डिजिटल अर्काईव्ह

सहकाऱ्यांची मानवंदना

भाऊसाहेब रानडे यांच्या जीवनाचे विविध पैलू आहेत. रामदास, लोकमान्य टिळक व गांधीजी हे भाऊचे आदर्श पुरुष. त्यांच्या जीवनाचा खोलवर ठसा भाऊंच्या जीवनावर उमटला आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत देशाला जातिधर्मनिरपेक्ष अशा राष्ट्रवादी शीलाचे लढाऊ सैनिक हवे होते. त्या काळाची ती गरज होती. भाऊंनी काँग्रेस व सेवा दलाच्या द्वारा राष्ट्रवादी सैनिक तयार करण्याचे कार्य केले. आज स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नवसमाजरचनेकरिता लोकशाही समाजवादी शीलाचे नागरिक हवेत. ती आजची महत्त्वाची गरज आहे. भाऊ त्यासाठी आज आयुष्य वेचीत आहेत. केवळ सिद्धान्त समाजक्रांती करू शकत नाहीत. या शीलाचे सैनिक घडविणे हे प्रथमकर्तव्य आहे असे भाऊसाहेब मानतात.

नाना डेंगळे

सेवा दलाच्या संघटनेत श्री. नानासाहेब डेंगळे यांचा वाटा फार मोठा आहे. पू. भाऊंच्या जीवनाचे शाब्दिक कौतुक करून ते थांबलेले नाहीत, थांबणार नाहीत. एकाच ध्येयाकडे वाटचाल करण्यामधून जो जिव्हाळा साहजिकच निर्माण व्हावा तो त्या दोघात झालेला आहे. दोघांची ही कार्यनिष्ठा विलक्षण आहे याची प्रतीती सेवा दलात येतेच; पण सर्वसामान्य जनतेला हा प्रत्यय गेल्या सामाजिक परिषदेच्या अधिवेशनात आला. नानासाहेबांनी भाऊंच्या जीवनाचा अन्वयार्थ येथे लावला आहे.

पाश्चात्त्य राष्ट्रातील नागरिक वयाच्या साठ-सत्तरापर्यंत क्रियाशील असलेले आढळतात. त्यानंतर वार्धक्यास सुरुवात होते. त्या राष्ट्राची भौगोलिक व आर्थिक स्थिती पाहिली तर या गोष्टी नवल वाटण्याजोगे नाही हे सहज लक्षात येईल. पण भारतात महाराष्ट्रात दीर्घायुषी राहून समाजसेवा करणारे सेवक आहेत, मात्र खासच वैशिष्ट्य समजावे लागेल. पावत्यांचे बरोबरीने काकणभर जास्तच तडफेने व सर्वस्वी समाजहिताकरिता झटणारे पू. भाऊसाहेब रानडे यांचेकडे पाहिले की नम्रतेने मान लवल्याशिवाय राहात नाही.

भाऊसाहेब रानडे यांच्या जीवनाचे विविध पैलू आहेत. रामदास, लोकमान्य टिळक व गांधीजी हे भाऊचे आदर्श पुरुष. त्यांच्या जीवनाचा खोलवर ठसा भाऊंच्या जीवनावर उमटला आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत देशाला जातिधर्मनिरपेक्ष अशा राष्ट्रवादी शीलाचे लढाऊ सैनिक हवे होते. त्या काळाची ती गरज होती. भाऊंनी काँग्रेस व सेवा दलाच्या द्वारा राष्ट्रवादी सैनिक तयार करण्याचे कार्य केले. आज स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नवसमाजरचनेकरिता लोकशाही समाजवादी शीलाचे नागरिक हवेत. ती आजची महत्त्वाची गरज आहे. भाऊ त्यासाठी आज आयुष्य वेचीत आहेत. केवळ सिद्धान्त समाजक्रांती करू शकत नाहीत. या शीलाचे सैनिक घडविणे हे प्रथमकर्तव्य आहे असे भाऊसाहेब मानतात.

‘भाऊ’ या नावाने आम्ही सर्व सेवादल सैनिक त्यांना हाक मारतो. खऱ्या अर्थानेच ते आमचे भाऊ आहेत, मार्गदर्शक आहेत. भाऊंनी लहानपणापासूनच स्वतःचे जीवन विशिष्ट दिशेने घडविले आहे. भाऊंना मनापासून जर काही आवडत असेल तर शिक्षणाचे कार्य. राष्ट्र सेवा दलाचे कार्य प्रामुख्ये करून शैक्षणिक आहे. शाखा कलापथकाने गुरुजी सेवापथक ही या विद्यापीठांची तीन अंगे आहेत. तीन्ही अंगाचा विकास करण्याकरिता भाऊंची अहोरात्र धडपड असते.

भाऊ प्रवासात असोत, शिबिरात, सेवा पथकावर, कलापथकाबरोबर वा अन्य कोठेही असोत, स्वतःची सर्व कामे स्वतः करतात. प्रवासात सारखा पत्रव्यवहार, वाचन किंवा नागरिकांच्या जीवनातील सुखदुःखांची विचारपूस ते करतील. सेवापथकावर टिकाव चालवतील व पहाटेच उठून चूल पेटवून भाजीही करावयास लागतील. दुपारच्या वेळात पोहायला शिकवतील, बौद्धिक घेतील, ज्या ज्या उणिवा दोष आदळतील ते बारकाईने दूर करण्याचा प्रयत्न करताना आढळतील. धारवाडला मित्राकडे सहज आम्ही गेलो होतो. भाऊंनी झाडू घेतला व संडास साफ केला. कोल्हापूरहून रेल्वेगाडी निघायची होती. गाडीत घाणच घाण. भाऊ लग स्टेशन मास्तरकडे गेले व गाडी स्वच्छ करून घेतली, रोज ती गाडी जाते व नेहमी अशीच असते पण कोणी तक्रार करून गाडी स्वच्छ करून घेतल्याचे उदाहरण नाही. भाऊ हे एकच गृहस्थ भेटले असे स्टेशन मास्तर म्हणाले. समाजातील सर्व प्रकारची घाण नष्ट करून विशुद्ध जीवन कसे जगता येईल हीच भाऊंची आतापर्यंतचीच आहे.

त्यांची दृष्टी त्याने बोलणे काम करणे, वागणे सारेच अतिगतिमान. आवाज मोठा पहाडी, शिस्त करडी. सैनिकात भाऊंना दरारा काही वेगळाच. ज्या खेड्यात सेवापथक असेल तेथील गावकऱ्यात भाऊंचा वचक काही औरच असतो. ‘म्हातारा लई कडक’ असे ते बोलताना ऐकू येईल. पण या दर्शनी स्वरुपाच्या आत अत्यंत सरळ साधे नि अतिप्रेमळ अंत:करण आहे. भाऊंना वचकणारे सैनिक भाऊंच्यापुढे आपल्या जीवनातील सारी सुखदुःखे खुली करतात आणि पित्याच्या नात्याने मार्गदर्शन घेतात. इतका जिव्हाळा त्याचेसंबंध सर्व स्त्री-पुरुष सैनिकात निर्माण होतो. गृहस्थ कोठेही एका ठिकाणी सापडायचे नाहीत. सैनिकांच्या जीवनात ते इतके रस घेतात की महाराष्ट्रातील अनंत कुटुंबे ही भाऊंचीच घरे झाली आहेत. सैनिकाचे बरोबरच ते त्यांच्या आई वडिलाचे सहकारी, मित्र, सल्लागार बनतात. 

समाजातील प्रदर्शनीय भाग वाढत चालला आहे; पण ते नाटक संपले की व्यक्ती जेथे होत्या तेथेच आढळतात. समाजजीवन व कालजीवन खालच्या पातळीवर अति वेगाने कोसळत आहे. अशा या अंधःकारमय अवस्थेतून जाताना भाऊंचे जीवन पाहिले, अनुभवले की वाटते हा नागरिक या देशाचा नव्हेच. काहीतरी वेगळेपण उठून दिसते ते दर्शनीय नाही, दिपविण्याकरिताही नाही. दुहेरी जीवनाचा तेथे वासही नाही. केव्हाही तेथे प्रवेश करावा. आज पुढारी पुष्कळ आहेत. पण समाजजीवनाला नवे वळण देण्याचे सामर्थ्य लोप पावल्यासारखे दिसते. भाऊ हे पुढारी नाहीत, ते या देशाचे थोर तरुण सैनिक आहेत. साठ वर्षे झाली पण भाऊंना कधी कंटाळा आला आहे, असे कधीच दिसणार नाही. प्रतिक्षणी ते नव्या जाणिवेने जगत असतात. ज्यांच्या जीवनाने आपले जीवन अल्पसे तरी उजळील अशा तेजस्वी तपस्वी सेवकांची ही एकसष्टी साजरी करण्यात म्हणूनच औचित्य आहे.

भाऊसाहेबांनी महाराष्ट्रातील शेकडोवारी मुलींच्या जीवनाला समतेच्या विचाराचे व आचाराचे वळण दिले आहे. त्यांच्या पालकातही अपेक्षित बदल घडवून आणण्याचे कार्य अव्याहत चालूच आहे. सामाजिक क्रांतीतील स्त्रियांचा वाटा स्त्रियांनी उचलला पाहिजे व जाणीवपूर्वक पुढे वैवाहिक जीवनातही हे व्रत पाळले गेले पाहिजे असा भाऊंचा कटाक्ष आहे.

सेवा दलातील अनेक मुलींना व मुलांना त्यांच्या अव्याहत प्रयत्नांतून नव्या सामाजिक समतेच्या क्रांतीकरिता जाणीवपूर्वक आचाराची शिकवण मिळत आहे. त्याकरिता भाऊंना भरपूर आयुरारोग्य लाभो. देशातील तरुण आदर्श सेवा सैनिक बनण्याची धडपड करतील तर जीवन कृतार्थ झाले असे भाऊंना वाटेल.

**

अनसूया लिमये

भाऊंच्या कार्यात नितांत निष्ठने समरस होणाऱ्या अनूताई लिमये यांनीही आपली मानवंदना येथे दिली आहे. स्त्रियांच्या समस्या सोडविताना अनूताईंना स्वतःइतकाच, किंबहुना अधिक खंबीर आधार लाभला आहे तो भाऊंचा. स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा मारून व्याख्याने सजवणारे बोलूकाका पुष्कळ असतात; भाऊंसारखे कार्य करण्याचा वसा घेतलेले थोर पुरुषच थोडे. अनूताईंनी म्हणूनच भाऊंच्या जीवनाचे मर्म येथे आवर्जून सांगितले आहे.

एकदा भाऊंच्या चांगल्या परिचयातील आणि त्यांच्याबद्दल चांगला आदर असणारे माझे एक मित्र बोलता बोलता म्हणाले, “भाऊंच्या त्यागाबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल प्रश्नच नाही. पण भाऊंमध्ये असामान्य असे काय आहे!” मला ते बोलणे त्यावेळी रुचले नाही. भाऊबद्दलची माझी आदराची भावना दुखावली गेली. मी विचार करू लागले. भाऊंमध्ये असामान्य काही नाही हे मला पटेचना. भाऊंमध्ये असामान्य काहीच नसते तर भाऊंचे हातून हा त्याग आणि हे कार्य घडलेच नसते.

जगात ज्या थोर व्यक्ती होतात त्यामध्ये काही ना काही तरी असामान्य गुण असतात निश्चित. कुणामध्ये प्रखर बुद्धिमत्ता असते तर कुणाजवळ विचारांचे मौलिकत्व असते. कुणाची लेखणी फार प्रभावी असते, तर कुणाची वाणी स्फूर्तिदायी असते. कुणाचे अंगी मोठाली कामे हाती घेण्यास लागणारी उपक्रमशीलता आणि कर्तबगारी असते तर कुणाचे अंगी अचाट धाडस आणि असते. ‘असामान्य’ कोटीला पोचण्याइतका यातला कोणताच गुण भाऊच अंगी नसला तरी यातले बरेचसे गुण कुशल कार्यकर्त्यांला आवश्यक तेवढ्या प्रमाणात भाऊजवळ आहेत हेही खरे आहे. पण भाऊंचे असामान्यत्व मला दिसते त्या त्यांच्या साधेपणात, त्यांच्या मोठ्या मनात, त्यांच्या प्रखर ध्येयनिष्ठता आणि त्यांच्या असीम त्यागात.. या गोष्टींच्या बळावरच भाऊंनी आपल्या अनेक शिष्यांच्या, अनेक सैनिकांच्या आणि अनेक सहकाऱ्यांच्या मनात कायमचे आदराचे स्थान पटकावले आहे.

भाऊंच्या आचारांतील साधेपणाची ओळख अगदी अल्प परिचयात देखील कुणालाही होईल. एखाद्या सैनिकांच्या घरी भाऊ प्रथमच उत्तरले तरी त्यांच्यातील अडचण ओळखून भाऊ चटकन् घतील सर्व कामात मदतीला लागतील आणि घरातील माणसात क्षणात मिसळून जातील. मनमाडला एका सैनिकेच्या घरी भाऊ उतरले. उन्हाळ्याचे दिवस. गावात पाण्याची विलक्षण टंचाई. बाहेरून पाण्याच्या मोटारी आणवून म्युनिसिपालिटी लोकांना पाणी पुरवीत होती. पाण्यासाठी मोठा क्यू लागला होता. भाऊ ह्या सैनिकांच्या घरी उतरले आणि दहा मिनिटांत पाण्याच्या बादल्या घेऊन क्यूमध्ये दाखल झाले. घरातली मंडळी संकोचली. पण भाऊ कुठले ऐकणार? वागण्यातील हा साधेपणा सर्वपरिचित आहे. त्यांच्या मनाच्या साधेपणाचा परिचय होण्यास मात्र थोडा अधिक सहवास घडावा लागतो. भाऊंच्या मनात कधी-कधी गोंधळ असतो आणि त्यांच्या मनाचा तोल क्वचित् प्रसंगी एखाद्या बाजूला अधिक झुकतो. कुणावर ते कधी-कधी विलक्षण संतापतात आणि त्याला ताता चोळतात. नवीन मंडळी गांगरून जातात. गैरसमज करून घेतात. पण त्या रागाचे कारण व्यक्ती नसून तत्त्वाशी किंवा कार्यकुशलतेशी विसंगत असे कृत्य असते. व्यक्ती ही निमित्तमात्र झालेली असते.

भाऊंच्या सान्या जीवनात एखादी लहानशी गोष्ट देखील अशी सापडणार नाही की, जी त्यांनी आपल्या व्यक्तीगत स्वार्थाकरता केली असेल. स्वतःचे घर, स्वतःचा संसार, स्वतःच्या जीवनाची सुरक्षितता या गोष्टींवर भाऊंनी संपूर्णपणेच पाणी सोडले आहे. पण विशेष म्हणजे स्वतःच्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा देखील भाऊ जोपासू शकलेले नाहीत. आपल्या डोळ्यासमोरील ध्येय, त्या ध्येयाच्या साधनेसाठी बांधावयाची संघटना आणि संघटनेत गोवली गेलेली लहान मोठी माणसे यांनीच भाऊंचे सारे जीवन व्यापून टाकलेले आहे. तिच्याकरता त्यांची अहर्निश इतकी धडपड चालू असते की, स्वतःच्या जीवनाचा विचार करायला त्यांना सवड आहे कोठे? भाऊंनी स्वतः लग्न केले नाही. कुणा नातलगांचे पाश उराशी बाळगले नाहीत. पण सेवा दलातल्या छोट्या मोठ्या सैनिकांच्या पाशांनी भाऊंना गुरफटून टाकलेले आहे. त्या पाशांनी भाऊंना दुर्बल मात्र बनवलेले नाही; विशाल बनवलेले आहे. परदेशात जाऊन तेथील समाजघटनाचा अभ्यास करण्याची भाऊंनी एक मनिषा होती. आजपर्यंत त्यांच्या जीवनात ती प्रत्यक्षात उतरू शकली नाही. पण सेवा दलातील एका कार्यकर्त्याला परदेशात जाण्याची संधी मिळताच अगदी समर्पित होऊन आपल्या जवळ असलेली थोडीशी कॅश सर्टिफिकिटेही भाऊंनी तिच्या खर्चासाठी द्यायला तयार व्हावे, ही भाऊंच्या मनाची केवढी उदात्तता! आपल्या सैनिकांच्या आणि सहकाऱ्यांच्या जीवनाशी इतके समरस होताना दिसून येणारी भाऊंच्या मनाची विशालता असामान्यच नव्हे का?

स्वतःचा संसार उभा न करणारी ब्रह्मचारी माणसे बहुधा काहीशी एकांडी बनलेलेच आदळतात. स्त्रियांच्या मुलाच्या सहवासात ती संकोचल्यासारखी वागत असतात. भाऊ याला अगदी अपवाद आहेत. सेवा दलातल्या कितीतरी मुला-मुलींचे भाऊ आज साक्षात् आई बनलेले आहेत. चिमुकल्या माणिकला अंगा-खांद्यावर खेळवण्यापासून तो सेवा दलात काही वर्षे घालवलेल्या तरुण मुलींच्या जीवनातील गुंतागुंतीचे प्रश्न समजून घेण्यापर्यंत प्रत्येक गोष्टी करता भाऊंची धडपड चालू असते. आमचे एक मानसशास्त्राचे विख्यात प्राध्यापक आम्हाला नेहमी सांगत असत की तुम्हाला उत्कृष्ट शिक्षक बनायचे असेल तर तुम्हाला लग्न केले पाहिजे, संसार केला पाहिजे, स्वतः माता किंवा पिता बनले पाहिजे, सर्वसामान्यतः त्यांचा हा उपदेश बरोबरही आहे. पण भाऊ मात्र जन्मजात शिक्षक आहेत. स्वतःचा संसार न करताही ते तरुणाचे उत्कृष्ट शिक्षक बनले आहेत. पित्याची व मातेची भूमिका घेऊ शकले आहेत. त्यांच्यामध्ये वात्सल्य ओतप्रोत आहे. 

भाऊंची ध्येयनिष्ठा प्रखर आहे. लहान-सहान प्रश्नात त्यांच्या विचारांत क्वचित् गोंधळ दिसला तरी आपल्याला गाठावयाचा ध्येयबिंदू व त्याकडे जावयाचा मार्ग याबद्दल भाऊंच्या डोळ्यांसमोरील चित्र स्पष्ट आहे. राष्ट्र सेवा दल संघटना पूर्ण कह्यांत घेण्याची काँग्रेस नेत्यांची बुद्धी दिसून येताच तिने काँग्रेसपासून दूर होण्याचे ठरवले तेव्हा सर्वांच्या पेक्षा भाऊंच्या मनाला जास्त वेदना झाल्या; कारण सेवादल कार्यकर्त्यात भाऊ वयाने व अनुभवाने सर्वांत वडील आहेत. काँग्रेसची संघटना व तत्वे जोपासण्यामध्ये त्यांनी आपले रक्त इतरांपेक्षा जास्त आटवले होते. जन्मदात्या आईप्रमाणे काँग्रेसवर भक्ती केली होती. पण ध्येयापासून ती च्युत झालेली दिसताच तिचे पाश तोडण्याची कठोरताही त्यांनी पत्करली ती ध्येयचित्रे स्पष्ट असल्यामुळेच. भाऊंची राजकीय दृष्टी संकुचित कधीच नाही. तिला विशाल सामाजिक बैठकीचे कोंदण मिळाले आहे.

गांधीवादी म्हणून भाऊंना जग ओळखत नसले तरी आपल्या राजकारणाभोवती गांधीजींनी जे निरनिराळे सामाजिक पैलू निर्माण केले त्यातील बरेचसे भाऊंनी ग्रहण केलेले आहेत. सर्व तऱ्हेची अंगमेहनतीची कामे स्वतः जातीने करून भाऊंनी सेवा दल सैनिकांना श्रमाचे मूल्य शिकविले आहे. कुठेही राहिले तरी तेथील संडास स्वच्छ नसेल तर प्रथम तो स्वतः साफ करणे हा भाऊंनी आपल्या दैनंदिन जीवनात एक नियम मानलेला आहे. दलिताच्या हाकेला केव्हाही ओ देण्यास भाऊ तत्पर असतात.

स्त्रियावर समाज अद्यापही करीत असलेला अन्याय ही तर भाऊंना नेहमीच क्लेश देणारी गोष्ट आहे. त्याकरता पुरुषांना योग्य तो दृष्टिकोन देणे आणि निमूटपणे हा अन्याय सहन करणाऱ्या दुर्बल स्त्रियांना आपली दुर्बलता टाकून देण्यास समर्थ बनवणे यासाठी भाऊंची धडपड अविरत चालू असते. एखाद्या घरात भाऊचा परिचय झाला की तेथल्या स्त्रियांना सामाजिक वातावरणात खेचल्याशिवाय भाऊ राहणार नाहीत. कोणत्याही खेड्यांत सभा घेण्याची वेळ आली तर त्या सभेला गावातील स्त्री समाज जमण्याबद्दल भाऊंचा कटाक्ष असतो. स्त्रिया आल्याशिवाय सभा सुरू करावयाची नाही असा दंडक स्वतःपुरता तरी भाऊंनी घालून घेतला आहे.

भाऊंच्या मनाची तळमळ बारीकसारीक गोष्टीतूनही नेहमी दिसून येत असते. ध्येयाच्या अंतिम साधने करता विशिष्ट समाज-घडणीची आवश्यकता भाऊ मानत असले तरी त्यासाठी पोषक अशी वृत्ती बारीकसारीक गोष्टींतूनही ते जोपासत असतात. समाजमूल्यांचे शिक्षण देणाऱ्याला हे अत्यावश्यक आहे. शिबिरातून शिस्तीविरुद्ध गंभीर स्वरुपाचे वर्तन एखाद्या सैनिकाने केल्यास रात्ररात्र भाऊंनी तळमळत काढलेली मला माहीत आहे. दीर्घ मुदतीचे स्त्रियांचे एक शिबिर चालू असता शिबिरात कामास येणाऱ्या एका मुलीला चिमाला अक्षरे शिकविण्याचे काम कुठल्याही सैनिकेने इतक्या तत्परतेने केले नाही; पण सारा दिवस धडपड करून दमले-भागलेले भाऊ शिबिरात आले की चिमाला दोन तरी अक्षरे शिकविल्याशिवाय रहात नसत. चिमा ताक पीत नसे. भाऊ शिबिरात असले की, तिला आपल्याबरोबर जेवायला बसवून बळेच ताक प्यायला लावीत. चिकु यांच्या अक्का पाटीलच्या घरी 2-3 दिवस राहून सेवा दलाच्या स्त्री कार्यकर्त्यांना जे साधता आले नाही ते भाऊंनी केले. अक्काताईच्या दोघी भावजयांना भाऊंनी लिहायला वाचायला शिकवण्याची सुरुवात करून दिली. पुढे भाऊंना त्यांची आलेली पत्रे मी पाहिली आहेत.

भाऊंचे हे सारे निरभिमान, साधे जीवन दिसायला सामान्यच दिसते या पण सामान्य जीवनापाठीमागेच भाऊंचे असामान्यत्व दडले आहे. ते नसते तर भाऊंच्या हातून सेवा दलासारखी मोठी संघटना उभारण्याचे आणि शेकडो तरुणांना तयार करण्याचे काम झालेच नसते.

Tags: Nana Dengle नाना डेंगळे Eksashti Ansuya Limye Bhausaheb Ranade एकसष्टी अनसूया लिमये भाऊसाहेब रानडे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी