डिजिटल अर्काईव्ह

गुरुजींचे सगळे जीवन म्हणजेच एक प्रचंड साधना. या साधनेच्या तपस्येला बंधने नकोशी होती. गुरुजींचा अंत झाला त्या वेळी मी आदिसआबाबालाच होतो. त्यांच्या मृत्यूला काय कारणे घडली ते मला केवळ वाचून माहीत, पण त्यांच्या अकाली मृत्यूने मानवतेचा एक महान उपासक गेला. ज्या उपासकाला धर्म, जात, पंथ ही बंधने तोडून मानव एक करायचा होता. ही साधना स्वतःच्या जीवनात त्यांनी यशस्वी केली होती. हे असिधारा व्रत साधकांनी आचरले पाहिजे. हेच साने गुरुजींचे पुण्यस्मरण.

1931 मध्ये अमळनेरच्या प्रताप हायस्कूलमधली नोकरी सोडून देऊन साने गुरुजी राजकारणात पडले. त्यांचे जीवन देशव्यापी झाले. त्यांची जळजळीत दगडालाही चेतना आणणारी भाषणे आणि त्यांचे तुफान दौरे हे त्या वेळचे खान्देशमध्ये आगळेच दृश्य होते. त्यांच्या रोमरोमांत देशप्रेम भिनलेले होते. देशाच्या स्वातंत्र्याची त्यांना अक्षरशः रात्रंदिवस चिंता होती आणि गुलामगिरीच्या व्यथेने ते बेचैन होते. आपल्या कार्याचा प्रचार अधिक प्रभावपूर्ण व्हावा यासाठी त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे वर्तमानपत्र काढले. काँग्रेसचे अंक आता कुठे वाचायला मिळतील किंवा नाही याची शंकाच आहे, पण आपल्या तेजस्वी, ओघवत्या लेखणीतून त्यांनी पहिल्याच अंकातून काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. गुरुजींची लिहिण्याची एक विशिष्ट शैली होती. वक्तृत्वाची एक अजोड देणगी त्यांना लाभली होती. लेखणी आणि वाणी या दोहोंवर गुरुजींचे सारखेच असामान्य प्रभुत्व होते.

अशी तडजोड कधी केली नाही 

गुरुजींनी आपले जन्माने प्राप्त झालेले ‘ब्राह्मणत्व’ कधीच झुगारून दिले होते. जानव्याचा त्याग केला होता. त्या काळी जानवे न घालणे महान पाप समजत! एवढे सुधारक माधव ज्यूलियन, ते जानवे घालत नसत हे खरे, पण एकदा एका मित्राकडे जेवायला जाताना, ते आमच्या घरी येऊन माझ्या वडलांना म्हणाले, ‘‘लक्ष्मणराव जानवे आहे का तुमच्याकडे?’’  आणि वडलांनी दिलेले जानवे घालून ते मित्राकडे जेवायला गेले. त्या काळी ‘श्रीमंत’ घरांतून पाटावरती व उघड्या अंगानेच जेवायला बसत, गुरुजींना अशी तडजोड मानवली नाही. 

त्यागी वृत्ती 

साने गुरुजींच्या विशाल मनाची कल्पना त्यांच्या सहवासात में आले असतील, त्यांना आली असेलच, पण त्यांच्यासारखा मानवतेची कास धरलेला महात्मा आगळाच. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ ही तुकोबांची उक्ती त्यांच्या जीवनात ठायी ठायी दिसून येई आणि म्हणूनच साने गुरुजी समाजातल्या त्या काळी खालच्या समजल्या जाणाऱ्या थरांतील लोकांत मिसळू लागले, त्यांचे जीवन जगू लागले. नेसूचे केवळ एक आखूड गुडघ्यापर्यंतचे धोतर. पायांत घालायला चपला मात्र नव्हत्या! गुरुजींना जीवनात पैशाचे वा सुखाचे कधी आकर्षणच वाटले नाही. एक तरुण विद्यार्थी आला. आम्ही त्या तरुणाला चांगलेच ओळखून होतो. त्याने आपली रडकथा सांगायला सुरुवात केली. अण्णा (आम्ही गुरुजींना ‘अण्णा’ म्हणत असू) गहिवरले. पुढे असलेले सर्व पैसे त्यांनी त्या तरुणाला देत म्हटले, ‘‘पुरतील ना एवढे ?’’ आम्ही ओरडलो, ‘‘अण्णा, हे काय करता? कशावरून त्याला पैशाची गरज आहे ?" पुढचे मी लिहीत नाही. अण्णा रागावले म्हणजे कसा अवतार धारण करीत हे निकटवर्तीयांना चांगले माहीत होते, आणि आम्ही तर त्यांचे विद्यार्थी! ज्याला देवाने जीवनाला पात्र मानले त्याच्या पात्रतेची आपण आणखी उठाठेव कशाला करा, असे त्यांच्या आस्तिक  मनाला वाटले असावे. साने गुरुजींच्या या खालच्या थरात काम करण्याबद्दल धुळ्याच्या एका वर्तमानपत्राने त्यांचा 'साने भंगी' म्हणून उल्लेख केला! गुरुजींना त्याचा विशाद वाटला नाही. ते म्हणाले, "माझा उल्लेख एका वृत्तपत्राने 'साने भंगी' म्हणून केला आहे. त्यांनी दिलेल्या या पदवीबद्दल मी त्यांचा फार आभारी बाहे. मला तसे होता आले मी स्वतःला भाग्यवान समजेन. मला आता एकच इच्छा आहे, लोकांनी मला साने-मुल्ला म्हणावे म्हणजे माझ्या जीवनाचे सार्थक झाले!’’ 

1924 ते 1931 सात वर्षे साने गुरुजींच्या अध्यापनाचा आणि सहवासाचा लाभ झालेले जे भाग्यशाली विद्यार्थी आहेत, त्यांपैकी मी एक आहे. गेली अनेक वर्षे शिक्षणक्षेत्रात मी अनेक पदांवरून काम केले आहे, त्यावरून मी एवढे निश्चित म्हणू शकतो की विद्यार्थ्यांच्या जीवनावर परिणाम करण्याचे महान कार्य शिक्षक करू शकतो व त्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे साने गुरुजी. आपल्या वागण्याने त्यांनी सर्वांना कित्ता घालून दिला होता. एम. एम. शहा नावाचा एक विद्यार्थी आमच्या वर्गात होता. तो अतिशय फॅशनेबल राहत असे. त्याची धोतरे अत्यंत तलम असत. साने गुरुजींनी त्याला त्या फॅशनच्या हव्यासापासून मुक्त केले. असे अनेक संस्कार गुरुजीनी विद्यार्थ्यांवर केले. विद्यार्थ्यांवर त्यांचे अलोट प्रेम असे. 'विद्यार्थी' नावाचे मासिकही त्यांनी सुरू केले होते आणि माझ्या स्मृतीप्रमाणे मासिकाचे बोधवचन होते- 'फोडिले भांडार। धन्याचा हा माल। मी तव हमाल भारवाही ।।’’

सेनापतींची भलावण

एखाद्या व्यक्तीचे अमाप गुणगान करण्यात आपण भारतवासी अगदी पटाईत आहोत. जिवंतपणी अनन्वित छळ केलेल्या आंबेडकरांना आपण आता महान पुरुष म्हणू लागलो आहोत. त्यामुळे पुष्कळशी विशेषणे ही केवळ शोभेची बिरुदावली ठरत आहेत. परंतु साने गुरुजींच्या बाबतीत विशेषणानी विशेषत्व पावावे असे होते! देशासाठी 'सर्वस्व' म्हणजे शब्दशः 'सर्वस्व' अर्पण करणारे साने गुरुजी होते; म्हणूनच, 1939 च्या सुरुवातीला तापी-बोरीच्या संगमावर समाधी घेण्याचा निर्णय गुरुजींनी घेतल्याचे कळताच, त्यांच्या मालिकेत बसणाऱ्या सेनापती बापटांनी गुरुजींना तार केली, ‘‘मीही तुमच्या बरोबर जलसमाधी घ्यायला येत आहे.’’ मी त्या वेळी सेनापती बापटांच्या घरी पुण्यास राहत होतो. मी सेनापतींना म्हणालो, ‘‘तात्या, गुरुजींनी जलसमाधी घेणे चांगले नव्हे." त्यावर हसून तात्या म्हणाले होते, "मत द्यायचा आपल्याला काय अधिकार?" देशाच्या स्वातंत्र्यासाठी, गरिबांच्या उन्नतीसाठी प्राणपणाने झटणे हे साने गुरुजींचे जीवित कार्य होते. हातचे राखून ठेवणे त्यांना माहीत नव्हते. या अंगीकृत कार्यात जे जे येतील त्या सर्वांबरोबर त्यांनी सहकार्य केले आहे.

साने गुरुजींनी एखाद्या कार्याला वाहून घेतले म्हणजे त्याची सांगता होईपर्यंत ते अक्षरशः तहान, भूक, झोप विसरत. 1934 नंतरचा काळ तरुणांनी सोशॅलिस्ट कम्युनिस्ट बनण्याचा होता. साने गुरुजींनी त्या काळात 1942 पर्यंत कम्युनिस्टांबरोबर सहकार्य केले. जळगावला नेलेला शेतकऱ्यांचा 50-60 हजारांचा मोर्चा हे केवळ साने गुरुजींच्या श्रमांचे फळ! पण कोणतेही राजकीय लेबल साने गुरुजींना पसंत नव्हते. कोणत्याही पक्षाचे बंधन त्यांनी स्वीकारले नाही. 1942 मध्ये लढा सुरू झाला. आमची व गुरुजींची वैचारिक फारकत झाली. आम्ही कम्युनिस्ट ‘लोकयुद्धा’च्या घोषणा करीत होतो. साने गुरुजी आमच्यावर अत्यंत चिडत. ते भूमिगत झाले होते. मी त्या वेळी जळगावला ट्रेनिंग कॉलेजमध्ये नोकरी करीत होतो आणि पक्षाचे कामही करीत होतो. विशेषतः ‘लोकयुद्ध' विकणे, त्याचा प्रचार करणे हे माझे प्रमुख कार्य असे एकदा सकाळी दहाच्या सुमारास प्रचंड नावाच्या मित्राकडे मी ‘लोकयुद्ध’ विकायला गेलो. माडी चढून तिसऱ्या मजल्यावर गेलो. दार आतून लावलेले होते. मी ठोठावले. आत काहीतरी बोलणी ऐकू आली, दार थोडे किलकिले झाल्याचे दिसताच, ते ढकलून मी आत गेलो. चारपाच तरुणांच्या गराड्यात साने गुरुजी बसलेले! प्रथम मी त्यांना ओळखलेच नाही; कारण त्यांनी मिशा काढलेल्या होत्या. मला पाहता साने म्हणाले, ‘‘मला पकडून द्यायला तू आलास ना? सांग! सांग सरकारला- तुम्ही लाल सैतान देशाचे वाटोळे करणार! मी दिङ्मूढ झालो. त्यांच्या पायांना स्पर्श करीत मी म्हणालो, ‘‘अण्णा, मी कम्युनिस्ट असलो तरी माणूस आहे. तुमचा विद्यार्थी आहे. मी तुम्हांला आईप्रमाणे पूज्य मानतो आणि चटकन निघून गेलो. साने गुरुजींचा हा स्वभावविशेष होता. जो विचार, जो सिद्धान्त त्यांना पटे, त्याच्याशी ते भावनिक रूपाने तादात्म्य पावत, एकजीव होत. त्यात ताटस्थ्य नसे. लाल झेंड्याला डोक्यावर घेऊन नाचणारे गुरुजी लाल झेंड्याचे कट्टर शत्रू बनले. हे शत्रुत्व केवळ वैचारिक नव्हते तर ते भावनिक होते. त्यामुळे त्यांनीच प्रेरणा व स्फूर्ती दिलेले त्यांचे जे पूर्वीचे आवडते विद्यार्थी, ते बेचाळीसच्या चळवळीत न पडल्याबद्दल व सुभाषबाबूंना देशद्रोही म्हणू लागल्याबद्दल साने गुरुजींपासून कायमचे दुरावले. साने गुरुजींनी त्या कम्युनिस्टांशी पुन्हा कधीही वैयक्तिक संपर्क आणला नाही. कम्युनिस्टांना त्यांनी त्यांच्या ह्या राष्ट्रद्रोहाची कधीच क्षमा केली नाही.

अविस्मरणीय प्रसंग

तादात्म्य आणि एकरूपता हे साने गुरुजींचे विशेष स्वभावविशेष. याचे प्रत्यंतर अगदी लहानसहान गोष्टींतही दिसून येई. गोविंदाग्रजांची 'राजहंस माझा निजला' आणि दत्तांची 'नीज नीज माझ्या बाळा' कविता शिकवताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत आणि मुलांच्याही. हरिभाऊंची ‘मी' कादंबरी ते शिकवत, शिकवत म्हणजे काय, वाचत: पण त्यांच्या वाचनाचाच प्रभाव इतका विलक्षण असे की शाळेत साने गुरुजींच्या मुखातून श्रवण केलेली 'मी' मी कधीच विसरलो नाही. एकदा बाल गंधर्वांचे नाटक पाहायला साने गुरुजी आम्हांला घेऊन जळगावला गेले. गुरुजींनीच भाड्याचे व नाटकाचे पैसे दिले. नाटक होते 'एकच प्याला.' नाटकाच्या शेवटच्या अंकात सिंधू म्हणते, "नाही रे दादा- मला आज उपवास होता. भोवळ येऊन पडले मी. त्याची खोक पडली." ह्या प्रसंगाने साने गुरुजी अक्षरशः रडू लागले आणि त्यांच्या बरोबर आम्ही विद्यार्थीही!

साने गुरुजींचे वैशिष्ट्यपूर्ण साहित्य

इतकी एकात्मता चांगली की वाईट हा चर्चेचा विषय होऊन बसला आहे. साने गुरुजींच्या सगळ्या साहित्यात ही एकात्मता आहे. साहित्यात एक अलिप्तपणा असावा लागतो, 'समाधी' लागावी, पण ती 'सविकल्प' असावी असे साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांचेही मत आहे. पण साने गुरुजींच्या एकरूपतेचे स्वरूपच वेगळे होते. जे जे मंगल, पवित्र, सुंदर, उदात्त त्याच्याशी ते तादात्म्य पावत. यासाठी निष्पाप जग म्हणजे लहान मुलांचे, त्यांत ते रंगून जात. लहान मुलांबद्दल प्रेम असणारे पुष्कळ पुढारी होऊन गेलेत; पण साने गुरुजी त्या लहानग्या सृष्टीत रमत, बागडत, चक्क नाचत. ही एकात्मता दुर्लभ आहे. मुलांबरोबर खेळणे, त्यांना कविता म्हणायला लावून त्यांच्याबरोबर नाचणे, त्यांना गोष्टी सांगून तल्लीन करून सोडणे व स्वतःही तल्लीन होणे ही गोष्ट दुर्मिळ आहे. लहान मुलांप्रमाणे त्यांना स्त्रीबद्दल अपरंपार आदर. अनेकांना याचा अनुभव आला असेल. 'स्त्री'ला ते देवता मानीत. जेवताना एखाद्या पदार्थावर कुणी नाक मुरडले तर साने गुरुजींना संताप येई. स्त्रीबद्दलच्या या अत्यंत मंगल भावनेतूनच 'श्यामची आई' निर्माण झाली.

एक हृदयस्पर्शी प्रसंग

त्यांच्या अमोघ वक्तृत्वाचे बीजही या एकरूपतेत आहे. त्यांच्याकडे प्रथमच ज्यांची दृष्टी जात असेल, त्यांना ही बावळी, ठेंगणीशी खादीचा घरी धुतलेला कुडता आणि घरी धुतलेले धोतर नेसलेली व पायतान नसलेली मूर्ती पाहून, या मूर्तीच्या अंतःकरणात केवढा ज्वालामुखी पेटला आहे याची कल्पना येत नसे.  1936 मध्ये मी पुण्यास स. प. कॉलेजमध्ये बी. ए. च्या शेवटच्या वर्षात होतो. कॉजातील साहित्य मंडळाचा मी चिटणीस होतो व साने गुरुजींचे व्याख्यान ठरवले होते. त्यांना घ्यायला मी टांगा करून शुक्रवारात गेलो. खोलीला कुलूप! मला धस्स झाले! तोच टांगा मी परत कॉलेजात आणला व स्टाफरूममध्ये साने गुरुजींचेही गुरू म. म. पोतदार यांना सांगायला गेलो. साने गुरुजी शांतपणे एका खुर्चीवर अवघडत म. म. पोतदारांशी गप्पा मारीत बसलेले! पायांत काही नाही. "अरे कशाला हवा होता टांगा? मो पायीच आलो." मी ओशाळून म्हणालो, "पण अण्णा, या उन्हातून तुम्ही अनवाणी पायी आलात." हसून गुरुजी मला म्हणाले, ‘‘अरे, मला सवय आहे.” गुरुजींना सभागृहात नेल्यावर, त्यांच्याकडे पाहून माझे मित्र कुचाळक्या करू लागले, पण त्यांनी बोलायला सुरुवात करताच दीड तास सभा मुग्ध झाली! 

उदात्त, मंगल, पवित्र अशा भावनाशी एकरूप होणे, तादात्म्य पावणे हा साने गुरुजींचा स्थायी भाव त्यांच्या स्वभावात अनेक रूपाने प्रकट झाला होता. त्यांना 'अर्था’चे आकर्षण तर नव्हतेच, उलट तिटकारा होता. त्याचप्रमाणे प्रसिद्धीचे. 1940 मध्ये मुंबई उपनगर मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद साने गुरुजींनी स्वीकारावे यासाठी मी त्यांचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला पण गुरुजी म्हणत, "येवढा मोठा मी साहित्यिक नाही.’’ त्यांच्यातला विनय हा विनयालाही लाजवणारा होता. 

मुळमुळीत अवघेचि टाकावे 

साने गुरुजींना सत्याची अत्यंत चाड होती; आणि चहाडी-खोटे बोलणे असल्या स्वभावाच्या व्यक्तीपासून ते लांब राहत. विद्यार्थ्यांच्या मनावर त्या गुणांचा पगडा साने गुरुजींच्या आचरणाने पडत असे. मांसाशन यांना मुळीच पसंत नव्हते आणि आम्ही काही विद्यार्थ्यांनी कॉलेजात गेल्यावर  ‘फॅशन' म्हणून मांसाशन सुरू केले व त्याची तरफदारी साने गुरुजींपाशी करू लागताच त्वेषाने गुरुजींनी स्वतःचा हात माझ्या तोंडात घालीत म्हटले, "खा खा मांस खायचे ना! खा" हा त्वेष त्यांचा निरंतर भाव होता. त्यांची भाषणे त्वेषाने भरलेली असत. या त्वेषामुळे, राग आला की साने गुरुजींशी चर्चा करणे अवघड व्हायचे. याबद्दल त्यांना अत्यंत दुःख होई. स्वतःच्या हीनतेबद्दल गुरुजी वारंवार हळहळत. त्रिचनापल्लीच्या तुरुंगात स्वतःच्या तुच्छतेबद्दल त्यांना इतकी खंत वाटली की जळत्या तव्यावर त्यांनी आपला उजवा हात धरला नि जळू दिला! पण त्यांचे अंतःकरण गरिबांच्या, दुःखितांच्या, पीडितांच्या तळमळीने, प्रेमाने अथांग भरलेले होते. प्रेमाने ते लोकांची मने जिंकीत आणि आपल्यामुळे दुसऱ्याला कष्ट होत आहेत असे त्यांना कळले तर ते स्वतःला शिक्षा करून घेत. एखादे वेळ वर्गात कुणा विद्यार्थ्याने शिकवण्याकडे लक्ष दिले नाही तर गुरुजींना अत्यंत वाईट वाटे. "तुझा दोष नाही. मलाच शिकवता येत नाही." असे म्हणून ते स्वतःच्या हातावर छड्या मारून घेत. 

साने गुरुजींच्या या तादात्म्यतेमुळे त्यांनी राजकारणात स्वतःचे मठ स्थापन केले नाहीत. राजकारणात पुढारी व्हायचे म्हणजे त्यासाठी स्वभावाची घडण अलग असावी लागते. साने गुरुजींचा स्वभाव पुढारी होण्याचा नव्हता. राजकारणातले डावपेच त्यांना मानवणे शक्यच नव्हते. या बाबतीत सेनापती बापटांचे व त्यांचे गोत्र एक होते. साने गुरुजींच्या साहित्याबद्दल अनेक वर्षांपूर्वी एका प्रख्यात साहित्यिकाने अनुदार उदगार काढल्याचे मला चांगले आठवते. ‘‘डुकरिणीला पिल्ले होतात तशी साने गुरुजींची साहित्य प्रसूती आहे,’’ असे त्यांनी म्हटले होते! ते साहित्यकार म्हणजे प्रा. ना. सी. फडके. मला या ठिकाणी साने गुरुजींच्या साहित्यावर लिहायचे नाही; पण प्रा. फडक्यांना गुरुजींचा स्थायी भाव दुर्दैवाने समजला नाही.

गुरुजींच्या ज्या स्थायी भावाचे मी वर दिग्दर्शन केले आहे, त्याचेच चित्रण त्यांच्या साहित्यात आहे, त्यामुळे नाटकी कला, बेगडीपणा, कृत्रिमता त्यात नाही. साने गुरुजींना ज्या क्षणी जे महत्त्वाचे वाटले, ते त्यांनी प्रभावीपणे तळमळीने लिहिले. त्यातील पुष्कळशा प्रचाराशी नंतर गुरुजीही सहमत नव्हते. उदा- कम्युनिस्टांबद्दल, लाल झेंड्यांबद्दल प्रशस्ती व प्रचार. पण ज्या वेळी त्यांनी ते लिहिले त्या वेळी ते त्यांच्या दृष्टीने सत्य होते, इष्ट होते, महत्त्वाचे होते. त्या वेळेस कम्युनिस्टांविरुद्ध बोलण्याजोगे गुरुजींजवळ काहीच नव्हते. 'काँग्रेस' पत्र त्यांनी काढले; त्यात काँग्रेस संस्थेची इतकी स्तुती असे की प्रत्यक्ष काँग्रेसला बोलकी केली असती तर तिने स्वतःबद्दल इतके म्हटले नसते. त्याच काँग्रेसमधून पुढे त्यांना बाहेर पडावे लागले.

निर्मळ वात्सल्य 

1946 नंतर मी राजकारणच नव्हे तर देशही सोडला. आदिसअबाबाहून किर्लोस्कर मासिकातून आणि नवभारत मासिकातून माझे लेखन नियमित प्रसिद्ध होऊ लागले. देश सोडण्यापूर्वी साने गुरुजींना भेटण्याचा योग आला होता. नाशकाला 'न्यू स्कूलमध्ये त्यांचे भाषण होते. मी त्या वेळी नाशिकरोडला पाच बंगले सॅनिटोरियममध्ये आजारी पत्नीला घेऊन श्वशुरांकडे राहत होतो. त्याच वेळी माझे परदेशाला जायचे ठरत होते. गुरुजी गावात आले आहेत हे कळताच मला आनंद झाला. माझ्यातले परिवर्तन त्यांना सांगणार होतो; देश सोडण्यापूर्वी त्यांचे आशीर्वाद मागणार होतो. 'न्यू स्कूल'च्या पटांगणात खूप गर्दी जमलेली होती. ज्या रांगेत साने गुरुजी खुर्चीवर बसले होते, त्याच रांगेत मीही बसलो होतो. गुरुजींच्या शेजारी कोल्हापूरला माझ्याच बरोबर बी. टी. झालेले श्री बेदरकर बसले होते. मला वाटते, बेदरकर त्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक असावेत. गुरुजींना बेदरकरांतर्फे मी लहानशी चिठ्ठी पाठवली, ‘‘अण्णा, तुम्हांला भेटायची तळमळ आहे."

गुरुजींनी चिठ्ठी वाचली, माझ्याकडे पाहिले. पण नाही; बोललेही नाहीत. सभा आटोपल्यावर मी बेदरकरांना विचारले. ते म्हणाले, "गुरुजींना वेळ नव्हता’’. माझ्या मनाला ते फार लागले. गुरुजींचा माझ्यावरील रोष अजून गेला नव्हता! मग आदिसअबाबाहून मी त्यांना पत्र लिहिले. चांगले लांबलचक. त्यात गुरुजींच्याच ‘‘आई मी तुला आवडेन का ?" या अत्यंत करुण गोष्टीचा उल्लेख करून म्हटले होते, “अण्णा, मी तुमच्या मनातून इतका उतरलो आहे? तुमचे व माझे विचार भिन्न होते म्हणून तुम्ही माझ्यावर राग ठेवणे इष्ट आहे का?-" साने गुरुजींचे लगेच मला चारपानी पत्र आले - नेहमीप्रमाणे स्वतःच्या दोषांबद्दलची त्यांनी खंत प्रकट केली आणि शेवटी लिहिले, "तू लेखक होशील हे लहानपणापासूनच मी ओळखले होते. तुला एक गोष्ट सांगतो. लेखणीशी बेइमान होऊ नकोस; आणि, साहित्यनिर्मिती ही सरस्वतीची पूजा समजून, मांगल्याची पूजा करणारे साहित्य लिही. मी साधना काढले आहे. त्यात लेख पाठव! 

गुरुजींचे सगळे जीवन म्हणजेच एक प्रचंड साधना. या साधनेच्या तपस्येला बंधने नकोशी होती. गुरुजींचा अंत झाला त्या वेळी मी आदिसआबाबालाच होतो. त्यांच्या मृत्यूला काय कारणे घडली ते मला केवळ वाचून माहीत, पण त्यांच्या अकाली मृत्यूने मानवतेचा एक महान उपासक गेला. ज्या उपासकाला धर्म, जात, पंथ ही बंधने तोडून मानव एक करायचा होता. ही साधना स्वतःच्या जीवनात त्यांनी यशस्वी केली होती. हे असिधारा व्रत साधकांनी आचरले पाहिजे. हेच साने गुरुजींचे पुण्यस्मरण.

Tags: श्रद्धांजली साने गुरुजींच्या आठवणी प्रासंगिक Tribute Memories of Sane Guruji Occasional weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी