डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नग्न वास्तव : पित्याला धक्का

नेवारी, 09) या वृत्तपत्रातील नदीम एफ. पराच्या यांच्या ‘नेकेड लन्च; ब्लो डॅडी’ (नग्न वास्तव: पित्याला धक्का) या लेखावरून हा एका सुशिक्षित घरातील बापलेकांच्या मधला संवादखाली देत आहे. त्यामध्ये मुसलमान व मुसलमानांसंबधी वापरण्यात आलेले शब्द काढून त्याजागी हिंदू, ख्रिश्चन, ज्यू (आणि बौद्ध व जैन सुद्धा) हे व ह्यांच्या सबंधीचे शब्द घालून पहावेत. अविवेक. आक्रस्ताळेपणा, अहंगंड, असहिष्णुता, इतिहासाची तोडमोड, विज्ञान व आधुनिक विचारसरणीचा तिरस्कार, खोटारडा प्रचार करून लोकांना (सुशिक्षितांनाही) अंधश्रद्ध बनविणे आणि आमचाच धर्म कसा सर्वश्रेष्ठ आहे हे त्यांच्या मनावर ठसविणे हे सारे सर्वच धर्मांमधून कसे बोकाळत चालले आहे ते आपल्याला समजेल. दैववाद, भविष्य कथन, कुंडल्या, बुवाबाजी यांचे स्तोम माजवण्याने आणि आततायी, हिंसक घटना पुन्हा पुन्हा दाखविण्याने कोवळ्या वयातील मुलांच्या मनावर काय परिणाम होतो, त्याचं विदारक स्वरूप इथे स्पष्ट केलेलं आहे.

‘बाबा’

‘काय रे बाळा?’

‘आपली हिंदुस्थानशी लढाई होणार आहे का हो?’

‘हां, होईल कदाचित.’

‘मग बाबा, आपण त्यांना झोडपून काढू ना? 1857 मध्ये झोडपलं होतं तसं?’

‘1857 मध्ये नाही रे बाळा.’

‘बरं बरं, मग आपण 1857 मध्ये कोणाला झोडपलं?’

‘ब्रिटिश लोकांना.’

‘आणि हिंदूंना सुद्धा, हो की नाही?’

‘अरे असं पहा...’

‘त्या लढाईमध्ये कायदे आझमसुद्धा लढले होते का हो बाबा; महम्मदबिन कासिम आणि इमरान खान ह्यांना घेऊन?’

‘नाही, कायदे आझम आणि इमरानखान त्यानंतर कितीतरी वर्षांनी जन्यले. आणि महम्मद बिन कासिम तर कितीतरी वर्षे त्यापूर्वीच मेला.’

‘असं, मग तेव्हा पाकिस्तानात कोणाची सत्ता होती?’

‘तेव्हा पाकिस्तान नव्हतंच.’

‘काम सांगताय बाबा! पाकिस्तानतर नेहमीच होतं. गेली 5 हजार वर्षे पाकिस्तान आहे!’

‘हे कोणाकडून ऐकतोस रे तू?’

‘कोणाकडून नाही; मी टीव्ही पहात होतो.’

‘हां, आलं लक्षात माझ्या.’

‘बाबा, हे लोक आम्हा अरबांच्या का विरुद्ध आहेत हो?’

‘अरब; बाळा आपण अरब कुठे आहोत?’

‘नाही कसं, आहोतच आपण अरब. आपले पूर्वज अरबी नाहीत का?’

‘नाही रे बाळा; आपले पूर्वज म्हणजे उपखंडातील वंशाचे लोक होते.’

‘उप... काय?’

‘ते जावू दे; पण तुला एकंदरीत लढाया फार आवडतात नाही का?’

‘हो बाबा, मला टीव्ही वर लढाया पाहायला खूप मजा वाटते.’

‘अरे, पण खऱ्या लढाया लढल्या जात आहेत टीव्हीच्या बाहेर. टीव्हीमध्ये नाही.’

‘खरंच? पण ते कसं शक्य आहे? बाबा या लढाया कशा असतात हो?’

‘ते जावू दे रे.’

‘बाबा काय झालं? तुम्हांला कशाची काळजी वाटते आहे का?’

‘काळजी नको करू तर काय करू;काय वामफळ बडबड चालवली आहेस लढायांची ; मूर्ख कुठला!’

‘बाबा, पण तुम्ही माझ्यावर का चिडता?’

‘कारण टी.व्ही. वाटेल ते बडबडतो आणि तेच तूही बरळतोस!’

‘बाबा, तुम्ही हिंदूंचा कैवार घेत आहात!’

‘नाही.’

‘मग तुम्ही काफीर झाला आहात?’

‘गप्प बस आता, खूप झालं. आता टीव्ही पाहायचा नाही. जा डीव्हीडीवर एखादा सिनेमा पहा नाहीतर सीडी ऐकत बस.’

‘ते नाही मी करू शकत हो, बाबा.’

‘का बरं? आपल्याकडे तर कितीतरी डीव्हीडी आणि सीडी आहेत.’

‘होत्या; आता नाहीयेत.’

‘अरे, नाहीयेत म्हणजे काय?’

‘मी त्या सगळ्या जाळून टाकल्या.’

‘हां, ते मी ऐकलं होतं. अरे, पण का केलंस असं?’

‘कारण त्या अश्लीलता फैलावणाऱ्या घाणेरड्या, शरम वाटेल अशा होत्या.’

‘अरे देवा! बरं मग जा तुझं होमवर्क कर. तुझ्या त्या सायन्स प्रोजेटचं काय झालं?’

‘ते जवळ जवळ संपलं आहे.’

‘त्यामध्ये तू काम करतो आहेस रे?’

‘बॉम्ब.’

‘काय म्हणालास? बॉम्ब?’

‘हो बाबा, बॉम्बच.’

‘ते ऐकलं मी, अरे पण बॉम्ब कशासाठी?’

‘कशासाठी म्हणजे? मी सच्चा मुसलमान आहे आणि म्हणून मी अमेरिकेचा द्वेष करतो.’

‘अरे, पण गेल्याच आठवड्यात तुला डिस्नेलँडला जायचं होतं ना?’

‘बाबा, ती गोष्ट अगदी वेगळी आहे हो.’

‘का बरं?’

‘अहो, मिकी माऊस मुसलमान आहे.’

‘छे रे, तो मुसलमान नाहीये.’

‘तो मुसलमान झाला आहे. त्याने चंद्रावर आजान ऐकलं ना तेव्हा.’

‘काय चंद्रावर? आणि आजान ऐकलं?’

‘हो. कारण पृथ्वी सपाट आहे आणि...’

‘काऽऽय?’

‘पृथ्वी आहे...’

‘ते ऐकलं मी.’

‘बाबा, तुम्हांला माझा सायन्स प्रोजेट पाहायचा आहे ना?’

‘बापरे, तो बॉम्बचा प्रोजेट? तुझ्या सामन्सच्या बाई तुला नापास करतील.’

‘त्या मला नापास करूच शकणार नाहीत.’

‘खरंच?’

‘हो, अगदी खरं. कारण त्या सायन्सवाल्या बार्इंनाही मी उडवून देणार आहे.’

‘हाय आ! अरे तुला झालय तरी काय? जा तुझ्या आईला बोलावून आण.’

‘नाही हो, ती नाही येऊ शकणार.’

‘का नाही येऊ शकणार?’

‘मी तिला स्वयंपाक घरात कोंडून ठेवलंय.’

‘अरे, पण कशासाठी असं केलंस?’

‘म्हणजे काम? बायकांची जागा स्वयंपाकघरातच असते ना; नीट बुरखा पांघरून घेतल्या शिवाय मी तिला बाहेर येऊ देणारच नाही.’

‘अरे, पण ती तुझी आई आहे!’

‘पण, ती एक बाई पण आहे.’

‘मग?’

‘मग काय? तिला लपवूनच ठेवलं पाहिजे.’

‘लपवून? कोणापासून?’

‘सारं जग आणि टोनीपासून.’

‘टोनी?’

‘हो, टोनी.’

‘अरे, पण टोनी तर मांजर आहे.’

‘मांजर असलं तरी तो बोका आहे.’

‘अरे मुला, तुला वेड लागलंय का?’

‘नाही. शिवाय किट्टोसुद्धा बुरखा घालील याची ही मी खबरदारी घेतली आहे.’

‘किट्टो?’

‘हो, किट्टो.’

‘अरे, पण किट्टो तर मांजर आहे.’

‘पण ती मांजरी आहे, मादी आहे ना.’

‘बुरख्यामध्ये ती गुदमरेल रे!’

‘ती मेली सुद्धा.’

‘काऽऽय?’

‘ती आधीच मेली आहे.’

‘हं, ते मी समजलो, पण कशी मेली?’

‘मी तिला जिवंतपणी पुरून टाकली.’

‘काय म्हणालास; पुरून टाकली?’

‘हो. टोनीच्या इज्जतीचा बदला घेण्यासाठी. पण आता मी टोनीचंही डोकं उडवून देणार आहे.’

‘अरे, पण का?’

‘कां म्हणजे; आईची इज्जत राखायची आहे म्हणून.’

‘अरे देवा!’

‘अहं; तसं नका म्हणू. नेहमी हाय अल्ला म्हणा.’

‘का? त्याने काय फरक पडतो?’

‘बाबा, तुम्हांलाही आपलं डोकं उडवून घ्यायचं आहे का?’

‘नाही.’

‘मग दगडांच्या माराने चेंदून मरायचंय का?’

‘नाही.’

‘मग तुम्हांला फटके खायचे आहेत का?’

‘नाही.’

‘मग तुम्हांला स्वतचे हात छाटून टाकणं आवडेल?’

‘नाही.’

‘मग असे मूर्खासारखे प्रश्न विचारणं सोडून द्या.’

‘मग तू मला काय म्हणून हाक मारशील?’

‘‘बाबा’ या शब्दासाठी अरेबिकमध्ये जो शब्द असेल त्या शब्दाने मी तुम्हाला हाक मारेन.’

‘अरे, पण मला कुठे अरेबिक येतंम?’

‘नाही येत, कारण तुम्ही काफीर आहात.’

‘तू कोण आहेस रे मला काफीर ठरविणारा? मूर्ख फॅशिस्ट; बडबडतोय केव्हाचा.’

‘फॅशिस्ट म्हणजे काय?’

‘फॅशिस्ट म्हणजे एक विवेकशून्य, दांडगट, घमेंडखोर, वेडा माणूस.’

‘काऽऽय?’

‘अरे, तुला रडायला काय झालं?’

‘तुम्ही मला रागावलात.’

‘बरं, बरं. माफ कर मला. पण बेटा तू आता सहिष्णू आणि विवेकी व्हायला हवंस. आता जा आणि शहाण्या सारखं पुस्तक वाच.टी.व्ही. नको पाहूस.’

‘पण माझ्याजवळ पुस्तकंच नाहीत.’

‘नाहीत कशी? असायलाच हवीत. मी किती पुस्तकं आणून दिली आहेत तुला.’

‘ती तर मी सगळी पुरून टाकली.’

‘अरे, पण का?’

‘ती सगळी इंग्रजीत होती.’

‘मग?’

‘ती मुसलमानांची भाषा नाही.’

‘पण आपण आता इंग्रजीच बोलतो आहोत ना?’

‘पण...’

‘आता काय?’

‘झिओनिस्टांनी मला अरेबिक विसरायला लावलं.’

‘अरे पण तुला अरेबिक कधी येतच नव्हतं.’

‘नाही असं नाहीये. तुम्ही आणि आईनं मला पोलिओचे थेंब दिलेत त्या अगोदर मला अरेबिक येत होतं.’

‘बरं, आता तू माझ्यावर एक मेहेरबानी करशील का?’

‘नक्की करीन बाबा.’

‘माझ्यासाठी एक गोष्ट उडवून टाकायची आहे. उडवशील?’

‘नक्कीच. सांगा काय उडवू? सीडीचं दुकान, हॉटेल का शाळा?’

‘नाही नाही; त्यापेक्षा बरंच जास्त दुष्ट आणि अमंगळ.’

‘आईला उडवू?’

‘नाही.’

‘मग काय?’

‘तो टी.व्ही. सेट.’

‘काऽऽय?’

‘हा टीव्ही सेट उडवून टाक.’

‘ते मी ऐकलं बाबा, पण का?’

‘मी सांगतोय ना; तेवढंच कर.’

‘अस्सं! बाबा?’

‘काय रे?’

‘तुम्ही किती बेकायदेशीर आहात!

अनुवाद : सुमन ओक

Tags: डॉन नग्न वास्तव सुमन ओक नदीम एफ. पराचा weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नदीम एफ. पराचा

पाकिस्तानी लेखक, पत्रकार 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके