डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

चित्रपटाच्या गाभ्याकडे न जाता, अनेक अन्वयार्थ ज्यात शक्य आहेत त्याकडे दुर्लक्ष करून भलत्याच गोष्टीला महत्त्व देऊन जेव्हा चित्रपटाचं... चित्रपटाचंच का, अन्य कुठल्याही कलाकृतीचं किंवा भोवतालच्या कुठल्याही संदर्भाचं- मोजमाप केलं जातं तेव्हा तो प्रकार साप समजून दोरखंडाला झोडपण्यासारखा मला वाटतो. आणि हे सेक्स आणि धार्मिक भावना या संदर्भात प्रकर्षाने होतं. 1984 च्या महोत्सवात जर्मन दिग्दर्शक व्होल्कर शॉल्ड्रोफच्या ‘सर्कल ऑफ डिसिट’ या चित्रपटातल्या एकमेव सेक्स-सीनबद्दल अशीच अनाठायी चर्चा झडली होती. चित्रपटाची सुरुवात होते तेव्हा एका वर्तानपत्राचं ऑफिस दिसतं. संपादक आपल्या एका सहकाऱ्याला केबिनमध्ये बोलावतो आणि ताबडतोब बैरुतला निघायला सांगतो. 

खरं तर कुठलीही कलाकृती नीट पाहायची असेल, समजून घ्यायची असेल, तिचा सर्वार्थाने आस्वाद घ्यायला असेल तर त्याकडे पाहण्याची नजर मिळवणं आवश्यक असतं. थोडं बारकाईने लक्षात घेतलं तर असं जाणवेल की डोळे आहेत म्हणून आपल्याला दिसतंय बरंच काही... परंतु आपण ते सारं खऱ्या अर्थाने ‘पाहतोय’ का? 

‘‘इटस्‌ अ हार्डकोअर पोर्नो फिल्म!’’ 

‘‘सेक्स आणि फक्त सेक्स असलेली ही फिल्म फेस्टिवलच्या स्पर्धा विभागात मुळात निवडलीच कशी गेली....?’’ 

‘इन द बेड’ या फिल्मविषयी आणखीही अशा प्रतिक्रिया ऐकायल्या मिळाल्या. नोव्हेंबर 2006 मध्ये गोवा येथे पार पडलेल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा ‘इन द बेड’ दाखवला गेला. त्याचा पहिला खेळ पाचव्या की सहाव्या दिवशी झाला आणि तेव्हापासून ही अशीच चर्चा सतत कानावर पडत राहिली. त्यामुळे अनेकांची उत्सुकता अनेक कारणांनी चाळवली. मलाही कुतूहल वाटलं. दुसरा खेळ कधी, याकडे माझंही लक्ष लागून राहिलं आणि मग एकदाचा तो खेळ जाहीर झाला.

शेवटच्या दिवशी पणजीतल्या आयनॉक्सच्या एका छोट्या चित्रपटगृहात सकाळी नऊ वाजता त्याचा हा दुसरा खेळ ठरला. ज्या प्रकारची त्याची चर्चा झाली ती पाहता तुडुंब गर्दी लोटणार हे स्वाभाविकच होतं आणि तशी ती लोटली देखील. एकीकडे महोत्सवांना येणाऱ्या प्रेक्षकाची जाण, अभिरुची वाढते आहे, तो प्रगल्भ होतो आहे हे दिसतं, तर दुसरीकडे केवळ सेक्स आहे म्हणून तोच पाहायला येणारा प्रेक्षकही मुबलक आहे. जागतिक चित्रपटांचा गाढा अभ्यास असणारे काहीजण महोत्सवातील प्रतिनिधींना अनौपचारिक मार्गदर्शन करीत असतात. तसेच कुठल्या चित्रपटात किती सेक्स आहे याचीही माहिती देणारे असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती, दुसरं काय...!

तर ‘इन द बेड’ला अशीच ‘खास’ चाहत्यांची गर्दी लोटली आणि ताणलेल्या प्रतीक्षेनंतर एकदाचा चित्रपट सुरू झाला. पडद्यावर स्पष्ट असं काही दिसत नव्हतं. अस्पष्टसं जे काही दिसत होतं त्याला स्पष्ट अशा ध्वनिपरिणामाची मात्र जोड होती. तो ध्वनी होता सेक्स करणाऱ्या जोडीच्या वाढत्या श्वासोच्छवासाचा...! तो जसजसा वाढत गेला तसं पडद्यावरचं दृश्य अधिकाधिक स्पष्ट होत गेलं. जेव्हा सेक्स संपला तेव्हा विलग झालेली दोन शरीरं दिसली. एका मोटेलची एक छोटी बेडरूम आणि ही दोघं...! 

काही क्षण गेले आणि त्याने तिला विचारलं, ‘‘नाव काय तुझं...?’’ आणि मैफिलीत जशी उत्स्फूर्तपणे दाद द्यावी तसं इकडे माझ्या तोंडून स्पष्ट-अस्पष्टसा शब्द आला, ‘‘वाह....!’’ 

तिने त्याच्याकडे पाहिलं. म्हणाली, ‘‘गेस...’’ त्याने दोन-तीन नावं घेतली. मग तिने आपलं नाव सांगितलं. त्यानेही आपला परिचय दिला. मनाशी सहजपणाने प्रश्न आला, की एकमेकांचा साधा परिचय नसतानाही मघाचा अनुभव दोघांनी इतका उत्कटपणे कसा घेतला...?

यावर कुणी चटकन उत्तर देईल ‘अशी संधी आली तर कोण असा उत्कट अनुभव घेणार नाही...?’ इतकं सोपं आणि वरवरचं होतं हे...?

लगेचच लक्षात येतं, की ती दोघं प्रथमच भेटली आहेत. मागचा कधीचा परिचय असेल अशा दूरवरच्या कसल्याच खुणा नाहीत. मधे मधे ती दोघं थोडंफार बोलतात आणि पुन्हा दोनदा ती सेक्स करतात. या वेळी तो दिसतो. असं हे तीनदा झाल्यानंतर त्यांच्यात आणखी काही बोलणं होतं. सहज व्हावं असं. परंतु त्यातून अस्पष्टसं काही उलगडतं.. न उलगडतं असं. ते सेक्सविषयी देखील अर्थातच अगदी मोकळेपणाने बोलतात.

याच वेळी कधी तरी बाथरूममध्ये ती गेलेली असताना तो तिची पर्स चाळतो. त्यात त्याला तिची लग्नपत्रिका सापडते. चारच दिवसांवर तिचं लग्न असतं... आणि तरीही ती इथे...? या परक्या तरुणाबरोबर? अशा अवस्थेत...? ती येते. तो थेटपणे नाही परंतु आडून-आडून विचारतो... आणि मग ती लग्न, आयुष्य याबद्दल पुन्हा तसंच अस्पष्ट बोलते... दोघं सहजपणानं आपापली आयुष्यं आणि मनं मोकळी करतात... कुठेतरी धागे जुळत जातात. अलगदपणे एकमेकांबद्दल काही वाटायला लागतं... जगण्याचा अन्वयार्थ लागतो... आता ती वेगळ्याच पातळीवर जवळ येतात... दरम्यान ते चौथ्यांदा सेक्स करण्याच्या अवस्थेत असतात... मात्र तो घडून येत नाही... दोघं मूकपणे एकमेकांच्या कुशीत विसावतात... चित्रपट संपतो.

मतीहास बीझ दिग्दर्शित हा चिली-जर्मनी यांची संयुक्त निर्मिती असलेला चित्रपट मला तरी अजिबात पोर्नो वाटला नाही. खरं तर तो नीटसा कळण्यासाठी आणखी किमान एकदा तरी पाहायला हवा. ही केवळ एका तरुण युगुलाची गोष्ट नव्हती. त्या पलीकडे बरंच काही त्यात होतं, आहे. अगदी थेट आजच्या ग्लोबलायझेशनच्या संदर्भांपर्यंत जाता येईल इतपत! आणखीही  बऱ्याच गोष्टी अचंबित करणाऱ्या होत्या. एक मुख्य गोष्ट म्हणजे, 85 मिनिटांचा हा चित्रपट अवघ्या एका लोकेशनवर घडतो. बारीकसा लोकेशनबदल म्हणजे दोनदा झालेला बाथरूमचा वापर! कुणी म्हणेल इतकं चमचमीत असताना हवीत कुणाला वेगळी लोकेशन्स. एक बेड आणि उत्सुक शरीरं असताना गरजच काय त्याची...?  परंतु वर म्हटल्याप्रमाणे हे एवढंच नाही आणि म्हणूनच माझ्यासारखे काही त्याला पोर्नो फिल्म म्हणायला तयार नाहीत. एरवी अशी दृश्यं काही चित्रपटांतून नुसती अनावश्यकच नाही तर हिडीसही वाटू शकतात. इथे असला काही प्रकार नव्हता.

मग मनात प्रश्न उमटला की का म्हणून बहुतांश प्रेक्षकांनी याची पोर्नो फिल्म म्हणून संभावना केली...? याचं उत्तर असं देता येईल का, की अजून चित्रपट पहायचा कसा हे अनेकांना कळतच नाही...! त्यांनी वेगळी नजर प्राप्त केलेलीच नाही...! अगदी ठामपणे नाही म्हणता आलं तरी तशी शक्यता पूर्णपणे नाकारताही येत नाही, एवढं मात्र निश्चित...! महोत्सवाला सातत्याने येणारा प्रेक्षक देखील भलत्याच मुद्यांना, गोष्टींना महत्त्व देत एखाद्या महत्त्वाच्या चित्रपटालाही बाजूला सारताना मी इतकी वर्षं पाहतो आहे.

एखादा चित्रपट संथ असतो हे खरंय, पण त्याला काही कारणं असतात. मात्र ती लक्षात न घेता ‘फारच रटाळ सिनेमा आहे’ म्हणून मोकळे होतात. यावर मी गंमतीने उत्तर देतो की, एखाद्या कथेत नायकच जर आळशी असेल तर तो चित्रपट संथच असणार आणि या नायकाच्या भूमिकेत धसमुसळ्या शाहरुख फिट बसणारच नाही. आशुतोष गोवारीकरच्या ‘स्वदेस’वर तो संथ असल्याची टीका मोठ्या प्रमाणात झाली. होता तो संथ. कारण गोष्टच तशी होती. काय होती गोष्ट...? काय होता तिचा गाभा...?

स्थितिशील समाजात नायकाला बदल घडवून आणायचा आहे. अवघा समाज एका साचलेल्या अवस्थेत वावरतो आहे आणि म्हणून आधुनिक दृष्टिकोन असलेल्या नायकाला त्यात बदल घडवून आणायचा आहे. आपल्या देशात कुठलेच बदल एका रात्रीत होत नाहीत. स्थितिशीलता इतकी नसानसांत भिनलेली आहे की हे साचलेपण लक्षात येत नाही. आता ते लक्षात आणून द्यायचं, त्यासाठी आणि पुढल्या बदलासाठी होणाऱ्या विरोधाशी झगडत ईप्सित गाठायचं तर त्याला वेळ लागणारच आणि याचाच परिणाम म्हणून अशा कथानकाची गती संथच राहणार. परंतु हे लक्षात न घेता केवळ वरवर दिसतं, जाणवतं त्यावरून मतप्रदर्शन करून मोकळं व्हायचं, याला सिनेमा पाहाणं म्हणायचं का? 

चित्रपटाच्या गाभ्याकडे न जाता, अनेक अन्वयार्थ ज्यात शक्य आहेत त्याकडे दुर्लक्ष करून भलत्याच गोष्टीला महत्त्व देऊन जेव्हा चित्रपटाचं... चित्रपटाचंच का, अन्य कुठल्याही कलाकृतीचं किंवा भोवतालच्या कुठल्याही संदर्भाचं- मोजमाप केलं जातं तेव्हा तो प्रकार साप समजून दोरखंडाला झोडपण्यासारखा मला वाटतो. आणि हे सेक्स आणि धार्मिक भावना या संदर्भात प्रकर्षाने होतं. 1984 च्या महोत्सवात जर्मन दिग्दर्शक व्होल्कर शॉल्ड्रोफच्या ‘सर्कल ऑफ डिसिट’ या चित्रपटातल्या एकमेव सेक्स-सीनबद्दल अशीच अनाठायी चर्चा झडली होती. चित्रपटाची सुरुवात होते तेव्हा एका वर्तानपत्राचं ऑफिस दिसतं. संपादक आपल्या एका सहकाऱ्याला केबिनमध्ये बोलावतो आणि ताबडतोब बैरुतला निघायला सांगतो. 

मध्यपूर्वेतली त्या वेळची धुमश्चक्री कव्हर करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली जाते. तो लगेच घरी जातो. तयारी करायला लागतो. सतत फिरतीवर आणि अशा धोकादायक कामांसाठी जाणाऱ्या नवऱ्यामुळे सतत एक प्रकारच्या ताणग्रस्त अवस्थेत असणारी बायको त्याच्याशी भांडण करते. तो तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. ती क्रमाक्रमाने जवळपास हिस्टेरिक होत जाते. प्रकरण दोघांकडूनही हाणामारीपर्यंत जातं. 

आईवडिलांच्या या भांडाभांडीने रडवेली झालेली त्यांची छोटी मुलगी जिना चढून वरच्या त्यांच्या बेडरूमपर्यंत येऊ लागते आणि त्याच वेळी हाणामारी करता करता एकमेकांवर कोसळलेली त्यांची शरीरं भिडतात आणि ती सेक्स करू लागतात. खाली उभी असलेली गव्हर्नेस जिन्यावर अर्धवट पोचलेल्या मुलीला घेऊन जाते. या नवराबायकोचं हे टोकाचं भांडण आणि नंतरची कृती यातून त्यांच्यातल्या उत्कट प्रेमाचं, कन्सर्नचं दर्शन घडतं. परंतु काहींना तो निव्वळ सेक्स वाटला, अनावश्यक वाटला. आजवर पाहिलेल्या जगभरच्या चित्रपटांतले काही मोजके आणि कथेला सर्वार्थाने पूरक असलेले सेक्सचे जे प्रसंग मी पाहिले त्यांपैकी हा एक होता. तो नीट पाहणं मात्र गरजेचं होतं. 

याचा अर्थ सर्वच चित्रपटांतील अशी दृश्यं क्षम्य असतात असं नव्हे. परदेशातील चित्रपट महोत्सवात जेव्हा अशी अनावश्यक दृश्यं येतात तेव्हा प्रेक्षक अतिशय उत्स्फूर्तपणे हुर्यो करीत नापसंती व्यक्त करतात. परंतु जेव्हा असं काही कथेचा अपरिहार्य भाग म्हणून येतं तेव्हा ते कथेतील अन्य महत्त्वाच्या गोष्टींसारखं पाहतात. ‘इन द बेड’सारखा चित्रपट पाहण्यासाठी अशी नजर असावी लागते...! पुन्हा वर म्हटल्याप्रमाणे असा एखादा चित्रपटच का? खरं तर कुठलीही कलाकृती नीट पाहायची असेल, तिचा सर्वार्थाने आस्वाद घ्यायचा असेल तर त्याकडे पाहण्याची नजर मिळवणं आवश्यक असतं. थोडं बारकाईने लक्षात घेतलं तर असं जाणवेल की डोळे आहेत म्हणून आपल्याला दिसतंय बरंच काही... परंतु आपण ते सारं खऱ्या अर्थाने ‘पाहतोय’ का? एकदा या ‘पाहण्या’चं महत्त्व लक्षात आलं की पुढचं वळण अगदी सहज गाठता येतं आणि ते म्हणजे - ‘नजर’! 

साधना : 10 फेब्रुवारी 2007 (सिनेमा) 

Tags: परदेशातील चित्रपट नजर आस्वाद कलाकृती चित्रपट Foreign Movies Eye Taste Artwork Movies weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अशोक राणे
ashma1895@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके