डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

धरण ते म्हैस : मार्गे माणसं

उद्या, बखर अंतकाळाची अशा काही कादंबऱ्या आणि ‘कहाणी मानवप्राण्यांची’ अशी विज्ञानविषयक पुस्तके लिहिणारे नंदा खरे हे मराठीतील महत्त्वाचे लेखक आहेत. अलीकडेच त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही जाहीर झाला, पण तो त्यांनी नम्रपणे नाकारला आहे. त्यांनी स्थापत्यविशारद (सिव्हिल इंजिनियर) म्हणूनही बरेच काम केले आहे. अलीकडेच त्यांनी कृष्णात खोत यांची ‘रिंगाण’ ही कादंबरी व संजय जगदाळे यांचा ‘असो आता चाड’ हा कवितासंग्रह या दोन पुस्तकांचे वाचन केले. त्यानंतर त्यांच्या मनात उमटलेले प्रतिध्वनी त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. - संपादक
 

ना. धों. महानोरांनी ‘धरण-मरण’ असा प्रास जुळवला. भू-संपादन करणारे जणू ज्यांची जमीन घेतात त्यांची शिकारच करतात, असं विश्वास पाटलांनी ‘झाडाझडती’मध्ये चितारलं. 2009 च्या आसपास माझे तरुण मित्रमैत्रिणी मला म्हणायचे, ‘‘तुझ्याशी धरणं आणि हरितक्रांतीवरनं भांडायचं आहे एकदा!’’ मीही ‘‘म्हणाल तेव्हा वाद घालू!’’ म्हणत असे. धरणांना विरोध करण्यात ना माझ्या पर्यावरणवादी मित्रांचा नंबर पहिला होता, ना महानोर-पाटलांचा.

तो मान जातो इंद्राकडे. सिंधू संस्कृतीत म्हणे नद्यांवर उन्हाळ्यात बांध घातले जात. पावसाळ्यात या बांधांमुळे नदीचं सुपीक, गढूळ पाणी दूरपर्यंत पसरून शेतजमिनीला भिजवायचंही आणि गाळातून खतही द्यायचं. मग या शेतकरी संस्कृतीवर गुराखी लोकांचे हल्ले होऊ लागले. त्यांनी शेतकऱ्यांचं नाक दाबायला बांध तोडून नद्या ‘मोकळ्या’ केल्या. हे करणारा तो इंद्र.

पण कोरडवाहू जमिनीपेक्षा सिंचित जमीन जास्त पीक देते हे तर नाकारता येत नाही. आणि ह्यात बियाणं, विशेष खतं वगैरेंचाही विचार नाही. तेही जर जमलं तर थेट हरितक्रांतीच अवतरते! म्हणून ‘‘आमच्याकडे सिंचनाची सोय करा’’ ही जवळपास निरपवादपणे शेतकऱ्यांची मागणी असते. आणि सिंचनाचा विचार आला की लहान-थोर बांध-बंधारे-धरणंही आलीच. सतत वीज जाणाऱ्या भागात ‘इन्व्हर्टर्स’ जसे वीज साठवून घराला दिवाबत्ती पुरवतात; तशी बांध-बंधारे-धरणं मौसमी पावसाळा क्षेत्रात अडीअडचणीला सिंचन पुरवतात; अगदी नेमकं तस्संच. आता ‘दादाच्या मळ्यामंदी मोटंच मोटं पानी’ चांगलं की ‘माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं’ हे चांगलं; हा तज्ज्ञांमधला वाद आहे. कुठे विहिरीचं पाणी वाढवणारे बांध लागतात; तर कुठे अजस्र कालवे, दूरवर पाणी नेणं, हेच व्यवहार्य असतं.

पोटापाण्यासाठी मोठी धरणं बांधली हा आरोप करा माझ्यावर; पण त्या प्रक्रियेतलं सगळं काही मी ठरवत नव्हतो; याचाही विचार करा. बरं, मी नदीजोड, नद्यानाल्यांचं ‘खोलीकरण’ असल्या अमानुष आणि आत्मघातकी कृतींमध्ये तर भाग घेतला नाही ना! जेव्हा मोठमोठे ‘स्वच्छ-सचिव’ हिमालयाला काळा रंग फासून गंगेचं पाणी ‘वाढवायचा’ विचार करत होते, तेव्हा तर मी दूर होतो ना? फार नाही पाप माझ्या खात्यावर.

आणि मी 1972 आणि 73 चे दुष्काळ अगदी जवळून पाहिले. मराठवाडा आणि लगतचा पश्चिम महाराष्ट्र अर्धी वीत पावसावर कसा तडफडला ते मी भोगलं आहे. भीमामाई घोटाही भिजवू शकत नव्हती, एरवी बारमाही असून. जलपर्णी, काँग्रेस गवत, ते ज्यांमधून आले ती पीएल-480 धान्याची भीक; सगळं मी पाहिलं. हुलगा-मायलो खायला लावले, खाल्ले.

माणसं मोठ्या अडचणींवर तात्कालिक उत्तरं शोधतात. खूपदा त्या उत्तरांमधून चाकोऱ्या-रूळ घडतात आणि पुढं वाटा बदलणं अवघड जातं, पण हरित क्रांती अश्राप कोरडवाहू शेतकऱ्यांची शिकार करायला रचली असं म्हणू नका, प्लीज. ती सर्वांचं पोट भरायलाच घडली. दोषारोप विचारांतील करावेत; भावनेतनं नकोत.

0

पण माझे आवडते तरुण लेखक धरणं बांधणं म्हणजेच नरसंहार करणं असं लिहितात, तेव्हा मला आतवर दुखतं. काहींच्या जमिनी बुडीत क्षेत्रात जातात. पुनर्वसन नीट होत नाही. पुनर्वसन कधीच नीट होत नाही!

उजनी धरण बांधत असताना आठवडी पगाराच्या दिवशी एक लहानखुरी, साठेक वर्षांची बाई यायची; ‘‘जमीन गेली, पैसे नाही मिळाले’’ असं सांगत. मी धरण बांधणारा ठेकेदार होतो. भू-संपादनाशी माझा दुरूनही संबंध नव्हता. पण सिंचन खात्याचे भू-संपादन करणारे अधिकारी ओळखीचे होते. जमिनीचं मोजमाप, पर्यायी जमीन, मोबदले देणं, विस्थापनात मदत- सगळं बऱ्यापैकी सचोटीनं करायचे ते... भलेही विश्वास पाटील भावनिक-अतिरंजित लिहोत. पण त्यांच्यावर बंधन असायचं ‘सात-बारा’चं. आज जशा ‘आधार’ नाही म्हणून कोव्हिड इस्पितळात प्रवेश नाकारल्याच्या कहाण्या ऐकू येतात; नेमकी तश्शी ती ‘मावशी’ मोबदल्यापासून वंचित होती. नावावर सात-बारा असल्यानं मुलाला सगळं मिळालं होतं. मावशीला आठवडी बाजारात भटकत चुरमुऱ्याचे लाडू खायची इच्छा व्हायची. मुलगा ‘हुडूत’ म्हणायचा आणि मावशी जरा सभ्यपणे भीक मागायची. मीही 1970-75 मध्ये रुपया-दोन रुपये देऊन माझ्या पंचविशीच्या शहरी सदसद्विवेकाला ‘‘चूप!’’ म्हणत असे. आपली पूर्वापारची जमीन सोडणंही मला नवं नाही. पण मी माझं घर बिल्डरला विकून बहुमजली को.ऑ.हौ.सो.मध्ये राहायला गेलो त्याची कारणं वेगळी होती. सुटं घर सांभाळणं आम्हा बुढ्ढा-बुढ्ढींना झेपेना. बिल्डर फ्लॅटही देत होता आणि वर पैसेही; म्हातारपणी गरजेचे वाटणारे. म्हणजे माझं विस्थापन हा माझा निर्णय होता. उजनी धरणावरच्या मावशीचं तसं नव्हतं. ती, मुलगा, सून, सगळे निर्वाचित लोकप्रतिनिधींमुळे उचकटले गेले होते. वर ‘ऑम्लेट करायला अंडी फोडावीच लागतात’, ‘समष्टीसाठी व्यक्तींना काही तरी सहन करावच लागतं’, असलं बोधामृतही प्यावं लागलं त्यांना. आजचा जमाना असता तर मावशी आणि कुटुंबीय ‘सिंचनयोद्धे’ ठरले असते, आणि त्यांनी तो फसवा रामराम स्वीकारलाही असता! असो. माझं विस्थापन बहुतांशी माझं भलं करत होतं; तर धरणग्रस्तांचं मुख्यतः वाईट होत होतं.

0

कोव्हिड-लॉकडाउन काळात मित्रांशी फोननं, मेलनं गप्पा हाच मोठा विरंगुळा होता. मित्र, स्नेही पुस्तकं सुचवायचे; ॲमेझॉन-नेट्‌फ्लिक्स चित्रपट आणि मालिका सुचवायचे. सूचनांपैकी रुपयात आठ-दहा पैसे पाळताही यायच्या. तर एका पुस्तकाच्या शिफारशी बऱ्याचदा आल्या. अखेर प्रकाशकांशी संपर्क साधून पुस्तक मागवलं मैत्रीत, फुकटात! पुस्तक होतं कृष्णात खोतांचं ‘रिंगाण’ (शब्द प्रकाशन, 2017). खोतांचा मी जुना, कधीच न भेटलेला प्रेमी. सुरुवात केली आणि धरणानं उखडला गेलेला देवाप्पा पुढ्यात आला. धरणानं बुडवलेल्या डोंगराळ भागातला शेतकरी. शेतीसोबत शिकार­ अन्नसंकलनही दखलपात्र. शेती, पशुपालन, सगळं मुळात गरजांपुरतं, निर्वाहापुरतं. भरपूर कमावून, सरकारी देणी देऊन वर धनसंकलनाची इच्छाही नसलेले. निरागस.

तर देवाप्पा लंगोट, रानमेवा, ठासणीची बंदूक यांवर खूश राहणारा. गुरं पाळतानाही त्यांना फारदा बांधत नसे. सारी गुरं आसपास चरून रात्री माणसांच्या आसऱ्याला गावाच्या मध्यावर येऊन ठेपायची. गावाचाच साठा तो. जरी विशिष्ट जनावर खास घराशी निष्ठा ठेवून असायचं. आणि यातच एक ‘मुदीवाली’ म्हणून ओळखली जाणारी म्हैस. देवाप्पाची लाडकी. तिच्या आणि देवाप्पाच्या कानांमध्ये एकाच वेळी मुदी, उर्फ मुद्रिका, उर्फ रिंग घातली होती, ही दोघांच्या स्नेहबंधाची खूण.

पण मुदीवाली आडदांड. रेड्यांशी संग व्हायचा, पण गाब (गर्भ) राहत नसे. स्वातंत्र्यवादिनीच म्हणा ना! तर जेव्हा धरणामागे गाव बुडून देवाप्पा सहकुटुंब हाकलला गेला तेव्हा सरकारी ट्रकांचा तुटवडाच होता. इतर सारं सामान, दुभती आणि गाभण जनावरं नेता आली. मुदीवालीला मात्र आता निर्मनुष्य झालेल्या, जंगल झालेल्या भागातच सोडलं.

वाढीव नागरीकरणाच्या भागात लोटला गेलेला देवाप्पा नाराजच राहिला. शेजारी आपल्याला ‘उपरा-उचल्या’ म्हणतात, नुसत्या लंगोटीवर वावरण्यावरून अचकटविचकट बोलतात; याचं दुःख तर होतंच. सोबत रानमेवा-वनौपज­ सरपण गमावल्यानं कुटुंबाची आर्थिक स्थितीही डळमळीत होती. अखेर देवाप्पा दोन तरण्या साथीदारांसकट धरणामागच्या जंगलात जायचं ठरवतो. इतर सारा कुटुंबकबिला आणताना मुदीवालीला मागं सोडलं, याची टोचणी देवाप्पालाही असते आणि त्याच्या आईलाही.

पण आता धरणामागचा भाग बदललेला असतो. इथं-तिथं पाणी साचून रस्ते-वाटा बदलणं; ओळखीच्या खुणा पडझडीनं, बुडण्यानं अनोळखी होणं; ही तशी बदलाची अपेक्षित अंगं. पण मोठे फरक झालेले असतात मोहिमेच्या ‘लक्ष्या’त; मुदीवालीमध्ये!

एक तर नियमित भादरणं नसल्यानं तिच्या अंगावर बोटबोट केस असतात. नियमित धुणं नसल्यानं अंग चिखलानं माखलेलं असतं. पण मोठा फरक म्हणजे आता मुदीवालीला गाब राहून एक रेडकू झालेलं असतं. एक विक्षिप्त म्हण आहे. ‘तुम्हांला मूल होतं त्या क्षणी नियतीला तुमच्याविरुद्ध वापरायला एक ‘ओलीस’ मिळतो!’ माणसांचं पाहा. मूलबाळ नसताना शेजारच्या गणेशोत्सवाच्या मोऽठ्या आवाजावर डाफरता येतं ‘‘काय वात आणलाय ­-नी!’’ एक मूल होऊ द्या. लवकरच त्या मुलाला त्याच आवाजी माइकवरनं विविध गुणदर्शनात गाता यावं म्हणून मत बदलतं. ‘‘सामाजिक वागणुकीचं शिक्षण असतं ते!’’ ढेपाळले! तर मुदीवालीनं ओलीस दिला!

पण माणसांपासनं सुटं राहणं कैक पिढ्या पाळीव राहिलेल्या जनावरांसाठी सोपं नसतं. गवे सहज आसरा देत नाहीत. वाघ-बिबट आणि तरस-कोल्हे वाटच पाहत असतात सावज सापडायची. त्यामुळे माणसं नसतानाही मुदीवाली, रेडकू आणि त्यांचा नवा ‘कळप’ जुन्याच खेड्यांच्या चौकांमध्ये रात्री काढत असतात. ताडोबा राखीव जंगलाच्या कडाकडांना हरणांचे कळप रात्री माणसांजवळ येऊन बसतात. आणि हरीण हे कधीही पाळीव न झालेलं जनावर आहे. तर देवाप्पा रात्री ‘घात लावून’ रेडकू पकडतो, की त्यामागं मुदीवालीला पकडावं!

यानंतरच्या मुदीवाली-देवाप्पा संघर्षाचं कृष्णात खोतांनी केलेलं वर्णन माझ्यासारख्या पूर्ण शहरी माणसाला झेपणं शक्य नाही. हो, माझे काका भर पुण्यात म्हशींवर केंद्रित दुधाचा धंदा करायचे. म्हशी भादरणं मला माहीत आहे. नारायण पेठेतल्या आमच्या म्हशी मागे नदीवर धुवायला नेल्या की ‘नदी अडेल’ असं मला वाटायचं. पुढे पुणेकर भावंडांना चिडवायला मी मुळा-मुठा यांची यथेच्छ टिंगल करायचा; नागपूरची आणिकच दुबळी नागनदी विसरून! पण तरी मला मुदीवाली-देवाप्पा अनुबंध, त्यात देवाप्पाचा स्वामित्वहक्काचा हव्यास आणि मुदीवालीची जुनीच स्वातंत्र्यवादिनी वृत्ती, हे आतपासून समजत नाहीत. बरं, मी माणूस म्हणून देवाप्पाच्या बाजूचा, पक्षाचा आहे असंही नाही. काकांकडे सैंधव मीठ, गूळ, शेंगदाण्याची पेंड खाताना म्हशींबद्दल मैत्रीची भावना जागायची. मी ‘त्यांचा’ही आहे!

मी खोतांनी चितारलेला रेडकू-मुदीवाली-देवाप्पा संबंध तटस्थ साहित्यिक वृत्तीनं तपासला. मला थेट अर्नेस्ट हेमिंग्वेच्या ‘द ओल्ड मॅन अँड द सी’ची आठवण झाली; किंवा त्या पुस्तकाच्या ‘एका कोळीयाने’ या पु.ल. देशपांड्यांच्या भाषांतराची. मी ना हेमिंग्वेचा प्रेमी आहे, ना पुलंचा. हो, दोघांनाही मी टिंगल करण्याजोगे मानत नाही... पण...! देवाप्पा सामान्य माणसाला झेपणारही नाही इतक्या शौर्यानं (हो! हाच शब्द योग्य आहे!) रेडकाला धरून-वापरून मुदीवालीला पुन्हा ‘कमावाय’चा प्रयत्न करतो. जमत नाही. मी माझा सारा तटस्थपणा सोडून मुदीवालीला ‘चिअर’ करतो. यात कृष्णात खोतांचा अपमान मुळीच नाही. असलं तर कौतुकच आहे की त्या माझ्या भावानं ‘स्वातंत्र्य’ या शब्दाचा खरा अर्थ समजून घेतला. खोत मानव­प्राण्यात अडकले नाहीत. आध्यात्मिक झाले.

माणसांच्या इतिहासात कित्तीऽऽदा अशा घटना घडल्या असणार. मनाविरुद्ध, इच्छेविरुद्ध, जोरजबरीनं जगायच्या पद्धती बदलाव्या लागल्या असणार. नागर-औद्योगिक पद्धतीनं जगणाऱ्यांचे अशा स्थितींमधले प्रश्न फार तर माणसांपुरते असतात. ग्रामीण अन्नोत्पादक-अन्न संकलकांना मात्र आपण पाळलेले जीव, त्यांचे न पाळता आलेले नातलग, थेट परिघाबाहेरचे जीव, साऱ्यांचाच विचार करावा लागतो.

आणि या निकषावर मला तरी ‘द ओल्ड मॅन अँड द सी’पेक्षा ‘जैत रे जैत’, ‘रिंगाण’ हे संघर्ष मोठे वाटतात. माणसांच्या काळजांजवळचे, मनांजवळचे वाटतात. समुद्राशी झगडणं गर्विष्ठ थोर, तर देवाप्पा मुदीवालीला पकडू पाहतो ते मानवी थोर. भगताचा पोर राणीमाशीला हाकलू पाहतो ते मानवी थोर. कोण्या माणसाला दुखलं, भाजलं, जळलं- त्यानं समतोल साधायला धडपड केली. ते थोर लोक समुद्रावर ‘प्रभुत्व’ मिळवायला झगडू देत. देव व्हायला धडपडू देत. मला माणूस व्हायचा प्रयत्न पुरतो.

पण देवाप्पाची खरी गोष्ट एकदोन पापुद्र्यांआड जमिनीशी जुळलेली आहे. जीवनशैली, मुदीवाली म्हैस अशा पडद्यांआड जमीन आहे. तो थेट धरणं बांधणाऱ्यांचा ‘बळी’ नाही.

तसा बळी, काही अर्थी माझ्यावर थेट आरोप करणारा बळी भेटला ‘असो आता चाड’ या कवितासंग्रहातून. काही काळापूर्वी पुस्तक पुरस्कारानं वाखाणलं गेलं. आता प्रसाद कुमठेकर या मित्रानं कवी संदीप जगदाळ्यांना माझ्याकडे पाठवायला लावलं. सोबत जगदाळ्यांची चिठ्ठी, पैठणचा पत्ता!

मनातून चरकलो. 1969 ते 1978 या काळात पाचेक वर्षं मी पैठणलगतच्या जायकवाडी धरणापासून निघालेल्या ‘पैठण डावा कालव्या’वर दहा जलसेतू बांधले. कालवा सतत मूळ नदीच्या उपनद्यांना ओलांडतो. प्रत्येक ‘उडी’ म्हणजे एक जलसेतू किंवा ॲक्वेडक्ट.

बरं, सारी कामं सुरळीत, फायद्यात झाली असंही नाही. पहिली दोन बदाबद (नागपुरी बोलीत ‘दबादब’) तोट्यात गेली. नंतरच्या चारांनी भरघोस कमावून दिलं. शेवटच्या चारांनी एकूण जायकवाडीचा हिशोब ‘पूज्या’वर आणला. पण पहिली दोनही फार दुखली नाहीत. एक तर मराठवाडा प्रेमळ. सरासरीच्या जास्त. मी नुकताच लग्न झालेला, चौकोनी कुटुंब घडवत असलेला. नाही, तोट्यातलं काम दुखायचं. तेव्हा पैठणला म्हणे पैठणी अनुदानित सहाशे रुपयांना मिळायची; तर माझा पगार महिना तीनशे. तोही तोट्यामुळे दरमहा उचलता येण्याची खात्री नसलेला.

आणि आता जगदाळे. त्याच नऊएक वर्षांना अमानुष मानणारा, बहुधा माझ्यापेक्षा दशकभर तरी लहान.

0

­पंचवीस कविता, जेमतेम ऐंशी पानं व्यापणाऱ्या. प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द अर्करूप, तेजाबासारखे जहाल झालेले. पैठणचा पत्ता. थेट मला डिवचणारा. खिजवणारा.

पण सुरुवातीला तरी संदीप शिवाजीराव जगदाळ्यांचं माझ्याशी भांडण नाही. ते लिहितात (पान 35-36)

कोसळतं आभाळ

नांदतं शिवार

कायम राहिलं त्याच्या स्वप्नात

स्वप्नांचे दुष्काळी ढग झाले तेव्हा

कोरड्याठाक विहिरीसारखा

पडून राहिला निपचित

राजेहो, आम्हांलाही वाटलं होतं की आमच्या धरण-कालवे-पाट­चाऱ्या व्यवस्थेतून दुष्काळी ढगांखाली आभाळ कोसळून शिवार नांदेल. आम्ही अनेक जण होतो, बहुतांशी ‘सुष्ट’. सर्व इंजिनियरांचाही आमच्यासारखाच विचार होता. आज जाणवतं की इंजिनियरांमधल्या माझ्या पंथाला (सिव्हिल-स्थापत्य) बांधणं, त्यामागचं नियोजन शिकवतात. वापर मात्र शिकवत नाहीत. पुढं नांदेडला ‘पाणी व्यवस्थापन’ असा अभ्यासक्रम सुरू झाला, पण त्यातनं निघणारी पोरं बांधकामातच गेली. व्यवस्थापन पोरकंच राहिलं.

धरण योजना आखताना एक ‘लाभार्थीं’ची यादी बनवली जाते... आणि बऱ्याच नंतर ‘योजनाग्रस्तां’ची. जगदाळे अर्थातच ‘ग्रस्तां’मध्ये होते. पण त्यांनाही लाभार्थी दिसत होते. ते लाभार्थी हे ‘ग्रस्त’ लोकांचे शत्रू नव्हते. पण त्यांना तरी लाभ मिळाला का? जगदाळे साशंक आहेत. ते लिहितात (पान 16)

धरणाचं पाणी पिऊन

फुललं परक्याचं माळरान

पाइपातून, पाटाच्या दगडी भिंतीमधून

गेलं पाणी दूर दूर

पण गेलं नेमकं कुठं?

प्रयत्न करतो उत्तर द्यायचा; तेही जायकवाडीशी सांधा जोडून. धरणं, पाट हे सिंचन-खात्याचं क्षेत्र. त्यांच्या योजनांमध्ये सुरुवात करताना तरी जवळच्या शहरांचं, उद्योगांचं पाणी विचारात घेतलं जात नाही. तो म्युनिसिपल ­इंडस्ट्रियल (MI) किंवा सिव्हिल-इंडस्ट्रियल (CI) पाण्याची गरज फुटकळ ‘समासा’तून, मार्जिन्समधून पूर्ण होईल, असं समजतात. हे आजकाल होत नाही.

एक तर मोठ्या धरण योजना सुचण्यापासून कार्यान्वित होईपर्यंत दोन तरी दशकं जातात. जायकवाडीसाठी हा आकडा चार किंवा पाच दशकं असेल! आणि एवढ्या काळात लोकं अडीच पट होतात. त्यातही शहरी लोकं तर तीन-चार पट होतात. आणि औरंगाबादचं तर मला आठवतं की जायकवाडीनं एक लाख माणसांना पाणी द्यायचं ठरलं होतं. आज औरंगाबाद तेरा लाखांवर आहे! तर ‘परक्याचं माळरान’ जालना-परभणी-नांदेड जिल्ह्यांमध्ये नव्हतं. ते होतं औरंगाबादेतच!

0

आणि MI/CI शहरी पाण्याची गरज नेहमीच ग्रामीण गरजेच्या आधी भागवली जाते. जगदाळे विचारतात (पान 65)

दिवसभर गुरामागं रान तुडवणाऱ्या

ओढ्याकाठाला मिठासंगं

भाकर खानाऱ्या पोरीचं चित्रबित्रं;

असं कह्यीच कसं नई ह्या पुस्तकात?

राजा! धर्मराजानं द्रौपदीला डावावर लावायच्या आधी स्वतःला लावलं होतं नं? मग गुलामाला बायको डावावर लावता यायला नको नं? विकास­पुरुषांच्या ह्या भाऊगर्दीत भाकर खाणाऱ्या, रान तुडवणाऱ्या पोरींना पकडून बळी देतात. मानवत खून मालिका आठवा! चित्रं काढायला तुही गोदा, माही नर्मदा - काय ते ऐश्वर्या-कतरिना आहेत!

नाही. हा जायकवाडी धरणाच्या वरचा-खालचा संघर्ष नाही. हा थेट शहरी-ग्रामीणही संघर्ष नाही. हा अन्नोत्पादक-औद्योगिक... जवळ यायला लागला आहात! पण तसाही संघर्ष नाही. हा वाढीव उपभोगाला विकास मानणाऱ्यांशी भावंडभाव, भाईचारा असलेल्यांचा संघर्ष आहे. जगदाळे लिहून जातात. वाचणाऱ्याच्या सदसद्विवेकाला दाभण टोचते, आरपार (पान 70)

मरणातोरणाला तरी पाय लागू देत जाय गावमातीला

आपलं आतडं असं एकाएकी तोडून टाकता येत नसतं

गायीच्या खुरातलं पाणी पिऊन

हजार पिढ्यांनी दिलेला शब्द

पाळत आलो आजवर

पण जगदाळ्यांना माहीत आहे दुखणं नेमकं कुठे आहे ते. ते शिक्षकाच्या भूमिकेतनं विद्यार्थ्यांना प्रार्थना शिकवताहेत. ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे.’ मग पोरांचं पठण, शब्दोच्चार, आवाजातले चढउतार तपासताना भीती दाटून येते. (पान 58)

एक दिवस या प्रार्थनेची लय

तुम्ही सोडून देतान

या भीतीनं धांदरून जातोय

मराठी भाषेचं माहेर पैठण-आपेगाव-नेवासा परिसरात आहे, तसंच महाराष्ट्रभर आहे. काही डुढ्ढाचार्य तिला दुकानातल्या शोकेसच्या बाहुलीसारखं कृत्रिम ‘प्रमाण’ रूपात जबरदस्तीनं कोंबताहेत. अशा अत्याचाराला नाक खाजवून दाखवणारा जगदाळ्यांचा ‘देतान’ मला मोहवून जातो. तोही महाराष्ट्रभर भेटतो. मला आवडतो!

पण गरजा मर्यादित ठेवत, इतरांचं माळरान फुलायला आपलं घरदारही गमावत, तरी खऱ्या धर्माला विसराल या भीतीनं शहारत, जगदाळे उपाय शोधायला लागतात. (पान 89)

दिल्लीजवळ नाहीय ‘कोणताच’ उपाय. तरी बरं जगदाळे इहवादी आहेत. देवाला साकडं घालत नाहीत. तिथेही उपाय नाही आहे. साहिर लुधियानवीच्या एका गाण्यातल्या अप्रकाशित ओळी अशा...

इतने दूर से अगर देखता भी हो

तेरे मेरे वासते क्या करेगा वो!

जो भी है यहीं पे, अपने बाजूओं का दम

आसमां पे है खुदा और जमीं पे हम

0

पण... पण... (पान 28)

एक धरण

जे आणखीनच अजस्र होत जाईल दिवसेंदिवस

त्याचं काय? प्रतीक म्हणून वापरा धरण आणि त्यामागच्या विकासाच्या संकल्पना. त्यातून ‘खरा तो एकचि धर्म’ कधी मिळणार नाही. कारण जगाला नुसतं प्रेम अर्पून प्रश्न सुटत नाहीत. त्यातून प्रश्नांच्या उत्तरांची दिशा ठरवायला मदत होते. अनेक उत्तरांपैकी एक निवडता येतं. पण उत्तर सुचायला विचार, विवेक, निसर्ग समजून घेणं, घेत राहणं, चुका दुरुस्त करत राहणं, यांना पर्याय नाही. त्या मेहेनतीपासून सुटका नाही.

0

2018 साली, नोटाबंदीच्या ताबडतोब नंतर आम्ही पन्नासेक जणांनी औरंगाबादला एक शिबिर घेतलं. जालन्याचे विजय अण्णा बोराडे, ‘वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट’चे (WALMI चे) धरण-व्यवस्थापन तज्ज्ञ प्रदीप पुरंदरे मार्गदर्शक होते. हवामान, भूजल वगैरेंचे तज्ज्ञही सोबत होते. एक फेरी जायकवाडी धरणावर, कालव्याच्या पहिल्या दीड-दोन किलोमीटरांवर झाली. तेव्हा 72 चा असलेला मी रडकुंडीला आलो.

कालव्याच्या काँक्रीट-माती-फरशांच्या भिंती खचलेल्या. डिझाइनप्रमाणे 3.5-4 मीटर खोल पाण्याऐवजी 3.5-4 सेंटिमीटर पाणी! त्यातून पाणी खेचणारे शेतकरी. पाण्याच्या वहनाला सोपं करायला आम्ही कालव्याचे तळ आणि बाजू घासून गुळगुळीत करायला धडपडायचो. आता शेतकरी अडथळ्यांच्या शर्यतीतनं वाहणाऱ्या घोटाभर पाण्यात एक आणि दीड इंचाचे पंप लावताहेत. मनातनं शंकरराव चव्हाणांपासनं माझ्यापर्यंत जायकवाडी प्रकल्पाचा भाग असलेल्यांना आईबहिणीच्या शिव्या देताहेत. आणि हे अडीचशे किलोमीटर पाटाच्या पहिल्या-दुसऱ्या किलोमीटरांत होतं आहे. माझ्या आयुष्यातली 1969-73 वर्षं बरबादच झाली. जो तोटा सहन करत मी एक ‘उच्छ्‌वास’ (Syphon)  एक ‘जलसेतू’ (Aqueduct) बांधला, तो वायाच गेला. माझ्या अकाली म्हातारपणातला वीसेक टक्के भाग सिंचन ­व्यवस्थापनातील गाढवपणानं.... हो! थेट गाढवपणानं वाया घालवला. भ्रष्टाचार तसा क्षुद्र, हो!

0

एक कादंबरी, एक कवितासंग्रह, दोन्ही मला न भेटलेल्या, पण माझ्याच वृत्तीच्या माणसांनी घडवलेल्या कलाकृती. त्यांच्यावर लिहिताना मी भरपूर इकडे-तिकडे भटकलो आहे. इंजिनियरिंगपासून मानवतावादापर्यंत वाट्टेल तिकडे गेलो आहे.

पण मी का जाऊ नये? कृष्णात खोत, संदीप जगदाळे, मी, माणसं आहोत. कोविडकाळात तिघे एकमेकांशी बोललो.... किती? पाचसात मिनिटंही नसेल. पण अंतरीची खूण पटली. बोललो. शहारलो. त्या संपर्कांमधून पुस्तकं नव्यानं वाचली, वाटलं ते लिहिलं. वय, भूगोल, सारे भेद ओलांडत लिहिलं.

जे लिहिलं ते ‘वाढतो’. पहा, रुचतं का!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नंदा खरे
nandakhare46@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके