डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्रौढ साक्षरता अभियान पुन्हा सुरू करावे लागू नये म्हणून

संपूर्ण जगाला कोरोनानं विळखा घातला होता. तो हळूहळू सैल होत आहे. जग सुरू झाले आहे. परंतु 100 टक्के शाळा 100 टक्के मुलांच्या उपस्थितीमध्ये सुरू झालेल्या नाहीत. शिक्षण अवघडलेल्या अवस्थेत आहे. ते पुन्हा किमान मूळ पदावर आणावं लागेल व नंतर प्रगतिपथावर न्यावं लागेल. यासाठी रॉजर्स कर्व्हचा विचार करून काम करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांची मन:स्थिती बदललेली आहे. पुन्हा बदल स्वीकारणं ही अवघड गोष्ट सवघड (सोपी) करण्याचं आव्हान आहे. गोरगरीब, कष्टकऱ्यांची मुलं मजुरी करण्यासाठी जात आहेत. पालकांना मदत करत आहेत. शाळेच्या बाहेर सुतारकाम, गवंडीकाम शिकली आहेत. त्यांच्याकडे शिकण्याची क्षमता आहे, परंतु ते ज्या पद्धतीने शिकू शकतात, त्या पद्धतीने आम्ही त्याला शिकवू शकलेलो नाही. या मुलांच्या हातात मजुरीचा पैसा येत आहे, त्याची त्यांना सवय होत आहे. त्यापासून त्या’ना दूर करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या मुलांच्या बाबतीत हे प्रमाण अधिक असणार आहे.

सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात दुसरीच्या वर्गात असणारी मुलं या वर्षी तिसरीचं शिकणार आहेत. यातील बरीचशी मुलं कशीबशी अक्षरे आणि अंकज्ञान याची ओळख झालेली आहेत. पहिलीच्या वर्गात परिपूर्ण शिक्षण झालेलं नसतं म्हणून तर सातवीच्या मुलांना तिसरीचं वाचता येत नाही- वगैरे बोललं जातं. असरच्या अहवालावर नजर टाकल्यास हे स्पष्ट होईल. अशी ही दुसरीची मुलं वर्षभर शाळेत गेलेली नाहीत. अपवाद वगळता शिक्षकांना भेटलेली नाहीत. ऑनलाइन किंवा ऑफलाइनचा वारा त्यांना लागलेला नाही. पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्यांचं शिकणं किती झालं याचा विचारच करायला नको. काही मुलं कधीच शाळेच्या वर्गात गेली नाहीत आणि त्यांना त्यांचे शिक्षकही माहीत नाहीत.

पहिली ते चौथीची मुलं गेल्या वर्षात एकदाही शाळेत गेली नाहीत. काही उपक्रमशील, धडपडे शिक्षक याला अपवाद आहेत. या मुलांना ‘सांग सांग भोलानाथ शाळा भरेल काय?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शिकण्यामध्ये सलगता, सहजता येण्यामध्ये अडथळे आहेत. कोरोनापूर्व शिक्षणाच्या स्थितीचा शिकण्याच्या सर्वसाधारण स्तराचा विचार करता पहिली ते चौथीच्या मुलांना शिकवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. उन्हाळ्याची एक महिना सुट्टी संपल्यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला शाळापूर्व तयारीसाठी पंधरा दिवस द्यावे लागतात. कोरोनामुळे मुलांच्या शिक्षणात दीड वर्षांच्या कालावधीचा मोठा खंड पडला आहे. ग्रामीण भागात पाचवीपासूनचे वर्ग 50 टक्केप्रमाणे एकआड एक दिवस सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. पहिली ते चौथीचे वर्ग कधी सुरू होणार माहिती नाही. शहरामध्ये आठवीपासूनचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. 

हा भला मोठा खंड पडलेला काळ आहे. या काळात मुलांचं खूप विस्मरण झालेलं असणार आहे. असा खंड पडल्यानंतर मुलांच्या दृष्टीनं शिकणं हे खूपच किचकट असतं. या दीर्घ कालावधीचा विचार करता विविध स्तरांवर आसणाऱ्या मुलांना पुन्हा शिकण्याच्या प्रवाहात आणण्यासाठी व मूळ शिकलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल सांगता येत नाही. पहिलीची मुले आणि दुसरीची मुले लेखन-वाचन, अक्षर, अंकज्ञान यांमध्ये खूपच मागे असणार आहेत. पहिलीच्या वर्गातून दुसरीच्या वर्गात मुलं जातात त्या वेळी सर्व मुलांची पूर्ण तयारी झालेली नसते. बरीच मुले शिकण्यामध्ये पाठीमागे असतात. दुसरीच्या वर्गात गेल्यानंतर त्यांना पुन्हा पहिलीच्या वर्गाचं शिकवावं लागतं. अन्यथा वाचन-लेखनात ही मुले कायमच मागे राहतात. त्यामुळे त्यांना पुढचं शिकणं मेंदूवरचं ओझं ठरतं. सध्या दुसरीच्या वर्गात असणाऱ्या मुलांच्या शिक्षणात मोठा खंड पडला असल्याने हे प्रमाण अधिक असणार आहे. काही मुलांना पूर्णपणे पहिलीचं शिकवावं लागणार आहे.

सर्वच वर्गांत पूर्वीपासून पाठीमागे असणारी मुले, वेगवेगळे प्रश्न असणारी मुले, घरच्या अडचणी असणारी मुले, यांना शिकवण्याचं मुख्य आव्हान असणार आहे. पूर्वीपासून शैक्षणिक उपोषण झालेल्यांची संख्या खूप आहे. ऑनलाइन शिक्षण दिलं असं म्हटलं जातं, परंतु ते किती पोहोचलं आणि किती पचलं हा प्रश्न आहे. याचं मोजमाप करता आलेलं नाही. आजच्या स्थितीत शिकण्याच्या व शिकविण्याच्या पद्धतीत बदल झाला नाही तर जे शिकत आहेत ते शिकत राहतील आणि जे शिकत नाहीत ते शिकू शकणार नाहीत. सुरळीत शाळा सुरू असताना शंभर टक्के मुलांना आपण किमान शिकवू शकलेलो नाही. मग शाळा, शिक्षक आणि मुलं यांची गाठभेट न होता सर्व मुलं किती आणि काय शिकली असतील, याची खातरजमा ना पालकांकडून झाली, ना शिक्षकांकडून झाली. स्वाध्याय उपक्रमासारखे साधन शासनाने हातात दिले. सुरुवातीस त्याचा नगण्य वापर झाला. स्वाध्याय सोडविणाऱ्या मुलांची संख्या खूपच कमी होती. वरिष्ठांनी तगादा लावल्यामुळे ही संख्या अचानक एक टक्क्यावरून 70 टक्क्यांवर गेली. एका मोबाइलवर एका वेळी शंभर मुलांना स्वाध्याय सोडविण्याची सोय आहे. रेंज नसताना, मोबाइल नसताना हे कसं काय शक्य झालं, याची चर्चा चवीनं झाली. हे काम काही शिक्षकांनीच पूर्ण करून वरिष्ठांची बोलणी खाण्यापासून स्वतःची सुटका केल्याचे बोलले जाते. हे सर्व असेच सुरू राहिले, आज योग्य विचार झाला नाही तर आणखी काही वर्षांनंतर पुन्हा प्रौढ साक्षरता अभियान सुरू करावं लागेल. परंतु कटू सत्य स्वीकारून ‘पोपट मेला आहे,’ असं म्हणण्याचं धाडस कोणी दाखवायचं हा प्रश्न आहे.

शिकण्या-शिकवण्यापेक्षा आपला परीक्षेवर अधिक विश्वास आहे. परीक्षा घेतली की आमचं काम संपलं. एकदा निकाल दिला की प्रश्न निकालात निघाला. दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्या पाहिजेत, यासाठीही आपण आग्रही राहिलो. नववीतून दहावीत गेलेल्या मुलांची सत्र दोनची परीक्षा झाली नव्हती. नोव्हेंबर 2020 मध्ये ऑफलाइन शाळा 50 टक्के मुलांच्या उपस्थितीत सुरू झाल्या. गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांचे ऑफलाइन अध्यापन केले गेले. साधारण तीन महिने 50 टक्के उपस्थिती म्हणजे प्रत्यक्षात दीड महिना उपस्थिती. साधारणपणे सकाळी 11 ते 12 या कालावधीत शाळा भरायची. या काळातच सॅनिटायझर लावणे, तापमान मोजणं व्हायचं. अशा परिस्थितीमध्ये शिक्षण किती झालं असेल? शिवाय इतर विषय ऑफलाइन पद्धतीने शिकवले गेले नाहीत. विज्ञान विषयाची प्रात्यक्षिकं किती झाली, याचा विचारच करायला नको. परीक्षा झाली की शिक्षण झालं असं तरी वाटत नाही ना आपल्याला? ओघानंच दहावी-बारावी मूल्यमापन शाळास्तरावर झालं. सर्वांना पास होण्याची संधी दिली. आपण पास होऊ असं स्वप्नातही वाटलं नसेल अशी मुलं दहावी पास झाली. ‘न भुतो न भविष्यति’ असं हे घडलं.

या सर्व वातावरणामध्ये शाळा आणि शिक्षणाची पडझड झाली आहे. शाळा बंद असल्याने त्यांना आणि शिक्षकांना मरगळ येणे साहजिक आहे. शाळांमध्ये हवी तितकी स्वच्छता झालेली नाही. शाळा वापरात नसल्याने, गवत वाढल्याने ओसाड वाटाव्यात अशी काही ठिकाणी स्थिती आहे. एकंदरीत वातावरणात उदासी भरून राहिली आहे.

शिक्षकांना शाळेत 50 टक्के उपस्थितीचे बंधन घातले गेले. शिक्षक शाळेत असतील तरच विद्यार्थी त्यांच्याभोवती घोटाळतात. शिक्षकांची शाळेतील उपस्थिती 100 टक्के असेल तर हे घडू शकतं, असं बऱ्याच जणांना वाटतं. शाळेपासून, मुलांपासून दूर राहिल्याने शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या शिकण्या-शिकवण्याच्या सवयीत अडथळा आला आहे. न शिकणं, न शिकवणं अंगवळणी पडल्याची शक्यता नाकारता येत नाही. एकाच स्थितीत राहून अवघडलेला अवयव सरळ करताना दुखतो, तशीच काहीशी अवस्था झाली आहे. पहिली ते चौथीच्या शाळा आजही सुरू झालेल्या नाहीत. अजूनही हाताशी वेळ असल्याने शाळांची डागडुजी करणे, बागबगिचा करणे, परसबाग करणे, वृक्षारोपण करणे, शालेय दप्तराचे वर्गीकरण करणे, अशा काही गोष्टींना हा काळ उपयोगी पडेल.

काही ठिकाणी मात्र शिक्षक व अधिकारी या सर्वांवर मात करून आपलं काम अधिक जोमानं, निष्ठेने व कल्पकतेने करत आहेत. वेगळी वाट चोखाळत आहेत. धुळ्याच्या नीता सोनवणे यांनी ऑनलाइन शिक्षण सुरू असताना मुलांचे छोटे गट करून गल्लीत ओट्यावर मुलांचं शिकणं सुरू ठेवलं आहे. यासाठी मोठे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, स्वयंसेवक, पालक यांची मदत घेतली आहे. गल्लीमध्येे विद्यार्थ्यांच्या गटाला शिकवणाऱ्या मुलांना त्यांनी ‘गल्लीबॉय’ असं नाव दिलं आहे. समाजाचा सहभाग घेऊन कम्युनिटी क्लास सुरू केला आहे. दुर्गम आदिवासी भागात रेंज नसल्याने ऑनलाइन शिक्षणात अडथळे येतात. मोबाइलमधील आपलं खाजगीपण मुलांच्या हातात देणे पुरुष पालकांना अवघड होतं. त्यासाठी पालकांना मुलांवर लक्ष ठेवत बसावं लागतं. त्यामुळे दोघांचीही मन:स्थिती बिघडते. दुर्गम डोंगराळ भागात घरे दूर दूर अंतरावर असल्यामुळे दोन व्यक्तींमधील अंतर राखणं सोयीचं होतं. त्यामुळे येथे कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी वाटतो. 

पहिलीत न दाखल झालेली मुलं मोठ्या भावंडांबरोबर पूर्वी शाळेत येत असल्याने आणि कम्युनिटी क्लासमुळे पहिलीची मुलं सुरुवातीपासूनच शिक्षणाच्या प्रवाहात राहिली आहेत. त्यामुळे ती शिक्षणापासून तुटलेली नाहीत. प्रत्येक मुलापर्यंत शिक्षक पोहोचले आहेत. एकही मूल शिक्षणापासून तुटू नये म्हणून धडपड सुरू आहे.

ललिता भामरे या नंदुरबार जिल्ह्यात केंद्रप्रमुख आहेत. त्यांनी शिक्षकांच्या शिकवण्यासंदर्भातल्या ऑनलाइन, ऑफलाइन कार्यशाळा घेतल्या आहेत. ‘माझी शाळा माझी जबाबदारी’, ‘माझा वर्ग माझी जबाबदारी’ हे शिक्षकांच्या मनात रुजवले आहे. अल्पसंख्याक समाजातील मुलंमुली शिक्षणापासून तुटू नयेत, न कळत्या वयात मुलींची लग्न होऊन त्या संसाराला लागू नयेत, म्हणून काळजी घेणे सुरू आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ अभियान सुरू आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा हा प्राधान्याचा मुद्दा आहे. शिक्षक सहभाग व लोकसहभागातून जवळपास चार कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. याशिवाय मनरेगा आणि वित्त आयोगातील रकमा शाळांना भौतिक सोयीसुविधा पुरविण्यासाठी वापरण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज शाळेत वर्गखोल्या व भौतिक सोयीसुविधा झाल्या आहेत. परिसर स्वच्छ व प्रसन्न आहे. रंगरंगोटी झाली आहे. या शाळा मुलांच्या स्वागतास सज्ज आहेत. संधीचं सोनं करणे यालाच म्हणत असावेत.

रॉजर्स कर्व्हमध्ये समूहामध्ये काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण कसं असतं हे दाखवलं आहे. समूहातील 20.5 टक्के लोक स्वतः प्रभावित होऊन परिणामाचा विचार न करता धडाडीने, कल्पकतेने वेगळी वाट चोखाळत असतात. उदा.वाडी-वस्तीवरच्या खेड्यापाड्यांतल्या काही शिक्षकांनी वेगवेगळ्या युक्त्या वापरून ऑफलाइन शाळा सुरू ठेवलेल्या आहेत. कोणाच्या परवानगीची, आदेशाची त्यांनी वाट पाहिली नाही. पालक, मुलं आणि शिक्षक या तिघांनाही शिक्षणाची ओढ लागल्यामुळे या शाळा सुरू आहेत, पण हे कोणाला सांगायचं नाही- असं धोरण आहे.

त्यानंतरचे 13.5 टक्के लोक या 2.5 टक्के लोकांचे अनुकरण लगेच करतात. म्हणजे समूहातील सोळा टक्के लोक हे कुणीही न सांगता त्यांचं काम उत्तम रीतीने पार पाडत असतात. हे सूत्र कोरोनाकाळातील सुरू असलेल्या शिक्षणालाही लागू होत असावं. नंतरच्या 34 टक्के लोकांना कोणीतरी सांगावं लागतं, जे 16 टक्के लोक चांगलं काम करत आहेत, त्याची उदाहरणं दाखवावी लागतात. मग ते कामाला लागतात. त्यांनी काम करावं म्हणून वरिष्ठांना थोडेसे प्रयत्न करावे लागतात. मग ते स्वतःमध्ये बदल घडवतात. आज फक्त शिक्षण विभागच नव्हे तर सर्वच विभागांत  अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे या 34 टक्के समूहाला बदलण्यासाठी प्रशासनाला अधिक सजग व्हावं लागणार आहे. नंतरच्या 50 टक्के समूहाला बदलणं अवघड असतं. पुढच्या 50 टक्क्यांमधील 34 टक्के लोक वारंवार प्रयत्न केल्यामुळे बदलू शकतात. शेवटचे 16 टक्क्यांतील 13 टक्के हे खूप सबबी सांगणारे असतात उदाहरणार्थ- ‘हे छोट्या शाळेत ठीक आहे, खेड्यात शक्य आहे हो. आमच्या इथले प्रश्न वेगळे आहेत, ते तुम्हांला कळणार नाही, इथे येऊन बघा म्हणजे कळेल, मग तुम्हीच करून दाखवा.’ वगैरे... शेवटचे 2.5 टक्के लोक हे कठीण खडकासारखे असतात. कितीही प्रयत्न केला तरी ते स्वतःमध्ये बदल घडवत नाहीत. उलट त्यांच्यामध्ये बदल घडवणाऱ्यांना ते त्रास देतात. त्यामुळे या 2.5 टक्क्यांना बदलणं म्हणजे इतर कामांकडे दुर्लक्ष करण्यासारखं असतं. अर्थात खडकावर धडका मारल्यानंतर जो परिणाम होतो तो इथं जाणवतो.

संपूर्ण जगाला कोरोनानं विळखा घातला होता. तो हळूहळू सैल होत आहे. जग सुरू झाले आहे. परंतु 100 टक्के शाळा 100 टक्के मुलांच्या उपस्थितीमध्ये सुरू झालेल्या नाहीत. शिक्षण अवघडलेल्या अवस्थेत आहे. ते पुन्हा किमान मूळ पदावर आणावं लागेल व नंतर प्रगतिपथावर न्यावं लागेल. यासाठी रॉजर्स कर्व्हचा विचार करून काम करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांची मन:स्थिती बदललेली आहे. पुन्हा बदल स्वीकारणं ही अवघड गोष्ट सवघड (सोपी) करण्याचं आव्हान आहे.

गोरगरीब, कष्टकऱ्यांची मुलं मजुरी करण्यासाठी जात आहेत. पालकांना मदत करत आहेत. शाळेच्या बाहेर सुतारकाम, गवंडीकाम शिकली आहेत. त्यांच्याकडे शिकण्याची क्षमता आहे, परंतु ते ज्या पद्धतीने शिकू शकतात, त्या पद्धतीने आम्ही त्याला शिकवू शकलेलो नाही. या मुलांच्या हातात मजुरीचा पैसा येत आहे, त्याची त्यांना सवय होत आहे. त्यापासून त्या’ना दूर करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या मुलांच्या बाबतीत हे प्रमाण अधिक असणार आहे. शाळेबाहेर मजुरीचं काम करत असताना मुलांना मोकळीक मिळते. कृती करण्याची संधी मिळते. त्यात ते आनंद घेत आहेत. ही मुलं त्यांच्या शाळेत शिकण्यात कायमच पाठीमागे असतात. वर्गात बांधून घेऊन न समजणारं, नीरस, कंटाळवाणे ऐकत बसण्याची त्यांची सवय मोडली आहे. त्यांना मुळातच असं आणि अशा प्रकारे शिकण्याची इच्छा नव्हती. त्यांची होती नव्हती तीही इच्छा आता मेल्यात जमा झाली असणार. शेवटच्या 16 टक्के शिक्षकांच्या बाबतीत हे असं झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रत्येक मूल शाळेशी-शिक्षणाशी जोडणं हे पहिलं आव्हान असणार आहे आणि शाळेत आलेल्या प्रत्येक मुलाला आनंदात शिकत ठेवणं हे दुसरं आव्हान असणार आहे. हे आव्हान पेलण्यासाठी शिक्षकांना सक्षम करणं हे प्रशासनापुढचं आव्हान असणार आहे. 

मुलांचा, शिक्षकांचा दिनक्रम बदलला आहे. शिकणं ही नैसर्गिक गोष्ट असली तरी शाळेत बसवून, ठरवून शिकवणं ही थोडी बाजूची गोष्ट आहे. बांधून ठेवणं कोणालाच आवडत नाही. निसर्गात मोकळ्या वातावरणात मुलं रमतात. ती मोकळीक घेण्याची संधी कोरोनानं मुलांना दिली आहे. मुलं शाळेत आल्यानंतर शिकवण्याची घाई करून मुलांना बांधून ठेवलं तर मुलांचं स्वास्थ्य बिघडून नवे प्रश्न तयार होतील. ही घाई होणार नाही यासाठी पालक आणि शिक्षकांना दक्ष राहावं लागणार आहे. पालक मुलांच्या शिक्षणाच्या काळजीनं धास्तावलेले आहेत. त्यांची स्वतःची मन:स्थिती बदललेली आहे आणि त्याचा परिणाम मुलांवरती झालेला दिसून येतो. मध्यम वर्गीय पालकांमध्ये हे प्रमाण अधिक जाणवते. मुलांना कुठून आणि कसं शिकवायचं हा प्रश्नही शिक्षकांसमोर असणार आहे.

मुलांची शिस्तीची सवय मोडली आहे. त्यांना कृत्रिम शिस्त न लावता कामात, शिकण्यात गुंतवल्यास नैसर्गिक शिस्त तयार होईल. आज असणारी मोकळीक देऊन नैसर्गिक वातावरणात कृती करत मूल शिकेल. मुलांना आणि पालकांना शाळा सुरू व्हायला हव्या आहेत. त्यांना शाळेची ओढ लागलेली आहे. मूल फक्त शिक्षकांकडून शिकतं असं नाही, तर ते आपल्या मित्रांकडून अधिक चांगलं शिकतं. मुलांना आपल्या समवयस्क मित्रांबरोबर काम करायला आवडतं. या वातावरणातच त्याचे व्यक्तिमत्त्वाचे पैलू पडत असतात. शिष्टाचार आणि जीवनकौशल्य; शाळेत मित्रांच्या सहवासात विकसित होण्यास मदत होते. औपचारिक शिक्षणात हे सगळं घडत असतं. अनौपचारिक शिक्षणात ही मुलं शिकू शकत नाहीत. शाळेत ठरवून संधी दिल्यास हे अधिक चांगलं होतं, म्हणून यामध्ये शिक्षकांची भूमिका अधिक महत्त्वाची असते. शिकण्यात नावीन्य वाटायला हवं, शिकणं मनोरंजक, सोपं, आव्हान देणारं व्हायला हवं. तेच तेच घोकंपट्टी करायला लावणारं, रट्टा मारायला लावणारं काम मुलांना दिलं तर शाळेच्या ओढीने धावत आलेली मुलं तेवढ्याच वेगात शाळेपासून, शिक्षणापासून दूर जातील. एकाकी असणाऱ्या, प्रश्न असणाऱ्या मुलांची चिडचिड वाढेल. ती बुजतील. त्यामुळे शिकण्यात अडथळा येईल. त्यांना निराशा येईल. जी मुलं मुळातच शिकण्यामध्ये पुढे आहेत ज्यांना पोषक वातावरण मिळाले आहे ती मुलं अधिक वेगाने पुढे जातील. या दोन प्रकारच्या मुलांच्या शिकण्यामध्ये मोठी तफावत असणार आहे. ही दरी अधिकच वाढत जाईल. ही दरी सांधण्याचं आव्हानही शिक्षकांना पेलावं लागणार आहे. दरी अधिक वाढणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

शिक्षकांना मूल कोणत्या स्तरावर शिकत आहे, हे समजावून घ्यावे लागेल. शिक्षणाच्या ज्या स्तरावर मूल आहे, तिथपासून मुलाला शिकवावे लागेल. एकाच वर्गात पहिली, दुसरी, चौथी इत्यादी वर्गांची तयारी असणारे स्तर पाहायला मिळतील. त्यामुळे आता इयत्ताऐवजी स्तरानुसार विद्यार्थ्यांची बैठकव्यवस्था करावी लागणार आहे. त्यानुसार शिक्षकांना शिकवावे लागणार आहे. त्यांना कसे शिकवायचे, एका स्तराला एका शिक्षकांनी शिकवायचे, की वेगवेगळ्या युक्ती वापरून, हे ठरवावे लागेल. काही वेळा एखादा घटक सर्व वर्गातील मुलांनी शिकणे अपेक्षित असते. त्या वेळी सर्व मुले एकत्र करता येतील. काही वेळा मुले आपल्या मित्रांकडून शिकतील किंवा शिक्षक आपल्या सोईने विद्यार्थ्यांचे गट करून शिकवतील. याचं सूक्ष्म नियोजन केल्यास विद्यार्थ्यांना पुढच्या टप्प्यावर जाणे शक्य होईल. मोठ्या माणसांना लेखन, वाचन किंवा गणितातील बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया सोप्या वाटत असल्या, तरी मुलांच्या दृष्टीने ही फारच किचकट व गोंधळात टाकणारी गोष्ट असते. त्यामुळे जर मूल सुरुवातीलाच या गोष्टी शिकलं नाही तर पुढे त्याला हे शिकणं अवघड जातं. किंबहुना त्याचे फक्त शरीर शाळेत असते. या संकटातून कशी सुटका करून घेता येईल याचा विचार त्याच्या मनात सुरू असतो. मग हळूहळू मूल शाळाबाह्य होते. त्यामुळे सद्य:स्थितीत या गोष्टी सर्व मुलांना कशा चांगल्या येतील, यासाठी डोळसपणे सूक्ष्म नियोजन करावे लागेल. हे करत असताना या गोष्टीची कल्पना पालकांना द्यावी लागेल. वास्तवाची जाणीव करून द्यावी लागेल. अन्यथा पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये मतभेद, विसंवाद होण्याची शक्यता आहे. पालकांना त्यांच्या अपेक्षांना आवर घालावा लागणार आहे. विद्यार्थी आणि पालकांना प्रसंगी समुपदेशनाची गरज लागेल. पालकांनी मुलांकडून वस्तुस्थिती जाणून घेऊन आपल्या अपेक्षांना आवर घालावा. मूल शिकण्यासाठी त्याला मदत करण्याची भूमिका घ्यायला हवी.

शिक्षकांनी ‘मी सगळं शिकवणार’ ही भूमिका बदलून कमीपणा न मानता समाजातील घटकांची मदत घ्यावी. ही मुलं मोठी भावंडं, माजी विद्यार्थी, सुशिक्षित युवक-युवती, डी. एड. झालेले युवक, स्वयंसेवक, विशेष कौशल्ये असणाऱ्या समाजातील व्यक्ती या सर्वांना बरोबर घेऊन प्रत्येक मूल शिकवण्याचं नियोजन करता येईल. काय आणि कसं शिकवायचं, अभ्यास, स्वाध्याय, उजळणी यासाठी या घटकांची मदत होऊ शकते. हे सर्व करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण द्यावे लागेल. पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय, उपक्रम, कृती या गोष्टी घेणे त्यांना जमू शकते. अगदी अशिक्षित पालकांचीही मुलाचं शिक्षण आणि सराव सोपा होण्यासाठी मदत घेता येईल. मुलांना गोष्ट सांगणे, गोष्ट ऐकण्याची सवय लावणे, ऐकलेली गोष्ट पुन्हा सांगणे, मुलांनी गोष्ट वाचून दाखवणे, वाचलेली, ऐकलेली गोष्ट मुलांनी लिहिणे, घरात शिकलो ते शाळेत सांगणे, शाळेत शिकलेले घरात सांगणे यातून बऱ्याच गोष्टी मुलांचं शिकणं सोपं करतील. वाडी-वस्तीवरती पहिली ते सातवीचे वर्ग असणाऱ्या काही शाळांमध्ये एक-दोनच शिक्षक आहेत. अशा ठिकाणी या गोष्टींचा अधिक विचार करावा लागेल.

प्रत्येक मुलाच्या सर्वांगीण अभ्यासासाठी कृतीवर भर देणे, मुलांशी भावनिक नाते जुळविणे, प्रेमभाव जोपासणे, थोडा वेळ पाठ्यपुस्तक बाजूला ठेवणे, कृती आणि उपक्रमांना पाठ्यपुस्तकाशी जोडणे, वेळापत्रक उलटे टांगून ठेवणे, पाठ्यपुस्तक न शिकवता मुलांच्या स्तराचा विचार करून त्यानुसार गट करून शिकवणे या गोष्टी स्वीकाराव्या लागतील. यासाठी विषयाची उद्दिष्टे आणि अध्ययन निष्पत्ती समजून घेऊन शिकवावे लागेल. अभ्यासक्रम संपवणे, पाठ्यपुस्तक संपवणे याची भीती सोडून द्यावी लागेल. मूल्यमापन करण्याचं, प्रश्नपत्रिका काढण्याचं पूर्ण स्वातंत्र्य शिक्षकांना आहे. आपण काय शिकवलं आहे, कसं शिकवलं आहे यानुसार मूल्यमापन करणं महत्त्वाचं ठरतं. अन्यथा शिकवणाराने काय आणि कसे शिकवले हे माहीत नसणाऱ्यांनी प्रश्नपत्रिका काढल्यास योग्य मूल्यमापन होत नाही. मुलाचा गोंधळ उडतो. त्यामुळे शिक्षकांनी त्यांच्या या अधिकाराचा सक्षमतेने वापर करायला हवा.

या सगळ्यांमध्ये पालकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. शाळेत आणि शाळेबाहेर पालकांचे गल्लीतील गट, पालकांचे संघ स्थापन व्हायला पाहिजेत. हे पालक संघ मुलांच्या शिकण्या-शिकवण्यामध्ये सहभागी असतील. शिक्षण ही सर्वांची जबाबदारी आहे असं मानणारी शैक्षणिक चळवळ सुरू व्हायला हवी. फक्त शिक्षक शिकवतील ही भूमिका आता बदलावी लागेल. दुसरे शिकवू लागले तर आपले काय होणार, असे शिक्षकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. पालकांचे गल्लीनिहाय गट, शहरात अपार्टमेंटमधील पालकांचे गट मुलांच्या शिकण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. गल्लीमध्ये गोष्ट सांगणं, गोष्टीचं नाट्यीकरण करणं, गोष्टीरूप इतिहासाचं नाट्यीकरण करणं अशा आनंद देणाऱ्या गोष्टी गल्लीशाळेत करता येतील. पालकांना नेमकी शिकण्या-शिकवण्याची पद्धत कळण्यासाठी त्यांना प्रशिक्षण द्यावे लागेल, चर्चा करावी लागेल. घरी नेमके काय करून घ्यायचे आणि ते तसं घेत आहेत का हे शिक्षकांना पाहावे लागेल. पालकांना सोप्या सूचना द्याव्या लागतील, सरावाचे घटक समजावून सांगावे लागतील. शिकण्यासाठी मोबाइलचा कसा नेमका वापर करता येईल हे सांगावे लागेल. शहरांमध्ये शाळेत मुलांना वेळखाऊ आणि बोजड प्रकल्प दिले जातात. बऱ्याच वेळा त्याचे ओझे मुलांबरोबर पालकांवर असते अशा गोष्टींना आळा घालावा लागेल.

हे थोडंसं आदर्शवादी अवघड वाटण्याची शक्यता आहे. कोणतीही नवीन गोष्ट करताना असं वाटणं साहजिक आहे. पण याची सद्य:स्थितीत गरज आहे. एकदा सवय झाली की या गोष्टी सोप्या आणि आनंदाच्या वाटू लागतील. हे करत असताना शिक्षकांनी व शाळांनी एकमेकांचं जसंच्या तसं अनुकरण न करता आपल्या शाळेची गरज पाहून गावाची, पालकांची, परिसराची एकंदर स्थिती आणि सुविधा यांचा अभ्यास करून शिक्षकांना काय आणि कसं करावं हे ठरवता येईल.

शासनाने सेतू अभ्यासक्रम हा मुलांना शिक्षणाशी, पाठीमागील अभ्यासाशी जोडून घेण्यासाठी चांगला उपक्रम आखला होता. कोरोना जाईल आणि शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांना मुलांबरोबर यातील कृती करता येतील अशी अपेक्षा होती. परंतु शाळा सुरू न झाल्याने सेतू अभ्यासक्रम वर्गात घेण्याऐवजी मुलांना घरी सोडवण्यासाठी द्यावा लागला. आता पुन्हा एक वेळ हे गरजेनुसार वर्गात करावं लागेल. 45 दिवसांत अभ्यास पूर्ण करावा अशी अपेक्षा आहे, परंतु विद्यार्थ्यांचा स्तर आणि गती याचा विचार करून हे बंधन न समजता, मार्गदर्शक गोष्ट आहे असे समजून सेतू अभ्यासक्रम स्वीकारणे योग्य होईल. शिक्षकांनी पालकांशी चर्चा करून घर आणि परिसराचा वापर करून कोणकोणत्या विषयाचा कसा अनुभव देता येईल आणि शिकणं सोपं होईल हे सांगावं. गणित, विज्ञान, भाषा या विषयांचं घरात सहज शिक्षण होऊ शकतं. ‘अभ्यासाला बस, परीक्षा कधी आहे?’ याऐवजी पालकांना वेगळी वाक्ये उच्चारण्याची सवय लावावी लागेल.

घरात एकत्र बसून जेवणे यामध्येही मुले शिकू शकतात. उदाहरणार्थ- ताटातून बाहेर सांडू नये, खरकटं ठेवू नये, ताट स्वच्छ पुसून जेवावं, ताटात आलेले सर्व पदार्थ खाल्ल्याने समतोल आहार मिळतो. समतोल आहार म्हणजे काय हे समजेल. कोणत्या आहारातून काय मिळतं हे विज्ञान कळेल, आरोग्य शिक्षणही होईल. एकत्र बसून जेवल्याने संवाद होतो. आज संवादाची गरज आहे. पदार्थाचा आस्वाद घेत सेवन करायचं असतं, जेवण हे काम नाही की फक्त रिकामं पोट भरणं एवढाच जेवणाचा उद्देश नाही. जेवण ही आनंद घेण्याची गोष्ट आहे. हास्यविनोद केला तर मनं मोकळी होतील. मुलांच्या अडचणी समजतील. भावनिक विकासाचा बराचसा भाग जेवता जेवता पूर्ण होईल. हे सर्व करत असताना पालकांना स्वतःमध्ये बदल करावा लागेल. ‘घोका आणि ओका’ यातून प्रथम पालकांना बाहेर पडावे लागेल. मूल स्वतः शिकतं, अनुभव घेऊन, कृती करून, अनुकरणातून शिकतं. जाणून घेण्यासाठी शिकतं. मित्राकडून शिकतं हे समजून घ्यावं. शिकण्यासाठी पाठ्यपुस्तकाशिवाय खूप साधनं आहेत. पाठ्यपुस्तकातील शिक्षणाबरोबर अनुभवलेलं, व्यवहारातलं शिक्षण आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. स्वतःचे कपडे स्वतः धुणं, इस्त्री करणं, घराची स्वच्छता ठेवणं या गोष्टी शाळा बंदच्या काळात शिकता येतील. सवयी लावून घेता येतील. अर्थात इथं मुलांची परीक्षा नसून पालक आणि शिक्षकांचीच कसोटीची वेळ आहे. 

खेड्यापाड्यांमध्ये ठरावीक घरांमध्ये हरिविजय, रामायण, पांडवप्रताप यांसारख्या ग्रंथांचं सामूहिक वाचन व्हायचं. ज्यांनी शाळकरी वयात हे ग्रंथ वाचण्याची संधी घेतली आहे, त्यांचं वाचन आणि उच्चार नक्की चांगले झाले आहेत. शिवाय ग्रंथ वाचल्याने ग्रंथातील पुराणकथा आणि इतर माहिती याचा लाभ मोजता येणार नाही. आपण रोज ठरावीक वेळी घरात असं निवडक पुस्तकाचं वाचन का घेऊ नये? ‘वेळ नाही’ हे कारण आता सांगण्याची ही वेळ नाही. चांगली पुस्तके निवडून वाचन केलं तर पुस्तक वाचनाचे सर्व फायदे होतील. वाचनावर आधारित काय कृती मुलांना सांगता येतील, हे शिक्षकांनी पालकांना सांगावं. त्यासाठी शिक्षक आणि पालकांनाही वाचण्याची सवय लावून घ्यावी लागेल. शिवाय भाषा-विषयाचा अभ्यास नकळत होऊन जाईल.

घरी अंगणात, टेरेसवर खेळता येतील असे आणि विस्मरणात गेलेले खेळ भावंडांबरोबर, पालकांबरोबर खेळता येतील. दगड आणि खड्यांच्या साह्याने खेळल्या जाणाऱ्या खेळातून संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी शिकता येईल. सापशिडीच्या साह्याने टप्पे समजतील. या खेळमधून अंदाज करणे, तुलना करणे, तर्क करणे अवगत होईल. एकत्रित खेळ खेळल्याने, संवादाने भावनिक व मानसिक विकास होईल. शारीरिक विकासासाठी खेळ पूरक ठरतील. खेळामुळे मेंदूला अधिक प्राणवायू मिळतो. मन प्रसन्न होते, त्यामुळे नवीन भाग शिकण्याची मेंदूची तयारी होते. मोबाइल गेममध्ये अडकलेली मुले यामुळे मुक्त होतील. खेळ शिकण्याशी कसे जोडता येतील, याबाबत शिक्षक आणि पालक यांनी चर्चा करावी. सध्याची पाठ्यपुस्तके कृतीला भरपूर वाव देणारी आहेत. पाठ्यपुस्तकातील कृती, उपक्रम करण्यासाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार पालक मुलांना मदत करतील. छापील गाइडवर अवलंबून न राहता मुलांना अशी मदत केली, तर मुले कसं शिकायचं हे शिकतील. एकदा मूल शिकायला शिकलं की पुढचं शिकणं सोपं होऊन जाईल. स्वाध्यायाऐवजी कृतिपत्रिकांचा, कृतिपुस्तिका पुस्तकांचा वापर करता येईल. स्वाध्यायामध्ये फक्त प्रश्न-उत्तरे असतात. न शिकवता प्रश्न सोडवता येत नाहीत. मग मुलं गाइड्‌सचा आधार घेऊन उत्तरे लिहून काढतात.

मुलांना कसं शिकायचं हे शिकवावं लागेल. स्वयंअध्ययनाचे मार्ग दाखवावे लागतील. उदाहरणार्थ- मजकुराला प्रश्न विचारणे. यामध्ये पाठ्यपुस्तक किंवा पाठ्यपुस्तकाबाहेरील मजकूर वाचून प्रश्न तयार करण्यास सांगता येतील. प्रश्न विचारता येणे हे एक भाषा-विषयातील कौशल्य आहे. संवाद, मुलाखत यासाठीही प्रश्न महत्त्वाचे असतात. एका शब्दात उत्तर देता येणे ते दीर्घोत्तरी असे विविध प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना तयार करायला शिकवावे लागेल. मुळात शिक्षकांनी, मोठ्या माणसांनी प्रश्न विचारणे आणि मुलाने उत्तर देणे ही आपली परंपरा थांबवावी लागेल. त्याला छेद देणारी ही कृती आहे. का, कसे, जर, तर यांसारखे प्रश्न तयार करता येतील. प्रश्न तयार करायला आणि उत्तरे द्यायलाही विचार करावा लागतो. आकलन व्हावे लागते. तयार केलेल्या प्रश्नांवरून ‘ओपन बुकटेस्ट’ घेता येईल. प्रश्न तयार करणं आणि पुस्तकाच्या साह्याने प्रश्न सोडवणं म्हणजेच मुलांचं दोन वेळा समजून घेणं होईल.

कोरोनाशी सामना करताना शिक्षकांना कोरोनायोद्धा म्हणून काम करावे लागले आहे. या कारणामुळेही शिक्षण आणि शाळेपासून काही शिक्षक दूर गेलेले आहेत, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या आणि अशा कामातून शिक्षकांना आता वगळावे. शाळेतील लसीकरण केंद्रे आता बंद करून ती अन्य ठिकाणी हलविण्यात यावीत म्हणजे शाळेचे कामकाज नित्यनेमाने व्यवस्थित चालवता येईल. शिक्षकांना आता लसीकरण आणि अशा प्रकारच्या इतर कामांमध्ये गुंतवू नये. प्रशासनाकडून ऑनलाइन, ऑफलाइन माहितीचा तगादा लावला जातो तो कमी करावा. नेहमी वरिष्ठांचे आदेश पाळायचे म्हणून वरिष्ठ त्यांच्या वरिष्ठांचे ऐकतात आणि खालच्या स्तरावर हे ‘खूप महत्त्वाचं काम आहे. हे प्रथम करा, बाकी नंतर बघा. हा साहेबांच्या प्राधान्याचा विषय आहे’, असं सांगितलं जातं. त्यामुळे हातातलं शिकवण्याचं काम सोडून साहेबांनी सांगितलेलं काम करावं लागतं. हातचं सोडून पळत्याच्या मागे लागावं लागतं आता मुलांचं शिकणं हेच प्रथम प्राधान्य आहे हे प्रशासनातील सर्वांनीच ठरवायला हवं.

शाळेतील स्पर्धा परीक्षा हा सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा भाग झाला आहे. विविध प्रकारच्या खाजगी स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना बसविण्याची शिक्षक आणि पालकांची चढाओढ लागलेली असते. यासाठी पालकापासून ते अधिकारी-पदाधिकारी आग्रही असतात, त्यामुळे स्पर्धेत असणारे आणि नसणारे यांच्यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या दोन्हींमध्ये अशी दरी निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. दिवास्वप्नात रमणारे पालक आणि सन्मानात रमणारे शिक्षक यांनी या एकाच गोष्टीच्या मागे न लागता स्पर्धा परीक्षेतील यश हेच एकमेव यश असे समजून काम करू नये. या यशापेक्षा न शिकणारांच्या, न शिकवणाराच्या अपयशाकडे सजगपणे पाहावे लागेल. अन्यथा हे अपयश शिकण्यापासून वंचित असणाऱ्यांना अधिक दूर लोटेल. किंबहुना खोल दरीत ढकलवल्याशिवाय राहणार नाही.

या काळात शिक्षकांना आधार, मार्गदर्शन, समुपदेशन व प्रशिक्षणाची गरज आहे. शिकण्या-शिकविण्यासंदर्भात चर्चा होण्याची मार्गदर्शन पुस्तिका शिक्षकांच्या हातात असण्याची गरज आहे. शिकवायला कुठून आणि कशी सुरुवात करायची असा प्रश्न पडणारेही खूप आहे. कदाचित हे सगळे चमचाने भरवल्यासारखे वाटेल; परंतु पुन्हा पहिल्यापासून सर्व काही करावयाचे असल्याने राज्य सरकारच्या पुढच्या 50 टक्के लोकांचा विचार करावा लागेल. त्यातील शेवटच्या 13.5 टक्क्यांचा अधिक विचार करून आखणी करावी लागेल. आपल्या क्षेत्रामध्ये शाळा स्तरावर चांगले काम करणाऱ्यांना राज्यस्तरावर एकत्र करून निश्चित आराखडा बनविण्याची गरज आहे. आता दीर्घ काळासाठी रजा काढणेही परवडणारे नाही. रजाकाळात शिकणे बंद पडणार नाही, अशा कितीतरी गोष्टींचा बारकाईने विचार करायला हवा. नेहमीपेक्षा अधिक सावधगिरीने काळजीपूर्वक काम करण्याचा हा काळ आहे अन्यथा ‘ये रे माझ्या मागल्या...’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Tags: प्रौढ साक्षरता अभियान weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नामदेव माळी,  सांगली, महाराष्ट्र
namdeosmali@gmail.com

शिक्षण क्षेत्रात वर्ग दोनचे अधिकारी, कादंबरीकार व शैक्षणिक लेखक.


Comments

  1. shivaji pitalewad- 11 Oct 2021

    मस्त! आपण जवळ्पास सर्व मुद्याना न्याय दिलाय.पण शिक्षकाना वेळेवर वेतन देणे खुप आवश्यक आहे.सततच्या अनियमिततेमुळे शिक्ष्कांवार आधी हातउसणे व नांतर कर्ज प्रकरणे करावी लागतात.मग शिक्षक जोड व्यवसाय करतात.मग बर्याच गोश्टी येतात.

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके