डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

किती किती बघायचं शाळेचं!  अहो अजून खूप आहे. दिवसभर शाळेत थांबलात तरी  बघून संपणार नाही आणि  कंटाळाही येणार नाही. गीतमंच  बघा ना. गाताना मुलं तल्लीन होऊन डोलतात. त्यांना  डोलताना बघितलं,  गाताना ऐकलं की आपणही पायाचा  ठेका धरतो. डोलतो. गुरुजी  पेटी वाजवतात. ढोल,  पडघम, झांजरी या वाद्यसहित्याने साथ करतात मुलं. काय,  चुकतोय  का ठेका?  आपल्या काळजाचा  ठोका चुकेल,  पण मुलांच्या  वाद्यांचा चुकणार नाही.  कवितागायन पहा,  वक्तृत्व पहा, प्रिया मोरेचं यशवंतराव चव्हाणांच्यावरचं भाषण ऐका.  झांजपथक,  लेझीम,  लाल- पिवळ्या गणवेशात खोखो  खेळणारी मुलं. तो बघा रवींद्र  कातकऱ्याचा मुलगा कसा  हातावर भोवरा फिरवतोय,  हा कातकऱ्याचा पोर कसा  हातावर चालतोय. कसं वाटतंय  वृश्चिकासन?  

 

आपण साताऱ्याहून महाबळेश्वरला जायला निघालो की,  पश्चिमेला जावळी तालुका सुरू  होतो. साताऱ्यापासून 25 किमी अंतरावर मेढा हे जावळी तालुक्याचं मुख्यालयाचं गाव. अजून  थोडं पश्चिमेला चला. फार नाही तीन किलोमीटर. बघा उजव्या हाताला एक रस्ता फुटलाय.  झाडांची फांदी फुटल्यासारखं वाटतंय ना?  रस्त्याच्या दुतर्फा किती छान झाडं लावली आहेत.  त्याला ट्रीगार्डही बसवलेत. हे गुरुजींचं काम बरं का!  मुख्य रस्त्यापासून शाळेपर्यंत चांगली दीड- दोन फर्लांगापर्यंत झाडं लावली आहेत. मंदिराचा कळस पाहिलात का?  हे केदारेश्वराचं मंदिर.  त्याच्या शेजारीच विद्यामंदिर. दोन्हीही देखणी. गावाला अभिमान वाटावा अशी. शाळा आतून  बाहेरून सुंदर. शाळा-शिक्षक-विद्यार्थी सगळं सुंदर. नैसर्गिक देखणेपण. नटवेपणा नाही. जीव  लावून उभारलंय ना सगळं. कुठेही कसूर नाही. मंदिरालगत शाळेचं प्रवेशद्वार. भक्कम लोखंडी  कमान. विद्या विनयेन शोभते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मामुर्डी. चला, आत पाऊल टाका.

ही शाळा आहे असं वाटत नाही ना. दोन्ही बाजूंना ओळीनं उभे  राहिलेले कात्री पाम तुच्याकडे बघून हसताहेत. अशोक सलाम करताहेत. कडेनं किती छान  विटा लावल्यात गुरुजींनी. पुढे सुंदर बाग दिसतीय ना,  म्हणून फसलात. बागेत गेल्यावर आणखी  आश्चर्यचकित व्हाल. डाव्या हाताला बघा. पुरुषभर उंचीची दगडी भिंत रंगवली आहे. त्याच्या  वरची सहा इंचाची सिमेंट गिलाव्याची पट्टी पिवळ्या रंगानं रंगवली आहे. त्यावर काय लिहिलंय  वाचा. झाडांना जगवाल तर सुखाने जगाल. आरोग्याची गुरुकिल्ली- शुद्ध हवा शुद्ध पाणी.  शाळेसमोरच्या दोन एकरांच्या मैदानाची सीमा ठरवणाऱ्या या भिंती. गुरुजींनी भिंत देखणी  केलीय. दगडी भिंत बोलते आपल्याशी. शाळेसमोरचं हे मैदान पूर्वी नव्हतं बरं का. उंच टेकडी होती इथं. सन 03-04 साली  लोकसहभागातून सहा शिक्षकांनी टेकडी काढली आणि खड्डा बुजवला.

आता इथं पहिली ते  सातवीच्या वर्गात 56 मुलं आणि 40 मुली स्वयंअध्ययनात रमतात. मुलांच्यापेक्षा सोळा मुली कमी दिसताहेत. मुला-मुलींचे मिश्र गट वर्गांत आहेत. पाचवी ते सातवीच्या वर्गात वाकून बघा. बाकावर एक मुलगा एक मुलगी अशी बैठक व्यवस्था केलीय. मुलांच्या बरोबरीनं मुली खेळात, गाण्यात,  सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होत आहेत. जिल्हा स्तरावरचं 14 वर्षांखालील खो  खोचं बक्षीसही मिळवलंय मुलींनी.  अरे हो,  तुम्हाला हे सांगितलं पण बागेत जायचं राहिलं. बागेत जाण्यापूर्वी कंपाउंडच्या लागतची अशोकाची,  गुलमोहराची झाडं बघा. झाडासमोर बसण्यासाठी केलेले कट्टे पहा. दोन कट्‌ट्यांच्यामध्ये लोखंडी पाईप उभा केलाय. पाईपच्या टोकाला वर्तुळाकार डिजिटल पोस्टर  बघा. वाघ, सिंह,  हत्ती,  उंट,  काळवीट,  गवा,  शेकरू,  कांगारू बघा. पक्षी?  आहेत ना,  भारव्दाज  पोपट,  सुतारपक्षी, अगदी घुबडसुद्धा. चला बागेत. हो,  पण तुच्याजवळ कचरा असेल तर त्या निळ्या ड्रममध्ये टाका. त्यावर  काय लिहिलंय वाचा. माझा खाऊ मला द्या,  लोखंडी पाईपवरचं ती 3/2 आकाराची डिजिटल चित्रं बघा. फांदीवरची पोपटाची जोडी त्या अक्षराकडे बघतीय.  एका दगडाने दोन पक्षी मारण्यापेक्षा  एकाच फांदीवर दोन पक्षी झुलविले तर  फांदीलाच पक्ष्यांचा झोपाळा  बांधल्यासारखे नाही का होणार?  

आणखी पहा,  तुकाराम महाराज- वृक्षवल्ली आम्हा सोयरी,  ज्ञानेश्वर- जो खंडावया घाव घाली, रामदास- नाना वल्लींमध्ये  जीवन. किती छान आणि आकर्षक आहेत ही चित्रं. कडेनं सोनेरी दुरांडा. बागेत जाताना सिमेंट ब्लॉक किती छान  बसवलेत. स्वत: गुरुजींच्या हातांनी केलंय हो सगळं. तो खर्च शाळेला परवडणारा नव्हता ना! चला आतमध्ये. ख्रिसमस ट्रीज्‌भोवताली  वर्तुळाकार बसलेले मोरपंखी पहा. मुलांनी मानवी मनोरा केल्यासारखं  दिसतंय ना. तिथून बागेत किती वाटा फुटल्यात?  वाटांच्या कडेच्या  विटांचा रेखीवपणा पहा. विविध रंगी शोची झाडे आणि रोपटी पहा. पामचे विविध प्रकार पहा. बदाम,  सायकस, शिंदी,  जास्वंदी,  सदाफुली,  पपई आणि कितीतरी झाडं नियोजनपूर्वक सौंदर्यदृष्टी ठेवून  लावली आहेत. तुच्याबरोबर कोणी लहान मूल आहे का?  नाही  म्हणजे इथं त्याच्यासाठी घसरगुंडीही आहे. खेळणी आहेत. आहे की नाही चाईल्ड फ्रेंडली सगळं. वर्गात जाऊ या म्हणताय?  चला,  बागेच्या शेजारी पहिली- दुसरीचे वर्ग एकाच खोलीत बसताहेत. संगणकही याच खोलीत  आहेत. वर्गात जाण्यापूर्वी भिंतीवरची शोकेस बघा. तिथं लावलेली  मुलांनी काढलेली छान छान चित्रं बघा. गांधीजींची,  तुकोबारायांची  माहिती वाचा.

हां आता चला वर्गात. मुलं रांगेत बसली नाहीत.  पहिली-दुसरीची मुलं असून वर्ग वेगवेगळे दिसत नाहीत. वर्गाला  काही शिस्त नाही असं वाटतंय ना! अहो,  फसलात तुम्ही. प्रत्येकाजवळ स्वत:चं दप्तर आहे. हातात स्वाध्याय कार्ड आहे.  प्रत्येकजण स्वयंअध्यनात दंग आहे. आपल्याला समजत नाही ते. मित्राकडून समजून घेणं चाललंय. प्रत्येकजण गणवेशात आहे. गळ्यात टाय अडकवलाय. मुलींनी केसांत बेल्ट अडकवलाय. किती  हसरे चेहरे आहेत त्यांचे! वर्गखोल्या म्हणजे गोठा नाही. अहो जमीन  बघा ना. निळ्या-जांभळ्या रंगात फरशीवर षट्‌कोनी आकार काढले  आहेत. संदर्भफलक,  प्रदर्शन फलकावर मुलांनी रंगवलेला विदूषक,  हरिण,  सैनिक आहे. त्याच्याखाली शैक्षणिक साधने स्वाध्याय  कार्डस,  कार्यानुभव साहित्य ठेवण्यासाठी कडाप्याचे दोन फूट उंचीचे  रॅक. प्रदर्शन फलकाच्या वर इतर साहित्य, बालवाचनालयाची  पुस्तकं ठेवण्यासाठी प्लायवूडचे रॅक. वर्गात दोन फळे. एक काळा,  दुसरा पांढरा. काळ्यावर पांढऱ्या आणि इतर रंगांच्या खडूंनी इंग्रजी  आणि गणिताचं लेखन केलंय. किती सुबक मांडणी, गुरुजींचं देखणं  अक्षर मुलांच्यात उतरणारच.

फळ्यावर मार्कर पेननं सिंह आणि  उंदराच्या गोष्टीचे फक्त मुद्दे आहेत. पहिलीतली 12 पैकी सहा मुलं  गोष्ट तयार करतात. प्रत्येकाच्या कल्पनेप्रमाणं गोष्ट तयार होते त्यामुळे प्रत्येकाची गोष्ट वेगळी असते. इथल्या सिंहाकडे मोबाईल  आणि उंदरांकडे  मारुती गाडी असली तर आश्चर्य वाटू देऊ नका. आनंददायी वाचनप्रकल्प गुरुजींनी राबलाय. चित्र,  नाव,  आकारसंबंध ओळखणे,  वाचन,  लेख असं शिकवलं मुलांना.  त्यांची आकलन क्षमता वाढवली. आज जानेवारी महिन्यात 7  मुलांना जोडाक्षरांची ओळख झालीय.  दुसरीच्या वर्गाचं काय?  बघा ना तुम्हीच. मराठी इंग्रजीच्या  कविता ऐका. इंग्रजी वाचन घ्या. चित्रवाचन प्रकल्प समजून घ्या.  चित्रवाचनानं कल्पकतेला वाव मिळतोय. वाक्यरचना करता येते.  क्रियापद लिंग यांचा योग्य वापर करता येतो. आकलनक्षमता,  भाषेवर प्रभुत्व,  बोलकेपणा,  संवादकौशल्य आणि आत्मविश्वास!  शाब्बास गुरुजी शाब्बास! पण हे दोन्ही वर्ग,  तेवीस मुलं, शंभर  टक्के ठणठणीत वर्ग,  हे सगळं कसं काय शक्य झालं बुवा?  लेखन-वाचनाचा पाया भक्कम केला. संख्याज्ञान भक्कम केलं. आता स्वयंअध्ययनावर भर,  गटपद्धतीचा वापर.

सकाळी साडेनऊ ते  सहा वाजेपर्यंत शाळेत असतो आम्ही. पन्नास-साठ टक्के काम विद्यार्थी शिक्षकांच्या अनुपस्थितीत करतात. आमचं शिकवण्याचं  काम कमी होतं. अहो, होणारच काम. गोटा,  मणी,  चित्र आणखी काय काय आहे  त्यांना अभ्यास करायला. अभ्यास कसला,  खेळ वाटतोय मुलांना आणि खेळ कोणाला आवडत नाही? छान! गुरुजी कौतुक आहे तुमचं. नाव काय म्हणालात?  संजीवन निकम... भाऊ राजकारणात आहेत. व्वा! तरी तुमचं इतकं चांगलं  काम. याला म्हणायचं निष्ठा.  बघा हो, आपण चार-सहा लोक वर्गात आहोत. आपलं बोलणं,  चर्चा सुरू आहे.  तरीसुद्धा सगळी मुलं शांतपणे आपापलं काम करत  आहेत. गटकार्य,  स्वयंअध्ययनात गुंग आहेत. सवयीशिवाय आणि  सातत्याशिवाय असं वळण लागतं का?  आणि तेही या कोवळ्या  वयात.  चला,  जरा तिसरी- चौथीच्या वर्गात डोकावू या. इथं शशिकला दळवी वर्गशिक्षिका आहेत. अख्खा वर्ग बोलका  केलाय. चित्रं,  तक्ते,  उठावदार,  स्वच्छ. या शाळेतल्या प्रत्येक वर्गात चित्र आखीव-रेखीव,  एकाच मापाची,  रंगसंगती साधलेली आहेत.  त्यामुळं प्रत्येक तक्ता  आणि चित्र उठावदार दिसतंय. आपली नजरही  खिळून राहते. पांढऱ्या रंगाच्या वापरामुळं स्वच्छ आणि प्रसन्न  वाटतं. कोपऱ्यात बघा. मुलांनी केलेल्या साहित्याचं प्रदर्शन पहा.  कार्यानुभवाचं साहित्य किती नेटकेपणानं मांडलंय बार्इंनी. इथला  कोपरा न्‌ कोपरा बोलतोय आपल्याशी. मुलं हावभाव करून मुक्तपणे नाचत किती सुंदर कविता गात आहेत!

नाट्यीकरण,  पाढे-पाठांतर,  चौथीच्या वर्गातील मुलाचं पन्नासपर्यंतच्या संख्यांचं वर्गपाठांतर.  आश्चर्य वाटतंय ना?  अहो इतकी तयारी होते म्हणून शिष्यवृत्ती  परीक्षेचा निकाल चांगला असतो. त्याचबरोबर दर वर्षी गुणवत्ता यादीत चमकतात मुलं. शशिकला दळवी आणि रघुनाथ दळवी हे  दोघे पति-पत्नी या शाळेत आहेत. मन लावून संसार करावा तसं  शाळेत जीव लावलाय त्यांनी. या दांपत्यानं आजपर्यंत एक मुलगा  आणि दोन मुली शिक्षणासाठी दत्तक घेतल्यात. वनिता मुकणे ही  कातकऱ्याची मुलगी. वडील अंध, आईविना वाढलेली पोर.  जंगलात फळं,  कंदमुळं शोधणं आणि शिकारीच्या पाठीमागं धावणं,  कसंबसं पोट भरणं,  दारिद्य्राशी झगडणं. व्यसन करून तात्पुरता विसावा मिळवणारी,  सभोवताली फाटकी माणसं. जंगल हीच शाळा  असणाऱ्या या मुलीला दळवी दांपत्याच्या रूपानं आई-वडील लाभले. आज वनिता साताऱ्यातील कॉलेजमध्ये शिकते. कदाचित  बारावीपर्यंत शिकलेली या भागातील कातकऱ्याची ही पहिलीच  मुलगी असेल.  अहो हे जावळी खोरं आहे. हे शिक्षक शिवरायांचे मावळेच. राजांनी रयतेची काळजी घ्यावी तसे हे मावळे कातकऱ्यांच्या मुलांनी  शिकावं म्हणून धडपडताहेत. या मुलांकडून ते कसलीही फी घेत  नाहीत. त्यांना गणवेश, लेखनसाहित्य मोफत देतात. त्यांचा खेळात  सहभाग असतो. या मुलांना आज शिक्षणाची गोडी वाटतेय.

रघुनाथ दळवींनी पाचवी ते सातवीला काय इंग्रजी शिकवलंय!  त्यांचा इंग्रजी कक्ष बघा. 79 चार्ट आहेत. त्यांचं मुलांच्याकडून नियमित वाचन आणि सराव केला जातोय. गुरुजी स्वत: चाऊस  डिक्शनरी, ऑक्सफर्ड डिक्शनरीचा वापर करतात. शिवाय व्याकरण  आणि इतर इंग्रजी पुस्तकांचा संग्रह गुरुजींनी वर्गात ठेवलाय.  शासनाने पुरविलेली ‘माय फर्स्ट इंग्लिश मराठी डिक्शनरी’ बाईडिंग करून घेतलीय. प्रत्येक मुलाला एक प्रत दिली आहे. बऱ्याच  शाळांतून ती आम्हांला घाबरून पळून गेलीय. दररोज एक पान इंग्रजीचं. त्याची चाचणी,  आठवड्याला झालेल्या भागाची उजळणी  चाचणी. का तयारी होणार नाही मुलांची?  पाचवी ते सातवीच्या सर्व  मुलींना कोणतंही वाक्य द्या. सर्व काळांत वाक्य फिरवतील. प्रश्नार्थक वाक्य तयार करतील. इंग्रजी वाक्याशी खेळतात इथली  मुलं. बोटावर काळ नाचवतात. किती किती बघायचं शाळेचं! अहो अजून खूप आहे. दिवसभर  शाळेत थांबलात तरी बघून संपणार नाही आणि कंटाळाही येणार नाही. गीतमंच बघा ना. गाताना मुलं तल्लीन होऊन डोलतात. त्यांना डोलताना बघितलं,  गाताना ऐकलं की आपणही पायाचा ठेका  धरतो. डोलतो. गुरुजी पेटी वाजवतात. ढोल,  पडघम,  झांजरी या वाद्यसाहित्याने साथ करतात मुलं. काय, चुकतोय का ठेका?  आपल्या काळजाचा ठोका चुकेल पण मुलांच्या वाद्यांचा चुकणार  नाही. कवितागायन पहा, वक्तृत्व पहा,  प्रिया मोरेचं यशवंतराव  चव्हाणांच्यावरचं भाषण ऐका. झांजपथक,  लेझीम,  लाल-पिवळ्या गणवेशात खोखो खेळणारी  मुलं. तो बघा रवींद्र कातकऱ्याचा मुलगा कसा हातावर भोवरा  फिरवतोय,  हा कातऱ्याचा पोर कसा हातावर चालतोय. कसं वाटतंय वृश्चिकासन?  

या पहा अंजली आणि रूपाली. दोघी कातकरी बरं  का. धावण्यात जिल्ह्याला खेळल्या. नैसर्गिक शक्तीचा,  कौशल्याचा  छान उपयोग करताहेत ना गुरुजी?  पाच मुलं आणि दोन मुली खेळात  आघाडीवर आहेत.  गुरुजींनी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी हिंदुस्थान पेट्रोलियम  कंपनीकडून बेंच मिळवलेत. एक एक बाक 7500/-  रुपयाचा आहे. 7 टेबलं,  7 खुर्च्या.  साडेतीन लाख रुपयाचं काम केलंय  गुरुजींनी. प्रयोगशाळा बघायची राहिली. बघा,  सुगरणीच्या घरट्यापासून  किडनीच्या मॉडेलपर्यंत सगळं आहे प्रयोगशाळेत. हे घरटं पक्षी  स्थलांतरित झाल्यानंतरचं आहे बरं का. मराठी,  इंग्रजी माध्यमाची  सोय असूनही इतर ठिकाणच्या 22 मुलांनी या शाळेत प्रवेश  घेतलाय. काय म्हणालात?  प्रत्येक शिक्षकाने वर्षातून अशा पाच शाळांना भेट द्यायला पाहिजे?  हो,  अशा शाळा,  असे गुरुजी बघायला पाहिजेत. माझा या  गुरुजींना एक प्रश्न आहे. मी म्हणतो- एवढं सगळं तुम्हाला कसं काय  जमलं हो?  ऐका ऐका,  गुरुजींचं उत्तर ऐका.  ‘आम्ही सगळे झोकून देऊन काम करतो.’  अहो,  म्हणून तर इथे दगड,  माती, भिंती,  ढोल,  झाडं,  पानं,  फुलं,  मुलं सगळ्यांना कंठ फुटलाय. ते आपल्याशी बोलताहेत.  अशा शाळेला प्रत्येकाने भेट द्यायला हवी ना?  तर मग आता सगळ्यांना बोलवा, ‘चला चला,  मामुर्डीची शाळा बघायला चला.’

Tags: सदर साधना सदर शाळाभेट नामदेव माळी shalabhet sadhana sadar namdeo mali weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नामदेव माळी,  सांगली, महाराष्ट्र
namdeosmali@gmail.com

शिक्षण क्षेत्रात वर्ग दोनचे अधिकारी, कादंबरीकार व शैक्षणिक लेखक.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके