डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

भारतीय वस्त्रोद्योगास हजारो वर्षांचा इतिहास आहे. ग्रामीण भागात हातमागावर वस्त्रनिर्मिती होत होती. प्रत्येक लहान गावामधील आठ- दहा कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून होती. आज हे सर्व लयाला गेले आहे, कारण राष्ट्रपिता म.गांधी यांचा ‘खेड्याकडे चला’ हा मंत्र आम्ही उलटा करून ‘शहराकडे पळा’ असा केला आहे. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर असलेल्या भव्य कपड्यांच्या एका दुकानास मी मायदेशी परतीच्या प्रवासाआधी सहज भेट दिली. तिथे सर्व बांगलादेशमध्ये तयार झालेले कपडेच विकले जात होते. तेही उत्कृष्ट दर्जाचे होते आणि नोकरवर्गसुद्धा बांगलादेशाचाच. म्हणजेच देशांतर्गत आणि देशाबाहेरही कापूसआधारित रोजगारनिर्मिती दिसत होती. लंडनच्या बाजारपेठेत खरेदी केलेले टी-शर्ट ‘मेड इन चायना’ होते. अनेक वेळा आपण परदेशी जातो आणि तिथून उत्तम डिझाइनचे कपडे भारतीय समजून घेऊन येतो. पण घरी आल्यावर ते बांगलादेश किंवा चीनमध्ये तयार झालेले आढळतात.

नदीचा सतत वाहत राहणारा स्वच्छ प्रवाह हा राष्ट्राची संस्कृती आणि लोकांचा सुसंस्कृतपणा दर्शवितो. आफ्रिका खंडामधील नाईल नदीचा असाच स्वच्छ स्फटिकासारखा फेसाळ वाहता प्रवाह मी तिच्या टांझानियामधील उगमापासून ते इजिप्तच्या विस्तीर्ण दोन काठांपर्यंत पाहिला. इजिप्तमधील 95 टक्के लोक या नदीच्या दोन्ही काठांवर वस्ती आणि शेतीच्या रूपात राहतात. जगामधील सर्वांत लांब असलेल्या या नदीचा इजिप्तमधील प्रवाह जेमतेम 5 टक्के आहे, पण या राष्ट्राची 90 टक्के अर्थव्यवस्था या नदीशी जोडलेली आहे. इजिप्तची सर्व शेती, औद्योगिक विकास आणि पिण्याचे पाणी नाईलशी निगडित आहे, म्हणूनच तेथील लोक या नदीला खऱ्या अर्थाने त्यांची माता समजतात.

औद्योगिक विकासामुळे जगामधील नदीकाठच्या अनेक मोठमोठ्या संस्कृती लयास गेल्या, पण नाईलची संस्कृती आजही हजारो वर्षांपासून आहे तशीच टिकून आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे, तिथे नदीला दिलेला सन्मान आणि तिच्या दोन्हीही काठांना ठरावीक अंतर ठेवून केलेली सेन्द्रिय शेती. इजिप्तमध्ये नाईलच्या पाण्यावर गहू, ताग, ऊस, कापसाचे फार मोठे उत्पादन घेतले जाते. या नदीच्या सुपीक गाळावर वाढवलेल्या कापसास ‘इजिप्शियन कॉटन’ असे म्हणतात. या पिकाचा आणि नाईलचा ऋणानुबंध हजारो वर्षांचा आहे. लांब, सरळ, ताकदवान, न तुटणारा मुलायम धागा हे या कपाशीचे वैशिष्ट्य आजही तसेच आहे. येथील शेतकरी कापसाचे उत्पादन घेऊन आपल्याच राष्ट्रामधील वस्त्रव्यवसायास विकतात. या वस्त्रोद्योगामध्ये उच्च प्रतीचा धागा तयार होऊन तो जगभर निर्यात केला जातो. इजिप्तमधील 30 टक्के औद्योगिक विकास या कापसाशी जोडलेला आहे आणि यामध्ये जवळपास 3300 उद्योग प्रत्यक्ष धागानिर्मितीत सहभागी आहेत. आज हा देश कपाशीचा 80 टक्के धागा अमेरिकेस निर्यात करतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांची कापूसनिर्मिती आणि या कापसापासून धागानिर्मितीचे प्रमाण 1:4 एवढे आहे. म्हणजेच एका शेतकऱ्याने चार लोकांना वस्त्रोद्योग कारखान्यात रोजगार उपलब्ध करून दिला आहे. म्हणूनच या देशाला ‘नाईल थ्रेड’ने समृद्ध केले आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

चीनने इजिप्तच्या कापसावर आधारित या अर्थव्यवस्थेचा सखोल अभ्यास केला आणि तो प्रत्यक्षात  आणलासुद्धा! आज चीनमध्ये शेतीवर आधारित उद्योगधंद्यांत कुशल कामगारांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आढळते. ‘गुआँझु’ हे चीनमधील फुलांचे शहर म्हणून ओळखले जाते. तिथे हरितगृहे आणि उघड्यावरसुध्दा मोठ्या प्रमाणात विविध फुलांचे उत्पादन घेतले जाते. उत्सुकतेपोटी मी एका मोठ्या हरितगृहास भेट दिली आणि त्या मालकाने सांगितलेली, त्याच्या हरितगृहाचे अर्थकारण व रोजगारनिर्मिती. ती ऐकून मी चकित झालो. हा शेतकरी प्रतिदिन 40-50 कुशल कामगारांना फुले तोडण्याचे काम वर्षभर देत होता आणि तेवढ्याच संख्येने लोक त्या फुलांचे पॅकिंग व त्यांची योग्य वाहतूक करून त्यांना इच्छित स्थळी टवटवीत अवस्थेत पोचवीत होते. एका मोठ्या शेतकऱ्याने त्याच्या उत्पादनाचा उत्कृष्ट दर्जा सांभाळून ती फुले ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत अंदाजे शंभर कुशल लोकांना शाश्वत रोजगार दिला होता. अशी हजारो हरितगृहे या शहराच्या परिसरात आहेत.

शेती आणि ती करणारा शेतकरी यांच्या यशस्वी कृषिव्यवसायाचे रहस्य असे यात दडलेले दिसून येते. पूर्वी आपल्याकडेही वडिलोपार्जित सांभाळलेली विहीर अथवा नदी-ओढ्यांचे वाहते पाणी उपलब्ध असल्यासच शेतकरी ऊस लावत. त्यानंतर गुऱ्हाळ व गुळांच्या ढेपींना भाव येईल तेव्हाच विक्री होत असे. ऊसउत्पादक शेतकरी या उद्योगामधून ऊसकाढणी, वाहतूक, उसाची रसनिर्मिती, गुळवे, गूळढेप निर्मिती, वाहतूक आणि साठवण यामधून किती तरी लोकांना रोजगार उपलब्ध करून देत असत. ऊसउत्पादक शेतकरी खऱ्या अर्थाने रोजगारनिर्मिती करत होता. म्हणूनच ग्रामीण जीवन सुखमय होते. आज 95 टक्के ऊस कारखान्याकडे जातो, मग प्रश्न उभा राहतो या 95 टक्क्यांमध्ये पूर्वी निर्माण झालेले हजारो-लाखो स्थानिक रोजगार आता कुठे गेले?

नद्या आटून गेल्या, ओढ्यांमधून शेती करणे बंद झाले, विहिरी तळाला गेल्या; पण ऊसशेती मात्र पाहावे तिथे वसंत ऋतूमध्ये दिसणाऱ्या पुष्पमहोत्सवाप्रमाणे सर्वत्र आपल्या शैलीमध्ये बहरलेली आहे. यामधून निर्माण झालेले ग्रामीण रोजगारीचे प्रचंड मोठे निर्माल्य आज सहजपणे पायदळी तुडविले जात आहे. या प्रवासात रोजगारनिर्मिती करणारा परमेश्वररूपी बळीराजा मात्र कुठेही दिसत नाही. रोजगारनिर्मितीमध्ये अपयशी ठरलेल्या भारतीय शेतीची आणि शेतकऱ्यांची आज ही फार मोठी शोकांतिका आहे. शाश्वत शेतीव्यवसायापासून बेरोजगार झालेला ग्रामीण भागामधील गावागावामधील हजारोंचा हा समूह शिधापत्रिकेच्या माध्यमामधून मिळणाऱ्या स्वस्त धान्यावर आज संतुष्ट आहे. हा धोक्याचा कंदील ‘व्होट बँक’ बनू पाहत आहे, त्यामुळेच शेतीवर उपलब्ध न होणाऱ्या रोजगारीचे दाट काळे ढग जमा झाले आहेत. यातून रोजगाराची वृष्टी होणार तर नाहीच, मात्र वैफल्याची वीज सातत्याने कडाडत राहणार आहे. ग्रामीण बेरोजगारी ही शाश्वत शेती व्यवस्थापनामधील फार मोठा अडथळा आहे.

शेतकऱ्यांचे शासकीय अनुदानावर अवलंबून राहणे, कृषिकार्यालये व बँकांमध्ये अस्वस्थपणे खेटा मारणे, त्यामुळे वाढणारा एकाकीपणा, विस्कटलेल्या एकत्र कुटुंबपद्धतीच्या जखमा या सर्वांवर कृषिक्षेत्रामधील बेरोजगारीची दाट काळी सावली तयार झाली आहे. म्हणूनच दिवसाउजेडी झालेल्या या कृत्रिम अंधारात शाश्वत शेतीची दृष्टी असणारा शेतकरी दिशाहीन होऊन चाचपडत आहे. पूर्वी शेतकरी खऱ्या अर्थाने अन्नदाता होता. जमिनीखालील उपयुक्त जिवाणू, बांधावरचे वृक्ष, त्यावरील पक्षी, बागडणारी फुलपाखरे, खुरपण करणाऱ्या स्त्रिया, विहिरीवर-शेतात काम करणारी गडीमाणसे या सर्वांचा तो खऱ्या अर्थाने पोशिंदा होता. अन्नास जोडलेली ही खरी रोजंदारी आणि कृषिउद्योग- निर्मिती होती. आज जमिनीखाली काहीच उरले नाही. बांधही गेले, दिसत आहे ती वाळूमिश्रित जमीन आणि प्रखर ऊन पिणारे शिवार. पावसावर अवलंबून, किडीच्या तावडीतून कशीबशी वाचलेली पिके खळ्यावरून गाडीमध्ये आणि तिथून मिळेल त्या भावात बाजारात गेलेली आपणास दिसतात. यास शेती म्हणावयाचे का?

शेती अशी असावी की, ज्यामध्ये एक शेतकरी गावपातळीवर दहा लोकांना कृषिउत्पादनावर आधारित रोजगार उपलब्ध करून देईल. आज आपली कृषिउत्पादने आपल्या शेजारच्याच राष्ट्रात लाखोंच्या संख्येत कुशल आणि अकुशल रोजगारनिर्मिती करत आहेत. मुद्याचे सांगावयाचे झाले तर, चीनसह बांगलादेशची 2018-19 मधील कापूस आयात वाढणार, ही बातमी कापूस उत्पादनात जगामध्ये प्रथम स्थानावर असलेल्या आपल्या देशासाठी सुखावह असली तरी या निर्यातीमुळे आपल्या शेजारच्याच दोन राष्ट्रांत मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत आहे, याकडेही आपले लक्ष जाणे जरुरीचे आहे. बांगलादेश हा जगामधील सर्वांत मोठा कापूस  आयातदार देश आहे. तिथे कापूस उत्पादन अत्यल्प किंवा अपवादानेच म्हणजे जेमतेम 2 टक्के आहे, मात्र येथील वस्त्रोद्योग प्रचंड मोठा आहे. इजिप्त हा देश नाईलच्या किनारी कापूस उत्पादन करतो, तो तिथेच वस्त्रोद्योगामध्ये वापरून धागानिर्मिती होते आणि त्याची निर्यात होते. मात्र बांगलादेश 98 टक्के कापूस आयात करतो, त्यापासून ग्रामीण पातळीवर घराघरांमध्ये धागानिर्मिती करून तो कपडनिर्मितीमध्ये वापरला जातो. हा देश भारतीय कापूस खरेदीस प्राधान्य देतो, कारण त्यांना ही आयात जमीन व समुद्रमार्गे अतिशय जवळ आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इतर कापूसउत्पादक देश म्हणजे अमेरिका व ऑस्ट्रेलियापेक्षा तो 10 टक्क्यांनी स्वस्त आहे.

बांगलादेशाच्या गार्मेंट उद्योगासाठी प्रतिवर्षी लागणाऱ्या एकूण कापसाच्या गाठींपैकी आपल्या देशाने मागील वर्षी 46 टक्के गाठी निर्यात करून त्या देशाच्या वस्त्रोद्योगास समर्थ केले आहे. या वर्षी म्हणजेच 2018- 19 मध्ये हाच आकडा 70 टक्क्यांपेक्षाही जास्त होण्याची शक्यता आहे. बांगलादेशामधील गार्मेंट आणि धागानिर्मिती ही ग्रामीण भागात स्त्रीशक्तीवर आधारित आहे. नव्वदीच्या दशकापर्यंत या गरीब राष्ट्रामधील स्त्रियांची व मुलांची अवस्था आर्थिक, आरोग्य व आहार या क्षेत्रात अतिशय दयनीय होती. कुपोषण आणि माता- बालमृत्यूने या देशामध्ये थैमान घातले होते. प्रा.मोहम्मद युनूस या ढाक्का विद्यापीठामधील अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाने शेतकरी स्त्रियांचे हे दु:ख जवळून पाहिले आणि मोजक्या स्त्रियांना एकत्र करून स्वत: आर्थिक मदत करून सुरुवातीस लहान मुलाचे कपडे त्यांना शिवण्यास देऊन विक्री व्यवस्थापन उभे केले व सोबत आर्थिक स्वावलंबनसुद्धा. याच व्यवसायात नंतर स्त्रियांना स्त्रिया जोडल्या गेल्या आणि यातूनच गरीब म्हणजेच ग्रामीण बँकेची स्थापना झाली. जी स्त्री स्वत: व्यवसाय उभा करून आणखी आठ-दहा स्त्रियांना रोजगार देऊ शकेल, अशांना या ग्रामीण बँकेकडून त्वरित कर्ज मंजूर होऊ लागले आणि परतफेडसुद्धा सोप्या पद्धतीने होऊ लागली. आज या व्यवसायात तीन दशलक्ष स्त्रिया काम करत आहेत.

स्त्रियांना गरिबीमधून बाहेर काढून त्यांना आर्थिक स्वामित्व, सुदृढ आरोग्य व समाजात सन्मान मिळवून देण्यामध्ये प्रो.युनूस आणि त्यांच्या ग्रामीण बँकेचा फार मोठा सहभाग आहे. यामुळेच आर्थिक विवंचना, व्यसनाधीनता, स्त्रियांवर अत्याचार, कौटुंबिक कोलाहल कमी होऊन या व्यवसायाद्वारे या गरीब राष्ट्रात शांतता निर्माण झाली. म्हणूनच त्यांना 2006 चा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. बांगलादेशामधील या गार्मेंट व्यवसायात असलेल्या शेतकरी स्त्रियांना भारतात निर्माण झालेल्या कापसानेच फार मोठा हात दिला आहे. या व्यवसायात तयार झालेल्या कापडापैकी 77 टक्के कापड युरोप, अमेरिका आणि आखाती देशात निर्यात होते, म्हणूनच या राष्ट्रात आज याच व्यवसायामधून डॉलरचा ओघ चालू आहे.

आपला दुसरा शेजारी चीनची गोष्ट यापेक्षा फार वेगळी नाही. या विकसनशील राष्ट्राच्या ‘जिझियाँग’ प्रांतात सर्वांत जास्त म्हणजे 90 टक्के कापूस पिकवला जातो आणि याचे कारण म्हणजे त्याचे विशेष भौगोलिक स्थान आणि या पिकास पोषक असे हवामान व जमीन. या प्रांतामधील कापूसउत्पादन कमी झाले की, चीन कापूस आयात करतो आणि हा सर्व कापूस देशामधील लहान गावागावांत विस्तारलेल्या गार्मेंट व्यवसायास दिला जातो. पेरलेल्या बियांची उगवणक्षमता पाहून आयात कापसाची आकडेवारी लगेच जाहीर होते. जगाला लागणाऱ्या एकूण कपड्यामध्ये चीनचा सहभाग 40 टक्के आहे आणि तोही त्यांच्या 24000 अत्याधुनिक वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून.

चीनमध्ये या व्यवसायात आज फार मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली आहे. जगाची लोकसंख्या आज 710 कोटी आहे, ती 2050 पर्यंत 920 कोटींना स्पर्श करेल. या प्रचंड लोकसंख्येस भविष्यात 50 टक्के कपडा निर्यात करण्यासाठी चीनची कापूस आयात आणि त्यास जोडून रोजगारनिर्मितीही वाढतच जाणार आहे. चीनचे कापूसउत्पादन अंदाजे 350 लाख गाठी आहे, पण वाढत्या गार्मेंट व्यवसायामुळे आज त्यांची ही गरज 700 लाख गाठींपेक्षाही जास्त झाली आहे. चीन-अमेरिका व्यापार शीत युद्धामुळे आज आपल्या देशाला चीनसाठी कापूस निर्यातीची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. जागतिक बाजरपेठेपेक्षा दहा टक्के स्वस्त मिळणारा भारतीय कापूस चीनच्या गार्मेंट व्यवसायास व उपलब्ध रोजगारीस आता मजबूत करणार आहे आणि आम्ही मात्र चीनला 100 लाख गाठी कापूस निर्यात करणार म्हणून खुशीचे मांडे खात आहोत.

शेती, शेतकऱ्यांचे कापूसउत्पादन आणि उपलब्ध रोजगारनिर्मिती यांचे हे गणित कुठे तरी चुकत आहे.  भारतीय वस्त्रोद्योगास हजारो वर्षांचा इतिहास आहे. पूर्वी म्हणजे पाच दशकांपूर्वीपर्यंत ग्रामीण भागात हातमागावर वस्त्रनिर्मिती होत होती. ग्रामीण रोजगार- निर्मितीमध्ये हे माध्यम फार महत्त्वाचे होते. प्रत्येक लहान गावामधील आठ-दहा कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून होती. आज हे सर्व लयाला गेले आहे, कारण राष्ट्रपिता म.गांधी यांचा ‘खेड्याकडे चला’ हा मंत्र आम्ही उलटा करून ‘शहराकडे पळा’ असा केला आहे. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर असलेल्या भव्य कपड्यांच्या एका दुकानास मी मायदेशी परतीच्या प्रवासाआधी सहज भेट दिली. तिथे सर्व बांगलादेशमध्ये तयार झालेले कपडेच विकले जात होते. तेही उत्कृष्ट दर्जाचे होते आणि नोकरवर्गसुध्दा बांगलादेशाचाच. म्हणजेच देशांतर्गत आणि देशाबाहेर ही कापूसआधारित रोजगारनिर्मिती दिसत होती. लंडनच्या बाजारपेठेत खरेदी केलेले टी-शर्ट ‘मेड इन चायना’ होते. अनेक वेळा आपण परदेशी जातो आणि तिथून उत्तम डिझाइनचे कपडे भारतीय समजून घेऊन येतो, पण घरी आल्यावर ते बांगलादेश किंवा चीनमध्ये तयार झालेले आढळतात. दर्जा मात्र इंग्लडसारखाच असतो.

जगात सर्वांत जास्त कापूसउत्पादन करणारा देश ही आपली ओळख 2500 वस्त्रोद्योग आणि 13 टक्के वस्त्रनिर्यातीवरच थांबली आहे. वस्त्रोद्योगात रेशीम उद्योगाचा सहभागही मोठा आहे. कापूस हा ‘आहे तसा’ अथवा सरकी, रुई वेगळी करून किंवा धाग्याच्या रूपाने निर्यात केला जातो. चीन आणि बांगलादेश कापूस आहे ‘तसा’ आयात करण्यास जास्त इच्छुक असतात. कारण यामधूनसुद्धा रुई-सरकी वेगळी करणे, सरकी पेंड, तेल, कुक्कट खाद्य यामध्ये त्यांच्याकडे रोजगारनिर्मिती होतेच. हा आकडासुध्दा फार मोठा आहे. आपला देश आजही कापसापासून सरकी, रुई आणि धागानिर्मितीमध्ये फार मागे आहे. जिनिंग व्यवसाय ब्रिटिशकालीन आहे तसाच आहे. त्यामधील कर्मचारी, त्यांचा आर्थिक स्तर आणि आरोग्य खालावलेले आहे. म्हणून सूतनिर्मिती जेवढी हवी तेवढ्या प्रमाणात आणि दर्जेदार होत नाही. जिनिंगमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री आणल्यास कुशल क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते. बांगलादेशासारखे छोटे गरीब राष्ट्र 77 टक्के तयार कपडा निर्यात करू शकते आणि चीन 50 टक्क्यांना स्पर्श करू पाहत असताना आपल्या देशाची जेमतेम 13 टक्के निर्यात ही कुठे तरी खटकणारे आहे.

आपलाच कापूस शेजारच्या राष्ट्रांत प्रचंड प्रमाणावर रोजगारनिर्मिती करत असताना आम्ही मात्र कापूस निर्यात वाढणार याच्या आनंदात ‘कौशल भारत, कुशल भारत’ला फक्त कुरवाळतच बसलो आहोत. आजही मला असे वाटते की, शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्या या अनुदानाने सुटणार नाहीत, त्यासाठी कापसासारख्या शेतीउत्पादनावर आधारित उद्योग आणि त्यामध्ये कुशल व अकुशल रोजगाराची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन व्यापारी/दलाल यांनी बोली लावून खरेदी करण्यापेक्षा तिथे निर्यात क्षेत्राशी निगडित उद्योगांच्या प्रतिनिधींची स्पर्धात्मक बोली असावी, हे जेव्हा प्रत्यक्ष अमलात येईल, तेव्हाच शेतकऱ्यासाठी कापूस हे खऱ्या अर्थाने ‘व्हाईट गोल्ड’ ठरेल, असे वाटते.

Tags: कुशल भारत skilled india weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके