डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्त्री अत्याचारांच्या मागे स्त्रीविषयक आस्थेचा अभाव व स्त्रीदेहाकडे बघण्याची उपभोगी दृष्टी हीच मुख्य कारणे आहेत. सारिका शहा, अमृता देशपांडे किंवा रिंकू पाटील यांच्यासारखी प्रकरणे यांतूनच निर्माण होतात. स्त्री-पुरुष नात्यात पारदर्शकता आणि सुसंवाद आल्याशिवाय आजची परिस्थिती बदलणार नाही. हे नाते परस्पर सहकार्याचे, विश्वासाचे आणि मैत्रीचे असणे आवश्यक आहे.

स्त्री-जीवनाचा विचार करताना अपरिहार्यपणे, स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारांची नोंद पदोपदी घ्यावी लागते, ही अत्यंत दुर्दैवाची आणि तेवढीच खरी बाब आहे. स्त्रियांचे आयुष्य आज खूप बदलले आहे. त्यांची शैक्षणिक प्रगती लक्षणीय आहे. विविध क्षेत्रांतून स्त्रियांच्या कर्तृत्वाची भरारी चिह्नांकित होताना दिसत असते. तरीही...., या ‘तरीही’ शब्दाशी ठेचकाळल्याशिवाय स्त्रीच्या समग्र जीवनाचा आलेख उभाच राहू शकत नाही, हे खेदजनकच आहे.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना स्त्रियांना येणारा अनुभव पाहिला तरी त्यांना कोणकोणत्या प्रकारांच्या अत्याचारांचा सामना करावा लागतो हे समजून येईल. नोकरी करणाऱ्या व शिकणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण आज वाढते असल्याने हा एक सार्वत्रिक प्रश्नच बनला आहे. कोणत्याही कामानिमित्त किंवा कारणानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक स्त्रीला समाजात वावरताना विविध त-हेच्या वाईट अनुभवांना तोंड द्यावे लागते, ते केवळ ती 'बाई' असते म्हणून. या एकाच नजरेतून स्त्रीवर्गाकडे पाहणाऱ्या पुरुषांची मानसिकता हा सार्वजनिक जीवनात स्त्रियांकरिता मोठाच त्रास ठरत असतो. अशा पुरुषांची संख्या फार मोठी नसेलही, तरीपण स्त्रियांना होणारा या 
त-हेचा उपद्रव हा सार्वत्रिक आहेच.

लैंगिक अत्याचाराचे प्रकार

रात्री-बेरात्री घराबाहेर राहावे लागणाऱ्या स्त्रियांनाच काय, पण अगदी दिवसाढवळ्या समाजात वावरणाऱ्या स्त्रियांना येणारे अनुभव काही कमी त्रासिक नसतात. हा एक प्रकारचा लैंगिक छळच असतो. बसमधून किंवा रेल्वेतून प्रवास करताना, तिकिटाच्या रांगेत उभे असताना किंवा कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी स्त्रियांना जाणूनबुजून करण्यात येणारे स्पर्श, त्यांना उद्देशून मारण्यात येणारे शेरे हे सर्व म्हणजे लैंगिक अत्याचाराचेच प्रकार आहेत. केवळ शारीरिक बलात्कार हाच लैंगिक अत्याचार नव्हे.

अश्लील पत्रे लिहिणे, फोनवरून असभ्य भाषेत संभाषण करून स्त्रियांना सतावणे असेही प्रकार घडत असतात. यातून स्त्रियांना होणारा मनस्ताप आणि त्रास असह्य असतो. त्यांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होऊ शकतो. संकोच, दडपण, भय अशा भावनांमुळे स्त्रिया अशा प्रसंगांच्या वेळी फारसा विरोध करताना दिसत नाहीत. एवदेच नव्हे तर त्याची याच्यताही उघडपणे करत नाहीत. दुर्लक्ष करणे आणि शारीरिक प्रकार असेल तर कसेबसे स्वतःला सोडवून घेणे हाच मार्ग बहुतेक जणी अवलंबतात. पण प्रत्येकीलाच याप्रकारे सुटता येत नाही. काही जणींना बळी पडावे लागते. अपमान, उपमर्द, नकोसे स्पर्श, बलात्कार आणि कधी कधी अपघात, मृत्यू अशांसाठी सामोरे जावे लागते.

अत्याचारांतून मृत्यू

गेल्या वर्षभरात अशा त-हेच्या अनेक घटना देशात घडल्या तेव्हा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देणारा कायदा करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाणही खूपच मोठे आहे. गेल्या जुलै महिन्यात चेन्नई येथे सारिका शहा नावाच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीला रिक्षातून जाणाऱ्या नऊ मुलांनी सतावले व तिचा पाठलाग केला. ती घाबरली आणि या घटनेच्या वेळी रिक्षाची धडक तिला बसून अपघात झाला. त्यातच तिचा काही दिवसांनंतर मृत्यू झाला. या भयंकर घटनेनंतर तामिळनाडू सरकारने छेडछाडविरोधी कायदा केला आणि संबंधित गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याची तरतूदही केली. यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर सडकछाप हिरोंना पकडण्यात आले. तरीही अशा  त-हेचे प्रकार चालूच राहिले आणि तरुण मुलींना उपद्रव होत राहिला.

गेल्या महिन्यातही याच त-हेची आणखी एक घटना घडली. दुर्गा ही 35 वर्षीय महिला आपल्या दोन सहकारी स्त्रियांबरोबर संध्याकाळच्या वेळी रस्त्यातून जात होती. या तिघीही एका बुटाच्या कंपनीत काम करणाऱ्या स्त्रिया. त्यांना रिक्षातून प्रवास करणाऱ्या सहा पुरुषांनी अडवले आणि ‘तुमची नावे सांगा', असा तगादा लावला. या तिघींनी दुर्लक्ष केले व त्या तशाच चालत राहिल्या. तरीही त्यांचा पाठलाग संपला नाही. दुर्गाने त्या माणसांना याचा जाब विचारला, तेव्हा रिक्षाच तिच्या अंगावर घालण्यात आली. यामुळे दुर्गाच्या डोक्याला जखम होऊन, नंतर सरकारी दवाखान्यात तिचे निधन झाले. या माणसांना आता अटक झाली असून यथावकाश कारवाईनंतर त्यांना शिक्षा होईलही. दुर्गाला मात्र जीव गमवावा लागला. तोही तिचा काहीच अपराध नसताना.

प्रवासातील राखीव जागा ही घटना अत्यंत भयावह अशी आहे. आपल्या छेडछाडीला अनुकूल प्रतिसाद मिळत नाही, हे पाहिल्यावर, संबंधित स्त्रीवर शारीरिक प्राणघातक हल्ला चढवणे हा या पुरुषांना जणू आपला हक्कच वाटला. ही प्रवृत्तीच निषेधार्ह आहे. अशा प्रकारची दूषित दृष्टी बाळगणाऱ्याचे दडपण स्त्रियांवर सतत असल्यामुळेच आजच्या समानतेच्या युगातही सार्वजनिक ठिकाणी (उदा. रेल्वे, बस प्रवास, आरक्षणाच्या खिडक्या इ.) स्त्रियांकरिता राखीव जागांची मागणी करणे अनिवार्य ठरते. दक्षिणेकडील राज्यांतून बसमध्ये महिलांकरिता एक बाजू राखीव असते.

मुंबईत बेस्टच्या बसमध्येही 4-6 आसने महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. परंतु या सवलतीकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती बाळगून पुरुषमंडळी सर्रास या जागा बळकावून बसतात. दुर्गाच्या मृत्युघटनेनंतर हे स्पष्ट झाले आहे की, सरकार आपल्या स्त्रियांना संरक्षण पुरवण्याच्या कर्तव्याचे पालन करण्यात कमी पडते. सारिका शहाच्या मृत्यूनंतर चेन्नई शहरात बस, रेल्वे स्थानके अशा ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. परंतु हळूहळू त्यात ढिलाई येत गेली व वर्षाच्या आतच परत एक तशीच घटना घडली. पहिल्या घटनेतील आरोपीवरची कारवाई अजूनही पूर्ण झालेली नाही.

मानसिक बळ

मध्यंतरी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा बसण्यासाठी कायदा झाला. परंतु या कायद्याचा आधार घेण्याचे मानसिक बळ संबंधित स्त्रीच्या अंगी येण्यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका निर्णयानुसार स्त्रीवर या प्रकारचा अत्याचार होणे हा तिच्या जगण्याच्या मूलभूत हक्कावरील घालाच ठरतो. अशा रीतीने तिच्यावरील लैंगिक अत्याचार हा मानवी हक्कांची पायमल्ली ठरवण्यात यावी असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निवाड्यातही अत्यंत प्रागतिक आणि सहानुभूतिपूर्ण असा दृष्टिकोन व्यक्त झाला आहे.

स्त्रियांच्या संदर्भातील भेदभावांचे निराकरण होण्यास अनुकूल अशी भूमिका न्यायालयाने घेतली आहे. कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ दूर होण्यासाठी उचलाव्या लागणाऱ्या पावलांकरिता मार्गदर्शक तत्त्वे ठरवून देतानाच, न्यायालयाने भारत सरकारने सह्या केलेल्या दोन करारांकडे लक्ष वेधले आहे. आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांच्या संदर्भातील स्त्रीहक्कांची जपणूक करण्याचे आवाहन यात आहे. स्त्रियांच्या संदर्भातील विविध प्रकारचा भेदभाव नष्ट करण्यासाठीचा करार आणि चौथ्या बीजिंग आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या वेळी सह्या करण्यात आलेला करार यांकडे निर्देश करून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला आपल्या स्त्री हक्कांशी असलेल्या वचनबद्धतेची आठवण करून दिली आहे. हे करतानाच न्यायालयाने भारतीय घटनेच्या तत्त्वांच्या विरोधात न जाणाऱ्या सर्व करारांना कायद्याचा दर्जा बहाल केला आहे. या प्रकारे स्त्रीहक्कांच्या संबंधातील करारातही कायद्याचा दर्जा प्राप्त होतो. म्हणूनय स्त्रीहक्कांची जपणूक होणे हे सरकारचे कर्तव्यपालन ठरते.

देशातील स्त्रीवर्गाशी सरकार ज्या प्रकारे सामाजिक हिताच्या तत्त्वाच्या धाग्याने बांधील आहे. तसेच कायद्यानेही ते स्त्रीहक्कांशी जोडले गेले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय स्त्रीवर्गाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तरीही सरकारने जेव्हा भेदभावविषयक (Convention for Elimination of Discrimination Against Women - CEDAW) करारावर सही केली (1992) त्या वेळी ती सशर्त होती. ज्या ठिकाणी स्त्रियांचे मानवी हक्क यांचा धार्मिक आणि सांस्कृतिक हक्कांशी संघर्ष होण्याची परिस्थिती असेल, तेथे स्त्रीहक्कांकडे कायदा म्हणून बघता येणार नाही अशी अट घालूनच या सह्या करण्यात आल्या होत्या.

संघर्ष आणि वादावादीच्या परिस्थितीतून स्वतःची सुटका करणाऱ्या सरकारला स्त्रीहक्कांविषयी असलेली सहानुभूती किती खरी आहे हे यावरून स्पष्ट होते! सरकार कोणत्याही पक्षाचे असो, त्याची पुरुषी वर्चस्वाची व दृष्टिकोनाची मानसिकता फारशी वेगळी नाही हेच यावरून सिद्ध होते. आजच्या काळातही राजराजेश्वरी महिला कल्याण विमा योजनेअंतर्गत मिळणारे फायदे बलात्कार झाल्यामुळे अपंगत्व आलेल्या स्त्रीलाही मिळू शकतील, असे कलम नियमावलीत समाविष्ट करण्यास सार्वजनिक क्षेत्रातील जनरल इन्शुरन्स कंपनी मागेपुढे पाहत नाही. यावरून स्त्रीविषयक आस्थेचे (?) अपूर्व असे दर्शनच घडते.

उपभोगी दृष्टी

स्त्री-अत्याचारांच्या मागे या आस्थेचा अभाव आणि स्त्रीदेहाकडे बघण्याची उपभोगी दृष्टी हीच मुख्य कारणे आहेत. स्त्री हे फक्त एक शरीर आहे अशीच दृष्टी बाळगणारे अनेक जण समाजात वावरत असतात आणि त्याच्यामुळे स्त्रियांना सन्मानहीन असे अनुभव घ्यावे लागतात. त्यातच आपल्या सांस्कृतिक परंपरांचा आधार घेऊन स्त्री-पुरुष नात्याचा सोयीचा अर्थ लावला जातो. श्रीकृष्ण आणि गोपी यांच्या रासक्रीडेचा संदर्भ मनात ठेवून मुलींची छेडछाड काढली जाते. होळीच्या वेळी रंगांचा खेळ खेळण्याच्या निमित्ताने स्त्रियांना त्रास दिला जातो. गरबा आणि दांडियाचे लोणही आता सर्वदूर पसरले आहे. या निमित्तानेही स्त्रियांना होणारा उपद्रव वाढला आहे.

मुंबईत तर गोकुळाष्टमी, होळी अशा सणांच्या आसपास रेल्वे-बसमधून प्रवास करणाऱ्या बायकांच्या अंगावर फुगे मारले जाण्याचा अनुभव झेलण्याची तयारी ठेवावी लागते. संस्कृती आणि परंपरांचा आधार घेऊन स्त्रीवर्गाला लक्ष्य बनवायचे, हा प्रकार आज सार्वत्रिक बनला आहे. याचाच एक परिणाम म्हणून की काय अपवादात्मकरीत्या का होईना, पण मुलांची छेड़ मुलीनी काढण्याचे प्रकारही कधी कधी आढळून येतात किंवा मुलांनी छेड काढली तरी त्यात काहीतरी विशेष सन्मान झाला असे काही जणी वाटून घेतात. या सर्व प्रकारांतूनही परिस्थितीशरणताच दिसून येते.

पुरुष जे जे करतो ते सर्व करण्याची तयारी दाखवणे हे मूर्खपणाचेच आहे. त्यातून स्त्रिया स्वतःवरच अन्याय करत असतात. स्वतःच बळी होण्याचे कबूल करत असतात. स्त्री-पुरुष नात्यात नितळता, पारदर्शकता आणि सुसंवाद आल्याशिवाय आजची परिस्थिती बदलणार नाही. 'कामप्रेरणा' ही मानवी जीवनातील एक सुंदर आणि नैसर्गिक भावना आहे. मात्र सुसंस्कृतता नसेल तर त्यातूनच लैंगिक विकृती आणि शारीरिक अत्याचार उद्भवू शकतात. सारिका शहा, दुर्गा, अमृता देशपांडे किंवा रिंकू पाटील यांच्यासारखी प्रकरणे त्यातून निर्माण होतात. स्त्री-पुरुषांमधील नाते परस्पर सहकार्याचे, विश्वासाचे, मैत्रीचे आणि मोकळेपणाचे असणे आवश्यक आहे.

लैंगिकतेच्या पलीकडे जाऊन एकमेकांविषयी विचार करता येणे हे या संदर्भात महत्त्वाचे ठरते. स्त्री व पुरुष दोघेही माणूस आहेत आणि हे माणूसपणाचे परिमाण जोपासले जाणे अत्यंत गरजेचे आहे. घरापासूनच स्त्री-पुरुषांच्या नात्यातील मोकळेपणाची सुरुवात झाली, तर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी स्त्री-पुरुष एकत्र आल्यावर अत्याचारासारखे प्रकार होणार नाहीत. मुळात हा विषय आणि त्या संबंधांतील काम हे अतिशय अवघड व गुंतागुंतीचे आहे. परंतु सुसंवाद साधतच या बाबतची जागरूकता प्रत्यक्षात आणावी लागेल. तसेच स्त्रियांना उपद्रव देणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कठोर उपाययोजना करणेही आवश्यक आहे. केवळ 'बाई’ची जात आहे म्हणून अत्याचाराचा बळी ठरण्याचे स्त्रियांचे भागधेय बदलायलाच हवे. त्या बाबतची जबाबदारी सरकारने उचलायलाच हवी.

Tags: स्त्री-पुरुष समानता उपभोगी दृष्टी पुरुषी वर्चस्व लैंगिक अत्याचार स्त्रीविषयक सामाजिक gender equality consumerist vision masculine domination sexual oppression feminine social weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नंदिनी आत्मसिद्ध

पत्रकार, स्त्री-प्रश्नांच्या अभ्यासक, अनुवादक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके