डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी पाहावी अशी मालिका...

या मालिकेमध्ये एकेका कथेमधून रचनावादाचं एकेक सूत्र उलगडत जातं. कधी क्षेत्रभेटीमधून, कधी निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या आजोबांकडून, तर कधी पाड्यावरच्या लाडाबाईकडून. इथं बिनभिंतीची शाळा दिसते.

सह्याद्री वाहिनीवर शनिवारी रात्री 10 वाजता आणि रविवारी सकाळी 9.30 वाजता ‘माझी शाळा’ ही मालिका सुरू आहे. रचनावादी शिक्षणपद्धतीचे वस्तुपाठ ह्या मालिकेच्या विविध भागांत आपल्याला दिसतात. ज्ञानरचनावाद, रचनावादी शिक्षण असे शब्द उच्चारले तरी आपल्या भुवया उंचावतात. सर्वसामान्य शिक्षकांना वाटते, ‘हे कधी शक्य आहे काय? खरे तर मी पूर्वीपासून शिकवतोय, तेच ठीक आहे. कोणी सांगितलीय ती कटकट!’ रचनावादावर प्रभुत्व मिळविलेली तज्ज्ञ मंडळीही हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच. रमेश पानसे हे त्यांतलं ठळक नाव. अधिक अधिकारवाणीनं काम चालवणारं, बोलणारं आणि लिहिणारं. गीता महाशब्दे, नागेश मोने, व.सी.देशपांडे, सीमंतिनी धुरू, विवेक मॉन्टेरो ही काही नावं कोल्हापूरची. डॉ.लीलाताई पाटील यांची ‘सृजन आनंद’, पुण्याची अक्षरनंदन, फलटणची मंजिरी निंबकर यांचे कमाल निंबकर विद्यालय, ग्राममंगलच्या शाळा, पुण्याची ज्ञानप्रबोधिनी- अशा काही मोजक्या शाळा; ज्यांना प्रयोगशील म्हणावं. यातून येणारा ज्ञानरचनावाद. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाने अभ्यासक्रमाची पुनर्रचना केलीय. आनंदाची बाब म्हणजे ‘बालभारती’ने रचनावादी पद्धतीने शिकण्यास योग्य अशा इयत्ता पहिली-दुसरीच्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली आहे.

प्रतिभा भराडे या सातारच्या विस्तार अधिकारी. त्यांनी रमेश पानसे यांच्या मार्गदर्शनाखाली एक वर्ष अगोदरच त्यांच्या भागामध्ये रचनावाद राबवलाय आणि तो यशस्वी केलाय. असा एखादा अपवाद वगळता रचनावाद पाहिजे तितका शाळांमध्ये मुरला नाही, कारण शिक्षकांमध्ये तो मुरलेला नाही. सामान्य पालक शिक्षकांवर विसंबून आहे. मूल शाळेत जातेय म्हणजे ते शिकतेय, असं त्यांना वाटतंय. सुज्ञ म्हणवणारे पालक खासगी शिकवण्यांच्या इमारतींची उंची वाढवत आहेत. विद्यार्थी मुके बिचारे हाताची घडी, तोंडावर बोट.

आजचा शिक्षक रचनावादाचा वापर करताना चाचपडत आहे, असे वाटते. अशा या काळात सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांनी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना सह्याद्री वाहिनीवर चांगली संधी उपलब्ध करून दिली. त्याला महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने प्रायोजक होऊन समर्थ साथ दिली.

‘माझी शाळा’ या मालिकेमध्ये एकेका कथेतून ज्ञानरचनावाद म्हणजे काय, तो प्रत्यक्षात कसा राबविता येतो, मूल कसं शिकतं, त्याला शिकण्यासाठी काय हवं असतं, चांगला शिक्षक विद्यार्थ्यांना अनुभव देऊन कसा समृद्ध करतो, शिक्षण कशासाठी- या प्रश्नांची उत्तरे मिळतात. पुन: पुन्हा उच्चार म्हणजे पाठांतर. इथं ‘का?’ ‘कसे?’ अशा प्रकारचे प्रश्न विचारावयाचे नाहीत. म्हणून कर्णाला ऐन वेळी मंत्र आठवला नाही. एकलव्याची शिकण्याची पद्धत म्हणजे रचनावाद. जुने विचार कालबाह्य नाहीत, पण काळाबरोबर नवे प्रवाह सामील करून घ्यायला पाहिजेत. या मालिकेचे शीर्षकगीतही रचनावादाची ओळख करून देते. घंटानादाने गीत सुरू होते.

अवकाशाच्या रिंगणात पृथ्वीचा चेंडू

माणसाचं पोर तिथे खेळे विटी-दांडू

माणसाच्या पोराचा मेंदू फार भारी

का, कसं, असं कसं, शंका ते विचारी

प्रश्नांच्या बियांना उत्तरांचे कोंब

पोर शिके आपोआप कशाला ही बोंब

नाही शिक्षा, नाही परीक्षा

नाही भीती, ना कंटाळा

बोलते, डोलते, खेळते, रमवून घेती मला

हवीहवीशी, रंगीबेरंगी साद घाली मला

माझी शाळा, माझी शाळा!  

विद्यार्थ्यांमध्ये समस्या निवारण्याची चिरंतन अशी ताकद निर्माण करणे, हे शिक्षणाचे एक उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षकाने द्यावयाचे आणि विद्यार्थ्याने घ्यावयाचे, असे होत नाही. ‘गुरुविण कोण दाखवील वाट?’ हा प्रश्न इथे नाही. अनुभव हा मोठा गुरू आहे, असे म्हणतात. हे रचनावादाच्या बाबतीत तंतोतंत खरे आहे.

या मालिकेच्या पहिल्या भागात जुन्या काळातील विलक्षण गुरुजी ‘मॉडेल ॲन्सर’वर विश्वास न ठेवणारे, प्रत्येकाने आपलं उत्तर स्वत:च शोधलं पाहिजे असा आग्रह धरणारे. त्यांचा नातू अमल, आजी त्याला आजोबांच्या डायऱ्या वाचायला देते. अमल प्रेरणा घेऊन शिक्षक व्हायचं ठरवतो.

दुसऱ्या भागात शिक्षक व्हायला, शिकवायला घाबरणारा, खचून गेलेला कैलास आहे. त्याला अनुभवातून उभा राहिलेला विद्यार्थी जगण्याचं रहस्य उलगडून दाखवतो. ‘‘मपल्या बापानं कर्जापायी झाडाला टांगून जीव दिला. तवा मला न्‌ माझ्या आईला असंच झालं होतं. आई म्हणी, हे काय खरं न्हाय. आपल्याला हातपाय हयतं, डोकं हाय. मग मी स्वत:च स्वत:चं नाव शाळंत टाकलं.’’

मुक्त शिक्षण संशोधन केंद्रात एकत्र आलेले शिक्षक रचनावाद शिकत, चर्चा करत, अनुभवत मुलांना असे शिकवतात. पुढे कैलास चर्चा, अभ्यास, नाट्यीकरण, यांतून इतिहासासारखा विषय रचनावादी पद्धतीने आनंददायी करतो.

रमेश पानसे हे त्यांच्या ‘रचनावादी शिक्षण’ या पुस्तकात म्हणतात... बुद्धिमत्ता एक नसते, अनेक असतात. प्रत्येकालाच सर्व बुद्धिमत्ता उपजत असतात. प्रत्येकातच कोणती तरी बुद्धिमत्ता तीव्र असते. ज्ञानप्राप्ती हाच मुलांचा छंद असतो. जन्मापासून जग समजून घेण्याचा प्रयत्न मुले करत असतात. मनुष्य वास्तव जगाची, त्याचे आकलन करून घेण्याची रचना आपली आपणच करीत असतो. ही ज्ञानरचना आपल्या स्वत:च्या अनुभवाकरवी आणि आलेल्या अनुभवांना प्रतिसाद देत-देत, त्यावर स्वत:च्या प्रतिक्रिया नोंदवीत तो करीत असतो. सतत नवनव्या अनुभवांना सामोरे जाणे, हे माणसाचे निसर्गदत्त कार्य असते. कोणत्याही नव्याने पुढे आलेल्या अनुभवाचा आशय लक्षात घेणे, तो आपल्या पूर्वानुभवांशी- त्यांच्या स्वनिर्मिती आशयाशी- जोडून घेणे, त्यातून आपल्या मूळच्या तत्संबंधी आकलनात आवश्यक बदल करणे; म्हणजेच आपल्या आधीच्या ‘समजे’ची नवीन रचना साकारणे, आपल्या श्रद्धा-विश्वास-मते-दृष्टिकोन यांत आवश्यक ते बदल करणे- या गुंतागुंतीच्या प्रक्रियेकरवी ज्ञानाची नवरचना किंवा ज्ञानाची नवनिर्मिती होत जाते. ज्ञानरचनावादाची ही मूलभूत भूमिका आहे.

शिकणाऱ्याची भावनिक अवस्था विस्कळीत नसणे, भावनिक ताणाखाली नसणे किंवा भावनिक दृष्ट्या स्थिरतेची अवस्था असणे, ही कोणत्याही बौद्धिक कामाची पूर्वअट आहे. प्रत्येक विद्यार्थी स्वत:ची ज्ञाननिर्मिती स्वत: करीत जातो. शिक्षकवर्ग हा विद्यार्थ्याच्या ज्ञाननिर्मितीस साह्य करतो. ‘शिकायला शिकणे’ हे आणि असे विचार रमेश पानसे यांच्या ‘रचनावादी शिक्षण’ या पुस्तकात आहेत. या विचारांची पेरणी ‘माझी शाळा’मध्ये आपणास पाहावयास मिळते. विशेषत: ‘शिक्षण कशासाठी?’ या भागामध्ये बघणाऱ्यांचा रचनावादाचा पाया तयार होतो. ‘

बड्‌डे’ हा भाग शिक्षकांचे डोळे उघडायला लावणारा  आणि डोळ्यांत पाणी उभं करणारा आहे. आईने अनुभव झेललेले. तिला ज्ञानरचनावाद म्हणजे काय, हे माहीत नाही; परंतु विचार आणि कृती रचनावादी. एक आई शंभर शिक्षकांचं काम करते, हे इथं खरं ठरतं- तंतोतंत. मुलगी सोना वाढदिवसाच्या दिवशी गणवेश न घालता येते, नवा रंगीत फ्रॉक घालून. तिच्या पूर्वीच्या शाळेत हे चालायचं. ती पूर्वानुभवानुसार वागली तर इथले शिक्षक तिला समजून न घेता खडूसपणे तिचा अपमान करतात. उशीरा शाळेत आली, म्हणून वर्गाबाहेर बसवतात. मुलांचे निबंध त्यांच्या अनुभवांवर आधारित असतात. इंटरनेटवरून कांगारूंची माहिती मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास ते कॉपी केली असे म्हणतात. सोनाने ‘माझा आवडता प्राणी’ या विषयावर माणसाच्या प्रगतीची माहिती लिहिलेली असते. माणूस हा प्राणी आहे, हे त्यांना मान्य होत नाही. ते सोनाचा निबंध रागाने फाडतात. मी म्हणेन तेच शिकायचं, तेच खरं. शिक्षक तिला बाहेर बसून दहावा धडा पाच वेळा लिहायला सांगतात. शिक्षक वर्तनवादी, विद्यार्थी-पालक रचनावादी- असं विसंगत चित्र.

या मालिकेमध्ये एकेका कथेमधून रचनावादाचं एकेक सूत्र उलगडत जातं. कधी क्षेत्रभेटीमधून, कधी निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या आजोबांकडून, तर कधी पाड्यावरच्या लाडाबाईकडून. इथं बिनभिंतीची शाळा दिसते.

आपल्या परीनं शाळांमध्ये प्रकल्प, कृती, उपक्रम, क्षेत्रभेटी असे अनुभव देऊन उपक्रमशील शिक्षक अध्यापनात रचनावादाचा वापर करत आहेत. ज्यांना समजलंय-गवसलंय, त्यांच्यासारखा दुसरा आनंदी शिक्षक नाही. तसेच अशा शिक्षकांच्या शाळेत धाडसी, धडपडी, बडबडी, आनंदी मुलेही हमखास दिसतील.

रचनावादाचं सार्वत्रिकीकरण व्हायचं असेल; तर शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी ही मालिका आवर्जून पाहावी. प्रत्येक शाळेत मालिकेचे भाग डीव्हीडी करून दिल्यास दुधात साखर.

Tags: Dnyanprbodhini Gramamagal Shala Kamaal Nimbakar Vidyalay Manjiri Nibakr Akshrnandan Srujan Anand Dr.Lilatai Patil Vivek Montero Simanteeni Dhuroo C.Deshpande Nagesh Mone Geeta Mahashbade Ramesh Panse Majhi Shala Namdev Mali Dakhal ज्ञानप्रबोधिनी ग्राममंगल शाळा कमाल निंबकर विद्यालय मंजिरी निंबकर अक्षरनंदन सृजन आनंद डॉ.लीलाताई पाटील विवेक मॉन्टेरो सीमंतिनी धुरू सी.देशपांडे नागेश मोने गीता महाशब्दे रमेश पानसे माझी शाळा नामदेव माळी दखल weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नामदेव माळी,  सांगली, महाराष्ट्र
namdeosmali@gmail.com

शिक्षण क्षेत्रात वर्ग दोनचे अधिकारी, कादंबरीकार व शैक्षणिक लेखक.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके