डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

भारतामधील स्मार्ट शहरांची कल्पना स्मार्ट दुबईवरून घेण्यात आली आहे आणि तिचे निर्माते व प्रत्यक्ष कार्य करून तिला यशस्वी करणारे खलील हे स्थापत्य शास्त्रज्ञ म्हणतात की, भारताची स्मार्ट खेडी ही कल्पना जर खऱ्या अर्थाने यशस्वी करावयाची असेल, तर स्मार्ट खेड्यामधील प्रत्येक शेतकरी हा केंद्रबिंदू मानावयास हवा. त्याचे कृषिउत्पादन हेच मुळी या कल्पनेचा गाभा आहे आणि यास यशस्वी करावयाचे असेल तर शिक्षित कृषी युवक- युवतींची फौज ग्रामीण भागात कार्यरत होणे आवश्यक आहे. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती तर होईलच, त्याचबरोबर शहरी स्थलांतराचा लोंढाही थांबू शकतो. उद्याच्या कृषिप्रधान भारताचे खरे उज्ज्वल भविष्य हे अशा पद्धतीने निर्माण होणाऱ्या स्मार्ट खेड्यांमध्ये आणि त्यांच्या निर्मितीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो कृषी युवकांमुळेच साध्य होणार आहे. युवकांच्या सहभागाशिवाय दिसणारा कृषिविकास हे केवळ दिवास्वप्न असून, हे दाखविण्यासाठी माध्यान्हीचा तळपता लोहगोल पुरेसा आहे. 

मध्य प्रदेशामधील जबलपूर हे शहर मला त्याच्या दोन वैशिष्ट्यांमुळे जास्त आवडते. एक म्हणजे, शहराजवळून वाहणारी व स्फटिकासारखे स्वच्छ पाणी असणारी नर्मदा नदी आणि याच पाण्यावर शेती करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांची शाश्वत काळजी घेणारे तेथील जवाहरलाल नेहरू कृषी विश्व विद्यालय. जबलपूरला आल्यावर मी नेहमीच नर्मदेचे दर्शन घेऊन या विश्व विद्यालयाच्या कृषी मंदिरात जातो.
 
फेब्रुवारीच्या 16 आणि 17 तारखेसही नेमके असेच घडले. कान्हा व्याघ्र प्रकल्प व तेथील घनदाट जंगलातच जंगलनिर्मितीची आठवड्याची आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आटोपल्यावर परतीच्या मार्गावर असलेल्या या कृषी विद्यापीठास आर्वजून भेट दिली आणि तेथील विवेकानंद सभागृहात सुरू असलेल्या राष्ट्रीय कृषी विद्यार्थी संमेलनामधील ज्ञानगर्दी पाहून क्षणभर थबकलो. या क्षणांचे तासात केव्हा रूपांतर झाले, हेच लक्षात आले नाही. भारताच्या विविध राज्यांतून आलेले ते 500 युवक आणि परिषदेमधील त्यांचा उत्साही सहभाग पाहून ते देशाच्या कृषिक्षेत्राचे नेतृत्व करत आहेत, असा सतत भास होत होता. युवा छात्र संमेलनामधील कृषितज्ज्ञांचे विचार, विद्यार्थ्यांबद्दलची त्यांची तळमळ, भविष्यामध्ये त्यांना हव्या असलेल्या कृषिप्रधान भारताचे रूप पाहताना साने गुरुजींचे ‘बलशाली भारत होवे, विश्वात शोभुनी राहो’ हे गीत मी प्रथमच प्रत्यक्षात अनुभवत होतो. वर्ष मात्र 1931 च्या ऐवजी 2019 होते, एवढेच. 

जगामधील कृषिक्षेत्रात कार्यरत असलेली 60 टक्के युवाशक्ती आज आपल्या देशात आहे आणि यातूनच उद्याचे कृषिशास्त्रज्ञ तयार होतील, अशी आपली माफक अपेक्षा असते; पण असे होते का? आज महाराष्ट्रच काय, पण इतर राज्यांमधील शेतकऱ्यांची मुले वा कृषीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी दुर्दैवाने या क्षेत्रापासून दूर जात आहेत आणि हे प्रमाण सातत्याने वाढतच आहे. हे असे का होत आहे, हा चिंतेचा विषय आहे. या युवकांना कृषिक्षेत्राकडे पुन्हा वळविण्यासाठी शासनातर्फे सन्मानजनक मार्गांची गरज आहे आणि यातूनच भारतीय शेतीला पुन्हा सुवर्णयुगाकडे वाटचाल करण्याची संधी प्राप्त होणार आहे. 

परिषदेमधील तज्ज्ञांचे हे प्रभावी विचार युवाशक्तीला मार्गदर्शन करत होते, मात्र दुर्दैवाने एकाग्र चित्ताने ऐकणारे फक्त विद्यार्थीच दिसले. त्यांच्यासाठी सन्मानजनक मार्गाची निर्मिती करणारा राजकीय मंच या विचारधारेमध्ये कुठेही दिसत नव्हता. तीन-चार दशकांपूर्वी बोटांवर मोजण्याइतपत मुलींची संख्या असणाऱ्या कृषी-शिक्षणक्षेत्रात आज ही संख्या मुलांच्या बरोबरीने आहे आणि हे सशक्त कृषिक्षेत्राचे शुभ दर्शकच आहे. 

भारतीय कृषिक्षेत्रात सुरुवातीपासूनच महिलांचा सहभाग महत्त्वाचा राहिला आहे. पतीच्या खांद्याला खांदा लावून शेती करणारी ही नारीशक्ती आज या क्षेत्रात फार मोठा वाटा उचलत आहे. दक्षिण भारतात आज कृषीमध्ये महिलांची संख्या 70 टक्क्यांच्या पुढे गेली आहे आणि उर्वरित देशात तिने 50 टक्क्यांना स्पर्श केला आहे. ही टक्केवारी न घसरण्यासाठी कृषिशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना शासनाने कृषिक्षेत्रातच समावून घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. 

भूतानमधील सेंद्रिय शेतीमध्ये महिलांचा सहभाग पाहिल्यावर शेतीसारखा आनंदी व्यवसाय नाही, याची मनोमन खात्री पटते. भूतानला हे सहज साध्य झाले ते स्त्रियांना तिथे दिलेल्या सन्मानामुळेच. अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, मणिपूर, आसाम, त्रिपुरामध्येसुद्धा थोडेफार असेच चित्र आहे. महाराष्ट्रात आज महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत शेकडो-हजारो महिला बचत गट हे कृषी आणि त्याच्याशी निगडित क्षेत्रात कार्यरत आहेत. या गटांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांच्या व्यवसायांची प्रगती होण्यासाठी प्रशिक्षित कृषिकन्यांना शासनातर्फे कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झाला, तर शेतमालाची वावरामधून खळ्यावर आणि तिथून आडतीवर- या दुष्ट प्रवासाच्या साखळीस निश्चितच अटकाव निर्माण होईल. 

गावपातळीवर शेतमाल प्रक्रिया उद्योग सुरू होणे, हा खऱ्या अर्थाने राष्ट्रपिता म.गांधी यांना अपेक्षित असणारा ग्रामविकास. या ग्रामविकासाला स्वराज्याशी जोडताना देशामधील प्रत्येक लहान खेडे हे भविष्यामधील बलशाली भारताचे एक स्वतंत्र स्वावलंबी घटक झाले, तरच देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल... हे या थोर विचारवंतांचे विचार आणि याच ग्रामस्वराज्याच्या विचारधारेला पुढे नेताना साने गुरुजींनी यात ग्रामीण युवकांच्या सहभागास आवाहन करून युवाशक्तीला एका वेगळ्या उंचीवर नेले होते. आज आपला देश माहिती तंत्रज्ञानात जगामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. पण त्याच वेळी जेव्हा आपण आपली कृषीवर आधारित अर्थव्यवस्था पाहतो, तेव्हा स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या विकासाचे इमले उभारताना आम्ही राष्ट्रपित्यास अपेक्षित असणारा ग्रामविकास व स्वराज्याचा चुराही अनुभवतो. कृषिक्षेत्रात कार्यरत असलेल्या युवाशक्तीचा आज फार मोठ्या प्रमाणावर व्यय होत आहे तो याचमुळे. 

कृषीमधील शिक्षणाच्या बाजरीकरणात ही तरुण पिढी जैविक तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया, आयात-निर्यात, हरित-गृहामधील शेती या गोंडस नावाखाली आकर्षित झाली आणि आज याच क्षेत्रामध्ये आपणास हजारोंच्या संख्येने बेकारी पाहावयास मिळत आहे. जबलपूरच्या कृषी छात्र संमेलनामध्ये याच क्षेत्रामधील अस्वस्थ तरुणांच्या हुंकाराचे प्रतिनिधित्व करणारा फार मोठा गट होता. कृषिउद्योगाचे अर्थशास्त्र, कृषिमालावर प्रक्रिया उद्योग, कृषिविमा, हरितगृहे, आधुनिक शेती, कृषी आयात-निर्यात, परदेशी बाजरपेठा ही रोजगार उपलब्धीची दालने आमच्या युवकांना अजूनही संपूर्णपणे उघडली गेलेली नाहीत. 

मला इस्राईलचे उदाहरण आठवते. जेमतेम 5-6 इंच पाऊस असलेल्या या देशाला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हरितगृहे आणि ठिबक सिंचनप्रणाली स्वीकारण्यावाचून पर्यायच नव्हता. तेथील कृषी विद्यापीठांमधील ज्येष्ठ प्राध्यापकांनी या दोन क्षेत्रांत विपुल संशोधन करून हजारो कृषियुवकांच्या साह्याने त्याला प्रत्यक्ष कृतीमध्ये आणले. आज या देशाच्या कृषिक्षेत्रात 70 टक्के युवाशक्ती याच आधुनिक कृषी- तंत्रज्ञानामध्ये कार्यरत आहे. म्हणूनच सर्व जगाला ताजा भाजीपाला, फळे-फुले निर्यात करणारा इस्राईल आज कृषीमध्ये खऱ्या अर्थाने सुजलाम्‌-सुफलाम्‌ ठरला आहे, तो  या युवाशक्तीमुळेच. त्यामुळेच येथे आग्रहाने नमूद करावे वाटते की- देशाला जर खऱ्या अर्थाने कृषिविकास हवाच असेल, तर या क्षेत्रामधील युवाशक्तीला याच क्षेत्रात थांबवणे ही काळाची गरज आहे. 

भारतीय कृषिक्षेत्राला आज वातावरणबदल, वाढती उष्णता, वाळवंटीकरण, मॉन्सूनचा चढ-उतार याचबरोबर कृषिमालाची अनियंत्रित आयात- निर्यात, भौगोलिक स्थितीप्रमाणे नसलेले पीक-नियोजन या समस्यांनी ग्रासलेले आहे. अनेक वेळा राजधानीमधील वातानुकूलित कक्षामध्ये घेतलेले कृषिनिर्णय कसल्याही प्रात्यक्षिकाशिवाय शेतकऱ्यांवर लादले जातात. कृषिविकासाची गंगा शेतकऱ्याच्या उंबरठ्यापर्यंत आणण्यामध्ये या युवाशक्तीच्या योगदानाबद्दल आज कुणीही फारसे बोलण्यास तयार नाही. जबलपूरच्या कृषी विश्व विद्यालयामधील या कृषी विद्यार्थी संमेलनात अनेक विद्यार्थी प्रतिनिधींनी कृषिशिक्षण-क्षेत्रामधील बाजारीकरणावर अंकुश ठेवण्याची मागणी केली. ‘आम्हाला कृषिक्षेत्रातच कार्य करावयाचे आहे, पण योग्य संधीच शासनातर्फे मिळत नाही,’ यावरही सडेतोड चर्चा झाली. राज्यांमधील कृषिविषयक धोरणांचा निर्णय आणि अंमलबजावणी ही तज्ज्ञ अनुभवी कृषितज्ज्ञ अधिकाऱ्यांकडूनच व्हावी, यावरही मंथन झाले. 

या कृषिछात्र संमेलनामधील सर्वांत महत्त्वाची मागणी होती, ती म्हणजे- देशामधील सर्व शाळांमध्ये प्राथमिक स्तरावर शेती हा विषय विद्यार्थ्यांना शिकवण्याची. कृषिव्यतिरिक्त इतर शाखांमधील विद्यार्थ्यांना शेती, शेतकरी व त्यांच्या समस्या याचा अजिबात गंध नसतो आणि म्हणूनच ग्रामीण व शहरी भारतामधील दरी वाढतच आहे. मुंबईमध्ये प्रतिवर्षी भरणाऱ्या अनेक वृक्ष, वेली, फुलझाडे प्रदर्शनामध्ये कुंडीमधील फळभाज्या पाहताना ‘वांग्याचे झाड एवढे छोटे असते? मला तर वाटत होते ते वडाएवढे मोठे आहे!’ असे पाल्यांचे त्यांच्या पालकांबरोबर होणारे चित्रविचित्र संवाद ऐकून धक्काच बसतो. म्हणूनच आपल्या विद्यार्थ्यांना प्राथमिक, माध्यमिक आणि हायस्कूलपर्यंत कृषी हा विषय सक्तीचा करणे गरजेचे आहे. यामधूनच त्यांना सेन्द्रिय, नैसर्गिक आणि रासायनिक शेतीची ओळख होऊ शकते. त्याचबरोबर वनीकरण, जलसंवर्धन, ग्रामीण विकास, कृषी उत्पादित मालावर प्रक्रिया उद्योग यांचेही शिक्षण मिळू शकते.

कृषिविषयाचा भारतीय शिक्षण-प्रणालीत प्राथमिक स्तरापासून होणारा समावेश आज लाखोंच्या संख्येने रोजगारनिर्मिती करू शकतो. वाढत्या कृषी पदविका आणि पदवीधारकांना याच क्षेत्रात सेवा देण्याची ही अनमोल संधी आहे. काही महिन्यांपूर्वी मराठवाड्यामधील एका कृषी पदवीधारकाने दूरध्वनीवरून त्याची व्यथा मला सांगितली. अल्पभूधारक शेतकऱ्याच्या या मुलाने अतिशय कष्टाने कृषीशिक्षण घेतले ते कृषिसाठी वाहून घेण्याकरता; पण अजूनही त्याला नोकरी नाही. इच्छा नसतानाही कृषीमध्ये  नोकरी मिळेपर्यंत तो स्पर्धापरीक्षेची तयारी करत आहे. ग्रामीण भागातील तरुणांना स्पर्धापरीक्षेत नेहमीच अडथळे येतात. 'काही तरी प्रक्रियाउद्योग सुरू करा’ असे भरल्या पोटाने पोकळ सल्ले देणारे अनेक असतात. आज प्रत्येक कृषी पदवीधारकांची जवळपास हीच शोकांतिका आहे. युवा कृषिशक्तीचा हा ऱ्हास होत आहे. या तरुणांना आम्ही भारतातील ‘सोने की चिडियाँ’ म्हणतो आणि भविष्यात त्यांना ‘सोने के शेर’ करण्याच्या घोषणा देतो; पण वास्तविकता पाहताना कुठे तरी दिशाहीन पद्धतीने वाटचाल होताना आढळते. 

भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये (जीडीपी) 18 टक्के हिस्सा आणि हाताशी असलेल्या एकत्रित उपलब्ध मनुष्यबळापैकी 50 टक्के रोजगार हे कृषी व कृषिआधारित क्षेत्राचे योगदान आहे, पण आजही आम्ही ते गांभीर्याने स्वीकारत नाही. कृषिक्षेत्रामधील समस्यांचे खऱ्या अर्थाने निर्मूलन करावयाचे असेल. तर या क्षेत्रात तयार होणारी युवक-युवतींची फौज याच क्षेत्रात उतरणे ही काळाची गरज आहे. 

आखिल भारतीय कृषी विद्यार्थी संघटनेचे (AIASA) आज 75000 सदस्य आहेत आणि 1 लाख 25 हजार कृषी युवक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यास जोडलेले आहेत. शासनाने कृषिक्षेत्रात जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करावी, यामध्ये कृषिकन्यांना प्राधान्य असावे. प्रत्येक कृषी पदवीधारकाला शासनाचे प्रतिनिधी म्हणून सन्माननीय मार्गाने शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळावी. प्राथमिक स्तर व त्यापुढील अभ्यासक्रमात कृषीचा अंतर्भाव करावा, या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. 

जबलपूरच्या राष्ट्रीय कृषी छात्र परिषदेमध्ये चर्चा झालेल्या अनेक विषयांपैकी ‘स्मार्ट खेडी’ या विषयावर सखोल चर्चा आणि यामधील युवकांचा सहभाग मला अतिशय मोलाचा वाटला. म.गांधींच्या ‘आदर्श गाव’ आणि ‘ग्रामस्वराज्या’चा धागा पकडून 2 ऑक्टोबर 2014 रोजी आदर्श ग्राम योजना जाहीर झाली. सन 2015 मध्ये तीनशे गावांना दर्जा देण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर मोहीम सुरू करून ती 2019 मध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले. 

प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेऊन 2019 पर्यंत ते स्मार्ट करावे, यासाठी खासदार निधीमधून भरघोस अनुदान देण्यात आले. पण पुढे काय झाले, हे सर्वानाच माहिती आहे. भारताची 833 दशलक्ष म्हणजेच 68 टक्के जनता ग्रामीण भागात 638000 खेड्यांमध्ये विस्तारलेली आहे आणि येथेच आज शहरी स्थलांतराच प्रश्न उग्र स्वरूप धारण करत आहे. खेड्यामधील जनतेस आणि कुटुंबांना शिक्षण, आरोग्य, स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे, योग्य आहार, दळणवळण, संरक्षण आणि मोबाईलची सेवा पुरविली म्हणजे ते खेडे स्मार्ट झाले- अशा भ्रामक कल्पनेत आज आपण आहोत. स्मार्ट खेड्यासाठी हे सर्व आवश्यक असले, तरी परिपूर्ण निश्चितच नाही. भारतीय कृषी अर्थव्यवस्थेत खेडी आणि तिच्यामधील शेतकरी या घटकांचा आज आम्हाला विसर पडत आहे. 

स्मार्ट गाव या संकल्पनेत गावामधील प्रत्येक शेतकरी कुटुंबाचा, त्याची शेती, पीकयोजना, खते, पाण्याचा पुरवठा, घरामधील मजुरांची संख्या, खरिपरब्बीतून मिळालेले उत्पादन, बाजारपेठ, मिळालेली किंमत आणि झालेला फायदा-तोटा हे विचारात घेणे गरजेचे आहे. खेड्यामधील प्रत्येक शेतकऱ्याची ही अशी डिजिटल माहिती गोळा करून तिचे पृथ:करण फक्त कृषिक्षेत्रामधील युवा पिढीच करू शकते. शेतकऱ्यांच्या नावावर बँकेत केवळ पैसे जमा झाले म्हणजे गाव स्मार्ट झाला, असे नव्हे. 

भारतामधील स्मार्ट शहरांची कल्पना स्मार्ट दुबईवरून घेण्यात आली आहे आणि तिचे निर्माते व प्रत्यक्ष कार्य करून तिला यशस्वी करणारे खलील हे स्थापत्य शास्त्रज्ञ म्हणतात की, भारताची स्मार्ट खेडी ही कल्पना जर खऱ्या अर्थाने यशस्वी करावयाची असेल, तर स्मार्ट खेड्यामधील प्रत्येक शेतकरी हा केंद्रबिंदू मानावयास हवा. त्याचे कृषिउत्पादन हेच मुळी या कल्पनेचा गाभा आहे आणि यास यशस्वी करावयाचे असेल तर शिक्षित कृषी युवक-युवतींची फौज ग्रामीण भागात कार्यरत होणे आवश्यक आहे. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती तर होईलच, त्याचबरोबर शहरी स्थलांतराचा लोंढाही थांबू शकतो. उद्याच्या कृषिप्रधान भारताचे खरे उज्ज्वल भविष्य हे अशा पद्धतीने निर्माण होणाऱ्या स्मार्ट खेड्यांमध्ये आणि त्यांच्या निर्मितीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो कृषी युवकांमुळेच साध्य होणार आहे. युवकांच्या सहभागाशिवाय दिसणारा कृषिविकास हे केवळ दिवास्वप्न असून, हे दाखविण्यासाठी माध्यान्हीचा तळपता लोहगोल पुरेसा आहे.

 

Tags: कृषिविकास डॉ. नागेश टेकाळे स्मार्ट खेडी कृषीविद्यार्थी कृषीशिक्षण शेती कृषी कृषिउत्पादन agricultural development smart village agricultural product youngster agricultural student agriculture nagesh tekale weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात