डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

खऱ्या अर्थानं 22 सप्टेंबर 2012 रोजी शाळा सुरू झाली. शाळेचं नाव प्रश्नचिन्ह आदिवासी पारधी आश्रमशाळा. समाजापुढे पोटाचा प्रश्न, गावाचा प्रश्न, घराचा प्रश्न, जातीच्या प्रमाणपत्राचा प्रश्न, विविध दाखल्यांचा प्रश्न, माणूस म्हणून जगण्याचा प्रश्न... प्रश्न, प्रश्न, प्रश्न! प्रश्नच प्रश्न!! म्हणून शाळेचं नाव प्रश्नचिन्ह. मुलं शाळेत आली खरी, पण त्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न होता. मुलं अंगावरचे कपडे महिनोन्‌महिने काढत नव्हती. शौचाला कसं बसायचं, दात कसे घासायचे- काहीच माहीत नव्हतं. दोन वर्षे साफसफाईत गेली. मुलांना नदीवर घेऊन जायचं. अंघोळ घालायची. दगडानं अंग घासायचं. चमडी निघेपर्यंत मळ काढायचा. यातील बरीच मुलं निराधार. कोणाचे आई-वडील जन्मठेपेची शिक्षा भोगताहेत, काही सर्पदंशाने, अस्वलाच्या हल्ल्यात, शिकारीला गेल्यानंतर शेतकऱ्यानं टाकलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन धक्क्यानं मेलेत.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली; तरीही आज काही समाज असे आहेत की, स्वातंत्र्य म्हणजे काय, हे त्यांच्या गावीही नाही आणि ते कशाशी खातात, हे त्यांना माहीत नाही. त्यांच्या गावी असायला त्यांना गावच नाही. पोटाचा प्रश्न रोजचाच आहे. मिळेल ते शिळं-पाकं खायचं. त्यांनी स्वातंत्र्य बघितलेलं नाही, त्यामुळे त्याची चव चाखण्याचा प्रश्न नाही. मान, सन्मान, प्रतिष्ठा अशा गोष्टी कोसो दूर. अंग टेकायला हक्काची जागा नाही, की निवारा नाही. पोटाच्या आगीसाठी शिकार करावी, भीक मागावी, नाइलाजानं कधी चोरीमारीही करावी. पाणीपातळीवरचं आयुष्य वाट्याला आलेलं. आम्ही भरल्या पोटानं संस्कृतीच्या गप्पा मारतो, संस्काराच्या-आदर्शाच्या गोष्टी सांगतो; त्यांच्यासाठी पोट हीच संस्कृती आणि पोट हाच संस्कार.

पारधी समाज अशांपैकी एक. कुठेही चोरी झाली, कोणीही चोरी केली की, पोलिसांचा छापा पालावर. पोलिसांचा मार खाणं, एखादा अवयव निकामी होणं, मुलंबाळं बेवारस करून आयुष्यभर तुरुंगात खितपत काढणं- हे रूढ होत गेलेलं. प्रश्न घेऊन जन्माला आलेलं मूल प्रश्न घेऊन मरतं, प्रश्न ठेवून मरतं. पण या प्रश्नांना भिडणारा, प्रश्नांना घट्ट आवळणारा, हातात प्रश्न घेऊन प्रश्नाचं हत्यार करणारा पारधी समाजाचा माणूस उभा राहिलाय- त्याचं नाव मतिन भोसले. मतिन भोसलेंनी भीक मागणाऱ्या मुलांच्या हातात पाटी-पुस्तक दिलंय. शिकारीची हत्यारं आणि फासं टाकून मुलांनी हातात पेनपेन्सिल धरलीय. एका मुलाला जन्म दिलेला मतिन साडेचारशे मुलांचा बाप झालाय. एक पोट भरायची मारामार असते, तिथं साडेचारशे पोटांची काळजी वाहतोय. प्रश्नचिन्ह भेदून उत्तराच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे- शिक्षणाची वाट. मतिनच्या शाळेचं नाव आहे प्रश्नचिन्ह! प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा, मंगरूळ चव्हाळा, ता.नांदगाव खंडेश्वर, जि.अमरावती.

नागपूर-औरंगाबाद आणि अमरावती-यवतमाळ हे हमरस्ते एकमेकांना शिंगणापूर इथे छेदतात. हा शिंगणापूर चौफुला. या चौफुल्यापासून पश्चिमेस साधारण पाच किलोमीटरवर ही शाळा आहे. सरकारी नोकरी म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी. ती मिळविण्यासाठी लोक नाना खटपटी-लटपटी करतात. खोट्या गुणपत्रकापासून जातीच्या प्रमाणपत्रापर्यंतची कित्येक उदाहरणं आढळतील. अशा या काळात जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाच्या नोकरीवर मतिन भोसलेंनी लाथ मारून जाळात उडी मारण्याचं धाडस केलं. अमरावती जिल्ह्यात पारधी समाजाचे बेचाळीस बेडे आहेत. मोठ्या बेड्यात नऊशेपर्यंत लोकसंख्या आहे, मंगरूळ चव्हाळा बेड्याची लोकसंख्या सातशेपन्नास आहे.

याअगोदर नववीत शिकत असताना ‘दिव्य सदन’ या ख्रिश्चन संस्थेबरोबर समाजाचं काम केलं होतं. धानोरा, जगतपूर, शिवरा, मंगरूळ चव्हाळा येथील बांधवांना सोबत घेऊन चोरीचा शिक्का पुसण्यासाठी, हक्काची जमीन मिळावी म्हणून, जातीची प्रमाणपत्रं मिळावीत म्हणून मोर्चे काढले होते. आंदोलनं केली होती. संकटात सापडलेल्या समाजबांधवांच्या मदतीला धावून गेले होते. आता मुलांच्या शिक्षणाचा ध्यास घेतला. शोधमोहीम सुरू झाली. नागपूर, औरंगाबाद, मुंबई, छत्तीसगढ... पायपीट सुरू झाली. पुलाखाली राहणारी, रेल्वेस्टेशन, ट्रॅफिक सिग्नल इथे उभे राहून भीक मागणारी मुलं हेरायची. पालकांना सांगायचं, समजवायचं. एप्रिल-मे 2012 मध्ये अशी एकशे अठ्ठ्याऐंशी मुलं गोळा केली. त्यांच्या पोटापाण्यासाठी कुठून गहू, कुठून कडधान्य गोळा केलं. शिकारही करावी लागत होती.

शाळा शिकत असताना मतिनला शाळेपेक्षा जंगल प्यारं वाटायचं. ते आपल्या शिकण्याविषयी म्हणतात, ‘‘वडील मामा-भीमा तितरं पकडून आणायचे. लोकांना द्यायचे. त्यावर पीठ मिळायचं. दोन-तीन दिवस शिकार झाली नाही. शेतात वाणी जवारीची कणसं होती. लंबी कणसं, गोड राहते. आमाला हुरडा चारला. कास्तकरांनी कणसं चोरल्याचा रिपोर्ट दिला. पोलीस आले, दिडशे. आमच्या लोकांनी पोलिसांच्या बंदुका-गिंदुका हिसकावल्या. त्यावर पिटाई बसवली. पोलिसांना मारझोड. दगडं-गिगडं, डेंजर एरिया. धिंगा झाला. पिटाई तीन दिवसांनंतर वडिलांना अटक झाली. चार-पाच कणसांसाठी तीन महिने तुरुंगात. मी पाच वर्षांचा होतो तेव्हा. वडिलांनी मला पहिल्या वर्गात दाखल केलं. मला जंगलची सवय. बाटी बोमलून भोरी पकडायची सवय. घोडी पकडली. तिच्या शेपटीचे केस उपटले. त्याचा फांदा तयार केला. ते शाळेत घेऊन गेलो. शिक्षक म्हणाले, हे काय? मी म्हणालो, पारवे पकडायचं हे. ते म्हणाले, शिकायला आला का पारध्या, पारवे पकडायला?

मी पळून गेलो. जंगलात राहुटी असायची. जिथं दाट शिकार असायची तिथं राहायचं. या जंगलाचा पाल, त्या जंगलामध्ये चाल. इथं वीस दिवस, तिथं महिना. भटकंती. दोन महिने काढले. वडिलांनी पकडलं, मारलं. पुन्हा शाळेत घातलं. कसंबसं ढकलपास करून तिसऱ्या वर्गापर्यंत नेलं. चौथीला दोन वर्षे नापास. थोरातगुरुजींनी चड्डी, पाटी घेऊन दिली. ते मला त्यांच्या घरी घेऊन जायचे. मग गोडी लागली. दहावीनंतर पोटासाठी नीलगाय, तितरं, बटेर, लावा यांची शिकार करायचो. जांभळं खायची, मध गोळा करायचा. मधाच्या बदल्यात संत्री घ्यायची. कधी काहीच मिळालं नाही की संत्री चोरायची. तितरं भाजून खायची.’’

अशीच भटकणारी एकशेअठ्‌ठ्याऐंशी मुलं सांभाळायची होती. बेड्याशेजारी रिकामं पडलेलं सरकारी गोडावून होतं. त्याचं कुलूप तोडलं. मुलं त्यात राहू लागली. हीच शाळेची सुरुवात. मुलं सोडली तर शाळेची खूण असलेलं काहीच नव्हतं. मुलांना एकत्र टिकवून ठेवणं, हेच पहिलं शिक्षण होतं. ही जगावेगळी शाळा. पहिलं शिक्षण लढाईचं. हक्कासाठी, सरकारला जागं करण्यासाठी. मुलांच्या शिक्षणाची सुरुवातच आंदोलनानं झाली- भीक मागो आंदोलन. कार्यकर्ते आणि मुलं एक रुपयाची भीक मागायची. सरकारी कार्यालयात जायचं. आपली भूमिका, आपल्या मागण्या सांगायच्या. डब्यात कोणी एक रुपाया टाकायचे, तर कोणी एक हजार रुपयांची नोट टाकायचे. एक रुपाया टाकण्यासाठी मनधरणी केली जायची, पण हजारपाचशेची नोट घ्यायला ठाम नकार. मग तिथं अधिकारी असो, नाही तर मंत्री असो.

हे आंदोलन सरकारनं या मुलांच्या शाळेला मान्यता द्यावी, शंभर टक्के अनुदान द्यावं, पारधी समाजाचे प्रश्न सुटावेत यासाठी होतं. प्रश्नांची दखल घ्यावी यासाठी आंदोलन होतं. ही भूमिका न समजल्यामुळे, समाजाविषयीच्या पूर्वग्रहदूषित दृष्टीमुळे काही लोक आरोप करत- एक रुपयामध्ये एकविसाव्या शतकात काय येतं? यामध्ये मुलांचं पालन-पोषण होऊ शकत नाही. तुम्ही सोंग घेतलंय. दिवसभर फिरून कुठं कुठं फ्रिज, कूलर, लोखंड आहे बघणार अन्‌ रात्री चोरी करणार. भीक मांगो आंदोलन करताना मतिन भोसले यांच्यावर अठ्ठावीस पोलीस केस झाल्या. अगदी फॉरेस्ट विभागानं लाकूडचोरीचे आरोप केले. ट्रक भरून लाकडं नेतात आणि जिमखाना, हॉटेलमध्ये विक्री करतात. यामध्ये तीन दिवस अटक झाली. नऊ केसमधून सुटका झाली. बाकी सुरू आहेत. विनापरवानगीची ही आंदोलनं.

आजही महिन्यातून चार-दोन वेळा अमरावती, नागपूर, यवतमाळ  या ठिकाणी कोर्ट केससाठी जावं लागतं. जून 2012 मध्ये नोकरीचा राजीनामा रीतसर दिला. घरच्यांनी बोलणं बंद केलं. वडील ‘तुला मारून टाकतो’ म्हणू लागले. पत्नीही विरोधात. घरच्यांनी बहिष्कार टाकला. दोन महिने घरातल्या संघर्षाला तोंड द्यावं लागलं. आता पत्नी खांद्याला खांदा लावून या कामात बरोबर आहे.

मतिन भोसले म्हणतात, ‘‘पारधी मूळचे रजपूत. लढवय्ये. पानिपतच्या युद्धात हा समाज लढत होता. प्रामुख्याने शस्त्रे पुरवणे हे त्यांचं काम. इंग्रजांच्या रेल्वेचं लोखंड चोरून रजाला द्यायचं. इंग्रजांनी अटक केली. सर्व समाजाला चोर-दरोडेखोर म्हणून जाहीर केलं. जंगलात लपून राहावं लागलं. रानोमाळ भटकावं लागलं. आता हा समाज जरासा गावाजवळ आलाय, परंतु चोर म्हणून मारलेला शिक्का अजून पुसला नाही. घरकुलं मिळाली, जमिनी मिळाल्या, तरी समाजाचा विकास होणार नाही. विकास करायचा असेल, समाज बदलायचा असेल, शिक्का पुसायचा असेल; तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही.’’

दि.14 ऑगस्ट 2012 रोजी 150 कार्यकर्ते आणि 188 मुलं घेऊन भीक मांगो आंदोलन सुरू. थेट जिल्हाधिकारी कार्यालय. जिल्हाधिकाऱ्यांना गाठलं त्यांना भीक मागितली. सर, तुम्ही एक रुपयाची भीक द्या. या दानपेटीत रुपया टाका. जिल्हाधिकारी भडकले. अजिबात नाही. तुम्ही सिस्टीमच्या विरोधात आंदोलन करत आहात. तुम्हाला अटक करायला पाहिजे. गुन्हा काय तर म्हणे, तुम्ही लहान मुलांना भीक मागायला प्रवृत्त करत आहात. मतिन भोसले म्हणाले, ठीक आहे. जेल म्हणजे आमचे आई-वडील. जेल आम्हाला मरणही आणि पालनपोषणही. साहेबांनी पोलिसांना बोलावून मतिन भोसलेंना ढकलून बाहेर काढलं. मग ते एस.पी. कार्यालयात केले. त्यांनी पोलिसांची भाषा वापरली. पारध्या आम्हाला पूर्ण सिस्टीममध्ये बेहकून राहिला. काय सोंग लावलंय हे? चला रे, याला अटक करा. आत टाका.

ही वरात अमरावतीच्या राजकमल चौकापर्यंत हुसकली. तिथं सोडलं. मुलं आणि कार्यकर्त्यांना घेऊन मतिन भोसले पोलीस आयुक्तांकडे गेले. ते ओरडले, अटक करायला पाहिजे म्हणाले. मतिन भोसले म्हणाले, काय विषय न्हाय? मी भयानक गुंडा माणूस हाय, अमरावती शहर पूर्ण लुटलंय म्हणून तुम्ही मला अटक करणारच. तुमालाबी पोलीस म्हणून लुटण्यासाठी आलोय म्हणून अटक करताय. मतिन भोसले गरम झाले होते.  अटक करण्याचा आदेश निघाला. सर्व तयारीनिशी अटक झाली. मुलं, कार्यकर्ते सोबत होते. एकीकडे ध्वजवंदनाची तयारी सुरू होती आणि दुसरीकडे अंधारात गडद झालेल्या भोवतालात शाळेची तयारी सुरू होती.

मुलांना बाहेर काढलं, बालसुधारगृहात पाठवलं. पंधरा ऑगस्टला घोषणा दिली- ‘ये आझादी झूटी है, देशका आदिवासी पारधी भूखा है.’ यासोबत आमरण उपोषणाची चिठ्ठी दिली. चक्रं फिरली. पंधरा मिनिटांत मतिन भोसलेंना अंडासेलमध्ये पाठवलं. नक्षलवादी, धोकादायक गुन्हेगार ठेवतात, त्या ठिकाणी स्वातंत्र्याचे हक्क मागणाऱ्याला ठेवलं होतं. अंधार, मारझोड. तब्येत खालावली. उपोषणाला बहात्तर तास झाले होते. कार्यकर्त्यांनी आवाज उठवला. आतले कैदी धमकावत होते, ‘आम्ही खून केलेत, तुझा पत्ता लागू देणार नाही.’ मग दवाखान्यात हलवलं. इतर कार्यकर्त्यांचं उपोषण सुरू होतं. मग बाहेर काढलं. जप्त साहित्य ताब्यात दिलं. लगेच जेलच्या गेटपासून भीक मांगो आंदोलन सुरू केलं. शिपायानं एक रुपाया टाकला.

खऱ्या अर्थानं 22 सप्टेंबर 2012 रोजी शाळा सुरू झाली. शाळेचं नाव प्रश्नचिन्ह आदिवासी पारधी आश्रमशाळा. समाजापुढे पोटाचा प्रश्न, गावाचा प्रश्न, घराचा प्रश्न, जातीच्या प्रमाणपत्राचा प्रश्न, विविध दाखल्यांचा प्रश्न, माणूस म्हणून जगण्याचा प्रश्न... प्रश्न, प्रश्न, प्रश्न! प्रश्नच प्रश्न!! म्हणून शाळेचं नाव प्रश्नचिन्ह.

मुलं शाळेत आली खरी, पण त्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न होता. मुलं अंगावरचे कपडे महिनोन्‌महिने काढत नव्हती. शौचाला कसं बसायचं, दात कसे घासायचे- काहीच माहीत नव्हतं. दोन वर्षे साफसफाईत गेली. मुलांना नदीवर घेऊन जायचं. अंघोळ घालायची. दगडानं अंग घासायचं. चमडी निघेपर्यंत मळ काढायचा. यातील बरीच मुलं निराधार. कोणाचे आई-वडील जन्मठेपेची शिक्षा भोगताहेत, काही सर्पदंशाने, अस्वलाच्या हल्ल्यात, शिकारीला गेल्यानंतर शेतकऱ्यानं टाकलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन धक्क्यानं मेलेत.

ही मुलंच कमाईचं साधन. कोणी भंगार गोळा करतंय, कोणी भीक मागतंय. यांच्या कमाईवर पोट. भीक मिळाली की, निम्मी रक्कम दलालाला द्यायची. अशा मुलांना शाळेत आणणं सोपं नव्हतं. मुलांचे पालक आणि दलाल दोघेही शत्रू. जीवावरचे प्रसंगही बेतले. इथं मुलं भीक मागतात म्हणून कोणालाही अटक केली जात नाही. एकेका पुरुषाची चार-पाच लग्नं, एकेका मुलाला चारपाच आया; पण एका आईचं नाव माहीत नाही. पहिली लढाई मुलांच्या आई-वडिलांबरोबर, दुसरी लढाई शासनाबरोबर. रात्री शहरभर फिरून हॉटेलातील शिल्लक वडे, सामोसे गोळा करायचे. पोरांना चारायचे. तिथंच पोरांबरोबर सिग्नल किंवा पुलाखाली झोपायचं. एकदा मतिन भोसलेंना टाइफाईड झाला. धान्य संपलं होतं. मुलांना खायला काय घालायचं? विकायचं म्हटलं तरी सगळा उघड्यावरचा संसार. मुलांची परीक्षा फी द्यायचीय. पालक साथ देत नाहीत. सगळं सोडून द्यावं वाटलं, पण कोणी ना कोणी मदतीला उभं राहिलं. उद्याचं काय, असा प्रश्न आजही असतोच.

सप्तशृंगीवरून, मनमाडच्या रेल्वे स्टेशनवरून भीक मागणारी पंचवीस मुलं शाळेत आणली होती. यांचे आई- वडील तुरुंगात सजा भोगत होते. मुलं शाळेत रमली आणि एके दिवशी या मुलांचे इतर पालक- आजी, काकू, काका-मुलांना न्यायला आले. त्यांची कमाई थांबली होती. दलाल त्यांच्या पाठीशी होता. दि.15 ऑगस्ट 2016 हा तो दिवस. पालकांनी भांडण काढलं, अंगावर धावून आले. मारामारीचा प्रसंग आला. नाइलाज झाला. मुलांना जा म्हणावं लागलं. मुलं रडू लागली. जायला तयार होईनात. ती मतिन भोसलेंना बिलगली, अलग व्हायला तयार नव्हती. शेवटी पालकांनी मुलं नेलीच. काही काळ गेल्यावर पुन्हा प्रयत्न. मुलं परत शाळेत आली. आज ही मुलं नववी-दहावीत शिकत आहेत.

ही कोणत्याही शाळेत न जाणारी मुलं होती. काही मुलांची नावं बेड्यावरच्या शाळेत असायची. पटावर चाळीस मुलं असली, तरी प्रत्यक्षात दररोज चार-दोन मुलं शाळेत हजर. एके दिवशी दोन मुलांना मागे बसवलेलं दिसलं. गुरुजींना विचारलं तर ते म्हणाले, ‘‘इतर मुलं पाहा आणि तुमच्या समाजातील मुलं पाहा. किती घाणेरडी आहेत! ही मुलं पेन चोरतात, पुस्तकं चोरतात.’’ मतिन भोसले त्यांना म्हणाले, ‘‘शिक्षक असे असायला पाहिजेत की सिस्टीमचे बाहेरच्याला ते आत आणत आहेत, अन्यथा ते काही कामाचे नाहीत.’’ मग ते शिक्षक आणि त्यांची संघटना मतिन भोसले यांच्या विरोधात. अर्थात मतिन भोसले आवर्जून सांगतात की, जिल्हा परिषदेच्या शाळेतील काही शिक्षकांनी त्यांना गहू, ज्वारी, तांदूळ देऊन मदत केलीय.  आजही शिक्षक त्यांना मदत करतात.

सिकंदराबाद-तेलंगणा येथील आई-वडिलांना वाघाची शिकार केल्याच्या आरोपाखाली सजा झाली होती. मतिन भोसले त्यांच्या मुलांना आणण्यासाठी तिथे गेले. मुलं म्हणाली, ‘तुमच्या शाळेत काय काय मिळणार?’ त्यांनी विचारलं, ‘तुम्हाला काय काय हवं?’ मुलं म्हणाली, ‘एकशेवीस-तीनशेचा खर्ररा, नागपुरी सितार गुटखा असं मिळणार का तुमच्या शाळेत? ब्रॉयलर कोंबड्यांची आतडी मिळणारी का? मटण, लाल रंगाची दारू?’ पांढऱ्या रंगाची दारू चालणार नाही का विचारल्यावर मुलं म्हणाली, ‘तुम्ही दारूत पाणी मिसळून देणार.’

महाराष्ट्रातील पारधी भीक मागण्यासाठी तिथपर्यंत पोहोचले आहेत. तिथून अठरा मुलं आणली. या मुलांना सुरुवातीला तंबाखू दिली, खर्ररा दिला, चार दिवस दारूही दिली. देणगीतून टीव्ही संच मिळाला होता. त्यावरचे कार्यक्रम, गाणी, योगा यातून पहिल्या मुलांत ही मुलं मिसळून गेली. त्या सवयी सुटल्या. मटण मात्र लागायचं. रोही (नीलगाय) पकडून आणायची, रानडुकरांची शिकार करायची. मटण नाही मिळालं तर मुलं म्हणायची, ‘मतिन, तू केत्रोही सिरा (कितीही जाग), आम्ही पळून जाणार.’ काही मुलं पळून जायची. रेल्वे स्टेशनजवळच्या पोलीस स्टेशनचे, पोलिसांचे फोन नंबर होते. त्यांना कळवायचं. मुलांना पकडून परत आणायचं. रोज शे-दीडशे भांडण. भांडणंही अशी की एकमेकांना दगडानं मारायचे, रक्त निघेपर्यंत. त्यांच्या राखणीसाठी तीन-चार कर्मचारी, प्रत्येक मुलाची कहाणी वेगळी. साडेचारशे मुलांच्या साडेचारशे कहाण्या. जंगलात राहणारी, भटकणारी, शिकार करणारी ही मुलं सारखी पळायची. दंड ठोकायची, ‘थांब पाह्यते तुमचं! न्हाय मटण देऊन ऱ्हायले?’

मग शाळेभोवतीचं वातावरण जंगलासारखं केलं. शिकारीचं साहित्य ठेवलंय. ते मुलांनी बघायचं. मग पुस्तकं दाखवायची. शिकार चांगली की पुस्तकं? शिकार सोडा, पुस्तक हातात धरा. आता मुलं पळून जात नाहीत. सुट्टीत आई-वडिलांना भेटायला जातात. ज्यांचे आई-वडील नाहीत ते मावशी, काकांना भेटतात. पूर्वी ही मुलं गेली की परत फिरकत नसत, आता स्वत: होऊन परत येतात. दैनिक सकाळचे प्रमोद काळपांडे यांनी लेख लिहिला.  ‘एका शिक्षकानं राजीनामा देऊन गुढी पाडव्याला शिक्षणाची गुढी उभारली!’ लेख वाचून या शाळेकडं लोकांचं लक्ष गेलं. जालन्याची मैत्र मांदियाळी ही संस्था मदतीला धावून आलीय. भीक मांगो आंदोलनं बंद झाली. आता शाळेचं रूप पालटू लागलंय. मैत्र मांदियाळी या संस्थेच्या सहकार्यानं इमारत बांधकाम सुरू झालंय. पूर्वी झोपड्यांमध्ये वर्ग भरायचे. साप, विंचू निघायचे. मुलांना डसायचे. वीज नव्हती. सगळा संसार अंधारात. उजेडासाठी दोन वर्षे भांडावं लागलं. पुण्यनगरीमध्ये ‘कुणा कुणा भेटू मी?’ हा लेख आला. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी तो वाचला. त्यांनी यंत्रणा कामाला लावली. तहसीलदारांना पाठवलं. अडचणी समजून घेतल्या. दोन वर्षे रखडलेलं विजेचं काम आठ दिवसांत झालं. साहेबांनी शाळेला कपाटं, पुस्तकं दिली. त्यांच्या वडिलांची स्मृती वाचनालयाच्या रूपानं इथं दिसतेय. प्रशासनातही संवेदनाशील माणसं आहेत, याचं दर्शन झालं.

प्रश्नचिन्हला उत्तराचा मार्ग गवसलाय. पण प्रश्न सोपे नाहीत. एक प्रश्न सुटला की दुसरा प्रश्न उभा राहतोय. इमारत बांधकाम सुरू आहे. कुठं अंगणवाडीच्या बांधकामावरचं लोखंड चोरीला गेलं की, पोलीस आले प्रश्नचिन्हमध्ये. निरपराध असल्याचं किती वेळा सिद्ध करायचं? मतिन भोसले पोलिसांना म्हणाले, ‘तुम्हाला हे चोरीचं लोखंड वाटत असेल तर घेऊन जा; पण ज्यांनी मदत म्हणून दिलंय, त्यांना फोन लावतो.’ मग ससेमिरा चुकला. एक चुकला, दुसरा सुरू झाला.

मैत्र मांदियाळीचे अजयभाऊ किंगरे मदतीला धावून आले. आधार दिला. त्यांच्यामुळेच डॉ.प्रकाश आमटे यांच्याशी मतिन भोसले यांचा एका कार्यक्रमात परिचय झाला होता. त्यांनी इथं भेट दिली. मतिन भोसले यांचं काम पाहून ते भारावले. डोळे पाणावले. या प्रकरणात ते पाठीशी राहिले. त्यांची नजर प्रश्नचिन्हकडे आहे. मंदाताई आणि ते अधूनमधून इथं येतात. मुक्कामाला थांबतात. रमतात, अडचणी समजून घेतात. त्यांच्या सहकार्यामुळं पाण्याची सोय झाली आहे. पासष्ट फूट खोल विहीर आहे. पस्तीस फूट खोल पाणी आहे. जवळपास साडेआठ लाख रुपये खर्चाची मदत या कामासाठी डॉ.प्रकाश आमटे यांनी केली आहे.

आश्रमशाळेत दहावीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. पारधी समाजाची बोली जाणणारे शिक्षक इथं आहेत. मुलं शिकत आहेत. शिक्षणाकडं कसं वळलो सांगताना त्यांच्या तोंडातून मतिनसरांचं नाव येतं. ही मुलं बोलतात, गातात, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतात. प्रत्येक मूल शिकून स्वत:च्या पायावर उभं राहावं यासाठी मतिन भोसले धडपडत आहेत. सात मुलं हेमलकसा, चंद्रपूर, जळगाव, नागपूर या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी आहेत. प्रश्नचिन्हशी जोडलेल्या संस्था आणि व्यक्ती यासाठी मदत करत आहेत. कोणाला डॉक्टर व्हायचं आहे, कोणाला स्पर्धापरीक्षा देऊन अधिकारी व्हायचं आहे. क्रीडास्पर्धेत मुलं चमकत आहेत. केंद्रप्रमुख जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली योगामध्ये राष्ट्रीय पातळीपर्यंत शाळेचं नाव पोहोचलंय.

अजून खूप पल्ला गाठायचाय. मदतीचे हात पुढे येत आहेत. अरुण बुधले आपल्या पत्नीसह मुलांच्या स्वयंपाकाची जबाबदारी कोणत्याही अपेक्षेशिवाय पेलत आहेत. भोजनाचा दर महिन्याचा अर्धा खर्च मैत्र मांदियाळी देतेय. अर्ध्या खर्चाच्या तरतुदीसाठी झगडणं सुरू आहे. खरं काम असेल तर लोक मदत करतात, यावर मतिन भोसले यांचा विश्वास आहे. ज्या कारणासाठी रक्कम मिळते, त्याच कारणासाठी ती खर्च केली जाते. पैसे घेण्यापेक्षा वस्तुरूपाने मदत घेणं, बांधकामाच्या रूपानं मदत स्वीकारण्याला इथं प्राधान्य दिलं जातंय. सुरुवातीस येथील वातावरणाविषयी गैरसमज होते. पारधी खतरनाक आहेत, गाड्या फोडतात- असं सांगितलं जायचं. देणगीदार पळून जायचे.

दै.लोकसत्ताच्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या सदरामध्ये प्रश्नचिन्हविषयी माहिती आली. संस्था माहीत झाली. मदत घेऊन लोक येऊ लागले. आता लोक प्रश्नचिन्हला भेट देतात. इथं थांबतात. आम्ही मतिन भोसले यांच्याशी गप्पा मारत होतो, तेव्हाही भेट देण्यासाठी लोक आले होते. येताना धनादेश घेऊन आले होते. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पंचायत समितीतील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आले. त्यांनीही आर्थिक मदत केली. स्वत: होऊन मदत देणारे पुढे येत आहेत. तरीही मुलांची संख्या, सोई-सुविधा, खर्च पाहता प्रश्नचिन्ह अजूनही उत्तराच्या शोधात आहे. उत्तराकडे जायला आपण त्यांचे सोबती होऊ या.

नामदेव माळीमतिन भोसले

Tags: शाळा नामदेव माळी आदिवासी मतिन भोसले शिक्षण prashnchinh ashramshala parashi matin bhosale matin bhosle namdev mali uttarachya shodhat prashnchinha shikshanvishv weekly sadhana 27 january 2018 sadhana saptahik प्रश्नचिन्ह आश्रमशाळा पारधी मतीन भोसले नामदेव माळी उत्तराच्या शोधात प्रश्नचिन्ह शिक्षणविश्व साधना साधना साप्ताहिक अंक 27 जानेवारी 2018 साधना साप्ताहिक weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नामदेव माळी,  सांगली, महाराष्ट्र
namdeosmali@gmail.com

शिक्षण क्षेत्रात वर्ग दोनचे अधिकारी, कादंबरीकार व शैक्षणिक लेखक.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके