हे नोबल पारितोषिक मला दिले याबद्दल मी तुमची आभारी आहे. पण असे असले तरीही आमची प्रतिष्ठा आता फक्त न्याय मिळाल्यावर आणि संबंधित गुन्हेगारांवर खटले चालवल्यानंतरच परत येऊ शकते हे लक्षात ठेवले पाहिजे. केवळ याझिदी आहेत म्हणून मारल्या गेलेल्या आमच्या प्रिय व्यक्तींची जागा घेऊ शकेल असा कुठलाही पुरस्कार अस्तित्वात नाही. आमची माणसे आणि आमचा मित्रपरिवार यांचे दैनंदिन आयुष्य जर नॉर्मल व्हायचे असेल तर न्याय आणि उरलेल्या समूहाचे संरक्षण एवढाच पर्याय उरतो. आपण सध्या मानवी हक्कांच्या वैश्विक जाहीरनाम्याचा 70 वा वर्धापनदिन (10 डिसेंबर) साजरा करत आहोत. वांशिक हत्याकांडे रोखणे आणि संबंधित गुन्हेगारांविरुद्ध खटले चालवणे असाच त्याचा उद्देश आहे. माझ्या समुदायाबाबतीत तर गेल्या चार वर्षांपासून वांशिक हत्या घडवली जात आहे. त्यांना रोखण्याचा वा थांबवण्याचा काहीच प्रयत्न आंतरराष्ट्रीय समुदायाने केलेला नाही.
राजघराण्याचे सदस्य, इथे उपस्थित असलेले विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, नोबेल समितीचे सर्व सभासद आणि सभ्य स्त्री- पुरुषहो, सादर प्रणाम. हा सन्मान दिल्याबद्दल मी नोबेल समितीची आभारी आहे. लैंगिक हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या स्त्रियांसाठी अथकपणे कार्यरत असणारे व त्या स्त्रियांना आवाज मिळवून देणारे माझे डॉक्टर मित्र डेनिस मुक्वेगे यांच्याबरोबर हा पुरस्कार मला जाहीर होणे हा मी माझा सन्मान समजते.
माझे आणि सगळ्या याझिदी समूहाचे आयुष्य वांशिक हत्याकांडाच्या वेडापायी कसे संपूर्णपणे बदलून गेले आणि इराकचाच अविभाज्य घटक असणाऱ्या याझिदी समूहाला समूळ नष्ट करण्याचा आयसिसने कसा प्रयत्न केला आणि त्यासाठी स्त्रियांना कसे कैद केले, पुरुषांच्या कशा हत्या केल्या, धार्मिक स्थळे आणि प्रार्थनास्थळे कशी उद्ध्वस्त केली गेली, याविषयीचे हृद्गत मी इथे मांडणार आहे.
माझ्यासाठी आजचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. चांगल्याने वाईटावर विजय मिळवला, मानवतेने दहशतवादाला हरवले असा आजचा दिवस आहे. आज पीडित स्त्रिया व लहान मुलांनी त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांवर विजय मिळवलेला आहे. ही एका नव्या युगाची सुरवात ठरेल अशी मला आशा आहे. जिथे शांततेला प्राधान्य असेल; जिथे स्त्रिया, लहान मुले व अल्पसंख्यांक समूह यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आणि विशेषतः लैंगिक हिंसाचाराच्या बळी असणाऱ्या महिलांच्या संरक्षणासाठी संपूर्ण जग एकत्र येऊन नवा मार्ग उभा करायला सुरवात करेल असे हे युग असेल.
माझे लहानपण एखाद्या खेडुत मुलीप्रमाणे सिंजर प्रदेशाच्या दक्षिणेला असणाऱ्या कोचो या गावी गेले. माझ्या गावात असताना मला नोबेल शांतता पुरस्काराविषयी काहीही माहिती नव्हती. आपल्याच जगात रोज घडणारा जीवघेणा संघर्ष आणि हत्या यांच्याविषयीही मी अनभिज्ञ होते. माणसे एकमेकांविरुद्ध इतकी घृणास्पद दुष्कृत्य करू शकतात याची मी तेव्हा कल्पनाही केली नव्हती. एका लहान मुलीप्रमाणे उच्च माध्यमिक शिक्षण घ्यायचे व आपल्याच गावात स्वतःचे सौंदर्यप्रसाधनगृह (ब्युटी पार्लर) काढायचे आणि सिंजर इथे आपल्या परिवारासोबत राहायचे, हे माझे तेव्हाचे स्वप्न होते. पण तेच नंतर एक दुःस्वप्न ठरले.
आयुष्यात अनपेक्षित गोष्टी घडल्या. आम्ही वांशिक हत्याकांडाचे बळी ठरलो. त्यात माझी आई, माझे सहा भाऊ आणि माझ्या भावाची मुले अशा सगळ्यांना मी गमावले. त्या वांशिक हत्याकांडामुळे प्रत्येक याझिदी कुटुंबाची अशीच वा प्रसंगी याहून भयानक शोकांतिका झाली. एका रात्रीत आमचे जग आमच्या आकलनाच्या पलीकडे बदलले. आज प्रत्येक याझिदी कुटुंब एकमेकांपासून हरवलेल्या आपल्या कुटुंबियांना शोधत आहे. एका शांतताप्रिय समुदायाचे आज केवळ अवशेष शिल्लक राहिले आहेत. शांततेच्या मार्गाने जाणारा आणि सहिष्णुतेची संस्कृती सांगणारा एक समूह एका निरर्थक युद्धासाठीचे इंधन ठरला आहे. श्रद्धा आणि धर्म यांचे नाव घेत झालेल्या वांशिक हत्याकांडाची अनेक उदाहरणे आपण इतिहासात अनुभवलेली आहेत. याचाच परिणाम म्हणून आज तुर्कस्तानमध्ये याझिदी समूहाचे खूपच कमी लोक उरले आहेत.
एके काळी सीरियामध्ये सुमारे ऐंशी हजार याझिदी राहात होते. आता त्यांची संख्या पाच हजारापर्यंत आली आहे. इराकमध्येही याझिदींची साधारण अशीच परिस्थिती आहे. त्यांच्या संख्येत लक्षणीय घसरण होतच आहे. याझिदी समूहाचा ‘समूळ विनाश’ हे आयसिसचे ध्येय जर पूर्ण होऊ द्यायचे नसेल, तर याझिदी समूहाला आवश्यक ते संरक्षण देणे हा एकच पर्याय राहतो.
इराक आणि सीरियामधल्या इतर अल्पसंख्यांकांचीदेखील हीच परिस्थिती आहे. फक्त इराक आणि कुर्दिस्तानच नाही तर सगळा आंतरराष्ट्रीय समुदायसुद्धा आयसिसपासून आमचे संरक्षण करण्यात आणि आमचे वांशिक हत्याकांड रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे. एका संपूर्ण समूहाचे अस्तित्व नष्ट होत असताना उर्वरित जगाने फक्त बघ्याची भूमिका स्वीकारलेली आहे. त्यामुळेच आज आमची घरे, आमची कुटुंबे, आमच्या परंपरा, आमची माणसे, आमची स्वप्ने सगळे सगळे उद्ध्वस्त करून टाकण्यात आले आहे.
वांशिक हत्याकांडानंतर आमच्याविषयी फक्त स्थानिकच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील सहानुभूती दाखवण्यात आली. अनेक देशांनी तर या कत्तलींना ‘वांशिक हत्याकांड’ असेही संबोधले. मात्र असे असले तरीही यापैकी कशानेही आमचे वांशिक हत्याकांड काही थांबले नाहीच. याझिदी समूहाचे अस्तित्वच पूर्णपणे संपुष्टात येण्याचे सावट आजही आमच्या मनावर घोंघावत आहे.
आयसिसने कैदेत ठेवलेल्या याझिदी लोकांच्या परिस्थितीत अजून काहीही फरक पडलेला नाही. ते अजून आयसिसच्या छावणीतून बाहेर पडू शकलेले नाहीत. आयसिसने उद्ध्वस्त केलेल्या कशाचीही पुनर्बांधणी अजून झालेली नाही. ही वांशिक हत्याकांडे घडवून आणणाऱ्या गुन्हेगारांना अजून शिक्षा व्हायची आहे. मला आता आणखी सहानभूती नको आहे. उलट त्या सहानुभूतीच्या भावनेचे रूपांतर आता क्रियाशीलतेत करायचे आहे. आयसिसने घडवलेल्या वांशिक हत्याकांडाचे जे शिकार ठरले आहेत त्या लोकांना मदत करण्याविषयी जर आंतरराष्ट्रीय समुदाय गांभीर्याने विचार करत असेल, याझिदी समूहाच्या लोकांनी विस्थापित छावण्या सोडून त्यांच्या गावी परत जावे असे जर आपल्याला वाटत असेल, आणि त्यांच्यात पुन्हा जगण्याची हिंमत जागवायला हवी असे वाटत असेल, तर आंतरराष्ट्रीय समुदायाने त्यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या देखरेखीखाली आंतरराष्ट्रीय दर्जाचे संरक्षण दिले पाहिजे. इतर दहशतवादी संघटनांकडून पुन्हा आमचे वांशिक हत्याकांड घडवले जाणार नाही याची खात्री, अशा आंतरराष्ट्रीय संरक्षणाच्या तरतुदीशिवाय देता येणार नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र येऊन वांशिक हत्याकांडाला बळी पडलेल्या व्यक्तींना आश्रय आणि विस्थापनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.
सर्व इराकी नागरिकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मी नोबेल शांतता पुरस्कार मिळवणारी पहिली इराकी नागरिक आहे यामुळे नव्हे. तर आम्ही आयसिस या दहशतवादी संघटनेच्या तावडीतून आमच्या इराकची सुटका आजच्याच दिवशी केली होती. त्यामुळेच आम्ही आजचा दिवस ‘विजय दिवस’ म्हणून साजरा करतो. एका अतिशय कट्टर अशा दहशतवादी संघटनेविरुद्ध संपूर्ण जगाच्या वतीने ते एक विशाल युद्ध लढले. या लढ्यात उत्तरेच्या टोकापासून दक्षिणेच्या टोकापर्यंतचे सर्व इराकी नागरिक एकत्र आले होते. हे ऐक्यच आम्हाला ताकद देते.
आयसिसच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आणि आयसिसने इराकच्या अधिकाधिक भूप्रदेशावर नियंत्रण मिळवले तेव्हा ज्यांनी ज्यांनी आयसिसचे स्वागत केले, त्यांना मदत केली आणि त्यांच्यात सामील झाले अशा अंतर्गत शक्तींवरदेखील खटले चालवण्यासाठी आपण एकत्र प्रयत्न केले पाहिजेत. आयसिसच्या पराभवानंतर आता इराकमध्ये दहशतवाद आणि धार्मिक कट्टरतावादाला तसूभरही जागा असता कामा नये. देशाच्या बांधणीसाठी आपण देशाच्या सैन्यात भरती झाले पाहिजे. सर्व इराकी नागरिकांच्या जीवनात सुरक्षा, स्थैर्य आणि समृद्धी प्रस्थापित करण्यासाठी आपण एकत्र योगदान दिले पाहिजे.
2014 मध्ये आयसिससारख्या दहशतवादी संघटनेने आणि त्यांच्या विचारांनी भारावून गेलेल्या नागरिकांनी, इराकचा अविभाज्य घटक असणाऱ्या याझिदी समूहाचे अस्तित्व संपवण्याच्या उद्देशाने कसा हल्ला केला होता हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. याझिदींच्या श्रद्धा आणि परंपरा वेगळ्या आहेत, त्यांचा एकेमकांच्या हत्या करण्यावर विेश्वास नाही किंवा लोकांना कैदेत ठेवण्यावर वा त्यांना गुलाम करण्यावरही विेश्वास नाही एवढ्या क्षुल्लक कारणासाठी हे वांशिक हत्याकांड घडवून आणण्यात आले होते.
एकविसाव्या शतकात, जागतिकीकरण आणि मानवी हक्क याविषयी सर्वत्र जाणीव जागृती झालेली असतानाच्या काळात, साडेसहा हजाराहून अधिक याझिदी मुले व स्त्रिया कैद झाल्या. गुलामाप्रमाणे त्यांची खरेदीविक्री झाली व त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करण्यात आले. 2014 पासून चालू असलेल्या प्रयत्नानंतरही आयसिसच्या तावडीत अजूनही असलेल्या तीन हजाराहून अधिक मुले व स्त्रिया यांचा काहीही शोध अद्याप लागू शकलेला नाही.
आयसिसकडून तरुण मुली विकल्या जातात, विकत घेतल्या जातात, कैदेत ठेवल्या जातात आणि त्यांच्यावर रोज बलात्कार होतात आणि असे असूनही 195 देशांच्या नेत्यांची सदसद्विवेकबुद्धी या पीडित स्त्रियांच्या सुटकेसाठी अजूनही कशी जागृत होत नाही, ही माझ्या कल्पनेच्या बाहेरची गोष्ट आहे. त्या स्त्रियांच्याऐवजी जर एखादी तेलाची खाण असती, शस्त्रास्त्रांनी भरलेले एखादे जहाज असते किंवा एखादा महत्वाचा व्यापारी करार असता तर काय झाले असते? त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात या देशांनी काहीही कमतरता ठेवली नसती.
मी आता रोजच अशा शोकांतिका ऐकते. जगभरात हजारो-लाखो स्त्रिया व मुले कैद होतात, हिंसेचे बळी ठरतात. मला रोज सीरिया, इराक आणि येमेनमधून लहान मुलांच्या किंकाळ्या ऐकू येतात. आफ्रिका खंडात आणि अशा इतर अनेक देशांमध्ये रोजच हजारो स्त्रिया व मुले यांच्या होणाऱ्या हत्या हे युद्धाचे कारण बनत आहे. त्या पीडितांना कोणी मदतही करत नाही किंवा गुन्हेगारांना जाबही विचारत नाही.
गेली चार वर्षे मी माझी, माझ्या जमातीची आणि इतर असुरक्षित जमातींची कथा सांगत जगभर फिरते आहे आणि अजूनही मला न्याय मिळालेला नाही. याझिदीं आणि इतरही स्त्रियांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांवर अद्याप खटले चालवायचे आहेत. जर हा न्याय झाला नाही तर आमच्या बाबतीत आणि इतर असुरक्षित समूहांच्याबाबतीत अशा वांशिक हत्या पुन्हा पुन्हा होत राहतील. इराकच्या विविध समूहांमध्ये शांतता आणि सहकार्य प्रस्थापित करायचे असेल तर पिडीत घटकांना न्याय मिळवून देणे हा त्यावरचा एकमेव मार्ग आहे.
स्त्रियांना कैदेत ठेवणे आणि आणि बलात्कार करणे अशा घटना पुनःपुन्हा घडू नयेत असे आपल्याला वाटत असेल, तर लैंगिक अत्याचार हे स्त्रियांच्या विरोधात हत्यार म्हणून वापरणाऱ्यांना योग्य ती शिक्षा केली पाहिजे. हे पारितोषिक मला दिले याबद्दल मी तुमची आभारी आहे. पण असे असले तरीही आमची प्रतिष्ठा आता फक्त न्याय मिळाल्यावर आणि संबंधित गुन्हेगारांवर खटले चालवल्यानंतरच परत येऊ शकते हे लक्षात ठेवले पाहिजे. केवळ याझिदी आहेत म्हणून मारल्या गेलेल्या आमच्या प्रिय व्यक्तींची जागा घेऊ शकेल असा कुठलाही पुरस्कार अस्तित्वात नाही. आमची माणसे आणि आमचा मित्रपरिवार यांचे दैनंदिन आयुष्य जर नॉर्मल व्हायचे असेल तर न्याय आणि उर्वरित समूहाचे संरक्षण एवढाच पर्याय उरतो.
आपण सध्या मानवी हक्कांच्या वैश्विक जाहीरनाम्याचा 70 वा वर्षापनदिन (10 डिसेंबर) साजरा करत आहोत. वांशिक हत्याकांडे रोखणे आणि संबंधित गुन्हेगारांविरुद्ध खटले चालवणे असाच त्याचा उद्देश आहे. माझ्या समुदायाबाबतीत तर गेल्या चार वर्षांपासून वांशिक हत्या घडवली जात आहे. त्यांना रोखण्याचा वा थांबवण्याचा काहीच प्रयत्न आंतरराष्ट्रीय समुदायाने केलेला नाही. हे गुन्हे केलेल्या गुन्हेगारांना न्यायासनासमोर आणण्याचेदेखील काम त्यांनी केलेले नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाच्यादेखत अनेक असुरक्षित समूह जातीयवाद, वंशद्वेष यांचे बळी ठरले आणि स्वतःची ओळख गमावून बसले. याझिदी आणि अशा जमातींचे संरक्षण करणे, विशेषतः जिथे वाद आहेत आणि जिथे जागतिक युद्ध लढली जातात अशा ठिकाणी मानवाधिकारांचे रक्षण करणे, अल्पसंख्याक समूहांना सुरक्षित ठेवणे, स्त्रिया व लहान मुलांचे अधिकार जपणे ही आंतरराष्ट्रीय समुदायाची आणि आंतरराष्ट्रीय संस्थांची जबाबदारी आहे.
या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात पॅरिसमध्ये झालेल्या शांतता परिषदेत सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले. या परिषदेमध्ये पहिले महायुद्ध संपल्याची शंभरी साजरी करण्यात आली. पण पहिले महायुद्ध संपल्यापासून वांशिक हत्या आणि युद्धे झाली नाहीत का? युद्धाचे बळी, विशेषकरून देशांतर्गत युद्धांनी असंख्य बळी घेतले आहेत. जग या युद्धांविषयी सहानुभूती दाखवते आणि अशा दंगलींची वंशहत्या म्हणून दखल पण घेते. तरीही अशा युद्धांना व त्यांच्या पुनरावृत्तीला रोखण्यात जग कमी पडले आहे, हे सत्य आहे.
जगात अनेक वाद-विवाद आणि समस्या आहेत हे खरे आहे. पण तरीही शोषितांना मदत करण्यासाठी अनेकजण पुढे येतात आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठीही बरेच प्रयत्न केले जातात हेही खरेच आहे. बाडेन ऊर्तबर्ग आणि मिस्टर क्रेस्चमन आणि त्यांचे सहकारी यांच्या पुढाकाराशिवाय मी आयसिसच्या गुन्ह्यांचा पाढा वाचण्याचे आणि याझिदी समूहाच्या वाट्याला आलेल्या भोगांचे सत्य सांगण्याचे स्वातंत्र्य उपभोगूच शकले नसते. माझे असे मत आहे की, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सर्व पीडितांना सुरक्षित आयुष्य जगण्याचा अधिकार आहे.
सहनशीलता, संयम आणि शांतता यावर विेशास ठेवणारा सुसंस्कृत समाज घडवण्यामध्ये शिक्षणाचा मोठा वाटा असतो. त्यामुळे आपण मनाची पाटी कोरी असणाऱ्या लहान मुलांमध्ये अधिकाधिक गुंतवणूक केली पाहिजे. द्वेष आणि सांप्रदायिकतेला खतपाणी न घालता, शिक्षणाद्वारे सहनशीलता आणि सहकार्यभावना शिकवता येऊ शकते. स्त्रियांच्या सहभागामुळे अनेक समस्या सोडवणे सोपे होते. समाजामध्ये चिरंतन शांतता प्रस्थापित करण्यामध्येदेखील त्यांचा सहभाग असला पाहिजे. समाजात मूलभूत बदल घडवण्यासाठी स्त्रियांनी आवाज उठवणे आणि त्यात सक्रियपणे सहभागी होणे आवश्यक आहे.
याझिदी समूहाच्या नागरिकांची शक्ती आणि त्यांचा संयम यासाठी मला त्यांचा अभिमान आहे. माझ्या समूहाला अनेक वेळा हिंसेचे लक्ष्य बनवण्यात आले, अनेक वेळा त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा करण्यात आला, तरीही आम्ही सातत्याने आमच्या अस्तित्वाच्या अधिकारासाठी झगडत राहिलो आहोत. याझिदी हे शांतता आणि सहनशीलतेला मूर्त स्वरूप देतात असे मला वाटते. एक उदाहरण म्हणून जगाने त्यांच्याकडे पाहिले पाहिजे.
ज्यांनी अगदी सुरुवातीपासून माझी बाजू घेतली आणि माझा संदेश इतरांपर्यंत पोचवण्याचे काम केले, त्या सर्वांचे आणि विशेषतः माझ्या सोबत दिवसरात्र असलेल्या माझ्या टीमच्या सदस्यांचे, मी आभार मानते. या हत्याकांडाची वंशहत्या म्हणून दखल घेणाऱ्या आणि असुरक्षित समूहांना साह्य करणाऱ्या सर्व देशाच्या शासनांचे आभार मानते. याझिदी वांशिक हत्याकांडाच्या पीडितांना आश्रय देऊ केला यासाठी कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाचे आभार मानते. माणुसकीला धरून आमच्या उद्देशांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल फ्रान्स आणि अध्यक्ष माक्रोन यांची आभारी आहे.
इराकमधील निर्वासितांना मागची चार वर्षे सतत मदत करणाऱ्या इराकी कुर्दिस्तानच्या लोकांचीदेखील मी ऋणी आहे. इराकच्या पुनर्निर्मितीसाठी परिषद आयोजित करणाऱ्या कुवेतचे एमिर आणि नॉर्वेचे शासन यांचेसुद्धा आभार मानते. ज्यांनी ही वंशहत्या आयसिसनेच केली हे साऱ्या जगाला पटवून देण्यासाठी व आयसिसला शिक्षा व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले ती माझी मैत्रीण अमाल क्लुनी आणि तिची टीम यांची मी आभारी आहे. विस्थापितांना अमर्यादित साह्य करणाऱ्या ग्रीसचीदेखील मी ऋणी आहे.
आपण सगळे अन्याय आणि जुलूम यांच्याविरुद्ध एकत्र येऊ या. शांततेसाठी, हिंसाचाराविरुद्ध स्वातंत्र्यासाठी, गुलामीविरुद्ध वंशवादाविरुद्ध-एकतेसाठी आणि सर्वांच्या मानवधिकारांसाठी आपण सगळे एकत्रितपणे आवाज उठवू या. स्त्रिया व बालकांच्या शोषणाविरुद्ध, त्यांना सभ्य आणि स्वावलंबी आयुष्य मिळवून देण्यासाठी; गुन्हेगारांना शिक्षा न देता सोडून देण्याविरुद्ध, त्यांना त्यांच्या कृत्यांसाठी जबाबदार धरण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी आपण एकत्र आवाज उठवू या. तुम्ही दाखवलेल्या अगत्याबद्दल आणि मनःपूर्वक लक्ष देऊन माझे भाषण ऐकून घेतल्याबद्दल मी आपली आभारी आहे. आपल्या सर्वांचे आयुष्य चिरंतन टिकणाऱ्या शांततेत व्यतीत होवो.
अनुवाद : मृद्गंधा दीक्षित
(नादिया मुराद या 25 वर्षी इराकी तरुणीला 2018 या वर्षीचे नोबेल शांतता पारितोषिक 10 डिसेंबर 2018 रोजी नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे प्रदान केले गेले, त्यावेळी केलेले हे भाषण.)
Tags: woman harrasement sexslave isis Iraq shanatatecha noble peace noble nadiya murad मृद्गंधा दीक्षित वांशिक हत्या गुलाम सेक्सस्लेव्ह आयसीस इसीस इराक शांततेचा नोबेल नादिया मुराद weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या