डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

परीक्षेमध्ये प्रथम आलेल्या चाळीस शिक्षकांना महाराष्ट्रातील अभिनव शैक्षणिक उपक्रम व तज्ज्ञांच्या भेटी घडविल्या जातात. नंतरच्या शंभर शिक्षकांना प्रेरणादायी पुस्तके भेट दिली जातात. प्रथम दोनशे विद्यार्थी व शंभर शिक्षकांसाठी वर्षातून दोन वेळा विनाशुल्क कार्यशाळा घेतल्या जातात. विद्यार्थी व शिक्षकांसाठी वेगळी पुस्तके असतात. शिक्षक, विद्यार्थी, पालक अशा 98700 व्यक्तींना 1,33,000 प्रती देण्यात आलेल्या आहेत- त्याही फक्त चार वर्षांत.

  ‘इमानाला इसरला, त्याले नेक म्हणू नही

जन्मदात्याला भोवला, त्याले लेक म्हणू नही!’

‘कशाले काय म्हणू नही’ या बहिणाबार्इंच्या कवितेतील या ओळी आहेत. या कवितेत शिक्षक कोणाला म्हणू नये, याविषयी ओळी नाहीत. मला वाटतं- जो पाठ्यपुस्तका-शिवाय इतर पुस्तके वाचत नाही; विद्यार्थ्यांसाठी वाचनालयाची कपाटे उघडी ठेवत नाही त्याला शिक्षक म्हणू नये. काही अपवाद वगळता पुस्तकांवर तुटून पडणारे, स्वत:चं शेकडो पुस्तकांचं ग्रंथालय असणारे, विद्यार्थ्यांसाठी वाचनाचे प्रयोग करणारे शिक्षक दिसत नाहीत. मग दीपस्तंभ फाउंडेशनसारख्या संस्थेला वाचनासाठी अभियान उभारावं लागतं. यजुर्वेंद्र महाजन संचालक असलेले जळगावचे हे फाउंडेशन प्रामुख्याने स्पर्धा परीक्षांमधून देशप्रेमी अधिकारी, उत्तम नागरिक, आत्मविश्वास आणि जबाबदारीचे भान असणारे तरुण उभा करण्याचं काम करते. ‘शिक्षणातील दुसरी क्रांती गुणवत्तेची’ असं म्हणणाऱ्या या संस्थेमार्फत ‘दीपस्तंभ आत्मविश्वास व प्रेरणा वाचन अभियान’ चालवलं जातंय. शिक्षक आणि विद्यार्थी या अभियानात आपला सहभाग नोंदवू शकतात.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कार रुजविणे, मोठी स्वप्ने- सकारात्मक विचार- आत्मविश्वास निर्माण होणे, देशासाठी सर्व क्षेत्रांत प्रामाणिक- कर्तव्यदक्ष- सुसंस्कृत नेतृत्व निर्माण करणे, ही ध्येये विद्यार्थ्यांसाठी ठेवली आहेत.

शिक्षकांना चांगली पुस्तके वाचावयास मिळावीत व वाचनाची अधिक गोडी लागावी, शिक्षणातील अभिनव प्रयोग-व्यक्तिमत्त्व-विकास इत्यादींचा आवाका यावा, कर्तव्यदक्ष-सर्जनशील शिक्षकांचे व्यासपीठ तयार होऊन शिक्षणाची गुणवत्ता वाढावी आणि शिक्षकांना तज्ज्ञ व्यक्तीद्वारे प्रशिक्षण मिळावे, ही शिक्षकांसाठी उद्दिष्टे आहेत.

अभियानात सहभागी झालेल्या विद्यार्थी व शिक्षकांना ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर दर वर्षी ठराविक पुस्तके दिली जातात. या पुस्तकांवर आधारित परीक्षा घेतली जाते. विद्यार्थ्यांसाठीची परीक्षा 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या शाळेत घेतली जाते. पुस्तकांचे वाचन व्हावे, आवड निर्माण व्हावी, नवे वाचक तयार व्हावेत हे यातून अभिप्रेत आहे. त्यामुळे ही परीक्षा पास-नापासाचा शिक्का मारत नाही. जे विद्यार्थी पुस्तके विकत घेऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी वेगळी सवलत व योजना आहे. शाळेच्या ग्रंथालयास एक संच दिला जातो. परीक्षेचे आयोजन करणाऱ्या शाळेस नियोजनखर्च दिला जातो. अल्प अशी फी भरून या अभियानात शाळा सहभागी होऊ शकतात.

परीक्षेमध्ये प्रथम आलेल्या चाळीस विद्यार्थ्यांना तीन दिवस दिल्ली सहल घडवली जाते. राष्ट्रपती, पंतप्रधान, प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या भेटी घडविल्या जातात. राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी, एनडीए, सायन्स सेंटर इत्यादी संस्थांना भेटी दिल्या जातात. नंतरच्या चाळीस विद्यार्थ्यांना पुणे भेट. पाचशे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पुस्तके आणि लहान सोलर लॅम्प, शब्दकोश, पृथ्वीगोल यांसारखे शालेय साहित्य भेट दिले जाते.

परीक्षेमध्ये प्रथम आलेल्या चाळीस शिक्षकांना महाराष्ट्रातील अभिनव शैक्षणिक उपक्रम व तज्ज्ञांच्या भेटी घडविल्या जातात. नंतरच्या शंभर शिक्षकांना प्रेरणादायी पुस्तके भेट दिली जातात. प्रथम दोनशे विद्यार्थी व शंभर शिक्षकांसाठी वर्षातून दोन वेळा विनाशुल्क कार्यशाळा घेतल्या जातात. विद्यार्थी व शिक्षकांसाठी वेगळी पुस्तके असतात. शिक्षक, विद्यार्थी, पालक अशा 98700 व्यक्तींना 1,33,000 प्रती देण्यात आलेल्या आहेत- त्याही फक्त चार वर्षांत.

या वर्षीही हे अभियान सुरू आहे. 30 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करावयाची आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांतून खूप मोठा प्रतिसाद या अभियानाला मिळत आहे. हे अभियान महाराष्ट्रभर पसरायला हवे, वाचन चळवळीचे वादळ उठायला हवे. यासाठी शिक्षकमंडळींनी या अभियानात उडी घ्यायला हवी, अभियानाचे नेतृत्व करायला हवे. शिक्षकांना इतिहास घडविण्याची संधी आहे.

दीपस्तंभ वाचन संस्कार व प्रबोधन संस्था

42 हाउसिंग सोसायटी, सहयोग क्रिटिकल हॉस्पिटलजवळ, जळगाव.

संपर्क क्र. : 0257-2242299

Tags: नामदेव माळी वाचन चळवळीचा दीपस्तंभ विधायक वाटा Namdeo Mali Vachan Chalwalicha Deepsthambh Vidhayak Vata weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नामदेव माळी,  सांगली, महाराष्ट्र
namdeosmali@gmail.com

शिक्षण क्षेत्रात वर्ग दोनचे अधिकारी, कादंबरीकार व शैक्षणिक लेखक.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके