डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वसाहत गरिबांची असली तरी येथील शाळा श्रीमंत आहे. याचं कारण या शाळेचा पट पन्नास आणि शिक्षक अठरा आहेत. त्यापैकी इयत्ता पहिली ते चौथीमध्ये पंधरा शिक्षक शिकत आहेत. दोन शिक्षक सरकारी पगार घेणारे आहेत. एका शिक्षकांना ग्रामस्थ आणि शिक्षक मानधन देतात. एका शिक्षकांना कसलाही पगार अगर मानधन नाही. ते निरक्षर आहेत. निवृत्ती चव्हाण यांचं नाव. यांना तिसरा शिक्षक म्हणून ओळखतात इथं.

आता आपण सांगलीकडून इस्लामपूर साताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहोत. नेमकं सांगायचं तर सांगलीपासून बारा किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूला आकाशवाणीचा टॉवर दिसतोय, तर उजव्या बाजूला महाराष्ट्रात ग्रामस्वच्छता अभियानात प्रथम आलेलं तुंग हे गाव. तिथून एक-दीड किलोमीटर पुढे येऊन कच्च्या रस्त्याने पूर्वेला जाऊया. छोटीछोटी कौलारू घरे पहा. चांदोली धरण झाल्यानंतर जमीन जागा अभयारण्यासाठी घेतली. त्यामुळं विस्थापित झालेली कुटुंबं इथं स्थिरावली आहेत. इथं भोगीव आणि वित्ती या दोन गावची कुटुंबं आहेत. या एकत्रित वसाहतीचं नाव विठ्ठलाईनगर. विठ्ठलाई देवीचं नाव गावाला दिलंय.

 या गावातल्या सर्वच कुटुंबांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. काहींना पैसे मिळाले नाहीत. काहींना जमीन मिळाली नाही. मजुरी करून, कष्ट करून हे लोक जगत आहेत. वसाहत गरिबांची असली तरी येथील शाळा श्रीमंत आहे. याचं कारण या शाळेचा पट पन्नास आणि शिक्षक अठरा आहेत. त्यापैकी इयत्ता पहिली ते चौथीमध्ये पंधरा शिक्षक शिकत आहेत. दोन शिक्षक सरकारी पगार घेणारे आहेत. एका शिक्षकांना ग्रामस्थ आणि शिक्षक मानधन देतात. एका शिक्षकांना कसलाही पगार अगर मानधन नाही. ते निरक्षर आहेत. निवृत्ती चव्हाण यांचं नाव. यांना तिसरा शिक्षक म्हणून ओळखतात इथं.

या शिक्षकांची ओळख करून घेण्यापूर्वी जरा शाळेच्या परिसरात फेरफटका मारू या. आपण हिरव्या मंडपाखालून शाळेत प्रवेश करतो. या मंडपावर गुरुजींनी वेल चढवायला सुरुवात केलीय. उजव्या हाताचा बोर्ड पहा. ‘उत्पत्ती गावाची संस्कृती शाळेची’ या शीर्षकाच्या खालचा मजकूर वाचा. ‘गाव हा विश्वाचा नकाशा. गावावरून देशाची परीक्षा.’ पुढचा मजकूर वाचाल तर तुच्या लक्षात येईल, या शाळेतले गुरुजी कोणत्या भावनेने आणि किती जिव्हाळ्याने काम करतात ते. कृष्णात पाटोळे तुंग गावचे. सातत्याने व्याख्यानमाला, रक्तदान, वाचनालय असे उपक्रम करणाऱ्या जिव्हाळा ग्रुपचे कार्यकर्ते. तो जिव्हाळा या शिक्षकांनी शाळेतही जपलाय.

या फलकावर गुरुजींनी लिहिलंय, निसर्गाच्या सान्निध्यात व डोंगराच्या कुशीत राहून कोकणाशी साधर्म्य साधणारी या लोकांची संस्कृती जोपासण्यासाठी शाळेने कोकण संस्कृतीचे दर्शन घडविले आहे. यामध्ये साकव, उतरते छप्पर, कोकणी वास्तू झुलता पूल, बांबूचे कुंपण, सडासांर्जन, औषधी वनस्पतींची लागवड आदींचा समावेश आहे. या उपक्रमामधून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन अनुभूतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे व मूळ मातीचा सुगंध मुलांच्या मनामनात दरवळावा ही अपेक्षा!

आता फिरवा सभोवार नजर. बघा नारळ कसे डोलताहेत. आंबा, फणस, देवदार, काजू, गुलमोहोर, गूळभेंडी... किती झाडं लावली आहेत. झाडावर वेली चढल्या आहेत, वाढल्या आहेत. चांदोली परिसरातील जैव विविधता इथं आणलीय. वाटतंय ना अभयारण्यात गेल्यासारखं. आंबा झाडांची काळजी कशी घ्यावी याविषयीचे छत्रपती शिवरायांचे आज्ञापत्र वाचा. आरमारास तक्ते, सोट, डोलाच्या काट्या आदीकरून थोर लाकूड असावे लागते... आंबे फणस आदीकरून हेही लाकडे आरमाराचे प्रयोजनाची परंतु त्यास हात लावू न द्यावा. काय म्हणोन की ही झाडे वर्षा दोन वर्षाने होतात यैसे नाही. रयतेने ही झाडे लावून लेकरासारखी बहुतकरून जतन करून वाढविली... डोळ्यासमोर हे आज्ञापत्र सतत असेल तर मुले झाडांवर प्रेम करतील नव्हे तर काय?

वडाच्या, आंब्यांच्या झाडांवर लोंबकळणाऱ्या प्लास्टिकच्या टोपल्या पहा. वाचा त्यावर लिहिलंय, ‘पक्ष्यांचा आहार.’ तुम्ही भोजनाच्या सुट्टीत आलात तर पक्ष्यांचा किलबिलाट इथं ऐकायला येतो.

 पक्ष्यांवर प्रेम करा असं वेगळं सांगायला नको या मुलांना. इथं शालेय पोषण आहाराच्या खरकट्यावर जोगवलेली धष्टपुष्ट कुत्री नाहीत की त्यांची कळवंड नाही. इथं आहे, पक्ष्यांचं सुंदर गाणं. खरकटं वेचून पक्ष्यांच्या टोपलीत ठेवलं जातं. इथले तिसरे शिक्षक आहेत ना, ते मदत करतात या कामात. त्यांचा हात शाळेच्या कणाकणाला, झाडाच्या पानापानाला लागला आहे. त्यांचा लळा मुलामुलांना लागला आहे. म्हणून इथली प्रत्येक गोष्ट जिवंत वाटते. तो समोरचा डायनासोर बघा. बदामाच्या झाडाखाली उभं राहून त्यानं जाळीतून डोकं बाहेर काढलंय. घाबरू नका, तो जिवंत वाटत असला तरी लाकडाचा आहे. बेवारस पडलेल्या लाकडाच्या ओंडक्यात गुरुजींनी जीव भरलाय. तुम्हांला घाबरवण्यासाठी लाकडी सोट रोवून त्याभोवती नायलॉनची जाळी लावून डायनासोरला बंदिस्त केलाय. ते झापाखालचं काळवीटाचं डोकं पहा. शिंगाकडे बघितलं की काळवीट वाटतंय. आता तोंड बघा. वाटतोय की नाही ससा? झुलत्या पुलाखालच्या पाण्यात कमळं फुलली आहेत. ती खरी आहेत बरं का, पण ते पाण्यातले साप आहेत ना त्या लाकडाच्या मुळ्या आहेत. काय झुलत्या फुलावर जायचं म्हणताय? अवश्य जा, मजबूत आहे तो. पुलाशेजारची गवताची झोपडी बघा. बाप रे बाप, झोपडीवर किती मोठे साप. काष्टशिल्पं आहेत ही.

चला झोपडीत. नारळाचं खोड कापून बैठक केली आहे. त्यावर तुम्ही बसू शकता, गप्पा मारू शकता, किंवा दोरीवर अडकवलेली गोष्टीची पुस्तकं घेऊन वाचू शकता. अभ्यास करा किंवा समोरची वेताची शिल्पं बघा, वडाच्या झाडाला टांगलेल्या जुन्या टायरांच्या झोपाळ्यावर झोके घेणारी मुलं पहा.

काय म्हणालात, मुलांना मस्त वाटत असेल? अहो, एवढं सगळं आहे म्हणून तर इथली मुलं सकाळी सातला शाळेत येतात. गटागटांत अभ्यास करत बसतात. सर्व वर्गांच्या चाव्या स्नेहल पाटील या चिमुरडीजवळ आहेत. संध्याकाळ झाली तरी मुलं शाळेच्या परिसरात रमलेली असतात. शाळा सुटल्यानंतर अभ्यासाचे विषयवार दिवस ठरलेले आहेत. सोमवारी इतिहास, मंगळवारी गणित. नैसर्गिक वातावरणाशी आणि मित्रांशी असलेले भावबंध अतूट आणि आनंद देणारे आहेत. मग वेळेचं भान मुलं हरवतील नाही तर काय! तिसऱ्या गुरुजींना मुलांना सांगावं लागतं, ‘बाळांनो आता घरी जा.’ तुम्ही म्हणाल, सकाळी सातपासून संध्याकाळ होईपर्यंत मुलं करतात तरी काय? तुम्हाला म्हणून सांगतो, इथले पगार घेणारे शिक्षक आहेत ना, ते मुलांना फार कमी शिकवतात, त्यांचा कमी अभ्यास घेतात. परंतु त्यांनी तयार केलेले छोटे गुरुजी आहेत, ते फार तयारीचे आहेत. खरं तर तेच शाळा चालवतात म्हणा ना. हे बघा, ही मुलं सकाळी आल्याबरोबर झोपडीत, झाडाखाली, वऱ्हांड्यात- मनाला वाटेल तिथं आपापल्या गटात बसतात.

परसबागेजवळचे शासनाने नुकतेच पुरवलेले फरक बघा. प्रदर्शन फलकावर आजचा प्रश्न लिहिलाय. त्याचं उत्तर ज्याला लिहावं वाटतं त्यानं कागदावर लिहायचं. खाली आपलं नाव लिहायचं. कागद त्या टेबलावर पोस्टाच्या पेटीसारखी पेटी दिसतेय ना, त्यात टाकायचा. त्याच फलकावर वर्तमानपत्रातली कात्रणं लावली आहेत. त्या रंगीत कात्रणांवरची बुलंद विजयदुर्गची माहिती वाचा. दुसरं कात्रण आहे ह.मो.मराठे यांच्या पहिल्या चहाचं. त्यातला रवींद्रनाथांचा फोटो पहा. राष्ट्रगीताची माहिती वाचा. आता तुम्हांला कळलं ना, आपलं राष्ट्रगीत बंगाली भाषेत आहे.

त्याच्याशेजारी स्टँडला उभा असलेला दुसरा फलक बघा. ‘इंग्लिश वर्ल्डस्‌’ पहिली, दुसरीसाठी पाच इंग्रजी शब्द. उच्चार आणि अर्थ लिहिलाय. इयत्ता तिसरी, चौथीसाठी दहा शब्द. विद्यार्थ्यांनी जातायेता हे शब्द वाचावेत, जमेल तसे आपल्या वहीत टिपून घ्यावेत. हे दोन्ही फलक या महिन्याभरात शाळेला मिळालेत.  गुरुजींनी त्याचा लगेच वापर सुरू केलाय. नाहीतर, हरवेल, खराब होईल, मोडेल, मला कोणीतरी विचारेल, पैसे भरावे लागतील, मी गेल्यावर काहीही करा, अशी भाषा इथं नाही. अशी भाषा असेल तर शिक्षक नोकरीतूनच काय पण या जगातून गेल्यावरही साहित्याचा वापर होत नाही.

बागेत असतात तशी सिमेंटची बाकडी, कट्टे मैदानात आहेत. बसण्यापूर्वी त्यावरचं वाचलं तर कट्टा तुच्याशी बोलेल. ‘एक, दोन, तीन, चार झाडे सावली देतात गार’, ‘पाच, सहा, सात, आठ पाठीचा कणा ठेवा ताठ.’, ‘निसर्गावर प्रेम करा, निसर्ग आपली माता आहे’, ‘विसावा घ्या, मन:शांती मिळवा.’ इथल्या स्वच्छतागृहातही चित्रं आहेत. मुलांना हात धुता येईल एवढ्या उंचीचं वॉश बेसीन. सगळी शाळा चाइल्ड फ्रेंडली आहे.

वर्गाच्या दरवाज्यावर रंगवलेली पाठ्यपुस्तकांची मुखपृष्ठं, मलपृष्ठं बघा. अंतराळवीर बघा, डॉक्टर बघा. वर्गातला प्रवेशसुद्धा आहे की नाही चाईल्ड फ्रेंडली? आपण गप्पा मारण्यापेक्षा वर्गात जाऊन मुलांनाच विचारू या. चला. टाका पाऊल आत. सकाळच्या अभ्यासाची माहिती तिसरीतील रोहित सोनवणे या छोट्या गुरुजींना विचारू या. काय रोहित, कसा काय चालतो तु चा सकाळचा अभ्यास?

‘पहिल्यांदा मी कालचा राहिलेला अभ्यास पूर्ण केला आहे का बघतो. एखाद्याने अभ्यास पूर्ण केला नसेल, काही अडचण असेल तर आम्ही त्याला मदत करतो. नंतर आम्ही ऐकून लिहिण्याचा सराव घेतो. मी मुलांनी लिहिलेलं तपासतो, चुका दाखवतो, दुरुस्त करून घेतो. आम्ही पाढे पाठ करतो. मी प्रत्येकाला विचारतो, आज तुझे कितीपर्यंत पाढे पाठ आहेत? 35, 36 असं सांगितलं की मी त्याला त्याच्या आतला कोणताही पाढा म्हणायला सांगतो. बरोबर पाढा म्हटला की फळ्यावर त्याच्या नावासमोर कितीपर्यंत पाढे पाठ आहेत, तो अंक लिहितो. समजा, एखाद्याचा मधला पाढा चुकला तर तो दुरुस्त पाढा करून सांगतो. जिथपर्यंत न चुकता जो पाढा येतो त्याचा अंक त्याच्या नावासमोर लिहितो.

‘चूक दुरुस्त करून सांगायची म्हणजे या गटप्रमुखांची तयारी खूपच पाहिजे. काय गुरुजी?’

होय. हा चौथीतला प्रमोद. याला गणिताचा मंत्री केलंय. याचे 57 पर्यंत पाढे पाठ आहेत. अकरापर्यंतचे उलटे पाढे म्हणता येतात. इंग्रजी पाढे पाचपर्यंत पाठ आहेत. दुसऱ्यांची तयारी करून घेताना त्याचीही तयारी होते. गणित विषयासाठी पाढे पाठांतराचा फायदा होतो.’

‘एवढं सगळं तुम्ही करताय म्हणजे अप्रगत मुलगा राहत नसेल.’

‘तुलनेनं अप्रगत असतात मुलं. त्यांच्यासाठी आम्ही दत्तकमित्र योजना राबवली आहे. प्रगत मुलाला अप्रगत मुलगा दत्तक द्यायचा. चौथीची शिष्यवृत्तीची परीक्षा झाल्यानंतर त्यातल्या हुशार मुलांना तिसरीतील अप्रगत मुलांना प्रगत करण्याचं काम दिलं. शिवाय जूनपासून ज्या त्या वर्गातल्या प्रगत-अप्रगत विद्यार्थ्यांची जोडी लावली आहे. जयची आणि रोहितची जोडी लावलीय. रोहित सांग, तू जयचा अभ्यास कसा घेतोस?’

‘मी त्याचं ऐकून लिहणं घेतो, गणित करून घेतो. रविवारी त्याच्या घरी जातो. त्याला शाळेत घेऊन येतो.’

या शाळेतली मुलं शक्यतो गैरहजर राहत नाहीत. पूर्वी एखादा विद्यार्थी गैरहजर असायचा. त्याला बोलवायला त्याचा मित्र जायचा. त्यातूनही तो आला नाही तर सगळा वर्ग त्याच्या घरी जायचा. आता रजा हवी असेल तर मुलं वर्गाच्या मुख्यमंत्र्याकडे चिठ्ठी देतात.

मुख्यमंत्री वर्गशिक्षकांकडे चिठ्ठी देतात. पहिली ते चौथीचे वर्गशिक्षक कृष्णात पाटोळे तर दुसरी- तिसरीचे वर्गशिक्षक संजय साळुंखे आहेत. वर्गाचं मंत्रिमंडळ शिक्षकांनी निवडलंय. मुख्यमंत्री, गणितमंत्री, इंग्रजीमंत्री, सांस्कृतिक मंत्री, सफाईमंत्री, क्रीडामंत्री. अभ्यासात मागे राहणाऱ्या मुलांना मुद्दाम गुरुजी मंत्री करतात. क्रीडामंत्री झाल्यापासून चौथीतल्या विशालची अभ्यासात प्रगती झालीय.

शाळेचंही सगळं मंत्रिमंडळ आहे. ते निवडणूक पद्धतीनं निवडलंय. अर्ज भरणं, मागे घेणं, प्रचार, मतदान, निवडणुकीतल्या सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या आहेत. या शाळेची मुख्यमंत्री चौथीतली निकिता आहे. हे मंत्रिमंडळ सहा महिन्यांसाठी आहे.

वर्गावरून नजर फिरवा. जमिनीलगत पूर्ण वर्गभर फळा आहे. तो मुलांसाठी आहे. ज्याला हवं त्यानं आपलं नाव लिहावं आणि गणित सोडवावं. खास गणितासाठी हा फळा आहे. फरशीवरच्या अर्धगोल, गोल, त्रिकोन, चौकोन, घन या आकृत्या पहा. घड्याळ पहा. सूर्यकिरणांसारख्या रेषा, वर्तुळाकार रेषा दिसतात. त्या रेषेवर विद्यार्थ्यांनी बसावं म्हणून आखल्या आहेत. बदलती बैठक व्यवस्था आहे इथं.

दर शुक्रवारी येथे प्रश्नमंजूषा घेतली जाते. एका वर्गाचे तीन गट. तीन गटांतील विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयाचे प्रश्न काढायचे. दुसऱ्याला उत्तर देता येऊ नये म्हणून अवघड प्रश्न विद्यार्थी काढतात. प्रश्नाच्या चिठ्ठीवर प्रश्न काढणाऱ्याचं नाव असतं. कोणालाच उत्तर आलं नाही की, प्रश्नकर्त्यानं उत्तर द्यायचं. एका विद्यार्थ्यानं जास्तीत जास्त दोन प्रश्नांची उत्तरे द्यायची. मुख्यमंत्री प्रश्नमंजूषेचं सूत्रसंचालन करतात. या छोट्या उपक्रमात किती साधलं गुरुजींनी? प्रत्येकाला अभ्यासाला लावलं.

खरी गंमत आहे ती विचारा तुम्ही, सांगतो आम्ही या उपक्रमाची. शनिवारी सकाळी परिपाठाच्या वेळी हा उपक्रम घेतला जातो. तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आहे. एका गटाला विषय दिला जातो. गटानं त्या विषयाचा अभ्यास करून यायचं. शनिवारी त्यांच्या गटाचं दरबार भरवल्यासारखं सादरीकरण करायचं. त्या विषयातील महत्त्वाची आपल्याला येणारी माहिती एकेका वाक्यानं सांगायची. पुढे खरी रंगत येते. गटाची माहिती सांगून झाली की, त्या वर्गाचे विद्यार्थी  त्या विषयातील प्रश्न विचारतात. कोणते प्रश्न विचारायचे हे इतर मुलांनी ठरवलेलं असतं. मुलं पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न विचारतात. त्यासाठी विचार करावा लागतो. प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर गटाचा गुण गेला. उत्तर देणाऱ्याला गुण. किती प्रक्रिया घडतात इथं? सर्व विद्यार्थी वाचन करतात. प्रश्न तयार करतात. एकमेकांशी संवाद साधतात. सभाधीटपणा येतो. मलाही भाग घेता येतो, माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही, मी उत्तर दिलं. माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही, याचा आनंद.

या सगळ्याच्या मिलाफातून गुरुजींनी उपक्रमशील गटनिवडीचा उपक्रम केलाय. वाचन, लेखन, गणित, इतर उपक्रम यानुसार गटाला गुण दिले जातात. पंधरा दिवसांतून एकदा असा उपक्रमशील गट निवडला जातो.

‘अहो, पण गुरुजी तुम्ही शिकवता की नाही? आणि कसं शिकवता?’

‘आपण गप्पा मारतोय तोपर्यंत या इयत्ता तिसरी-चौथीच्या मुलांना त्यांच्या मनाचे इंग्रजी शब्द लिहायला सांगू.’

ऐका, पाटोळे गुरुजी काय सांगतात ते.

‘मी मुलांच्याशी गोष्ट सांगितल्यासारखं बोलतो. चर्चा करतो. पुस्तकांच्या बाहेरचं त्यांना ऐकवतो, वर्गाच्या बाहेर नेतो, संगणकाचा वापर करतो, इंटरनेट जोडलंय, नेटवरून मुलांना ज्ञानेश्वरांची माहिती दाखवली. मुंगी उडाली आकाशी ऐकवलं.’

‘साळुंखे गुरुजी, तुमचं कसं?’

‘माझाही भर प्रत्यक्ष कृतीवर जास्त असतो. मुलांना मैदानावर घ्यायचं. तिथला अनुभव द्यायचा. स्वाध्याय कार्डचा वापर, पहिलीसाठी विविध वस्तूंचा वापर, मुलांना स्वातंत्र्य, त्यांच्या कलानं घ्यावं. शाळेची ओढ लागावी. आम्ही वर्गवाटणी केली असली, तरी ती दाखवण्यासाठी. आम्ही दोघे सर्व मुलांच्याकडे लक्ष देतो. पाटोळे गुरुजी सर्व वर्गांना इंग्रजी शिकवतात. त्यांचा औरंगाबादला इंग्रजीचा कोर्स झालाय. शिवाय एक दिवस इंग्रजी डे म्हणून पाळतो आम्ही. इंग्रजीचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करतो. परिपाठाचे आदेशही इंग्रजीतून दिले जातात.

अरे हो, तिसरी, चौथीच्या मुलांचे इंग्रजी शब्द लिहून झाले. बाप रे, चौथीच्या वर्गात सर्वांत जास्त 65 शब्द लिहिलेत एकानं आणि तिसरीच्या वर्गात साठ. अरे व्वा! दहा-बारा मिनिटांत एवढे शब्द?

जरा पहिली ते दुसरीच्या वर्गावर नजर टाका. फरशी बघा. फरशीवर विमान रंगवलंय, साप रंगवलाय, त्या आकारावर मुलं बसतात. पहिलीची मुलं थंड पेयाच्या बाटलीच्या टोपणाशी खेळत आहेत. त्यापासून विविध आकार करत आहेत. कोणाच्या हातात स्वाध्याय कार्ड आहे. सहा वाजायला आले. यांना घरची आठवण कशी येत नाही? नाही तर दुपारच्या भोजनानंतर पहिलीचा निम्मा वर्ग पेंगुळलेला असतो. एखादा दुसरा मुलगा भिंतीला टेकल्या टेकल्या झोपलेला असतो. एखादा दप्तराला मिठी मारून आईची आठवण काढत असतो. इथं पेंगुळलेलं चित्र नाही.

इथं किती वेगळं आहे. जुलैमध्येच अक्षरओळख, शब्दओळख झालीय. अहो गवयाचं मूल रडलं तरी सुरात रडतं म्हणतात ना तसं इथल्या मुलांचं आहे.

तुम्हाला कुठं कचरा दिसला का? दिसेल कसा? कचरा दिला की उचलून खताच्या खड्‌ड्यात टाकतात मुलं. या शाळेत मुलांच्या तोंडी चुकूनसुद्धा शिवी येणार नाही. गुरुजींशी बोलताना एक्सक्यूज मी म्हणून बोलतात मुलं. इथं मूल्यशिक्षणाच्या तासाला मूल्यं शिकवत नाहीत. कृतीतून मूल्यं रुजतात. मग झाडामाडाचं प्रेम असो की बंधुभाव, सहवेदना, संवेदना, वक्तशीरपणा असो.

आपल्याला शाळेच्या सभागृहाकडे जायचंय. सभागृहा- बाहेरच्या फलकावरचं सामान्यज्ञान वाचा. चला, आत. 40 / 20 चं हे सभागृह आमदारफंडातून बांधलंय. कशाकशाची चित्रं काढली आहेत गुरुजींनी! सभागृहाबाहेर वरच्या बाजूला नेत्यांची तैलचित्रं आहेत. भारताचा नकाशा आहे. आपण सभागृहात गेल्यानंतर कलादालनात गेलोय असं वाटतं आपल्याला. समोरच्या भिंतीवर शिवराज्याभिषेक. गड, किल्ले, बुरुज यांची चित्रं तैलरंगात रंगवली आहेत. खालच्या बाजूला शिवकालीन मावळे, हत्तीघोडे यांची रेखाचित्रं रेखाटली आहेत.

आतून दरवाजाच्या दोन्ही बाजूंना खांब, कमान आणि पडदा चितारलाय. दरवाजाच्या बाजूच्या भिंतीवरचे पर्वत, पठार, मैदान, पाण्याचे प्रवाह पहा. खाण पहा. शहामृग पहा. अहो, खिडक्यांचे दरवाजेही चित्रांनी सजले आहेत. ताजमहाल, सांगलीचं गणपती मंदिर. चित्रं लहान मुलांनी काढली आहेत असं वाटतं. पाठीमागच्या भिंतीवरचं चांदोली धरण बघा. भोगीव आणि वेत्ती या गावाचं मूळचं स्थानही दाखवलंय चित्रात. मोर आणि आपली राज्यांची पक्षी हरियालही दिसतेय इथं.

खालच्या बाजूची वारली चित्रकला पहा. एक फूटभर उंची. चारी भिंतींवर वारली जीवन साकार केलंय कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी. शिक्षकांची धडपड बघून या चित्रकारांनीही शाळेला भेट दिली आहे. कंदील, ग्रामोफोन, डोली, वाळूचं घड्याळ अशा जुन्या वातावरणातील वस्तूंची चित्रं आहेत. शिवाय गोंधळ, वासुदेव, वाघ्या मुरळी, लेझीम या लोककलांची ओळख दाखवणारी चित्रं पहा.

आता थोडं छताकडे नजर वळवा. बाप रे! लालभडक सूर्य आणि त्याचं कुटुंब. पृथ्वी, चंद्र, शुक्र, शनि- अख्खं तारांगण आहे. आज ही शाळा सर्वांसाठी आकर्षण ठरली आहे. पर्यटनकेंद्र झाली आहे. गावाला या शिक्षकांचा आणि शाळेचा अभिमान आहे.

Tags: वारली चित्रकला सांगलीचं गणपती मंदिर ताजमहाल चाइल्ड फ्रेंडली राष्ट्रगीत ह.मो.मराठे तुंग महाराष्ट्र ग्रामस्वच्छता अभियान टॉवर सांगली Warali Painting Ganapati Temple of Sangali Tajmahal child Friendly National anthem H. M. Marathe Maharashtra Gram Swachata Abhiyan Tower Sangali weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नामदेव माळी,  सांगली, महाराष्ट्र
namdeosmali@gmail.com

शिक्षण क्षेत्रात वर्ग दोनचे अधिकारी, कादंबरीकार व शैक्षणिक लेखक.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके