डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नामदेव माळी यांची ‘शाळाभेट’ ही लेखमाला 11 जून, 2011 नंतरचे वर्षभर ‘साधना’तून क्रमश: प्रसिद्ध झाली. एकूण 14 उपक्रमशील शाळांची ओळख करून देणाऱ्या त्या लेखमालेचे पुस्तक 11 जून, 2012 रोजी प्रकाशित झाले. त्यानंतरच्या तीन वर्षांत त्या पुस्तकाच्या पाच आवृत्त्या निघाल्या असून, एकूण 15 हजार प्रती वितरीत झाल्या आहेत. आता सहावी आवृत्ती प्रकाशित होत असून, जळगाव येथील दीपस्तंभ फाऊंडेशनने आयोजित केलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या स्पर्धेसाठी या पुस्तकाच्या दोन हजार प्रती खरेदी केल्या आहेत. या नव्या आवृत्तीत समाविष्ट केलेली ही पंधरावी शाळा...  

संदीप गुंड- वय वर्षे अठ्ठावीस. एकूण सेवा- पाच वर्षे दहा महिने. राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव मा. नंद कुमार यांच्या नजरेत हा शिक्षक येतो. त्याच्या कामाचा चार मिनिटांचा व्हीडिओ ते केंद्राच्या कॅबिनेटमध्ये दाखवतात. आपल्या राज्याला 18 कोटी रुपये मंजूर होतात. या निधीतून महाराष्ट्रातील प्रत्येक केंद्रशाळा ग्लोबल क्लासरूमने सज्ज होणार आहे. इंटरनेट ब्रॉड बॅन्ड, स्मार्ट बोर्ड, टॅबलेट ही माहिती-तंत्रज्ञानाची आयुधं 1800 शाळांमध्ये असणार आहेत. ठाणे, शहापूर येथे राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती आल्या की, त्यांचे पाय पष्टेपाड्याकडे वळतात. जवळजवळ सातशे शाळाव्य वस्थापन समित्या पष्टेपाड्याला भेट देऊन ऊर्जा घेऊन गेल्या आहेत. खडूच्या जागी बोट किंवा पेन, फळ्याच्या जागी स्मार्ट बोर्ड, पाटी व वहीच्या जागी टॅबलेट.

कोण आहे संदीप गुंड? काय आहे संदीप गुंड? नावानं गुंड असला तरी खूप गोड तरुण आहे हा- जादूगार! किमयागार!! शहापूर हे ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचं ठिकाण. तिथून साधारण तीस किलोमीटरवर पष्टेपाडा. खूप पाऊस. डोंगर, झाडे, भातशेतीचा प्रदेश. जवळच आजाचा डोंगर- आजोबाचा- वाल्मीकीऋषीचा. तिथं लव-कुशचा पाळणाही होता म्हणे. मुख्य रस्त्यावर फलक लावलाय- ‘कृतीतून शिक्षण देणारी आपली शाळा, जिल्हा परिषद प्रायमरी डिजिटल स्कूल- पष्टेपाडा - 1. शाळेकडे -->’ पाच-सहा फूट रुंदीच्या डांबरी रस्त्यानं आत गेलो की, उतरत्या छपरांची कौलारू घरं दिसतात. टुमदार. छोटासा पाडा. आखीव-रेखीव.

शाळेच्या स्वागत कमानीतून आत गेलं की, दोन्ही बाजूंना हिरवा-सोनेरी ड्युरांडा. स्वच्छ, सुंदर परिसर. बोलका, मनमोहक. त्याहीपेक्षा वर्गखोल्या सुंदर, आकर्षक, आनंदी अन्‌ बालस्नेही. छत पत्र्याचं असलं तरी खालून कापडी रंगीत छत लावलंय. दुसऱ्या खोलीत सपाट सिमेंट पत्रा लावलाय. तिथं निळंभोर आकाश, चांदण्या, चंद्र. एका खोलीत शाळेची माहिती. दोनही खोल्यांत एल.सी.डी. प्रोजेक्टर आणि स्मार्ट बोर्ड आहेत. डिजिटल क्लासरूम म्हणजे मुलांच्या स्वप्नातला स्वर्ग. ढग, डोंगर, पाणी, मासे, झाडेझुडपे, त्यांची आवडती कार्टून्स- गणपती, कृष्ण, भीम, हत्ती, माकड आणि बरंच काही. मज्जाच मज्जा!

लावण्यानं फूल देऊन माझं स्वागत केलं. शुभांगी पष्टेनं शिवाजीमहाराजांच्या प्रतापगडावरील पराक्रमाचं आवेशपूर्ण भाषण केलं. माझ्या लक्षात आलं की, इथली मुलं सहशालेय कार्यक्रमांतही मागे नाहीत. भिंतीवर टप्प्या-टप्प्याची रचना करून मांडलेली स्मृतिचिन्हं त्याची साक्ष देत होती.

मला बघायचं होतं E- Learning. मुलांना गुरुजींनी सांगायचा अवकाश- मुलं अक्षरश: आनंदानं तुटून पडली अभ्यासावर. ही जादू! प्रत्येक मुलाला टचस्क्रीन टॅबलेट. सुरक्षितता म्हणून टॅबलेट ठेवण्यासाठी आतून थर्माकोल असलेला बॉक्स. त्यावर मुलाचं नाव. मुलं त्यांच्या आवडीचा अभ्यास करण्यात गुंग झाली. शाळा सुरू होऊन पंधरा दिवसही झाले नव्हते. इयत्ता पहिलीची मुलंही टॅबलेट सहजतेनं हाताळत होती.

पहिलीतील साक्षीला मी तिचं नाव विचारलं, तर ती माझ्याकडे बघायलाही तयार नव्हती. तिला सवडच नव्हती. माझ्याकडे थोडीशी नजर टाकत तिचं बोट स्क्रीनवरच्या ‘अ’वर फिरत होतं. काळ्या रंगाचा ‘अ’ बोट फिरेल तसा निळा होत होता. टॅबलेटमधून टाळ्या वाजल्याचा आवाज येत होता. आकार समजून घेत साक्षी दुसऱ्या अक्षरावर बोट फिरविण्यास आतूर झाली होती. धूळपाटीसारखीही टॅबलेटची पाटी- कितीही वेळा गिरवा आणि कितीही पुसा. या पाटीवर आकाराचा सराव झाला, अक्षराची ओळख झाली की; मग कागदावर पेन्सिलने सराव.

अंगणवाडीत असतानाच ही मुलं दुपारनंतर शाळेत येतात. त्यांच्या इच्छेनुसार. पालकांना, मुलांना दोघांनाही शाळेची ओढ आहे. ही छोटी शाळेत रमतात. मोठ्यांच्या कृती बघतात. खेळात सहभागी होतात. पहिलीत नाव दाखल करण्याचा फक्त उपचार. या मुलांना नव्याने शाळेत आलोय असे वाटत नाही. मी एकाला विचारलं, तुला शाळेत काय आवडतं? तर, तो म्हणाला, अख्खी शाळा आवडते!

चित्रं आणि अक्षरं पाहून त्या इंग्रजी शब्दांचं अनुलेखन तिसरीतील यश करत होता. सर्व शिक्षा अभियान योजनेतून मिळालेली अशी सातशे कार्ड्‌स स्कॅन करून ठेवली आहेत. पुढच्या टप्प्यामध्ये मुलांना फक्त चित्र दिसेल. मुलांनी स्पेलिंग लिहायचं. यशला इंग्रजी अक्षरं माहीत आहेत. तो इंग्रजी लिहितो आणि वाचतो. त्यानं Cabbage लिहिलं. टॅबलेट फिरवला आणि बटण दाबलं. त्यानं केलेल्या कामाचा स्क्रीनशॉट घेतला. त्याचं काम साठून राहिलं.

एक मुलगा अंक आणि अंकाचे अक्षरी लेखन याच्या बोट फिरवून जोड्या लावत होता. पेन्सिलचं काम बोट करत होतं. रंग उमटत होता. मुलाला हवा तो रंग निवडता येऊ शकत होता. हे स्वाध्यायाचं काम. शासनानं पुरविलेली दोन हजार काडर्‌स संदीपनं टॅबलेटमध्ये ठेवली होती. काही वेळा शासनानं असं फुकट दिलेलं उत्तम साहित्य धूळखात पडलेलं दिसतं; परंतु संदीपनं याचा खुबीनं उपयोग केला होता. मुलं कृती करत होती. प्रत्येक मुलाजवळ आम्ही गेलो की, ‘हा खूप हुशार आहे,’ म्हणून सांगत होता. यानं किती सुंदर काम केलंय बघा- म्हणत होता. त्याच्या जिभेला असं वळणच लागलं होतं. तो तंत्रज्ञानानं शिकवत असला, तरी मूल समजून घेण्याची कला त्याला साधलीय.

शिक्षकांना वाटतं की, E-Learnig म्हणजे एखादा घटक पडद्यावर दाखवला, की संपलं. या पद्धतीमध्ये पसरलेली ही अंधश्रद्धा. संदीप म्हणतो, इथं शिक्षकाच्या कृतीला खूप वाव आहे; कल्पकतेला खूप मोठा अवकाश आहे. संदीपला एखादा घटक शिकवायचा असेल, तर तो त्या घटकाची P.P.T. बनवतो. सुरुवातीला मुलाचं पूर्वज्ञान तपासण्यासाठी विद्यार्थ्याकडून तो स्मार्ट बोर्डवर कृती करून घेतो. सुरुवातीची स्लाईड तशी असते. त्याला पृथ्वीचं परिवलन, परिभ्रण शिकवायचं आहे. तो स्मार्ट बोर्डवर चंद्र, पृथ्वी, इतर ग्रह दाखवतो. चित्रात काय आहे, ते मुलांनी स्मार्ट बोर्डवर लिहायचं. पुढच्या स्लाईडमध्ये मुख्य मुद्दे. त्याच्याशी संबंधित व्हीडिओ यू-ट्यूबवरून शोधून पीपीटीमध्येच लिंक देऊन ठेवलेले. आवाज बंद करून मुलांच्या कुवतीचा विचार करून शिक्षक माहिती देणार. नंतर आवाजासह चित्र किंवा व्हीडिओ दाखविणार. त्यानंतर त्याच्या पुढची संकल्पना. शेवटच्या स्लाईड मूल्यमापनाच्या. अपोलो मोहीम, चंद्रावर उतरलेले अंतराळवीर प्रत्यक्षात मुलं पाहतात. हवेत, काल्पनिक काही नसतं. डोळ्यांना दिसतं. असं एका पाठाचं एक फोल्डर.

सुरुवातीला शासनाने पुरविलेल्या स्वाध्याय पुस्तिका स्कॅन करून ठेवल्या. त्या स्मार्ट बोर्डवरही सोडविता येतात आणि प्रत्येकाला टॅबलेटवरही काम करता येतं. विविध कंपन्यांनी तयार केलेली सॉफ्टवेअर वापरता येतात. यामध्ये पाठ्यपुस्तकाचा डिजिटल स्वरूपात आशय असतो. मात्र, ती पारखून घेण्याची आवश्यकता आहे. अशी निवडक सॉफ्टवेअर आहेत इथं.

शिकवणं, विद्यार्थ्यानं त्याच्या टॅबलेटवरती ऐकणं, समजून घेणं, सराव करणं... पुन: पुन्हा पाहणं, ऐकणं- असं इथं होतं. विद्यार्थी हे वाट्टेल तेवढ्या वेळा करू शकतो.  आज एक टॅबलेट स्मार्ट बोर्डशी जोडलेला असतो. शिक्षक त्याच्या साह्यानं शिकवतात. संदीपला हे काम वायरलेस करायचं आहे; म्हणजे टॅबलेट हातात घेऊन वर्गात फिरत शिक्षक शिकवू शकतील. प्रत्येक मुलाचा टॅबलेट स्मार्ट बोर्डशी जोडायचा आहे.

विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठीही संदीपनं हेच तंत्र वापरलंय. विद्यार्थ्यांच्या चित्रांचं, कागदावरच्या लेखी कामाचं स्कॅनिंग करायचं. त्यानं केलेल्या मॉडेलचे फोटो काढायचे. त्याच्या भाषणाचे, तोंडी परीक्षेचे फूटेज, स्क्रीनशॉ ट हे साठवायचं. अशी डिजिटल संचिकाही झाली. याला उंदीर खाणार नाहीत, की वाळवी लागणार नाही.

‘कौन बनेगा करोडपती’ हा गाजलेला टीव्ही शो. असाच खेळ, तसाच अमिताभसारखा आवाज, सामान्यज्ञानावरचे प्रश्न, पडद्यावर मिळणारी बक्षिसं... यात मुलं रंगून जातात. सामान्यज्ञान वाढवतात.

हे सगळं प्रत्येक मुलाला दिलं जात नाही. एकाला दिलं की, तो दुसऱ्याला शेअर करतो. विद्यार्थ्याला एकदम सगळं दिलं जात नाही. एकदम दिलं, तर तो नुसतंच उत्सुकतेनं बघणार. अर्धवट समजणार अन्‌ एक ना धड-भाराभर चिंध्या, असं होणार. म्हणून एक-एक कृतिघटक दिला जातो.

शाळा-व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष नयनाताई आल्या. खूप आग्रह केल्यावर खुर्चीत बसल्या. माझ्याशी मोकळेपणानं गप्पा मारू लागल्या. शाळा-व्यवस्थापन समिती काय करते? विचारल्यावर म्हणाल्या,

‘‘आमचं पहिलं काम- विद्यार्थी काय करतात, हे बघणं. नंतर शिक्षक-विद्यार्थ्यांच्या अडचणी, परिसर स्वच्छता. पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. महिला शाळेत येत नव्हत्या. विद्यार्थी पडला, कोणी मारलं, सरांनी बोलावलं; तरच शाळेत यायचं धाडस करणार. शिक्षक म्हणजे आमच्याकडे देव. शिक्षक असे दिसले की, आमच्या महिलांनी अस्सा पदर घ्यायचा (नयनातार्इंनी डोक्यावरून पदर घेऊन दाखविला). सरांच्याकडे बघायचंसुद्धा नाही. खाली मान. एवढी बेकार कंडिशन होती. अशी खुर्चीत बसलेली महिला तुम्हाला दिसलीच नसती. आता मीटिंगला आल्यावर तेवढ्यापुरतं बसतात. पालक पूर्वी मुलाकडं लक्ष देत नव्हते; आता देतात. माझा मुलगा लवकर उठला पाहिजे, शाळेत गेला पाहिजे.’’

संदीप आणि त्या वेळचे त्याचे सहकारी शिक्षक पंढरीनाथ डोंगरे यांनी हे सगळं मुळापासून बदलण्यासाठी प्रयत्न केले. इथला पुरुष लावणी, कापणी आणि उत्सवापुरता दिवसा गावात. एरवी रोज ऐंशी-नव्वद किलोमीटर प्रवास करून ठाणे गाठायचं. दिवसभर रंगकाम, आचारी किंवा इतर काम करून रात्री उशिरा परतायचं. परत पहाटे उठायचं. गावात दिवसभर फक्त स्त्रिया, वृद्ध आणि मुलं. या जोडीनं प्रथम महिला सक्षमीकरणाचं काम हातात घेतलं. हळदी-कुंकू, आरोग्यविषयक व्याख्याने, मार्गदर्शन आणि संपर्क. उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा. पावसाळ्यात गढूळ पाणी. दूषित पाणी उकळून प्यायला शिकवलं. गावात दवाखाना नाही. आठ-दहा किलोमीटर दूर डोळखांबला जावं लागतं.

संदीप म्हणतो, ‘‘आपण करतो ते काम शेवटच्या व्यक्तीपर्यंत नेलं पाहिजे; मग अख्खा गाव तुमच्या पाठीशी उभा राहतो. त्यांना आम्ही दाखवलं की, आम्ही तुमची किती काळजी करतो. मुलं म्हणायची, ‘माझी आजी मिसरी घासते.’ आम्ही त्यांच्या घरी गेलो. झडपा घालून मिसरी आणली. तिची होळी केली. त्यांना फिल्म दाखवली. ‘तुमच्या आरोग्यावर, पोटावर कसा परिणाम होतो बघा.’ जगन मिस्त्रींची तंबाखू सुटली. लोकांना जाणीव झालीय- या लोकांना आमची, मुलांची काळजी आहे. आता आमचा शब्द पूर्व दिशा असतो. हे काम करायला डोंगरेगुरुजींना आणि मला सहा-सात महिने लागले.’’

संदीप या शाळेत हजर झाला, त्याची कहाणीही मजेशीर आहे. त्याला पंचायत समिती कार्यालयात नकाशावर पाडा दाखवला. पोपटमध्ये बसायला सांगितलं. पोपट म्हणजे पोपटी रंगाची बस. तो पोहोचला दुसऱ्याच पष्टेपाड्यावर. पुन्हा वरात शहापूरला. आता जिप्सी पकडली. टप्पे करत फाट्यावर. ऑगस्टचा पाऊस. झाडी, डोंगर. फाट्यावरून कच्च्या रस्त्यानं दीड किलोमीटर पाडा. पाडा कुठे दिसेना. संदीप परत फिरला. जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटला. ‘‘मला चांगलं काम करायचंय, शाळा बदलून द्या.’’

ते म्हणाले, ‘‘चांगलं काम करायचं, तर तिथं करा. तुमच्या मागे खूप वेटिंग आहे. आम्ही काय आमंत्रण द्यायला आलो नव्हतो.’’ गरज होती. पष्टेपाडा स्वीकारला. सूर्यरावगुरुजी वाटच बघत होते, कोण हजर होतंय याची. संदीप आला आणि संदीपला हेडमास्तर करून ते बदलून दुसरीकडे गेले.

संदीप कधी तरी बँकेत गेलेला आणि हातात आला पासबुकांचा गठ्ठा, कीर्द, खतावणी- दप्तरच दप्तर. दडपणच दडपण. शेवाळलेल्या भिंती, गळकं छप्पर. पोरांच्या डोक्यांपेक्षा गळणाऱ्या जागी ठेवलेल्या डब्यांची संख्याच  जास्त. वाटायचं- शाळा शहराजवळ असावी, रेल्वे स्टेशन जवळ असावं, शैक्षणिक पात्रता वाढवावी. या परिस्थितीत आधार दिला तो केंद्रप्रमुख दिमते यांनी. त्याचं दप्तराचं काम स्वत: केलं. त्यांनी पूर्वी यापेक्षाही दुर्गम भागात काम केलं होतं. संदीप म्हणतो, ‘‘दिमतेसर कामाच्या मर्यादेच्या पुढे जातात. एखाद्या शाळेवर शिक्षक नसतील, तर स्वत: शिकवतील. आम्ही त्यांना आमचे तिसरे शिक्षक समजतो. अर्थात, सूर्यरावगुरुजींनीही लेखन-वाचनात मुलं तयार केली होती.’’

संदीप इंग्रजी विषयाचा पदवीधर आहे. मराठीतून एम.ए. केलंय. परंतु, त्याच्या कामानंच त्याचे विचार प्रगल्भ झाले आहेत. तो म्हणतो, ‘‘मी माझी शैक्षणिक पात्रता वाढवणं बंद केलंय. आता मला असा अनुभव आलाय की, तुमच्याकडे डॉक्टरेट पदवी असली तरी तुम्ही प्रामाणिकपणे केलेल्या मोठ्या कामाला फार किंमत आहे. आजचा अनुभव असा आहे की, कोणत्याही सेमिनारमध्ये लोक इतके प्रभावी होतात की, एखादा डॉक्टरेट झालेला माणूस बोलूनही लोक प्रभावित होणार नाहीत. डिग्रीपेक्षा प्रॅक्टिकल कामाला किंमत आहे. जे काही करायचं, ते सहविचारानं करायचं. नंतर डोंगरेसर हजर झाले. त्यांची आणि माझी जोडी जमली. सरांनी हात पुढे केला की, मी टाळी द्यायची; मी हात पुढे केला की, त्यांनी टाळी द्यायची. आमच्या तिघांच्या समन्वयाने काम पुढं गेलं.’’

दिमते म्हणाले, ‘‘डोंगरेगुरुजींना Computer मधला उ कळत नव्हता. पहिलीतल्या मुलांनी त्यांना माऊस धरायला शिकवला. ते आता व्हीडिओ फिल्म तयार करतात. आज डोंगरे या शाळेत नाहीत. ते बढतीने दुसऱ्या शाळेत गेलेत, पण आपल्या कामाचा ठसा ठेवून.’’

डी.एड.ला असताना संदीपला संगणकाची आवड लागली. ICT केंद्रातील निकुंबसरांनी प्रेरणा दिली. हवं ते करण्याची, कितीही वेळ बसण्याची संधी दिली. पहिल्या प्रॅक्टिकलला की- बोर्डवरील ध सापडला नव्हता. तो म्हणाला, ‘‘यामध्ये ध नाही.’’ त्या वेळी अख्खं कॉलेज त्याला हसलं होतं. तो PPT बनवायला शिकला. गरजेनुसार शिकत गेला- एकलव्यासारखा. इंटरनेटचा वापर. मूव्ही मेकरमधून फिल्म बनवता येऊ लागली. आत्मविश्वास वाढला.

शाळेत संगणक घेण्याचा विषय नकळत आला. मुलांची उपस्थिती कमी असायची. शोध घेतला तर लक्षात आलं- मुलं घरात टीव्हीसमोर बसलेली असतात! मुलांना आवडतं ते शाळेत दिलं तर?

‘दुर्गसखा’ या संघटनेत गड-किल्ले स्वच्छता मोहिमेत केंद्रप्रमुख दिमते सहभागी असतात. त्यांच्याकडून देणगी स्वरुपात संगणक मिळवला. शाळेत E-Learning सुरू झालं आणि जे-जे सुचत गेलं, ते-ते गरजेनुसार बदलत- बदलत कामानं उंची गाठली. आज शाळेत 13 मुले, 8 मुली असा पट आहे. प्रत्येक मुलाजवळ टॅबलेट आहे. शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे एल.सी.डी. प्रोजेक्टर, टचस्क्रीन, स्मार्ट बोर्ड, वीज गेली तर सत्तर हजार रुपयांची सोलर सिस्टम, शिवाय छोट्या दोन पॅनलवर चालणारी बॅटरी- हे सगळं लोकसहभागातून.

शाळेत संगणक आला. पाठ्यपुस्तकावर आधारित सीडी आणल्या. स्वत: काम केलं. केलेल्या कामाचं संशोधनात रूपांतर. त्याच्यासाठी इंग्रजी विषय निवडला. नवोपक्रम स्पर्धेत सहभाग नोंदवला. विद्या परिषदेनं पारितोषिक देऊन गौरव केला. दिमते यांनी विस्तार अधिकाऱ्यांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. मग संदीपला दुसरं स्वप्न पडलं.

शाळेत आता एलसीडी प्रोजेक्टर आणि पडदा पाहिजे. माहितीपत्रक छापलं, केलेलं काम सांगितलं. काय करणार आहे, हे सांगितलं. दि. 26 जानेवारी- प्रजासत्ताकदिनाचा कार्यक्रम. पालकांपुढे प्रस्ताव मांडला. काहींनी ऐकला, काहींना कळला. एक महिला उठून गेली. निर्मला पष्टे. यांना वाटलं, त्यांचं काही काम असेल किंवा यातलं त्यांना काही कळलं नसेल. त्या परत आल्या. बंद मूठ उघडली... टेबलवर चुरगळलेल्या नोटा! भविष्याच्या तरतुदीची पुंजी-हजार रुपये! ‘‘तुम्ही काय म्हणता, मला कळत नाही. तुम्ही चांगलं काम करताय, एवढं कळलं. माझ्या मुलीच्या भल्याचं करताय.’’ तिथल्या पालकांनी हजार-हजार रुपये द्यायचं ठरवलं. सरपंच श्री. पष्टे यांनी पुढाकार घेतला. स्वत:चे पाच हजार रुपये ठेवले. त्या दिवशी चौदा हजार रुपये जमा झाले आणि पुन्हा मागं वळून पाहावं लागलं नाही.

काम करायचं, काम दाखवायचं, पैसे मागायचे- हे सूत्र. रंगीत झेरॉक्स, छोटे बुकलेट, व्हीडिओ... ज्याच्याजवळ जे आहे, ते त्यांनी दिलं. रंगकाम करणाऱ्यांनी रात्रभर जागून शाळा रंगवली. कधी रोजगार बुडवला. वायरमननी लाइट फिटिंग करून दिली. महिलांनी माती दिली, बाग केली. कोणी बाग खुरपून दिली, तर कोणी खड्डा काढला. संदीप, डोंगरे आणि दिमते यांनी नातेवाइकांकडे नऊ पावतीपुस्तकं दिली. असे 30-35  हजार रुपये जमा झाले... 50 हजार जमा झाले! संदीपचं नेटवरती काय घ्यायचं, कसं घ्यायचं याचा शोध घेणं सुरू होतं. त्यानं एके ठिकाणी स्मार्ट बोर्डचं प्रात्यक्षिक पाहिलं. त्याचा मेंदू काम करू लागला... अरे, याचा वापर आपल्या मुलांसाठी असा-असा करता येईल! खर्च वाढला... 85 हजार रुपये. परत सगळे गावकऱ्यांसमोर गेले. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तीस हजार रुपये जमा झाले होते. मंदिराचा जीर्णोद्धार नंतर, अगोदर शिक्षणाचा उद्धार!

शाळेत स्मार्ट बोर्ड आला. विजेचा प्रश्न होताच. कधी लपंडाव, तर कधी बिल आकारणी. शाळेचं फेसबुक अकाऊंट काढलं. पष्टेपाड्यात मोबाईलला रेंज नसते. टाटा इंडिकॉमची एखादी काडी कधी तरी सापडते. शहापूरला गेलं की, एखादी पोस्ट टाकायची. ‘वीजबिल आणि विजेच्या प्रश्नाबाबत सोलर सिस्टम बसविण्याची कल्पना’ अशी पोस्ट फेसबुकवर टाकली. शाळेचं कामही होतं. श्रद्धा मेहता (पुणे) यांनी आपल्या लग्नाचा स्वागत समारंभ रद्द केला. त्याचे 70,000/- रुपये या कामाला दिले.

चांगल्याच्या पाठीशी चांगले उभे राहतात. वाईटही भेटले, हिणवून बोलले. शिक्षणक्षेत्रातलेच बोलले. एका अधिकाऱ्यांना काम दाखवायला गेल्यावर ते म्हणाले, ‘‘मला माझ्या बायकोशी बोलायला वेळ नाही; तुमचं कधी पाहू? आता आलाच आहात, तर इथं चांगली बाग आहे. आणखी काय आहे, ते बघून जा.’’ काही म्हणाले, ‘‘हे काय सुरू केलंय पैसे (भीक) मागायचं?’’ हिणवून बोलायचे. आम्ही अशा बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. आमच्या कामाशी संबंध नसलेला, जाणीव नसलेला कोणी काही म्हणाला तरी लक्ष द्यायचं नाही, असं ठरवलं. गावकऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळाला. आमचा समन्वय चांगला आहे. वाईटांवर आम्ही हसलो. आम्ही कोणाचं पाहून काम केलं नाही. पारंपरिकतेला फाटा दिला. आमचा ब्रँड वाटेल, असं काम केलं. आम्हाला आता मदत मागण्याची गरज वाटत नाही; मदत आपोआप मिळते.

असेच कामातून केळकर भेटले. संदीप फोनवर एवढं बोलतोय म्हटल्यावर त्यांनी त्याच्या मोबाईलवर दीड हजाराचा रिचार्ज मारला. शाळा बघून गेले. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे विवेक सावंत. त्यांच्या व्याख्यानाला घेऊन गेले. सरांचं व्याख्यान ऐकून संदीप प्रभावित झाला. टॅबलेटचा वापर करून शिकवायची कल्पना विवेक सावंत यांची. या पद्धतीचा ते जोरदार पुरस्कार करतात. हे काम एका पाड्यावर संदीपनं करून दाखवलं. आता पुढचा रोडमॅप विवेक सावंत यांनी संदीपला दिलाय, त्या दिशेनं त्याची वाटचाल सुरू आहे. विवेक सावंत यांच्या प्रेरणेनं हे काम आणखी उंची गाठणार आहे.

शाळेत सौर ऊर्जा असली तरी प्रत्येक शाळेला सत्तर हजारांचा खर्च झेपणं शक्य नाही. शिवाय ढगाळ वातावरणात बॅटरी हवी तेवढी चार्ज होत नाही. संदीपनं अनेक बॅटऱ्या वापरल्या, वेगवेगळे प्रयोग केले. आता एक बॅटरी त्यानं असेम्बल करून घेतली आहे. ती घरातील विजेवर चार्ज करता येते. शिवाय दोन छोट्या पॅनेलवर सूर्यप्रकाशातही चार्ज होते. त्यानं असा प्रोजेक्टरही नेटवरून शोधलाय, जो कमी व्होल्टेजवर चालेल. तो त्यानं Online मागवलाय, बाहेरच्या देशातून. आपल्याकडे तो मिळत नाही. मिळाला, तरी चायनामेड. योग्य ब्रॅन्डचा नाही. संदीपची असेम्बल बॅटरी सात हजार रुपयांची आहे. त्या बॅटरीवर हा प्रोजेक्टर चालेल. विजेचा खर्च शून्य. एक टॅबलेट यात समाविष्ट केला की, वाडी-वस्तीवर E-Learning सुरू. महाराष्ट्रातील सर्व शाळांना हे युनिट देण्याचा शासनाचा विचार सुरू आहे. अर्थात, काही हिस्सा लोकसहभागातून मिळविण्याची जबाबदारी शाळांवर आली.

संदीप म्हणतो, ‘‘या कामात शिक्षकांना पठरावस्था कधी येते, बिल भरायला पैसे नाहीत म्हणून. कधी कधी टेक्निकल बिघाड होतात. मी स्वत: करेन किंवा तज्ज्ञाकडून करून घेईन. सहनशीलता ठेवायला हवी. हे बिघडलंय, दुरुस्त केलं नाही, मी वापरणार नाही- म्हणून धूळ खात पडलेली किती तरी उदाहरणं आहेत. काहीही झालं तरी मी करणार. हरणार नाही. मला फार येतंय असं नाही, पण मी शिकणार.’’

संदीपनं प्रत्येक प्रश्नाला उत्तर शोधलंय. खासदार निधीतून टॅबलेट मिळविले. चार्जर, हेडफोन, स्टॅण्ड यासाठी लागणारी रक्कम त्यानं त्याला मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून खर्च केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांचा युवा सामाजिक पुरस्कार या कामाला उपयोगी पडला (2014). सन 2015 चा देशपातळीवरचा सृष्टी सन्मान राष्ट्रपती भवनमध्ये स्वीकारण्याचा मान त्याला मिळालाय. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्यासमोर सौर ऊर्जा आणि शाळेतलं काम सादर करण्याची संधी मिळालीय.

कसंबसं लेखन-वाचन येणाऱ्या मुलांच्या हातात त्यानं महागडी साधनं दिली. पुस्तक फाटेल आणि चार्ज देताना  अडचण निर्माण होईल, म्हणून कपाटातून पुस्तके बाहेर न काढणारे मुख्याध्यापकही याच महाराष्ट्रात आहेत. ज्या पुस्तकांची किंमत एक-दोन आण्यांपासून काही रुपयांपर्यंत असते; आणि दुसऱ्या बाजूला नम्रपणे सलाम करावा असा शिक्षक जादूगार असतो- संदीप गुंड!! याच्या बोटांतील जादू मुलांच्या बोटांत उतरते. मुलांची बोटं स्क्रीनवर फिरतात. उमटतात रंगीबेरंगी अक्षरं, चित्रं आणि प्रकाशमान भविष्य! मुलांना किती आनंद देतो हा डिजिटल साने गुरुजी!

या शाळेत थ्री-डी प्रोजेक्टर आहे. नेटवरून थ्री-डी चित्रपट डाऊनलोड करून घेतले आहेत. हे चित्रपट पाहण्यासाठीचे खास चष्मे आहेत. चित्रपटातल्या चेंडूनं उसळी मारली की, तो पकडायला हात उंचावतात मुलं. किती आनंददायी अनुभव! हा अद्‌भुत अनुभव इतर शाळेतील मुलांना ते देतात. त्यासाठी शनिवार, रविवार आहे. शाळा-व्यवस्थापन समित्यांनीही हा अनुभव घ्यावा.

शाळा-व्यवस्थापन समित्या इथून ऊर्जा घेऊन जातात. आता हे एका शाळेचं काम राहिलेलं नाही, याचं अभियानात रूपांतर झालं आहे. याला संदीपनं नाव दिलंय- डिजिटल स्कूल अभियान!

मोकळ्या वेळेत गारुड्याच्या टोपलीसारखी संदीप त्याची बॅग उचलतो. त्यामध्ये त्याचा लॅपटॉप आणि वळवळणाऱ्या सापासारख्या वायर्स असतात. तो या उपक्रमाचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रभर करतोय. आपली स्टोरी सांगतोय. दुसरी स्टोरी तयार होतेय. वाघाच्या वाडीत गावकीची पूजा होती- वर्षातून एकदा होणारी पूजा. निरक्षर लोक. संदीपनं डिजिटल गारूड केलं. पूजेसाठी जमा झालेले 70,000 रुपये लोकांनी शाळेला दिले. आदीवली गावातल्या तरुणांनी या उपक्रमासाठी लकी ड्रॉ ठेवला. दीड लाख शिल्लक राहिले, ते शाळेला दिले.

संदीप म्हणतो, ‘‘लोक खूप काम करतात, पण मांडत नाहीत. का? स्वत:पुरतं मर्यादित ठेवलं, तर तुमच्या हुशारीचा फायदा होणार नाही. काम मांडल्याने तुमचं काम पुढं जातं आणि इतरांना प्रेरणा मिळते.’’

इथं कुणबी, कातकरी समाज आहे. डोंगरात राहणारा, भातशेती करणारा, मासे पकडणारा, जंगल-झुडपांत वावरणारा, निसर्गातील शक्तीला शरण जाणारा, त्यांची पूजा करणारा. या शक्तीवर, शक्तीच्या चमत्कारावर विश्वास ठेवणारा. इथं अठरा प्रकारचे देव वेगवेगळ्या माणसांच्या अंगात येतात. देवाचं वारं अंगात येतं. असं वारं अंगात आलं की, अद्‌भुत शक्ती येते. वेगवेगळ्या देवांची वेगवेगळी हत्यारं आहेत. चिमटा, आसूड, खिळ्याचं टोक वरती आलेल्या वहाणा. अंगात देवाचं वारं आलं की; त्या माणसाला चिमट्यानं कितीही मारा, आसुडानं मारा- काहीही होत नाही. खिळ्यांवर नाचलं तरी जखमा होत नाहीत. अशा समजुती.

इथल्या मुलांच्याही अंगात देवाचं वारं शिरायचं. कुणाच्या अंगात कानिफनाथ, तर कुणाच्या अंगात वेताळ. कुणाच्या अंगात गावदेव, तर कुणाच्या अंगात विठाबाई. विठाबाईचं ठाणं तर शाळेच्या आवारातच आहे. गावात लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीचा, तेलाचा कार्यक्रम असतो. वाद्य वाजू लागलं की, या ठराविक लोकांच्या अंगात वारं शिरतं. असं वारं शिरणारे लोक एकमेकांना मदत करतात. एकाच्या अंगात ठराविक देवाचं वारं आलं की, दुसरा देव त्याला त्याच्या ठिकाणापर्यंत घेऊन जातो. मग वारं जातं.

कुलदैवताला लोक जाऊन आले. रात्री गावात गोंधळ घातला आणि त्या दिवशी वाद्याच्या तालावर अंगात शिरून सगळे देव नाचू लागले. देव नाचताना बघून काही मुलांच्याही अंगात वारं शिरलं. अशा लोकांच्या घरी देवाचं अधिष्ठान असतं. इतर त्यांच्या पाया पडतात. मान, प्रतिष्ठा मिळते. आपल्या मुलाच्या अंगात देवाचं वारं शिरतंय, हे पालकांना प्रतिष्ठेचं वाटू लागलं.

अंगात देव आला की, अद्‌भुत शक्ती संचारते. देव माती उकरतो; झाडाला घट्ट मिठी मारतो, ती दुसऱ्याला सोडवता येत नाही. छोटा मुलगा शाळेतला बाक उचलू शकतो. या सगळ्यांचं मुलांना कुतूहल असतं. संदीपनं त्याच्या गावात अशा चमत्काराच्या गोष्टी बघितल्या होत्या. घरावर दगड पडतात. लोक त्यांना भानामती समजतात. दगड मारणारा लोकांच्यातच असतो. एकदा गावात देव अंगात आलेला देवळाभोवती प्रदक्षिणा घालू लागला. देवळाच्या भिंतींना रंगीबेरंगी बल्ब लावून रोषणाई केली होती. अंगात देव आलेला प्रदक्षिणा घालताना त्या माळा गोळा करू लागला. दोन वायर्सची जोडणी झालेल्या ठिकाणी त्याचा हात लागला. जोरदार शॉक बसला आणि तो देवही तिथंच बसला!

या अनुभवाचा उपयोग मुलांना शहाणं करण्यासाठी केला. तो मुलांना म्हणाला, ‘‘चला, आपण देव-देव खेळू.’’ संदीप वाजवू लागला. अंगात वारं शिरणारे नाचू लागले. सोंग आणू लागले. संदीपनं विचारलं, ‘‘देवाला विजेचा शॉक लागेल का?’’ मुलं म्हणाली, ‘‘नाही.’’ संदीप म्हणाला, ‘‘चला, मग आपण देवाला शॉक देऊन  बघू!’’ शॉकचं नाव काढताच अंगात देव आलेले पळाले. संदीप अशा अंधश्रद्धांवर मुलांना हसायला शिकवतो. हुशार आणि चांगल्या मुलातला फरक सांगतो. परिपाठाच्या वेळी अशा गोष्टींवर गप्पा मारतो. मोठ्यांना आपण बदलू शकत नाही; पण या छोट्यांना बिघडण्यापासून वाचवू शकतो, हा विश्वास त्याच्याजवळ आहे. शिक्षकांनी या गोष्टी समजून घ्यायला हव्यात. महाविद्यालयातील मुलंही काही वेळा बालिश भाष्य करतात, असं तो म्हणतो.

नितीन शाळेतून पळून जायचा. लांब डोंगरावर जायचा, पठारावर पळायचा. त्याला पकडायला त्याच्यामागे संदीपगुरुजी आणि गुरुजींच्या मागे अख्खी शाळा. त्याच्या आईनं तो नुसता पळतो म्हणून भगताकडं नेलं. ताईत बांधला. मी नितीनला विचारलं, ‘‘तू का पळायचास?’’ तर तो म्हणाला, ‘‘घाबरायचो.’’ कुणाला; तर गुरुजींना. का? तर अभ्यास केला नाही म्हणून. आईला वाटायचं, देवाचं आहे. अभ्यासाचं आहे, हे तिला माहीत नव्हतं. संदीपनं नितीनला मित्र दिले- अभ्यास पूर्ण करून घेणारे मित्र. आता नितीन पळत नाही, अभ्यास करतो.

विठ्ठलाच्या देवळात मी, संदीप, दिमते, मुलं जमलो. संदीपच्या शाळेतल्या दुसऱ्या शिक्षिका सुनीता ठेंगर या दीर्घ मुदतीच्या रजेवर आहेत. त्या भेटल्या नाहीत. त्यांच्याजागी तात्पुरते आलेले संदीप मदगे आमच्याबरोबर होते. काही ग्रामस्थही होते. मुलांनी इथं मला कविता गाऊन दाखवल्या. गावकऱ्यांशी आम्ही गप्पा मारल्या. त्यांना शाळेचं कौतुक आहे.

इथं पेरणीपूर्वी बकऱ्याचा बळी देतात. देवाला साद घालतात. प्रत्येकाच्या बांधाला वेगळा देव आहे. त्यांचा नैवेद्यही वेगळा आहे. कुणाला दोन मोठ्या व एक छोटी भाकरी, कुणाला खोबऱ्याची वाटी. कुणाला सर्पदंश झाला की, इकडं देवाचं वारं अंगात शिरतं. साप चावलेल्या ठिकाणी देव घास घेतो. विष ओढून घेतो. साप चावलेलं देवाला बरोबर कळतं. ‘मेसेज येतो’ असं एक जण म्हणाला. रात्री बारापर्यंत साप चावलेल्या माणसाला बसवून ठेवायचं. झोपू द्यायचं नाही. झोपलं की विष चढणार. बारानंतर एक भाकरी आणि कांदा खायला द्यायचा. ताईत फोडायचा. देव धुवायचा. भंडाऱ्याचं पाणी पाजायचं. कितीही विषारी साप असला तरी उतरणारच, असा समज.

प्रमोद आणि त्याचे मित्र आले. ते आता माध्यमिक शाळेत शिकायला जात होते. प्रमोदच्या अंगात देवाचं वारं शिरायचं. ते संदीपनं थांबवलं होतं. माध्यमिक शाळेत गेल्यावर परत त्याच्या अंगात देव येऊ लागला होता. बसण्याचा बाक उचलून शक्ती दाखवत होता. किशोर वयातला प्रमोद माझ्याजवळ बसला- बिलगून. प्रमोदनं वक्तृत्व स्पर्धेत बक्षिसं मिळवली आहेत. तो कलाकार आहे. मी त्याला विचारलं, ‘‘आता देव अंगात येतो का?’’ नाही म्हणून त्यानं मान हलवली.

दारुड्यानं दारू पीत नाही असं सांगताना लबाडी लपविण्यासाठी आव आणावा, तसा प्रमोदचा आव होता. थोडा लाजला, थोडा बावरला पण. मी त्याच्या खांद्यावरून हात टाकून त्याला जवळ धरलं होतं. माझी बोटं त्याच्या दंडाला बांधलेल्या ताईतावर होती. प्रमोद सर्वांचा पम्या. त्याला अपराधी वाटत होतं. ‘‘देशात जेवढी म्हणून मोठी माणसं आहेत, त्यांच्या अंगात देव येतो का?’’ मी विचारलं. त्याला पटलं होतं. तो ‘नाही’ म्हणाला. मी त्याला घेऊन बाजूला आलो. त्याच्या कानाला लागलो. म्हणालो, ‘‘आता देव अंगात आणू नकोस.’’ इथून पुढं नाही, असं तो म्हणाला. मी त्याला म्हणालो, ‘‘तू खूप मोठा हो. महाराष्ट्रातल्या सर्वांनी तुला ओळखलं पाहिजे.’’ मी जाहीर करून टाकलं- ‘‘आज मला कशाचा जास्त आनंद झाला असेल, तर तो प्रमोद भेटल्याचा.’’

नेट, वाय-फाय, मोबाईलचे मेसेज- असं जगाचं ज्ञान या छोट्यांना देऊन चांगली मुले बनविण्यासाठी संदीप धडपडतोय. तिथंच देवाचाही मेसेज येतोय. पाणी उकळून प्यायला तो सांगतोय आणि दुसऱ्या बाजूला ताईत फोडून, देव धुऊन ते पाणी सर्पदंश झालेल्या माणसाला पाजलं जातंय.

संदीपनं वर्गखोल्यांत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवले आहेत. बहुवर्ग अध्यापन करत असताना दुसऱ्या वर्गातील मुलं काय करत आहेत, याकडं लक्ष देता येतंय. शिक्षक समोर असताना जशी मुलं वागतात, तशीच शिक्षक नसताना वागतील असं नाही. शिक्षक समोर नसताना ती अधिक खरी वागतात. कोणत्या मुलाचं काय कसं बदलायचं, हे त्याला ठरवता येतं. संदीप तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनात करत असला, तरी तो तांत्रिक बनलेला नाही. त्याच्यातला माणूस सतत जागृत आहे. मुलाला माणूस बनवणं, हे त्याचं ध्येय आहे. त्यासाठी त्याची धडपड आहे. या ध्येयवेड्या गुरुजीला पुन: पुन्हा सलाम!

Tags: डिजिटल शाळा ई-लर्निंग संदीप गुंड नामदेव माळी डिजिटल पाडा : पष्टेपाडा शाळाभेट Digital School E-Learning Sandeep Gund Namdeo Mali Digital Pada: Pashtepada ShalaBhet weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नामदेव माळी,  सांगली, महाराष्ट्र
namdeosmali@gmail.com

शिक्षण क्षेत्रात वर्ग दोनचे अधिकारी, कादंबरीकार व शैक्षणिक लेखक.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके