डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कागल तालुक्यातील ही शाळा राधानगरी-भुदरगड-कागल या तालुक्यांच्या सीमेवर आहे. एकेकाळी एखाद्या शिक्षकाला शिक्षा द्यावयाची असल्यास या शाळेत नेमणूक दिली जात असे. दहा वर्षांपूर्वी आर. आर. पाटील नावाचे गटशिक्षणाधिकारी या तालुक्याला होते. ते साठे गुरुजींना गंमतीने म्हणाले होते की, बोरवडे शाळेचा दर्जा उंचावला की तालुक्याचा शैक्षणिक दर्जा उंचावला? रागातून ते असे म्हणाले असतील. कदाचित त्याचाही परिणाम झाला असेल. या शाळेने सन 2004-2005चा जिल्हा परिषदेचा राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरीय तृतीय तर सन 2006-2007 मध्ये तालुक्यात व जिल्ह्यात प्रथम व महाराष्ट्र शासनाचा तृतीय क्रमांक मिळविला आहे. जिल्हा परिषदेचा ‘आदर्श शाळा पुरस्कार’, ‘वनश्री पुरस्कार’, ‘साने गुरुजी स्वच्छ शाळा पुरस्कार’ असे विविध पुरस्कार मिळविले आहेत. 

रेल्वेने 10 वाजता कोल्हापूरला पोहोचलो. कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील कोणती शाळा बघायची हे अद्याप नक्की झालं नव्हतं. युवराज राठोड यांच्याशी संपर्क झाला होता. ते राधानगरी तालुक्यातील कौलवच्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत डझनानं मुलं आणणारा हा बहाद्दर शिक्षक. चंदगड तालुक्यात आम्ही शिष्यवृत्ती परीक्षेचं काम केलं होतं.

‘तुम्ही या, राधानगरी तालुक्यातील चांगल्या शाळा दाखवतो’, असं राठोड म्हणाले होते. 

गोविंद पाटील हा माझा कविमित्र. भुदरगडमध्ये प्राथमिक शिक्षक. मी कोल्हापूरमध्ये पोहोचल्यावर गोविंदला फोन लावला. त्याला सांगितलं, ‘मला राधानगरी, भुदरगड मधील चांगल्या शाळा बघायच्या आहेत. कोणत्या शाळा बघू?’ माझा उपक्रम ऐकून त्याला आनंद झाला. रजा शिल्लक आहेत, मी बरोबर येतो म्हणाला. गारगोटी गाडीत बसून बिद्रीमध्ये उतरायला सांगितलं. माझं नियोजन बदललं. मी गारगोटीत गाडीत बसलो, बिद्रीला उतरलो. गोविंदा आला. माझ्या पाठीवरच्या सॅकसह माझं ओझं त्याच्या नव्या यामाहा गाडीवर टाकलं. चला, आता तो नेईल तिकडं जायचं. 

बिद्रीच्या पश्चिमेस चारएक किलोमीटरवर बोरवडे (ता. कागल, जि. कोल्हापूर). गावाच्या बाहेर शाळा. भक्कम वीट बांधकामाचं कंपाउंड. शाळेजवळ गाडी थांबली. कंपाउंडला लागून आत गर्द झाडी. मोठं गेट. गेटमधून झाडांतून नजर आत घुसवली. शाळेची इमारत दिसली. गोविंदाला म्हटलं, ‘इथं कोणाला भेटायचं काय?’ कोणत्या गावातील शाळा बघायची हे अद्याप नक्की नव्हतं. कवी लहरी. इथं थांबलो तर वेळ होईल, असं मला वाटलं म्हणून मी विचारलं.

तो म्हणाला, ‘हीच शाळा बघायचीय.’ 

‘आपल्याला खाजगी माध्यमिक शाळा बघायची नाही. जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा बघायचीय.’

‘ही जिल्हा परिषदेचीच शाळा आहे’, गोविंदा म्हणाला. 

माझं लक्ष गेटवरच्या शाळेच्या नावाकडे गेलं. मी अवाक्‌ झालो. मी गेटचा फोटो घेतला. शाळेच्या नावाच्या फलकाचा फोटो आला की पुढचे सगळे फोटो कोणत्या शाळेचे आहेत ते कळतं. हे अनुभवातून आलेलं शहाणपण. गेटमधून आत गेलो. दोन्ही बाजूंना नारळाची झाडं. उंचच्या उंच. लेकुरवाळी. फळांनी लगडलेली. मुख्याध्यापक साठे, त्याच गावचे. त्यांनी हसतमुखानं नमस्कार केला. आम्ही येणार असल्याची कल्पना गोविंदानं त्यांना दिली असावी. आमचं निरीक्षण सुरू झालं.

डाव्या हाताला वनौषधी बाग. कोठून कोठून जमवलेल्या वनस्पती. एकेक रोप, झाड मुख्याध्यापक दाखवत होते. झाडांचं वैशिष्ट्य सांगत होते. ‘हे इन्शुलिन, डायबेटीससाठी. हे स्टेव्ही, साखर वाढवण्यासाठी. याची पानं गोड असतात.’ मुख्याध्यापकांनी एक पान तोडून दिलं. मी पान तोंडात घातलं, जरा चावलं. आश्चर्यकारक गोड.

‘फारच गोडी आहे’, मी म्हणालो. 

‘साधारणपणे साखरेच्या तीनपट गोडी आहे.’ मुख्याध्यापक माहिती देत पुढची रोपं दाखवू लागले. 

‘ही अन्नपूर्णा वनस्पती. तांदूळ शिजवताना पानं घातली तर भाताला छान सुवास येतो. अडुळसा सर्दीसाठी. गवती चहा, तुळस, कडूलिंब, आवळा, कोरफड...’ या बागेला त्यांनी ऑक्सिजन पार्क असं नाव दिलंय. हा थोडा उंचवट्याचा भाग आहे. 

त्याचे दोन टप्पे केले आहेत. वरच्या टप्प्यावर गेलो की दोन पाट्या दिसतात. ‘श्री.कै. रामचंद्र शिवराम कुलकर्णी स्मृतिवन’ दुसऱ्या बाजूला ‘गोरखनाथ गुरू फराकटे स्मृतिवन.’ वृक्षारोपणासाठी देणगी दिलेल्यांच्या स्मृती जागवणाऱ्या या पाट्या. स्मृतिवन! एका बाजूला छोटंसं लॉन, मध्येच गुलाबी-जांभळ्या रंगाची झुबकेदार वनस्पती. हे बघत आपण कार्यालयात जातो. दरवाजासमोर लांब टेबल, समोर मुख्याध्यापकांची खुर्ची, बाजूला इतरांना बसण्यासाठी खुर्च्या. कार्यालयात विविध स्पर्धा परीक्षांत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो, शाळेची माहिती. 

मुख्याध्यापकांच्या पाठीशी एक दरवाजा आहे. त्या दरवाजातून आत गेलं की जी खोली आहे ती आहे संगणकाची खोली. अकरा संगणक आहेत. शाळेची, शिक्षकांची, विद्यार्थ्यांची सगळी माहिती संगणकीकृत आहे. मुलाचा रजिस्टर नंबर किंवा नाव टाईप केले की त्याची जनरल रजिस्टर मधील माहिती कळते. शालेय पोषण आहारापासून विद्यार्थीसंख्येपर्यंत सर्व माहिती संगणकात भरली आहे. शाळेचे मासिकपत्रक संगणकावर आहे. 

जीर्ण रजिस्टरे उद्या फाटून, कुजून नष्ट होणार आहेत. ती जपण्याची धडपड सुरू आहे. गावातील सॉफ्टवेअर इंजिनीअर पुण्याला आहेत. त्यांचीही मदत त्यासाठी घेतली आहे. सुरुवातीला प्रशिक्षणाची सोय नव्हती. अर्जुन पाटील व साठे हे दोघे सुरुवातीला चुकत-माकत शिकले. नंतर पुण्याला जाऊन त्यांनी 15 दिवसांचे मायक्रोसॉफ्टचे प्रशिक्षण घेतले. 

शाळेत एकूण 12 शिक्षक आहेत. सर्वांचा MS-CIT कोर्स पूर्ण झाला आहे. शासनाने खर्च करून सर्व शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांना प्रमाणपत्रही मिळाले आहे. परंतु त्यांच्या ज्ञानाचा त्यांना स्वत:ला आणि विद्यार्थ्यांना किती फायदा होतोय हे शोधावे लागेल. 

इथे मात्र परिस्थिती वेगळी आहे. सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना संगणकाचा लाभ देतात. पाठ्यपुस्तकातील धडे संगणकाच्या मदतीने शिकवले जातात. त्यासाठी वेदांत आणि चाणक्य कंपनीच्या सीडी लोड केल्या आहेत. प्रश्नसंच सोडविण्याची सोय संगणकामध्ये केली आहे. रिकाम्या वेळेत ऑफ तासाला मुले प्रश्नसंच सोडवतात. मुलांना संगणकावर चित्रं काढता येतात, रंगवता येतात. 

सातवीत शिकणाऱ्या अविनाशला इंटरनेटची माहिती आहे. त्याचे वडील शेतकरी आहेत. सहेलीनं बहिणाबार्इंची गाणी गुगलवर पाहिली आहेत. जिल्हा परिषद शाळेत पुस्तके, प्रयोगशाळा साहित्य, खेळ साहित्य कुलूपबंद ठेवण्याची कुप्रथा आढळते. जसा चार्ज घेतला तसा दिला असं दुरभिमानाने सांगणारे सेवानिवृत्त शिक्षक दिसतात. इथं मात्र सर्व साहित्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या ताब्यात आहे. 

जे वापरण्यास योग्य नाही ते नियमानुसार निर्लेखित केले आहे. संगणक खोलीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये मिळवलेली शील्डस्‌ आणि पदके ठेवलेली आहेत - जी इतरांना प्रेरणा देतील. गेल्या वर्षी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीला 100% विद्यार्थी बसविले होते. सर्व विद्यार्थी पास तर दोन गुणवत्ता यादीत आले आहेत. माध्यमिक शिष्यवृत्तीच्या परीक्षेचा निकाल 68% आहे. एक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकला आहे. 

शाळा सकाळी साडेसातला उघडते. शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक सकाळी मार्गदर्शनासाठी उपस्थित असतात. सुट्टीच्या दिवशी मुलं शाळेत येतात. शाळा सुटण्याची घंटा इथं होत नाही. घंटेच्या तालावर शाळा नाही. शिकवणारा आणि शिकणारा दोघेही आपापल्या नादात, तालात असतात. शिकवून संपेपर्यंत शिक्षक वर्ग घेतात. हिशोब पूर्ण झाल्याशिवाय बँकेतला कॅशिअर बँकेच्या बाहेर पडत नाही, तसं शिक्षक-विद्यार्थी शिकविण्याचं-शिकण्याचं पूर्ण समाधान झाल्याशिवाय शाळेतून बाहेर पडत नाहीत. 

अभ्यास होईपर्यंत विद्यार्थ्यानं शाळेत थांबावं. दप्तर शाळेत ठेवून घरी जावं, आवश्यक तेवढं घरी न्यावं. दप्तराचं ओझं होईलच कसं! इथल्या मुलांना शाळा सुटल्यानंतर घरी जा असं म्हणावं लागतं. पहिलीच्या मुलांना सलग तीन-चार दिवसांची सुट्टी कंटाळवाणी वाटते. इतकी सुट्टी का देता, असं इथली पहिलीची चिमुरडी मुलं शिक्षकांना विचारतात. ‘रविवार  माझ्या आवडीचा’ हे गीत या मुलांना माहीत नाही. 

शाळेभोवती आम्ही फेरफटका मारला. शाळेत झाडं, झाडांत शाळा. नारळाची 155 झाडं आहेत इथं. त्यांतील शंभरांना फळं लागतात. शिवाय पपई, काजू, आंबा या फळांचीही झाडं आहेत. ‘स्वच्छतागृह स्वच्छ! हे कसं काय?...’ तर मुख्याध्यापक म्हणाले, ‘सवयीचा भाग. आम्ही शिक्षकांनी स्वच्छतेला सुरुवात केली. आता मुलं स्वत: स्वच्छता करतात.’ ‘शाळेत शेण्या लावलेल्या दिसल्या. 

हे काय?’

‘शालेय पोषणाचं इंधन.’ 

‘अहो पण या शेणाचं खत...’

‘शेण नव्हे हे, कारखान्याची मळी. पातळ मळी नव्हे, प्रेसमड. हे वाया जातं. आम्ही कारखान्याकडून मागून आणतो. गावकरी स्त्रिया शेण्या थापून देतात.’ समाजाचा सहभाग फार मोठा आहे इथं.  शाळेभोवती गोल फिरून आम्ही कार्यालयाच्या मागे गेलो. मागच्या बाजूला हिरवीगर्द झाडी. आपण कोकणात आलोय असा भास व्हावा, अशी नारळाची झाडं. एकमेकांशी स्पर्धा करत उंच उंच चाललेली.

शाळेच्या पश्चिमेच्या वसाहतीचं सांडपाणी शाळेच्या आवारात घेतलंय. उतारावरून पाणी आपोआप झाडाच्या बुंध्यापर्यंत जाईल अशी व्यवस्था केली आहे. या पाण्यामुळं मागच्या बाजूची झाडं जास्त हिरवीगार वाटतात.  ग्रामपंचायतीनं शाळेसाठी पाण्याची दहा कनेक्शन्स दिली आहेत. शाळेत नळ कनेक्शन नाही, कनेक्शन असले तरी तोटी नाही अशा अवस्था असणाऱ्याही शाळा नजरेस येतात; पण शाळेवर, झाडांवर प्रेम करणारी माणसं एकत्र आली की निसर्ग नुसता जिवंत होत नाही तर तो फुलतो, फळतो, बहरतो. आपल्या आतमध्ये खोल-खोल निसर्ग उतरतो. 

बालपणापासून निसर्गाची गोडी लागलेली मुलं, झाडे, वेली, फुलांवर प्रेम करायला शिकतात. ही मुलं माणसांवरही प्रेम करतील. ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे’, अशी रोज रोज प्रार्थना न करताही प्रेम वाढत राहील. दहा वर्षांपूर्वीचा या शाळेचा फोटो मी पाहिला. उजाड, ओसाड भाग, उंचसखल. त्यात तग धरून उभी असलेली दोन झाडं दिसली. विश्वास बसणार नाही असा बदल. त्या वेळचे मुख्याध्यापक बा. गे. पाटील, आबाजी (ज्ञानू फराकटे) शेतकरी, पी.डी. मगदू, सोसायटी चेअरमन. सरळ मनाचा रांगडा माणूस. शेतकरी. स्वत: जे.सी.बी. आणून सपाटीकरण केले. रमेश चौगुले यांनी शाळेच्या कंपाउंडचं बांधकाम करण्याचं कंत्राट घेतलं. तीन लाख एकोणसत्तर हजारांचं काम असताना पैशांचा विचार न करता ग्रामपंचायतीच्या नुसत्या शब्दावर जादा काम केलंय. 

शाळेला पाच एकर जागा आहे. शाळेच्या या रम्य परिसरात बालकुमार साहित्य संमेलनही झालंय. शालेय पोषण आहार कार्यालयाच्या शेजारच्या शेडमध्ये शिजत होता. मी भाताची चव घेतली, नेहमीपेक्षा वेगळी चव लागली. भात स्वादिष्ट वाटला. मी म्हटलं, वेगळा तांदूळ वापरलाय का? तर मुख्याध्यापक म्हणाले, ‘अन्नपूर्णा वनस्पतीची पानं भातात घातली आहेत. त्यामुळे भाताला चव येतेय. (मी शाळेतून बाहेर पडताना अन्नपूर्णाचं रोप मागून घेतलं.) 

भाताबरोबर खायला वाटाण्याची आमटी आणि उसळ केली होती. आमटी आणि उसळीमध्ये शाळेतल्या नारळाचं ओलं खोबरं किसून घातलं होतं. आमटीला शाळेतल्याच कढीपत्त्याच्या पानांची फोडणी दिलेली होती. बघता बघता मुलांनी भात फस्त केला होता. कोरडा भात मुलं कमी खातात. म्हणून रोज पातळ आमटी इथं केली जाते. मुलं पोटभर खातात. भात शिल्लक राहिला असं इथं होत नाही. 

शाळेत गांडूळखत प्रकल्प, गोबर गॅस प्रकल्प आहे. शाळेत प्रश्नमंजूषा घेतली जाते. वर्षाच्या सुरुवातीला सर्व मुलांना पुरतील इतक्या वह्या शैक्षणिक उठावातून घेतल्या जातात. सर्व मुलांना मोफत दिल्या जातात. सर्व वर्ग बोलके आहेत. वऱ्हांडा बोलका आहे. पहिली-दुसरीच्या वर्गांसमोर प्राणी, पक्ष्यांची चित्रं काढली आहेत. शाळेतील मुलं मर्दानी खेळ खेळतात. 

शैक्षणिक गुणवत्तेबरोबर खेळालाही ही शाळा महत्त्व देते. कबड्डी व ॲथलेटिक खेळांमध्ये शाळेला जिल्हास्तरावर विजेता/उपविजेता पदक मिळालेलं आहे. कागल तालुक्यातील ही शाळा राधानगरी-भुदरगड-कागल या तालुक्यांच्या सीमेवर आहे. एकेकाळी एखाद्या शिक्षकाला शिक्षा द्यावयाची असल्यास या शाळेत नेमणूक दिली जात असे. दहा वर्षांपूर्वी आर. आर. पाटील नावाचे गटशिक्षणाधिकारी या तालुक्याला होते. ते साठे गुरुजींना गंमतीने म्हणाले होते की, बोरवडे शाळेचा दर्जा उंचावला की तालुक्याचा शैक्षणिक दर्जा उंचावला? रागातून ते असे म्हणाले असतील. कदाचित त्याचाही परिणाम झाला असेल. 

या शाळेने सन 2004-2005चा जिल्हा परिषदेचा राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरीय तृतीय तर सन 2006-2007 मध्ये तालुक्यात व जिल्ह्यात प्रथम व महाराष्ट्र शासनाचा तृतीय क्रमांक मिळविला आहे. जिल्हा परिषदेचा ‘आदर्श शाळा पुरस्कार’, ‘वनश्री पुरस्कार’, ‘साने गुरुजी स्वच्छ शाळा पुरस्कार’ असे विविध पुरस्कार मिळविले आहेत. शिक्षक, पदाधिकारी, पालक यांनी मनावर घेतलं तर किती कायापालट होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बोरवडे शाळा आहे. ही शाळा जिल्हा परिषदेची आहे’ हे म्हणायला माझं मन अजूनही तयार नाही. 

Tags: कोल्हापूर भुदरगड चंदगड कौलव राधानगरी बोरवडे Kolhapur Bhadargarh Chandgad Kaulaw Radhanagari Borvade weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नामदेव माळी,  सांगली, महाराष्ट्र
namdeosmali@gmail.com

शिक्षण क्षेत्रात वर्ग दोनचे अधिकारी, कादंबरीकार व शैक्षणिक लेखक.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके