डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वर्तमानपत्रातील लेखांना शब्दांची मर्यादा असते, त्यामुळे लेखकाला लिहिताना लगाम घालावा लागतो. ओढताण होते. या पुस्तकाबाबत ते काही ठिकाणी झाले आहे. काही वेळा लेखांना कहाणी आणि किश्श्यांचे स्वरूप आले आहे. तरीही लेखांचा आकार लहान असल्याने शिक्षणप्रेमींना सोयीनुसार, वेळेनुसार वाचण्याची सोय आहे. शिक्षणविषयक पुस्तकांमध्ये आणखी एका चांगल्या पुस्तकाचा समावेश झाला आहे.

द. ता. भोसले वयाची ऐेंशी वर्षे पार केलेले लेखक. तरुणाला लाजवेल असा त्यांचा उत्साह आजही आहे. सळसळते व्यक्तिमत्त्व. लेखनातही तोच वेग आणि उत्साह आहे. प्राचार्य म्हणून काम केल्याने उच्च शिक्षणात प्रत्यक्ष वावर आणि अनुभव आहे. शिक्षणाविषयी प्रेम आणि आसक्ती आहे. रयत शिक्षण संस्थेत कर्मवीर अण्णांच्या सहवासात घडलेली पिढी, त्यानंतरची पिढी शिक्षणाच्या तळमळीने भारावून गेली होती. आपल्या पुढची पिढी स्वावलंबी व्हावी, समाजावर प्रेम करणारी व्हावी, समानतेचा आग्रह धरणारी व्हावी यासाठी धडपडत होती. गरजू विद्यार्थ्यांना मदत करणं हा शिक्षकांच्या, प्राध्यापकांच्या नित्य जगण्याचा भाग होता. या दोन पिढ्यांमध्ये कर्मवीर अण्णांचा अंश होता, ते खऱ्या अर्थाने अण्णांचे वारसदार होते.

संख्यात्मक वाढ झाली की, गुणवत्ता ढासळते. कष्ट करून श्रीमंत झालेल्यांना श्रीमंतीची किंमत कळते. काही अपवाद वगळता पुढच्या पिढ्या आयत्या पिठावर रेघोट्या ओढतात. मुळासकट ऊस खातात. पावित्र्याचा धंदा करतात. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी रक्त सांडलं, तुरुंगवास भोगला त्यांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ माहीत आहे. आज जे स्वातंत्र्याचं झालं तेच शिक्षणाचं झालं.

 द.ता.भोसले तळमळीने शिकलेल्या आणि तळमळीने शिकविलेल्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. व्यक्तीचा विकास, समाजाची प्रगती आणि राष्ट्राचा सर्वांगीण अभ्युदय चिरंतन स्वरूपात होण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही उपाय सांगता येणार नाही. विकार, विकृती, विषमता विपन्नदशा यावरचे अंतिम उत्तर म्हणजे माणसाला मिळणारे श्रेष्ठ दर्जाचे शिक्षण होय, असे द.ता.भोसले प्रस्तावनेमध्ये म्हणतात. शिक्षण हा धर्म राहिला नाही, धंदा झाला. कृतार्थ जीवनाचा मार्ग राहिला नाही. तो स्वार्थी जीवनाचा मार्ग बनला, असे त्यांना वाटते आणि या पोटतिडकीतूनच त्यांनी शिक्षणातील अधिक-उणे लिहिले आहे.

ते विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षण संस्थापक, समाज हे शिक्षणाचे प्रमुख घटक मानतात. शिक्षणक्षेत्रात त्यांनी दीर्घकाळ काम केल्याने या घटकांशी त्यांचा जवळून संबंध आलेला आहे. या पुस्तकातील सर्व लेख या घटकांशी संबंधित असे आहेत. पुस्तकाचे शीर्षक वाचले की, पुस्तकात काय आहे याची कल्पना येते. समाजजीवन सुंदर व्हावे, समृद्ध व्हावे, संस्कारी व्हावे अन्‌ तितकेच उदात्त व्हावे, ही भावना उराशी बागळून लेखन झाले आहे.  ‘दै.लोकमत’मधून लेखमाला प्रसिद्ध झाली. त्याचे हे पुस्तक समाजातील प्रत्येक घटकाने वाचावे, असे आहे.

द.ता.भोसले यांना प्राध्यापक म्हणून काम करत असताना भेटलेले विद्यार्थी, त्यांची शिकण्याची ओढ ही या पुस्तकातील सकारात्मक बाजू आहे. मातृहृदयाचे शिक्षक भेटले की, विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलून जाते. जगणे आनंदी होते. खडतर प्रसंगातून शिकलेल्या पिढीला पुढच्या पिढीने शिकावे वाटते. त्या तळमळीने द.ता.भोसले यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मदत केली आहे. साधारण सन 2000 पर्यंत असे प्राध्यापक आणि विद्यार्थी होते. एकमेकांना लळा लागलेला असायचा. प्राध्यापक-विद्यार्थी घरातल्यासारखे असायचे. प्राध्यापकांच्या घरी विद्यार्थी असायचे. गरीब घरातल्या मुलांना अशा मातृहृदयाच्या प्राध्यापकांचा आधार असायचा. हे विद्यार्थी स्वावलंबी असायचे. या पुस्तकातील सेनापती जगदाळे, भूक आणि बक्षीस, दोन घास सुखासाठी या लेखातून ते आपणास दिसते. काही वेळा वाचताना गलबलल्याशिवाय राहत नाही.

 द.ता.भोसले यांच्या लेखनात चित्रमयता आहे. प्रसंग, चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते, उदा. खेड्यातील शेतकऱ्याचा पोषाख अंगावर, मनगटाजवळ पैरण फाटलेली, बऱ्याच दिवसांत न धुतलेली, खाली मळलेले आखूड धोतर आणि माथ्यावर चिंध्या लोंबणारे मुंडासे... कुपोषणाची शिकार झाल्याने अशक्त, निस्तेज आणि पिचलेल्या काडीसारखी काटकुळी.

‘तरुणाईचे नवे दर्शन’ या लेखामध्ये विद्यार्थी वर्गणी काढून अपंग विद्यार्थ्याला खुर्च्या देतात, ‘काटकीला आलेला मोहोर’ या लेखात धनगराचा दिनेश काम करीत शिकतो. वृद्ध सद्‌गृहस्थांची सेवा करतो, हजेरी कमी भरल्याने त्याला परीक्षेला बसता येत नाही. हे असे विद्यार्थी शिकून मोठे होतात, लेखकांना आवर्जून भेटतात. विद्यार्थ्यांमध्ये टवाळक्या करणारेही आहेत, परंतु त्यांच्यातही माणुसकीचं दर्शन घडते. ही मुलं कोयनेच्या भूकंपावेळी भूकंपग्रस्तांना मदत करायला धावतात. आई-बापाला जेव्हा मजुरी मिळते तेव्हाच घरात चूल पेटते, अशा विद्यार्थ्याला भुकेसाठी चोरी करावी लागते. कॉलेजचे प्राचार्य त्याला शिक्षा म्हणून पोटभर खाण्याची सोय करतात.

असे आदर्श जपणाऱ्या लेखकांना सवंग लोकप्रियता आणि शिक्षणाचा धंदा मांडलेले संस्थापक भेटतात. मूल्ये हरवलेले प्राध्यापक भेटतात. ते पुस्तक न वाचता, त्या विषयातील फारसे ठाऊक नसताना मूर्ख बडबड करतात. वारांगणा आणि वीरांगणा, रोडगा आणि रोडका, घास आणि घाट यातला अर्थभेद त्यांना ठाऊक नाही. विनाअनुदान तत्त्वावर शाळा, महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये यांना मंजुरी मिळाल्यानंतर यातून तयार झालेले डोनेशनवाले शिक्षक, प्राध्यापक ज्यांना शिक्षणापेक्षा इतर गोष्टींमध्ये अधिक रस आहे. याच्या रसभरित कहाण्याही या पुस्तकामध्ये आपणास भेटतात.

दोन घास सुखासाठी, एका स्वप्नाचा अंत, एका माऊलीचे स्वप्न, दाता आणि याचक, गोदावरी मॅडम हे मुलींच्या शिक्षणाबाबतीतील लेख आहेत. ‘एका माऊलीचे स्वप्न’मधील माऊली म्हणते, ‘मास्तर मी सांगू नये ते सांगतेय. आमचा धंदा रातीच्या सोबतीनं चालणारा. अंधार पडायला लागला की, गिऱ्हाईकं यायला सुरुवात व्हते. ही ही माझी पोरगी घरात असली, की नवं गिऱ्हाईक बिचकतं. माघारी जातं... एकटी बसलेली पोर बघितल्यावर तिला टोचायला गिधाडं येणारच.’ दाता आणि याचक तुळसा परीट या मुलींची मैत्रीण तुळसाच्या कॉलेजला उशीरा येण्याचं कारण सांगते, ‘सर, हिची आई दोन्ही डोळ्यांनी पार आंधळी आहे. घरात दुसरं कुणी नाही. हिलाच सारं करावं लागतं. ती आईला घेऊन स्टँडवर सोडते. तिची आई तिथं दुपारपर्यंत भीक मागते...’ अशा मुली आणि त्यांचं असं शिक्षण.

प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भातील एखाद-दुसरा लेख आहे. त्यामध्ये शिकवणं सोडून पत्ते कुटणारे शिक्षक आहेत. पटपडताळणीवेळी कसरत करणारे संस्थाचालक आहेत, शिक्षणाचे नवे दर्शन आहे. तारामतीची दुसरी शाळा आहे, असं बरंच अधिक-उणे आहे.

वर्तमानपत्रातील लेखांना शब्दांची मर्यादा असते, त्यामुळे लेखकाला लिहिताना लगाम घालावा लागतो. ओढाताण होते. या पुस्तकाबाबत ते काही ठिकाणी झाले आहे. काही वेळा लेखांना कहाणी आणि किश्श्यांचे स्वरूप आले आहे. तरीही लेखांचा आकार लहान असल्याने शिक्षणप्रेमींना सोयीनुसार, वेळेनुसार वाचण्याची सोय आहे. शिक्षणविषयक पुस्तकांमध्ये आणखी एका चांगल्या पुस्तकाचा समावेश झाला आहे.

शिक्षणातील अधिक-उणे

लेखक : द. ता. भोसले

पृष्ठे : 176, मूल्य : रुपये 100/-  

Tags: द. ता. भोसले नामदेव माळी शिक्षणातील चांगल्या-वाईटाचा परामर्श नवे पुस्तक Da. Ta. Bhosale Namdeo Mali Shikshanatil Changalya-Vaitacha Paramarsh Nave Pustak weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नामदेव माळी,  सांगली, महाराष्ट्र
namdeosmali@gmail.com

शिक्षण क्षेत्रात वर्ग दोनचे अधिकारी, कादंबरीकार व शैक्षणिक लेखक.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके