डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्त्री-कलावंतांनी हे ध्यानात घेणे जरुरीचे आहे की, ऐन उमेदीचा काळ संपल्यावर त्यांच्याकडे पाठ फिरविणारेच जास्त असणार! स्त्रीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन तिच्या वृद्धावस्थेतही फारसा बदलत नाही. कलावंतांच्या कलोपासनेचे श्रेय हे त्यांच्या चुकांपेक्षा किंवा दुर्दैवी आयुष्यापेक्षा लहान ठरू नये. तसे होणे ही समाजाचीच अप्रतिष्ठा ठरणार नाही का?

'कुणी घर देता का, घर...?’ नटसम्राट गणपतराव बेलवलकर या बुलंद व्यक्तिमत्त्वाने विचारलेला आणि म्हणूनच अधिकच केविलवाणा वाटणारा हा प्रश्न.... काळजाला घरे पाडत जाणारा.... कोणत्याही सहृदय माणसाला अस्वस्थ आणि अंतर्मुख करणारा हा एका कलत्या आयुष्यातला अखेरचा सवाल आज समाजात वेगवेगळ्या स्तरांवर पुसट-ठळक स्वरूपात उमटलेला दिसतो.

अतिशय क्लेशकारी

मध्यंतरी नामवंत गायिका मेनकाबाई शिरोडकर यांच्या विपन्नावस्थेची बातमी वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाली, त्या वेळी कै. शिरवाडकरांच्या 'नटसम्राट'मधील वरील स्वगताची आठवण प्रकर्षाने झाली. कलावंत, लेखक अशा मंडळींच्या उत्तरायुष्यात येणारे निर्धनतेचे, एकाकीपणाचे दिवस त्यांच्या झळाळत्या आयुष्याच्या पार्श्वभूमीवर विशेषच दुर्दैवी वाटतात. सर्वार्थाने वैभवपूर्ण आणि आनंदाचे जीवन जगून झाल्यानंतर आयुष्याची गाडी दुसऱ्या टोकाने घसरणीला लागणे अतिशय क्लेशकारी आहे.

पण अनेकदा असेही आढळून येते की संबंधित कलावंतांचे बेदरकार व बेपर्वा राहण्याचे धोरणच त्यांच्या उत्तरायुष्यातील विपन्न अवस्थेला कारणीभूत ठरते. कलावंत स्त्री असो की पुरुष, अशी अनेक उदाहरणे आढळून येतात की त्यांच्या खर्चीक, उधळ्या स्वभावामुळे, व्यसनांमुळे आणि छंदांमुळे त्यांच्याजवळील संपत्ती लवकर संपते आणि त्यांच्यावर खालच्या प्रतीचे आयुष्य जगण्याची वेळ येते. बऱ्याचदा अशा मंडळींशी वैभवाच्या दिवसांत मैत्री व सलगी करून प्रत्यक्षात मात्र त्यांना लुबाडणारेही भेटतात.

मेनकाबाई शिरोडकरांच्या आयुष्यात कमी-अधिक प्रमाणात असेच काहीसे घडले. गोव्याच्या कलाभूमीचा वारसा लाभलेल्या मेनकाबाईंना जन्मतःच सुरांची देणगी लाभली. विलक्षण सौंदर्य, संगीताचा वारसा आणि नृत्यकलेतील प्रावीण्य या वैशिष्ट्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडत असे. कोवळ्या तरुण वयातच त्यांच्या गाण्याच्या मैफलींना गर्दी लोटे. मंतरलेल्या या तारुण्याच्या किमयेने खुद्द मेनकाबाईंनाही भुरळ पडली आणि संगीताला साथसंगत करणाऱ्या सारंगीवादकाच्या प्रेमात त्या पडल्या. पुढे पडू नये ते घडले आणि या लहान वयातच त्यांना मातृत्व पत्करावे लागले. मात्र त्यांच्या प्रियकराने त्यांचा अव्हेर केला आणि त्यांच्या मनातील त्याच्याबद्दलचा विश्वास अनाठायी ठरला. आज ठुमरी गायकीत अव्वल गणल्या जाणाऱ्या शोभा गुर्टू या मेनकाबाईंच्या कन्या. लहानग्या शोभाला बरोबर घेऊन मेनकाबाईंचा प्रवास एका विशिष्ट दिशेने सुरू झाला.

संगीतसाधनेत बाईंनी अतीव कष्ट घेतले. त्यांच्या सुरांची आणि सौंदर्याची कीर्ती कोल्हापूरपासून मुंबईपर्यंत पसरली. राजदरबारच्या मैफली, धनवंतांच्या घरच्या खाजगी मैफली मेनकाबाईंनी सजवल्या. याच काळात शेठ गोरधनदास मेहता या धनिकाशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांचे भावबंध जुळले. कलावंतिणीच्या आयुष्याला असे संबंध नवे नसतातच. पण पुढे शेटजींनी मेनकाबाईंशी विवाहही केला. अर्थातच त्यांच्या पत्नीची प्रतिष्ठा मेनकाबाईंना मिळाली नाही. त्यांनी आपल्या कन्येचा विवाह करून दिला. काहीशा नंतरच्या वयात त्यांना दुसरी मुलगी झाली. दरम्यान पैशालाही ओहोटी लागली. गुंतवणूक चांगली केली असल्याने मेनकाबाई अडचणीत आल्या नाहीत. पण दुसरी कन्या रजनी हिला विवाहाचा वाईट अनुभव आला. एका दुःस्वप्नातून बाहेर पडल्याप्रमाणे ती मुलाला घेऊन आईकडे परतली. कालांतराने तिचा झालेला आणखी एक विवाहही फसला आणि या सर्व प्रकरणांमध्ये मेनकाबाईंचे होते नव्हते ते सर्व गेले. आज या दोघीही अत्यंत गरिबीचे जीवन जगत आहेत.

निर्धनता आणि एकाकीपणा

शोभा गुर्टू यांच्या पतीने मेनकाबाईंचा नेहमी अनादर केला आणि त्यांच्या एकूण वागणुकीबद्दल अढीच बाळगली. या नापसंतीमुळेही असेल, शोभाताईंचे आपल्या आईशी असलेले संबंध जवळजवळ तुटलेच. आज निर्धनता आणि एकाकीपणा यांच्या कचाट्यात सापडलेल्या मेनकाबाई शिरोडकर यांची ही जीवनकहाणी अशी आहे. बरीचशी अपेक्षित वळणाने जाणारी, अटळपणे पतनाचा मार्ग लाभलेली आणि काहीशी प्रमादांमुळे ओढवून घेतलेली, म्हणूनच अत्यंत दुर्दैवी. ही कहाणी फक्त मेनकाबाई शिरोडकरांची नाही, अशा अनेक जणी असतील. मेनकाबाईएवढा वैभवाचा आणि प्रतिभेचा काळ त्यांनी पाहिला असेल-नसेलही; पण शेवट मात्र असाच... किंबहुना हाच. तारुण्य, संपत्ती, कलेची देणगी, यशाचा कैफ आणि यौवनसुलभ मस्तीमुळे न पटणारी अविवेकाची ओळख... अशा रसायनांचे हे मिश्रण. 

थोडा तरी विवेक हवा 

या सगळ्यांत दोष कुणाचा? कलावंताने आपले आयुष्य मस्तीत जगायचे हे ठीक आहे. पण त्याच्या चुकांची जबाबदारी त्यानेच स्वीकारायला नको का? त्यांना यामुळे लाभलेल्या पडत्या काळात समाजाने आधार काय म्हणून द्यायचा, असे अनेक प्रश्न या निमित्ताने मनात उभे राहतात. मात्र हेही लक्षात घेणे आवश्यक आहे की, सर्व काही व्यवहाराच्या फूटपट्टीने मोजता येत नसते. कलावंत-साहित्यिक यांनी बहराच्या काळात मस्तीत आयुष्य जगायचे आणि उत्तरायुष्यात खंक होऊन समाजाकडे हक्काने मदत मागायची हे जसे अयोग्य आहे; तसेच, या दुरवस्थेला प्रत्येक वेळी संबंधित कलावंतालाच जबाबदार धरणेही चुकीचे ठरू शकते.

मेनकाबाईंचेच उदाहरण घेतले, तर त्यांच्या हातून जशा चुका झाल्या, तसा त्यांच्यावर अन्यायही झाला हे मान्य करावेच लागेल. चौकटबद्ध आयुष्याचे नियम आणि नीतिमत्तेच्या नेहमीच्याच फूटपट्ट्या लावून त्यांच्या जीवनाकडे पाहणे योग्यही ठरणार नाही. त्यांच्या कलावंत असण्यामुळे या सर्वाला एक वलय आपोआपच प्राप्त होते. अन्यथा या तऱ्हेच्या घटना सर्वसामान्य बाईच्या आयुष्यातही घडू शकतात. घडतातही. कलावंताने आपल्या आयुष्यात थोडा तरी विवेक बाळगायला हवा हे आवश्यकच आहे.

राजे-महाराजे आणि संस्थानिकांच्या काळातील कलेची मिरासदारी निराळी होती. राजाश्रयावरील कलासंगोपनाची जबाबदारी त्याच पद्धतीने लोकांवर टाकणे योग्य होणार नाही, विशेषतः स्त्री-कलावंतांनी हे ध्यानात घेणे जरुरीचे आहे की, ऐन उमेदीचा काळ संपल्यावर त्यांच्याकडे पाठ फिरविणारे जास्त असणार. कला ही व्यक्तिगत पातळीवर मर्त्यच असते. तिचा असर कमी होतोच.

आजच्या व्यावहारिक जगात सर्वच स्तरांवरील कृतज्ञतावृत्ती कमी होत आहे. अशा वेळी वाजवी अपेक्षाही बाळगण्याची सोय उरलेली नाही. त्यातूनही वृद्धत्व हे कोणालाही एकाकी, असहाय आणि केविलवाणे बनवून टाकत असते. स्त्रीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन तिच्या वृद्धावस्थेतही फारसा बदलत नाही. तिच्यावरील अन्यायापेक्षा तिच्या चुकाच कशा जास्त मोठ्या होत्या हे सिद्ध करण्याकडे समाजाचा कल असतो. ठोकरा स्त्री-पुरुष दोघांनाही बसतात, पण स्त्रीच्या चुका तिला अधिक त्रासदायी ठरत असतात. मात्र एक माणूस म्हणून कोणाही असहाय व्यक्तीला मदत करणे हे समाजाचे कर्तव्य ठरते हे विसरता कामा नये. आज अनेक खून करणाऱ्या, लोकांना लुटणाऱ्याचेही हृदयपरिवर्तन आणि पुनर्वसन करून त्यांना माणसात आणण्याचे प्रयत्न केले जातात. त्यांना जी संधी मिळू शकते ती कलावंताला का मिळू नये? कलावंताने लोकांना भरभरून आनंद तरी दिलेला असतो. संपन्न स्थितीतील कलावंत सामाजिक बांधिलकीची जाणीव मनात बाळगून समाजाच्या उपयोगी पडताना दिसतात. सामाजिक कृतज्ञता कलावंतांकडून अशी जोपासली जात असताना विपन्न कलाकारांच्या आयुष्याची थोडीशी जबाबदारी समाजाने उचलण्यास हरकत कसली? 

कलावंतांच्या व्यसनासाठी किंवा छंदांसाठी समाजाने पैसे अजिबात पुरवू नयेत, पण त्यांच्या जीवनात जर अंधाराचे साम्राज्य पसरले असेल, तर उजेडाचा किरण तिथे फुलवण्यासाठी मदत नक्कीच करायला हवी. परावलंबी वृद्धत्वाचाही वेगळा विचार व्हायला हवा. व्यसनांमुळे तारुण्यात मस्तीत जगणारा कलावंतही वृद्धावस्थेत असहायच असतो. त्याने या मार्गाने यायला नको हे ठीकच, पण तो असहाय असताना दुर्लक्ष करणे हा आणखी एक अत्याचारच ठरेल. आज असे अनेक कलावंत आढळतात. यात स्त्रियाही कमी नाहीत.

तमाशातील अव्वल कलावंत विठाबाई नारायणगावकर, लावणी गायिका रोशन सातारकर अशी काही अलीकडचीच उदाहरणे आहेत. कलाकार मस्तीत जगूनही विपन्नावस्थेत सापडतोच असेही नाही. आपल्या शर्तीवर खास ढंगाचे आयुष्य जगलेल्या चित्रपटातील ज्येष्ठ व श्रेष्ठ अभिनेत्री ललिता पवार या काही गरिबीच्या विळख्यात सापडल्या नव्हत्या, पण दुर्दैवाने अखेरच्या वेळी त्यांच्या सोबत कोणीच नसल्याने त्यांना खऱ्या अर्थाने एकाकी मृत्यू आला. दोन दिवसांनंतर ही घटना उघडकीस आली. वृद्धपणी सोबतीचीही गरज विशेषत्वाने असते. कोणीही व्यक्ती झाली तरी म्हातारपणी असहाय बनू शकते. शांताबाई हुबळीकर यांच्यासारखी गाजलेली नटीही यातून सुटली नाही. वसईजवळच्या एका वृद्धाश्रमात त्या अनामिकपणे सर्वसामान्य वृद्धेचे दुर्लक्षित जीवन कंठत होत्या. वृत्तपत्रांतील बातम्यांमुळे त्या परत एकदा उजेडात आल्या आणि अखेरच्या काळात प्रसिद्धीच्या झगमगाटाचा काहीसा अनुभव त्यांनी घेतला. अशी अनेक उदाहरणे बघावयास मिळतात. 

कलावंतिणीची तपश्चर्या 

गायकीच्या क्षेत्रात स्त्रियांनी बरेच यश संपादन केले, त्याला कलावंत घराण्यातील स्त्रियाच कारणीभूत आहेत. आज पांढरपेशा घरांमधील मुली कलोपासना म्हणून संगीत-नृत्य शिकतात, त्यामागे अशा अनेक कलावंतिणींची तपश्चर्या आहे. एक व्यवसाय म्हणून त्यांनी तो जोपासलाच, पण त्यापलीकडे जाऊन निखळ कला म्हणूनही या कलांचा सांभाळ केला गेला. फक्त व्यवसाय करणे सोपे. पण कलाकार म्हणून उभे राहताना या स्त्रियांना त्या क्षेत्रातील पुरुषी व्यवस्थेशी स्पर्धा करावीच लागली.

संगीत क्षेत्रातील घराण्यांच्या गायकीतील घराणी ही पुरुष गायकांकडे वेगळ्या भूमिकेतून पाहणारी होती. मुळात आपला वारस घडविण्याच्या प्रयत्नांतून इतर शिष्यांपेक्षा मुलाला जास्त विद्या देण्याचा प्रयत्न घडत असेच. त्यात स्त्री शिष्या ही त्या काळात व्यवसाय करणारी गायिकाच असल्याने त्यात गायनाची शिकवणी हा आर्थिक व्यवहारच बने. या सगळ्या परिस्थितीतूनही बेगम अख्तर, हिराबाई बडोदेकर, केसरबाई केरकर, मोगूबाई कुर्डीकर अशा अनेक जणी स्वतंत्रपणे पुढे आल्या.

पूर्वीच्या काळात ध्वनिमुद्रिकांच्या माध्यमातून अनेक गायिका पुढे आल्या. पुरुष गायकांपेक्षा स्त्रियांनी हे माध्यम अधिक लवकर स्वीकारले. यामागे मैफलीतील गाण्यात असलेली पुरुषांची मिरासदारी हे कारण होते. तसेच ध्वनिमुद्रिकेमुळे गायनाच्या घराणेशाहीतला वारसा व खास ज्ञान याला धक्का पोहोचत असल्याची भावना या गायकांमध्ये कुठेतरी रुजली असावी. ध्वनिमुद्रिकेच्या सुरुवातीच्या काळात स्त्रियांच्या ध्वनिमुद्रिका मोठ्या प्रमाणावर निघाल्या हे मात्र खरे आहे.

संगीत क्षेत्रातील स्त्री-मुक्ती संगीत मैफलीच्या क्षेत्रातही हिराबाई, केसरबाई, मोगूबाई यांच्यासारख्या गायिकांनी स्वतःचा खास ठसा उमटवला. मध्यंतरी गंगूबाई हनगल यांच्या 87 व्या वाढदिवशीच्या सत्कार समारंभात बोलताना विजय तेंडुलकर यांनी या तिघी गायिकांना संगीतक्षेत्रातील ‘स्त्री-मुक्ती रुजविणाऱ्या स्त्रिया’ म्हणून गौरविले ते सार्थच आहे. संगीतक्षेत्रातील पंडित, उस्ताद वगैरे बिरुदे स्त्रियांना लावली जात नाहीत या वास्तवाकडे त्यांनी निर्देश केला आणि गंगूबाई हनगल यांना 'उस्ताद' हे यथार्थ संबोधन बहाल केले. संगीताला समाजाभिमुख करून त्याचा प्रसार समाजाच्या सर्व घरांमध्ये करण्यात गायिकांचा वाटा फार मोठा आहे. अशा कलावंतांच्या परंपरेतील एक कलाकार मेनकाबाई शिरोडकर यांच्या कलोपासनेचे श्रेय हे त्यांच्या चुकांपेक्षा किंवा दुर्दैवी आयुष्यापेक्षा लहान ठरू नये. तसे होणे ही समाजाचीच अप्रतिष्ठा ठरणार नाही का?

Tags: समाजाची अप्रतिष्ठा विपन्न अवस्था उपेक्षेचे जगणे तपश्चर्या स्त्री-कलावंत सामाजिक disrepute of society bad stroke down life dedication to art lady artist social weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नंदिनी आत्मसिद्ध

पत्रकार, स्त्री-प्रश्नांच्या अभ्यासक, अनुवादक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके