डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

एकदा कृष्णात खोत ‘साधना’साठी शैक्षणिक विषयावर लिहा म्हणाले होते. मला असं सांगून लिहिता येत नाही. काय लिहायचं हे आता पक्कं झालं होतं. कसं लिहायचं समजत नव्हतं. राजा शिरगुप्पेंचा झब्बा पकडला. त्यांना त्यांची नोंदी ठेवण्याची, लिखाणाची पद्धत विचारली. समजून घेतली. कोंडी फुटली. सूर गवसला. प्रसिद्धीसाठी ‘साधना’ मला योग्य वाटली. विनोद शिरसाठ आणि साधना परिवारानं माझ्यावर आणि शिक्षकांच्या कामावर विश्वास दाखवला. सुरुवातीचे लेख सातारा तालुक्यातील शाळांचे होते. तेथील काही लोकप्रतिनिधींना ही माहिती मिळाली. उलट-सुलट चर्चा झाली. जिल्हा परिषदेचे शिक्षण समितीचे सभापती, शिक्षण अधिकारी, इतर पदाधिकारी, पत्रकार यांनी या भागातल्या शाळा पाहणीचा संयुक्त दौरा केला. शाळांनी उत्तम सादरीकरण केलं. संभ्रम दूर झाला. पत्रकारांनी चांगली प्रसिद्धी दिली. शिक्षकांचं आणखी कौतुक झालं.या लेखमालेला माझ्या अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिक्रिया आणि प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातून प्रतिक्रिया आल्या. सुरुवातीस लेख आवडला. पुढच्या लेखांची वाट पाहतोय, आमच्या शाळेत आम्ही असे उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया होत्या. पटत नाही, विश्वास बसत नाही, इतक्या चांगल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत याचा आनंद आणि आश्चर्य वाटणाऱ्या प्रतिक्रियाही मिळाल्या.

शिकवून कोणी शिकतंय का? विनोबा म्हणतात, शिक्षक आणि मुले दोघेही एकमेकांच्या आचरणापासून शिकत असतात, दोघेही विद्यार्थीच आहेत. जे दिले जात नाही ते शिक्षण, विनोबाजींचे खरे आहे. मुलांचे डोके म्हणजे कोठार आहे असे समजून त्या डोकीमध्ये माहिती कोंबण्याच्या कामाला शिक्षण म्हटले जाते. माहितीच द्यायची तर मग त्यासाठी शिक्षक कशाला? वर्तमानपत्रे, दूरदर्शन, इंटरनेट, इत्यादी माध्यमांतून ती सहज मिळते. शिक्षकांनी शिकण्यासाठी वातावरण तयार करायचे आहे. शिक्षकांनी अशा काही कृती मुलांस द्याव्यात, स्वयंअध्ययन साहित्य द्यावे, की मुलाने स्वत: शिकले पाहिजे. नाहीतर शाळेपेक्षा जीवनास आवश्यक अशा किती तरी गोष्टी शाळेबाहेर शिकल्या जातात. शेतीचं शिक्षण, पशुपालन, गायींची धार काढणे असो वा कडब्याची गंज रचणे असो. नुसत्या नजरेच्या अंदाजाने उंचच्या उंच, सरळ, काटकोनात गंज रचलेली असते. ना गुण्या असतो, ना ओळंबा. तिथं शिकवायला शाळेतले शिक्षक नसतात. उलट असे विषय शाळेत ठेवल्यानंतर काय होतं ते सर्वज्ञात आहे. उदा. शेतीशाळा, सूतकताई, स्टोव्ह दुरुस्ती, पाव-बिस्किटे तयार करणे. 

विद्यार्थ्यांस गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावयाचे असल्यास बदलास सामोरा जाणारा शिक्षक शाळेत पाहिजे. आम्ही वर्ध्याला शिक्षण संमेलनासाठी रेल्वेने चाललो होतो. एक आजीबाई आमच्याजवळ आल्या. तिनं कृष्णात पाटोळे या शिक्षक मित्राच्या डोकीवरून, गालावरून हात फिरवला. अगदी आजीची माया केली. हात पसरला. कृष्णातने दहा रुपयांची नोट तिच्या हातावर ठेवली. आजीबाईच्या अंगावर फाटकी साडी नव्हती, की चेहऱ्यावर दीनवाणा भाव नव्हता. तिने भिकेची याचनाही केली नाही. बदलत्या काळानुसार मागण्याची पद्धत बदलली तिनं. परिणाम आपण बघितला. भिकारी जर आपल्या व्यवसायामध्ये नावीन्य आणत असेल तर शिक्षणामध्ये ते का असू नये? शिकण्याची प्रवृत्ती उपजत आहे. जगण्यासाठी, टिकण्यासाठी निसर्गाने प्रत्येक जीवाला ती देणगी दिली आहे. हरणाचे पाडस ज्या सहजतेने आईच्या कासेखाली जाते, दूध पिते, त्या सहजतेने शिकणं शिकवणं व्हावं. चित्र, शिल्प, संगीत, या कला शाळेत सुरू होण्यापूर्वीपासून समाजात आहेत. वारली चित्रकला शाळेत शिकण्यापूर्वीच आदिवासींना येते.

नागपंचमीला माझी आई भिंतीवर नागोबा काढायची. दारात काचवेल असायची. फुटके कप- बशा मातीच्या भिंतीत रुतवून नक्षी तयार करायची. गजीनृत्य, लेझीम, झिम्मा, फुगड्या, नागपंचमीची गाणी, हदग्याची गाणी किती, किती गोष्टी शाळेबाहेर शिकल्या जातात. भाजी-भाकरी करायला घरातच शिकतात मुली. या गोष्टी शाळेत शिकवायला सुरुवात केल्यानंतर काय होतं? चित्रकला! एकच चित्र अनेक पिढ्या अख्ख्या महाराष्ट्रातील शाळा-शाळांतून काढले जातंय. निसर्गाचा देखावा म्हणजे डोंगर, दोन्ही डोंगरांधून वर निघणारा (की खाली जाणारा?) अर्धा सूर्य, 444(४४४) म्हणजे पक्षी, डोंगरातून निघणारी नदी. सगळं वर्णन करायला नको. चित्र तुमच्या डोळ्यासमोर आलंय. शाळेच्या स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांचे नाच अतिशय सुंदर असतात. सिनेमातील गाण्यांच्या नाचाप्रमाणे लोकनृत्य तितक्याच सहजतेने, कलात्मकतेने मुलं सादर करतात. नाच झाल्यानंतर मी मुलांना जवळ बोलावून विचारतो, हा नाच तुच्याकडून कोणी बसवून घेतला? मुलं म्हणतात, ‘आमचा आम्हीच बसवला.’ मुलांच्यामध्ये शिकण्याची एक नैसर्गिक शक्ती आहे. तिच्या विकासाला संधी द्या. त्यांचं त्यांना शिकू द्या. आपण शिकणं बिघडवू नये असं वाटतं. शिक्षकांपेक्षा शाळेत फॅसिलिटेटरची (सुलभक- शिकणं सुलभ करणाराची) गरज आहे. 

हे सर्व सत्य असताना खेड्यातल्या, डोंगरातल्या, जंगलातल्या मुलांची वेलांटी चुकली, उकार चुकला म्हणून त्यांच्यावर अप्रगतचा, ‘ढ’चा शिक्का मारणे कितपत योग्य आहे? फक्त लिहिता-वाचता येणे, बेरीज-वजाबाकी आणि इतर गणिती क्रिया येणे याला शिक्षण म्हणता येईल काय? निदान आज सर्वसामान्यपणे तसाच समज झालाय असं वाटतं. अशा प्रकारे गुणवत्ता मोजली जातेय असं दिसतं. एखाद्याला नाही वाचता येत, पण चांगलं नाचता येतं, नाही गणित येत, पण सरसर झाडावर चढता येतं. त्याला नदीत पोहता येतं. गुरुजींना, बार्इंना झाडावर चढता येतंय काय? पोहता येतंय काय? मग आता अप्रगत कोण? ‘ढ’ कोण? प्रत्येक मूल वेगळं आहे. त्याच्यात विशेष काय आहे ते शिकवणाऱ्यास आकळले पाहिजे. 

ही गोष्ट पालकांनाही लागू होते. पालकांनी आपल्या अपूर्ण इच्छा मुलांकडून पूर्ण करण्याच्या भानगडीत पडू नये. मूल त्याच्या स्वत:च्या गतीने शिकते यावर विश्वास ठेवायला हवा. मुलाला एखादी गोष्ट येत नाही, समजत नाही, उमजत नाही, मुलाचे वर्तन आपल्याला पटत नाही, म्हणून त्याला गुन्हेगार ठरवून शिक्षा करू नये. बऱ्याचदा बालकालाही मोठ्यांचे पटत नसते. म्हणून ते मोठ्यांना शिक्षा करते काय? ते मोठ्यांचा मान राखायचा म्हणून गप्प असते. खरे तर हा बालकांचा मोठेपणा नव्हे काय? शिकताना मूल आनंदी हसायला हवं. जबरदस्ती करून, रागवून खायला घातलं तर पचनक्रिया चांगली होणार नाही. तसंच  शिकण्याचं आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांच्या गळ्यात टाय नाही, पायात बूट नाही, दिसायला ती नाजूक नाहीत. शाळेतल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये झगमगाट नसतो. त्यांचे पालक नटून थटून मिरवत नसतात, म्हणून तिथे शिक्षण नाही असे म्हणता येईल काय? जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण नाही आणि खाजगी शाळांध्ये फारच गुणवत्ता ओसंडून वाहतेय असे चित्र नाही. असा भास मात्र जाणीवपूर्वक निर्माण केला जातोय असे वाटते. सर्वच खाजगी शाळांत गुणवत्ता नसते. हेच विधान जिल्हापरिषदेच्या शाळांसही लागू होते. 

खाजगी शाळांमध्ये कोणाची मुले प्रवेश घेतात? प्रवेश घेताना काय प्रक्रिया घडते? गरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, अशिक्षित पालकांच्या, भरमसाठ फी देऊन न शिकणाऱ्या पालकांच्या मुलांना किती ‘नावाजलेल्या’ शाळेत प्रवेश देतात? (प्रयोग करणाऱ्या शाळा याला अपवाद असू शकतात. उदा. वाई येथील किर्लोस्करांची शाळा. फलटण येथील मंजिरी निमकर यांची शाळा.) एवढे करूनही गुणवत्ता, गुणवत्ता म्हणतो ती लेखन वाचन, गणिती क्रिया मिळालेले मार्क्स यांच्याशी निगडित असल्याचा भास निर्माण केला जातो. पुन्हा आम्ही ‘मार्क्सवादी’. यापुढे पाऊल नाही. बरे असो, एकवेळ तेही मान्य केले, तरी या गुणवत्ता वाढीत शाळेचा वाटा किती? पालकांचा किती? खाजगी शिकवण्यांचा किती?

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण नाही या एकमेव कारणामुळे त्या बंद पडत आहेत, हे चुकीचे आहे. खाजगी शाळा कोणी काढल्या? का काढल्या? खाजगी शाळा काढणारे शिक्षणतज्ज्ञ, अथवा कर्मवीर अण्णासारखे ध्येयवादी आहेत काय? गरज नसताना, जाणीवपूर्वक काही लोकांचे हितसंबंध जोपासण्यासाठी सरकारी शाळेशेजारी खाजगी शाळा उभी करायची, आपल्या नातेवाईकांची शाळेत भरती करायची, मूळची शाळा बंद पाडण्यासाठी प्रयत्न करायचे अशा घटना घडत नाहीत काय? जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिकेच्या शाळा बंद पडल्यानंतर त्या शाळेची इमारत, जागा यांचे काय होते याचा शोध जाणकारांनी घ्यावा. 

खाजगी शाळांतील शिक्षणाचा दर्जा उत्तम असतो आणि सरकारी शाळांत तोच नसतो हा गैरसमज दूर व्हावा म्हणून एवढे सविस्तर लिहावे वाटले. सरकारी शाळांमध्ये मुलांना मुक्तपणा मिळतो. विविध जाती-धर्माची व स्तरांतील मुले एकत्र शिकतात. परिपाठाच्या वेळी मुले वर्गखोल्या स्वच्छ करतात, मैदानाची स्वच्छता करतात. शाळेची घंटा वाजवतात. या गोष्टीमध्ये मुलांना कमीपणा न वाटता आनंद मिळतो. अशा वेळी श्रमप्रतिष्ठा वेगळी शिकवावी लागत नाही. त्यामुळे सामुदायिक जीवनाचा धडा अनुभवण्याची संधी मिळते. म्हणून काही विचारी लोक आपल्या मुलांना मुद्दाम सरकारी शाळांध्ये घालतात असेही दिसते. सरकारी शाळा बंद पडणे वा पाडणे ही अत्यंत धोकायदायक बाब आहे. खाजगी शाळांध्ये संस्थेला देणगी देऊन नोकरी मिळविणारे काही थोडके असतील, परंतु गुणवत्तेनुसार आज जे शिक्षक होत आहेत त्यांना प्रवेशाचे दार कायमचे बंद होईल. म्हणून सरकारी शाळा टिकविण्याची जबाबदारी सध्या सेवेत असणारांची आहे. एकदा खाजगी शाळांच्या ताब्यात शिक्षण गेले की...? 

सरकारी शाळा सर्वांना शिक्षण मिळावे म्हणून आहेत. श्रीमंतांच्या, नोकरदारांच्या मुलांना कदाचित या शाळांची गरज वाटत नसेल. परंतु अंध, अस्थिव्यंग असलेले, मूकबधिर, मतिमंद, झोपडीतला, झोपडपट्टीतला, तांड्यावरचा, वाडी-वस्तीवरचा, आदिवासी, या सर्वांना सामावून घेणारी आजतरी एवढी एकच व्यवस्था आपल्याकडे आहे. याचा अर्थ सरकारी शाळा फारच चांगल्या आहेत असा नव्हे. त्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत. ते माझे काम नाही, असे म्हणून चालणार नाही. काही धडपडणारे शिक्षक, शिक्षणप्रेमी, जागरूक पालक आहेत म्हणून काही सुंदर सरकारी शाळा आपणास दिसतात. पालक भले निरक्षर असतील, पण सूज्ञ आहेत. 

म.जोतिबा फुले म्हणतात, ‘सर्व जातीचे पंतोजी व्हावेत, म्हणजे ते हातात काठी घेऊन गुरे राखण्यास जाणाऱ्या मुलाला वेळीच शिकण्याची गोडी लावतील. पुढे ही मुले मोठी झाल्यावर आपल्यातील एका मुलास बारीबारीने माळावर गुरे राखण्यास ठेवून सूरपारंब्या खेळण्याऐवजी पंतोजीजवळ शिकण्यास जातील.’ जोतिबांना वाटत होते की, बहुजन समाजातील शिक्षक तयार झाले की ते मुलांना प्रेमाने जवळ करतील आणि शिकवतील. जोतिबांचा हा विश्वास खरा ठरवायचा की खोटा याचा विचार शिक्षक, संघटनांनी करावा. त्यांची ताकद इथे लावली तर शिक्षकांना इतर कोणी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता राहणार नाही.

शाळाभेट लेखमालेविषयी चांगल्या प्रक्रिया खूप आल्या. कौतुक करणाऱ्या असल्यामुळे त्याचा मला आनंदही झाला. नाशिकवरून रा.खु.भावसार यांनी शिक्षणविषयक प्रश्न मांडणारे व त्यांच्या सोडवणुकीच्या शक्यतांचे पत्र पाठविले. त्यात त्यांनी वर्तानपत्रात सध्या गाजत असलेली तपासणी व पटपडताळणी याबद्दल आपण कधी लिहिणार असे विचारले होते. (जाणकारांनी कोणत्या शाळा बोगस पटाच्या आहेत याचा शोध घ्यायला हरकत नाही.) हे लेख लिहिण्याचा हेतू धडपडणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा होता. सगळेच वाईट नसतात. चांगल्याचं कौतुक राहिलं. निदान त्यांचे पाय ओढले जाऊ नयेत. 

चांगलं, उत्कृष्ट कमी असतं, त्याला आदर्श म्हटलं जातं. त्या आदर्शाचं अनुकरण इतरांनी करावं अशी अपेक्षा असते. लेख लिहिलेल्या शाळा सर्वार्थाने आदर्श आहेत असे नाही. त्यांच्या काही चांगल्या पैलूंकडे लक्ष वेधले आहे. असे विविध पैलू असणारी आदर्शवत्‌ ‘स्वप्न शाळा’ निर्माण होऊ शकेल. या लेखातील शाळांध्ये काही उणिवाही होत्या. मुलांना कृतीत गुंतवणारी शाळा पाढे पाठांतरासारखी घोकंपट्टीचा उपक्रम राबविते. यात मुलाच्या  स्मरणशक्तीचं कौतुक असलं तरी वेळेचा, शक्तीचा अपव्ययही आहे. कथामाला मासिकाचे मधु नाशिककर यांना शिवाजीनगर शाळेच्या लेखातील ‘दोन मुली बसलेल्या मुलांसमोर ताट नेऊन ठेवत होत्या’ ही पद्धती खटकली. ही कामे फक्त मुलींनीच करायची काय? तसेच गणवेशात टाय हवाच काय? त्यांचे दोन्ही मुद्दे महत्त्वाचे आणि योग्य आहेत. शिकलेला आणि न शिकलेला नागरिक यातील फरक समजायला हवा इतके शिक्षण पोक्त व्हायला पाहिजे. मी एकदा एका शिकलेल्या आणि लेखक असलेल्या माणसाच्या घरी गेलो. त्यांनी माझे स्वागत केले. त्यांच्या मुलाने नाश्ता, चहा आणून दिला. छान गप्पा झाल्या. फक्त एकच गोष्ट राहिली. घरातील भगिनीचं दर्शन झालं नाही. 

दुसरा प्रसंग- मी आणि माझा शिक्षक मित्र किशोर महाजन नंदुरबार जिल्ह्यात गेलो होतो. आदिवासी कुटुंबात रहायचं ठरवलं. धडगाव हा तिथला दुर्ग तालुका. गटशिक्षणाधिकारी वळवी यांनी कुकलटच्या गुरुजींची भेट घालून दिली. ओळख-पाळख नसताना आदिवासी कुटुंबात राहिलो. या कुटुंबातली भगिनी आमच्या आसपास सहज वावरत होती. आपण परपुरुषासमोर कसं जायचं वगैरे गोष्टीचा लवलेशही जाणवला नाही. ती आम्हांला काय हवं नको बघत होती. आमची भाषा एकमेकांना समजत नव्हती, पण संवाद होत होता. या दोन प्रसंगांतील सूज्ञपणाचं, शहाणपणाचं वागणं कोणाचं? खमंग फोडणीचे पोहे देणाऱ्या शिकलेल्याचं, की बिनतेलाची भाजी बनविणाऱ्या आणि अक्षरओळखच काय, पण डोंगरदऱ्या ओलांडून सुधारणेचा वाराही न लागलेल्या भगिनीचं आणि खुल्या दिलानं स्त्रीपुरुष समानता स्वीकारणाऱ्या आदिवासी बांधवांचं?

आठवीपर्यंत शाळेत मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा शिकविल्या जातात. आता तर पहिलीपासून इंग्रजी. इंग्रजीमध्ये दहावीला 100 पैकी 90 गुण मिळाले तरी चार वाक्ये इंग्रजीतून सहज बोलता येतील याची खात्री नाही. याउलट खानापूर, तासगाव तालुक्यांतील शाळा सोडलेली मुलं (शाळा सोडण्याची सर्व कारणे लागू) केरळ, तामिळनाडू इत्यादी राज्यांत सोने-चांदीच्या गलई व्यवसायासाठी जातात. इतर भाषा नव्हे तर मातृभाषेतही ही मुले धड पास झालेली नसतात. परंतु गाव सोडल्यानंतर मराठीपासून पूर्ण भिन्न असलेली भाषा अगवत करतात. सोन्या-चांदीच्या व्यवसायात जम बसवतात. गणितात नापास झालेली ही मुलं रोज लाखो रुपयांची उलाढाल करतात. याचं कारण की, मुलं कृतीतून शिकली, अनुभवातून शिकली. बिनभिंतीच्या शाळेत शिकली. स्वत:च्या ज्ञानाची रचना स्वत: करत शिकण्यावर भर दिला पाहिजे. ज्ञानरचनावादी पद्धतीने शिकण्या-शिकविण्याची कला अगवत केली पाहिजे.

यासाठी शिक्षक, सक्षम, संपन्न आणि समृद्ध व्हायला हवा. शाळेत जिवंत शिक्षकाची आवश्यकता आहे. शिक्षकांची प्रेते गुणवत्ता सुधारू शकत नाहीत. माझ्या एका शिक्षक मित्राने त्याचा अनुभव सांगितला. त्यांना त्याच्या विद्यार्थ्याने विचारले, ‘सर आपल्या गावात पहिली तंदूर भट्टी कधी आली?’ सर म्हणाले, ‘मला काही याची कल्पना नाही.’ त्यावर त्या विद्यार्थ्याने दिलेली प्रतिक्रिया फार महत्त्वाची आहे. तो म्हणतो, ‘सर तुम्हाला गावातल्या तंदूर भट्टीची माहिती नसेल तर तुम्ही मला अणुभट्टीची माहिती कशी काय विचारता?’ आजचा विद्यार्थी शिक्षकांसमोर आव्हान आहे. त्याला विश्व जवळ आले आहे. धोका एकच आहे तो माणसाजवळ किती जाणार आहे? त्याला विश्व कुटुंबाचा नागरिक बनविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असताना शिक्षकही तेवढ्याच ताकदीने असावे लागणार आहेत.

कारण आज मी माझ्या कुटुंबाचा राहिलेलो नाही. माझे आई, वडील, माझ्या घरात (घर वडिलांनी बांधलं असलं तरी) मला नको आहेत. वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे. चार शब्दांचे भुकेले माता-पिता वृद्धाश्रमाचा खाना खात आहेत. त्यांची सोय केल्याचे मला समाधान आहे. असे आम्ही समविचारी एकत्र येत आहोत. भावी काळात आई- वडिलांना वृद्धाश्रमात ठेवले, काय असेल ती वृद्धाश्रमाची फी वेळच्या वेळी दिली, कधीतरी भेट घेतली म्हणजे मुलाने आपले ‘कर्तव्य चोख पार पाडले’ असे कोणी म्हटले तर आश्चर्य वाटायला नको. कदाचित अशा मुलांना सुसंस्कृत म्हटले जाईल. ही संधी न वाटता धोका वाटणारे विद्यार्थी- उद्याचे नागरिक तयार करण्याची जबाबदारी शिक्षणाची आहे. या शिक्षणाला गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हटले पाहिजे. 

शाळाभेटीपूर्वी / नंतर 

मी खटाव तालुक्यामध्ये (जि.सातारा) असताना शिक्षकांचा ‘धडपड मंच’ स्थापन केला होता. तालुक्यातील शाळांमध्ये स्वाध्याय कार्डस्‌चा वापर, गटपद्धती, गटनायकाची अप्रगत विद्यार्थ्यांना अध्ययनात मदत, प्रश्नमंजूषा, बालसभा, बदलती बैठक व्यवस्था असे विविध उपक्रम राबविले होते. या कामात माझ्याबरोबर प्रतिभा भराडे या विस्तार अधिकारी सहभागी होत्या. 2003 मध्ये तेथून माझी आणि त्यांचीही बदली झाली. सध्या त्या सातारा तालुक्यामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्याकडे सोनगाव बीट आहे. ‘माझ्या भागातील शाळा तुम्ही बघा. शिक्षकांनी खूप चांगलं काम केलंय. धडपड मंचचे उपक्रम राबवले आहेत’ असं त्या मला वारंवार म्हणत होत्या. मध्यंतरी सोनगावच्या शाळेला रविवारी भेट दिली होती. या शाळेतील उमा पाटील या शिक्षिका आमच्याबरोबर होत्या. त्यांनी गावात फिरून सातवीच्या वर्गातील मुलं गोळा केली. अर्ध्या तासात पाच-पंचवीस मुले-मुली जमा झाली. आयत्यावेळी मुलांनी स्वाध्याय कार्डस्‌चा वापर करून प्रश्नमंजूषा घेऊन दाखवली. गटपद्धती, बदलती बैठकव्यवस्था, परसबाग या बाबी तेव्हा बघितल्या होत्या. 

ठरवून सातारा तालुक्यातील शाळांना भेटी दिल्या. एक तासापेक्षा जास्त आगाऊ सूचना कोणत्याही शाळेला दिली नव्हती. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, भुदरगड तालुक्यातील शाळा बघताना तर कोणती शाळा बघायची हे माझं स्वत:चंही ठरलेलं नसायचं. त्यामुळे तपासणीला करतात तशी शाळेनं मुद्दाम कोणतीही तयारी केली नव्हती. शाळा दाखविण्यात दिखाऊपणा नव्हता. मला शाळांचं खरंखुरं दर्शन झालं. सर्व शिक्षा अभियानचे महाराष्ट्राचे प्रकल्प संचालक नंदकुमार यांच्यामुळे शाळा आणि शिक्षणाकडे बघण्याची माझी दृष्टी अधिक व्यापक झाली. आदर्श शाळा प्रशिक्षणासाठी मी राज्य स्तरावर साधनव्यक्ती होतो. ही संधी मी साधली. मुद्दाम परभणी, नंदुरबार, सिंधुदुर्ग हे दूरचे जिल्हे प्रशिक्षणासाठी घेतले. काही शाळा बघितल्या. चांगले शिक्षक भेटले. त्यांच्याशी संवाद साधता आला.

एकदा कृष्णात खोत ‘साधना’साठी शैक्षणिक विषयावर लिहा म्हणाले होते. मला असं सांगून लिहिता येत नाही. काय लिहायचं हे आता पक्कं झालं होतं. कसं लिहायचं समजत नव्हतं. राजा शिरगुप्पेंचा झब्बा पकडला. त्यांना त्यांची नोंदी ठेवण्याची, लिखाणाची पद्धत विचारली. समजून घेतली. कोंडी फुटली. सूर गवसला. प्रसिद्धीसाठी ‘साधना’ मला योग्य वाटली. विनोद शिरसाठ आणि साधना परिवारानं माझ्यावर आणि शिक्षकांच्या कामावर विश्वास दाखवला. सुरुवातीचे लेख सातारा तालुक्यातील शाळांचे होते. तेथील काही लोकप्रतिनिधींना ही माहिती मिळाली. उलट-सुलट चर्चा झाली. जिल्हा परिषदेचे शिक्षण समितीचे सभापती, शिक्षण अधिकारी, इतर पदाधिकारी, पत्रकार यांनी या भागातल्या शाळा पाहणीचा संयुक्त दौरा केला. शाळांनी उत्तम सादरीकरण केलं. संभ्रम दूर झाला. पत्रकारांनी चांगली प्रसिद्धी दिली. शिक्षकांचं आणखी कौतुक झालं.या लेखमालेला माझ्या अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिक्रिया आणि प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातून प्रतिक्रिया आल्या. सुरुवातीस लेख आवडला. पुढच्या लेखांची वाट पाहतोय, आमच्या शाळेत आम्ही असे उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया होत्या. पटत नाही, विश्वास बसत नाही, इतक्या चांगल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत याचा आनंद आणि आश्चर्य वाटणाऱ्या प्रतिक्रियाही मिळाल्या. ‘शाळा आहे आणि शिक्षणही आहे’ याला प्रसिद्धी मिळाली याचा आनंद बहुतेकांना वाटत होता. आमच्या शाळेतही चांगले उपक्रम राबविले जात आहेत.  आमच्या शाळेला भेट द्या, अशी शाळाभेटीची निमंत्रणे आली. जळगाववरून चंद्रकांत भंडारी या उपक्रमशील सेवानिवृत्त शिक्षकांचा फोन आला. ज्याचं स्वत:चं ‘कुडाळकरांची शाळा’ नावाचं एक चांगलं पुस्तक आहे. मार्गदर्शनासाठी याल का विचारलं. मी होकार दिला. त्यांनी चोपडा येथील विवेकानंद विद्यालयाच्या संस्थेचे कामकाज पाहणाऱ्या केंगे सरांना कळवलं. 

साने गुरुजींचा सहवास लाभलेल्या केंगे सरांनी विवेकानंद विद्यालयात येण्याचं निमंत्रण दिलं. मी, प्रतिभा भराडे आणि मिरज तालुक्यातील कृष्णात पाटोळे, धोंडिराम पवार, सदानंद कदम हे धडपडणारे शिक्षक आम्ही पाच जणांनी सातशे किलोमीटर प्रवास करून चोपडा गाठलं. उपक्रम, धडपडणाऱ्या शाळांचे फोटो आणि फिल्म दाखवल्या. सदानंद कदम यांनी एल.सी.डी. प्रोजेक्टरच्या साहाय्यानं गड, किल्ले दाखविले. इतिहास रंजक करून कसा शिकवावा याचं प्रात्यक्षिक दाखविलं. विवेकानंद विद्यालयासह परिसरातील दीडशे शिक्षकांसमवेत एक दिवस आम्ही शैक्षणिक आनंदात घालवला. सांगलीच्या वारणालीच्या शाळेत संस्थेच्या लाडसरांनी लेखांच्या कात्रणाच्या झेरॉक्स काढून शिक्षकांना दिल्या. लेखांवर चर्चा केली. काहींनी शाळेत सामुदायिक वाचन केल्याचं सांगितलं. नांदेडच्या माई राठोड, विकास शेनमुकर इत्यादींनी लेखांच्या कात्रणाच्या झेरॉक्स एकत्रित करून शाळांना वाटल्या. कूपर उद्योगाचे कन्सलटंट जे.बी.पाटील यांनी स्वत:च्या खिशातले सोळा हजार रुपये देऊन मला बेंगलोरला शिक्षण परिषदेला पाठवलं. भेटायला आले. येताना मला भेट द्यायला शिक्षणविषयक पुस्तकांचा गठ्ठा आणला. मी वाचावं, अधिक सशक्त व्हावं म्हणून. माणसं शिक्षणावर किती प्रेम करतात!

पुण्याहून अनंत लिमये, मुंबईहून रजनी पटेल यांनी आम्ही अशा शाळांना मदत करायला तयार आहोत असं सांगितलं. नाशिकवरून दिगंबर गाडगीळ यांचं पत्र आलं. ‘सोबत हजार रुपयांचा धनादेश. उपळीच्या मुलांना पुस्तकं घेऊन द्या.’ आपलं कोणीतरी भरभरून कौतुक करतंय, आपलं काम, आपली शाळा याविषयी छापून आलंय याचा त्या त्या शिक्षकांना खूप आनंद झाला. शिवाय अशा प्रकारे शाळेला भेट देता येते, इतकं सूक्ष्म आणि सकारात्मक पाहता येतं आणि त्याला इतकी चांगली प्रसिद्धी मिळाली याचा आनंद माझ्याजवळ शिक्षकांनी व्यक्त केला. समीर शिपुरकर यांनी लीलाताई पाटील यांच्या सृजन आनंद या विद्यालयावर मूलगामी नावाचा सुंदर माहितीपट बनवलाय. माहितीपट बघणं आणि त्यावर चर्चा असा विठ्ठलाईनगरच्या शाळेत कार्यक्रम ठरला. प्रशिक्षणांची संख्या उदंड झाली असतानाही सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून दीडशे शिक्षक जमले. पदरमोड करून, भाकरी बांधून घेऊन आले. नवीन काही मिळणार असेल तर शिक्षक स्वीकारायला तयार असतात याची पुन्हा एकदा प्रचिती आली. नरेंद्र दाभोलकरांनी कौतुक केलं. आणखी शाळांविषयी लिहा म्हणाले. अर्थातच माझा हुरूप वाढला. रा.रं.बोराडे, अनंत भावे, नाशिकचे ना.सी.पाटील आणि बरेच वाचक पुस्तक काढा म्हणत होते. स्वप्नशाळेच्या वाटेवरच्या या शाळांचं पुस्तक आपल्या हातात आले आहे. गिरीश सहस्रबुद्धे यांची चित्रं मला आवडतात. मी काढलेल्या फोटोपेक्षा मला ती अधिक बोलकी वाटतात. पुस्तकासाठी त्यांची चित्रं आहेत याचा माझ्याइतकाच वाचकांनाही आनंद होईल याची मला खात्री आहे. 

Tags: धडपड मंच लेखांचे पुस्तक आदर्श स्वप्न शाळा दर्जात्मक शिक्षण स्वावलंबन श्रमप्रतिष्ठा गुणवत्तापूर्ण जिल्हापरिषद शाळा खाजगी शाळांचे वास्तव गुणवत्तापूर्ण शिक्षण जिल्हापरिषद शाळा ज्ञानरचनावादी शिक्षण नामदेव माळी Constructivism in School series of articles Practical school. Experimental Schools Dream School Zilha Parishad school article on ZP school School Visits education system Article on education Namdeo Mali weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नामदेव माळी,  सांगली, महाराष्ट्र
namdeosmali@gmail.com

शिक्षण क्षेत्रात वर्ग दोनचे अधिकारी, कादंबरीकार व शैक्षणिक लेखक.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके