डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अस्वस्थ जग : सार्वभौमत्वाची पुनर्व्याख्या आवश्यक

सुप्रसिद्ध समाजवादी विचारवंत श्री. नानासाहेब गोरे यांनी नुकतेच अमेरिकाभेटीसाठी प्रयाण केले. नव्या राष्ट्राध्यक्षासाठी अमेरिका सज्ज होत आहे. या पार्श्वभूमीवर श्री. गोरे यांनी पाठविलेला हा पहिला लेख

25 ऑगस्टच्या रात्री साडेअकरा वाजता आमचे विमान उड्डाण करणार होते. विमानाच्या कॉकपिटमधून आवाज ऐकू आला की उड्डाणासाठी विमान तयार आहे पण कोणी एक उतारू अजून यायचा असल्याने उड्डाणाला थोडा उशीर होईल. 15 मिनिटांनी पुन्हा तोच संदेश ऐकायला मिळाला. मी मनात म्हटले की विमान ब्रिटिश एअरवेज असो की आणखी कोणाचे असो, त्याला हिसका दाखवणारा कोणीतरी भारतीय व्हीआयपी शेवटी निघालाच! विमानामध्ये मला झोप लागत नाही म्हणून कल्पनेच्या भराऱ्या मारण्यावर कसलेच बंधन नसते. 

विमानाने दोन-अडीच तासांचा प्रवास केला होता, त्यावरून मी कल्पना केली की आपले विमान आता बहुतेक इराकच्या आकाशातून मार्ग कापीत असेल आणि मला एकदम जाणवले की ऑगस्टच्या 26 तारखेपासून इराकी वायुसेनेतील विमानांनी 32 अक्षांशाच्या खाली असलेल्या भागावर संचार करू नये, केल्यास युनोतर्फे अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स यांची लढाऊ विमाने इराकी विमानांचा संचार बंद पाडतीत असा जो इशारा दिला होता तो उद्यापासून अमलात येणार होता. या इशाऱ्याचे कारण म्हणून असे सांगितले जात होते की सद्दामची लष्करी विमाने 32 अक्षांशाखाली राहणाऱ्या इराकमधील शिया पंथीय मुसलमानांवर जे हल्ले चढवीत आहे त्यांपासून त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी युनोने अमेरिका आदीकरुन राष्ट्रांवर टाकलेली आहे, म्हणून हा निर्वाणीचा इशारा. 

सद्दामने वर्षापूर्वी जवळजवळ याच सुमाराला शेजारच्या कुवेतवर हल्ला करून मोठ्या माशाने लहान मासा गिळून टाकावा त्याप्रमाणे कुवेतला गिळून टाकले होते. त्याही वेळी अमेरिकनेच पुढाकार घेऊन, सद्दाम हुसेन कुवेतवरचा आपला ताबा सोडण्यास तयार नाही असे पाहून इराकी लष्करी दलावर जबरदस्त हवाई हल्ले चढवले होते आणि सद्दामला कुवेती प्रदेश ओकायला भाग पाडले होते. पण त्यावेळची कारवाई आणि 26-8 पासून सुरू होणारी ही कारवाई यामध्ये मूलभूत फरक आहे. तो असा की, 90 साली सद्दामने कुवेतवर जे उघड उघड आक्रमण केले होते ते हटवायचे होते. 

त्यामुळे इराकच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न तेव्हा उद्भवला नसता. पण या वेळी तो उपस्थित झाला आहे. कोणत्याही राष्ट्राच्या भूप्रदेशाच्या खालची जमीन ज्याप्रमाणे  त्या राष्ट्राच्याच मालकीची मानली जाते त्याचप्रमाणे त्या भूमीवरील आकाशही त्याच्या मालकीचे समजले जाते. त्या दृष्टीने पाहिले तर या निर्णयामुळे इराकवरील आकाशाची फाळणी झालेली असून 32 अक्षांशाच्या वरचे आकाशही इराकच्या लष्करी विमानंना कुर्दी जमातीच्या छळाची सबब सांगून बंद करण्यात आले आहे. याचा अर्थ असा की इराकचे सार्वभौमत्व केवळ 32 अक्षांश ते 26 अक्षांशांच्या दरम्मान असलेल्या आकाशापुरते मर्यादित झाले आहे. ही घटना निश्चितच गंभीर म्हणायला हवी.

कायदेशीर दृष्टीने पाहिले तर इराकच्या सार्वभौमत्वाला असह्य अशी बंधने घातली गेली आहेत. पण सार्वभौमत्वाची व्याख्या तरी काय? त्याचा अर्थ असा की कोणत्याही राष्ट्राचा कारभार त्या त्या वेळी ज्या कंपूच्या हाती असेल त्याने राष्ट्रातील प्रजेला मन मानेल तसे राबवावे, छळावे, कोठेही हलवावे, वेळप्रसंगी त्यांची काही ना काही सबबीवर कत्तलही करावी! आश्चर्य असे की सद्दाम हुसेन ज्यांचा छळ करीत आहे ते धर्माने मुसलमानच आहेत. पण शिया पंथी आहेत. 36 अक्षांशाच्या वरच्या भूमीवर जे लोक राहतात ते कुर्द जमातीचे लोकही इस्लाम पंथीय आहेत. 

स्वतः सद्दाम आणि त्याचा मित्रपरिवार सुन्नी मुसलमान आहेत. म्हणजे मुसलमानांचा छळ मुसलमानांकडूनच होतो आहे. एका धर्माचे लोक एकमेकांचा विध्वंस करू पाहतात, हे अफगाणिस्तानातील चालू घडामोडींकडे लक्ष दिले तरी ध्यानात येईल. अशा परिस्थितीत सार्वभौमत्वाच्या प्रश्नाचा फेरविचार होणे अपरिहार्य ठरते.

सार्वभौमात्वाच्या कल्पनेमध्ये 'प्रजानां विनया धानात्। रक्षणात् मरणादपि' या कल्पनांचाही अंतर्भाव करायला हवा असे मला वाटते. या उदात्त हेतूने आज सद्दाम हुसेनला त्याची जागा दाखवू इच्छिणारी राष्ट्रे प्रेरित झालेली आहेत असे येथे सुचवायचे नाही. हे सगळे रक्तलांच्छित सबकारण ना कुर्दसाठी, ना शिया पंथीयांसाठी तर ते तेलासाठी आहे हे मी जाणतो! परंतु सद्दामसारख्या हुकूमशहांना आवर घालणारी शक्ती जगात निर्माण होण्याची गरज आहे याविषयी शका नाही. सार्वभौमत्व म्हणजे शासनाचा मोकाटपणा, असे समीकरण जगामध्ये कदापि रुढ होता कामा नये!

आमचे विमान लंडनच्या हिथ्रो विमानतळावर पोचले तेव्हा पहाटे पाचचा सुमार असावा. रात्रीचा दिवस कोणाला पाहायचा असेल तर त्याने अशा विमानतळाला भेट द्यावी. सगळीकडे नुसता लखलखाट होता. पण माझ्या दृष्टीने महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे निरनिराळी वर्तमानपत्रे पाहावयास मिळाली. राजघराण्यातील प्रेमप्रकरणे हा विषय इतका बहुचर्चित आहे की टाइम्स अथवा गार्डियन यांच्यासारखी उच्चभ्रू समजली जाणारी वर्तमानपत्रेसुद्धा तो टाळू शकत नाहीत. त्यांवर अनेकांकडून मतप्रदर्शनही होत असते. गार्डियनमधील (पूर्वीचा मँचेस्टर गार्डियन) एका पत्रकाराने मोठा मार्मिक प्रश्न उपस्थित केला होता. 

त्याने विचारले होते की राजघराण्यातील या अनैतिक किंवा विवाहबाह्य प्रश्नावर एवढ्या हिरीरीने लिहिणाऱ्यांनी स्वतःचे वर्तन तपासून पाहिलेले बरे. शिवाय राजघराण्यातील स्त्रियांकडून असा व्यवहार झाला म्हणून त्याचा एवढा बोभाटा होतो आहे पण असेच वर्तन जर राजघराण्यातील पुरुषांनी केले असते तर त्यावर एवढी चर्चा झाली असती का? अर्थात मला या विषयामध्ये काही रस नसल्यामुळे मी तो विषय तिथेच सोडून दिला.

गार्डियनमध्ये मला आनंददायक वाटणारी दुसरी बातमी होती ती नर्मदा प्रकल्पाची. चांगल्या ठळक शीर्षकाखाली ती बातमी निकी कोर्टवेलिएसी आणि सायमन ह्युजेस यांच्या सहीने एक विज्ञप्ती म्हणून छापण्यात आली होती. निकी हा इंग्लंडमधील ग्रीन पार्टीचा प्रवक्ता असून सायमन ह्युजेस हा पार्लमेंटचा सदस्य आहे. वर्ल्ड बँकेने नर्मदा प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्यासाठी ब्रॅडफोर्ड मोर्स यांच्या नेतृत्वाखाली जी समिती नेमली होती तिच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालावर बोट ठेवून निवेदनात असे म्हटले आहे की या प्रकल्पामुळे एक लक्ष लोक विस्थापित होणार असून त्यांच्या पुनर्वसनासाठी जे स्थान निवडलेले आहे तेथील परिस्थिती धक्कादायक आहे. 

हॉलंडच्या आणि नॉर्वे-स्वीडनच्या सरकारने तसेच युरोपियन पार्लमेंटने या प्रकल्पाला निधी पुरविणे स्थगित करावे असे म्हटले आहे. रिओ येथे हे नुकतेच उच्च स्तरीय जागतिक प्रतिनिधींचे निवेदन प्रसिद्ध झाले आहे त्याचे नेमके विरुद्ध हे वर्ल्ड बँकेचे धोरण असून ब्रिटिश सरकारचे अधिकारी 10 सप्टेंबर रोजी मोर्सच्या अहवालाची चर्चा करण्याचे एकत्र जमले होते.

हे परखड शब्दांतले निवेदन वाचछन मी मनात म्हटले "शाब्बास मेधा! नर्मदा प्रकल्पाचे हे उघडे नागडे स्वरूप जगाच्या वेशीवर टांगण्यात तू यशस्वी झालीस खरी!शाब्बास!" आता वर्ल्ड बँकेचे अधिकारी आणि भारत सरकारचे अधिकारी काय संगनमत करतात ते पाहू या पण मेधाने आपले काम पूर्ण केले आहे यात शंका नाही.

[ 'लोकसत्ता'च्या सौजन्याने ]

Tags: मेधा पाटकर गार्डियन लंडन कुवेत सद्दाम हुसेन इराक नानासाहेब गोरे सार्वभौमत्व Medha Patkar. Guardian London Kuwait Saddam Hussain Iraq Nanasaheb Gore Sovereignity weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ना. ग. गोरे

स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी कार्यकर्ते, लेखक, वक्ते आणि विचारवंत


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके