डिजिटल अर्काईव्ह

सी यू अगेन - प्रफुल्ल सरोवरे, रसरशीत रंग

काश्मीरचे वर्णन करता करता लेखक काश्मीरच्या प्राचीन व अर्वाचीन इतिहासातही शिरतो आणि त्यावर आपली मते व्यक्त करतो, येथपर्यंत त्याच्या हातून मर्यादामंग होतो असे वाटत नाही. पण सोळाव्या शतकातील काश्मीरच्या राजाची प्रेयसी बा खातूनच्या प्रेमगीतांच्या संदर्भात लेखकाला काश्मीरमधील विद्यमान कवयित्री पद्या सचदेव यांची आठवण होते, आणि तो जेव्हा काश्मिरी साहित्य व मराठी साहित्य यांची तुलना करू लागतो, त्यावेळी त्याने व्यक्त केलेले मराठी साहित्यसंबंधीचे विचार अनाठायी वाटतात.

श्री. शांतिलाल भंडारी यांनी ‘सी यू अगेन’- फिर मिलेंगे- अशा जरा चमत्कारिक वाटणाऱ्या इंग्रजी मथळ्याचे हे पुस्तक लिहिले आहे. नाव वाचून अशी कल्पना होत नाही की, हे काश्मीरचे प्रवास वर्णन असेल, परंतु काश्मीरला गेलेले श्री. भंडारी त्याच्या सौंदर्यावर इतके भाळून गेले की, काश्मीर सोडताना त्यांना ‘सी यू अगेन!’ असे सहजोद्गार काढावेसे वाटले. 

आपल्याकडे प्रवास वर्णनांची कमतरता आहे असे नाही आणि काश्मीर प्रवासाची वर्णने तर अनेकांनी केलेली आहेत. याचे एक कारण असे असावे की, भारताच्या अन्य भागात ज्या गोष्टी पहावयाला मिळत नाहीत, त्या काश्मीरात पहायला मिळतात. चिनारासारखे, आक्रोडासारखे वृक्ष, हिमाच्छादित गिरिशिखरे, स्फटिकाप्रमाणे झुळसळणारे पाण्याचे झरे, निशातसारख्या बागा, दालसारखी कमलपुष्पांनी प्रफुल्ल झालेली सरोवरे, केवळ अप्रतिमच अशी पंपोशचे व केशराचे मळे, एक ना दोन नवलाईच्या गोष्टी काश्मीरमध्ये पहावयास मिळतात. जहांगीर बादशहाची गोष्ट सांगतात की, काश्मीरच्या निशात बागेत फेरफटका मारल्यावर त्याने असे उद्गार काढले की, ‘पृथ्वीवर जर कोठे स्वर्ग असेल तर तो इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे!’ राजेश्वर्यात रात्रंदिवस लोळणाऱ्या जहांगीरला जर काश्मीरात स्वर्ग अवतीर्ण झाल्याचा साक्षात्कार झाला असेल, तर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाची वृत्ती काश्मीरचे सौंदर्य अनुभविल्यावर भावविवश झाली, तर त्यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. श्री. शांतिलाल भंडारींची तशीच अवस्था झाली, म्हणून त्यांनी काश्मीर सोडताना ‘फिर मिलेंगे’ असे म्हटले. 

लेखक आपल्या कथनाला सुरुवात करतो ती या वाक्याने: ‘आयुष्याच्या उतरणीवरुन काश्मीरची उत्तुंग शिखरे पहायला मिळणार होती तीन तपांपूर्वी काश्मीरला जायला मिळाले असते तर छान झाले असते. साठी गाठलेल्यांनी तीर्थयात्रेऐवजी काश्मीरला जावे, याचा अचंबा काहींना वाटणे स्वाभाविक आहे. आयुष्याच्या उत्तरार्धातील अवस्था मोठी विचित्र, दयनीय असते. यौवनाची मस्ती संपलेली असते, तारुण्यातला कैफही ओसरलेला असतो... इ.’ जीवनातील शिशिरात सर्व वृत्ती जेव्हा गोठत चाललेल्या असतात त्यावेळी काश्मीरातील वसंत अनुभवण्याची संधी मिळते आहे. या मनोवृत्तीतच लेखकाचा काश्मीरचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे काश्मीरमधील प्रवासात जे जे दिसले ते पुनः अनुभविण्यास मिळेल की नाही असे वाटून लेखकाने ते हावरेपणाने टिपले, शब्दांकित केले आहे. त्यामुळे काश्मीरमधील सृष्टिसौंदर्य तर त्याने पानापानावर वर्णिले आहेच; त्याचबरोबर राजेश खन्ना, टीना मुनी या कलाकारांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे प्रसंग नावाचा कोणी एक तरुण, आणि त्याची अप्रतिम सौंदर्य धारण करणारी कोणीतरी प्रिया, त्यांच्या टॅक्सीचा शोफर, दाल लेकवरील शिकाऱ्याचा टिप नाकारणारा मालक, पहेलगाममधील पौर्णिमा हॉटेल, इतकेच काय परंतु दाल सरोवरात फिरताना दृष्टीस पडलेली एक अतिविशाल गुजराती शेटाणी आणि तिच्या वजनामुळे कलंडलेली होडी- इथपर्यंतच्या सर्व बारीकसारीक बाबींची दखल लेखकाने घेतली असून त्या सर्वांचे थोडे पाल्हाळीकच वाटेल असे वर्णन केले आहे.

काश्मीरचे वर्णन करता करता लेखक काश्मीरच्या प्राचीन व अर्वाचीन इतिहासातही शिरतो आणि त्यावर आपली मते व्यक्त करतो, येथपर्यंत त्याच्या हातून मर्यादामंग होतो असे वाटत नाही. पण सोळाव्या शतकातील काश्मीरच्या राजाची प्रेयसी बा खातूनच्या प्रेमगीतांच्या संदर्भात लेखकाला काश्मीरमधील विद्यमान कवयित्री पद्या सचदेव यांची आठवण होते, आणि तो जेव्हा काश्मिरी साहित्य व मराठी साहित्य यांची तुलना करू लागतो, त्यावेळी त्याने व्यक्त केलेले मराठी साहित्यसंबंधीचे विचार अनाठायी वाटतात. त्या ओघात त्यांचा काश्मीरचा संदर्भ पार सुटून जातो व लिहिण्याच्या भरात ते उपराकार श्री. लक्ष्मण माने आणि कवी ढसाळ यांच्यापर्यंत येऊन पोचतात; त्यांच्या साहित्याला हिणकस कुत्सित वाग्डमय ठरवितात. काश्मीरच्या वर्णनामध्ये अशा प्रकारचा औचित्यभंग लेखकाने का करावा, ते लक्षात येत नाही.

असे अनौचित्याचे काही दोष सोडले, तर काश्मीरचे वर्णन करताना लेखकाच्या लेखणीला ठिकठिकाणी बहर आलेला आहे यात शंका नाही त्याची भाषा समृद्ध आहे, तिच्यामध्ये अनुभव टिपण्याचे सामर्थ्यही आहे. काश्मीरमधील अनेक स्थळे त्याने शब्दकुंचल्याने रसरशीत रंगात वाचकापुढे ठेवलेली आहेत, हे प्रवासवर्णन वाचून जो काश्मीरला भेट देईल त्याला तेथील नैसर्गिक व मानवी सौंदर्य अधिक चांगल्याप्रकारे अनुभवता येईल. असे म्हणावेसे वाटते.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ना. ग. गोरे ( 302 लेख )

स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी कार्यकर्ते, लेखक, वक्ते आणि विचारवंत




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी