डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नानासाहेब गोरे यांच्या निवडक लेखांचा संग्रह 1987 मध्ये वयाच्या 80 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘नारायणीय’ या नावाने साधना प्रकाशनाकडून आला होता. त्यांच्या डझनभर पुस्तकांतून निवडलेले 27 लेख या पुस्तकात आहेत. त्यातील काही ललित आहेत, तर काही वैचारिक. त्याची तिसरी आवृत्ती या आठवड्यात प्रकाशित होत आहे. त्या पुस्तकात ‘तिमिरातून तेजाकडे’ हा विशेष महत्त्वाचा लेख आहे. त्यात त्यांनी आपली वैचारिक घडण कशी झाली हे बहारदार पद्धतीने उलगडून दाखवले आहे. त्या लेखातील काही उतारे निवडून एकसंध वाटेल असा हा लेख येथे पुनर्मुद्रित करीत आहोत. - संपादक
 

आत्मगौरव आणि आत्मसमर्थन हा आत्मकथेचा अविभाज्य भाग आहे. काही कथांतून तो औद्धत्याने पुढे येईल आणि काही कथांतून तो नम्रतेची वस्त्रे ल्यालेला दिसेल, एवढाच फरक! मला त्यांपैकी काहीच करायचे नाही. पण प्रा. ग.प्र.प्रधानांनी जेव्हा मला असा मार्ग सुचवला की- गेल्या ऐंशी वर्षांत तुमचा विचारप्रवाह कसा वाहत गेला, वळणे-वाकणे घेत गेला; त्याचे रेखाटन तुम्हाला करता आल्यास पाहा, तेव्हा मात्र त्यांना नकार देणे मला शक्य वाटले नाही.

परंतु, याचा अर्थ असा नव्हे की, माझ्या ऐंशी वर्षांतील आयुष्यामध्ये जी वैचारिक स्थित्यंतरे होत गेली, त्यांचे रेखाटन करणे सोपे होते. गेली जवळजवळ पन्नास वर्षे मी कधी हौसेने, तर कधी कर्तव्यबुद्धीने अभ्यास करीत आलो आहे; लिहीत आलो आहे. परंतु हे लिहीत असताना वा अभ्यास करीत असताना या सर्वांचा कोठे तरी एक प्रवाह बनला पाहिजे, अशी योजना बुद्धिपुरस्सर आखलेली नव्हती. आता मागे वळून पाहताना मात्र असे दिसते की- या सर्व अभ्यासाचा, चिंतनाचा आणि लेखनाचा एक ओघ सहजपणेच बनत चाललेला होता.

आपल्याला अमुक एक विचारधारा आत्मसात करावयाची आहे, असा निश्चय करून मी कोणत्याही विषयाच्या अभ्यासाला प्रारंभ केलेला नव्हता. माणसे भेटत गेली, प्रसंग घडत राहिले, विचारांचा परिचय होत राहिला. चिंतन सुरू झाले आणि विचारप्रवाहाला दिशा लाभू लागली. आजदेखील ही प्रक्रिया चालूच आहे. 81 व्या वर्षात उभा असूनसुद्धा मी असे म्हणण्याचे धाडस करणार नाही की, मी बुद्ध झालो आहे- मी पोहोचलो आहे! कारण माझ्या मते, कोणत्याही ज्ञानाच्या किंवा विचाराच्या बाबतीत- मग ते ज्ञान अथवा विचार ऐहिक असोत की, पारमार्थिक- पूर्णावस्थेची पायरी ते कधीच गाठू शकत नाहीत! कारण माझ्या पूर्वी अनंत वर्षे, माझ्या अखेरच्या क्षणापर्यंत आणि त्यानंतरही अनंत काळपर्यंत हे जग घडत राहणार आहे, बदलत राहणार आहे आणि त्याच्यासंबंधीचे मनुष्याचे ज्ञानही बदलत, वाढत जाणार आहे, असे मी मानतो. विचारांच्या बाबतीत पूर्णविरामाला माझ्या मते जागाच नसते आणि तशी ती नसावीही. म्हणून जे कोणी वेदांपाशी थांबतात, कुराणापाशी थांबतात, बायबल अथवा ग्रंथसाहेब हा अखेरचा शब्द समजतात, बुद्धं शरणं गच्छामि म्हणतात; त्या सर्वांचीच मला कीव येते. ही सर्व माणसे फार ठेंगण्या मनाची आहेत, असे मला वाटते.

मला स्मरते त्याप्रमाणे माझ्या आयुष्यातल्या पहिल्या दहा-बारा वर्षांत ज्याला विचार असे म्हणता येईल तसे काही अस्तित्वात होते, असे मला वाटत नाही. त्या वेळी महिना पन्नास-साठ रुपये पगार मिळवणारे माझे वडीलसुद्धा सुस्थितीतले समजले जात. यामुळे रस्त्यावरील बत्तीच्या उजेडात बसून मला अभ्यास करण्याची अथवा सदरा रात्री धुऊन सकाळी तोच अंगात घालण्याची स्थिती कधी अनुभवता आली नाही. ‘तुला अभ्यासासाठी जे लागेल ते माग आणि शरीर कमावण्यासाठी जे खावेसे वाटेल ते (फक्त शाकाहारी) खा’- असे वडील मला सांगत आणि त्याहून अधिक काही पाहिजे, असे मलाही वाटत नसे. मुंज झाल्यावर मी त्या वेळच्या रीतीप्रमाणे संध्या, पूजापाठ शिकलो. सुटीमध्ये कोकणात गेल्यावर आमचे उपाध्याय सोवनी आणि मराठे यांच्याकडून पुरुषसूक्त आणि रुद्र यांचे पाठ घेतले. वेदघोष अजूनही माझ्या कानांना गोड वाटतो. मी नियमितपणे सकाळ-संध्याकाळ संध्या करीत असे. संध्याकाळी हरिहरेश्वराच्या दर्शनाला जात असे आणि निजण्यापूर्वी गीतेचा एक अध्याय म्हणत असे. माझ्या गळ्यात जानवे होते. डोक्यावर हातभर लांब शेंडी होती. माझी त्या वेळची वागणूक आजच्या कोणत्याही कडव्या स्वयंसेवकापेक्षा हिंदुत्वनिष्ठ होती! आमच्या घराशेजारून जाणाऱ्या ताबुतांच्या मिरवणुकीकडे फिरकायचेसुद्धा नाही, असे ठरवण्याइतपत मी हिंदुत्ववादी होतो. ‘भाला’ हे माझे आवडते दैनिक होते. सत्यशोधक समाजाचा मी कडवा विरोधक होतो. उपवास, पूजा, तपश्चर्या, इत्यादी परंपरागत आचार-विचारांचा मला मोह होता. प्रथम इंग्रजांची भीती आणि नंतर त्यांचा द्वेष, अशा स्थित्यंतरांमधून मी जात होतो. फार लांबण न लावता, त्या वेळच्या माझ्या मन:स्थितीबद्दल एवढे सांगितले तरी पुरे की, त्या वेळचे माझे क्षितिज हे अगदी मर्यादित, परंपरेशी जखडलेले आणि दुनियेकडे एका अत्यंत लहान अशा गवाक्षातून पाहणारे होते.

माझ्या लहानपणच्या समाजात अंधश्रद्धांचा तर धुमाकूळच होता. भोरचे महाराज, केडगावचे महाराज, माणिकप्रभू, साईबाबा यांचे नाव आणि त्यांनी केलेले चमत्कार सतत कानांवर येत. बाळ गंगाधर टिळकांचा केसरी वाचणारा माणूसही त्या वेळी वीरपुरुष समजला जात असे; मग खुद्द टिळकांना ईश्वरी अवतार असे लोक मानीत होते, याचे नवल वाटण्याचे कारण नाही. त्यातूनच आमचे घराणे टिळकांप्रमाणे चित्पावन ब्राह्मणांचे! टिळकांनी ज्या आगरकरांना ‘माळावरचा महारोगी’ म्हटले, त्यांचे नाव उच्चारणेसुद्धा आमच्या मंडळींत पाप होते आणि जोतिराव फुल्यांचे विचार तर शुद्ध धर्मबुडवेपणाचे विचार मानले जात, हे सांगायलाच नको.

अशा या कुंद व चिरेबंद वातावरणातून मी जो उडालो तो एकदम निरीश्वरवादाच्या तटबंदीविरहित टेंबावर येऊन उतरलो, असा काही चमत्कार माझ्या बाबतीत घडलेला नाही. शेंदराचे थरावर थर जडलेल्या मारुतीची मूर्ती ते कवच एके दिवशी गळून पडले की मूळ स्वरूपात प्रकट होते, तसे माझ्या बाबतीत झालेले नाही. परंपरेमध्ये लपेटलेले माझे मन भोवताली घडत असलेल्या घटना पाहत असावे आणि माझ्या मेंदूच्या पेशींमध्ये काही तरी हालचाल होत राहिली असावी. त्यामुळे काही प्रश्नांचे आकडे आणि तर्कांचे तंतू माझ्या डोक्यात निर्माण होत राहिले असावेत. ही प्रक्रिया नेमकी कोणत्या घटनेपासून किंवा तिथीपासून सुरू झाली, ते नक्की सांगणे माझ्यासाठी कठीण आहे.

मॅट्रिकची परीक्षा देण्याआधीच मी माझ्या इतर वर्गमित्रांच्या मानाने बरेच वाचलेले होते. हॅम्लेट, मॅक्‌बेथ, रोमिओ-ज्युलिएट, ऑथेल्लो या शेक्सपिअरच्या  चार शोकांतिका, वॉल्टर स्कॉटच्या कादंबऱ्या, तुलसीदासाचे संपूर्ण रामायण आणि महाभारताचे मराठी भाषांतर, हरिभाऊंच्या ऐतिहासिक व सामाजिक कादंबऱ्या, अरेबियन नाईट्‌स इत्यादी साहित्य मी अधाशासारखे ओरपले होते. परंतु त्याच्याकडे सामाजिक दृष्टीने पाहण्याचे सामर्थ्य माझ्या ठिकाणी त्या वेळी अजिबात नव्हते. ती शक्ती अथवा ती दृष्टी मला आता आठवते त्याप्रमाणे, प्रथमत: आगरकरांचे निबंध मी वाचू लागलो तेव्हापासून प्राप्त होऊ लागली. चिपळूणकर व टिळक एका बाजूला आणि आगरकर दुसऱ्या बाजूला, असा फरक हळूहळू लक्षात येऊ लागला. सेनापती बापटांच्या नेतृत्वाखाली मुळशीचा सत्याग्रह होत होता, तेव्हा मी इंग्रजी पाचवी-सहावीत असेन. त्या वेळी सत्याग्रह हा शब्द मी प्रथमच ऐकला. जालियनवाला बागेच्या वेळी शेकडो लोकांची कत्तल झाली एवढे ऐकले होते; परंतु त्यातील संघर्षाचा अर्थ मनात रुजला होता, असे म्हणता येणार नाही. जरी 1918 ते 1925 पर्यंतचा काळ निरनिराळ्या घटनांनी इतका भरलेला होता, तरी त्या घटनांचा अर्थबोध होण्याइतपत माझ्या मनाला पक्वता आली नव्हती. मॅट्रिक झालो त्या वेळेपर्यंत मी ब्रिटिश सत्तेचा विरोधी बनलो असलो, तरी मी कोठल्याही अर्थी कोणत्याही चळवळीचा, संघटनेचा किंवा वादाचा स्वीकार केला होता, असे म्हणता येणार नाही. किंबहुना, असेच म्हटले पाहिजे की, एस.एम. अथवा खाडिलकर यांच्यासारख्या वर्गमित्रांच्या मानाने माझे या घडामोडींच्या बाबतीतले ज्ञान अगदी मामुली होते. त्या वेळेपर्यंत मी जोतिबा फुल्यांचे एक अक्षरही वाचलेले नव्हते आणि मार्क्सचे तर नावही ऐकलेले नव्हते. शिवाजी, तानाजी, पहिला बाजीराव, पानिपतची लढाई, 1857च्या बंडातील तात्या टोपे, झांशीची राणी, चापेकर बंधू, सावरकर ही आमची त्या वेळची श्रद्धास्थाने. न्या. रानडे, गोपाळ कृष्ण गोखले या सर्वांना आम्ही ‘मवाळ’ म्हणून निकालात काढीत असू. भारतीय पारंपरिक विचारांमधील आणि समाजव्यवस्थेमधील गुण-दोष, ब्रिटिश साम्राज्यशाहीचे स्वरूप आणि गुणावगुण, भारतामधील वर्ण व जातिव्यवस्था- अशांसारख्या विषयांचे काहीही ज्ञान माझ्यापाशी नव्हते. अभ्यास आणि खेळ यांच्याव्यतिरिक्त कशाचाही ध्यास मला त्या वेळी तरी लागलेला नव्हता.

फर्ग्युसन महाविद्यालयात मी 1925 च्या जूनमध्ये पाऊल टाकले आणि माझ्या मेंदूला विचारांचे पैलू पडायला सुरुवात झाली. या अगोदर मी आगरकरांसंबंधी जो उल्लेख केला, तो या काळातला. फर्ग्युसन कॉलेजमधल्या ‘ओपन शेल्फ लायब्ररी’ने मला घडविले; प्राध्यापकांनी नव्हे, असे म्हणण्यास हरकत नाही. परंपरेने चालत आलेल्या विचारांना बुद्धीच्या कसोटीवर घासून पाहिले पाहिजे, याची जाणीव आगरकरांच्या लेखनामुळे प्रथम उत्पन्न झाली. ‘नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण’ हा भारताच्या परिस्थितीसंबंधी विवेचन करीत असताना चिपळूणकरांनी दिलेला हवाला काही कामाचा नाही, याची जाणीव हळूहळू होत चालली. मी ज्या समाजात जन्मलो व वाढलो, त्याचा भूतकाळ शनिवारवाड्याभोवती घोटाळत होता आणि वर्तमानकाळ गायकवाडवाड्यात सामावलेला होता. परंतु याच्या पलीकडे अफाट जग पसरलेले आहे आणि त्यात निरनिराळ्या तऱ्हेचे समाज, भिन्न-भिन्न विचारप्रवाह व वेगवेगळ्या संस्कृती आहेत, याची जाणीव मला होऊ लागली ती फर्ग्युसनमधील विद्यार्थिदशेत.

मी 1922 वर्षाला महत्त्व देतो ते माझ्या वैयक्तिक विकासाच्या दृष्टीने. देशाच्या दृष्टीने विचार केला, तरीही 1920 मध्ये लोकमान्य टिळकांचे देहावसान होऊन महात्मा गांधींचा उदय झाल्यापासून देशात वेगळ्याच प्रकारचे वारे वाहू लागण्यास प्रारंभ झाला होता, असे दिसते. रशियन क्रांती, जालियनवाला बाग हत्याकांड, असहकार आंदोलन यांसारखी जनमानसाला आलेली उधाणे आपल्या खुणा जनमानसावर उमटवून गेलेली होती. सत्यशोधक चळवळीचा अतिरेक आणि त्यातून निर्माण होऊ लागलेले आत्मसंशोधन या दोन्ही प्रक्रिया त्याच काळामधील. सेनापती बापटांच्या नेतृत्वाखाली मुळशीचा शेतकरी लढा टाटा उद्योगसमूहाविरुद्ध जोरात सुरू झाला, तेव्हा मी इंग्रजी सहावीत होतो. वर्गविग्रह, समाजवाद हे शब्दही आमच्या कानांवरून त्या वेळी गेलेले नव्हते. पण त्या वेळेपासून ‘नच टाटा हा, काटा रुतला हृदयी’ हे ‘कुंजविहारीं’चे शब्द ऐकून माझ्या मनात धनिकांविरुद्ध अढी निर्माण झाली, हे खरे. भांडवलदार, पिळवणूक इत्यादी शब्द माझ्या शब्दकोशात सामील झाले ते नंतर दहा-बारा वर्षांनी! तुरुंगात कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वाचल्यावर गळ्यातले यज्ञोपवीत मी नाकारले आणि केलाच तर विधवेशी विवाह करण्याचा मी निश्चय केला, तो मी बी. ए. च्या वर्गात असताना. विचाराप्रमाणे आचार हा मंत्र कोणा एका गुरूकडून कोण्या एका मंगल क्षणी स्वीकारला, असे माझ्या बाबतीत घडलेले नव्हते किंवा माझ्या मित्रांमध्ये ह्या विचारपरिवर्तनाला उपकारक अशी काही चर्चा होत असे, असेही नाही. माझ्या नजीकच्या मित्रांपैकी एकानेही जातिप्रथांचा बुद्धिपुरस्सर त्याग केलेला नव्हता. म्हणून माझ्या वाचनामधून आणि चिंतनामधूनच मी हे निर्णय घेत गेलो, असे मी म्हणतो. माझ्या विचारांची गती मंद असते, पण ती निश्चित असते.

आताच मी कम्युनिस्ट मॅनिफेस्टोचा उल्लेख केला, परंतु तो वाचनात येण्याच्याही आधी मी आगरकरांचे बहुतेक लेख वाचले होते. हरिभाऊ आपट्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांप्रमाणेच त्यांच्या सामाजिक कादंबऱ्या माझ्या वाचनात आल्या होत्या. रविकिरण मंडळाचे नवे काव्य आम्ही आवडीने वाचत असू. वामन मल्हार जोशी यांची रागिणी ही कादंबरी तर आमच्या अभ्यासक्रमातच अंतर्भूत होती. या वाचनातून माझे सामाजिक मन आकार घेत गेले असले पाहिजे. पण एवढे सगळे होईपर्यंत 1930 वर्ष उजाडले होते. संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रस्ताव रावीच्या तीरावर काँग्रेसने मान्य केला होता आणि गांधीजींनी मीठ सत्याग्रहाची हाक दिली होती. मनात वादळ उठू लागले होते, कसली तरी हाक ऐकू येत होती; परंतु स्वातंत्र्याचा ठराव किंवा मीठ सत्याग्रहाची हाक काय- त्यांचा आवाका मला पूर्णपणे समजला होता, असे म्हणणे बरोबर ठरणार नाही. पण त्या आवाहनामध्ये आपल्या पौरुषाला आवाहन करण्याची धमक आहे, देशाला चहूबाजूंनी वेढून बसलेल्या ब्रिटिश सत्तेच्या तटबंदीला भेदण्याची शक्ती आहे, सामान्य जनतेला प्रेक्षकाची भूमिका सोडून कर्तृत्वाची दिशा दाखविण्याचे बळ त्यात आहे, असे मात्र मला वाटले. म्हणून त्या हाकेला मी उत्तर दिले आणि चार महिन्यांची येरवडा तुरुंगवासातली पहिलीवहिली सजा भोगून, चक्की दळून, ‘नमक की रोटी’ची सजा (‘नमक की रोटी’ ही तुरुंगातली एक कडक शिक्षा. कैद्याला केवळ भरपूर मीठ घातलेली भाकरी दोन्ही वेळेला खाऊन राहावे लागते.) भोगून बाहेर आलेला मी, पूर्वीचा राहिलो नाही. त्या चार महिन्यांत सुरवंटाचे फुलपाखरू बनले होते. मानवतावादाची पदवी घेऊनच मी येरवडा तुरुंगातून बाहेर पडलो म्हणा ना!

‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ मी याच सुमारास केव्हा तरी वाचला. मार्क्सच्या त्या प्रतिपादनाने जो ठसा माझ्या मनावर आणि वृत्तीवर पडला, त्याला माझ्या जीवनात तोड नाही, हे मला नि:संकोचपणे सांगावेसे वाटते. त्या पुस्तकाच्या वाचनाने माझे विचार बदलले; केवळ एवढेच नव्हे तर, त्यामुळे माझी विचारप्रक्रियाच बदलून गेली. तो निर्जीव प्रबंध नसून झंझावात होता. मार्क्सने मला मार्क्सवादी बनविले नाही, पण बुद्धिवादी बनविले असे म्हटले तरी चालेल. भारतातील सामाजिक, आर्थिक, राजकीय व आध्यात्मिक विचार करण्याची जी काही परंपरा मला ठाऊक होती, तिच्यापासून मार्क्सने मला वेगळे केले आणि कोणत्याही घटनेकडे, धर्माकडे, तत्त्वज्ञानाकडे अथवा समाजाकडे सर्वस्वी निराळ्या अशा दृष्टिकोनातून कसे पाहावे ते शिकवले.

मार्क्सवादाचा पूर्णतया स्वीकार मी प्रारंभीची काही वर्षे केलाही होता आणि सोव्हिएत व्यवस्था ही एक आदर्श व्यवस्था आहे, असेही आम्हा कित्येकांना वाटत होते. परंतु त्या भ्रमातून आमची सोडवणूक करण्याच्या बाबतीतले मोठे श्रेय स्टालिनला दिले पाहिजे! स्टालिनची प्रदीर्घ राजवट हा प्रदीर्घ स्वप्नभंगाचा किंवा आमच्या पुन:प्रबोधनाचा एक भाग होता, असेही म्हणावयास हरकत नाही. रशियातील नामवंत गणल्या गेलेल्या आपल्याच कम्युनिस्ट सहकाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचे आरोप ठेवून त्यांना जीवे मारण्याचे सत्र जेव्हा स्टालिनने रशियात सुरू केले, तेव्हा या भ्रमनिरासाला प्रारंभ  झाला. ट्रॉट्‌स्कीला तर त्याने केव्हाच देशोधडीला लावले होते. पण तोपर्यंत ट्रॉट्‌स्की जिवंत तरी होता. परंतु बुखारिनसारखे मोठमोठे तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, सेनानी अशांच्या आहुती जेव्हा त्या सत्रात शेकड्यांनी पडू लागल्या, तेव्हा माझ्या मनातल्या मार्क्सवादाला चांगला हादरा बसला. कामगारांच्या एकाधिपत्याखाली देश आला म्हणजे सर्व प्रश्न मिटतील, अशी जी एक धारणा आम्हा नवशिक्या मार्क्सवाद्यांच्या मनात रूढ झालेली होती, तिची मुळेच यामुळे कुरतडली जाऊ लागली. कै. बेडेकर, फडके वकील आणि मी  हुजूरपागेसमोरच्या फडक्यांच्या कचेरीत अनेकदा जमत असू. त्या वेळी मी काँग्रेस समाजवादी पक्षात होतो, फडके कम्युनिस्टांचे सहयात्री होते, तर बेडेकर कट्टर मार्क्सवादी होते. मला हे स्पष्ट दिसत होते की, स्टालिनची राजवट इतकी रक्तपिपासू ठरेल अशी आमच्यापैकी कोणाचीही कल्पना नव्हती. त्यामुळे या घडामोडी कानांवर आल्यानंतर मी तर मार्क्सवादापासून चार कोस मागे हटलोच, पण माझे दोघे मित्रही संभ्रमित झाले असल्याचे मी पाहिले. पुढे महायुद्धाच्या काळानजीक जग जसजसे सरकू लागले, तसतशा तर केवळ असमर्थनीय अशा घटना रशियामध्ये घडत गेल्या आणि राजकारणातील कपटनीतीचा स्टालिनने आम्हाला शेवटी कळस करून दाखवला.

महायुद्धाच्या काळातील कम्युनिस्टांच्या उलट-सुलट कोलांटउड्यांबद्दल येथे अधिक लिहिण्याचे कारण नाही; कारण त्यावर हवी तेवढी चर्चा झालेली आहे आणि केवळ त्या काळातल्याच नव्हे, तर सबंध स्वातंत्र्यचळवळीच्या काळातल्या आपल्या चुका भारतीय कम्युनिस्टांनी उशिरा का होईना, कबूल केल्या आहेत. येथे त्या घटनांमुळे मार्क्सवादी विचारसरणीवर काय परिणाम झाला, तेवढेच सांगायचे आहे. माझ्या मनाला जो बोध झाला, त्याचे तात्पर्य एवढेच सांगता येईल की- मार्क्सवाद हादेखील अपुरा वाद आहे.

मार्क्सच्या सिद्धान्ताचा अपुरेपणा फ्रॉईड वाचल्यानंतर जसा माझ्या ध्यानात आला, तसा इतिहासाचा तौलनिक अभ्यास केल्यावरही लक्षात येऊ लागला. उत्पादनसाधनांतून मानवसमाजातील त्या-त्या काळातील संस्कृती, सामाजिक व्यवहार व सामाजिक मूल्ये आकार घेतात- हा त्याचा सिद्धान्त मर्यादित अर्थानेच खरा आहे, असे मला आढळून आले. इलियड आणि रामायण यांमधून व्यक्त झालेली सांस्कृतिक मूल्ये ही त्यांमधील उत्पादनसाधनांतील साम्य लक्षात घेतल्यावर फारच वेगळी असल्याचे दिसून आले. अकिलीजचे त्याने हेक्टरचा युद्धात वध केल्यानंतरचे वर्तन, ट्रॉय शहराचा पाडाव केल्यानंतर तिथे ग्रीक सैन्याने घातलेला धुमाकूळ आणि रावणाला मारल्यानंतर रामाने ‘मरणान्तानि वैराणि’ म्हणून रावणाचा केलेला विधिपूर्वक अंत्यसंस्कार, लंका लुटण्याचे तर राहोच, पण लंकेत पाऊल टाकण्यासही रामाने दिलेला नकार- जवळपास एकाच प्रकारची उत्पादनसाधने असूनही मनुष्याने जोपासलेली सामाजिक मूल्ये किती भिन्न असू शकतात, त्याचीच ही बोलकी उदाहरणे नव्हेत काय?

एकीकडे मार्क्सवादाची छाप माझ्या मनावर उमटत असताना, दुसरीकडे गांधींच्या विचारसरणीचीही ओळख स्वानुभवामुळे अधिकाधिक पटत चालली होती आणि माझ्या जिज्ञासू मनाला असे वाटू लागले होते की, मार्क्सवाद हे जसे भांडवलशाहीवरचे एक भाष्य आहे, तसेच गांधीवाद हेदेखील एका निराळ्या दृष्टिकोनातून भांडवलशाहीवर केलेले भाष्यच आहे. मार्क्सच्या विचारसरणीत वर्ग हा केंद्रस्थानी आहे, तर गांधींच्या विचारसरणीत व्यक्ती- माणूस केंद्रस्थानी मानलेला आहे. कामगारवर्गाचे आधिपत्य स्थापन झाल्यानंतर त्यांच्याकडून अन्याय होणार नाही, ही कल्पना मला भोळसटपणाची वाटते. म्हणजे, हाही मार्क्सने कल्पिलेला एक युटोपियाच नव्हे का? आणि त्या युटोपियातला महान दोष म्हणजे- ती अधिसत्ता जुलूम करू लागली, तर तिला विरोध करण्याचे सामर्थ्य जनतेने कोठून आणावे ते मार्क्सने सांगितलेलेच नाही! या बाबतीत मला गांधींची भूमिका अधिक तर्कशुद्ध वाटली. राजदंड कोणाच्याही हाती असो, त्याचा गैरवापर सत्ताधाऱ्यांकडून घडणे शक्य आहे, हे गांधीजींनी मान्य केले होते; आणि त्यांच्या कल्पनेतील राज्यव्यवस्थेत म्हणजे ‘रामराज्या’तसुद्धा हाती शस्त्रसाधने नसलेल्या पण न्यायप्रिय व्यक्तीला सत्याला अग्रहक्क देण्याचे आणि सत्यासाठी खुद्द शासनाशी झगडण्याचा हक्क देण्याचे त्यांनी मान्य केले होते. क्रांतीची सुरुवात स्वत:पासून झाली पाहिजे, हे त्यांचे वचन तेव्हा मला फार अर्थपूर्ण वाटले होते आणि आजही वाटते. विचार आणि आचार यांत शक्य तेवढी एकवाक्यता असली पाहिजे, हा गांधीविचारसरणीतील आग्रहही मला फार महत्त्वाचा वाटतो.

तरीही मी जसा मार्क्सवादी झालो नाही, तसा मी गांधीवादीही झालो नाही. माझे मत असे बनले की, कोणत्याही ‘वादा’ला व्यक्तीने बांधून घेऊ नये. त्यातील जे काही सार असेल, तेवढे ग्रहण करावे आणि आपली वाटचाल चालू ठेवावी. ‘हिंद स्वराज्य’मध्ये गांधीजींनी जे विचार मांडले, त्यांतले अनेक आणि विशेषकरून यंत्र व तंत्र आणि दंड यांच्यासंबंधीचे त्यांचे विचार मला मान्य होऊ शकले नाहीत. ज्या निरामय, शोषणविरहित आणि दंडविरहित समाजाची ते कल्पना करतात, त्यातील काही गोष्टी मला मान्य आहेत, तर काही नाहीत. ज्या मान्य आहेत, त्यादेखील अंशत: मान्य आहेत. वाफेचे युग, विजेचे युग, अणुऊर्जेचे युग ही सर्व युगे गांधींजी नाकारू पाहतात, याचा अर्थच मला समजत नाही.

ज्या भारताच्या अखंडत्वासाठी गांधीजींनी शर्थीची झुंज दिली, ते अखंडत्व इंग्रजांनी येथे घातलेल्या आगगाडीच्या रुळांमुळे, संदेशवाहक तारांमुळे, मराठे-मोगल व शीख यांच्याजवळच्या हत्यारांपेक्षा जबरदस्त ठरलेल्या काडतुसांच्या बंदुकीमुळे प्रथमत: साकार झाले होते, हे गांधीजींनी मान्य का केले नाही, हे मला समजत नाही. टेनिसनने पाहिलेले ‘फेडरेशन ऑफ मॅन ॲण्ड पार्लमेंट ऑफ द वर्ल्ड’ हे स्वप्न जर कधी काळी प्रत्यक्षात अवतरणार असेल, तर ते सर्व पृथ्वीगोलाला वेढून टाकणाऱ्या विज्ञानाच्या सुदृढ तंतूंवाचून शक्यच होणार नाही. बैलगाडी, चरखा आणि कुदळ-फावड्याची शेती यांच्या आधारावर भारतीय ऐक्यदेखील टिकू शकणार नाही; मग ‘यत्र विश्वं भवति एकनीडम्‌।’ ही कल्पना तर सोडाच! येथे उत्पादनसाधनांवर संस्कृती तोलली जाते, हे मार्क्सचे वचन सार्थ ठरते. परंतु ‘केवळ विज्ञानाच्या आधारे मानवाची बुद्धी ऐक्य साधू शकेल का?’ या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेच मी देईन. कारण विज्ञान हे नेहमीच माझ्या मते समाजमूल्यविहीन असते. ते ज्या बुद्धीच्या बळावर प्राप्त करून घ्यावयाचे, त्याच बुद्धीच्या बळावर समाजहिताला बाधक न ठरता त्याचा वापर करावयाचा असतो आणि त्याच्यावर बंधने घालावयाची असतात. याचसाठी बुद्धाने वा गांधीजींनी सांगितलेल्या करुणेची आवश्यकता मला भासते. एकविसाव्या असो की बाविसाव्या शतकातील असो- मानवाला मार्क्सचा आणि बुद्ध-गांधीजींचा समन्वय साधून आपली प्रगती करावी लागेल, अशी माझी समजूत आहे.

गांधीजींचे यंत्र-तंत्रासंबंधीचे ‘हिंद स्वराज्या’मधील विचार, जे त्यांनी 1946 मध्ये पंडित नेहरूंना लिहिलेल्या पत्रात बदलले नसल्याचा निर्वाळा दिला; मला स्वीकारणे शक्य झालेले नाही. त्याची आणखी काही कारणे आहेत. रेल्वेपासून संसदेपर्यंतच्या सर्व आधुनिक संस्थांचा त्यांनी धिक्कार केलेला आहे. दळणवळणाची आधुनिक साधने व केंद्रसत्ता नाकारल्यावर स्वयंपूर्ण ग्रामसंस्था मान्य करणे ओघानेच प्राप्त होते. अशा ग्रामसंस्था समानतेची व लोकसत्तेची केंद्रे न बनता विषमतेचे शौचकूप बनतील, ही डॉ. आंबेडकरांची टीका विदारक असली तरी वस्तुस्थितीशी जुळती आहे, हे मी मान्य करतो. पण गांधीजींची विश्वस्त-कल्पना मात्र मला पटते. वैयक्तिक सुखोपभोगांना मर्यादा घातली पाहिजे, हा त्यांचा विचारही मला प्रेरक वाटतो. अपत्याची इच्छा असेल तरच स्त्री-पुरुषांनी संभोग करावा, हा विचार मला पुन्हा कमालीचा अव्यवहार्य वाटतो. आधुनिक साधनांनी सज्ज असलेला समाज व समताधिष्ठित समाजरचना यांमध्ये मूलभूत अंतर्विरोध आहे, असे गांधीजींनी का गृहीत धरले होते आणि प्राचीन काळीसुद्धा कधी अस्तित्वात होता की नाही, अशा समाजाची स्वप्ने ते काय म्हणून पाहत होते, हे मला कधीच समजलेले नाही.

उत्पादनसाधनांवरील व्यक्तिगत मालकी नष्ट करावी व ती समाजाच्या मालकीची करावी म्हणजे शोषण होण्याचे थांबेल आणि संपत्तीचे केंद्रीकरण न झाल्यामुळे आर्थिक विषमता नष्ट होईल, असे प्रतिपादन मार्क्सने केले होते; पण उत्पादनसाधने खासगी मालकीतून समाजाकडे वर्ग करायची म्हणजे नेमकी कोणाकडे, त्याचा उलगडा त्याच्याकडून झालेला नव्हता. त्यामुळे समाजाच्या नावाने ती साधने शासनाने आपल्या ताब्यात घेतली. कारखाने, लघुउद्योग व शेती शासनाच्या हाती गेली; पण ती कोणाच्याच मालकीची न राहिल्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला. प्रचंड उद्योग व प्रचंड शेती म्हटली की, त्यांच्या व्यवस्थापनाचा एक वेगळाच प्रश्न ज्याप्रमाणे उत्पन्न होत असतो; त्याचप्रमाणे ‘माझा’ कारखाना, ‘माझी’ शेतीभाती या प्रथमपुरुषी षष्ठीमध्ये जी उद्योगाची व आस्थेची सामर्थ्यवान प्रेरणा दडलेली आहे, ती सामाजीकरण झालेल्या उद्योगात कशी निर्माण करावी, हा प्रश्न निर्माण होतो. मनुष्यामधील ह्या सकाम प्रवृत्तीकडे मार्क्सने दुर्लक्ष तरी केले असावे किंवा त्याला त्याची जाणीवच झालेली नसावी.

समाजविकासाची अंतिम स्थिती म्हणजे दंडहीन समाज. ते मार्क्स आणि गांधीजी या दोघांचेही अंतिम ईप्सित आहे. पण दंडहीन समाजाची कल्पना कधीही प्रत्यक्षात येणार नाही, असे माझे मत आहे. भारतीय दर्शनानुसार सत्त्व, रज व तम असे जर त्रिगुणात्मक जग आहे किंवा ग्रीक दर्शनानुसार मनुष्यात सोने, रुपे व लोखंड यांच्या कमी-जास्त प्रमाणामुळे जर प्रकृतिभेद झालेले आहेत; तर सत्त्व-रज-तमांचे अथवा सोने, रुपे व लोखंड यांचे प्रकटीकरण माणूस म्हणून या पृथ्वीतलावर माणूस नांदेल तोपर्यंत होतच राहणार. जर हे विधान खरे असेल, तर मानवी समूहांच्या व समाजांच्या बाबतीतही ते खरेच मानले पाहिजे; निरपवाद मानले पाहिजे. तेव्हा मानवी समाजाला सौम्य दंडशक्ती व तीव्र दंडशक्ती यातून कोणते तरी एक सहन करावेच लागणार, हे माझ्या मते त्रिकालाबाधित सत्य आहे. दोन माणसे स्नेही म्हणून जरी एकत्र राहू  लागली, तरी त्यांचे संबंध नियमित करावे लागतात आणि असे नियम म्हणजेच दंडाचे सौम्यतम स्वरूप होय. ह्या दोघांची तीन झाली आणि कुटुंब निर्माण झाले की, दंडाचे स्वरूप अधिक स्पष्ट होते. म्हणून दंडविहीन समाज हे एक रमणीय पण अनावश्यक स्वप्न आहे, असे मी मानतो. साहजिकच सत्तेला अस्पृश्य मानण्याची अथवा सत्तेपासून कटाक्षाने दूर राहणाऱ्या यतिवर्गाचीही जरुरी मला वाटत नाही. सत्तेचा हव्यास नसावा तसा विटाळही नसावा. सत्तेनेच केवळ समाजपरिवर्तन घडते असे मानणे जितके चूक, तितकेच सत्तेचा समाजपरिवर्तनाला हातभार लागण्याची आवश्यकता नाही, असा समज करून घेणेही चूक.

1930 पासून 1957 मध्ये आग्वादच्या किल्ल्यातून सुटका झाली, तोपर्यंतचा काळ हा माझ्या आयुष्यातील अत्यंत धामधुमीचा आणि पुरुषार्थाचा काळ. ज्या माझ्या मित्रांनी आणि वडिलधाऱ्यांनी मला वारंवार इशारे दिले होते की, आज जरी तू ईश्वराविषयी साशंक असलास, ‘अज्ञेयवादी’ असे स्वत:ला म्हणवत असलास; तरी पुढल्या आयुष्यात तुझ्यावर असे प्रसंग येतील की, ज्या वेळी तुला ईश्वराचा किंवा तुला सध्या अज्ञात असलेल्या शक्तीचा आधार घ्यावा असे वाटेल. त्यांना मीही तेव्हा प्रांजळपणे सांगे की, ‘मला प्रत्यय आला, तर माझे मत मी बदलण्यास केव्हाही तयार राहीन.’ परंतु आता ती स्थिती पालटलेली आहे. ज्या प्रांजळपणाने मी ही अनाग्रही भूमिका तेव्हा स्वीकारली होती, त्याच प्रांजळपणाने मला आता माझ्या ऐंशीव्या वर्षी- म्हणजे माझ्या पक्व वृद्धावस्थेत, असे ठामपणे सांगावेसे वाटते की, गेल्या साठ वर्षांच्या माझ्या जीवनात अतिशय कष्टमय अथवा दु:खमय परिस्थिती मला अनेकवार प्राप्त झाली असतानाही, मला माझ्या बुद्धीपलीकडचा कोणताही आधार शोधण्याची एकदाही गरज वाटलेली नाही. माझ्यावर परिस्थिती अचानक प्रसन्न झाली अथवा रुष्ट झाली, असे माझ्याबाबतीत एकदाही घडले नाही. ‘तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे अनुभव आले, ते खऱ्या अर्थाने खडतर नव्हतेच किंवा तुम्ही जी कार्ये पार पाडलीत ती पुरेशी अवघडही नव्हती’, असे जर कोणी यावर म्हणाले; तर मला मात्र त्यावर उत्तर देता येणार नाही. कदाचित एवढेच उत्तर देता येईल की- ‘ईश्वराची व आमची गाठ पडण्याचा योगच आमच्या कुंडलीत नसावा!’

असे अनंत प्रश्न आणि त्यांची अनंत उत्तरे. त्यासंबंधी विचार करता मला गौतम बुद्धाचा विचार पटतो. ईश्वराविषयी पृच्छा केली असताना बुद्धांनी सांगितले की, ईश्वरासंबंधी चर्चा करणे म्हणजे वेळ व्यर्थ घालवणे आहे. म्हणूनच शोध करून शिणलेल्या माझ्या मनाने ईश्वरविषयक पृच्छेची कवाडेच लावून घेतली आणि ज्या सृष्टीमध्ये व ज्या समाजामध्ये आपण जगत आहोत, ती सृष्टी व तो समाज यथाशक्ती सुधारण्याचा प्रयत्न करणे हाच मोक्षाचा मार्ग- अशा निर्णयाप्रत मी येऊन पोहोचलो.

पण बुद्धापाशी थांबण्यासही मी तयार नाही, असे जर मी म्हणालो; तर त्यात माझ्याकडून बुद्धाचा अनादर होतो आहे, असे मला वाटत नाही.

समाजातील सदाचारासाठी ईश्वरावरील श्रद्धेची गरज आहे, असा युक्तिवाद फक्त धर्ममार्तंडांनी व प्रेषितांनी केलेला नाही; माझ्या काही ज्येष्ठ आणि परममित्रांनीही ते मत आग्रहाने मांडलेले आहे. ईश्वराविषयी श्रद्धा आणि व्यवहारात अनाचार, पिळवणूक, लांडीलबाडी इथपासून तो दरोडे व लढाया इथपर्यंतचे अनाचार एकत्र नांदत असल्याची गेल्या हजारो वर्षांची साक्ष डोळ्यांसमोर दिसत असताना या मंडळींनी ईश्वर नसला तर सामाजिक नीतिनियम किंवा सदाचरणी प्रेरणा नष्ट होईल असे आग्रहपूर्वक का म्हणत राहावे, ते मला कळलेले नाही; अजूनही कळत नाही. नुकतेच मी बाबराचे चरित्र वाचीत होतो. त्याची ईश्वरावरील श्रद्धा किती प्रगाढ होती, ते त्याच्या रोजनिशीवरून वारंवार दिसून येते. तो जसा योद्धा होता, तसाच रसिक हृदयाचा होता. पशू-पक्षी, वृक्ष-वल्ली, निर्झर-प्रपात, पुष्करिणी-उद्याने ही सर्व सृष्टिनिर्मित व मानवनिर्मित सौंदर्यस्थाने आपल्या दैनंदिनीत टिपून ठेवण्याइतका तो रसिक होता. तो संगीतप्रेमी होता. पण आपला दरारा बसवण्यासाठी गुलाबाची गेंदेदार फुले खुडावीत तशी तो दहा-पाच माणसांची डोकी सहजपणे उडवीत असे आणि शत्रूच्या पराभवानंतर शिक्कामोर्तब करण्यासाठी शत्रूच्या मस्तकांचे बुरूज रचीत असे, असेही त्याची दैनंदिनी सांगते. धर्मावर अविचलित श्रद्धा असणाऱ्यांनी किती सहजपणे अघोरी कृत्ये केली आहेत, याचे दाखले रामायण, महाभारत आदी ग्रंथांमध्ये मिळू शकतील. याचा अर्थ उघडच असा नव्हे काय की, ईश्वरावरील श्रद्धेचा आणि सदाचाराचा काही अविभाज्य संबंध नाही? सदाचाराचे उगमस्थान ईश्वरनिष्ठेमध्ये शोधायचे नसून ते त्या-त्या युगातील समाजधारणेसाठी जे कोणते आचार आवश्यक आहेत, त्यांच्याविषयी तत्कालीन विचारवंतांनी बुद्धिपुरस्सर घेतलेल्या निर्णयांत शोधले पाहिजे. ‘खंडोबाचं चांगभलं’ अथवा ‘जय मल्हार’ म्हणून दरोडे घालणारे दरोडेखोर, सकाळी काकडआरतीला जाऊन किंवा स्नान-संध्या करून दिवसभर गिऱ्हाइकांचा गळा कापणारे व्यापारी आणि पांडुरंगाची सपत्नीक पूजा करून भष्टाचार करणारे मंत्री- ही सर्व नित्याचीच दृश्ये नाहीत का? ईश्वर न मानता मानवाने लाखो वर्षे काढली, ईश्वर मानणारा मानवी समाज गेली काही सहस्रकेच अस्तित्वात आहे. आता परत ईश्वर न मानता बंधुभावाने, समानतेने आणि सदाचाराने वागणारा मानवी समाज अस्तित्वात येऊ शकणार नाही, असे हताश उद्‌गार काढण्याचे मला तरी कारण दिसत नाही. मात्र त्यासाठी ईश्वर न मानताही आपण विश्वप्रेमी बनू शकतो, असे आपल्या आचरणाने दाखवून देणाऱ्या व्यक्तींची गरज आहे. ती गरज पुरविण्याचा प्रयत्न आपण स्वत:पासून केला पाहिजे, हे मी मान्य करतो.

तत्त्वज्ञानाच्या वाटेपेक्षा विज्ञानाची वाट मला पसंत पडते. वास्तविक विज्ञानाची आणि तत्त्वज्ञानाची वाट एकच असावयास हवी. पण तसे घडत नाही, निदान भारतात तरी नाही. कारण भारतीय चिंतकांनी मोक्ष, निर्वाण, नेति-नेति इत्यादी कल्पनांच्या धोंडी मार्गावर टाकून तत्त्वज्ञानाचा पुढचा मार्ग बंदच करून टाकलेला आहे. बुद्धही त्या बाबतीत मला दोषी वाटतो. ‘सर्वं दु:खम्‌ । सर्वं क्षणिकम्‌ । सर्वं नष्टम्‌ ।’ अशी भूमिका घेतल्यावर मानवी पुरुषार्थाला आवाहन किंवा आव्हान शिल्लक उरत नाही. वास्तविक काळ जर अनंत आहे, तर विश्वही अनंतच असणार आणि त्याचबरोबर ज्ञान व विज्ञानही कोठे संपले किंवा थांबले, असे होण्याचे कारण नाही.

विज्ञानाची अशी भूमिका कधीच नसते की, आपण एका क्षणाला जी भूमिका घेतली ती दुसऱ्या क्षणी बदलणार नाही. ज्या प्रेषितांनी असा दावा केला की- आपला शब्द तो अखेरचा, त्यांची बढाई विज्ञानाने खोटी पाडलेली आहे आणि ईश्वराधीन मानल्या गेलेल्या अनेक गोष्टी त्याने मानवाच्या हाती आणून दिलेल्या आहेत. भूमितीमधील रेषा अथवा बिंदू या प्रत्यक्षात व्याख्येप्रमाणे काढून दाखवता येत नसल्या, तरी त्या स्वयंसिद्ध मानल्या जातात; तसे ईश्वराचे बाबतीत करण्याचे कारण आहे, असेही मला वाटत नाही. उलट ईश्वरावाचूनचे जग आणि प्रेषितावाचूनचे जग आजच्या सश्रद्ध जगापेक्षा किती तरी पटीने सुंदर बनवणे माणसाला खासच शक्य आहे. समाजाबाहेर मनुष्य राहू शकत नाही, म्हणून बंधुभाव हवा म्हणजेच अहिंसा हवी; आणि सृष्टीतला किती तरी भाग अजून अज्ञात राहिलेला आहे, तो ज्ञात होण्यासाठी विज्ञान हवे. अहिंसा आणि विज्ञान या दोन साधनांच्या आधारावर मानव समाज ईश्वर अमान्य करूनही उत्तम प्रकारे चालू शकेल. जनतेमध्ये त्याच स्वावलंबी विचारांचा प्रसार केला पाहिजे. निरीश्वर विश्वाचा विचार सामान्यजनांना कळणार नाही, म्हणून ‘क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम्‌’ अशी बतावणी करून सामान्यजनांना देव-देवतांच्या बाहुल्यांत, भातुकलीत रमवून ठेवणे म्हणजेच अंधश्रद्धेला, गूढतेला व दैववादाला उत्तेजन देण्यासारखे आहे. नामयज्ञ आणि नामजप सांगणारा आमच्यातला भक्तिमार्ग तर माझ्या मते, संसारात हरवलेल्यांची एक लाघवी विराणीच आहे.

माझ्या चिंतनयात्रेत मी या घटकेला ज्या ठिकाणी येऊन पोहोचलो आहे, ते ठिकाण दाखवण्याचा प्रयत्न मी येथवर केला आहे. माझ्या चिंतनातील सर्वच आध्यात्मिक व ऐहिक विषय मी येथे मांडू शकलो नाही. कारण तसे केले असते, तर लेखाचा विस्तार फार झाला असता. माझ्या विचारांची दिशा सूचित करण्यासाठी येथे जे लिहिले आहे तेवढे पुरेल, असे मला वाटते. आतापर्यंत मी कोणालाही गुरू केलेले नाही. गांधी किंवा मार्क्सलाही नाही, हे यावरून स्पष्ट होईल. कारण या सतत बदलत्या विश्वाचे आणि मानवसमाजाचे अक्षरचित्र कोणापाशी कितीही दिव्यचक्षू असले तरी तो रेखांकित करू शकेल, असे मला वाटत नाही. कॅमेरा जशी क्षणचित्रे टिपतो तशीच आतापर्यंतच्या ऋषी-मुनींनी, विचारवंतांनी, प्रेषितांनी आणि विद्वानांनी टिपली आहेत. ती समाजचित्रे त्या काळाची, तत्क्षणीच्या परिस्थितीची चित्रे आहेत. म्हणून वेदकालीन चिंतन, कुरुक्षेत्रावरील चिंतन, बोधिवृक्षाखालील चिंतन गॅलिलिओचे आसमंतातील आणि हिरा डोंगरावरील चिंतन हे, आजच्या चिंतनाला बंधनकारक ठरता कामा नये. याचा अर्थ ते सर्वस्वी त्याज्य ठरते, असाही नाही. नीर-क्षीरन्यायानेच त्याचा स्वीकार व्हावयास हवा. माझ्या मते, ‘ईश्वर, अल्ला तेरे नाम’ असे म्हणून सर्वधर्मसमभाव निर्माण होणार नाही. कारण जगाचे वेगवेगळे दर्शन त्या-त्या धर्माच्या प्रेषितांना झाले, म्हणून तर हे धर्म त्यांनी प्रस्थापित केले. प्रत्येक धर्म पापाचरणापासून दूर राहा असे सांगतो खरे, परंतु पाप कशास म्हणावे याबद्दलच भिन्न धर्मांची मते भिन्न पडतात आणि त्यात पुन्हा स्वमताबद्दल पराकोटीचा आग्रह व अन्य मताची निंदा, तसेच प्रत्येक धर्मतत्त्वाशी अविच्छिन्नपणे बांधली गेलेली कर्मकांडे ही धर्माची वैशिष्ट्ये मानली जातात. आताच्या युगातल्या समाजाच्या गरजा किंवा धारणा कोणताही विद्यमान धर्म पुऱ्या करू शकत नाही, या अर्थी सर्व धर्म समान आहेत, असे मानण्यास माझी तयारी आहे. म्हणून परंपरागत सर्व धर्म आणि दर्शने बाजूला सारून, व्यक्तिमात्राला धर्मबंधनातून मुक्त करून आपापल्या मतीप्रमाणे कोणत्याही धर्मविचाराचा अथवा दर्शनाचा स्वीकार अथवा त्याग करण्याची मोकळीक जर त्याला राहिली, तर ती सर्वांत उत्तम गोष्ट होईल.

माझ्या उर्वरित आयुष्यात माझी ही मते पालटण्याचा संभव कमी आहे, जवळजवळ नाहीच. परंतु जर मला काही नवा प्रकाश माझ्या बुद्धीने दाखवला, तर तो अव्हेरण्याचीही माझी इच्छा नाही.

माझ्या जीवनात मी भावनांपेक्षा विचारांना आणि विचारांहून कृतीला अधिक महत्त्व देत आलो आहे. म्हणून रामदासाहून शिवाजी थोर, रानड्यांपेक्षा फुले थोर, बर्ट्रांड रसेलपेक्षा श्वाईट्‌झर थोर, जे. कृष्णमूर्तींपेक्षा मदर तेरेसा थोर आणि अस्पृश्यतानिवारणासाठी स्पृश्यांची मने वळवू पाहणाऱ्या गांधीजींपेक्षा अस्पृश्यांनाच बंडासाठी उभे करणारे आंबेडकर मला थोर वाटतात. सर्व समाजाच्या भल्यासाठी विचार, उच्चार आणि आचार यांची जेथे मिठी पडलेली दिसेल, तिथे मी नतमस्तक होतो. ‘तिमिरातून तेजाकडे’ जाण्याचा तो एकच मार्ग आहे, अशी माझी धारणा बनली आहे.

Tags: मराठी साहित्य आत्मचरित्र साधना प्रकाशन नारायणीय समाजवाद नानासाहेब गोरे ना. ग. गोरे पुनर्भेट weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नानासाहेब गोरे

ज्येष्ठ समाजवादी नेते, साधना साप्ताहिकाचे माजी संपादक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके