच्या बाहेर निघून न जाता माझ्या वडलांशी, थोरल्या भावाशी, वहिनींशी बोलत बसत. कित्येकदा "अरे तो लालजी दोनदा येऊन गेला, तुझा पत्ताच नाही!" असे वडील मला रागवायचे. सध्या असे होते की पक्ष वा संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या नादी आपली मुले लागू नयेत म्हणून पालक प्रयत्न करतात. आपली पोरे उगाच लष्करच्या भाकऱ्या भाजतात, असल्या लोकांच्या नादी लागून आयुष्याचे वाटोळे करतील अशी पालकांना भीती वाटते.
लालजी घरोघर संबंध प्रस्थापित करत. त्यांचा साधेपणा, निर्व्यसनीपणा यामुळे घरा-घरात त्यांच्याबद्दल चांगले मत होत असे. या माणसाच्या ताब्यात आपली मुले गेली तर मुलांचे काही बिघडणार नाही, उलट त्यांना चांगले वळण लागेल असे मोठ्या माणसांना वाटायचे. लालजींनी घरी एकादा निरोप ठेवला तर तो घरात पाऊल ठेवल्याक्षणी दोघा-तिघांकडून मिळायचा.
लालजी आमच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावयाचे. लालजी आणि यदुनाथजींनी आमचे तास घेतले नसते तर मी मॅट्रिक पास झालो नसतो. लालजी व्यक्तिगत स्वच्छता शिकवायचे. व्यायाम करायला लावायचे. शाखेवर एक पाच मिनिटांचे बौद्धिक रोज असायचे. त्या वेळी बोलायला लावायचे. आजच्या माझ्या वक्तृत्वाची सुरवात तेव्हा लालजींच्या आग्रहाने झाली होती. सेवा दलाच्या वतीने निबंध स्पर्धा होत त्यातही लालजी आम्हाला भाग घ्यायला लावायचे. पुण्यात त्या वेळी सेवा दलाच्या पुष्कळ शाखा होत्या. दर रविवारी शहराचा मेळावा असे. प्रत्येक रविवारी कोठल्या तरी शाखेवर. लालजींमुळे कितीतरी ओळखी झाल्या. पुण्यातले सर्व पेठांतले मित्र मिळाले.
शारीरिक काटकपणा लालजींनीच आमच्या अंगी बाणवला. सातारा रॅलीला पुण्याहून सातारला सायकलीवरून जाण्याची कल्पना त्यांनी काढली. सातारा रॅलीत जेवणा-खाण्याचे भयंकर हाल झाले. नुसती थोडी उसळ खाऊन, पाणी पिऊन कसे ताजेतवाने राहावयाचे हे त्यांनीच शिकवले.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रेशनिंगचे धान्य, त्यातली लाल ज्वारी-मिलो खाऊन खरजेची साथ आली होती. लालजी अनेक सैनिकांच्या घरी जाऊन त्यांचे फोड धूत, औषधे लावत. मला एकदा कुत्रे चावले होते. लालजी किती तरी दिवस सकाळ संध्याकाळ येऊन माझी शुश्रुषा करत असत.
आम्ही मॅट्रिक झालो. त्यानंतर कोणी कोणत्या कॉलेजात, कोणत्या फॅकल्टीला जायचे याचा निर्णयही त्यांनी केला. माझ्यावर त्यांचे विशेष प्रेम. त्यामुळे सकाळी थोडा वेळ असलेले व तेही गावात असलेले एस्. पी. कॉलेज व आर्टस् फॅकल्टी मला देण्यात आली. म्हणजे रोज आणि सुटीच्या काळात सेवा दलाचे काम करता येईल ही योजना. आम्ही सर्व योजना बिनतक्रार मान्य केल्या पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे "मी एस. पी. ला आर्टस् ला जाणार" असे सांगितल्यावर "त्या लालजीनं सांगितलेलं दिसतंय्!" एवढे बोलून वडलांनीही लगेच प्रवेश- फीचे पैसे दिले.
मग प्रत्येक सुटीत लालजींच्या आदेशाप्रमाणे भोर, इंदापूर, जुन्नर अशा कितीतरी गावी जाऊन राहिलो. सेवादलाची स्थापना केली. काम वाढवले. लालजी त्यावेळी जिल्हाप्रमुख होते. राजवाडे मंगल कार्यालयात सेवादलाचे ऑफिस होते.
लालजींच्या सांगण्यावरून त्यावेळी आम्ही जीवनाचा मार्गच बदलला. इंटर सायन्सला 45/50 टक्के मार्क मिळाले की मेडिकलला प्रवेश मिळण्याचे ते दिवस. सरकारी नोकऱ्याही मॅट्रिक पास झालेल्यांना चटकन मिळत. पण हे मार्ग आम्ही स्वखुषीने सोडून दिले. आज माझ्या शब्दासाठी असे जीवनाचे मार्ग बदलणारे तरुण मला आढळत नाहीत. कारण लालजींचा प्रभाव त्यांच्या स्वतःच्या स्वार्थत्यागात, प्रखर ध्येयवादात होता. आमच्या वाणीला ते वजन कुठून लाभणार?
लालजी आम्हाला सेवादलाच्या शिबिरांना घेऊन जायचे. ऐन दिवाळीच्या दिवशी गार पाण्याची आंघोळ, कांजीचा नाश्ता आणि भाजी-भाकरीचे जेवण अशी व्यवस्था. शिबिराला जाता- येतानाही आगगाडीने, प्रचंड गर्दीत, लोंबकळत प्रवास करावा लागे. पण कधी वाईट वाटायचे नाही, घरची आठवण यायची नाही. (आज मात्र माझा पुण्याला शिकणारा मुलगा दिवाळीला घरी आला नाही तर वाईट वाटते. त्यावेळी माझ्या वडलांना, बहिनींना असेच वाटले असेल आणि मला जी फुशारकी वाटली होती ती माझ्या मुलाला वाटत असेल!)
लालजी नुसते प्रेम करीत नसत. आमच्या हातून चुका झाल्या तर त्यांची आधीच तिखट असलेली जीभ भयंकर जहाल होत असे. ते रडके नव्हते. मधून मधून ते आमच्या परीक्षा घेत. हैद्राबादच्या मुक्तिसंग्रामासाठी काही शस्त्रे गोळा करण्याचे काम लालजी करत. पिशवीत काय आहे ते स्पष्ट सांगून काही दिवस पिशवी तुझ्या घरी ठेवतोस का? असे विचारायचे. आम्ही तयारच. मग त्यांना अभिमान वाटायचा. जनार्दनराव भोकरे त्या वेळी एस.पी.कॉलेजच्या मागे राहत असत. या पिशव्या त्यांच्याकडे आम्ही नंतर पोचत्या करत असू. पेरु गेटावरून जाताना थोडी धाकधूक वाटत असे एवढेच.
आणीबाणीच्या काळात लालजींच्या घरी गेलो होतो. कधी नव्हत ते लालजी म्हणाले की आता मला सवड नाही; संध्याकाळी पाच वाजता काकाकुवा मॅन्शनमध्ये ये. काम आहे. पुण्यातल्या परिस्थितीची मला कल्पना नव्हती. लालजींनी सांगितल्याप्रमाणे गेलो. ते म्हणाले: "काम वगैरे काही नाही. मी तुझी परीक्षा पाहिली. कारण इथे झडती झाल्यामुळे फारसे कोणी फिरकत नाही. तू तरी येतोस का हे मला पाहायचे होते!" लालजींच्या परीक्षेत मी उत्तीर्ण झालो याचा मला खूप आनंद वाटला.
लालजी अतिशयः परखड बोलणारे होते. त्यांनी कुणाचीच गय केली नाही. प्रजासमाजवादी- संयुक्त समाजवादी भांडणाऱ्या काळात त्यांनी सकाळमधे पत्रे लिहून एस्. एम्. वर सुद्धा टीका करण्यास मागेपुढे पाहिले नाही. समितीच्या काळात कम्युनिस्ट पक्षाच्या एका स्त्री कार्यकर्तीला त्यांनी एकदा असे झापले होते की तिला जन्मभर आठवण राहावी.
आयुष्यभर त्यांनी सेवा दल, पक्ष, कामगार संघटना यासाठी खस्ता खाल्ल्या. स्वतःसाठी काही मिळावे अशी अपेक्षाच केली नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणावर जातीयवादाची पकड आहे. त्यामुळे जन्माने ब्राह्मण असलेल्या कार्यकर्त्यांनी काही अपेक्षाच करणे चुकीचे आहे. काही जण अशी अपेक्षा करतात आणि निराश होतात. मग काँग्रेस आणि जनतात फरक काय, असे विचारतात. फरक नाहीच तर फरक काय सांगणार? लालजींनी कधी अपेक्षाच केली नाही. त्यामुळे त्यांना पदरी निराशा घ्यावी लागली नाही. इतरांसाठी मात्र ते झगडले. सेवा दलात, पार्टीत, कामगार संघटनांत काम करताना त्यांचे फार हाल झाले. त्यांना कधी वेळेवर मानधन मिळाले नाही. मोठ्या पुढाऱ्यांनी कसे काय चालले आहे म्हणून साधी चौकशीसुद्धा केली नाही. त्यांनी लेखन कधी केले नाही त्यामुळे इतरांना उपलब्ध असलेला पैसे मिळवण्याचा तोही मार्ग त्यांना बंद होता. पत्नीच्या पगारावर अगदी साधेपणाने राहून त्यांनी खडतर समाजसेवा, देशसेवा केली. आपल्या अडचणी त्यांनी कधी बोलून दाखवल्या नाहीत. कधी आपल्या कार्याचे भांडवल केले नाही.
लालजी सुरवातीला काकाकुवा मॅन्शनसमोर एका वाड्यात एका खोलीत आईसह राहात असत. खोलीत खूप ओल असे. त्या लहानशा खोलीतसुद्धा मी आणि माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते जेवलो आहोत. त्यांची आई त्यांच्यासारखी सोशिक. लग्न झाल्यावर ते रास्ता पेठेत राहायला गेले. सरकारी नोकरी करणाऱ्या त्यांच्या पत्नीने- कमलताईंनी- आम्हाला तितकेच प्रेमाने, अगत्याने वागवले. आधीच नवऱ्याचे रिकामे उद्योग व त्यात रिकामटेकडे टोळभैरव! अशी त्यांनी आमची हेटाळणी कधी केली नाही. कधीही गेलो तरी जेवण, किंवा चहा किंवा निदान केळी तरी देऊन आदरातिथ्य केले. कार्यकर्त्यांची स्वतःची मुले चांगली राहत नाहीत. पण लालजींचा उत्तम याला अपवाद. तो शिकला, नोकरीला लागला. त्याने घर सुधारले. घरात विविध सुखसोई आल्या. फोन आला. पण लालजी पूर्वीसारखेच राहिले. त्यांच्या सायकलमधे फरक नाही, त्यांच्या कपड्यांत फरक नाही. शर्ट-जाकिटात टोचून ठेवलेल्या टाचण्यासुद्धा तशाच! सुखासीनता त्यांच्या जीवनात कधी आली नाही. कोणत्याही भौतिक गोष्टींचा लोभ त्यांना वाटला नाही.
नुकताच त्यांचा पुण्यात सत्कार झाला. लालजींचा लोकसंग्रह किती दीर्घकालीन आणि सर्वक्षेत्रव्यापी आहे याची त्यानिमित्ताने जाणीव झाली. वास्तविक त्यांची एकसष्टी आणीबाणीच्या काळात होऊन गेली होती. पण त्या वेळचा राहिलेला समारंभ त्यांच्या चाहत्यांनी एकत्र येऊन साजरा केला. त्यांना मोपेड घेऊन दिली. त्या वेळी सत्काराला उत्तर देतानासुद्धा लालजी भावनाप्रधान बोलले नाही. नेहमीप्रमाणे कामाची चार वाक्ये बोलून त्यांनी आभार मानले. खऱ्या अर्थाने त्यांनी सतीचे वाण स्वीकारले होते. निंदा, अवहेलना, सत्कार आणि स्वागत यांची त्यांनी तमा बाळगली नाही, त्याला काही महत्त्व दिले नाही.
त्यांचा लोकसंग्रह विलक्षण त्याप्रमाणे त्यांची स्मरणशक्तीही जबरदस्त. कधी भेटलो की म्हणायचे: “अरे, तुझ्या नारायण पेठ शाखेतला परांजपे आता बँकेचा डायरेक्टर झाला आहे!" हा कोण परांजपे ते मला लौकर आठवायचे नाही. लालजींना 30-32 वर्षांपूर्वी कोण कोणत्या शाखेत होता, कोण कोणाचा मित्र होता याची आठवण असे. मग कधी रमण शहा, सायमन, मधू मोरे, माधव गीर, राम पाडेकर, निघोजकर, नांगरे, गोपाळ अवस्थी, मधू गोवंडे, पुरंदरे यांच्या आठवणी निघायच्या. त्यात प्राचार्य डॉ. ना. य. डोळे स्वतःला विसरून, रघु डोळे होतो. मला 'अरे रघू' म्हणणारे आता फार थोडे राहिले आहेत. लालजी त्यात होते. त्यांच्या समोर सिगारेट ओढायची हिम्मत होत नसे.
1945 पासून आजपर्यंत आणि पुढेही असा प्रभाव लालजी आमच्यासारख्या अनेकांवर टाकू शकले याचे कारण काय असावे? त्यांनी आमच्या मनाशी जवळीक निर्माण केली होती. 'आमार जीवन आमार वाणी' असे त्यांच्या कडे पाहून पटायचे. आम्ही पुष्कळ चुका केल्या. काही त्यांना समजल्या. त्यावेळी त्यांनी पुरेसे झाडून आम्हाला वळण लावले. काही चुका त्यांना समजल्या नाहीत. पण लालजींना समजले तर काय होईल या भीतीने आम्ही स्वतःच सुधारलो.
सेवादलाच्या लोकांना सुखाचे जीवन सोसत नाही असे दिसते. आवाबेननी घर बांधले त्यात त्यांना राहता काही आले नाही. अंबिकेंच्या जीवनात असेच झाले. लालजींचा सत्कार केला, मोपेड दिली की दोन महिन्यांत लालजी आजारी पडले. सेवादलातली पोरे मंत्री झालेली पहावी म्हणून भाऊसाहेब मुंबईला निघाले तर त्यांना कोणा धटिंगणाने उचलून फेकून दिले. सेवादलाचे काम बिहारात, आसामात, दिल्लीत वाढते आहे. म्हणून परीटगुरुजी खूष तर त्यांच्यावर कौटुंबिक आपत्ती कोसळली!
काही माणसे हाल सोसण्यासाठीच जन्मतात. लालजी यांतलेच एक. सुखा समाधानाचे दिवस आले की त्यांना या जगात राहवत नाही. कमलताई रिटायर्ड झाल्या, उत्तम चांगल्या नोकरीवर आहे. सून मिळवती आहे. आज्ञाधारक आहे. आता निवांत रहावे, प्रवास करावा. नातवंडाना खेळवत घरी बसून राहावे. एखादी कमिटी मिळालीच तर त्यावर काम करावे, आपले सहकारी अनुयायी केंद्रात, राज्यांत आमदार, खासदार, मंत्री झाले आहेत अशी समाधानाची अवस्था इतक्या वर्षानंतर आली असतानाच लालजी हे जग सोडून गेले. तरीसुद्धा त्यांचे माझ्या मनातले अस्तित्व, त्यांची शिकवण त्यांचा धाक माझ्या मनात कायम राहणार आहे.
Tags: जातीयवाद दुसरे महायुद्ध यदुनाथ थत्ते राष्ट्र सेवा दल नांदेड लालजी कुलकर्णी Casteism World War II Yadunath Thatte Rashtra Seva Dal Nanded Lalji Kulkarni weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या