डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पाच वर्षांपूर्वी आम्ही दोघे  नवरा-बायको एकाच दिवशी या  शाळेत आलो. कुटुंबाचा वेळ  देऊन काम करणार असाल तर  दोघांना एकच शाळा देतो असं  त्यावेळेस गटशिक्षण अधिकारी  म्हणाले होते. त्यांच्या विश्वासास पात्र रहायचं आम्ही  ठरवलं. खरं तर बार्इंची तळमळ  माझ्यापेक्षा जास्त आहे. माझं  काम 30 टक्के आणि त्यांचे 70  टक्के आहे. त्यांच्यामुळंच मी  काम करू शकतो. पाच वर्षांपूर्वी  इथं फक्त ही दोन खोल्यांची  दगडी इमारत होती. आपल्याला  चांगलं करायचं आहे,  असं  ठरवलं होतं. एक वर्ष लोकांची मानसिकता तयार करण्यात गेलं.  आरोग्याच्या सवयी,  गणवेश,  टाय,  पालकांना वाटू लागलं की  आमची मुलं जणू शहरातल्या  शाळेतच जात आहेत.  पालकांच्या बैठका घेतल्या. शारीरिक कष्ट,  आर्थिक मदत शाळेसाठी मागितली. सन  2007-08 मध्ये दीड लाख  रुपये गावानं मदत केली.  एकट्यानं पासष्ट हजार रुपये  दिले. माझ्या या हातांनी मी ते  खर्च केले आहेत. मला कोणी  हिशोब मागितला नाही. ही बाग  आणि शाळा फुललीय. या  आनंदी वातावरणात मुलं  रमतात. त्यांना घरी जा म्हणून  सांगावं लागतं.

पुणे-बंगलोर हायवेवर साताऱ्याचा अजिंक्यतारा साखर कारखाना आहे. तेथील शेंद्रे फाट्यावरून पश्चिमेला बघा. तुम्हाला ऐटीत बसलेला एक डोंगर दिसेल. हा शिलोबाचा डोंगर. या डोंगराच्या  पायथ्याजवळ शिवाजीनगर हे छोटंसं खेडं आहे. हायवेपासूनचं अंतर साधारण तीन किलोमीटर. या  गावाला पूर्वी मुगदुल भटाची वाडी असं म्हणत. या गावात पेरणीच्या कुरीच्या स्पर्धा होत असत.  पावसाच्या भरवशाची शेती, रंगकाम,  कारखान्यात कामगार पुरवणारं हे गाव. पूर्वी विहिरी खोदणाऱ्या  मजुरांचं गाव म्हणून प्रसिध्द होतं.

आज हे गाव गुरुजींवर,  शाळेवर प्रेम करणारं गाव आहे.  हा चमत्कार मोहन थोरात आणि सुन थोरात या पती-पत्नींनी घडवलाय. जिल्हा स्तरावरचं  गुणवत्तेचं बक्षीस शाळेनं मिळवलंय. ‘देखणी’  हा शब्द अपुरा पडेल अशी ही शाळा. दोन खोल्यांची  टुमदार इमारत. शाळेसभोवार कंबरेइतकं दगडी बांधकाम त्यावरती तारेची जाळी,  असं हे कुंपण.  प्रवेशव्दारावर शाळेला निघालेल्या गणवेशातील विद्यार्थ्यांची सुंदर चित्रं. एका बाजूला मुलगा व दुसऱ्या  बाजूला मुलगी. प्रवेशव्दारासमोर कुंपणाला समांतर उताराचा असा रस्ता आहे. गुरुजींनी त्याला काँक्रीट  करून घेतलंय. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दगडी भिंत बांधली. भिंतीत खोलगट भाग ठेवून माती  भरली. त्यात चिनी गुलाब, छोटी फुलझाडं,  शोभेची झाडं फुलली आहेत. समोरच्या कुंपणाच्या  जाळीवरती कोयनेलचा वेल गुलाबी फुलांनी डवरलाय. जाळीतून सोनेरी डुरांडा डोकावून शाळेला  येणाऱ्या मुलांच्याकडे बघतोय. प्रवेशव्दारापासून वऱ्हांड्यापर्यंत शहाबादी फरशी बसवलीय.       

इथं आपल्याला थोडं थांबावं लागतं. मऊ पोत्याला पाय पुसून आत जावं लागतं. पोतं इतकं मऊ आणि  गुबगुबीत का,  असा आपल्याला प्रश्न पडतो. मग गुरुजी सांगतात. अहो त्यात इकडंतिकडं पडलेलं  प्लास्टिक भरलंय. गुटख्याच्या पुड्या भरल्यात. हे काम मुलांनीच केलंय. प्लास्टिकचा पुनर्वापर आणि  एक वेगळा संदेश ‘गुटखा आम्ही पायदळी तुडवतो’.  ही कल्पना सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाम देशपांडे यांची. शहाबादी फरशीच्या दोन्ही बाजूंना हिरवंगार लॉन आहे. लॉनभोवती सोनेरी डुरांडा लावलाय.  डुरांडा आणि लॉन यांच्यामध्ये सिमेंटच्या उभ्या स्लेट बसवल्या आहेत. त्यांना रंग दिलाय.  डुरांड्याच्यामधून नारळाच्या झाडाने डोकं वर काढलंय. आपण ज्या पायपुसण्याजवळ उभे होते. तिथंच बाजूला ध्वजकट्टा आहे. शाळेसमोरच्या उजव्या कोपऱ्यात सावली धरून बदामाचं झाड उभं आहे. दलदलीच्या प्रदेशात घरं झाडावर असतात त्याची प्रतिकृती ‘ट्री हाऊस’  बदामाच्या दोन  फांद्यांध्ये ठेवलीय. या झाडाखाली दोन उभ्या लोखंडी अँगल्सवर फळा आहे. तो कसाही कोठेही  हलवता येतो,  उभा करता येतो. ही एक चारची शाळा. प्रत्येकाकडे दोन वर्ग. एकूण 38 मुलं.

एका  वर्गखोलीत गटकार्य,  स्वयंअध्ययन करतो. दुसरा वर्ग बदामाच्या सावलीत लॉनच्या मऊ गादीवर  निसर्गाच्या सान्निध्यात शिकतो. शेजारीच घसरगुंडी बसवलीय,  झोपाळाही आहे. हिरवीगार प्रसन्न शाळा. शाळेच्या नळाला चोवीस तास पाणी असतं. असं खास पाण्याचं कनेक्शन ग्रामपंचायतीनं  शाळेला दिलंय.  पाण्याच्या टाकीशेजारी आळू आणि पुदिना माजलेला दिसतोय. तिथल्या सांडपाण्यावर तो एवढा फोफावलाय. टाकीवर काय लिहिलंय पहा,  पिण्याचे पाणी. स्वच्छता राखा. टाकी स्वच्छ केल्याचा दि.5/2/2011 पुढील दि.19/2/2011. पाण्याच्या टाकीशेजारी मुलांचं स्वच्छतागृह,  त्याला  काटकोनात पाठीमागच्या कुंपणाला समांतर मुलीचं स्वच्छतागृह. स्वच्छतागृहाबाहेर पायपुसणी  आहे. स्वच्छतागृह आणि मुताऱ्यांना टाइल्स बसविल्या आहेत. सगळं चकचकीत,  स्वच्छ.  वॉशबेसिन,  साबण,  आरसा आणि बारवर घडी घालून टॉवेल ठेवलेला. भिंतीवर स्वच्छतेचे संदेश  आहेत. मुलींच्या स्वच्छतागृहावर चित्रे चितारली आहेत. चित्रातील मुले-मुली स्वच्छता करत आहेत. बागेला पाणी घालत आहेत. शाळा असो वा घर,  स्वच्छता हाच परमेश्वर.

स्वच्छतेचे महत्त्व  ध्यानी धरा,  स्वच्छतागृहाचा वापर करा. हसणारे झाड,  त्यावर  किलबिलणारे पक्षी,  झाडांभोवती फेर धरून नाचणारी मुले,  शेजारी कविता- वृक्ष आमुचे मित्र त्यांना तोडू नका कोणी. हे तर  शिवाजीनगरच्या शाळेचं चित्र आहे. चित्रातील मुलं याच शाळेतील  आहेत. चित्र जरा निरखून पहा. शाळेच्या पाठीमागे शिलोबाचा डोंगर  दिसतोय.  दोन्ही स्वच्छतागृहांचा काटकोनी भाग व शाळेची भिंत यामध्ये  मोकळी त्रिकोणी जागा उरलीय. सर्व बाजूंनी वाट सोडून तो भाग उंच  केलाय,  त्यामध्ये माती घातलीय. मिरची वांगी,  पालक,  मेथी,  चांगली  उगवून आलीय. मध्येच छोटंसं हरितगृह केलंय. बाहेरच्या भाजीपेक्षा  हरितगृहातील भाजीची वाढ जोमानं झाली आहे. मुलं हा फरक समजून  घेतात. किती छोटी पण महत्त्वाची गोष्ट!

गुरुजी भाजी मुळांसह उपटत  नाही,  तर ती कापून घेतात म्हणजे नंतर फुटणाऱ्या फुटव्याची भाजी  करता येते.  गुरुजींनी कोथिंबीर सुकवण्यासाठी ड्रायर तयार केलाय. लोखंडी  सळ्याच्या त्रिकोणी सांगाड्याला काळा प्लास्टिक कागद लावलाय.  खालच्या बाजूला जाळी बसवली. आत भाजी,  कोंथिबीर ठेवून कागद  बंद करायचा. कोथिंबीर सावकाश सुकते. जास्त उत्पादन असणाऱ्या  काळात कोथिंबीर सुकवायची आणि तुटवडा असतो त्या वेळी  वापरायची.  शाळेच्या मागच्या बाजूला गांडुळखत प्रकल्प आहे. सावलीत  गांडुळ चांगले वाढतात म्हणून छोटंसं छतही केलंय. शाळेच्या पुढच्या  डाव्या बाजूला भिंतीलगत छोटी खोली तयार केलीय. इथं शालेय पोषण  आहार शिजवला जातो. खोलीच्या बाहेर भिंतीवर आहाराच्या साप्ताहिक नियोजनाचा फलक लावलाय. खोलीत डोकावलं तर ताट,  पेले,  भांडी ठेवण्यासाठीचं रॅक दिसतंय. त्यावरचे स्टीलचे चमकणारे  पेले ओळीत आहेत. सर्व नीटनेटकं. कमालीची स्वच्छता.

खोलीच्या  बाहेर कुकरचं भांडं स्वच्छ धुऊन पालथं घालून उन्हाला ठेवलंय. एवढी  स्वच्छता आणि काळजी घेतल्यावर आहारातून विषबाधा कशी बरं  होईल?  आहार तयार करणाऱ्या अरुणा धनवडेंचं कौतुक करायला हवं.  खोलीसमोर कुंपणावर घेवड्याचा वेल पसरलाय. शेवग्याचं झाडही  उभं आहे. आहारात घेवडा,  शेवगा असणारच. शेजारी छोटी औषधी  वनस्पती बाग आहे. त्यात तुळस,  कोरफड,  लिंबू,  गवती चहा,  हळद,  कडूलिंब,  अडुळसा या वनस्पती आहेत. शाळा खोलीच्या बाजूला  चप्पलचं रॅक केलंय. त्यामुळं शाळेत आल्याबरोबर चपलांचं दर्शन होत  नाही. व्हरांड्यात उभं राहून वरती पाहिलंत तर तुळयांवरती सुविचार  दिसतील. भिंतीवर वरच्या बाजूला सुविचार,  सूर्यालेचं चित्र दिसेल.  चौकटीच्या समांतर रेषेत साधारण तीन फूट जागेत छ. शिवराय,  महात्मा गांधी यांची तैलरंगातील चित्रं,  शाळेच्या गुणगौरवाचे फोटो  चिकटवलेला फलक,  उपक्रमांचे फोटो. या फलकाचं नाव,  आमची  प्रेरणादायी शाळा. मूल्यमापन श्रेणीपध्दत दर्शवणारा फलक. तापमापी  आणि तापमान नोंदपत्रक इत्यादी.

तिसरी,  चौथीची मुलं सकाळी 10 ते दुपारी 1 व सायंकाळी 4 वाजता तापमानाच्या नोंदी करतात. आज  सावित्री गटानं नोंद केली होती. तापमान नोंदीचं गुरुजींनी गटवार  आठवड्याचं नियोजन केलंय. जमिनीलगत व्हरांड्याच्या भिंतीवर  सातारा तालुका,  सातारा जिल्हा,  महाराष्ट्र,  भारत हे नकाशे आहेत. सर्वशिक्षण अभियान लोगो,  सारे शिकू या पुढे जाऊ या. फुलांचा गुच्छ.  प्रत्येक फुलात वैयक्तिक स्वच्छतेचे चांगल्या सवयींचे संदेश. आजचे पंचांग. आकडेपत्रक,  पट,  हजर,  गैरहजर. इयत्तावार. शाळेत प्रवेश  करताच गुरुजींना भेटण्यापूर्वी किती माहिती होते पालकांना!  इयत्ता तिसरी व चौथीची मुलं एका खोलीत बसतात. या  जोडवर्गाला मोहन थोरात शिकवतात. फार कल्पकतेनं वर्गरचना  केलीय. वर्गात प्रवेश केला की फळ्याची भिंत. दरवाजाशेजारच्या  भिंतीमध्ये कडाप्पाचे रॅक तयार करून घेतले आहेत. पहिल्या रॅकमध्ये  स्वाध्यायकार्डस्‌  ठेवण्यासाठी जाड पुठ्ठे घालून कप्पे केले आहेत.  पोस्टात पत्रं ठेवण्यासाठी असतात तसे. कार्डस्‌ विषयवार,  महिनावार  ठेवली आहेत. कार्डस्‌ सहज सापडावीत,  हाताला लागावीत, गटवार  वापरता यावीत हा त्याचा हेतू. अन्यथा,  ती एकमेकांत मिसळली तर त्यांचा वापर होणं कठीण. शिवाय जाड पुठ्‌ठ्याच्या खोक्यांनाही कप्पे  केले आहेत. खोक्यांच्या कडांना कापडी पट्टी चिकटवून मजबुती आणि  टिकाऊपणा आणलाय. यातही विषयवार कार्डस्‌ ठेवली आहेत.  

एका रॅकमध्ये प्रयोगसाहित्य ठेवलंय. प्रथमोपचार पेटी ठेवलीय. टु  इन वन,  ध्वनीफिती ठेवल्या आहेत. टु इन वन सौर ऊर्जेवर चालतोय,  त्यामुळे भारनियमनाचा आणि व्यापारी दरानं वीजबिलं देण्याचा प्रश्न  इथं नाही. तिथंच खालच्या कप्प्यात स्वाध्यायपुस्तिका ठेवल्या आहेत.  हा खिडकीच्या खालचा कप्पा आहे. इथंच जि.प.कडून मिळालेला  केनस्टारचा पाणी फिल्टर बसवलाय.  फळ्याच्या समोरच्या भिंतीवर नेत्यांची चित्रं आणि माहिती  असलेली पोस्टर्स फ्रेम करून एका रेषेत लावली आहेत. जाड दगडावर चिकटवून त्याला प्लास्टिक फ्रेम लावल्या आहेत. टिकाऊपणा आणि  उपयोगिता वाढवली गुरुजींनी. या चित्रांच्या खाली दगडी भिंतीवर  दोन-अडीच फूट रुंदीचा सिमेंटचा फळा केलाय. त्यावर एका मापाचे  विज्ञान मराठीचे तक्ते,  चित्रं काढून घेतली आहेत. त्याच्याखाली तार बांधली आहे. त्यावर प्रत्येक विद्यार्थ्याचा रुमाल घडी करून  अडकवला आहे. रुमाल ओळखण्यासाठी त्यावर मुलांचे हजेरी नंबर  टाकले आहेत. शौचालयाला जाऊन आल्यानंतर,  जेवणापूर्वी,  जेवणानंतर हात,  तोंड पुसण्यासाठी रुमालाचा वापर केला जातो. रुमाल  स्वच्छ धुण्याचं काम आहार शिकविणाऱ्या अरुणा धनवडे करतात.

दरवाजातून दिसणाऱ्या तिसऱ्या भिंतीस कडाप्पाचं रॅक आहे. त्यात  बालवाचनालयाची पुस्तकं आहेत. पुस्तकं कपाटात बंद नाहीत.  वाचलेल्या पुस्तकांच्या नोंदी करण्यासाठी प्रत्येक मुलाचं वाचनकार्ड आहे. रोहन धनवडे ग्रंथालयमंत्री आहे. त्याचे वडील रंगकाम करतात.  वडील रंगात रंगतात आणि मूल पुस्तकात रमतंय. आहे की नाही गंत!  समोरची भिंत फळ्याची. फळ्याच्या वर वेळापत्रक. वेळापत्रकाच्या दोन्ही बाजूला शास्त्रज्ञांची छायाचित्रं. फळ्याच्या दोन्ही बाजूंना दीड दोन  फूट रुंदीचे आणि फळ्याच्या उंचीचे कल्पक फलक. त्यावर जोडशब्दांचे  कोरीव अक्षरातील तक्ते लावले आहेत. आवश्यकतेनुसार त्यावर चित्र,  तक्ता,  कागदकाम सहज प्रदर्शित करता येतं. फळ्याच्या खालीही  असाच,  थर्माकोलचा आडवा फलक आहे. त्यावर जोडशब्द,  जोडून  येणारे शब्द लावले आहेत.

खाली काळ्या फळ्याची पट्टी आहे. तो भाग विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्ययनासाठी,  अभ्यासासाठी,  सरावासाठी.  फळ्याच्या डाव्या बाजूला संगणक आहे. तिथंच शैक्षणिक  साहित्याचा कोपरा आहे. तिसरी व चौथीच्या मुलांना संगणकाच्या  वापराचं थोडंसं ज्ञान गुरुजींनी दिलंय. त्यांना संगणक सुरू/बंद करता येतो. फाईल उघडता येते. स्वत:चं नाव टाईप करता येतं. पेंट करता येतं.  शिवाय,  शैक्षणिक भाग दाखवण्यासाठी संगणकाचा वापर केला जातो.  गुरुजींनी मुलांनी केलेले प्रकल्प दाखवले. प्रकल्प करण्यासाठी  त्यांनी दोन दोन विद्यार्थ्यांचे गट केले आहेत. श्रध्दा आणि श्वेतानं  म्हणी,  शब्दसमूहाबद्दल शब्द,  समूहदर्शक शब्द,  ध्वनिदर्शक शब्द,  पिलूदर्शक शब्द (जसे- गाईचे वासरू) असा प्रकल्प केला आहे. रोहन  आणि सुशांतने अद्याक्षरांप्रमाणे इंग्रजी शब्दांचा संग्रह केला आहे.  शिवाय विज्ञान इतिहासाचेही प्रकल्प केले आहेत. हे प्रकल्प  विद्यार्थ्यांनी स्वत: केले आहेत. प्रकल्प म्हणजे आईवडिलांना शिक्षा  असं इथं नाही. सुंदर अक्षर,  नीटनेटकी मांडणी साध्या आखीव तावांचा  वापर केला आहे. विनाकारण खर्च नाही की भडक मांडणी नाही.  नाहीतर आशयापेक्षा सजावट जास्त असते. बियांचा संग्रह,  पिसांचा संग्रह असं गोळा करण्याची सवय लावणारा संग्रह एकही नव्हता.  (आतापासून गोळा करायची सवय लागली तर अधिकारी/पदाधिकारी  झाल्यावर फक्त गोळा करत बसतील नाहीतर काय!)  वाचनाचा सराव,  अक्षर सुधार, नीटनेटकेपणा,  जादा ज्ञान,  स्वयंअध्ययन हे हेतू ठेवून गुरुजींनी मुलांच्याकडून प्रकल्प करून घेतले  आहेत. मुलं हुशार तरतरीत आहेत. मुलं-मुली एकत्र गटवार बसतात.  मुलांना बसण्यासाठी बेंच आहेत. समोरच्या बेंचला गटाचा,  नावाचा फलक लावलाय. फलकाला प्लास्टिक फ्रेम आहे. गटाचं नाव  फुलपाखरू. वलंगारे प्रतीक्षा विकास गटप्रमुख आणि खाली गटातील  इतर मुलांची नावे.

मुलींनी केसांना तांबड्या रिबनचा बेल्ट घातलाय.  डोकीवर बरोबर मध्ये बेल्टध्ये जास्वंदीच्या फुलासारखं रिबनचं फूल  आहे. कमरेला लाल पट्टा. शनिवार,  आठवड्याचा शेवटचा दिवस  असूनही गणवेश स्वच्छ दिसतोय.  मुलंही स्वच्छ तरतरीत आणि  उत्साही.  माझ्या तालुक्यातील शिक्षकांनी ही शाळा पाहिलीच पाहिजे असं  मला तीव्रतेनं वाटू लागलं. शाळेच्या दिवशी शिक्षकांना घेऊन येणं,  त्यासाठी वरिष्ठांची परवानगी काढणं या गोष्टी जिकिरीच्या होत्या.  आज दुसरा शनिवार असल्यानं मला सुट्टी होती. त्याचा फायदा मला  झाला होता. आज शाळा सकाळी होती. आज मुलांना शाळेत परत  बोलावलं, दिवसभर शाळा घेतली तर माझ्या तालुक्यातील शिक्षकांना  बोलावता आलं असतं. थोरात गुरुजींना,  बार्इंना हे बोललो. त्यांनी  मोठ्या आनंदानं या गोष्टीला संमती दिली. नव्हे तर त्यांचा उत्साह  वाढला.

शिक्षक समितीचे महादेव माळी,  शिक्षक संघाचे नरुले,  केंद्रप्रमुख जमदाडे,  माने,  देवराष्ट्रेचे मुख्याध्यापक आनंद मोहिते यांना  मी फोन लावले. सगळ्यांनी उत्साह दाखवला. 25-30 शिक्षक  चारचाकी गाड्या करून 70-80 किलोमीटर आले.  तोपर्यंत इतर निरीक्षण सुरू होतं. मुलांची भोजनाची सुट्टी झाली. मुलांनी रुमाल घेतले. हात धुऊन मुलं व्हरांड्यात दोन रांगा करून  बसली. अरुणा धनवडे वाढून देत होत्या. भोजनासाठी मोठ्या प्लेट  आहेत. मग जेवताना खाली सांडेल कसं?  दोन मुली बसलेल्या  मुलांसमोर ताट नेऊन ठेवत होत्या. ढकलाढकली नाही,  की पाडापाडी नाही. सर्व शांतपणे. श्लोक झाला. मुलं शांतपणे जेवू लागली. अन्नाचं  चांगलं पचन व्हायचं असेल तर जेवतानाही शांतपणा हवा,  नाही का? पुन्हा हात धुण्यासाठी मुलं पाण्याच्या टाकीजवळ जात होती.  रुमालाचा वापर करत होती. दृष्ट लागणं वगैरे गोष्टी खऱ्या नाहीत,  परंतु  दुसरा शब्द मला सुचत नाही. इतके चांगले गुरुजी मिळणं,  किती मोठी संधी!

उदरभरणानंतर मुलं दोन्ही बाजूच्या लॉनवर जाऊन बसली. लगेच त्यांच्यापुढे बालवाचनालयातील पुस्तकं आली. काही मुलं- मुली गोलाकार तर काही आपापल्या सोयीनं बसली. वाचनात दंग  झाली. पोट भरलं. आता मेंदू भरून घ्या.  मुलं सकाळी सात वाजता शाळेत आली होती. त्यांना घरी जाऊन  दुपारी परत शाळेत या असं सांगितलं. एकही मूल घरी गेलं नाही.  आमची मुलं अजून का घरी आली नाहीत म्हणून पालकही शाळेत  आले नाहीत. गुरुजींच्या ताब्यात मुलं आहेत म्हणजे सुरक्षित सुखरूप  घरी येणार. शिक्षकांच्यावर किती मोठा विश्वास!  शाळा हे संस्काराचं केंद्र आहे. एकाच साच्याचे गणपती इथं तयार  होत नाहीत. व्यक्तिगत विकासाबरोबर नम्रपणा,  आज्ञाधारकपणा,  स्वयंशिस्त,  स्वयंअध्ययन,  अभ्यासूवृत्ती. ज्याच्या त्याच्या  वकुबाप्रमाणं सहजसुलभ आनंद घेत शिकायचं.  मध्यंतरी मी कला कार्यानुभव अंतर्गत मुलांनी केलेली भेटकार्डस्‌  पाहिली होती. कांदा,  भेंडीचे काप,  झाडाची पानं रंगात बुडवून मुलांनी  सुंदर भेटकार्ड केली आहेत.

एक वेगळं अप्रतिम कोलाजचं भेटकार्ड,  पोस्टकार्ड  साईजचं कापलेलं कार्डशीट. त्याला स्केचपेनची बॉर्डर. त्यावर  मध्ये एक हिरव्या रंगाची वेडीवाकडी रेषा. या रेषेला दोन्ही बाजूंना सोनेरी  पानं चिकटवली. वरच्या टोकाला सदाफुलीच्या फुलाच्या पाकळ्या  गोलाकार चिकटवल्या. झालं छानसं रोपटं आणि त्यावर दिसणारं फूल.  अगदी जिवंत वाटणारं. छापील कार्डपेक्षा कितीतरी आकर्षक.  नवनिर्मितीचा,  स्वनिर्मितीचा आनंद किती वर्णावा!  पहिली-दुसरीचे वर्ग सुन थोरातांच्याकडे आहेत. वर्गाची रचना  अगदी तिसरी-चौथीच्या वर्गासारखी,  मात्र इथं खेळाच्या साहित्याचं  रॅक आहे. डंबेल्स,  घुंगुरूकाठ्या,  रंगीत पुठ्यांचे चौकोनी ठोकळे,  मोठे चेंडू,  सगळं नीटनेटकं ठेवलंय. शिवाय स्वाध्यायकार्डस,  शैक्षणिक साहित्य याचं रॅक आहेच. कडेगाव तालुक्यातील शिक्षक आल्यानंतर त्यांना परत परिसर  आणि तिसरी-चौथी वर्ग दाखवले. कोलाजची पानाफुलांपासून मुलांनी  भेटकार्डं करून दाखवली. काही उत्सुक शिक्षकांनी मुलांचा शैक्षणिक  दर्जाही तपासला. पहिलीच्या मुलांचं लेखन-वाचन बघितलं.  चौथीच्या मुलांचे प्रकल्प बघितले. इंग्रजी विषयाचा आद्याक्षरानुसार  केलेल्या शब्दसंग्रहाचा प्रकल्प बघितला. रोहन धनवडेनं तो वाचून  दाखवला. हे खरंच मुलांनी बनवलंय याची शिक्षकांनी खात्री केली. ही  मुलं खाजगी माध्यमिक शाळेत गेल्यावर तिथले शिक्षक जि.प.शाळेतून कच्ची मुलं आली,  त्यांना लिहिता वाचता येत नाही  अशी तक्रार आता करणार नाहीत.

इथल्या मुलांच्या हस्ताक्षराकडे पहिलीपासून लक्ष दिलं जातंय. पहिलीची मुलं स्वाध्यायकार्डं, अभ्यासकार्डं घेऊन,  कार्डशीटवर सराव  करतात. त्यासाठी बार्इंनी ठराविक आकाराचे कार्डशीट कापून ठेवले आहेत. त्यावर मुले शिसपेन्सिलने लिहितात. इतर वर्गांची मुलं प्रश्न  तयार करतात. दुसरीपासून मुलांना प्रश्न तयार करायला शिकवलं आहे.  मुलं गटात प्रश्न तयार करतात. सर्व प्रश्न एकत्रित केले जातात. परत-परत आलेले प्रश्न वगळले जातात. बाकी प्रश्न कार्डशीटवर लिहायचे.  झालं अभ्यासासाठी कार्ड तयार. नुसता भौतिक साधनांचा दिखाऊपणा नाही,  तर मुलांची चौरस तयारी झालीय. कला असो की क्रीडा असो. मुलं इतकी कशी शिकण्यात रमतात,  इतका चांगला दर्जा कसा काय  झाला. असं विचारल्यावर बाई म्हणाल्या,  ‘कष्ट. जास्तीत जास्त वेळ  शाळेसाठी देतो. मुलाला शाळेची भीती वाटू नये, ते शाळेकडे वळावं, यासाठी समोरचं मूल माझं मूल आहे असं समजून मी त्यांना शिकवते.  शाळेत मुलांना बाईप्रमाणे आईही हवी असते. आपण आई व्हायचं. मी  मुलांध्ये बसते. त्यांना जवळ घेऊन बसते. मुलं जवळ येतात. पदराला  तोंड पुसतात. मी त्यांना मांडीवर घेते,  कधीकधी मांडीवर बसण्यासाठी  मुलं एकमेकांत भांडतात.’ हे सांगताना बार्इंचा आवाज कातर झाला.  शैक्षणिक दर्जा असल्याचे सांगताना बाई म्हणाल्या,  ‘मुलं घरी स्वयंअध्ययन करतात. आम्हाला समजलंय,  शिकवू नका म्हणतात.  त्यांनी घरी धडा वाचलेला असतो, प्रश्न वाचलेले असतात.  दुसरीपासून मुलांना प्रश्न निर्मिती करता येते.’  गुरुजींचंही हेच मत आहे. ते म्हणाले,  ‘एक वर्ग व्हरांड्यात,  एक वर्ग झाडाखाली. बाकी दोन वर्ग एकेका खोलीत. एका वर्गाला शिकवणं सुरू असताना दुसऱ्या वर्गाचं गटात काम सुरू असतं.

प्रत्येक वर्गात दोन गट केले आहेत. आपण निरीक्षण करायचं. आमच्याकडे  अप्रगत विद्यार्थी नाहीत. तुलनेने पाठीमागेकडे असणाऱ्याकडे लक्ष  द्यायचं. दोन शिक्षक,  चार वर्ग,  कार्यालयाचं काम या पद्धतीनं सहज  होतं. स्वयंअध्ययनात मुलांना गुंतवण्याची कला आम्हाला साधलीय.’  दोरीवरच्या मल्लखांबाची प्रात्यक्षिके मुलांनी दाखवली. नंतर  लॉनवर साहित्य कवायत दाखवली. साहित्य वाटप करण्यात एक  शिस्त होती. साहित्य कोणी कसं वाटायचं याचं नियोजन आहे. गडबड  गोंधळ नाही. घुंगूर काठी,  रिंग,  झेंडे,  पुट्‌ठ्याचे चौकोनी ठोकळे,  याचं  वर्गवार नियोजन करून ढोलाच्या तालावर कवायत होते. ढोल,  ट्रँगल,  झांज मुलं वाजवतात. या शाळेत एरोबिक्स,  लेझीम,  झांजपथक आहे.  मुलांना इतका सराव आहे की,  शिक्षक फक्त नजर ठेवतात. मुलं स्वत:च  सगळं करतात.

मुलामुलींच्या दोन गटांनी एकाचवेळी मानवी मनोरे  करून दाखवले. ट्रँगल,  झांज व ढोलाच्या ठेक्यावर मनोरा उभा राहतो  व उतरतो. सर्व सहज,  नित्याचं सवयीचं असल्यासारखं.  मराठी,  इंग्रजी कवितांचं गायन,  ड्रेपरी वापरून सांस्कृतिक  कार्यक्रमासारखं कवितेचं सादरीकरण झालं. फुलपाखरांसारखे पंख  लावून नाचणारी मुलगा-मुलगी पाहिली. लॉनवर मोठी फुलपाखरं  आली आहेत असं वाटलं. त्यांचं मुक्त होऊन नाचणं,  बागडणं मनाला  मोहिनी घालणारं आहे. इथंही मुलुंली एकत्र. पाठ्यपुस्तकातील धड्याचं नाट्यीकरण,  मी सावित्री बोलते हे एकपात्री,  वक्तृत्व,  थोड्या वेळेत खूप खूप दाखवलं मुलांनी.

या वर्गखोलीबाहेरच्या कार्यक्रमानंतर  शिक्षक,  मुलं आम्ही सर्वजण व्हरांड्यात बसलो. अनौपचारिक गप्पा,  आभार वगैरे. थोरात गुरुजींना म्हटलं,  तुम्ही शाळेची प्रगती कशी केली  ते सांगा. म्हणजे आमचे शिक्षक तुच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या  शाळेत तसा प्रयत्न करतील.  पाच वर्षांपूर्वी आम्ही दोघे नवरा-बायको एकाच दिवशी या शाळेत  आलो. कुटुंबाचा वेळ देऊन काम करणार असाल तर दोघांना एकच  शाळा देतो असं त्यावेळेस गटशिक्षण अधिकारी म्हणाले होते. त्यांच्या  विश्वासास पात्र रहायचं आम्ही ठरवलं. खरं तर बार्इंची तळमळ  माझ्यापेक्षा जास्त आहे. माझं काम 30 टक्के आणि त्यांचे 70 टक्के आहे. त्यांच्यामुळंच मी काम करू शकतो.  पाच वर्षांपूर्वी इथं फक्त ही दोन खोल्यांची दगडी इमारत होती. आपल्याला चांगलं करायचं आहे,  असं ठरवलं होतं. एक वर्ष लोकांची  मानसिकता तयार करण्यात गेलं. आरोग्याच्या सवयी,  गणवेश,  टाय,  पालकांना वाटू लागलं की आमची मुलं जणू शहरातल्या शाळेतच जात आहेत. पालकांच्या बैठका घेतल्या. शारीरिक कष्ट,  आर्थिक मदत  शाळेसाठी मागितली. सन 2007-08 मध्ये दीड लाख रुपये गावानं  मदत केली. एकट्यानं पासष्ट हजार रुपये दिले. माझ्या या हातांनी मी ते खर्च केले आहेत. मला कोणी हिशोब मागितला नाही. ही बाग आणि  शाळा फुललीय. या आनंदी वातावरणात मुलं रमतात. त्यांना घरी जा  म्हणून सांगावं लागतं.

शाळेला स्वच्छ सुंदर शाळेचं जिल्हा परिषदेचं बक्षीस मिळालंय.  अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली. ते म्हणाले,  स्पर्धा आहे. अधिकारी  भेट देणार त्या वेळी स्वच्छता असते. मी म्हणालो कधीही अचानक भेट द्या. अधिकारी न सांगता रविवारी  सुट्टीदिवशी शाळा बघून गेले.  पालकांशी संपर्क वाढवला की, आपल्याला त्रास होईल अशी एक  शिक्षकांच्यात धारणा असते,  पण ती चुकीची आहे. शिक्षक काम करत आहेत हे पटलं की पालक मागेल ते देतात. पालकांच्या जिवावर ही  शाळा उभी आहे. पालकांचा आणि आमचा कौटुंबिक जिव्हाळा आहे.  लग्न,  बारसं याला लोक बोलवतात. माझ्या मुलीच्या लग्नाची पत्रिका मी  थोड्या लोकांना दिली होती. तरी पत्रिका नसताना इथल्या महिला  एकत्र आल्या. भाड्याचा टँपो करून लग्नाला आल्या. माझ्या मुलीला  रंगीत टीव्ही भेट दिला. गावात यात्रा असते. छबीना निघतो. पालखीला खांदा द्यायचा मान मला देतात.  यापेक्षा मोठा पुरस्कार असू शकतो?  शाळा आणि शिक्षक डोळ्यांसमोरून हालत नाहीत. मला अजून  स्वप्नात असल्यासारखं वाटतं.

Tags: वाचनालय अजिंक्यतारा साखर कारखाना शिलोबाचा डोंगर पुणे बंगलोर हायवे नामदेव माळी शाळा shala vachnalay ajinkytara sakhar karkhna shilobacha dongar pune banglor hayve nemdeo mali weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नामदेव माळी,  सांगली, महाराष्ट्र
namdeosmali@gmail.com

शिक्षण क्षेत्रात वर्ग दोनचे अधिकारी, कादंबरीकार व शैक्षणिक लेखक.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके