डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

असंख्य कार्यकर्त्यांचे शिकस्तीचे प्रयत्न चालू आहेत

समाजकार्य : जीवनगौरव पुरस्कार 
मनोगत । नागनाथअण्णा नायकवडी 

1942 च्या चळवळीत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासोबत प्रतिसरकारच्या स्थापनेत पुढाकार. स्वातंत्र्यानंतर सामाजिक, राजकीय, विधायक कामाला वाहून घेतले. नागनाथअण्णांनी उभा केलेला हुतात्मा अहिर साखर कारखाना संपूर्ण महाराष्ट्रात आगळावेगळा म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्यांना सर्वाधिक दर या कारखान्यामार्फत दिला जातो. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, असंख्य परिवर्तनवादी कार्यक्रम नागनाथअण्णांच्या प्रेरणेने राबवले जातात. सांगली व सातारा जिल्ह्यांतील दुष्काळी भागांना पाणी मिळावे यासाठी गेली 15 वर्षे नागनाथअण्णांच्या नेतृत्वाखाली तीव्र संघर्ष चालू आहे आणि तो यशस्वी होतो आहे. सामाजिक न्यायासाठी सातत्याने संघर्ष हा अण्णांचा स्थायीभाव आहे

भगतसिंग, बाबू गेनू, किसन अहिर, नानकसिंग यां सारख्या हजारो क्रांतिकारकांनी प्राणाची पर्वा न करता हौताम्य पत्करले. लाखो देशभक्तांनी कठोर तुरुंगवास भोगला, लाठीमार सहन केला. वेगवेगळ्या मार्गानी हा इंग्रज सत्ता विरोधाचा स्वातंत्र्य लढा जवळ जवळ 1857 पूर्वीपासून 1947 पर्यंत लढवला. 1920 नंतर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य शेतकरी, कामगार, विद्यार्थी या स्वातंत्र्य लढ्यात उतरले. शेवटी इंग्रज राज्यकर्त्यांना कळून आले की, सर्वसामान्य जनता प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाली आहे, आता भारतावर राज्य करणे अशक्य आहे. म्हणून वाटाघाटी करून त्यांना भारताला स्वातंत्र्य बहाल करणे भाग पडले. समाधान एकच की, मी व माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी कर्तव्य भावनेने या स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली व स्वातंत्र्य मिळेपर्यंत इंग्रज सत्तेच्या विरोधात लढत राहिलो. 15 जुलै 1922 ला वाळवे. येथील शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. वडील रामचंद्र नायकवडी यांना वाटे की, मुलाने तालमीत जावे, पैलवान व्हावे. आई लक्ष्मीबार्इंना वाटे की, मुलाने खूप शाळा शिकावी. 1930 चा तो काळ. मी प्राथमिक शाळेत शिकत होतो. या काळात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी महात्मा गांधीजींच्या विचाराने प्रभावित होऊन तलाठ्याच्या नोकरीचा त्याग करून स्वातंत्र्याचा संदेश देण्यासाठी गावोगाव सभा घेऊन लोक जागृती करण्यास सुरुवात केली होती. महात्मा फुलेंच्या सत्यशोधकी विचारांचाही त्यांच्यावर प्रभाव होता. माळ भागावरील घराजवळ असणाऱ्या मारुती मंदिराच्या समोर पार कट्‌ट्यावर संध्याकाळी नाना पाटलांची सभा होत असे. सभेअगोदर संपूर्ण गावातून फेरी काढली जाई, त्यात सर्वांत अग्रभागी राहून तिरंगा झेंडा हातात घेण्यास मला अभिमान वाटे. नाना पाटलांचे रसाळ, ग्रामीण बोली भाषेतील, जीवनातील दाखले देणारे गावरान भाषण ऐकत असे. यातूनच माझे स्वातंत्र्य लढ्याचे आकर्षण वाढले. याच काळात गावा शेजारी येडेनिपाणीचे क्रांतिवीर पांडू पाटील हे शाळेत शिक्षक लाभले. त्यामुळे देशभक्तीचे बाळकडूच मिळाले. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी काहीतरी केले पाहिजे असे वाटे पण नेका मार्ग सापडत नव्हता. पुढे काही काळ आष्टा येथे शिक्षणासाठी थांबलो. नंतर कोल्हापूरला प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये राहू लागलो. याच काळात राष्ट्रसेवादलात सामील झालो, विद्यार्थी चळवळीत भाग घेऊ लागलो.

खेळामध्ये व अभ्यासात प्रावीण्य संपादन केले. सेवाभावी वृत्तीने इतरांच्या मदतीसाठी धाव घेत असे; यातूनच समाजाविषयीची, देशाविषयीची कर्तव्य भावना वाढीस लागली. 1939 मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची भेट झाली. त्यांची शिक्षणाविषयीची तळमळ पाहून 1939 ते 1941 या काळात शिराळा पेठ्यात अतिदुर्ग भागात मित्रासोबत व्हॉलंटरी शाळांची सुरुवात केली. कामेरी ता. वाळवा येथे विद्यार्थी परिषद आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला. कोल्हापुरात त्या काळात स्वातंत्र्य चळवळीचा भाग म्हणून विद्यार्थी चळवळ जोाने वाढत होती. ‘हरिजन’ या महात्मा गांधी यांच्या नियतकालिकाचे मी नियमित वाचन करत असे. महात्मा गांधीजींच्या राष्ट्रवादी विचारांचा आणि त्यासाठी खादी वापरण्याच्या विचाराचा माझ्यावर प्रभाव पडला. इस्लामपूर येथे खादी भांडाराची सुरवात केली. ‘हरिजन’ या नियतकालिकामधून 7 आणि 8 व 9 ऑगस्ट 1942 च्या मुंबई येथील गवालिया टँक (आजचे ऑगस्ट क्रांती मैदान) वर होणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाची माहिती मिळाली, मी माझ्या कांही मित्रासह मुंबईकडे धाव घेतली. मी स्वयंसेवकाच्या वेषात असल्याने अधिवेशनात प्रवेश मिळवता आला. या अधिवेशनात महात्मा गांधी यांनी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडताना इंग्रज राज्यकर्त्यांना ‘चले जाव!’ असे ठणकावले व कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यासाठी ‘करा किंवा मरा’ असा अखेरचा संदेश दिला. पंडित जवाहरलाल नेहरूंचे भावनाप्रधान व जोशपूर्ण भाषण झाले.

मी भारावून गेलो. शिक्षण सोडून पूर्णपणे स्वातंत्र्य चळवळीत स्वत:ला झोकून द्यायचे अशा निर्धाराने परतलो. राष्ट्रीय नेत्यांना अटक झाली होती. अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले होते. स्वातंत्र्य लढ्याचा हा काळ तीव्र बनला होता. सातारा (आजचा सांगलीसातारा) जिल्हा आघाडीवर होता. संपूर्ण देशात अनेक ठिकाणी इंग्रज सत्तेच्या कायद्याला न जुानता हरताळ पाळला गेला. निदर्शने झाली. चळवळीचे लोण ग्रामीण भागातही पसरले. अनेक ठिकाणी प्रचंड जमावाने, इंग्रज सत्तेबद्दलचा असंतोष व चीड व्यक्त करण्यासाठी पोलिसठाणी, पोस्ट कार्यालये, न्यायालये, रेल्वे स्थानके यांवर हल्ले चढवले, रेल्वे रूळ उखडले, टेलिफोन व्यवस्था उद्‌ध्वस्त केली. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीही यात सहभागी होते : मामलेदार कचेरीवर मोर्चे काढले गेले, काही ठिकाणी इंग्रज पोलिसांनी मोर्चे काढणाऱ्यांवर निर्दयपणे गोळीबार केला. अनेकांना हौतात्म्य आले, कित्येकांना तुरुंगात डांबले गेले. नि:शस्त्र मोर्चेकरांच्यावर होणारा गोळीबार पाहून मी अस्वस्थ झालो. इंग्रज पोलिसांच्या गोळीबारास गोळीनेच उत्तर द्यावे लागेल असे वाटू लागले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेसारखे सशस्त्र दल उभे करण्याचा निश्चय केला.

अनेक अडचणींवर मात करून शस्त्रे जमवण्यास सुरुवात केली. गोव्यात पोर्तुगांची सत्ता असल्याने तेथे हत्यारे मिळतील असे समजल्याने नोव्हेंबर 1942 मध्ये मी गोव्यास गेलो. 15 डिसेंबर 1942 रोजी हत्यारे घेऊन परत आलो. सशस्त्र चळवळीसाठी पैशाची गरज होती. सरकारी पैसाच त्यासाठी मिळवायचा या हेतूने 7 जून 1943 ला शेणोली (ता. कराड) येथे, सहकाऱ्याच्या मदतीने स्पेशल पे-ट्रेन लुटली 19716 रुपये मिळाले. चळवळीला जो आला. इंग्रज सरकारचा कायदा मानायचा नाही. स्वत:चे स्वतंत्र सरकार निर्माण करावयाचे या विचाराने ‘समांतर सरकार- (प्रतिसरकार)’ निर्माण करायचे ही कल्पना पुढे आली होती. ऑगस्ट 1942 मध्ये उत्तर प्रदेशात ‘बालिया’, बंगालमध्ये ‘मिदनापूर’ येथे असे प्रयत्न झाले पण 3 ऑगस्ट 1942 ला पणुंब्रे (ता. शिराळा) येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारची स्थापना झाली. हे प्रतिसरकार स्वातंत्र्य मिळेपर्यंत टिकले. सातारा जिल्ह्याच्या उत्तर दिशेस वाहणाऱ्या नीरा नदीपासून जिल्ह्याच्या दक्षिण बाजूस वाहणाऱ्या वारणा नदीपर्यंतचा प्रदेश प्रतिसरकारच्या नियंत्रणाखाली होता. त्यासाठी 18 गट निर्माण केले होते. प्रत्येक गटात एक गटप्रमुख व एक उपगटप्रमुख असे.

वाळवे गटप्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी आली. उपगटप्रमुख म्हणून पै. किसन अहिर हे होते. 10 ऑक्टोबर 1943 ला सांगाव (जि. कोल्हापूर) येथील पोलीस चौकीतून मी व माझ्या सहकाऱ्यांनी तीन बंदुका लुटल्या. 14 एप्रिल 1944 ला स्वातंत्र्य लढ्यात देशभर गाजलेल्या धुळे खजिना लुटीच्या चित्तथरारक व शौर्य गाजवणाऱ्या लुटीतून 5 लाख रुपये मिळाले. मिळालेली सर्व रक्कम वेगवेगळ्या भागांतील कार्यकर्त्यांच्यामध्ये वाटली. ज्याचा पुढील स्वातंत्र्य चळवळीस फार उपयोग झाला. 29 जुलै 1944 रोजी देशद्रोही खबऱ्यांनी फितुरी केल्याने वाळवे येथे इंग्रज पोलिसांनी छापा टाकून मला अटक केली. तुरुंगात गेल्यानंतर पहिल्या दिवशीच तुरुंग फोडून बाहेर पडण्याचा मी निश्चय केला होता. तुरुंगात असतानाच मला समजले की, देशद्रोही फितुरांचा एक हात व एक पाय तोडण्याची शिक्षा माझ्या सहकाऱ्यांनी दिली होती. इस्लामपूरहून सातारा जेलमध्ये माझी रवानगी करण्यात आली व सहकाऱ्यांच्या मदतीने 10 सप्टेंबर 1944 रोजी सकाळी 8 वाजता सातारा तुरुंगातून तटावरून उडी मारुन मी स्वत:ची सुटका करून घेतली व पुन्हा भूमिगत होऊन स्वातंत्र्य चळवळीत काम करू लागलो. सशस्त्र क्रांतीच्या दिशेने माझी पावले पडली.

भगतसिंग, सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकारी कार्याचा माझ्या मनावर प्रभाव होता. प्रतिसरकारची गरज म्हणून सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या धरतीवर सशस्त्र सैनिकी दल उभे केले. यातील तरुणांना सैनिकी शिक्षण मिळावे म्हणून 88 दर्यागंज-दिल्ली येथे जाऊन आझाद हिंद फौजेतील सैनिक नानकसिंग व मन्सासिंग यांना वाळव्यास आणले व शिराळा पेठ्यात फौजी कँप चालू केला. यासाठी सर्वसामान्य माणसांचीही आम्हांला मदत झाली. 25 फेब्रुवारी 1946 ला इंग्रज पोलिसांशी सोनवडे (ता. शिराळा) येथे सशस्त्र लढ्यात माझे दोन सहकारी किसन अहिर व नानकसिंग हुतात्मा झाले. माझे दोन सहकारी धारातीर्थी पडताना पाहून खूप दु:ख झाले. त्यांच्या त्यागाचे स्मरण मी आयुष्यभर जोपासत आलो. प्रतिसरकार चालवत असताना आमच्या समोर महात्मा गांधीजींच्या ग्रामराज्याची कल्पना होती. गावागावांत गट तट असू नयेत, गावात शांतता नांदावी, राष्ट्रप्रेी तरुणांनी व गरीब सत्‌प्रवृत्तीच्या लोकांनी संघटित व्हावे, विधायक कार्य करावे, व्यसनमुक्त, समताधिष्ठित, सुशिक्षित व सुदृढ समाज निर्माण व्हावा, अन्याय अत्याचाराचा बीमोड व्हावा; यासाठी साक्षरता प्रसार, अस्पृश्यता निवारण, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसन मुक्ती, ग्राम स्वच्छता, स्त्री पुरुष समानता, हुंडा बंदी, गांधी विवाह पद्धती इत्यादी कार्यक्रम राबवले जात होते. अन्यायग्रस्त, गोरगरीब व स्त्रियांना न्याय मिळवून देण्याचे काम प्रतिसरकारचे कार्यकर्ते करत होते. जवळ जवळ 2 हजार खटले चालवले गेले व जनतेला न्याय मिळवून दिला. हे प्रतिसरकार चालवत असताना काही दृष्ट प्रवृत्तीचे लोक भूमिगतांचे विधायक कार्य उधळून लावण्याचा प्रयत्न करत होते. ‘प्रतिसरकार’ची ‘पत्री सरकार’ असा मुद्दाम नामोल्लेख करत काही दरोडेखोर महात्मा गांधी व नाना पाटील यांचा जयजयकार करून दरोडे टाकत व लूटमार करून चळवळ बदनाम करू पाहत होते. त्यांच्यावर कार्यकर्त्यांनी वेळीच जरब 

क्रांतीसिंह नाना पाटील यांना उतार आयुष्यात आम्ही कार्यकर्त्यांनी वाळवा येथे आणले, किसान शिक्षण संस्थेच्या आवारातच त्यांचे निवासस्थान होते. मी आणि माझी आई, कुटुंबीय, माझे कार्यकर्ते यांनी त्यांची मनोभावे सेवा केली. ‘माझा राजकीय वारसदार म्हणजे नागनाथ’ असे सांगून त्यांनी मला मानसपुत्राचा सन्मान दिला. 6 डिसेंबर 1976 ला त्यांचा वृद्धत्वाने अंत झाला. शेतमजूर, कष्टकरी शेतकरी, कामगार, सर्वसामान्य जनतेविषयीचे त्यांचे कार्य पुढे चालवणे आजही आवश्यक आहे.

बसवली. काही जमीनदार-वतनदार प्रतिसरकारची चळवळ मोडून काढण्यासाठी भूमिगतांच्या विषयीच्या बातम्या इंग्रज अधिकाऱ्यांना पुरवत. त्यानाही जरब बसविणे भाग पडले. खरे तर सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर, सामान्य जनतेच्या कल्याणासाठी इंग्रज सत्ता नष्ट करून स्वराज्याचा पाया मजबूत करणे हेच प्रतिसरकारचे कार्य होते. 1946 ला कर्मवीर भाऊराव अण्णांच्या अपेक्षेप्रमाणे ऐतवडे बु॥ येथे सामुदायिक शेतीचा प्रयोग राबवण्यात पुढाकार घेतला. विद्यार्थी परिषदेच्या माध्यामतून रयत शिक्षण संस्थेला 1 लाख रुपयांचा निधी गोळा करण्यात पुढाकार घेतला. महार वतने नष्ट करून जमिनी त्यांच्या मालकीच्या व्हाव्यात यासाठी वतन मुक्ती लढा संघटित केला. हैद्राबाद मुक्ती संग्राम व गोवा मुक्ती आंदोलनात कार्यकर्त्यांच्या सोबत शक्य ते कार्य केले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपला भ्रनिरास झाल्याने अनेक क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिकांच्या लक्षात आले. स्वातंत्र्य लढ्यात कोठेच नसणारे किंबहुना इंग्रजांचे हस्तक असणारे अनेकजण बाजू बदलून राजकीय सत्ताधाऱ्यांच्या जवळ सरकले. लोकशाही शासन व्यवस्था आली पण शेतकरी, शेतमजूर, कामगार, मध्यमवर्गीय कारकून, दलित, आदिवासी इत्यादी समाज घटकांना खऱ्या खुऱ्या स्वातंत्र्याचा प्रत्यय येईनासा झाला.

‘माझा शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे;’ असे क्रांतिसिंह म्हणत पण स्वातंत्र्योत्तर काळात शेती व्यवसाय धोक्यातच आला. दिवसेंदिवस महागाई, बेकारी, अनाआरोग्य, व्यसनाधीनता, भ्रष्टाचार, वाढतच राहिला. म्हणून आम्ही कार्यर्त्यांनी जनतेची बाजू घेऊन चळवळीच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणून जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम स्वीकारले, मुंबई संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात काम केले. 1949 ला वाळवे गावात ‘किसान शिक्षण संस्था’ स्थापन केली. आज या संस्थेच्या माध्यमातून बालवाडीपासून महाविद्यालयापर्यंत. विविध शाखांतून दलित, आदिवासी, धरणग्रस्त, शेतकरी, शेजमजूर व कामगार यांची मुले मुली वसतिगृही शिक्षणाचा लाभ घेत आहेत. क्रांतीसिंह नाना पाटील यांना उतार आयुष्यात आम्ही कार्यकर्त्यांनी वाळवा येथे आणले, किसान शिक्षण संस्थेच्या आवारातच त्यांचे निवासस्थान होते. मी आणि माझी आई, कुटुंबीय, माझे कार्यकर्ते यांनी त्यांची मनोभावे सेवा केली. ‘माझा राजकीय वारसदार म्हणजे नागनाथ’ असे सांगून त्यांनी मला मानसपुत्राचा सन्मान दिला. 6 डिसेंबर 1976 ला त्यांचा वृद्धत्वाने अंत झाला. शेतमजूर, कष्टकरी शेतकरी, कामगार, सर्वसामान्य जनतेविषयीचे त्यांचे कार्य पुढे चालवणे आजही आवश्यक आहे.

रस्त्यासाठी साराबंद चळवळ, सहकारी पाणी पुरवठा लिफ्ट इरिगेशन, कृष्णा नदीवर कोल्हापुरी पद्धतीचा बांधारा, फासेपारधी व भटक्यांचे पुनर्वसन इत्यादी विधायक कामे करत असतानाच चळवळीच्या पार्श्वभूीवर 26मार्च 1981 रोजी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याला केंद्र सरकारची मान्यता मिळवली. 15 गावांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या परिसरात समाजातील शेतमजूर, शेतकरी, दलित इत्यांदी सर्व घटकांना भेदभाव न करता 8 हजार शेअर्सची विक्री झाली. 1983 ला साखर कारखाना उभारणीस सुरुवात झाली. 11 महिन्यांत कारखान्याची उभारणी पूर्ण करून 9 कोटी मंजुरीचा हा प्रकल्प 8 कोटी 50 लाखांत पूर्ण केला. 20-1-1984 ला पहिला गळित हंगाम सुरू झाला. हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून जाणीवपूर्वक केलेले विविध प्रयोग यशस्वी झाले. गाववार सभा घेऊन शेअर्स विक्री, नोकर भरती, लागाणतारीख व उसाची रिकव्हरी पाहून ऊस तोड, तोडणी कामगारांना विविध प्रकारच्या सोयी सवलती, शेतकऱ्याला जास्तीत जास्त ऊस दर देण्याची प्रथा, साखर कामगार पहिल्या दिवसापासून कायमस्वरूपी व त्यांना प्रत्येक महिन्याच्या एक तारखेस पगार, जास्तीत जास्त 40 टक्के पर्यंत बोनस, साखर कारखान्यातून मिळणाऱ्या नफ्यातून शेतकरी, कामगार, शिक्षण संस्था, सामाजिक चळवळी असे चार वाटे करून तसा खर्च केला. भूकंपग्रस्त, धरणग्रस्त, दुष्काळग्रस्त, दलित-आदिवासी यांच्या चळवळींना कारखान्याच्या माध्यमातून मदत झाली. वाळवा येथे दोन वेळा दलित-आदिवासी, ग्रामीण साहित्य सेंलन घेऊन साहित्य चळवळीला मदत केली. शेतकरी व कार्यकर्ते यांचे प्रबोधन करण्यासाठी अभ्यास शिबिरे घेतली. जातीयवादी धर्मांध शक्तींचा बीमोड करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेची चळवळ राबवून सांगली-सातारा-कोल्हापूर जिल्ह्यातील शेतमजूर, कष्टकरी शेतकरी, कामगार यांच्या वतीने परिषदा घेतल्या. वाळवा ते हुतात्मा नगर (सोनवडे) अशी 80 किलोीटरची मानवी साखळी उभा केली. क्रांतिकारी विद्यार्थी संघटना, स्त्रियांच्या परिषदा यांची उभारणी झाली. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी, साखर कामगार, धरणग्रस्त, दुष्काळग्रस्तांचे प्रश्न सोडवण्याचे मी व माझ्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांचे शिकस्तीचे प्रयत्न चालू आहेत.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके