ह्या मनुष्य लोकात इष्टदेवतेच्या पाषाणमूर्तीपलिकडे काही सुंदर, पावन, रम्य, रोमांचकारी आहे की नाही असा भ्रम पडतो आणि इहलोकी जन्म घेतला हा महामूर्खपणा झाला, परत इहलोकी येणे नको, असा ग्रह होऊन बसतो. सूरदासाचे वेगळेपण मला यात दिसते की, त्याने थोडा वेगळा सूर लावला, वेगळा राग आळवला. संकीर्तन कृष्णाचेच केले पण ते करताना त्याच्या बाल लीलांवर रचना केली आणि ती इतकी रसाळ, इतकी अख्वार, अशी तपशीलवार आणि एवढी उत्कट की आपल्या तोंडून 'वाहवा' असे उद्गार निघालेच पाहिजेत.
भक्तकवी सूरदासाची पंचशताब्दी लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये आम्ही मार्च सतराला साजरी केली. "सूर सूरज तुलसी शशी" अशा शब्दांत सूरदासाची महती, तुलसीवेड्या उत्तर भारतीयांनीदेखील ज्या अर्थी केलेली आहे, त्यावरून सूरदासाच्या प्रतिष्ठेची कल्पना यावी.
हे कबूल केले पाहिजे की "मैय्या मेरी मैं नहीं माखन खायो।" ह्या सूरदासाच्या गीतापलीकडे मला ह्या असाधारण कवीविषयी काहीच माहिती नव्हती; आणि हे गीत तसे माहिती असण्याचे कारण गांधीजींच्या आश्रम भजनावलीत त्यांचा समावेश केलेला आहे म्हणून. माझे हे अज्ञान माझ्या अत्यंत मर्यादित व एकांगी ज्ञानाचे निर्देशक ठरते हे तर खरेच; पण त्याचबरोबर भारतीय भाषांमध्ये आपसात किती अत्यल्प दळणवळण व संपर्क उरलेला आहे, त्याचेही ते निदर्शक आहे.
नामदेवाचे अभंग ग्रंथसाहेबात अंतर्भूत केले गेले, गुरु नानकांनी आसामपासून मक्केपर्यंत यात्रा केल्या आणि रामदासांनी हिंदी रचना केली हे ऐकले की त्या काळात आंतर भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय व आंतरधर्मीय दृष्टी सहज स्वीकारणाऱ्या ह्या विशाल मनाच्या संतांचे कौतुक करावेसे वाटते. माझा मात्र ह्या पंचशताब्दी दिनामुळे फायदा झाला तो असा की मी सूरदासाविषयी इतरांनी लिहिलेले वाचले आणि स्वतःची त्यांची थोडी फार रचनाही चाखली आणि मला एकदम पटले की शृंगाररसात काय किंवा भक्तिरसात काय सूरदासाहून उत्कटतेने लिहिणारे कवी झाले असतील; पण वात्सल्य रसाचे इतके मनोज्ञ वर्णन करणारा कविश्रेष्ठ सूरदासच. 'यासम हाच,' अन्य कोणी नाही. गीर्वाण भाषेत झालेला नाही आणि प्राकृत भाषांतही नाही. कदाचित जगातल्या कोणत्याही भाषेत झालेला नसेल, पण सूरदासाने आळवलेल्या अपूर्व माधुरीच्या वात्सल्यभावाबद्दल जरा नंतर लिहितो.
गबाळग्रंथी कारभार
काय कारण असेल ते असो, आम्हा भारतीयांना काल हे परिमाणच मंजूर नसावे असे दिसते. आमचे तत्त्वज्ञ, महाकवी, भाष्यकार, योद्धे, नृपती, स्थपती केव्हा जन्मले, केव्हा निजधामास गेले, कोठे त्यांचा जन्म झाला, ते किती दिवस जगले, त्यांनी किती वर्षे राज्य केले, कशाचा कशाचा पत्ता म्हणून लागणार नाही. कोणाला सोळा सहस्र बायका होत्या असे लिहिताना लेखक कचरत नाही की कोणी एका राजाने दहा हजार वर्षे राज्य केले किंवा कोणी एका कवीने एक लाख रचना केली, असे विधान करताना त्यांची लेखणी अडखळणार नाही.
सूरदास कबीर, ज्ञानदेव, नामदेव हे तर फार जुन्या काळचे नव्हेत ना? पण त्यांच्याविषयीसुद्धा हा असाच गबाळग्रंथी कारभार! मग दशरथी रामदेवकीनंदन कृष्ण ह्यांच्याविषयी काय सांगावे? त्यांचे भाते अक्षय भरलेले, मनात आले तर विमानानेसुद्धा प्रवास, त्यांच्या अयोध्या- द्वारकेसारख्या राजधान्यांची तटबंदी सोन्याच्या चिपांची, रस्ते बैडूर्याचे आणि फरसबंदी हिरेमाणकांची! अशा ह्या इतिहासाच्या आाणि अरेबियन नाइट्सच्या लोक विलक्षण गल्लतीमधून शोधणाऱ्याने शोधावे तरी काय? खैर इतकीच की आमच्या ह्या राष्ट्रवीरांची, राष्ट्रकवींची व संतांची करणी व वाणी अशी काही सामर्थ्यवान होती की भाकड कथा, अंधश्रद्धा आणि धांदरटपणा यांचे सगळे अडथळे दूर सारून ती आमच्यापर्यंत पोचू शकली आणि आम्हाला सदैव प्रेरणा व तुष्टी देत राहिली.
मराठीच्या गंगोत्रीची धार
बाराव्या तेराव्या शतकापासून पुढची तीन चार शतके महाराष्ट्रातच नव्हे तर सर्व देशभर एक वारे वाहताना आपण पाहतो. इस्लामी धर्म, इस्लामी आक्रमणे आणि इस्लामी राजकीय प्रभुत्वाचा काळ नेमका हाच होता. मग ह्याला केवळ योगायोग म्हणायचे की इस्लामी आक्रमणामुळे जे दणके भारतामधील दृढमूल झाल्याप्रमाणे दिसणाऱ्या संस्कृतीला आणि समाज व्यवस्थेला बसले त्यांचा ह्या नव्या वाऱ्याशी काही संबंध असला पाहिजे असा तर्क करावा? तुझे "ते कस्मात् तस्मात्" माझ्या बाया- बापुड्यांना नको. तू मराठीतून रचना कर. असे चक्रधरांनी आपल्या शिष्योत्तमास सांगितले होते म्हणतात. तेथून मराठीच्या गंगोत्रीची धार स्पष्ट दिसू लागली आणि तदनंतर मराठी भाषा अमृतातेही पैजा लावून जिंकण्याचा आत्मविश्वास दाखवू लागली.
तोच प्रकार भारतात आज ज्या इतर संस्कृतीद्भव भाषा प्रामुख्याने वावरताना दिसतात त्यांच्या बाबतीत झाला. इतर भाषांतील संत- कवीही तोपावेतो, संस्कृतात दडलेले धर्मरहस्य जनसामान्यापर्यंत पोचवण्यासाठी सीतापती रामाचे, गिरिधर नागर कृष्णाचे किंवा युगे अठ्ठावीस विटेवरी उभ्या ठाकलेल्या विठ्ठलाचे संकीर्तन करण्याच्या निमित्ताने जनतेची वाणी-गीर्वाण वाणी नव्हे- राबवली आणि एकदा जनतेच्या नित्य व्यवहारातल्या भाषेत काव्यरचना सुरू झाल्यावर संस्कृतने निर्माण केलेले लेखनाचे व लेखन विषयाचे साचेबंद स्वरूप पालटून त्याचा विविध अंगांनी अविष्कार होऊ लागला. म्हणजे संस्कृत ऐवजी बंगाली, ब्रज, गुजराथी किंवा मराठी भाषा आली. एवढेच झाले नाही तर त्यांच्या काव्यरचनेवर तेथील मातीचा ऐन रंग, रस व गंध चढला.
भले तरी देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे मथा हाणू काठी ।।
ह्या तुकोबाच्या खणखणीत मराठी अभंगवाणीचे रुपांतर संस्कृतमध्ये करण्याचा प्रयत्न करा म्हणजे ते असे काही तरी करावे लागेल.
"यच्छामि सर्व धनं सज्जनाय । खलल्य शीर्षे लगुडप्रहार:" आणि मग माझे म्हणणे नीट लक्षात येईल.
असे भव्योत्कट (!) चित्र पण हा नवा सांस्कृतिक फुलोरासुद्धा काळाबरोबर विटत गेला. एकरंगी, आणि साचेबंद दिसू लागला. सगळ्या संतांच्या काव्यामधला एकसुरीपणा लक्षात येण्यासारखा असतो नाही का?
भारताच्या दास्यत्वाचे, हताशेचे व निरूपायिकतेचे प्रतिबिंबच त्यात दिसत नाही का? ज्या संतकवींची जी कोणती उपास्यदेवता असेल तिच्यासमोर लोटांगण घालून रात्रंदिवस तिच्या रूपाचे, तिच्या भक्तवत्सलतेचे कौतुक करीत राहावे, मोसम कौन कुटिलखल पापी म्हणून स्वतःच्या थोबाडात जोडे मारून घेत राहावे, मला उद्धर म्हणून आपल्या देवतासमोर टाहो फोडीत राहावे, संसाराला वमनप्राय मानावे, असे त्या भव्योत्कट (!) लाचारीचे चित्रच ह्या भक्तिमार्गी काव्यात बहुशा आढळून येते.
त्यामुळे ह्या मनुष्य लोकात इष्टदेवतेच्या पाषाणमूर्तीपलिकडे काही सुंदर, पावन, रम्य, रोमांचकारी आहे की नाही असा भ्रम पडतो आणि इहलोकी जन्म घेतला हा महामूर्खपणा झाला, परत इहलोकी येणे नको, असा ग्रह होऊन बसतो. सूरदासाचे वेगळेपण मला यात दिसते की, त्याने थोडा वेगळा सूर लावला, वेगळा राग आळवला. संकीर्तन कृष्णाचेच केले पण ते करताना त्याच्या बाल लीलांवर रचना केली आणि ती इतकी रसाळ, इतकी अख्वार, अशी तपशीलवार आणि एवढी उत्कट की आपल्या तोंडून 'वाहवा' असे उद्गार निघालेच पाहिजेत आणि आपले मन यशोदेच्या उरासारखे वात्सल्य रसाने तुडुंब दाटून आले पाहिजे.
बाललीला कालिदासादिकांनी वर्णिलेल्या नाहीत असे नाही 'अनियत- रुदित्तस्मितं विराजत।' अथवा 'धन्यास्त मगरजसा मलिनी भवन्ति।' आदि संस्कृत काव्यपंक्तींचे स्मरण कोणाही रसिकाला अशा वेळी झाल्यावाचून कसे राहील? पण शृंगाररसात डुबक्या मारणारे संस्कृत कवी वात्सल्य रसाचे चार थेंब अंगावर पडले न पडले की समाधान पावतात आणि दूर सरतात याचे मला नवल वाटते.
करारविंदेन पदारविंदम्
मुखारविंदे विनिवेशयन्तम्
घटस्य पत्रस्य पुटे शयानम्
बालं मुकुंद मनसा स्मरामि ॥
हे बाळकृष्णाचे वर्णन संस्कृत कवींच्या बालवर्णनाची परिसीमा समजायला हरकत नाही. मराठी कवी तर काय? मराठी प्रदेशासारखीच त्यांची स्थिती. खडकाळी फार, हिरवळ विरळा. याला किंचित अपवाद दोन : एक एकनाथ व दुसरे वामन पंडित. आमचे लावणीकार तसे भारी रसिक, पण त्यांचेही लक्ष बेहोष शृंगारात तळपणाऱ्या मदन तलवारीवर केंद्रित झालेले. वात्सल्याकडे त्यांनीही पाठ फिरवलेली. शृंगाररसाची परिणती शेवटी वात्सल्यरसात होत असते हा नित्याचा अनुभव त्यांना कटू वाटत असावा!!
सूरपदावलीचा प्रथम खंड
आग्र्याच्या सूरस्मारक मंडळाने श्री शिवप्रसाद आगरवाल यांच्याकडून सूरपदावलीचा प्रथम खंड प्रसिद्ध करविला आहे. सूरदासांच्या एकंदर 125 रचना ह्या खंडात संकलित केलेल्या असून, शब्दांचे अर्थ आणि सुगम हिंदी अनुवाद सोबत दिलेला असल्यामुळे पदावली समजायला कोणतीही अडचण पडत नाही. पहिली 25 पदे विनयाची आहेत. म्हणजे त्यातून देवाची नेहमीचीच आळवणी केलेली आहे की माझ्यासारख्या आश्रयहीनाला व पतिताला तूच पैलतीराला ने. इतर संतानी व भक्तांनी ज्या तऱ्हेची आळवणी केली तिच्याहून सूरदासाने यामध्ये काही वेगळे केलेले नाही. तत्कालीन विरुद्ध परिस्थितीच्या चक्कीत पिसल्या जाणाऱ्या जनतेच्या वतीने हे संतकवी बोलताहेत असे वाटते. सूरदात तर त्यातून आंधळा. मग त्याला कितो दीनवाणे वाटत असेल त्याची आपण सहज कल्पना करू शकतो.
पण ह्या विनय पदावलीतून आपण बाहेर पडलो आणि वात्सल्य पदावलीच्या गोकुळात शिरलो की आपल्याला निराळीच सृष्टी दिसू लागते. तटावर कदंब वृक्षांची गर्द सावली असलेली यमुना-कालिन्दी आपल्या नजरेला पडते; गोवर्धन पर्वताच्या आसपास चढणाऱ्या सवत्स धेनू आणि त्यांची राखण करणारी गवळ्यांची पोरे भेटतात आणि त्यानंतर आपण जातो नंदाच्या गौळवाड्यात. पांढरीच्या मधोमध नंदाचा प्रशस्त वाडा आहे.
भले लांब रूंद आंगण आहे त्याला; मग सोपा, सोप्यावर गेलात की आतून दह्याच्या डेऱ्यातून फिरणाऱ्या रव्यांचे घुसळण तरी ऐकू येईल किंवा कोणी तरी अंगाई गीत गाते आहे त्याचे मधूर स्वर कानांवर पडतील. उंबऱ्याच्या बाहेर उभे राहा, चौकटीवर हात ठेवा, आणि जरा आत डोकवा की तुम्हाला तो श्याम सुंदर पाळण्यात पहुडलेला आहे आणि यशोदा त्याला झोपवीत आहे, म्हणजे झोपवण्याचा प्रयत्न झोके देऊन करीत आहे, असे दिसेल. पण आवाज करू नका हं! ती पहा यशोदा ओठावर तर्जनी दाबून तुम्हाला चूप राहण्याची खूण करत आहे. एकदा तिला वाटते की शाम निजला. त्याने डोळे मिटले आहेत. नाही का? पण कुठचा तो खट्याळ असा निजायला. झोपे, ये ग बाई लवकर. माझा शाम तुला बोलावतोय बघ. बघा हं मिटलेत डोळे; नाही उघडलेत!
काही शब्दचित्रे
पाळण्यात निजलेल्या गोपाळ कृष्णापासून तो मथुरेला जाऊन गोकुळाची आठवण काढणाऱ्या कंसारी कृष्णापर्यंतची चित्रे सूरदासांनी आपल्या शब्दांच्या कुंचल्यांनी अशा काही सूक्ष्म छटांनी रंगवली आहेत की मी तर ते जन्मांध होते यावर विश्वास ठेवायला तयार नाही. दुनियेतल्या सगळ्या बालकांचे कौतुक स्वतः पाहून डोळ्यांनी टिपून घेतल्यानंतर त्यांना अंधाराने वेढले असेल कदाचित. पण प्रारंभापासून अंधारात बसलेल्याने इतक्या सजीव रसरशीत रेषांनी रेखाटन करावे हे असंभाव्य वाटते. व्रजाला पारखा झालेला कृष्ण मथुरेत उद्धवाला म्हणतो : ऊधौ, मला व्रजाला विसरता येत नाही रे!"
उधौ मोहिं व्रज विसरत नाही।
हंस सुताकी सुंदर कगरी, अरु कुंजन को छांहीं ।
वै सुरभी वै वच्छ दोहनी, खरिक दुहावन जाहीं।
ग्वाल-वाल मिलि करत कुलाहल नाचत गहि गहि बाहीं।
यह मथुरा कांचन की नगरी
सूरदास सांगतात की इतके बोलून कृष्णा गप्प बसला, त्याला आणखी बोलवेना. खरे आहे. वाचणाऱ्यालाही बोलवत नाही. यशोदेच्या पाळण्यापासून मथुरेच्या राजप्रासादापर्यंतची अशी क्षणचित्रे ही पदावली आपणासमोर अशा प्रकारे बोलक्या शब्दांत उभी करते. त्या चित्रांमध्ये निवडा-निवड करणे कठीण काम असले तरी मला विशेष आवडलेली दोन-तीन शब्दचित्रे वानगीदाखल उद्धृत करण्याचा मोह टाळता येत नाही.
प्रसंग असा आहे की, यशोदा तिच्या मांडीवर किंवा पाळण्यात झोपलेल्या कृष्णाकडे एकटक पहात आहे आणि आपल्या मनातल्या मनात म्हणत आहे :
"नंदरिया गोपाल लाल, तू बेगि बड किन होही!" माझ्या छकुल्या गोपाल लाला तू बेगी बेगी वाढत का रे नाहीस? माझ्या मनातली लालसा जर विचारशील तर मला असं झालंय की तुझ्या हसऱ्या मुखातून बोबडवाणे गोड शब्द मला केव्हा ऐकायला मिळतील? माझ्या अंगणात तू आपल्या पायावर उभा केव्हा राहू लागशील? बलरामाबरोबर तुला खेळताना नंद आणि मी तुला केव्हा पाहू? आणि खेळताना तू दमला असशील म्हणून केव्हा तुला परत जवळ घेऊन पाजू?
"खेलहि हलघर संग रंगरूचि नैन निरखि सुख पाऊ?
छिन छिन क्षुधित जानि-पय-कारन हेंसि हे़ंसि निकट बुलाऊं?"
अशीच एकदा यशोदा पाहत बसली होती, तेव्हा कृष्णाने तोंड उघडले तर तिला दिसल्या दोन शुभ्र दाताच्या कण्या. काय हर्ष झाला तिला! तिने लगेच नंदाला हाक मारली, अहो इकडे येऊन तर पाहा, आपल्या बाळाला दात आलेत, ते पहा दिसले? नंद धावतच आला आणि पहात राहिला. कृष्णाने काही तरी किलबिल करण्यासाठी ओठ उघडले आणि "दूध दंतुलिया तनक तनक" दिसताच नंदाचे डोळेही तृप्त झाले.
आता कन्हैया रांगू लागला. सगळ्या घरभर त्याचे लुटूलुटू रांगणे. असाच एकदा शाम नंदाच्या अंगणात रांगतो आहे आणि नंद, यशोदा उभी राहून ते कौतुक पहात आहेत. मध्येच श्याम मजेत किचाळतो, मग हसत एकदा नंदाकडे पाहातो तर एकदा यशोदेकडे.
कबहुंक दोरो घुटूरयनि लपकत, गिरत, उठत पुनि धार्वरी ।
इततं नंद बुलाई लेन है उतते जननी बुलावेरी ।
दंपती होड करत आपस में, स्थाम खिलौना किन्हीरी ।
बाळ म्हणजे मातापित्याचे खेळणे, त्यावरून दोघांत मग चढाओढ, पैजा. हळू हळू मोहन उठून उभा राहण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याला कोणी तरी थोडा आधार नको का द्यायला? मग नंद त्या श्यामसुंदराचं बोट धरतो.
गहे अंगुरिया ललन की नंद चलन सिखायत । बरवराह गिरी परत है, कर टकि उठावत ।
बार बार बकि स्थाम सौ, कछु बोल बुलावत । दुहुधा द्वै दंतुली भई ,मुख अति छवि पावत।
कबहु कान्ह कर छांडी, नंद पग तुक रिगावत । कबहू धरनि पर बैठी कें मन में कछु गावत।
कबहु उलटी चलै धामको, धुटूरुनि सरी धावत ।
नंद कृष्णाला चालायला शिकवतो आहे. कृष्ण एकदा बोबडा शब्द बोलतो आहे, दोन पावले नंदाचा हात न धरता टाकतो आहे, मग एकदम कृष्ण बैठक मारतो, आणि काही बाही गुणगुणतो. लहर फिरली की उलटा फिरून घराकडे झपाझप रांगत जातो. पण उंबरठा ओलांडायचं कुठं जमतंय; मग पुन्हा परत फिरतो.
आता श्यामनंदन जरा मोठा झाला बर का. एक दिवस आईला म्हणतो कसा, माझी शेंडी बघ किती लांब झाली आहे! मला दहि- पोह्याची शिदोरी गाडग्यात घालून दे बरं. मी मोठा नाही का झालो? गाई घेऊन मी गायरानात जाईन आता. पुढे काही दिवसांनी गायरानात सगळ्या गोपाळबाळांबरोबर कृष्ण जाऊ लागला. तिथं नाना प्रकारचे खेळ. एकदा श्रीदामाची व कृष्णाची कुस्ती लागली. कृष्ण हरला. रूसला- चिडला. चिडका बिब्बा चिडला। तेलात जाऊन बुडाला. त्यांची कोणाला पर्वा. पोरे हरीला खडसावतात कशी ते बघा.
खेलत में को काकी गुसैयाँ।
हरि हारे जीते श्रीदामा, बरबस की कत करत रिसैयाँ ।
जाति पाती हमने बढ नही, नाहीं बसत तुम्हारी छैयाँ ।
अति अधिकार जनावत याते -जाते अधि तुम्हारी गैयां ।
रूहठि करी तातों को खेले, रहे बैठित जह तहें सब ग्वेर्या ।
खेळताना कसलं रूसायचं! तू हरलास, श्रीदामा जितला ही सत्य गोष्ट आहे. मग चिडतोस कशाला? तुझी जात पात काही आमच्याहून उंच नाही की आम्ही तुझे ओशाळ नाही. तुझ्या बापापाशी थोड्या अधिक गायी आहेत, म्हणून काय झालं? असल्या रुसक्या मुलाशी कोण खेळतोय? बसारे आपल्या आपल्या जागी, खेळ बंद." कृष्णाला तरी गोष्ट अशी एकेरीवर यायला नको होती. म्हणून तो म्हणाला बरं बाबांनो मी हरलो आणि खेळ परत सुरू झाला.
गोकुळचा चोर
अशी किती चित्रं मी पेश करणार ह्या टीचभर जागेत? पण आणखी एकच करतो. मैया मेरी मैं नहीं, माखन खायों। हे गाणे अनेकांना परिचित वाटेल पण ते केवळ कानांवरून गेल्यामुळे. त्यातले नाट्य जर लक्षात आले नाही तर त्यातला रसाविष्कार पूर्णपणे चाखता येणार नाही. बालमुकुंदाला दही-लोणी भारी आवडे. ते मिळत का नव्हते? यशोदा म्हणायची, "अरे तुझ्या बापाच्या गोठ्यात लाख गाई आहेत. माझ्याकडे रोज शंभर डेरे दही घुसळतात. घरी तुला काय मी कमी का देते? " यशोदेचे म्हणणे खरंच होतं. पण नंदबाळाला आईची व गोपींची नजर चुकवून लोणी खाण्यात और मजा वाटे. सगळ्या मुलांना वाटते तशी.
एकदा स्वारी सापडली. बलरामदादानीच सांगितली बातमी की तो बघ मुकुंद आता लोणी खातोय. यशोदा हातात काठी घेऊनच घरात गेली. गोकुळचा चोर सापडला. भरल्या तोंडाचा आणि लडबडलेल्या हाताचा. यशोदा कडाडली, "बरा सापडलास. आता कबूल करशील की नाही" आणि तिने काठी उगारली. मुकुंदा खमंगपणे म्हणाला, "मैया मोरी में नहीं माखन खायो." यशोदेने मुकुंदाचा खांदा धरला आणि विचारले, "मग हे हे काय आहे? तोंडावर हातावर?" अग ह्या सगळ्या पोरांनी कट केला. माझ्या तोंडाला, हाताला लोणी फासलं. शिंकी किती उंचावर आहेत बघ. मी केवढासा? माझे हात तरी तिथवर पोचतील का. बघ बरं पोचतात का?" यशोदा थक्क झाली हे चतूर बोलणं ऐकून. तिचा राग कोठच्या कोठे पळाला. हातातली काठी गळून पडली आणि मुकुंदाला तिने प्रेमभराने उराशी कवटाळले.
अशी किती उदाहरणे द्यावीत? रांगणारा कृष्ण, पहिली पावले टाकणारा कृष्ण, धुळीने माखलेला कृष्ण, माती खाणारा कृष्ण, लोणी चोरणारा कृष्ण, चिडका कृष्ण, बोबडा कृष्ण, लबाड कृष्ण. अशी कृष्णाची विविध रूपे रंगवून सूरदासांनी जी एक बालसृष्टीच निर्माण केलेली आहे तिला तोड सापडणार नाही. आणि म्हणे हा कवी अंधळा होता! ज्या पूर्वसुरींनी रामाच्या किंवा कृष्णाच्या बाललीला गायल्या त्यांच्या मनावर ते परमेश्वराचे अवतार होते ह्या कल्पनेचा बोजा कायमचा पडलेला दिसतो. सूरदासाने परमेश्वराचे बालरूप न चितारता जणू बालकांचे परमेश्वररूप चितारले. जसे त्यांनी पुढे राधा-कृष्ण प्रेमात जिवा-शिवाचे परमैक्य पाहिले. यावरून असा एक विचार सुचतो की हा सुफी वाङ्मयाचा तर भारतीय आविष्कार नसेल? बिन्दूत सिंधू पहाणे, प्रेयसीमध्ये परमेश्वर पाहणे हा त्याचा विशेष.
साकी की मुहब्बत में दिल साफ हुवा इतना
की हरकतरे- में दरया नजर आता है।
सूरदास-पदावली वाचताना एक गंमत वाटली. तेवढी नमूद करतो आणि थांबतो. ह्या व्रज भाषेत आणि आपल्या मराठीत अगदी ग्रामीण मराठीतसुद्धा शब्दांचा सारखेपणा किती? लालसा, पाठवते (मै पठवती) सगळे (सिगरे) कावडी (कावरी) माया (मया) दाई (धाय) खेडे (खेरे) विसरत इतकेच काय पण नफा अन्याव- अन्याय ह्या अर्थी- असेही शब्द सूरदास वापरतात. त्या काळच्या भाषा अशा सरमिसळ असल्यामुळेच संत कवींना सगळा भारत आपला मानणे सोपे जात असावे.
सूरदासाच्या काव्यावर आधारलेली फार सुंदर लघुचित्रे (मिनिएचर्स) लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्यूझिअमच्या संग्रही आहेत. त्यांच्या प्रतिलिपि भारत सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने छापून घ्याव्या आणि त्यांचा देशोदेशी प्रचार करावा. यंदाचे आंतरराष्ट्रीय बालक वर्ष आहे ना? सूरदासाने त्याची सिद्धता आधीच करून ठेवलेली आहे. पण योजकस्तत्र दुर्लभः!
Tags: श्रीराम श्रीकृष्ण कालिदास काव्य संत ज्ञानेश्वर Shriram सूरदास Shrikrishna Kalidas Kavya Sant Dnyaneshwar Surdas weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या