डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘मोरमित्रांची शाळा’मधील मुलं मोराची अंडी कोंबडीखाली उबवतात. त्यांचं निरीक्षण करतात, त्यांना जीव लावतात. ‘राजवाडा’ ही कातकऱ्यांची वस्ती. इथं अपयश पदरी येतं; परंतु शाळाउभारणीचा संघर्ष, जिद्द, तळमळ दिसते. ओहोळापासून समुद्रापर्यंतचा मुलांना दाखविलेला प्रदेश. समुद्र पाहून मुलगी म्हणते, ‘व्हळाचं आभाळ झालं’. वाघिणीची शाळा, चला नकलांनी शिकू या आणि कुलगुरूंचा सत्कार बाबीआजीच्या हस्ते. त्याला कुलगुरूंचं उत्तर पुस्तक वाचूनच पाहावं. स्वयंसेवी वृत्तीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नक्की बळ मिळेल.

वंचित समाजातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छ.शाहूमहाराज, कर्मवीर भाऊराव पाटील अशा थोर व्यक्तींनी मोठे काम केले आहे. छ.शाहूमहाराज स्वत: राजे होते. राज्यातील जनता प्राथमिक शिक्षणाने विभूषित झाली, तर आपले राज्य जनतेच्या हाती सोपवायला छ.शाहूमहाराज तयार होते. थोरा-मोठ्यांची नावे आणि त्यांचे शैक्षणिक काम आपणास माहीत आहे; परंतु आपल्या परीने काम करणारी माणसे आणि संस्थाही आहेत. त्यांना प्रसिद्धी नसते, तरीही त्यांचे काम, ‘एकला चलो रे’ प्रमाणे सुरू असते. 

असेच काम करणारी तळकोकणातील ‘श्रमिक सहयोग’ ही संस्था. ‘श्रमित सहयोग’चा ढाचा संस्थात्मक स्वरूपाचा असला तरी तो एक सोय म्हणून स्वीकारण्यात आलाय. या संस्थेने तळकोकणात- विशेषत: चिपळूण तालुक्यात गवळी-धनगर व कातकरी आदिवासी समाजातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून चळवळ उभी केली. काम उभे केले. जनावरांचे जिणं जगणाऱ्यांना माणसांत आणण्याचा, त्यांना उभं करण्याचा प्रयत्न केला. या त्यांच्या धडपडीच्या यश- अपयशाचा लेखाजोखा मांडणाऱ्या कहाण्यांचा दस्तऐवज म्हणजे ‘मोरमित्रांची शाळा’ हे पुस्तक. 

शिक्षणतज्ज्ञ दत्ता सावळे यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शन घेऊन हा गट कार्य करत राहिला. त्यांनी आपल्या अनुभवांचा अन्वयार्थ लावण्यासाठी ‘लिहिते व्हा’ असा आग्रह धरला. या पुस्तकातील लेख (खरे तर कहाण्या) शिक्षकांकडून, कार्यकर्त्यांकडून लिहून घेतले. या कहाण्यांच्या संपादनाचे काम राजन इंदुलकर यांनी केले आहे. पुस्तकाला दीर्घ अशी प्रस्तावना लिहिली आहे. 

ही प्रस्तावना म्हणजे, मोरमित्रांच्या शाळेचा आरसा आहे. साधारणपणे 1990 च्या सुमारास शाळांच्या कामाची सुरुवात आहे. त्या वेळी धनगर-आदिवासी मुलं शिकावीत म्हणून दाखविलेला डोळसपणा आजच्या काळातही सरकारी पगार घेऊन शिकविणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे. जे काही धडपडणारे सरकारी शाळांतील शिक्षक आहेत, त्यांना प्रेरणा देणारे हे प्रयोग आहेत. या डोंगर-कपारीतल्या, जंगलातल्या बिनभिंतीच्या शाळा आहेत. 

आजही ज्यांची उंची जास्त, हात लांब आहेत; त्यांच्यापर्यंत इतर योजनांप्रमाणे शिक्षणही पोहोचतं. शिक्षण नाकारलं जात होतं त्या काळात जोतिबासारख्यांनी सुरुवात केली. आज सरकार आणि ‘श्रमिक सहयोग’सारख्या संस्था शिक्षण द्यायला धडपडत असल्या तरी आदिवासी, भटके शिक्षणापासून दूरच राहतात. आपलं आहे, हे बरं आहे असं त्यांना वाटतं. त्यांच्या जगण्याच्या पद्धतीमध्ये हे सरकारी शिक्षण बसत नाही. श्रमिक सहयोगने सर्व्हे केल्यानंतर रस्त्यालगतच्या शाळांकडे लक्ष दिले जाते, दुर्गम भागातील शाळांकडे उपेक्षेने पाहिले जाते. अतिदुर्गम भागात साईच उपलब्ध नाहीत, असे दिसले. शिक्षक व शासनव्यवस्था तिथे जाऊ इच्छित नाही आणि मुलांची संख्या कमी म्हणून शाळा सुरू होत नाही. 

गवळी-धनगर समाज सह्याद्री पर्वतरांगांवर राहणारा. पूर्वीचा व्यवसाय सह्याद्री पर्वतातून मालाची वाहतूक करणे, त्यासाठी बैल सांभाळणे. वाहतूक सुविधा झाल्या आणि हा समाज दुग्धव्यवसायाकडे वळला. स्वत:च्या मालकीची जमीन नाही. खोतांची मर्जी सांभाळायची. हे वाघाला भिडतील; पण खोतासमोर, शेठसमोर मात्र पार झुकतील. 

कातकरी-आदिवासी जंगलतोडीचे काम करतात. त्यासाठी आठ महिने भटकंती. गावात खोत, रानात शेठ आणि बाजारात सावकार यांच्या दावणीला बांधलेली ही माणसं(?). सन 2010 मध्ये श्रमिक सहयोगने चिपळूण तालुक्यात या समाजाची पाहणी केली. एकाही वाडीत स्वत:ची विहीर नाही. 80 टक्के कुटुंबांकडे रेशनकार्ड नाही. मासेमारी, शिकारही हे लोक करतात. अनारोग्य आणि कुपोषण आहे. शिक्षणातून निर्माण होणाऱ्या जाणतेपणाचा अभाव असल्याने या समाजात पुरेसे आत्मभान आणि जागृती आलेली नाही. 

जिद्द व इच्छाशक्ती निर्माण करणाऱ्या सांस्कृतिक चळवळी या घटकातून निर्माण झाल्या नाहीत. आंबेडकरी चळवळीमुळे दलितांमध्ये शिक्षणप्रसार झाला. अशा सांस्कृतिक चळवळीच्या अभावामुळे शिक्षणपद्धतीचा प्रश्न गुंतागुंतीचा बनलेला आहे, असे प्रस्तावनेमध्ये राजन इंदुलकर नमूद करतात. शिक्षक, शिक्षणपद्धती, प्रशिक्षण, चर्चा- अनुभवकथन यांतून ही चळवळ उभी करतात. 

श्रमिक सहयोगचं काम, दाभोणच्या जंगलातलं ग्राममंगलचं अनुताई वाघ आणि रमेश पानसे यांचं काम; मेधा पाटकर, प्रकाश आमटे आणि यांच्यासारखे काम करणारे, परंतु आपणास माहीत नसणारे. यांची पहिली अडचण म्हणजे मुलं शाळेत आणणं, त्यांना शाळेत बसवणं इथपासून सुरुवात होते. अनुभवातून, विचारपूर्वक मंथनातून त्यांनी मार्ग काढला आहे. 

परकीय भाषांतून अनुवाद झालेल्या तोत्तोचान, प्रिय बाई, टीचर यांसारख्या पुस्तकांचं व त्यातल्या प्रयोगांचं कौतुक होतंय. आणि त्यात वावगे काहीही नाही. परंतु आपल्याकडे दाभोणच्या जंगलातून ‘दिवास्वप्न’ या पुस्तकाप्रमाणेच ‘मोरमित्रांची शाळा’ जराही कमी पडत नाही. या तिन्ही पुस्तकांमध्ये मला एक समान धागा दिसतो. तो म्हणजे, ‘सहज शिक्षण’. मूल, त्याचा परिसर लक्षात घेऊन सहज आलेली शिक्षणपद्धती. शिकवणे कमी, शिकणे जास्त. पाठ्यपुस्तक, वेळापत्रक या गोष्टी कमी महत्त्वाच्या. जंगल, झाडे, प्राणी, पक्षी, डोंगर-दऱ्या, संस्कृती, समाज हीच मोठाली पुस्तकं, जिवंत पुस्तकं. रोज बदलणारी, बालमनाला खुणावणारी, आनंद देणारी. विज्ञान, भूगोल, परिसर अभ्यास यांसारखे विषय प्रत्यक्ष निसर्गात निरीक्षण करून मुले समजावून घेतात. परिसरात हिंडणे, हाताळणे, अनुभवणे, तपासणे, निरीक्षण करणे यांतून मुले त्यामागील कार्यकारणभाव स्वत: पडताळू लागली, असे इंदुलकर म्हणतात आणि ते खरेही आहे. 

अलीकडे या बाबींवर अधिक लक्ष दिले जात आहे. ज्ञानरचनावाद स्वीकारलाय. त्याचे सार्वत्रिकीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु याच्यापूर्वी किती तरी अगोदर भाषा, गणित, इतिहास या विषयांसाठी आणि एकंदर सर्वच शिक्षणासाठी विविध प्रयोग केले आहेत. 

प्रमाण मराठी बोली मुलांना परकी वाटते म्हणून सुरुवातीला मुलांच्या धनगरी, काथोडी या बोलीभाषांचा उपयोग करण्यात आला. क, ख, ग, अशा अमूर्त अक्षरांनी सुरुवात करण्याऐवजी मुलांच्या अनुभवविश्वातील शब्दांपासून शिकविण्याची सुरुवात करण्यात आली आहे. या समाजाच्या समृद्ध संवादपद्धतीच्या म्हणी, उखाणे, गाणी, कोडी यांचा भाषाशिक्षणासाठी उपयोग केला आहे. गणित शिकविताना परिसरातील वस्तू, जनावरे, चारा, पाणी याची मोजमापे यांचा प्रत्यक्ष अनुभव देऊन सोपेपणा आणला आहे. इतिहास शिकविताना कातकरी, धनगर यांचे पूर्वज, त्यांच्या प्रेरणादायी कथा- उदा. वाघाच्या तावडीतून वासराला सोडविणारा पांडू ढेब्या, कुंभार्ली घाटाची तज्ज्ञ इंजिनिअरला ओळख आणि आखणी करून देणारा सोनू शेळके. अशा पद्धतीमुळे इतिहास मुलांना आपला आणि आवडीचा वाटतो. 

एकंदरीत विविध प्रयोगांतून शिक्षणाविषयी आत्मविश्वास आणि आसक्ती वाढविण्याचे काम केले आहे. जे प्रयोग, पद्धती शिक्षणामध्ये राबविण्याचा शासकीय पातळीवरून जोरदार प्रयत्न केला जातोय, ते प्रयोग अगदी शास्त्रीय पद्धतीने या मंडळींनी 1990 च्या काळात केलेले आहेत. या पुस्तकातील बाबी आजीची शाळा ही सामान्य माणसाला आणि शिकविणाऱ्यांना प्रेरणा देणारी आहे. एका धनगर बाईने वसवलेली वाडी. मुलं शाळा शिकू शकली नाहीत, इतर मुलं टिंगल-टवाळी करायची. मुलं नदीत बसून रडायची. या आजीने आपली नातवंडं-पणतवंडांना शिकविण्याचा ध्यास घेतला. श्रमिक सहयोगला शाळा काढायला लावली. या आजीची आणि शाळेची कहाणी मुळातून वाचायला हवी. 

ओवळी येथील कातकरी वस्तीतील शाळा घरे चालविणाऱ्या स्त्रिया. पुरुष दारूसाठी मजुरी करतो. आत्मगौरव हरवलेला, मृत्यूविषयी भय नसलेला. या बाबतीत कोरडा, संवेदनाशून्य समाज. त्यांची गाणीही दारूशी संबंधित... 
हरबऱ्याच्या झाडाखाली, दारुड्या झोपला गं बाई। 
दारुड्यावरून गेला हत्ती, दारुड्याला सूद नाही।। 

अभ्यासक्रमातील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पाठ्यपुस्तक हे साधन आहे. ‘दिवास्वप्न’मध्ये गिजुभाई बधेका पाठ्यपुस्तक बाजूला ठेवतात. तसंच इथंही दिसतं. या मुलांसाठी वेगळं पाठ्यपुस्तक हवं. तात्याची गाय हा लेख त्याचा नमुना. हा घडलेल्या प्रसंगाचा शिक्षकांनी तयार केलेला पाठ मुलांना आपला वाटतो. कातकऱ्याच्या शाळेनं मला काय शिकवलं, हा लेख सविता भोसले यांनी लिहिलाय. 

‘मोरमित्रांची शाळा’मधील मुलं मोराची अंडी कोंबडीखाली उबवतात. त्यांचं निरीक्षण करतात, त्यांना जीव लावतात. ‘राजवाडा’ ही कातकऱ्यांची वस्ती. इथं अपयश पदरी येतं; परंतु शाळाउभारणीचा संघर्ष, जिद्द, तळमळ दिसते. ओहोळापासून समुद्रापर्यंतचा मुलांना दाखविलेला प्रदेश. समुद्र पाहून मुलगी म्हणते, ‘व्हळाचं आभाळ झालं’. वाघिणीची शाळा, चला नकलांनी शिकू या आणि कुलगुरूंचा सत्कार बाबीआजीच्या हस्ते. त्याला कुलगुरूंचं उत्तर पुस्तक वाचूनच पाहावं. स्वयंसेवी वृत्तीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नक्की बळ मिळेल.

मोरमित्रांची शाळा 
संपादन : राजन इंदुलकर 
प्रकाशक : श्रमिक सहयोग, चिपळूण. 
पृष्ठे : 96 
किंमत : 100 रुपये 

Tags: कर्मवीर भाऊराव पाटील छ.शाहूमहाराज सावित्रीबाई फुले महात्मा जोतिबा फुले श्रमिक सहयोग राजन इंदुलकर मोरमित्रांची शाळा नामदेव माळी पुस्तक परिचय KArmvir Bhaurao Patil Shahu Maharaj Savitribai Phule Mahtam Jyotiba Phule Shrmik Shayog Rajan Indulkar Mormitranchi Shala Namdev Mali Pustak Parichay weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नामदेव माळी,  सांगली, महाराष्ट्र
namdeosmali@gmail.com

शिक्षण क्षेत्रात वर्ग दोनचे अधिकारी, कादंबरीकार व शैक्षणिक लेखक.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके