डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

साने गुरुजींच्या साहित्यसमीक्षेची समीक्षा

साने गुरुजींच्या लेखनात तांत्रिक दोष अनेक आढळतील. पण सात्त्विक आनंद देऊन भारावून टाकण्याची मांत्रिक शक्ती, त्यांची मराठी संस्करांनी भिजलेली शब्दकळा, तन्मयतेने-तळमळीने आणि आंतरिकतेने आर्द्र झालेली भाषा; वैदिक साहित्याच्या परंपरेपासून लोकसाहित्याच्या अनागर संस्कारांपर्यंत सर्व काही पचवून आतून समृद्ध- पण वरून भोली वाटणारी वाक्संहिता सहृदय मनाचा ठाव घेते. 

मराठी साहित्यसमीक्षा किती गतानुगतिक आहे. परप्रत्ययी आणि परावलंबी आहे हे पाहावयाचे असेल तर साने गुरुजींच्या साहित्यावर लिहिली गेलेली समीक्षा वाचून पाहावी. साने गुरुजींच्या साहित्यावर गेल्या पन्नास वर्षांत लिहिली गेलेली समीक्षा पाहताना तिच्यातील अनेक वृत्ती-प्रवृत्ती आपल्या लक्षात येतात. विशेषणांमध्ये हरवून जाणारी, भाबड्या आस्वादात रमणारी, थोरामोठ्यांच्या कायम दबावात राहणारी आणि म्हणूनच स्वतःची निर्मितिशीलता हरवून बसलेली मराठी समीक्षा स्वतःच निर्माण केलेल्या भोवऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे कशी फिरत राहते ते आपल्या लक्षात येते. कधी कधी ती अतिवैयक्तिक होते आणि मूल्यांच्या वैश्विकतेच्या गप्पा करू लागते. त्यामुळेच साहित्यातील नेमके प्रश्न जशी ती टाळते, त्याप्रमाणेच समकालीन साहित्याची चिकित्सा करण्याचे कारणही तिला वाटत नाही. समीक्षा लिहीत असताना कलाकृती, कलाकृतीमागे असणारे लेखकाचे व्यक्तिमत्त्व आणि समग्र कालपट समजावून घेण्याची गरज असते. याचे भान नसल्यामुळे उथळ रूप धारण करणारी ही समीक्षा एखाद्या संदर्भात काही नवा विचार करता येतो का याची शक्यताही अजमावून न पाहणारी अशी आहे. स्वतःभोवती मर्यादित परीघ आखून देऊन स्वतःचाच उदोउदो करणारी ही समीक्षा म्हणूनच साहित्य संस्कृतीबद्दल आपल्या मनात चिंता निर्माण करते. कधी कधी एखाद्या लेखकावर कुठला तरी शिक्का मारून त्याला कायम हद्दपार करण्याची विलक्षण हातोटीही मराठी समीक्षेने आत्मसात केली आहे. आणि या साऱ्या मराठी समीक्षेच्या ‘कसबा’ला बळी पडलेले लेखक म्हणजे साने गुरुजी! 

वस्तुतः साने गुरुजी हे आपल्या लेखकपणाचा दावा न करणारे अतिशय सरळमार्गी लेखक होते. प्रखर राष्ट्रभक्ती, सेवापरायणता आणि शोषितांविषयीची कळकळ ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विलोभनीय वैशिष्ट्ये होती. म. गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक खोल ठसा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर उमटलेला होता. या प्रांजळ व्यक्तिमत्त्वाचा उत्कट आविष्कार त्यांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होतो. असे हे वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व मराठी समीक्षेला समजून घेणे गरजेचे वाटले पाहिजे होते. परंतु तसे झाले नाही. त्यांचे साहित्य, त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या निष्ठा या मराठी समीक्षकांना कधीच फारशा कळल्या नाहीत. म्हणून वाचकांमध्ये लोकप्रिय, परंतु मराठी समीक्षकांना मात्र अप्रिय असे लेखक म्हणजे साने गुरुजी होत असे म्हणावे लागते. 

टालस्टॉय जवळचा वाटला

अर्थात साने गुरुजी यांच्या साहित्याविषयी लिहिल्या गेलेल्या समीक्षेचा आढावा घेणे ही काही सोपी गोष्ट नाही. कारण 1945 पासून आजतागायत साने गुरुजी यांच्याविषयी लिहिले जात आहे. साने गुरुजींनी 'श्यामची आई' या आपल्या पहिल्याच कादंबरीने मराठी साहित्यात एक नवीन वाट निर्माण केली. प्रभावी लेखनाबरोबरच साहित्यासंबंधीची भूमिका मांडणेही त्यांना गरजेचे वाटले असणार. अर्थात साने गुरुजींनी अशी भूमिका फार कमी ठिकाणी प्रकट केली. ते स्वतः गांधीवादी होते. साहित्य हे श्रेष्ठ मूल्यांच्या उत्थापनासाठी असावे अशी त्यांची भूमिका होती. यातूनच टॉलस्टॉय त्यांना जवळचा वाटला असणे स्वाभाविक आहे. त्यांनी टॉलस्टॉय याच्या 'व्हॉट इज आर्ट’ या ग्रंथाचा अनुवाद केला. त्याला त्यांनी एक प्रस्तावना लिहिली आहे आणि आपली वेगळी भूमिकाही मांडली आहे. साने गुरुजींची ही प्रस्तावना त्यांच्यावरील प्रतिकूल टीकेला प्रारंभ करणारी ठरली. आणि साने गुरुजी यांच्यावरील समीक्षेचे पहिले पर्व सुरू झाले.  

आपल्या या प्रस्तावनेत साहित्याचे प्रयोजन काय असावे, याची चर्चा, चिकित्सा तर त्यांनी केली आहेच. पण त्यात त्यांनी अमराठी साहित्यासंबंधीची आपली मतेही मांडली आहेत. मराठी साहित्याच्या स्थितिगतीबद्दल बोलत असताना त्यांनी लिहिले आहे… "गेल्या शंभर-पाऊणशे वर्षांतील कोणते मराठी पुस्तक खेड्यांपर्यंत पोचले आहे? खरे राष्ट्राचे असे एकच पुस्तक जन्मले नाही. महाराष्ट्राचे राष्ट्रीय ग्रंथ कोणते? राष्ट्रातील बहुजन समाज जे ग्रंथ वाचतो, राष्ट्रातील बहुजनांच्या जीवनाला जे ग्रंथ वळण देतात, राष्ट्रातील बहुजन समाज ज्या ग्रंथांना पूज्य मानतो ते राष्ट्रीय ग्रंथ होत. ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, श्रीधराचे व महिपतीचे ग्रंथ हेच महाराष्ट्राचे अजून राष्ट्रीय ग्रंथ आहेत. आजच्या जमान्यातील कोणते पुस्तक खेडयापाडयांतील जनतेच्या हृदयात शिरलं आहे? खेडयापाडयांतील जनता हाच खरा महाराष्ट्र आहे. दहावीस शहरे म्हणजे महाराष्ट्र नव्हे. लाखो खेड्यांतून कोणत्या पुस्तकाचा प्रवेश झाला आहे? महाराष्ट्राचे आवडते कवी व आवडते कादंबरीकारांचे कोणते काव्य, कोणती कादंबरी या खऱ्या महाराष्ट्रात गेली आहे ? महाराष्ट्राचे आवडते याचा अर्थ चार सुशिक्षितांचे आवडते, यापेक्षा अधिक काही नाही. खरा महाराष्ट्र या कादंबरीकारांनी व कवींनी पाहिला नसतो. या खऱ्या कष्टाळू व श्रमिक महाराष्ट्राबद्दल त्यांना आदर नसतो, प्रेम नसते, त्याचे काय? कवी व कादंबरीकार ते काय म्हणून होतील? 
साने गुरुजींनी सांगितलेल्या परिस्थितीत आजही फार फरक पडलेला आहे असे नाही. 

साने गुरुजींनी आपल्या या प्रस्तावनेत बहुजन समाजाच्या भावभावनांना महत्त्व दिले आहे. त्यांना समजेल अशा भाषेत लिहिले पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला आहे. बहुजन समाजवाद यांचा आज संबंध राहिला नाही, हे दुःख त्यांनी बोलून दाखविले आहे. किंबहुना त्यात एक द्वैत निर्माण झाले आहे असे त्यांना वाटते. म्हणून पुढे ते लिहितात, "...परंतु अर्वाचीन कलावान ज्याप्रमाणे अर्वाचीन धार्मिक भावना देत नाहीत, त्याप्रमाणे सामान्य लोकांच्या सुखदुःखांच्या भावनाही रंगवीत नाहीत... तुमच्या रागिण्या व तुमच्या दौलती यांचे बहुजन समाज काय होय? तुमचे उच्च काव्यशास्त्र, विनोद, तुमचे सुसंस्कृत वैषयिक सुखविलास त्याला त्यांतील काही समजत नाही. या कादंबऱ्यांतील वातावरण ते ग्रहण करू शकत नाहीत. सिनेमातील नटांची नावे, चिरुटांची नावे, वस्तऱ्यांची नावे, तेलांची नावे, कोटाच्या आणि केसांच्या कटांचे प्रकार- त्याला काही समजत नाही... हे सारे वातावरण कोठले आहे हे समजत नाही. दुर्दैव त्याचे! त्याच्यासाठी संस्कृती नाहीच. डुकराला मोत्यांचा चारा काय उपयोगी ? तो राजहंसानीच सेवावा!"अशी मराठी साहित्याची मीमांसा करून लेखकांनी बहुजन समाजाभिमुख व्हावे असे ते सांगतात. तसेच महापुरुषांच्या विचारांचे प्रतिपादनही साहित्याने केले पाहिजे, असेही त्यांनी आपल्या या प्रस्तावनेत सांगितले आहे. त्यांची ही प्रस्तावना आजही चिंतनीय आहे. 

असेच विचार त्यांनी पुढे साहित्य आणि संस्कृतीचा अनुबंध स्पष्ट करताना मांडले आहेत. "आबालवृद्धसुबोध असे शब्द श्री ज्ञानेश्वरांनी लिहिले. त्यांच्यासमोर सारा समाज होता. केवळ प्रतिष्ठित लोक नव्हते. विनोबांनी गीताई लिहिली. आश्रमातील मुलींना अनुवाद समजा तर पास, नाही तर नापास- अशी अवघड कसोटी त्यांनी लावली... महाराष्ट्रात दोन लाख गीताई खपली. परंतु कोणा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला तिचा उल्लेख करावा असे वाटले नाही. जे ग्रंथ जनतेपर्यंत जाऊन पोचतील ते राष्ट्रीय ग्रंथ. तुमची पुस्तके गेली आहेत का जनतेपर्यंत? ती जनतेसाठी आहेत का?... तुम्हां साहित्यिकांचाही जनता देव होवो. जनतेचे स्वरूप काय, तिचे सुखदुःख, तिच्या गरजा यासाठी तुमचे वाङ्मय असो."

याचा अर्थ असा की गुरुजींनी साहित्यासंबंधीची वेगळी भूमिका मांडली. नकळतपणे गांधीवादाचाही पुरस्कार त्यांनी केला आणि हीच गोष्ट मराठीतल्या काही लेखक-समीक्षकांना रुचणे शक्य नव्हते. परिणामतः श्री. के. क्षीरसागर यांनी साने गुरुजींवर पहिली तोफ डागली. श्री. के. क्षीरसागर यांनी फेब्रुवारी 1945 च्या ‘समीक्षक’च्या अंकात ‘कला म्हणजे काय?’ या पुस्तकावर लिहिले आहे. त्यात त्यांनी टॉलस्टॉय यांची भूमिका तर्कदुष्ट आहे. सबब आपणांस मान्य नाही, हे तर जाहीर केलेच आहे; पण साने गुरुजींच्या प्रस्तावनेबद्दलही त्यांनी काहीसे खालच्या पातळीवर उतरून लिहिले आहे. ते म्हणतात, "टॉलस्टॉयसारख्या श्रेष्ठ कलावंतांचेही कलेसंबंधी केवढे गैरसमज! एवढे भय! तर बिचाऱ्या साने गुरुजींनी सदर ग्रंथाच्या प्रस्तावनेत व्यक्त केलेल्या मताची आणि भीतीची गत काय वर्णावी? कलावंतांना ते आजच्या महापुरुषांची चरित्रे लिहा, त्यांनी दिलेले मंत्र गोष्टीरूपाने रंगवा, असा उपदेश करतात आणि प्रत्यही जन्म पावणाऱ्या आपल्या लहानमोठ्या पुस्तकांतून या नियमाचे पालन करतात! महापुरुषाचा मंत्र झाला तरी त्यातील सौंदर्य दिसेल व दाखविता येईल, तरच त्याची कला बनते, याचीही या साध्याभोळ्या साहित्यिकास दखल नाही. आणि त्यामुळे त्यांचे विपुल वाङ्मय म्हणजे भोळसटपणा, दुबळेपणा, अधूपणा, पायघोळपणा, पुनरुक्ती यांचा एक अजबखाना बनून राहिले आहे. सुदैवाने त्यातील बरेच रूपांतररूप सारांशरूप असेच आहे. पण त्यातही त्यांनी आपल्या वारकरी वातावरणाचे इतके मिश्रण केले आहे की कला व साधुता म्हणजे एक गुळचट व पोरकट प्रकार होय अशी नवीन वाचकांची समजूत झाल्याखेरीज राहणार नाही." 

अशा प्रकारे साने गुरुजींचे साहित्य हे ‘वारकरी वातावरणा’चे मिश्रण असल्याची नोंद क्षीरसागर करतात. त्यांच्या भाषेबद्दल लिहिताना ते म्हणतात, ‘‘पण अशाच विषयावर साने यांनी लिहिलेल्या पुस्तकात मुद्दाम उच्चविलेली आणि ऊरबडवी भाषा, कोकणच्या विशिष्ट टापूत बोलली जाणारी पण महाराष्ट्राला दुर्बोध वाटणारी बोली, पाल्हाळ हास्यास्पद विचार यांखेरीज काय आढळेल? कमालीचा हास्यास्पद भोळसटपणा हाच या पुस्तकाचा वेगळेपणा होय. (श्यामची आई) साने यांच्या सर्वच पुस्तकांत भाषा गबाळ आणि पाल्हाळिक आहे. काही पुस्तकांत तर ती अत्यंत अशुद्ध आहे."  म्हणजे साने गुरुजींचे सामर्थ्य असलेली भाषा क्षीरसागरांच्या दृष्टीने दोषास्पद आहे याचाही अर्थ क्षीरसागर सांगतात, ‘‘या पुस्तकाच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या निघत आहेत. एखादे पुस्तक समजावून घेण्यास विद्वत्ता आणि बुद्धी लागत नाही; आणि शृंगारापासून अलिप्त आहे. या दोन आधारांवर ते शेकडो शाळांच्या गळ्यात बांधल्यास त्याच्या आवृत्त्या सहज निघू शकतात हे कोणीही प्रकाशक सहज सांगू शकेल आणि शाळकरी मुलेदेखील केवळ गाजावाजामुळे अशी पुस्तके हाती घेतात अशी अखेर त्यातील रडवेपणाला, प्रांतीयतेला आणि पाल्हाळाला कंटाळतात, असे थोडा शोध घेतल्यास दिसून येईल.’’

एकंदरीत साने गुरुजी यांचे साहित्य रडवे, पाल्हाळाने भरलेले, हास्यास्पद, भोळसटपणाने भरलेले, प्रांतीय महाराष्ट्राला अपरिचित असलेल्या भाषेत लिहिलेले आहे; असा निष्कर्ष काढतात. यावरून क्षीरसागर यांच्या साहित्याबद्दल कोणत्या धारणा आहेत हेही स्पष्ट होते. तेव्हा आपण ज्या धारणा बाळगतो त्याच्या नेमक्या विरोधी धारणा बाळगणारा लेखक लोकप्रिय होतो ही गोष्ट काही श्री. के. क्षीरसागर यांना रुचली नाही. शिवाय हा लेखक महत्त्वाचा होत जावा, ही बाब तर अधिकच गंभीर वाटते. म्हणून साने गुरुजींचा उपहास करताना ते त्यांना गायीची उपमा देतात. आणि ही दादागिरी आहे, असेही त्यांना वाटते. ते लिहितात: “आज साहित्यिकांना तीन कलाशून्य क्षेत्रांतील दादागिरीस तोंड द्यायचे आहे. एक शास्त्राभिमान्यांची, दुसरी धर्माभिमान्यांची आणि तिसरी राजकारणाभिमान्यांची.’’ 

याचा अर्थ असा की साने गुरुजी यांची साहित्यमीमांसा आणि साहित्य या दोन्ही बाबी श्री. के. क्षीरसागरांना दादागिरीच्या व धोकादायक वाटत होत्या. ते मांडत असलेल्या सौंदर्यवादापेक्षा भलत्याच वाटत होत्या.  श्रीरसागर यांच्या लेखणीला धार चढण्याचे आणखीही एक कारण होते. सुप्रसिद्ध समाजवादी विचारवंत भागवत यांनी साने गुरुजी यांच्या साहित्यावर व  व्यक्तिमत्त्वावर पाच-सहा लेख लिहिले होते व साने गुरुजींचे साहित्य हे कसे श्रेष्ठ आहे हे सांगितले होते. 'श्यामची आई' या कादंबरीबद्दल त्यांनी लिहिले होते. ‘‘आत्मकथेचा जिव्हाळा लाभल्यामुळे श्यामच्या आईत कृत्रिम कलाविलास नाही. स्वतःच्या भावना सत्यनिष्ठेने वर्णिल्यामुळे उच्च कला प्रकट झाली आहे... सबंध पुस्तकात एकही गोष्ट अशी दाखविता येणार नाही जीत अद्भुतता, अथवा अकल्पितता आहे.

पुस्तकाची भाषा घरगुती असून त्यात या उखाणे व म्हणी आहेत. याचाही आचार्य भागवतांनी निर्देश केला आहे. कोकणच्या साध्याभोळ्या संस्कृतीचे करुणरसपूर्ण चित्र ते रेखाटतात म्हणून हे पुस्तक मराठी वाङ्मयात अजरामर होऊन राहणार’’ साहित्याचा मोठेपणा साहित्यिकाच्या जीवनावर अवलंबून असल्याची नोंदही आचार्य भागवतांनी केली आहे. शिवाय लेखकाने न्यायाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, असेही भागवतांना वाटते. साने गुरुजी बहुजन समाजाच्या हृदयाची पकड घेणारे लेखक आहेत, असेही ते सांगतात आणि तत्कालीन महाराष्ट्राच्या साहित्यिक वातावरणाचा काही एक अर्थ लावतात. ते म्हणतात, "अलीकडे कित्येक वर्षे साहित्याची जिवंत प्रश्नांशी फारकत झाल्यामुळे महाराष्ट्र वाङ्मयात कृत्रिम कल्पनाविलास, नकली सौंदर्य आणि विचारांचा उथळपणा यांना ऊत आलेला दिसतो. आजचे महाराष्ट्र साहित्य कृपण भावना व्यक्त करणारे आहे. साहित्यात जो आनंद संप्रदाय वाढत आहे त्याचा आनंद जीवनाबाहेरील कल्पनानिर्मित थिल्लर गोष्टींवर उभारलेला आहे. वास्तववाद्यांच्या लिखाणात वास्तवतेचा मागमूसही सापडत नाही आणि ध्येयवाद आम्हांला मान्य नाही असे ते स्वतःच ओरडून सांगत आहेत! अशा वेळी साने यांचे मनाला आधार देणारे, साहित्यावरील श्रद्धा वाढविणारे असे झाले आहे.’’ आचार्य भागवतांनी साने गुरुजींच्या ‘पत्री’ या कवितासंग्रह प्रस्तावना लिहून या कवितेतून उदास भावना सहजतेने प्रकट होतात तसेच मातृभूमीचे प्रेम हा त्यांचा सहजधर्म आहे, असेही सांगितले होते. 

समीक्षेपुढील प्रश्न
साने गुरुजी, आचार्य भागवत आणि श्री. के. क्षीरसागर यांच्या भूमिका पाहिल्या की त्याकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन महाराष्ट्रात आकार घेत आहेत असे दिसते. या कालखंडातील मराठी साहित्य जसे जीवनापासून दूर जाणारे आहे, त्याप्रमाणेच मराठी समीक्षेपुढेही प्रश्न निर्माण झाले आहेत. केशवसुतांचा सौंदर्यवाद जाऊन रविकिरण मंडळाचा सौंदर्यबाद स्थिर होऊ लागला आहे. फडके-खांडेकर यांच्या स्वप्नरंजनाने मोहिनी घातली आहे. हरिभाऊ, वामन मल्हार, केतकर, वरेरकर चर्चेच्या बाहेर उभे आहेत. तेव्हा अशा वेळी काय करायचे? या सगळ्या बाबींचा आणि परंपरेचा अर्थ कसा लावायचा, हा प्रश्न मराठी समीक्षेपुढे निर्माण झाला. तसेच साहित्याचे प्रयोजन काय, असाही प्रश्न निर्माण झाला. या कालखंडातील साहित्य एकीकडे लोकप्रिय तर होते आणि दुसरीकडे त्याबद्दल असमाधानही व्यक्त होत होते. 1936 मध्ये मर्ढेकरांनी लिहिलेला ‘वाङ्मयीन महानता’ हा ग्रंथ याचाच निदर्शक होता. अशा सगळ्या परिस्थितीत मराठी समीक्षा दोन मार्गांनी प्रकट होऊ पाहते आहे.

एक म्हणजे इंग्रजी समीक्षेच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणे आणि दुसरा मार्ग म्हणजे भारतीय साहित्य मीमांसेचा आधार घेणे. पहिल्या प्रकारात ना.सी. फडके यांचे ‘प्रतिमा साधन’ (1931) ‘साहित्य आणि संसार’ (1937) ही पुस्तके येतात. श्री. के. क्षीरसागरही त्याला अपवाद नाहीत. दुसऱ्या मार्गाने जाणाऱ्या समीक्षकांनी संस्कृत मीमांसा मराठीतून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. द. के. केळकर (1931), सारस्वत समीक्षा- य. र. आगाशे (1934) अलंकार मंजूषा- बाळुताई खरे (1931). अलंकारचंद्रिका- ग. मो. खरे (1926), रसविमर्श- के. ना. वाटवे (1942), संस्कृत साहित्यशास्त्राचा इतिहास- पां. वा. काणे (1931), भारतीय नाट्यशास्त्र- गोदावरी केतकर (1928) इत्यादी पुस्तके प्रसिद्ध होत होती. भारतीय साहित्य मीमांसेची पाश्चात्त्य मानसशास्त्राशी सांगड घालण्याच्या प्रयत्नांत रा. श्री. जोग यांची 'अभिनय काव्य प्रकाश’ (1930) आणि ‘सौंदर्य शोध आणि आनंदबोध' (1943) याच काळात प्रसिद्ध झाली.

इंग्रजी साहित्य मीमांसेच्या आधारे समीक्षालेखन करण्याचा प्रयत्न असो की संस्कृत मीमांसेच्या आधारे समीक्षालेखन करण्याचा प्रयत्न, भोवती निर्माण होणाऱ्या साहित्याशी या दोन्हींचाही फारसा संबंध नाही. समीक्षेच्या वातावरणात ‘सविकल्प समाधी’ (न.चिं. केळकर 1921) ‘स्वायत्त तादात्म्य’ (द. के. केळकर) ‘सहानुभूतिपूर्वक ताटस्थ्य’ (रा. श्री. जोग), ‘पुनःप्रत्यय’ (ना.सी. फडके), प्रत्याभिज्ञा (कृ.पां. कुलकर्णी), आत्मौपम्य बुद्धीने परकाया प्रवेश (या.म.जोशी), कुतूहलपूर्ती (माधव ज्यूलियन) अशा शब्दांची चलती आहे...ग. त्र्यं. माडखोलकरही या काळात समीक्षालेखन करीत आहेत. 

अशा सगळ्या वातावरणात जीवनाचा आणि साहित्याचा निकटचा संबंध जोडू पाहणारा समीक्षकांचा एक वर्ग उदयाला येतो आहे. ‘साहित्य आणि समाजजीवन’ (1935) हा लालजी पेंडसे यांचा ग्रंथ याच काळात प्रसिद्ध झाला. विचारसौंदर्य (वा.म.जोशी. 1940), सहा भाषणे (वि. स. खांडेकर, 1941), ललित कलामीमांसा (गो.चिं. माटे, 1925) हेही ग्रंथ याच काळात प्रसिद्ध झाले. केतकर यांचे 'महाराष्ट्रीयनांचे काव्यपरीक्षण‘ व मा.गो. देशमुख यांचे ‘मराठीचे साहित्यशास्त्र’ ही पुस्तकेही याच काळात प्रसिद्ध झाली. म्हणजे हे सगळेच लेखक साहित्याचा प्रत्यक्ष जीवनाशी असणारा संबंध शोधू पाहत होते. काही मूल्ये सांगत होते. प्रस्थापित मराठी समीक्षेपेक्षा वेगळा मार्ग ही समीक्षक मंडळी चोखाळू पाहत होती. अशा काळात आचार्य भागवत यांची साहित्यमीमांसा व साने गुरुजींनी अनुवादित केलेले ‘कला म्हणजे काय?’ (1934) ही पुस्तके प्रसिद्ध झाली. आचार्य जावडेकरांची ‘पुरोगामी साहित्या’ची कल्पनाही पुढे आली. 

याचा अर्थ असा की प्रस्थापित व प्रतिष्ठित समीक्षालेखन गुरुजी लिहीत होते आणि भूमिकाही मांडत होते. शिवाय गांधीवादाचा पुरस्कार करीत होते. नेमकी हीच कारणे श्री. के. श्रीरसागर यांच्या टीकेमागे आहेत असे दिसते. म्हणूनच त्यांनी आचार्य भागवतांच्या विधानांचा समाचारही आपल्या उपरोक्त लेखातून घेतला आहे. म्हणजे साहित्यक्षेत्रातील भूमिकांमधील मतभेद हे येथील अनुदारपणामागील कारण आहे. क्षीरसागरांच्या पाठोपाठ ना.सी. फडके यांनी साने गुरुजी यांच्या वाङ्मयाबद्दल खालच्या पातळीवर येऊन लिहिले आहे. मे 1948 मध्ये वसंत व्याख्यानमालेमध्ये (पुणे) प्रा. ना. सी. फडके यांनी 'सत्यं शिवं सुंदरम्’ अशा साहित्यातील बुवाबाजीचा प्रकार असे एक व्याख्यान दिले. या व्याख्यानात साहित्य हे स्वतंत्र असते, साहित्याची गुणवत्ता त्यातील गुणांवरून ठरते, देशभक्तीला तेथे काही महत्त्व नाही, शुचित्व अथवा विरक्तीला साहित्यात काही अर्थ असत नाही; जीवनसाफल्य अगर पावित्र्य ही मूल्ये मानणे म्हणजे निखालस मूर्खपणा आहे, कलात्मकता आणि सौंदर्याविष्कार हीच एकमेव कसोटी मानली पाहिजे; अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. तसेच गुरुजी स्वतःस श्रेष्ठ साहित्यिक समजत आहेत, त्यांचे साहित्य कोणत्या दर्जाचे आहे ते शोधले पाहिजे, असे सांगून ते म्हणतात, "सान्यांच्या पुस्तकातल्या गोष्टी (श्यामची आई) फार तर मराठी दुसरी दुसरी-तिसरीतील मुलांना सुरस वाटतील. पण त्या चमत्कारिक इतक्यातच अर्थानं म्हणता येतील की, खरं बोलावं, उपकार करावा, भूतदया बाळगावी, या पलीकडे त्यांत बोध नाही. आणि सौंदर्य तर तिळमात्र नाही."

फडके यांचा अहंकार
‘‘ ‘श्यामची आई’ या पुस्तकातील चाळीस रात्रींच्या कहाण्या अशाच सर्वथैव पोरकट आहेत. त्या ऐकून श्यामची आई कुणी अलौकिक स्त्री होती असे मनात येत नाही. पण उलट वाटते की, असल्या निदान दोन कोटी आया महाराष्ट्रात घरोघर असतील... हुंदके देऊन आणि आसवं ढाळून पोरकट वर्णनं केली की वाङ्मय होत असेल तर मराठी साहित्याची शंभर वर्षे भरली म्हणायचे.’’ म्हणजे श्री. के. क्षीरसागर यांच्याप्रमाणेच ना. सी. फडके यांनीही आसवे ढाळण्याचा, पोरकट उपदेशाचा उल्लेख केला आहे. कारण फडके यांची ललित साहित्याची मीमांसाची वेगळी आहे! शिवाय ते स्वतःला त्या काळावर अधिराज्य गाजविणारे लेखक समजत आहेत. तेव्हा आपल्यापेक्षा अधिक वाचकप्रिय लेखक निर्माण होतो म्हणजे काय, असा अहंकार फडके यांच्या या लिहिण्यामागे आहे. 

साने गुरुजींनी समकालीन वाङ्मय आणि भोवतीचा बहुजन समाज, अशी एक मीमांसा केली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून श्रीरसागरांसारखाच आक्रमणाचा मुद्दा ना. सी. फडके यांनीही मांडला आहे. पण त्यांचा रोख सरळसरळ गांधीवाद्यांकडेच आहे हेही त्यांच्या पुढील उताऱ्यावरून दिसून येईल... ‘‘....फरक इतकाच की, आज ते आक्रमण एका तिसऱ्या पंथाकडून होत आहे. हा पेच राजकारणाचा धंदा करणाऱ्या देशभक्तांचा आहे. यात कम्युनिस्ट आहेत. गांधीवादी आहेत. आणि कम्युनिस्टांपेक्षा गांधीवादी हे अधिक उपद्रवी आणि भयंकर आहेत. कारण परंपरागत धर्माचे व नीतीचे आम्ही संरक्षक आहोत, अशी आरोळी कम्युनिस्टांना ठोकता येत नाही, परंतु गांधीवाद्यांना ती ठोकता येते. गांधीवादाचं राजकारणच सामान्य जनतेच्या प्रतिगामी, धार्मिक आचारविचारांत समजुतीत घोळून तयार केले असल्यामुळे आम्ही देशभक्त तर आहोत, परंतु शिवाय धर्मपरायणता, नीतिमत्ता आणि विरक्ती यांचेदेखील मिरासदार आम्ही आहोत असा पुकारा साहित्यावर आक्रमण करू पाहणाऱ्या गांधीवाद्यांना करता येतो. म्हणजे इतर सर्व पंथांपेक्षा या पंथातल्या मंडळीजवळ लोकांच्या डोळ्यांत टाकण्यासाठी धूळ जास्त आहे." 

क्षीरसागर-फडके यांची समीक्षा वाचली की मराठी समीक्षेमध्ये निर्माण झालेले आवर्त, ललित साहित्यात बोकाळलेले स्वप्नरंजन, अहंकार आणि गांधीवादाविरुद्धचा उद्रेक म्हणजे साने गुरुजींवरील टीका होय; असे म्हणावे लागेल. एका अर्थाने त्यांच्या मूल्यमापनाच्या संदर्भात संघर्ष आहे असे म्हणावे लागेल. परंतु क्षीरसागर-फडके आक्रमक आहेत, तर साने गुरुजी आपल्या स्वभावाप्रमाणे मवाळच आहेत. या सगळ्या टीकेबद्दल साने गुरुजींची प्रतिक्रिया मोठी सौम्य आहे. मधु लिमये यांना लिहिलेल्या पत्रात ते एवढेच नोंदवितात, "पुण्याचे एक टीकाकार श्री. क्षीरसागर यांनी माझ्या वाङ्मयावर झोड  उठविली आहे. रडके. रोगट, कोकणी तत्त्वज्ञानाने भरलेले असते हे भिकार वाङ्मय आहे. हे म्हणणे बरोबर आहे."

क्षीरसागर-फडके यांनी याने गुरुजी यांच्या वाड्मयावर केलेली टीका अनुदार होती आणि तिची भाषाही हिणकस होती यात काही शंका नाही. त्या टीकेमागील तत्कालीन वाङ्मयीन आणि अभिरुचिविषयक संघर्ष जरी समजून घेतला तरी या टीकेने साने गुरुजी यांच्या साहित्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन निश्चित झाला आणि तो आजतागायत कायम आहे की काय अशी शंका येते. या टीकेमुळे साने गुरुजी यांच्याविषयी एक ग्रह पक्का झाला. तो म्हणजे त्यांचे जीवन हे त्यागी, भारावून टाकणारे होते. याचाच एक भाग म्हणजे जीवन कसेही असले तरी साहित्य चांगले होतेच असे नाही. तसेच साहित्यात कुठलीच विचारसरणी महत्त्वाची असत नाही. सबब साने गुरुजी ध्येयवादी आणि गांधीवादी असले तरी त्यांचे साहित्य हे रडके आणि शाळेतल्या पोरासोरांच्या कामाचे असले तर आहे. 

क्षीरसागर-फडके यांच्यानंतर साने गुरुजींवर जेवढी म्हणून समीक्षा लिहिली गेली, तिच्यातील बहुसंख्य समीक्षेचा सूर हा आहे. नंतरच्या काळात लिहिल्या गेलेल्या समीक्षेमध्ये दोन प्रमुख गोष्टी दिसतात. एकीकडे साने गुरुजींच्या जीवनाबद्दल भारावून लिहायचे आणि साहित्यातील ‘रडकेपणा’बद्दल एक तर समर्थन तरी करायचे किंवा ते तसेच आहे असे सांगायचे.  साने गुरुजी यांच्या साहित्यात डॉ. अ.ना. देशपांडे यांनी आपल्या ‘आधुनिक मराठी वाङ्मयाच्या इतिहासा’त लिहिले आहे. तेथेही साने गुरुजींच्या रडण्याला प्राधान्य देऊनच ते लिहितात. डॉ. अ.ना.देशपांडे यांना साने गुरुजींची पत्रे नितांतसुंदर वाटतात. तर कथा कलागुणांच्या अपेक्षेने बऱ्याच निराशाजनक वाटतात. त्यांच्या कवितेत आत्मसमर्पण वृत्ती आणि करुणा असूनही ती वीर सावरकर वा कवि गोविंद यांच्या कवितेइतकी परिणामकारक नसल्याचाही ते निर्वाळा देतात. 

‘‘केवळ कुसुमावती देशपांडे यांनी आपल्या मराठी कादंबरीमध्ये नव्हे, तर इतर टीकाकारांनीही साने गुरुजींच्या वाड्मयातील रास्तपणे निर्देशिलेला रडवेपणाचा आणि विकृत दु:खप्रियतेचा सूर विचारात घेतला म्हणजे कुमारांच्या ‘वाढाळू’ मुलांच्या मनाचे इष्ट दिशेने पोषण करण्याच्या बाबतीतल्या या मानलेल्या उपयुक्ततेलाही मर्यादा घालावी लागते.’’  म्हणजे बघा, आतापर्यंत निदान साने गुरुजी कुमारांचे तरी लेखक होते. अ.ना. देशपांडे यांनी कुमारांनाही त्यांच्यापुढून ओढून घेतले. सांगितले, ‘‘चला उठा तिथून. येथे इष्ट पोषण होणे नाही!’’ 

हा क्षीरसागर आणि फडके यांनी लावलेता रडण्याचा सूर अगदी 1993 सालीही दिसतो. नव्हे, अगदीच टिपेला पोचलेला दिसतो, श्री. ना.ल. वैद्य यांनी 1993 मध्ये ‘साने गुरुजी : व्यक्ती आणि कर्तृत्व’ हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या जीवनाविषयी (नेहमीप्रमाणे) अगदी भरभरून लिहिले. परंतु वाङ्मयाला एकच प्रकरण लिहिले. त्यातील त्यांची विधाने पाहिली म्हणजे साने गुरुजी यांच्या वाङ्मयात समीक्षा कशी आवर्तात आणि शब्दांत घुटमळते आहे हे लक्षात येईल. 

साने गुरुजी यांचे समकालीन लेखक वि. स. खांडेकर. एका अर्थाने ते साने गुरुनीचे सहधर्मी असे म्हणता येईल. त्यांनी साने गुरुजींना समजावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ‘‘आणि म्हणूनच सान्यांच्या लेखनात लौकिक कलेच्या दृष्टीने अनेक वैगुण्ये आहेत हे कळत असूनही मला नेहमी वाटते.... साने थोर कलाकार आहेत. इतर कलावंत शब्द नाद, कल्पना, भावना इत्यादींचे सौंदर्य शोधून आपली कलाकृती घडवीत असतात. साने जीवनातील अंतिम सौंदर्य शोधायला निघाले आहेत. ते मानवतेचे शिल्पकार आहेत. या श्रद्धेने त्यांना कलाकार केले आहे." 

'आस्तिक' कादंबरीबद्दल लिहीत असताना तर ते भारावून गेले आहेत. पण वाङ्मयीन मूल्यांपेक्षाही या कादंबरीचे सामाजिक मूल्य फार मोठे आहे, अशी नोंद करून ते म्हणतात; ‘‘पण सान्यांच्या इतर वाङ्मयात न आढळणाऱ्या एका विशेषाने माझे मन अधिक आकृष्ट केले. तो गुण महाकवीच्या ललित सृष्टीतच आपल्याला स्पष्टपणे दिसतो. तो म्हणजे ‘जीवनाच्या विशालतेची जाणीव.’ " साने गुरुजींचा असा गौरव वि. स. खांडेकर करीत असले तरी ते फडके यांच्या प्रभावातून सुटले होते असे मात्र नाही. साने गुरुजींची पात्रे स्टॅटिक असतात. त्यात गुंतागुंत असत नाही याचीही नोंद करून ते म्हणतात,  ‘‘असे होण्याची कारणे शोधायला दूर जायला नको. जातिवंत कथाकारालाच कादंबरीतील गुंतागुंत साधते. त्याला मोठ्या नदीला मिळणाऱ्या लहान नद्यांप्रमाणे मिळणाऱ्या मुख्य कथानकात उपकथानके सुंदर रीतीने समरस करून घेता येतात. प्रा.फडक्यांच्या कादंबऱ्यांत समरप्रसंग, छायाप्रकाश, उत्कंठा, विस्मय वगैरे गोष्टींच्या अनुषंगाने हा संगम साधलेला असतो. पण माने गुरुजी यापैकी कुठल्याच मार्गाने जात नाहीत. त्यामुळे आस्तिकचे कथानक एका अतिविशाल संघर्षाच्या व चिरंतन समस्येच्या पार्श्वभूमीवर उभारले असूनही त्यात रोमहर्षक प्रसंग व त्यांच्या उत्कटतेने कादंबरीला भरणारा रंग नाही.’’

एकीकडे महाकवी म्हणायचे आणि दुसरीकडे फडक्यांशी तुलना करायची, याला काय म्हणावे? की समकालीन अभिरुचीचा हा बळी आहे?
प्रभाकर पाध्ये यांनीही साने गुरुजींना समजावून घेत घेत लेखन केले आहे. साने गुरुजींच्या निसर्गाकडे पाहण्याच्या वेगवेगळ्या दृष्टींची ते नोंद करतात. त्यांच्या सहजसुंदर भाषेची दखल घेतात. त्यांच्या लोकप्रियतेचे कारण त्यांची भाषा आहे, असेही सांगतात. त्यांनी 'श्यामची आई’चे यथायोग्य मूल्यमापन केले आहे. ते म्हणतात, "या पुस्तकात विश्वात्मकता असो वा नसो, त्यात एक अनपेक्षित भारतीयता आहे. गेल्या काही वर्षांत कोकणच्या मध्ययुगीन जीवनात जो ऱ्हास झाला, आधुनिक जीवनाच्या घणाखाली कोकणचे परंपरागत जीर्ण जीवन ने कोलमडू लागले, त्यांच्या या पुस्तकात आढळणाऱ्या भावनार्त चित्रणात वाचकाला आधुनिक हिंदुस्थानच्या आत्मिक सामर्थ्याची प्रतीती येते. श्यामच्या आईच्या भोवतालचे सारे वातावरण वादळले होते... पण त्या साऱ्या विध्वंसनात ती मात्र आपल्या आत्मबालच्या जीवनमूल्यांच्या प्रेममय व्यक्तित्वाच्या जोरावर खंबीरपणे उभी होती. साम्राज्यशाहीच्या विदारक शोषणाने हिंदुस्थानच्या उज्ज्वल जीवनाचा ऱ्हास झाला. पण हिंदुस्थानचा चारित्र्यशील आत्मा नष्ट झाला नाही. भारतीय संस्कृतीची थोर मूल्ये नाहीशी झाली नाहीत. 'श्यामच्या आई'त याचा प्रतीकात्म प्रत्यय येत नसेल का?" तरीही ‘मराठी वाङ्मया’च्या प्रथम श्रेणीत गुरुजींच्या वाङ्मयाचा समावेश करावा असाही आग्रह मी धरणार नाही. पण म्हणून गुरुजींचे एकंदर सर्व वाङ्मय म्हणजे गुळचट आणि पोरकट आहे असे मी म्हणणार नाही,’’ असेही त लिहून जातात.

याचा अर्थ असा की, कुठेतरी फड़के-क्षीरसागर यांचा प्रतिवाद करण्याची भूमिका येथे आहेच. पुढील विधानावरून तर ते तसे नक्कीच दिसते. “आता खरे बोलावे वगैरे जो अगदी प्राथमिक उपदेश 'श्यामच्या आई'त प्रो. फडक्यांना आढळला, त्याची अत्यंत निकडीची गरज काही 'प्रथितयश' बनलेल्या व्यक्तींनाही आज महाराष्ट्रात आहे. हे अनेक प्रकरणी सिद्ध झाले आहे.’’ 
अर्थात हा टोला 'प्रथितयश’ फडक्यांनाच आहे हे उघड आहे. त्यांच्या 'प्रतिभासाधन' या ग्रंथावर क्लेटन हॅमिल्टन यांच्या 'आर्ट ऑफ क्राफ्ट’ या ग्रंथाची चोरी केल्याचा आरोप होता आणि त्यासाठी सत्यशोधन समिती नेमली गेली होती. हा इतिहास आहेच!

नेमाडेंचे आकलन
डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी मात्र फडके-क्षीरसागर यांचे ओझे झुगारून साने गुरुजी यांचे आकलन केले आहे असे दिसते. किंबहुना त्यांनी जाणीवपूर्वक केले असावे असे वाटते. श्री. के. क्षीरसागर यांच्याविषयी लिहिताना त्यांचा सूर उपहासाचा आहे. ‘‘त्यांची एके काळची मातब्बरी आम्ही ओळखून आहो, तथापि त्यांस चढविण्यास आम्हांपासी हरभऱ्याचे झाड नाही! कै. पांडुरंग सदाशिव साने ह्यांस हुसकावून लाविले, कै. ठोकहितवादी यांस स्थानापन्न... हा खटाटोप प्रशंसार्ह आहे, नाही असे आम्ही म्हणणार नाही. परंतु खरोखर जी टीका समजली जाते ती ही मात्र नव्हे.’’

ना.सी. फडके यांचीही दखल त्यांनी घेतली आहे. ना. सी. फडके यांनी कादंबरीच्या क्षेत्रात अधिराज्य गाजवण्याचा उल्लेख केलेला होता. त्याचा उपहास करीत नेमाडे म्हणतात, "ह्या लेखक-समीक्षकांच्या अभिरुचीच्या कटात वेगळ्या शैलींची रूपं मांडणारे केतकर क्लिष्ट ठरले. साने गुरुजी बालवाङ्मयात ढकलले गेले, तर चिं. वि. जोशी विनोदी वाङ्मयात घातले गेले. आणि ‘कादंबरी’चे क्षेत्र दोघा-तिघा भांडवलदारांना एकाधिकार पद्धतीने मोकळे ठेवले होते.  येथे क्षीरसागर-फडके यांचे स्मरण असले तरी त्यांच्या अनुरोधाने साने गुरुवाङ्मयाची समीक्षा नेमाडे करीत नाहीत. म्हणूनच साने गुरुजी यांच्या साहित्याची अनेक वैशिष्ट्ये त्यांना दिसली. "साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ (1935) पासून समाजाच्या सर्व थरांना स्पर्श करणाऱ्या बहुविध आशयसूत्रांच्या आणि आपल्या सांस्कृतिक तत्त्वांना उजाळा देणाऱ्या कथा-कादंबऱ्यांमधून मराठी देशी अनुबंध अप्रतिम जिव्हाळ्याने मराठी कादंबरीचे क्षेत्र उजळले.’’ हे नेमाडे याचे विधान साने गुरुजी यांच्या वाङ्मयावे नेमके स्वरूप स्पष्ट करणारे आहे. 'आस्तिक’ कादंबरीचा त्यांनी अप्रत्यक्षपणे उल्लेख केला आहे. तसेच त्यांचे निबंध लेखनही नेमाडे यांना महत्त्वाचे वाटते. एवढेच नव्हे तर साने गुरुजी हा आपणांस एकमेव मोठा कादंबरीकार वाटतो, असे त्यांनी सांगितले आहे. श्यामच्या लायकीचा एकही दुसरा मराठी नायक नाही, असेही त्यांना वाटते. साने गुरुजींनी आपल्या कादंबऱ्यांतून स्वतःचे असे विश्व निर्माण केले असे सांगून ते म्हणतात, ‘‘त्यांना स्वत:ची अशी जीवनदृष्टी होती, जी इतर कुणाजवळ दिसत नाही. समाजाच्या सर्व स्तरांना मराठी कादंबरीने स्पर्श केला तो एकट्या साने गुरुजींनी. या बाबतीत त्यांचा आवाकाही विलक्षण आहे. पण निव्वळ समाजवादी शिष्यामुळे त्यांची वाईट प्रतिमा मनात रुजली.’’

भालचंद्र नेमाडे यांनी साने गुरुजींच्या साहित्याचे आकलन करण्याचा आणि अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला माझ्या दृष्टीने एक वेगळा अर्थ आहे. भालचंद्र नेमाडे हे 1960 नंतर उदयाला आलेल्या महत्त्वाच्या लेखकांपैकी एक आहेत. लघू अनियतकालिकांच्या चळवळीची धुराही त्यांनी काही काळ वाहिली आहे आणि देशीवादाचे ते आज प्रमुख प्रवक्ते आहेत. या सर्व बाबी मी यासाठी उपस्थित करीत आहे की, जेव्हा जेव्हा साहित्यात नवे प्रवाह येतात तेव्हा तेव्हा त्या नव्या प्रवाहांतील लोकांना पूर्वपरंपरेतीत आपले आधार शोधणे गरजेचे असते आणि आपण जी मूल्ये मानतो त्या मूल्यांच्या अनुषंगाने पूर्वसुरींचे वाङ्मय पाहावे लागते. या दृष्टीने भालचंद्र नेमाडे यांना साने गुरुजींच्या वाङ्मयाची दखल घ्यावीशी वाटली हे फार महत्त्वाचे आहे. 'आस्तिक' कादंबरी लिहिणाऱ्या आणि अस्पृश्याबद्दल काम करणाऱ्या साने गुरुजींविषयी एकाही दलित समीक्षकाने अगर साहित्याच्या निर्मात्याने लिहू नये ही आश्चर्यकारक असली तरी वस्तुस्थिती आहे. कोकणचे ग्रामीण-प्रादेशिक जीवन समर्थपणे व्यक्त करणाऱ्या साने गुरुजींची आठवण ग्रामीण साहित्य समीक्षकांना अगर निर्मात्यांना होऊ नये ही चांगली बाब नाही. तसेच युद्ध झाले तर अंतिमतः स्त्रियांच्याच वाट्याला दुःख येते. म्हणून स्त्रीशक्ती जागवली पाहिजे, हा संदेश ‘आस्तिक’मधून देणाऱ्या आणि मातृधर्म हा ज्याचा स्थायीभाव आहे अशा साने गुरुजींचा निर्देश स्त्रीवाद्यांना करावासा वाटत नाही हेही एक कोडेच आहे. या पार्श्वभूमीवर देशीवादी नेमाडे साने गुरुजींचे आकलन करतात, हे महत्त्वाचेच म्हणावे लागेल. 

साने गुरुजींच्या साहित्याची प्रांजळ समीक्षा करणाऱ्यांमध्ये प्रा. ग. प्र. प्रधान यांचा उल्लेख करावा लागेल. ‘मेकर्स ऑफ इंडियन लिटरेचर' या मालिकेसाठी (साहित्य अकादमीच्या) प्रा. ग. प्र. प्रधान यांनी 1995 मध्ये साने गुरुजींवर एक छोटेखानी पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक लिहिताना आपण पुन्हा एकदा संपूर्ण साने गुरुजी वाचून काढल्याची नोंद त्यांनी केली आहे. आपण लहान असताना साने गुरुजींमुळे भारावून गेलो होतो. आता मात्र आपण चिकित्सक दृष्टीने साने गुरुजी वाचू शकतो याचीही नोंद त्यांनी याच लेखात केली आहे. 

प्रगल्भ उकल 
परिचयवजा का होईना साने गुरुजी यांच्या समग्र साहित्याचा अतिशय समंजसपणे ग. प्र. प्रधान यांनी वेध घेतला आहे यात शंका नाही. इग्रजीत पुस्तक असल्यामुळे असेल, येथे क्षीरसागर-फडके यांचा उल्लेखही नाही, ही एक जमेची बाजू आहेच; परंतु साने गुरुजी, त्यांचा काळ, त्यांच्या प्रेरणा, तत्कालीन वाङ्मयाची झालेली कोंडी यांबद्दल अतिशय प्रगल्भतेने जर कुणी लिहिले असेल तर ते चंद्रकांत बांदिवडेकर या हिंदी समीक्षकाने. ते हिंदी साहित्याचे अभ्यासक असल्यामुळेच असे घडले की काय कुणास ठाऊक! परंतु त्यांनी साने गुरुजी यांच्या साहित्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. 

त्यांच्या लेखनाबद्दल प्रा. बांदिवडेकरांचे निष्कर्ष महत्त्वाचे आहेत. ते म्हणतात, ‘‘त्यांच्या लेखनातीत अकृत्रिम भावोन्मेष, आदर्शीकृत उत्कटता पानोपानीं विखुरलेली काव्यात्मकता, उदात्ततेची प्रचंड ओढ, सात्त्विकतेचे उमाळे यांकडे सर्वथा दुर्लक्ष झाले. एका बाजूला मराठी साहित्यात प्रणयाचा सुकाळ झालेला असताना राजकीय क्षेत्रात महान आध्यात्मिक प्रयोग महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चालला होता... साने गुरुजींच्या लेखनात तांत्रिक दोष अनेक आढळतील. पण सात्त्विक आनंद देऊन भारावून टाकण्याची मांत्रिक शक्ती, त्यांची मराठी संस्कारांनी भिजलेली शब्दकळा, तन्मयतेने, तळमळीने आणि आंतरिकतेने आर्द्र झालेली भाषा, वैदिक साहित्याच्या परंपरेपासून लोकसाहित्याच्या अनागर संस्कारांपर्यंत सर्व काही पचवून आतून समृद्ध पण वरून भोळी वाटणारी वाक्संहिता सहृदय मनाचा ठाव घेते.’’ 

मला वाटते प्रा. बांदिवडेकरांच्या वरील मीमांसेवर काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही. या सगळ्यांचा अर्थ एवढाच की, साने गुरुजी यांच्या साहित्याचा नव्याने विचार होण्याची नितांत गरज आहे.
 

*स्वतःचा मोठेपणा जपण्यासाठी साहित्यिकांनी साने गुरुजींना बालसाहित्यिकांच्या पिंजऱ्यात बंद केले

स्वतःचा मोठेपणा जपण्यासाठी तत्कालीन साहित्यिकांनी साने गुरुजींना 'बालसाहित्यिक’ कडी लावून पिंजऱ्यात बंद केले. हा अभिरुचीविरुद्धचा कट होता. साने गुरुजींनी त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मराठी माणसासाठी दिला. त्यांनी जवळपास 140 पुस्तके लिहिली आहेत. 'लिहिणे' ही गोष्ट साने गुरुजींनी महत्त्वाची मानली. त्यांचे लेखन चौफेर होते. त्यात त्यांनी सर्व विषय हाताळले आहेत. त्यांच्या मोठेपणामुळे आपण दिपून जाणार, अशी भीती तत्कालीन लेखकांना वाटत असल्यामुळेच त्यांनी साने गुरुजींना ‘बालसाहित्यिक’ ठरवले आणि स्वतःचे मोठेपण जपले, त्यांच्या पुस्तकांची संख्या जास्त असली तरी दर्जा राखला गेला, साने गुरुजींनंतर कोणीही कादंबरीकार होऊ शकला नाही असे सांगून डॉ. नेमाडे म्हणाले की, विश्राम बेडेकर, माडगूळकर यांना एका कादंबरीनंतर पुन्हा चांगली कादंबरी लिहिता आली नाही. त्यामुळे ते कादंबरीकार होऊ शकत नाहीत. 

- डॉ. भालचंद्र नेमाडे (दै. मराठवाडा, 19 सप्टेंबर 1999)
 

Tags: बांदिवडे ग. प्र. प्रधान योग्य मूल्यमापन - भालचंद्र नेमाडे क्षीरसागर-फडके खोडसाळ समीक्षा समीक्षा pro. bandivadekar साने गुरुजींचे साहित्य g. p. pradhan proper evaluation - bhalchandra nemade kshirsagar-phadake scrutiny review review कर literature of sane guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके