डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विद्यार्थ्यांनी लिहिली शिक्षकांची चरित्रे...

जिज्ञासू विद्यार्थ्यांनी संबंधित शिक्षकांची मुलाखत घेऊन आणि प्रश्नावलीच्या माध्यमातून आवश्यक माहिती गोळा केली. मिळालेल्या माहितीचे संश्लेषण आणि विश्लेषण केले. तसेच अन्य शिक्षकांशी चर्चा करून शिक्षकांची ही चरित्रे लिहिली आहेत. सतत दोन वर्षांच्या या उपक्रमाचं अंतिम स्वरूप म्हणजे ‘माझा शिक्षक : चरित्रनायक’ हे पुस्तक. इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिकत असलेली पाच मुले आणि चौदा मुली यांनी ही चरित्रे लिहिली आहेत. बहुतेक शिक्षक खेड्यात जन्माला येऊन परिस्थितीशी दोन हात करत शिकले आहेत. पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या या शिक्षकांच्या मनात विद्यार्थ्यांविषयी प्रेम आहे. आपल्याप्रमाणे आपले विद्यार्थी उत्तम शिकावेत, अशी तळमळ त्यांच्या ठायी आहे.

राजर्षी शाहू विद्यालय, नांदेड येथे डॉ.सुरेश सावंत हे मुख्याध्यापक आहेत. ते चाकोरीबाहेरचे उपक्रम शाळेत राबवतात. विद्यार्थ्यांनी वाचतं-लिहितं व्हावं, यासाठी त्यांनी विशेष उपक्रम राबवले आहेत. प्रत्येक वर्गात कथा, कविता, गाणी, कादंबरी, चरित्रे अशा प्रकारच्या साठ- सत्तर पुस्तकांची पेटी ठेवली आहे. शाळेत मागेल त्याला मागेल ते पुस्तक मिळते. मुलांच्या वाढदिवसाला पुस्तक भेट दिले जाते. शाळेत डॉ.अब्दुल कलाम यांच्या नावाचा वाचनकट्टा आहे. दर शनिवारी निवडक १०० ते १५० विद्यार्थ्यांसाठी लेखन कार्यशाळा घेतली जाते. विविध अनुभवांवर मुलांना लिहिते केले जाते. विद्यार्थी भित्तिपत्रक चालवतात, दैनंदिनी लिहितात याचा फायदा लेखनासाठी होतोय. ‘मला आवडलेले पुस्तक’ लिहिता-लिहिता ही मुले बालसाहित्याची समीक्षा करत आहेत. मुलांचे साहित्य मुलांनी लिहिणे, बालसाहित्याची समीक्षा मुलांनी करणे- किती छान कल्पना आहे! डॉ.भगवान अंजनीकर आणि एकनाथ आव्हाड यांच्या बालसाहित्याची समीक्षा या शाळेतील मुलांनी केली आहे. या समीक्षेची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. एकनाथ आव्हाड यांच्या साहित्याच्या समीक्षेचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

डॉ.सुरेश सावंत लेखक आहेत, त्यांचा लेखक परिवार मोठा आहे. याचा फायदा ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमाला झाला. त्यांनी यदुनाथ थत्ते यांच्यापासून श्रीकांत देशमुख यांच्यापर्यंत विविध लेखकांशी मुलांची भेट घडवून आणली आहे. मुलांनी या लेखकांशी साहित्यसंवाद साधला आहे. नुकतेच मुलांनी लिहिलेले ‘माझा शिक्षक : चरित्रनायक’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. राजर्षी शाहू विद्यालयातील १९ विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांची चरित्रे लिहिली आहेत. या प्रकल्पाविषयी डॉ.सुरेश सावंत यांनी मनोगतात लिहिले आहे, ‘विद्यार्थी महापुरुषांची चरित्रे वाचतात-ऐकतात, पण ती कशी घडतात याची कल्पना या विद्यार्थ्यांना नसते. अनेकांची चरित्रे घडविणारा, अनेकांच्या आयुष्याला आकार देणारा, आयुष्य प्रभावित करणारा आपला शिक्षक हा देखील चरित्रनायक होऊ शकतो याची कल्पना बहुतेक विद्यार्थ्यांना नसते. लेखनगुण अवगत असणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना आपला प्रत्येक शिक्षक हा चरित्रनायक आहे, हे समजावून सांगितले गेले. ‘आपल्या शिक्षकाचेही चरित्र वाचनीय आणि प्रेरणादायी होऊ शकते’, हा विश्वास मुलांना दिला. चरित्रलेखनासाठी आवश्यक सामग्री कशी गोळा करायची याची सविस्तर माहिती दिली. चरित्रनायक निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. त्यातून विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या शिक्षकाची चरित्रे लिहिण्याची प्रेरणा मिळाली. जिज्ञासू विद्यार्थ्यांनी संबंधित शिक्षकांची मुलाखत घेऊन आणि प्रश्नावलीच्या माध्यमातून आवश्यक माहिती गोळा केली. त्या माहितीचे संश्लेषण आणि विश्लेषण केले. तसेच अन्य शिक्षकांशी चर्चा करून शिक्षकांची ही चरित्रे लिहिली आहेत. सतत दोन वर्षांच्या या उपक्रमाचं अंतिम स्वरूप म्हणजे ‘माझा शिक्षक : चरित्रनायक’ हे पुस्तक.

इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिकत असलेली पाच मुले आणि चौदा मुली यांनी ही चरित्रे लिहिली आहेत. बहुतेक शिक्षक खेड्यात जन्माला येऊन परिस्थितीशी दोन हात करत शिकले आहेत. पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या या शिक्षकांच्या मनात विद्यार्थ्यांविषयी प्रेम आहे. आपल्याप्रमाणे आपले विद्यार्थी उत्तम शिकावेत, अशी तळमळ त्यांच्या ठायी आहे.

विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडून प्रश्नावलीच्या आधारे मिळवलेली माहिती आणि त्यांनी जवळून अनुभवलेले, मार्गदर्शन करणारे, प्रेम करणारे, तळमळ असणारे, समाजाप्रति सेवाभाव बाळगणारे शिक्षक- अशी एकंदर चरित्रांची मांडणी दिसून येते. काही वेळा मिळवलेल्या माहितीवरून लिहिलेल्या भागामध्ये एकसुरीपणा जाणवतो. कालानुक्रमामध्ये संगती लावताना तुटकपणा आला आहे. लालित्य कमी झाले आहे. माहिती घेऊन, समजून घेऊन, साठवून, रिचवून लिहिणे ही तशी अवघड गोष्ट आहे. तरीही विद्यार्थ्याचे प्रयत्न कौतुक करण्यासारखे आहेत. व्यक्तिचित्र लिहिल्याप्रमाणे थोडी गोष्टीरूप मांडणी झाली असती, तर ही चरित्रे अधिक रोचक झाली असती.

लेखकाकडे धाडस आणि तटस्थपणे पाहण्याची दृष्टी असावी लागते. ही चरित्रे वाचली की, हे गुण विद्यार्थ्यांजवळ आहेत, हे लक्षात येते. संकोच न बाळगता शिक्षकांच्या गुणांबरोबर त्यांच्यात असलेल्या उणिवा, त्यांच्याकडून झालेल्या चुका मांडण्यात हे छोटे लेखक कमी पडलेले नाहीत. कुंटूरकर

सरांना भाषण करण्याची भीती वाटत होती, देसाईसरांचे वडील रागावले म्हणून ते रुसून बसले होते, टपरेसरांनी बालपणी आईच्या वस्तूची चोरी केली म्हणून मार खाल्ला होता- इतके स्पष्टपणे मुलांनी लिहिले आहे. रोजच्या संपर्कातून समजलेल्या, उमजलेल्या शिक्षकांच्या वागण्या-जगण्याविषयीचे हे लेखन अधिक सहजसुंदर झाले आहे. विद्यार्थ्यांनी असा भाग समरसून लिहिला आहे. कोठेही बेगडी भाषा वापरलेली नाही, विनाकारण उपमा-अलंकारात मुले अडकली नाहीत. पंजाब सावंतसरांमुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय प्रिय झाला आहे. हंगेसर दिव्यांगांना, वृद्धाश्रमाला, अनाथाश्रमाला मदत करतात. जाधवसरांचा सर्वांत आनंदाचा क्षण म्हणजे आईला भेटायला गावाकडे जाणे. ते कोणताही विषय सोपा करून शिकवतात. सर खूप मजा करतात. सर एवढे विद्यार्थ्यांचे लाड करतात तेवढेच चूक केल्यावर रागावतात. गाडेकरसर चार भिंतींच्या बाहेरचे आयुष्य कसे जगायचे ते सांगतात. केंद्रेसर दुसऱ्या जगात प्रवेश केल्याचा अनुभव यावा अशी मराठीची तासिका रंगवतात.

विद्यार्थी आपल्या शिक्षकांचे चरित्र लिहिताना त्यामध्ये डॉ.सुरेश सावंत यांचाही आदराने उल्लेख करतात. चरित्रांमध्ये सावंतसरांचा उल्लेख वारंवार येतो. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या घडण्यामध्ये सावंतसरांचा मोलाचा सहभाग आहे, हे जाणवते. शिक्षक, विद्यार्थी आणि सावंतसर हे एकदिलाने शाळेत रमतात, सुख-दु:खात सहभागी होतात, हे जाणवते. हे चरित्रनायक शिक्षणाबरोबर समाजसेवा करतात, अनाथांना मदत करतात, गोरगरिबांचं दु:ख समजून घेतात. कोणाला खेळाची आवड आहे, तर कोणाला वाचनाची. कोणाला आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडणे म्हणजे खरी देशसेवा वाटते. चरित्रनायकांना विद्यार्थ्यांनी समजून घेतलंय. त्यांचा प्रभाव विद्यार्थ्यांवर आहे. उद्याचे उत्तम नागरिक होण्याची ही पायाभरणी आहे.

चरित्रनायकांच्या या कहाण्या संघर्षाच्या आहेत. यातील काही चरित्रे सविस्तर लिहून पुस्तकरूपाने स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यायोग्य आहेत. विद्यार्थ्यांकडून शिक्षकाचं चरित्रलेखन करून घेणं, हा अनोखा उपक्रम आहे. ते पुस्तकरूपात प्रकाशित करणं तर कौतुक करण्याची, अनुकरण करण्याची संधी आहे. असे प्रयोग करणाऱ्यांना हे पुस्तक नक्की दिशा देणारे आहे. अशा प्रयोगांमधून भावी साहित्यिक निर्माण होतील, अशी आशा बाळगायला खूप वाव आहे.

माझा शिक्षक : चरित्रनायक

संपादक : डॉ.सुरेश सावंत

संगत प्रकाशन, नांदेड,

पृष्ठे : २२३, किंमत : २५० रुपये

Tags: संगत प्रकाशन कुंटूरकर हंगे गाडेकर जाधव चरित्र श्रीकांत देशमुख डॉ.सुरेश सावंत नांदेड राजर्षी शाहू विद्यालय माझा शिक्षक : चरित्रनायक नामदेव माळी Sangat Prakashan Kunturkar Hange Gadekar Jadhav Shrikant Deshmukh Dr. Suresh Savant Dr. Suresh Sawant Nanded Rajashree Shahu Vidyalay Biography Majha Shikshak: Charitranayak Namdev Mali weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नामदेव माळी,  सांगली, महाराष्ट्र
namdeosmali@gmail.com

शिक्षण क्षेत्रात वर्ग दोनचे अधिकारी, कादंबरीकार व शैक्षणिक लेखक.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके