डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

डॉ. अंत्रोळीकरांचे स्मरण अनिवार्य

डॉ. अंत्रोळीकर हे स्वातंत्र्य चळवळीतील एक लक्षणीय व्यक्तिमत्त्व. 1930 साली त्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यात चार दिवस ब्रिटिश सत्ता झुगारून देऊन जनतेने स्वातंत्र्य उपभोगले होते. या गुन्ह्याला फाशीची शिक्षा होण्याचाही संभव होता. त्यांच्या साहसी जीवनाबद्दल नानासाहेब गोरे यांनी 'समर्पण 'मध्ये लिहिलेला हा लेख डॉ. अंत्रोळीकरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुनर्मुद्रित करीत आहोत.

येरवड्याच्या तुरुंगात आज सकाळपासून काहीतरी निराळीच गडबड सुरू होती. अधिकाऱ्यांची धावपळ चालली होती. तुरुंगात येरवडा तुरुंगात चैतन्य पसरविले होते. बंदोबस्त वाढविण्यात आला होता. तुरुंगातील राजकीय कैद्यांत मात्र एक प्रकारचे औत्सुक्य निर्माण झाले होते. या साऱ्या कैद्यांचे लक्ष आज तुरुंगात येणाऱ्या एका व्यक्तीवर केन्द्रित झाले होते. ती व्यक्ती म्हणजे सोलापूरच्या 1930 च्या महान स्वातंत्र्य लढयाचे थोर नेते डॉ. अंत्रोळीकर हे  होत. डॉ. अंत्रोळीकरांना पाहण्यासाठी सारे राजबंदी आतुर होते. 1930 च्या स्वातंत्र्यलढयात सोलापूरने चार दिवस ब्रिटिशांची सत्ता झुगारून देऊन स्वातंत्र्य उपभोगले होते. या लढयाचे नेतृत्व करणारे डॉ. अंत्रोळीकर यांना पाहण्यासाठी राजबंदी अधीर झाले होते. सोलापूर शहरातील 1930 च्या राष्ट्रीय चळवळीमुळे सर्व देशाचे लक्ष सोलापुरवर केन्द्रित झाले होते. सोलापुरातील या महान लढयाचे नेतृत्व डॉ. अंत्रोळीकर यांच्याकडे होते. त्यामुळे त्यांचा लौकिक सर्वत्र पसरला होता. त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली होती. 

त्यातच या स्वातंत्र्यलढयाबद्दल त्यांना सोलापूरच्या चार हुतात्म्यांबरोबर फाशी देण्यात येईल अशा वार्ताही सर्वत्र पसरल्या होत्या या चळवळीत अटक करण्यात आल्यानंतर डॉ. अंत्रोळीकरांना येरवड्याच्या तुरुंगात आणण्यात आले आणि तेथेच स्थानबद्ध करण्यात आले. अत्यंत कडक बंदोबस्तात डॉ. अंत्राळीकरांना तुरुंगात आणण्यात आले. तशाच कडेकोट बंदोबस्तात त्यांना तुरुंगातील खोलीकडे नेण्यात येत होते. उंच आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व, बलदंड धिप्पाड शरीरयष्टी, पिळदार मिशा, खादीचा शुभ्र पोशाख या स्वरूपात झालेले त्यांचे दर्शन खरोखरीच स्फूर्तिदायक होते. आपणही कदाचित याच येरवडा तुरुंगात फाशी जाऊ, याची त्यांना पूर्ण कल्पना असावी. पण त्याबद्दल थोडीसुद्धा खंत त्यांच्या चेह-यावर दिसून येत नव्हती. 'फाशी हे स्वातंत्र्याचे मोल आहे. ते कोणी तरी दिलेच पाहिजे. त्याशिवाय मातृभूमी परदास्यातून मुक्त होणे शक्य नाही, याची जाणीव डॉक्टरांना झालेली असावी. ते मोल देण्याच्या भावनेनेच पूर्ण तयारीने त्यांनी येरवडाच्या तुरुंगात प्रवेश केला होता. 

डॉक्टरांना ओळखणाऱ्या एका राजबंद्याने त्यांना पाहताच, 'डॉ. अंत्रोळीकर झिंदाबाद' अशी उत्स्फूर्त घोषणा केली. या घोषणेने मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी फासावर जाण्याच्या तयारीत आलेल्या या नेत्याच्या अस्पष्ट का होईना झालेल्या दर्शनाने राजबंद्यांचे डोळे पाणावले होते. पण त्याचबरोबर त्यांच्या डोळ्यांचे पारणेही फिटले होते. डॉक्टरांची येरवडा तुरुंगातील पहिली भेट खचितच स्फूर्तिदायक होती. सर्वत्र त्यांच्याबद्दल आदराबरोबर च अभिमानाची आणि आपुलकीची भावना निर्माण झाली होती. ही भावना वाटेल त्याबद्दल निर्माण होत नसते. ती महान त्यागाची परिणती आहे. 1930 च्या राष्ट्रीय लढयापूर्वी डॉ. अंत्रोळीकर यूथ लीगच्या चळवळीत सामील झाले होते. मुंबई राज्यात या चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या महान नेत्यांत त्यांचा समावेश होता. या यूथ चळवळीमुळेच एस. एम. जोशी यांच्याशी त्यांचा दृढ संबंध आला आणि शेवटपर्यंत तो हढ ऋणानुबंध तसाच राहिला. दोघांनाही परस्परांबद्दल नितांत आदर वाटत असे. ही परस्पर आदराची भावना नेत्यांतून आज नष्ट झाली आहे. 

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस संघटनेचा प्रभाव महाराष्ट्रात हळूहळू वाढू लागला. सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेचे नेतृत्व डॉ. अंत्रोळीकर यांच्याकडे आले. त्या वेळी ज्ञानाला त्यागाला किंमत होती. त्यागी आणि ज्ञानी व्यक्तींकडेच नेतृत्व साहजिकपणे जाई. आता परिस्थिती बदलली आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील कांग्रेस आणि स्वातंत्र्यानंतरची कॉंग्रेस यांत फार फरक आहे. पूर्वीच्या काँग्रेसमध्ये चैतन्य होते. आता फक्त  चैतन्याचा देखावा आहे. स्वातंत्र्यूर्व काळात प्रत्येक तालुक्यात पाच-दहा कॉंग्रेस कमिट्या असत. या कमिट्या हाच खरा काँग्रेस संघटनेचा आधार होता. काँग्रेसची पाळेमुळे अगदी खेडयापर्यंत पसरली होती. आज सर्वत्र 'अ‍ॅडहाकीझम' पसरला आहे. पूर्वी देशकार्यासाठी त्याग केला जात होता. आज दुसऱ्याच्या त्यागावर स्वतःचे कार्य (स्वार्थ) केले जात आहे. काँग्रेसच्या नावावर आज सर्वत्र हेच कार्य केले जात आहे. 

स्वातंत्र्यपूर्व काळात शंकरराव देवांकडे काँग्रेसचे नेतृत्व होते. डॉ. अंत्रोळीकर शंकरराव 'देवां’ चे कधी भक्त बनले नाहीत. पण त्याचबरोबर नेतृत्व स्पर्धेपासून ते अलिप्त राहिले. सत्ता-स्वार्थापासून अलिप्तता हाच मुळी डॉक्टरांचा पिंड होता तो शेवटपर्यंत त्यांनी जोपासला. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस फुटली काँग्रेसचे त्यागी, ज्ञानी नेतृत्व संपुष्टात आले. नवे नेते 'पेपर टायगर' होते. लोकशिक्षण हे स्वातंत्र्य चळवळीतील काँग्रेसचे महत्त्वाचे कार्य होते. डॉ. अंत्रोळीकरांना लोकशिक्षणाच्या कार्यात विशेष रस असे. ते मोठ्या उत्साहाने लोकशिक्षणाच्या कार्यात सहभागी होत. येरवड्याच्या तुरुंगातील भेटीमुळे डॉक्टरांशी दृढ संबंध प्रस्थापित झाले. नियमितपणा, नित्य व्यायाम, शिस्तप्रियता, वाचनाचा व्यासंग, ज्ञानपिपासा इत्यादी गुणांमुळे डॉक्टरांबद्दल पहिल्यापासून आदराची भावना निर्माण झाली होती, ती शेवटपर्यंत तशीच होती. 1931 सालाप्रमाणे 1940 आणि 1942 च्या चळवळीतही आम्ही दोघे येरवड्याच्या तुरुंगात एकत्र होतो. 

1931 च्या तुरुंगवासानंतर सुटून आल्यावर डॉक्टरांनी कामगार चळवळीत लक्ष घातले. पण या चळवळीबाबतचा त्यांचा दृष्टिकोन विधायक होता. कन्स्ट्रक्टिव्ह अ‍ॅप्रोच सह ते या चळवळीत सहभागी झाले. त्या वेळचा कामगार व्यसनी, कर्जबाजारी होता. या दोन्ही संकटांतून कामगारांना मुक्त केल्याशिवाय त्यांची उन्नती होणार नाही अशी डॉक्टरांची प्रामाणिक भावना होती. नवसमाज रचनेच्या ध्येयाने ते कामगार चळवळीत पडले. डॉक्टरांच्या नेतृत्वाखालील कामगार चळवळीत भाग घेण्यासाठी मी मुद्दाम सोलापूरला गेलो होतो. स्वातंत्र्यपूर्व काळात डॉक्टरांचे घर सर्व सामाजिक आणि राजकीय चळवळींचे प्रमुख केन्द्र होते. या क्षेत्रांत काम करणारी सर्व मंडळी डॉक्टरांच्याच घरी मुक्कामाला असत. डॉक्टर व त्यांच्या पत्नी या सर्व कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रेमाने, आपुलकीने आदरातिथ्य करीत. त्यामुळे त्यांच्याबद्दलची आदराची भावना सतत वृद्धिंगत होत असे. 

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात फार निराळी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशासाठी त्याग करण्याची पूर्वीची राष्ट्रीय भावना संपली आहे. आजच्या राजकारणात त्यागाऐवजी सत्तेला अधिकाराला महत्त्व प्राप्त झाले आहे. आपण देशाला काय व किती देऊ शकतो ही भावनाच नष्ट झाली आहे. आज सध्या समाजजीवनातील ही महाभयंकर उणीव आहे. स्वतंत्र भारताला कशा तऱ्हेचा आदर्श नागरिक हवा याचा विचार होणे आवश्यक आहे. पण तसा विचारच कोणी करीत नाही. देशाच्या हिताच्या विचाराऐवजी आज स्वार्थाला प्राधान्य दिले जात आहे. राजकारणात पूर्वीही मतभेद होते पण त्याबरोबरच आदराची भावनाही होती. पण आज मतभेदाला मत्सराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ही अत्यंत धोक्याची बाब आहे. समाजात स्वार्थ, चारित्र्यहीनता, मत्सर, गुंडगिरी या प्रवृत्ती वाढू लागल्या तर स्वतंत्र भारत सुधारणार कसा? आजच्या या पार्श्वभूमीवर डॉ.अंत्रोळीकर यांच्यासारख्या त्यागी, ज्ञानी, समाजहितदक्ष, देशभक्त नेत्याची वरचेवर आठवण तीव्रतेने होणे साहजिक आहे.

Tags: शंकरराव देव डॉ.अंत्रोळीकर महात्मा गांधी एस. एम. जोशी नानासाहेब गोरे Shankararao Dev Dr. Antrolikar Mahatma Gandhi S.M. Gore Nanasaheb Gore weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ना. ग. गोरे

स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी कार्यकर्ते, लेखक, वक्ते आणि विचारवंत


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके