डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बालंट : अधिकाधिक अर्थपूर्ण होत चाललेली कथा

‘बालंट’ ही दीर्घ कथा काळाच्या ओघात अधिकाधिक अर्थपूर्ण होत चालली आहे, असे दिसते. आज भारतभर समाजपरिवर्तनासाठी झटणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांना, पत्रकारांना, विचारवंतांना आणि लेखकांना विविध गुन्ह्यांखाली पकडून तुरुंगात डांबण्यात आले आहे. वर्षानुवर्षे ते तुरुंगात खितपत पडून आहेत. व्यवस्था किती हिंस्र होऊ शकते, ते आपण पाहत आहोत. परंतु या चार तरुणांना अटक झाली, तेव्हा महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांत आंदोलने-निदर्शने झाली; परंतु आज मात्र सारे शांत आहे. जणू कसल्या तरी अनामिक भीतीच्या छायेखाली सारी जनता वावरते आहे! कार्यकर्ते, विचारवंत शांत आहेत. उद्याच्या भीषण भविष्याची ही नांदी आहे. 

मराठी साहित्य-व्यवहारातील खुजेपणाबद्दल लिहावे तेवढे थोडे आहे. या साहित्य-व्यवहारानेच महात्मा फुले, कर्मवीर वि.रा.शिंदे अन्‌ अख्खे सत्यशोधकी साहित्य यांच्याकडे पूर्णत: पाठ फिरवली. आजही परिस्थिती फारशी बदलली आहे, असे मात्र नाही. वर्षभरात प्रकाशित झालेल्या पुस्तकांपैकी किमान पंचवीस-तीस पुस्तके तरी महत्त्वाची असतात. त्यांपैकी एखाद्‌दुसऱ्या पुस्तकाची कुठेतरी ‘शंभर-दीडशे शब्दांत’ नोंद होते. बाकीचे येतात आणि कुठली चर्चा न होता, नोंदही न होता मागे पडतात. वस्तुत: कुठल्याही पुस्तकाचा अनेक दृष्टींने विचार करता येतो. काही पुस्तके सामाजिक, (राजकीय आणि सांस्कृतिकही) दृष्टीने महत्त्वाची असतात. म्हणूनच समाजशास्त्रज्ञ, राजकीय विश्लेषक साहित्याच्या आधारे काही निष्कर्ष काढतात. याचा अर्थ अशी पुस्तके वाङ्‌मयीन दृष्टीने विचार करण्यासारखी नसतात, असे मात्र नाही. ती वाङ्‌मयीन गुणवत्तेच्या दृष्टीनेही सरस असतात. 

अनेक दृष्टींनी महत्त्वाच्या असणाऱ्या पुस्तकाच्या संदर्भात येथे लिहावयाचे आहे. ते पुस्तक म्हणजे ॲड.के.डी.शिंदे (सांगली) यांनी लिहिलेले ‘बालंट’. 

‘बालंट’ ही दीर्घ कथा किंवा लघुकादंबरी आहे. इनमिन सत्तर-बहात्तर पानांची ही दीर्घ कथा आहे. पण त्यातून प्रकट होणाऱ्या जीवनाचे भयप्रद रूप पाहून आपल्या भोवतीच्या समाज-वास्तवातील हिंस्रतेचे, संवेदनहीनतेचे प्रत्यंतर येते. आपण आतून थरकून जातो. 

ॲड.के.डी. शिंदे सांगलीच्या सामाजिक जीवनातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व. शेतकरी, मजूर यांच्यासाठी काम करणारे. प्रागतिक चळवळीत हिरीरीने भाग घेणारे. प्रबोधनपर स्वरूपाचे काही लेखन करणारे. ‘कॉ.पानसरेंचा खून का झाला?’, ‘कोण होते डॉ.दाभोलकर, कॉ.पानसरे, प्रा.कलबुर्गी?’ अशा काही पुस्तिकांचे लेखन त्यांनी केले आहे. परंतु ललित लेखन त्यांनी केले आहे, असे दिसत नाही. किंबहुना ही त्यांची पहिलीच दीर्घ कथा. पाच-सात वर्षांपूर्वी घडलेल्या सत्य घटनेवरती लिहिलेली. शिवाय या दीर्घ कथेतील व्यक्ती सांगली-कोल्हापूर पट्ट्यातील. त्या आपापल्या क्षेत्रांत काम करीत आहेत. परंतु काही वर्षांपूर्वी त्यांना महाराष्ट्र पोलिसांमुळे जीवघेण्या अनुभवाला सामोरे जावे लागले. निरपराध सामान्य माणसांच्या आयुष्यात विष कालविण्याचे प्रयत्न व्यवस्था कशी करते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे शिंदे यांनी न राहवून ही दीर्घ लिहिली आहे, असे म्हणता येईल. 

लिहिल्याशिवाय राहवतच नाही, अशी मन:स्थिती झाल्याशिवाय लिहू नये असे म्हटले जाते. शिंदे यांची एकूण प्रकृती पाहता, त्यांच्या दृष्टीने हे लेखन करणे अपरिहार्य झाले असणार. म्हणून तर ही दीर्घ कथा वाचकांच्या मनात असंख्य विचारांचे काहूर उठवते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे अशा अनुभवांना सामोरे जाणारे किती लेखक मराठीत आहेत? 

गरिबीशी झुंज देत शिकणारे, उपजीविकेसाठी छोट्या नोकऱ्या करणारे, समाजात परिवर्तन झाले पाहिजे, यावर ठाम असणारे, त्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक चळवळींशी निगडित असलेले सांगली, कोल्हापूर भागातील चार तरुण पुस्तक विक्रीसाठी नागपूरच्या दीक्षाभूमीकडे असतात. परिवर्तनाशी बांधिलकी असणारे तरुण जिथे कुठे चर्चा, सभा, परिसंवाद, भाषणे असतील तिथे प्रबोधनपर पुस्तकांचे स्टॉल लावून बसायचे. त्यातून त्यांना जगण्यासाठी आधार व्हायचाच. पण आपण चळवळीसाठी काही करतो आहोत, याचे समाधानही असायचे. 

नागपूरच्या दीक्षाभूमीवर हजारो परिवर्तनवादी जमतात, तेव्हा तिथे खूप विक्री होईल, अशी स्वप्ने रंगवीत हे चार तरुण कोल्हापूरहून सुटणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये आपल्या पुस्तकांचे गठ्ठे सांभाळीत बसतात. कोल्हापूर ते नागपूर चोवीस-पंचवीस तासांचा प्रवास. या प्रवासात या चौघांच्या अखंड गप्पा सुरू असतात. चौघेही ध्येयवादाने भारावलेले. तेव्हा स्वाभाविकपणेच समाज परिवर्तनासंबंधी अखंड गप्पा सुरू असतात. फुले, शाहू, आंबेडकर, समाजपरिवर्तन, त्यासाठीचे प्रबोधन आणि चळवळी हेच त्यांच्या गप्पांचे विषय असतात. 

अखंड गप्पा चालू आहेत. सारेच तरुण भारावलेले आहेत. या गप्पातील विषय कुणी तरी नागपूर पोलिसांना कळविते. नागपूर पोलीस एकदम सजग होतात. रेल्वे नागपूरच्या अलीकडे असलेल्या अजनी स्टेशनवर येते आणि धाडधाड दहा-पंधरा पोलीस डब्यात शिरतात. त्यांना त्यांच्या पुस्तकांसह अटक करतात. हे चारही तरुण भांबावून जातात. आपल्याला का अटक केली त्यांना कळत नाही. त्यांना पोलीस स्टेशनला आणले जाते. त्यांच्या पुस्तकांची झडती घेतली जाते. त्यात साने गुरुजींचे पुस्तक आहे. त्यात त्यांची कविता आहे... ‘आता पेटवू सारे रान...’ हे सारे पेटवायला निघालेले आहेत, असा निष्कर्ष पोलीस काढतात. 

कर्डकांच्या ‘‘सांगा आम्हांला बिर्ला, बाटा, टाटा कुठं हाय ओ? सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठं हाय ओ?’’ या ओळींनी त्यांना दरोडेखोर ठरवले जाते. एकंदरीत हे सारे नक्षलवादी आहेत, असा निष्कर्ष काढून त्यांच्यावर खटला दाखल केला जातो. देशावरील एक फार मोठे संकट आपण टाळले, या आनंदात पोलीस त्यांना कोठडीत टाकतात. हा सगळा प्रकार काय आहे, हे या भांबावलेल्या पोरांना काहीच कळत नाही. ते हतबल आहेत. गावापासून दूर आहेत. मदतीला कोणीच नाही. 

दोन दिवसांनी कोर्टापुढे त्यांना सादर केले जाते. चौकशीसाठी प्रथम पोलीस कस्टडी, नंतर न्यायालयीन कस्टडी, दोन्ही ठिकाणी छळ चालू आहे. पोलीस गावाकडे फोन करू देत नाहीत. त्यासाठी संघर्ष करावा लागतो. कायदेशीर तरतूद दाखवावी लागते. मग कुठे फोन करू दिला जातो. मग महाराष्ट्रभर बातमी पसरते. नागपूरपासून सांगली-कोल्हापूरपर्यंत सामाजिक कार्यकर्ते या प्रकारचा निषेध करायला लागतात. हा सगळाच खोटा, बनावट प्रकार आहे, हे साऱ्यांच्या लक्षात येते. पण काही उपयोग होत नाही. ही चारीही मुले तुरुंगात सडत राहतात. जेल आणि पोलीस प्रशासन यांच्या अभद्र युतीतून त्यांचा छळ होत राहतो. वस्तुत: आरोप सिद्ध झाल्याशिवाय कुणीही गुन्हेगार नसतो. परंतु याचे भान ना पोलिसांना असते ना जेल प्रशासनाला. या पोरांचे हाल सुरू होतात. पैकी एकाचे वजन वीस किलोने कमी होते. त्याला चालताही येत नाही, तरीही छळ चालूच आहे. अंडा सेलमध्ये त्यांना पाठविण्याची भीती घातली जात आहे. निराधार, बेवारस, निष्पाप तरुणांना काय करावे तेच कळत नाही. पण नागपूरमधले काही वकील मदतीला येतात आणि या चारही तरुणांना जामीन मंजूर होतो. म्हणजे त्यांचे नष्टचर्य संपले असे होत नाही. पुढे साडेचार वर्षे नागपूर कोर्टात खटला चालू राहतो. कोल्हापूर, सांगलीहून हे तरुण चार-पाचशे रुपये खर्च करून, तीन दिवसांचा येण्या-जाण्याचा प्रवास करून दर तारखेला नागपूरला जातात. हजेरी लावून परत येतात. सारेच दरिद्री. कुठून कुठून उसनेपासने करून त्यांना जावे लागते. 

या काळात पोलीस तपास सुरू होतो. या पोरांच्या गावात पोलीस शिरतात. धाकधपटशा दाखवतात. घरात काही सापडत नाहीच, पण गावात पोरांबद्दल संशय निर्माण होतो. पोरं ज्या वसतिगृहांमध्ये राहत होती, तिथे छापे मारतात. वसतिगृहात धाक निर्माण करतात. महाराष्ट्रभर नक्षलवादी सापडल्याच्या बातम्या येततात. पोलीस आपण फार मोठा पराक्रम केल्याच्या थाटात वावरत राहतात. 

ठिकठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आंदोलने करतात. शासनाला निवेदने देतात. राज्यकर्त्यांना भेटतात. पण गोरगरिबांच्या मतांवर निवडून येणारे राज्यकर्ते ‘कोर्टात केस आहे, निकाल लागू द्या’, असे म्हणून हात वर करतात. या गरीब, दलित पोरांकडे बघण्याचे कारण तरी काय, असाच त्यांचा दृष्टिकोन असतो. शेवटी हतबल होऊन सारे कार्यकर्ते कोर्टात केस लढविण्याचा निर्णय घेतात. नागपूरचे सुप्रसिद्ध वकील सुरेंद्र गडलिंग आणि त्यांचे सहकारी ॲड. अशोक काळे मदत करतात. 

साडेचार वर्षांनंतर खटल्याचा निकाल लागतो. हे सारे तरुण निर्दोष आहेत, असे न्यायाधीश जाहीर करतात. न्यायाधीश पुष्कळशा तांत्रिक बाबींचा आधार घेतात. जी पुस्तके जप्त केली आहेत, त्यावर शासनाने बंदी घातलेली नाही, हाही मुद्दा न्यायाधीशांना महत्त्वाचा वाटतो. हे सारे तरुण निर्दोष सुटतात. पण तुरुंगात झालेल्या छळाचे काय? साडेचार वर्षे आर्थिक तणावात प्रवास केला, त्याचे काय? समाजात त्यांची प्रतिमा मलिन झाली, त्याचे काय? या तरुणांच्या घरच्या साऱ्यांचे मन:स्वास्थ्य हरवले, त्याचे काय? (एकाच्या आईचा डोळाच या साऱ्या तणावामुळे जायबंदी होतो.) पोलिसांनी व जेल प्रशासनाने केलेल्या मारहाणीचे काय? आणि हे सारे कशासाठी? कोणत्या गुन्ह्यासाठी? प्रबोधनपर पुस्तके विकणे, परिवर्तनाबद्दल चर्चा करणे, हा गुन्हा आहे काय? असे एक नाही, हजारो प्रश्न उपस्थित होतात. किंबहुना असे प्रश्न उपस्थित होणे, ही या दीर्घ कथेची मोठीच फलश्रुती आहे. 

हे सारे तरुण स्वकष्टाने आपले शिक्षण करून जीवन उभारू इच्छिणारे तरुण आहेत. त्यांच्यावर किती मोठा अन्याय केला गेला, ते लक्षात यावे म्हणून लेखक दीर्घ कथेच्या प्रारंभी प्रत्येकाच्या जीवनाची वाटचाल विस्ताराने सांगतात. त्यापैकी एक आहे, बाबू सायमोते. हा सांगली जवळच्या कसबे डिग्रजचा. घरी एक एकर शेती व खाणारी तोंडे नऊ. बाबू लहान असतानाच बाप मरतो. विधवा आई कसा तरी संसार रेटते. गावात पाचवी-सहावी झाल्यानंतर हा कुंडलला क्रांतिसिंह नाना पाटील वसतिगृहात दाखल होतो. कुंडलला सिनेमागृहात काम करून शिकत राहतो. चटकन नोकरी लागावी म्हणून आय. टी. आय. करतो, पण कुठे नोकरी लागत नाही; म्हणून मिस्त्रीच्या हाताखाली पडेल ते काम करीत बारावी होतो. सांगलीला बी.कॉम.साठी येतो. छात्रभारतीत काम करायला लागतो. जगण्यासाठी पुस्तकांचा फिरता स्टॉल लावत कसा तरी जगत राहतो. शिकत राहतो. 

दुसरा तरुण आहे बापू पाटील. माणगावच्या दुष्काळी पट्ट्यातील लिंगीवरेचा. त्याचे वडील हा सातवीत असतानाच वारले. आईनं चार मुली आणि एक मुलगा वाढविला. पुढे एक बहीणही वारते. बापू चौथीत असताना नागनाथ आण्णा नाईकवाडी यांच्या पाणीप्रश्नावरील आंदोलनात सामील होतो. शिकताना माणगंगा पुलावर पाणी मारण्याचं काम करतो. शाळा आणि हे दमछाक करणारं काम करीत दहावी होतो. पुढे आटपाडीला येऊन अकरावी, बारावी कॉमर्स करतो. परंतु दारिद्र्यामुळे मेव्हण्याने विष घेतल्यामुळे बापू पाटलाची परीक्षा बुडते. या काळात तो एस.एफ.आय. या विद्यार्थी संघटनेत काम करू लागतो. पुढे कॉमर्सचा नाद सोडून हा सांगलीच्या महाविद्यालयात बी.ए.ला प्रवेश घेतो. शिकण्यासाठी आणि जगण्यासाठी चाटे कोचिंग क्लासेसमध्ये साफसफाईपासून सर्व कामे करतो. याच काळात तो बाबा सायमोतेबरोबर ‘छात्रभारती’मध्ये काम करायला लागतो. (कारण सांगलीला तो एस.एफ.आय.चा एकटाच असतो.) तसेच लोकजागृतीपर पथनाट्येही करीत असतो. बाबाबरोबर पुस्तकांचा फिरता स्टॉलही चालवतो. 

तिसरा तरुण दिनकर कांबळे. कोल्हापूरजवळच्या राधानगरी या डोंगराळ तालुक्यातील कान्होळी या गावचा. दलित असल्याने गावकुसाबाहेर घर. घरात अठरा विश्वे दारिद्र्य. तरी बाप मारोती एक अपंग मुलगी आणि दोन मुलांना जिद्दीने शिकवीत राहतो. परंतु अपंग मुलगी आणि मोठा मुलगा दहावीला नापास होतात. आता दिनकरला तरी  कशासाठी शिकवायचे, असे बापाला वाटत राहते. तरीही दिनकर कसा तरी अनेक गावे फिरून तिथल्या शाळांमधून दहावी होतो. आजोबांनी दिनकरला थोडे पैसे देऊन कोल्हापूरला पाठविले. तिथे तो ‘जनस्वास्थ्य दक्षता’ समितीत काम करायला लागतो. हाताने स्वयंपाक करून शिकायला लागतो. एस.टी.डी.बूथ, हॉटेल आदी ठिकाणी पडेल ती कामे करतो. याच काळात निर्मिती प्रकाशनचे अनिल म्हमाणे यांची भेट होते. त्यांच्या पुस्तकविक्रीच्या व्यवसायात दिनकर मदत करायला लागतो. दरम्यानच्या काळात सुरेश शिपुरकरांनी त्याच्यातील कार्यकर्त्याला हेरलेले असते. मग दिनकर कांबळे सामाजिक चळवळीत काम करीत आकाशवाणीवर व्याख्यानेही द्यायला लागतो. 

या तिन्ही तरुणांमध्ये काही साम्ये आहेत. दारिद्र्य, शिकण्याची प्रबळ इच्छा, सामाजिक परिवर्तनाची तीव्र आस, त्यासाठी कुठल्यातरी संघटनेत काम, जगण्यासाठी कठोर परिश्रम आणि स्वत:च्या पायांवर उभे राहण्याची धडपड ही साम्ये तर आहेतच, पण त्यांच्या आयुष्यात आंदोलन करणारी माणसे तरी आली किंवा सेवाभावी संस्था तरी आल्या. त्यातून त्यांची व्यक्तिमत्त्वे घडत गेली. 

ठिकठिकाणी पुस्तकविक्रीचे स्टॉल लावणे हा त्यांच्या उपजीविकेचा भाग तर होताच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे परिवर्तनासाठी प्रेरित करणारीच पुस्तकांची विक्री ते करताना दिसतात. 

अशा प्रकारे बाबा आणि बापू सांगलीमध्ये पुस्तकविक्री करताहेत, तर दिनकर कांबळे आणि अनिल म्हमाणे कोल्हापूरमध्ये पुस्तके विकण्याचे काम करताहेत. अनिल म्हमाणे हे स्वत: प्रकाशक आहेत. परंतु ते कुठलीही पुस्तके प्रकाशित न करता केवळ प्रबोधनासाठी प्रेरणा देतील अशीच पुस्तके प्रकाशित करतात. 

हे चौघेही नियोजन करून महाराष्ट्र एक्स्प्रेसने नागपूरकडे निघतात आणि त्यांच्यावर बालंट आणले जाते. व्यवस्था आणि या व्यवस्थेत काम करणारे मस्तवाल लोक किती हिंस्रपणे गोरगरिबांना स्वत:च्या व्यक्तिगत फायद्यासाठी बळीचा बकरा बनवत असतात, याचा तीव्र प्रत्यय या दीर्घ कथेतून/लघुकादंबरीतून येतो. ही सगळीच परिस्थिती भारतीय समाजव्यवस्थेवर झगझगीत प्रकाश टाकते. 

या तरुण मुलांच्या आयुष्याचे धिंडवडे काढणाऱ्या व्यवस्थेसंबंधीचे लेखकाचे चिंतनही महत्त्वाचे आहे. किंबहुना या चिंतनामुळेच ही लघू कादंबरी अर्थपूर्ण बनत जाते. व्यवस्था, पोलीस प्रशासन, न्यायालय व शासन यासंबंधी शिंदे यांनी वेळोवेळी प्रकट केलेले चिंतन महत्त्वाचे आहेच, पण कादंबरीच्या अर्थवत्तेमध्ये मोठी भर घालणारे आहे. त्यातील काहींचा येथे निर्देश करावासा वाटतो. 

‘‘आपलं पोलीस खातं तसं औरच आहे. सराईत गुंडांसमोर ते कायम नांगी टाकतात. पांढऱ्याधोट कपड्यांत वावरणाऱ्यांना ते सॅल्यूट मारतात. दोन नंबरचे धंदेवाले यांचे सगेसोयरे असतात... त्यांना चेव येतो, तो सामान्य माणून कुठं सापडला तरच. वांग्याचा भोपळा करण्यात पोलीस खात्याचा हात कुणी धरणार नाही...’’ (पृ.44) 

‘‘नागपूरच्या कारागृहात अनिल व बाबा या दोघांसहित चौदा आरोपींवर नक्षलवादाशी संबंध असणारा आरोप होता... जोपर्यंत कोर्टात आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत त्यास निष्पापच समजण्यात यावे, अशी कायद्याच्या पुस्तकात तरतूद आहे; परंतु ही तरतूद कागदावरच आहे. त्या तरतुदीशी महाराष्ट्रातील पोलीस खात्याचा आणि तुरुंग खात्याचा काडीचाही संबंध नाही. ही दोन्हीही खाती आरोप असलेल्या कैद्याला माणूस समजत नाहीत...’’ (पृ.67) 

‘‘भारत स्वतंत्र होऊन 65 वर्षे झाली, तरीही आपली न्यायव्यवस्था इंग्रजांनी घालून दिलेल्या नियमानुसारच चालते. आरोपीने गुन्हा केला आहे किंवा नाही, याची शहानिशा न करताच त्यास केवळ संशयावरून अटक करून त्याच्यावर खटला दाखल केला जातो. नेमलेल्या प्रत्येक तारखेस आरोपीने हजर राहिलेच पाहिजे, असा दंडकच आहे. ज्या दिवशी खटल्याचं काम चालणार नाही, त्या दिवशी वास्तविक आरोपींना गैरहजर राहण्याची मुभा कायद्यात पाहिजे होती...’’ (पृ.72) 

प्रस्थापित व्यवस्थेचे अंतरंग उघडे करताना लेखक लिहितात- ‘‘...तशी ती चौघंही भाबडीच होती. कपटनीतीचा व्यवहार त्यांना माहीत नव्हता. ते विक्री करणाऱ्या पुस्तकातून व्यवस्था-बदलाचा संदेश जात होता. विषमतेविरुद्ध वातावरण तयार होत होते. समाजातील विषमता, दारिद्र्य, अंधश्रद्धा हेच काहींचं जगण्याचं प्रमुख साधन असतं. केवळ विषमतेवरच त्यांचं दुकान चालतं. अंधश्रद्धा हीच त्यांची रोजगार हमी असते. प्रबोधनापासून समाज जितका दूर राहील, तितका त्यांचा फायदा असतो. स्वत: कोणतेही शारीरिक श्रम न करता दुसऱ्याच्या श्रमावर पिढ्यान्‌पिढ्या आयतं खाणाऱ्यांना समाजजागृती नको असते...’’ (पृ.43)  

या लघु कादंबरीला/दीर्घकथेला लेखकाने एक छोटेसे निवेदन जोडले आहे. त्यातील त्यांचे पुढील चिंतन फार महत्त्वाचे आहे. किंबहुना तोच कादंबरीचा कणा आहे. 

‘‘...भारतात स्वातंत्र्यानंतरचे कायदे हे शोषण थांबवण्यासाठी केलेले आहेत, परंतु या कायद्यांचा दुरुपयोग करून शासनव्यवस्था कार्यकर्त्यांचे ‘कायदेशीर’ शोषण करीत असल्याच्या घटना समाजात सतत घडतात. ‘परिवर्तनाच्या नादी लागाल तर खबरदार!’ अशी उघडउघड दरडावणी शासनयंत्रणा देत असेल, तर त्याचा मुकाबला करताना किती मोठा संघर्ष करावा लागतो... परिवर्तनाची वाट शासनपुरस्कृत शोषणातून जाते...’’ (बालंट, मनोगत) 

आपली दीर्घकथा अधिक प्रभावी करावी यासाठी लेखक काहीही क्लृप्त्या करीत नाहीत की प्रयोगशील निवेदन पद्धती आदीच्या आश्रयाला जात नाहीत. कारण मुळात हा अनुभवच इतका दाहक आहे की, त्याला अशा कुठल्या गोष्टींची आवश्यकता वाटत नाही. तसेच हा दाहक अनुभव लेखकाच्या वेळोवेळी प्रकटलेल्या चिंतनांमुळे अधिक प्रभावी होत जातो. 

कादंबरीतील प्रमुख व्यक्तिरेखांशिवाय त्यांचे कुटुंबीय, बापूसाहेब मकदूम अशा काही व्यक्तिरेखा या दीर्घ कथेला अधिक प्रभावी करतात. मैलकुलींच्या पैशांतून उभ्या राहिलेल्या ‘कष्टकऱ्यांची दौलत’ या इमारतीला या दीर्घ कथेत एक प्रतीकात्मक स्थान प्राप्त होते. एकंदरीत, अगदी थोडक्या भाषिक अवकाशात एका व्यापक आणि दाहक अनुभवाचा पट प्रत्ययकारी करण्यात लेखक ॲड. के. डी. शिंदे यांना यश प्राप्त झाले आहे, असे म्हणावे लागते. 

‘बालंट’ ही दीर्घ कथा काळाच्या ओघात अधिकाधिक अर्थपूर्ण होत चालली आहे, असे दिसते. आज भारतभर समाज-परिवर्तनासाठी झटणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांना, पत्रकारांना, विचारवंतांना आणि लेखकांना विविध गुन्ह्यांखाली पकडून तुरुंगात डांबण्यात आले आहे. वर्षानुवर्षे ते तुरुंगात खितपत पडून आहेत. व्यवस्था किती हिंस्र होऊ शकते, ते आपण पाहत आहोत. परंतु या चार तरुणांना अटक झाली, तेव्हा महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांत आंदोलने-निदर्शने झाली; परंतु आज मात्र सारे शांत आहे. 

जणू कसल्या तरी अनामिक भीतीच्या छायेखाली सारी जनता वावरते आहे! कार्यकर्ते, विचारवंत शांत आहेत. उद्याच्या भीषण भविष्याची ही नांदी आहे. 

‘बालंट’च्या निमित्ताने आणखी काही बाबी मांडल्या पाहिजेत. त्या अशा की, आपली पोलीस यंत्रणा असेल किंवा प्रशासन यंत्रणा असेल, त्यांना कुठलीच सामाजिक जाणीव असते, असे दिसत नाही. त्यामुळे ती स्वार्थात, भ्रष्टाचारात गळाभर बुडालेली असते. (अपवादात्मक भ्रष्ट नसलेले काही अधिकारी असतात, हे मला माहीत आहे.) तेव्हा त्यांच्यामध्ये सामाजिक जाणिवा विकसित व्हाव्यात यासाठी त्यांच्या प्रशिक्षणात काही बदल होण्याची आवश्यकता आहे. नाही तर येणाऱ्या काळात या व्यवस्थेचे सडणे वाढून दुर्गंधी सुटायला लागेल. 

नक्षलवादाच्या आरोपातून आरोपींना मुक्त करताना मुख्यत: तांत्रिक गोष्टींचे साहाय्य न्यायिक यंत्रणा घेताना दिसते. परंतु साने गुरुजी, कर्डक, फुले, आंबेडकर, मार्क्स हे कलावंत, विचारवंत आहेत, त्यांचा नक्षलवादाशी काय संबंध, असे झडझडून न्यायिक यंत्रणा विचारताना दिसत नाही. तेव्हा प्रशासन यंत्रणेबरोबरच न्यायिक यंत्रणेलाही सामाजिक जाणिवा विकसित करण्याच्या प्रशिक्षणाची गरज आहे, असे वाटते. तसेच काव्य, साहित्य, वैचारिक साहित्य आदी बाबींचा परिचय न्यायिक यंत्रणेसह प्रशासनास असणे गरजेचे वाटते. त्याशिवाय या यंत्रणेतील लोकांची जीवनविषयक समज विकसित होणार नाही. 

अगदी शेवटचा एक मुद्दा मांडल्याशिवाय या दीर्घ कथेवरील हे विवेचन पूर्ण होणार नाही. खरे म्हणजे हा मुद्दा पुढच्या बृहद्‌ कादंबरीचा विषय आहे. तो मुद्दा असा की, या चार निष्पाप तरुणांची नक्षलवादाच्या आरोपातून ज्यांनी सुटका केली, ते ॲड.गडलिंग हे सध्या देशविरोधी कारवाया केल्या, म्हणून तुरुंगात आहेत. 

बालंट 
लेखक : ॲड. के. डी. शिंदे 
प्रकाशक : राहुल थोरात 
सम्यम पब्लिकेशन्स, अभयनगर, सांगली 
स्वागत मूल्य : 100 रुपये.   

Tags: वाङ्मय लघुकादंबरी मराठी कथा बालंट साहित्य मराठी पुस्तक नवे पुस्तक weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके