डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विजेने चोरलेले दिवस : जोर का झटका धीरे से लगे!

महात्मा फुले प्रणित शेतकरी साहित्य कसे असावे याचे लखलखीत उदाहरण म्हणजे ही कादंबरी होय, अशी आसाराम लोमटे यांनी या कादंबरीची पाठराखण केली आहे. या एकाच विधानामधून या कादंबरीची ताकद लक्षात येते. ‘शेतकऱ्याचा असूड’, ‘ब्राह्मणाचे कसब’, ‘गुलामगिरी’ या पुस्तकांमधून म. फुले यांनी मांडलेली भूमिका शेतकऱ्याची बाजू उचलून धरताना त्या काळातील शोषकांवर हल्ला चढवते. हा हल्ला कधी थेट आहे, तर कधी उपरोधिक आहे. तिच भूमिका आणि मांडणी या कादंबरीत आहे.

बागायती शेती करून आर्थिक स्तर उंचावू पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हवा आणि पाण्याइतकीच वीज महत्त्वाची आहे. चार घास सुखाचे खाण्याची स्वप्नं शेतकरी फार पूर्वीपासून बघत आला आहे. मोट, डिझेल इंजिन ते विजेवर चालणारे पंप असा शेतीच्या पाण्याचा प्रवास झाला आहे. विजेचा लहरीपणा आणि यंत्रणेत बिघाड झाल्यानं जिवापाड जतन केलेली पिकं माना मुरगाळून पडतात. डोळ्यादेखत त्यांचा जीव जाताना स्वतः पाणी पाणी करत त्यांना पाणी पाजताना शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला येतो. पुन्हा त्याला डिझेल इंजिनचा शोध घ्यावा लागतो. ही प्रगती की अधोगती? दुसऱ्या हरित क्रांतीची स्वप्नं बघता बघता शॉर्ट सर्किट होऊन उसाला आग लागते नि डोळ्यादेखत त्याची राख होते. शेतकऱ्यानं जगाबरोबर आधुनिकता स्वीकारली. त्यांनी वेगवेगळ्या वानाचे शोध लावले आहेत. आधुनिक तंत्र, खतं, बी-बियाणे वापरून उत्पादन वाढीसाठी तो सतत धडपडत असतो. शेतकऱ्यांच्या हाडामांसात सर्जनशीलता आहे. त्याच्या मनात कल्पनेचे कोंब तरारतात. पिकं बहरतात. पण त्या स्वप्नांना नख लावण्याचं काम अस्मानी आणि सुलतानी संकटं करतात. शेतकऱ्यांचं आयुष्य चोरतात. शेतकऱ्यांचं आयुष्य चोरणाऱ्यांमध्ये वीजही मागे नाही. संतोष जगताप यांनी सहजासहजी लक्षात न येणारा परंतु शेतकऱ्याला झटके देणाऱ्या विजेचा प्रश्न ‘विजेने चोरलेले दिवस’ या कादंबरीत मांडला आहे.

वीज आणि अधिकारी यांचा लहरीपणा कधी तिरकस, कधी उपरोधानं, कधी रोखठोक, तर कधी मिश्किलपणे मांडला आहे. यातून एक एक नवल वाटाव्या अशा घटना आपल्यासमोर येतात. सगळ्या जगात दिवसभर वीज असताना, कार्यालयातले पंखे रिकाम्या खुर्च्यांना वारं घालताना शेतातली वीज गुडूप होते. ती रात्री अपरात्री येते, शेतकऱ्याची झोप उडवते. कधी अंधारात विंचू काटा दंश करतो, तर कधी शॉक लागतो. प्रजा डोळस असूनही राजाच्या लहरीमुळं प्रजेला ठेचा बसतात. ठेचा खाऊन  बोटं आंधळी होतात. ठसठसतात. जरा धक्का लागला की, मरणाची कळ उठते. विजेचा खेळखंडोबा शेतकऱ्याच्या जिंदगानीचा खेळ करतो. हे सारं हसावं की रडावं असं आहे. संतोष जगताप यांनी व्यवस्थेला दिलेला हा शॉक आहे. रांगड्या, मोकळ्याढाकळ्या अस्सल बोलीतील रोखठोक शैलीमुळं जोरका झटका धिरेसे देणारी ही कादंबरी आहे. माणदेशातल्या जगूच्या तोंडून मांडलेला खेळ गुदगुल्या करत गंभीर बनवतो. व्यवस्थेतील विसंगती पाना-पानावर दिसते, अंतर्मुख करायला लावते. त्याचे काही दाखले-

झिरो वायरमनविषयी जगू म्हणतो, ‘शून्याचा शोध आपलाय म्हणून झिरो किती अप्लाय करायचं ह्याला काय धरबंदच राहिला न्हाय कडू. जाईल तिथं झिरोचं हिरो. पोलीस स्टेशनची पायरी चढायच्याय. आधी झिरो सायबाचं पाय पुजा.’ सगळीकडं झिरो आहेत हे सांगताना जगू वैतागून म्हणतो, ‘काही शाळेतबी झिरो गुरुजी... आभाळ हेपलत बसावं का आता !’ ‘बातम्यात प्रमुख शहरांचं हवामान रोज सांगतेत. ते बंद करून त्याच्यावाटणीचं आजचं भारनियमन म्हणत राज्यातल्या प्रमुख खेड्यातलं भारनियमन रोज सांगायला पाहिजे. टीव्ही बघायला लाइट पाहिजे ही खराय; खरं नसलीच एखांद्याबारी तर आमी चिमणी लावून बघू. लईत लई जरा अंधुक दिसंल एवढंच.’ ‘किलोला सोळाशे रुपय दराच्या शाम्पूचा फेस करताना येत नाय का कडूंच्या गांडीला फेस!’ ‘लाइट आली म्हणजे उंदराला हळकुंड घावल्यागतच होतंय माणसाला.’ ‘पंचवीस लाखाच्या गाडीत बसून कुतमिरीची पेंडी चार आण्याला मागताना कडूस्नी लाजबी वाटत नाय.’ ‘तुमचं पोरगं गुड नाइट म्हणत झोपणार अन्‌ आमचं पोरगं फुल्ल लाइट म्हणत जागणार.’ ‘दीडशे रुपयाचं आम्लेट नि अंड्याचा दर दोन रुपय.’ ‘एकीकडं रोषणाईचा झगमगाट नि दुसरीकडं शेतकऱ्याचं मरण.’ ‘टाटाचं लेकरू एसटीत बसून प्रवास करतंय ही गोष्ट सपनात तरी खरी वाटेल का!’ ‘गावात कुठलाबी पुढारी येउद्या, त्याचा सत्कार डीपीतल्या फुटक्या फिजांचा हार घालूनच करा. डोळं झाकून कुठलाबी डीपी बघा. फिजा फुटक्याचं असणार.’

महात्मा फुले प्रणित शेतकरी साहित्य कसे असावे याचे लखलखीत उदाहरण म्हणजे ही कादंबरी होय, अशी आसाराम लोमटे यांनी या कादंबरीची पाठराखण केली आहे. या एकाच विधानामधून या कादंबरीची ताकद लक्षात येते. ‘शेतकऱ्याचा असूड’, ‘ब्राह्मणाचे कसब’, ‘गुलामगिरी’ या पुस्तकांमधून म. फुले यांनी मांडलेली भूमिका शेतकऱ्याची बाजू उचलून धरताना त्या काळातील शोषकांवर हल्ला चढवते. हा हल्ला कधी थेट आहे, तर कधी उपरोधिक आहे. तिच भूमिका आणि मांडणी या कादंबरीत आहे.

विजेचा ट्रान्सफॉर्मर  बिघडल्यावर तो बदलून घेण्यासाठी किती यातायात करावी लागते, संघर्ष करावा लागतो, पावला पावलाला अधिकाऱ्यांसमोर झुकावं लागतं. जे काम नियमानं मुदतीत व्हायला हवं, जे हक्काचं  आहे, ते मिळायला हवं ते दूरच राहतं. अंगातली रग आणि राग जिरवावा लागतो. शेवटी पदरात फसवणूक येते. याचं चित्रण कादंबरीत आहे.- ‘कितीबी गरिबी असली तरी किराणा न्‌ दवाखाना चुकवता येत न्हाय कुणालाच.’ ‘घरंदारं गहाण ठिवून बागा, हिरी, होल न्‌ पाइपलाइनी केल्या न्‌ आता लाइट कुठाय.’ ‘एसटीला, शाळेला पर्याय असतो; पण विजेला पर्याय नाही.’ जिथं तिथं शेतकऱ्याची अडवणूक. मग बी-बियाणं असो, की खतं-औषधं, की शेतमालाचा दर.

कादंबरीत समकाल, बदलता काळ, त्यातील भाषा, संपर्क साधनं, यांत्रिक-तांत्रिक बदल, जागतिकीकरणाचा शेती आणि खेड्यावर झालेला परिणाम, मोबाइलचा शेतीसाठी व वीजपंप सुरू बंद करण्यासाठी वापर या बाबी संतोष जगताप यांनी सुक्ष्मपणे टिपल्या आहेत. लेखकाची ग्रामजीवनाशी, मातीशी नाळ घट्ट आहे. या लेखनातून शेतकऱ्याच्या प्रश्नाला भिडण्याचं सामर्थ्य दिसतं. काळाचं भान राखत आजच्या खेड्यातलं वास्तव, वर्षानुवर्षे टिकून असलेल्या रूढी, परंपरा, चालीरीती, लोकसमजुती, लोकभ्रम, म्हणी, वाक्प्रचार या आधारे लोकजीवन घेऊन कादंबरी प्रकटते. सापाला साप न म्हणता ‘लांबडं’ म्हणणं, साप चावल्यास ‘पान लागणं’ म्हणणं, ‘गरोदरपणात विंचू चावला तर जन्मलेल्या बाळाला विंचू चढत नाही’ असे उल्लेख दिसून येतात. तसेच दंतकथा, लोककथा, काल्पनिक गोष्टी, स्वप्न खेळ यांचा कादंबरीत खुबीने वापर केला आहे. आपल्या गोष्टी सांगण्याच्या परंपरेचा, शैलीचा वापर गोष्टीत आणि एकूणच कादंबरीत केला आहे. त्यामुळे कादंबरी आपल्या मातीतली वाटते. ‘तिन्ही सांजेचं अंधारात बसू नये, दिवा लावावा’ म्हणतात. यासाठी अंधारात जेवताना भूत शेजारी बसून आपल्या ताटातलं खातं ही गोष्ट आली आहे.

वीज शेतकऱ्याच्या आयुष्यावर किती परिणाम करते; याचा सूक्ष्मपणे विचार संतोष जगताप यांनी केला आहे. मोबाइल बॅटरी चार्जींगपासून ते आयुर्वेदिक कंदील, वेड्या बाभळीपासून वीजनिर्मिती, पवनचक्क्यांचं राजकारण नि मातीमोलानं त्यासाठी खरेदी केलेल्या जमिनी, आकडा टाकून शेतकऱ्यासह थोरामोठ्यांनी केलेली वीजचोरी, यशवंतराव चव्हाण यांनी राज्याची स्थापना झाली त्या वेळी शेती, वीज आणि लघुद्योग यांचा विकास करणं हे उद्दिष्ट असल्याचं सांगितलं होतं. तसेच कोयना प्रकल्पाचं उद्‌घाटन करताना कोयनेची वीज आपल्या राज्याचं अज्ञान संपवेल अशा शब्दात विजेचं महत्त्व सांगितलं होतं, या आठवणींपर्यंतचा धांडोळा कादंबरीत घेतला आहे

सिंगलफेज योजना, भगीरथ योजना, खून, मारामाऱ्या, वायरमन आणि अधिकाऱ्यांना कोंडून घालणं, शॉर्ट सर्किट, अपघाती मृत्यू हे सगळं वाचलं की, संतोष जगताप यांनी या कादंबरीसाठी किती कष्ट घेतले आहेत; किती अभ्यास केला आहे, याचा विचार केला तर, ते अचंबा वाटण्यासारखं आहे. नवीन लिहिणाऱ्यांनी यासाठी ही कादंबरी मुद्दाम वाचावी.

बोलीभाषेचा प्रभावी वापर हे या कादंबरीचं बलस्थान आहे. साहित्यिक आसाराम लोमटे यांनी याबद्दल कादंबरीच्या मलपृष्ठावर नेमकेपणानं लिहिलं आहे. ‘ग्रामीण’ या नावाखाली लिहिली जाणारी कृतक अलवार भाषा सोडून स्थानिक लोकजीवनाशी घट्ट नाते असलेल्या अस्सल रोकड्या, रांगड्या भाषेत लेखकाने हा अनुभव मांडला आहे’ असं त्यांनी म्हटलं आहे.

खेड्यातील व्यक्तींची नावं तिथले संदर्भ घेऊन येतात. काही पडनावं असतात. त्याचाही वापर समर्पकपणे केला आहे. उदा. रंगीतराव, कृषिमंत्री गण्या, इवळ्या गंगू, वटवट्या दाढवान.

खरकटं मोडणे, मोबाइल चेकाळला, गण्याचा खिसा तुतारी फुकाय लागला, राजा उदार झाला नि हत्तीचा बोचा देऊन गेला, चोराला धार्जीण असणे, इदुळा कुणी बंड पुकारलं, माणूस तोंड ओळख विसरतं गांड ओळख नव्हं, तासाभरात येतो म्हणालाय खरं घड्याळ कोणत्या कंपनीचं वापरतोय अशा उदाहरणांवरून बोलीचं वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण लक्षात येतं.

‘कडू’ आणि ‘किता’ हे दोन शब्द वारंवार आले आहेत. कोल्हापूर परिसरात ‘रांडेच्या’ हा शब्द वेगवेगळ्या अर्थानं वापरला जातो. तसा ‘कडू’ हा शब्द इथं कधी प्रेमानं, तर कधी तिरस्कार, राग अशा भावना व्यक्त करण्यासाठी वापरला आहे. गड्या, च्यायला, हलकट, शहाणा, बनेल असे विविध अर्थ त्यातून निघतात. उदा.- ‘झ्याटसुदिक द्यायचं न्हाय कडूला.’ इथं कडूला म्हणजे नालायकाला, हलकटाला. ‘कडू औलादीचं’ म्हटलं की, कुळीमुळी निघते.

एकेक विधान काही वेळा कवितेचा आशय घेऊन येतं. ‘सात लाखाचं थडगं (घर) बांधून ठेवलंय की हौसंनं’, ‘नालासाठी घोडा लावून घेत बसायचं.’ मूळ नालासाठी घोडा विकत घेणं याची उच्चतम तीव्रता इथं दिसते. ‘आपल्या शेतीचा भाकरीवरचा तमाशा’, ‘होलला पैसाच लागलाय’ इत्यादी. सर्वसाधारणपणे न ऐकलेली, वाचलेली; पण वेगळेपण घेऊन येणारी माणदेशी बोली, शिवाय ज्या त्या व्यक्तीची विशिष्ट ढब घेऊन येणारी बोली संतोष जगताप यांनी सशक्तपणे शब्दात पकडली आहे. त्यामुळं त्या परिसरातील रूढी, परंपरा, लोकजीवन, लोकसंस्कृती आपल्यासमोर आणत, कादंबरी आपल्या अवतीभोवती घडत राहते. त्या-त्या व्यवसायाची एक भाषा असते. विजेशी संबधित डीपीची केबल शॉर्ट झाली, आकडा टाकणे, झिरो वायरमन असे विजेशी संबधित शब्द आणि वाक्यं आली आहेत.

भारनियमन आणि वीज वितरणाशी संबधित प्रश्न घेऊन कादंबरी शेती व्यवसायाच्या मूळ प्रश्नानांही हात घालते. कष्ट करणारा, हवालदिल झालेला, मातीमोल दरानं शेतमाल विकणारा शेतकरी, त्याचं जगणं(?), मरणं मांडते.

एक दमदार कादंबरी घेऊन संतोष जगताप यांनी मराठी साहित्यविश्वात पाऊल टाकलं आहे. बोलीमुळेच मराठी भाषा टिकेल असं म्हटलं जातं. यानिमित्ताने संतोष जगताप यांनी मराठी टिकवणं, तिचं संरक्षण आणि संवर्धन करणं यासाठी महत्त्वाची कृती केली आहे. मराठी संपत चाललीय, तिचं संरक्षण केलं पाहिजे असं म्हणणाऱ्यांसाठी हे कृतियुक्त उदाहरण आहे. त्यांनी प्रयत्नपूर्वक, अभ्यासपूर्वक हे केलेलं आहे. यापुढे त्यांच्या हातून असेच कसदार लेखन होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

वीजेने चोरलेले दिवस : कादंबरी
लेखक : संतोष जगताप
प्रकाशक : दर्या प्रकाशन, पुणे
पृष्ठे: 156, मूल्य : 220रुपये

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नामदेव माळी,  सांगली, महाराष्ट्र
namdeosmali@gmail.com

शिक्षण क्षेत्रात वर्ग दोनचे अधिकारी, कादंबरीकार व शैक्षणिक लेखक.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके