डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘फायर’ वरील बंदी, ख्रिस्ती जोगिणींवरील बलात्कार, निलोफर भागवत यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप अशा अनेक घटनांमधून धार्मिकतेचा ताठर, कठोर आणि आक्रमक चेहरा समोर येत आहे. स्त्रीला सातत्याने जायबंदी करणारी धर्माची नजर स्वतःच्या अंतरंगातील अपप्रवृत्तींकडे वळण्याची गरज आहे.

----------

विवाहानंतर नवऱ्याच्या कुटुंबात समरस होऊन जाण्याची कसरत प्रत्येकच स्त्रीला करावी लागते. आंतरधर्मीय विवाहांमध्ये तर अनेकदा स्त्रीची कसोटीच लागते. स्त्रीने आपला धर्मही बदलण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आणि अनेकदा अशा विवाहांमध्ये माहेरून पाठबळ नसल्याने स्त्रीला सासरच्या घराला धरून राहण्यासाठी या आग्रहापुढे मान तुकवावी लागते.
 

‘हजार चुराशिर माँ’ या महाश्वेता- देवींच्या कादंबरीतील आई आपल्या नक्षलवादी मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्याबद्दल विलक्षण हळवी होते. समाजाने आणि कुटुंबानेही बहिष्कृत केलेल्या मुलाच्या मनातील घालमेल आणि चांगुलपणा यांच्या पार्श्वभूमीवर इतरांच्या ढोंगीपणाचे दर्शन तिला होते. पण ती काहीच करू शकत नाही, आतल्या आत वेदनेने पिचत मात्र असते. मुलाच्या मागे, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणारी ही आई काळजाला घरे पाडणारी व्यक्तिरेखा आहे. 

महेश भटच्या ‘ज़ख्म’ मधील आई-मुलाचे नातेही असेच ह्रदय स्पर्श करून जाणारे आहे. एक आई हिंदू व एक मुस्लिम पण दोन्ही स्त्रीया या माणूसच, धर्म बदलला तरी नाती बदलत नाहीत; ‘स्त्री’ चा धर्मही बदलत नाही… 

आत्मकथात्मक चित्रपट देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भट यांनी ‘ज़ख्म’ या चित्रपटाद्वारे परत एकदा स्वतःच्या आयुष्यातील एक धागा उचलून हा चित्रपट साकारला आहे. त्यांची आई मुस्लिम होती तर वडील हिंदू. त्या दोघांचे रीतसर लग्नही झालेले नव्हते. ‘ज़ख्म’ मधून भेटते ती अशीच एक कथा, रमण देसाई आपल्या मुस्लिमधर्मीय प्रेमिकेशी विवाह करू शकत नाही. सामाजिक बंधनापुढे तो मान तुकवतो. त्याला तिच्यापासून दोन मुले मात्र होतात. मोठा अजय आणि धाकटा आनंद. धाकट्या मुलाच्या जन्मानंतर त्याला बघण्यासाठी येतानाच रमणचे अपघाती निधन होते. आपल्या वडिलांचे दुसरे लग्न झालेले आहे. याची कल्पना अजयला आईनेच दिलेली असते, पण आपली आई धर्माने मुसलमान असल्याचे मात्र त्याला वडिलांच्या मृत्यूनंतरच समजते. धाकट्याला हे रहस्य कळू न देण्याची गळ अजयला आईनेच घातलेली असते. आपल्या मृत्यूनंतर मात्र आपले दफनच केले जावे अशी इच्छा आईने अजय जवळ बोलून दाखवलेली असते. 

मुंबईतल्या दंगलींच्या वातावरणात अजयच्या आईला काही मुस्लिम युवक अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळतात; हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू होतो. जहाल हिंदुत्ववादी संघटनेत असलेला अजयचा धाकटा भाऊ सुडाने पेटून उठतो. तेव्हा अजय त्याला वस्तुस्थितीची कल्पना देतो आणि त्याचे मतपरिवर्तनही करतो. आईचा दफनविधी करण्याविषयीही त्याला अनुकूल करून घेतो.

आंतरधर्मीय विवाहांचे वास्तव

हिंदू-मुस्लिम किंवा आंतरधर्मीय विवाह हा विषय चित्रपटाला अगदीच नवीन नाही. ‘बॉम्बे’ मधून हाच विषय हाताळला गेला होता. तीही दंगलीच्या पार्श्वभूमीवरचीच कथा होती. ‘शंकर-हुसैन’ किंवा 1961 साली आलेल्या यश चोप्रा दिग्दर्शित ‘धर्मपुत्र’ मध्ये दुसऱ्या धर्माने प्रतिपाळ केलेल्या मुलांची कथाही येऊन गेली होती. ‘धर्मपुत्र’ मध्ये तर मुस्लिम आई-वडिलांच्या पोटी जन्माला आलेला, पण काही कारणाने हिंदू कुटुंबात वाढलेला आणि पुढे जहाल हिंदुत्ववादी बनलेला नायक शशी कपूरने रंगवला होता. महेश भटच्या या चित्रपटातूनही धर्माच्या पलीकडे जाणाऱ्या प्रेमाच्या आणि रक्ताच्या नात्यावर भर देण्यात आला आहे. हिंदू वडील आणि मुस्लिम आई यांचा कायदेशीर विवाह न होताही त्यांच्या नात्याला परिपूर्णता येऊ शकते हे ठसवले आहे. त्याचबरोबर एक स्त्री म्हणून चित्रपटातील आईची व्यक्तिरेखा दमदारपणे साकारण्यात जाली आहे. पूजा भटने वयाची अनुकूलता नसतानाही ही भूमिका विशेष ताकदीने सादर केली आहे याचाही उल्लेख करायलाच हवा. 

‘ज़ख्म’ मधली आई धर्माने मुस्लिम असून, आपल्या हिंदू प्रियकराशी विवाह होण्याची शक्यता दुरावलेली असतानाही त्याच्याशी एकनिष्ठ राहते. त्याच्या लग्नानंतर त्याच्यावरचा आपला अधिकार संपला हे मान्य करते. तरीही, रमणवरची तिची शुद्ध रूप प्रीती अविचलच राहते. त्याच्यापासून झालेल्या मुलांना वाढवताना आपल्या धर्माची छायाही त्यांच्यावर पडू देत नाही. नमाजही ती मुलांना कळू न देता पढते. कोणत्याही पारंपरिक भारतीय पतिव्रता स्त्रीप्रमाणे ती वागते. आपला अंत्यविधी मात्र मुस्लिम धर्मानुसार व्हावा, अशी तिची इच्छा असते. तिच्या इच्छेचा सन्मान राखला जावा यासाठी तिचा थोरला मुलगा अजय प्राणपणाने झटतो आणि यशस्वीही होतो. आई-वडिलांच्या स्वर्गातील मीलनाचा आपण जणू साक्षीदार असल्याची त्याची भावना होते. आयुष्यभर उपेक्षा आणि वेदनेचा सामना करणाऱ्या एका स्त्रीची एक तरी इच्छा तिच्या मरणानंतर पूर्ण होते.

विवाहानंतर पतीच्या आयुष्याला समर्पणाच्या भावनेने वाहून घेण्याची परंपरा भारतीय स्त्रीने शतकानुशतके सांभाळली आहे. ‘ज़ख्म’ मधली नायिकाही अनेक अर्थांनी अशीच एक पारंपरिक भारतीय स्त्री आहे. एक अविवाहित पतिव्रता आहे. तिला जिवंत जाळणाऱ्याकडेही संयत दृष्टिकोन ठेवून बघण्याचे संस्कार आपल्या मुलावर करणारी एक आई आहे. आपण आपल्या धर्माचे श्रद्धेने पालन केले तरच आपल्याला ‘जन्नत’ मध्ये जागा मिळेल आणि तिथे आपली आपल्या नवऱ्याशी गाठ पडेल अशी तिची भावना आहे. म्हणूनच आपले दफन व्हावे ही तिची आग्रहाची इच्छा आहे. 

‘ज़ख्म’ च्या कथानकाच्या पार्श्वभूमीवर आंतरधर्मीय विवाहांच्या वास्तवाकडे लक्ष वेधल्यास काही गोष्टी स्पष्ट होतात. एक तर आंतरधर्मीय विवाह आजही अगदी सर्रास घडत नसले, तरी भारतीय समाजाला ते सर्वस्वी नवे नाहीत. विवाहानंतर नवऱ्याच्या कुटुंबात समरस होऊन जाण्याची कसरत प्रत्येकच स्त्रीला करावी लागते. आंतरधर्मीय विवाहांमध्ये तर अनेकदा स्त्रीची कसोटीच लागते. स्त्री म्हणून जगताना येणाऱ्या अनेक दबाव-दडपणांबरोबर एक नवे ओझे अशा वेळी स्त्रीवर येऊन पडते. इतर अनेक गोष्टींप्रमाणे स्त्रीने आपला धर्मही बदलण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आणि अनेकदा अशा विवाहांमध्ये माहेरून पाठबळ नसल्याने स्त्रीला सासरच्या घराला धरून राहण्यासाठी या आग्रहापुढे मान तुकवावी लागते. अर्थात अशा तऱ्हेचे प्रकार अलीकडच्या काळात कमी झाले असले, तरी काही वर्षांपूर्वीपर्यंत आंतरधर्मीय विवाहात बहुधा धर्मांतर हे व्हायचेच. अपवादात्मक ठिकाणी पुरुषाने आपला धर्म बदलण्याच्या घटनाही घडत. 

धर्माचे स्वरूप पुरुषसापेक्ष 

वास्तविक धर्म ही एक व्यक्तिगत बाब आहे. तुम्ही कोणत्या धर्माच्या कुटुंबात जन्माला यावे हे तुमच्या हातात नसते. आयुष्यात वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर येईपर्यंत धर्मसंकल्पनेचा गंभीरपणे विचार करण्याची क्षमता माणसाला प्राप्त होत नाही. जन्माबरोबर त्याला एखादा धर्म मात्र नक्कीच चिकटतो. त्याचे संस्कार पेतच त्याच्या जीवनाची वाटचाल सुरू राहते. आपल्या देशात प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा हक्क आहे. एखाद्यास धर्मांतर करावेसे वाटल्यास त्याला ते करता येऊ शकते. धर्मविषयक श्रद्धा-अश्रद्धा बाळगण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. घटनेने आपला देश निधर्मी किंवा ‘सेक्युलर’ असल्याचे म्हटले आहे. 

तरीही अशा देशात धर्माच्या नावाखाली दंगली होतात. कोणत्याही गोष्टीला किंवा घटनेला धार्मिकतेचा मुलामा चटकन दिला जातो. धर्माच्या आधारावर सत्तेचे राजकारण खेळले जाते आणि लोकशाही तत्त्वांना पदोपदी वेठीला धरले जाते. याचा सर्वांत जास्त त्रास होतो तो स्त्रीयांना. कारण जीवनाच्या इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे धर्माच्या क्षेत्रातही पुरुषी मनोवृत्तीचे वर्चस्व आहे. धर्माचे स्वरूप पुरुषसापेक्ष असे असते हे कोणत्याही धर्माकडे पाहिल्यास ध्यानात येईल.

स्त्रियांना उपेक्षेचा दर्जा

स्त्रीपुरुषांमधील लैंगिक नात्याचे उदात्तीकरण करून विवाहसंस्था आणि पर्यायाने कुटुंबसंस्था अस्तित्वात आली. मानवी समाजाच्या कल्याणाच्या हेतूने स्त्रीपुरुषसंबंधांची जोडणी धर्म या संस्थेशी करण्यात आली. पुरुषी वर्चस्वामुळे आणि एक केन्द्री सत्तेच्या हातून धर्माची चौकट बंदिस्त होत गेली. अधिकाधिक कठोर, कर्मकांडाला महत्त्व देणाऱ्या धर्माकडून स्त्रीयांना सतत दबावाखाली ठेवण्याचे तंत्र अवलंबिले गेले. धर्म ही अत्यंत व्यक्तिगत बाब आहे आणि तिचा कोणत्याही सामाजिक अथवा सार्वत्रिक गोष्टीशी संबंध नाही असे समजणाऱ्यांना नास्तिकापेक्षाही उपेक्षेचा दर्जा देण्याची प्रवृत्ती आज वाढत आहे. रूढ धर्माच्या पलीकडची वाट चोखाळणाऱ्या जर स्त्रिया असतील तर ते सहन करण्याची तयारी अजिबातच दाखवली जात नाही. 

‘ज़ख्म’च्या निमित्ताने आधी सेन्सॉर बोर्ड, केन्द्र सरकार आणि त्याच्या वितरणानंतर काही ठिकाणी विशिष्ट मनोवृत्तीच्या लोकांनी घातलेला गोंधळ हे अशा संकुचित आणि आक्रमक प्रवृत्तीचेच द्योतक आहे. ‘फायर’ चित्रपट, मध्यप्रदेशातील ख्रीस्ती जोगिणींवर झालेल्या बलात्कारांच्या घटनेकडे हेतुपुरस्कर करण्यात आलेले दुर्लक्ष, गुजरातमधील ख्रीस्ती समाजावरील वाढत्या हल्ल्यांच्या संदर्भातील संदिग्ध विधाने, अॅडमिरल विष्णू भागवतांच्या बडतर्फीच्या नंतर त्यांच्या पत्नी निलोफर यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप अशा अनेक घटनांमधून धार्मिकतेचा ताठर, कठोर आणि आक्रमक चेहरा समोर येत आहे. धर्माच्या या रंगामागे असलेली प्रवृत्ती निषेधार्ह आहे. स्त्रीच्या भावनेवर घात घालणारी आणि तिला सातत्याने जायबंदी करणारी धर्माची नजर स्वतःच्या अंतरंगात असलेल्या अपप्रवृत्तीकडे वळण्याची आज खरी गरज आहे.
 

Tags: आंतरधर्मीय लग्न कुटुंबसंस्था फायर ज़ख्म चित्रपट महेश भट नंदिनी आत्मसिद्ध Inter religious Marriage Family Fire Jakhm Movie Mahesh Bhat Nandini Aatmsiddh weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नंदिनी आत्मसिद्ध

पत्रकार, स्त्री-प्रश्नांच्या अभ्यासक, अनुवादक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके