डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आपल्या विरोधकांचा समूळ काटा काढण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. एकट्या दिल्लीतच गेल्या वर्षभरात सात पत्रकारांची हत्या झाली. विचार व वृत्तपत्र-स्वातंत्र्याच्या प्रतिष्ठेसाठी अनेक जण लढा देत असताना पत्रकारांच्या जिवावरच घाला पडावा ही खेदाची गोष्ट आहे. शिवानीसारख्या ठिणगीने दिलेला लढा त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

आपण आपले काम चोखपणे करत राहणे हा जीवनाचा खरा मंत्र आहे आणि हा मंत्र जोपासणाऱ्या व्यक्तीला कधीही पराभव पत्करावा लागत नाही असे मानले जाते. पण कधी कधी एखाद्याचे प्रामाणिकपणे काम करत राहणे हे दुसऱ्या कुणालातरी अडचणीचे ठरत असते. ‘इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम करणाऱ्या शिवानीबाबत हेच घडले. गेल्या काही वर्षांमध्ये धडाडीने वेगवेगळ्या क्षेत्रांमधील खळबळजनक आणि महत्त्वपूर्ण बातम्या देणाऱ्या शिवानीला स्वतःच्या जिवाचीच किंमत चुकवावी लागली.

दिल्लीमधल्या राहत्या घरातच शिवानीचा गेल्या महिन्यात खून करण्यात आला. शिवानीचा खून नेमका कोणी व कोणत्या उद्देशाने केला याचा पूर्ण तपास अद्याप लागायचा असला, तरी हा खून चोरीच्या हेतूने झाला नसल्याचे स्पष्ट आहे. तसेच खून झाल्यानंतर घरात झालेली सामानाची उलथापालथ, कागदपत्रे व कॅमेरा गहाळ होणे अशा काही गोष्टी शिवानीच्या कामाशी या खुनाचा संबंध असल्याचा संकेत देतात. तरीही यामागे काही व्यक्तिगत कारण असल्याचीही शक्यता आहे. अर्थात काहीही असले, तरी शिवानीसारखी निर्भय, उत्साही आणि धडाडीची पत्रकार पत्रकार-व्यवसायाने गमावली आहे हे सत्यच आहे. 

शिवानी ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वर्तमानपत्रासाठी सर्वोच्च न्यायालय, कायदा मंत्रालय आणि सी.बी.आय. यांच्या संदर्भातील प्रतिनिधी म्हणून काम करीत होती. यापूर्वी तिने दिलेल्या हरियाणातील 30 कोटींच्या बिस्कीट घोटाळ्याच्या बातमीवरून खळबळ माजली होती. तसेच जनहित याचिकेच्या शुल्कात वाढ करण्याच्या प्रस्तावाची तिने दिलेली बातमीही गाजली होती. अखेरीस ही वाढ न करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारला प्यावा लागला होता . बाबरी मशीद पाडण्यापासून वाचवण्याची योजना सरकारने न राबवल्यामुळे ती घटना घडली याविषयीही तिने लिहिले होते. समाजाच्या हिताविरुद्ध घडणाऱ्या घटनांचा वेध घेऊन शिवानी या गैरप्रकारांना उजेडात आणण्याये काम अव्याहतपणे करत होती.

अतिशय तळमळीने आणि निष्ठेने हे काम करताना, कायद्याचा अभ्यासही ती कामास पोषक ठरेल यासाठी करीत होती. आपल्या कामाच्या गुणवत्तेचा आणि अचूकतेचा विचार करणारी आणि नेहमी वेगवेगळ्या विषयांचा पाठपुरावा करणारी शिवानी पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवून गेली. शिवानीने आपले काम निष्ठेने, निर्भयपणे आणि चिकाटीने केले. पण आपल्या तान्ह्या मुलाला पोरके करून क्रूर आणि पाशवी मरणाला बळी पडणे तिच्या वाट्याला आले.
 
एकाही हत्येचा तपास नाही 

गेल्या काही वर्षांमध्ये देशातील एकूणच हिंसक घटनांमध्ये वाढ झाली आहे. आपल्या विरोधकांचा समूळ काटा काढून आपली वाट मोकळी करण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. एकट्या दिल्लीतच गेल्या वर्षभरात तीन पत्रकारांची (त्यातील दोन स्त्रिया होत्या) हत्या झाली. त्यापैकी एकाही हत्येचा पूर्ण तपास लागलेला नाही. एकीकडे विचारस्वातंत्र्य, वृत्तपत्रस्वातंत्र्य या मूल्यांच्या प्रतिष्ठेसार्टी अनेक जण लढा देत असताना पत्रकारांच्या जिवावरच घाला घालण्याच्या घटना घडत आहेत ही खेदाची गोष्ट आहे. शिवानीसारख्या ठिणगीने दिलेला लढा वृत्तपत्रस्वातंत्र्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तिचे समर्पण हे निर्भयतेचे आणि कृतिशील निष्ठेचे प्रतीक आहे. तिला ठार मारणाऱ्या व्यक्ती आणि प्रवृत्ती भ्याड आणि अत्यंत निषेधार्ह अशा आहेत.

स्त्री पत्रकारांच्या अडचणी 

प्रसारमाध्यमातील व्यक्तींवर हले होण्याचे प्रमाण अलीकडे वाढत आहे. शिवानीच्या हत्येच्या निमित्ताने, स्त्री-पत्रकारांनाही अशा प्रकारच्या हिंसेचा सामना करावा लागू शकतो स्पष्ट झाले. एरवी पत्रकार म्हणून वावरताना स्त्रियांना येणाऱ्या अडचणी, त्यांना सोसावे लागणारे प्रसंग आणि कामाच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी त्यांना करावी लागणारी कसरत यांची यादीही मोठी लांबलचक ठरावी. स्त्रिया आज घराबाहेर पडून विविध क्षेत्रांमध्ये वावरत आहेत. मोठी पदे भूषवत आहेत. आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. याबद्दल करावी लागणारी धडपड त्या जिद्दीने करत आहेत. नोकरीत असणाऱ्या स्त्रियांचेही प्रश्न आहेत. अनेक प्रकारच्या कामांमध्ये रात्रपाळ्या कराव्या लागतात. त्यासाठी कामाच्या ठिकाणी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा आणि सुरक्षितता यांच्यासाठी कायदे अस्तित्वात आहेत; तरीही त्यांचे पालन पूर्णांशाने होतेच असे नाही. प्रसारमाध्यमांतून आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांच्या समस्या सर्वसामान्य नोकरदार स्त्रियांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांच्या कामाचे व त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षांचे स्वरूपही विशेष प्रकारचे आहे. मुळात पत्रकारितेच्या क्षेत्रात स्त्रिया गेल्या 20 वर्षांपासूनच अधिक पुढे येत आहेत. त्यापूर्वीही या व्यवसायात स्त्रिया होत्या. पण अलीकडेच महिला पत्रकारांच्या कर्तृत्वाचा जोर वाढला आहे हे खरे. पत्रकाराचे काम इतर नोकरदारांपेक्षा वेगळे असते. पत्रकाराला वेळेचे बंधन नसते, कामाच्या तासांचे बंधनही कायद्याने असले, तरी व्यवहारात कामाचे तास तेवढ्‌यास तेवढेच ठेवून चालत नाही. रात्री उशिरापर्यंत काम करणे, रात्रपाळी करणे, वेळी-अवेळी बाहेर जाऊन बातम्यांचे संकलन करणे- अशा चाकोरीतील नोकरीपेक्षा वेगळ्या कामामुळे पत्रकारितेच्या क्षेत्राकडे मुळात स्त्रिया आजही फारशा वळत नाहीत. पूर्वी तर हे प्रमाण फारच कमी होते.

शिक्षण पूर्ण झाले की अध्यापनाच्या क्षेत्रात किंवा कार्यालयीन कामकाजाच्या नोकऱ्यांमध्ये शिरून अर्थार्जन करण्याकडे स्त्रियांचा कल असे. आजही असतो. घरातूनही याच प्रकारचे संस्कार मुलींवर केले जातात. तरीपण बदलत्या काळाबरोबर स्त्रियांचे कार्यक्षेत्र रुंदावत गेले व त्यांचा वावर विविध क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या स्तरांवर होऊ लागला असल्याचे दिसून येते. तरीही पत्रकार म्हणून स्त्रियांना नोकरी देण्यास वर्तमानपत्रांच्या व्यवस्थापनांचा विरोध आणि नाखुशी सार्वजनिक होतीच.

अनेक मान्यवर वृत्तपत्रांतून महिलांना शक्यतो नोकरी न देण्याकडे कल असे. वृत्तपत्रांतील पत्रकारांच्या संख्येच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण फारच कमी असे. आता हे थोडे थोडे बदलत आहे. एखाद्या स्त्रीला पत्रकार म्हणून घेतलेच, तरी तिच्याकडे पुरवणीचा कार्यभार, बातम्यांचे अनुवाद किंवा बातमीदारीचे काम दिलेच, तर सांस्कृतिक हलकेफुलके क्षेत्र सोपवण्याचा प्रघात असे. आजही हा प्रकार पूर्णपणे संपलेला नाही. मात्र अलीकडच्या काळात आर्थिक, राजकीय, सामाजिक अशा क्षेत्रांतून अधिकाधिक महिला पत्रकार समर्थपणे वावरताना दिसतात. स्त्रियांचे अनेक प्रश्न महिला पत्रकारांमुळे चर्चेत येतात व त्यावर काहीतरी कृती होते असे दिसून येते. पत्रकारितेतही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची जिद्द, कर्तृत्व आणि सक्षमता स्त्रियांनी दाखवली आहे, यात शंकाच नाही. या कामाचे स्वरूप आणि ज्या परिस्थितीत हे काम करावे लागते ती परिस्थिती स्त्री-पत्रकाराच्या बाबतीत वेगळी नसते. आहे त्या परिस्थितीत काम करावे लागते. 

पूर्वी तर स्त्रियांना पत्रकार म्हणून काम करताना फारच अडचणी होत्या. त्यांचे प्रमाण कमी असल्याने त्यांना सुविधाही कमीच उपलब्ध असत. रात्री उशिरापर्यंत थांबायचे किंवा रात्रभर थांबायचे तर विश्रांतीची जागा, स्वतंत्र प्रसाधनगृह यांची गरज लागते, तर तशा सोयीही स्त्री पत्रकारांना अलीकडे मिळू लागल्या आहेत. अवेळी कामासाठी बाहेर राहावे लागते. पुरुष पत्रकारांच्या बरोबरीने कष्टाची तयारी ठेवावी लागते. तरीही त्यांच्या कामाविषयी वरिष्ठांना आणि पुरुष सहकाऱ्यांना साशंकता वाटते ती वेगळीच. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र स्त्रियांचे पत्रकारितेतील कर्तृत्व अधिकाधिक जोरदारपणे समोर येत आहे. त्यामुळे पत्रकारितेत स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी पडतात असे म्हणावयास जागाच उरली नाही. चित्रा सुब्रमण्यम या धडाडीच्या पत्रकार महिलेने बोफोर्स प्रकरणाविषयी बातमीपत्रे देऊन ते प्रकरण सातत्याने धगधगत ठेवले, हे उदाहरण पुरेसे बोलके आहे.
 
ठाकरे यांचे अनुचित वक्तव्य 

तरीपण स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज उरतेच. एक स्त्री- पत्रकाराबद्दल अनुचित वक्तव्य केल्याचा आरोप होऊन, शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचा निषेध मोठ्‌या प्रमाणावर करण्यात आल्याची घटना सर्वज्ञातच आहे. जबाबदार जागेवरच्या व्यक्तीही स्त्रियांबद्दल संकुचित आणि अनेकदा असभ्य दृष्टी बाळगताना दिसतात तेव्हा संतापजनक खेद जाणवल्यावाचून राहत नाही. समाजाचा जवळपास निम्मा हिस्सा स्त्रियांनी व्यापलेला आहे. सार्वजनिक जीवनात आज अनेक ठिकाणी स्त्रियांचा वाढता सहभाग आहे. देशाच्या सामाजिक, राजकीय, औद्योगिक आणि आर्थिक विकासात स्त्रियांचा वाटा कमी-अधिक प्रमाणात आहे.

राजकीय क्षेत्रात त्यांना वाव दिलाच जात नसल्याने त्यांची संख्या या क्षेत्रात त्या मानाने कमी आहे. पण महिला आरक्षण विधेयकाचा काहीतरी निर्णायक निकाल लागून हे चित्र बदलण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीतही स्त्रियांवर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणून त्यांना नामोहरम करण्याचे प्रयत्नही चालूच राहिले आहेत. पुरुषी वर्चस्वाच्या पगड्याखाली असलेल्या वातावरणातून वाट काढतच स्त्रियांना स्वतःचा विकास व प्रगती साधण्याची कसरत करावी लागत आहे. कुटुंबाच्या घडीची मोठीच जबाबदारी स्त्रीच्या शिरावर असते. ती बाजू सांभाळूनच तिला आपले व्यक्तिमत्त्व फुलवावे लागते.

कामाच्या क्षेत्रातही अनेक विरोधांतून तिला पुढे जावे लागते. तिथल्या विशिष्ट अशा परिस्थितीशी तडजोड करतच वाटचाल करावी लागते. आपल्या चांगल्या कामाबद्दलचे श्रेयही तिच्या पदरात सहजासहजी पडत नाही. तिने काही चूक केली असेल तर आणि अनेकदा तिची चूक नसतानाही तिला भलते परिणाम मात्र भोगावे लागतात. अरुणा शानभाग, मीना मोरे किंवा शिवानी अशांच्या वाट्याला येणारे दुर्दैवी प्रसंग केवळ तात्कालिक पुरुषी आक्रमकतेतून आलेले नसतात. त्यामागे भयावह आणि क्रौयपूर्ण असा सत्तेचा आणि दबावांचा रेटा असतो. या रेट्यामागची प्रवृत्ती नष्ट होणे गरजेचे आहे. त्यासाठी संघटित प्रयत्न होणे आवश्यक बनले आहे.

मुक्त वातावरणाचा पुरस्कार हवा 

वर्षभरापूर्वी पेरूमधील लिमा येथे महिला पत्रकार व प्रसारमाध्यमातील स्त्रियांची परिषद होऊन एक जाहीरनामा प्रसृत करण्यात आला होता. लॅटिन अमेरिकेतील परिस्थितीच्या संदर्भात या जाहीरनाम्यात विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. हा जाहीरनामा स्त्रियांच्या हक्कांच्या पायमल्लीच्या संपर्क हक्कांच्या बाजूने होता. स्त्री-पुरुषांचा प्रसारमाध्यमातील समान प्रकारचा सहभाग, अभिव्यक्ती-स्वातंत्र्याचा तसेच माहितीचा अधिकार, स्त्री-पुरुष पत्रकारांच्या हत्येचा निषेध- अशा गोष्टींकडे या मागण्यांचा रोख होता. आपल्याकडेही या त-हेचे संघटित प्रयत्न होऊन प्रसारमाध्यमातील मुक्त वातावरणाचा पुरस्कार होण्याची गरज आहे. विशेषतः स्त्री पत्रकारांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता स्त्री पत्रकारांची सशक्त अशी संघटना उभारली जायला हवी. स्त्री चळवळीने या प्रश्नातही लक्ष घातले पाहिजे, सध्याच्या वातावरणात हे फार निकडीचे बनले आहे. याची दखल सर्वांनीच घ्यायला हवी.

Tags: कामातील अडचणी पुरुषी वर्चस्व असमानता स्त्रियांना दुय्यम स्थान महिला पत्रकार पत्रकारिता difficulties in working male dominance unequality second position lady reporters journalism weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नंदिनी आत्मसिद्ध

पत्रकार, स्त्री-प्रश्नांच्या अभ्यासक, अनुवादक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके