डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे 1 ते 9 मे 2004 या काळात राष्ट्रीय ग्रंथोत्सव पार पडत आहे. हे पुस्तक प्रदर्शन बहुभाषिक ग्रंथांचे आहे, कारण विविध भाषांमधील लेखक व अनुवादक पुण्याचे रहिवासी अगर पुण्याशी संबंधित आहेत. साहित्य प्रसाराच्या आणि भाषिक संवादाच्या या उपक्रमाचं महत्त्व 'अनमोल', 'रसिक' आहेच, पण लोकांमध्ये भाषाविषयक जाणीव निर्माण करणं, भाषा हा आयुष्यातला महत्त्वाचा घटक आहे हे भान जागवणं आणि भाषेचा प्रसार साहित्य संस्कृतीच्या पलीकडेही रुजवणं यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न होणं गरजेचं आहे. हा लेख प्रसिद्ध होईल तेव्हा हा ग्रंथोत्सव समाप्त झालेला असेल.

भारतातील विविध भाषा आणि वेगवेगळ्या प्रांतांतून असणाऱ्या बोली हे या देशाचं वैविध्य आहे. इतक्या विपुल भाषा आणि त्यांतून होणारी साहित्यनिर्मिती हा अभिमानाचाच विषय आहे. हिंदीसारख्या व्यापक वापर असलेल्या भाषेद्वारे आणि इंग्रजीसारख्या शिक्षणक्षेत्रात राबता वाढलेल्या माध्यमभाषेमुळे विविध भारतीय भाषांमधील साहित्याची परस्परांतील देवघेवही अधिक सुलभ बनली आहे. पण या गोष्टीचा लाभ पाहिजे, तितका उठवला जात नाही. आपल्या भाषेच्या पलीकडे जाण्याची प्रवृत्ती खोलवर रुजल्याविना ही गोष्ट घडणारही नाही.

आज अशी परिस्थिती आहे की, भाषेबद्दलचं एक भान माणसाला स्वाभाविकपणे असतं, निदान असायला हवं तेच ओसरत चालल्याचा प्रत्यय येऊ लागला आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेवर किती प्रेम करता आणि ते कशा प्रकारे करता, हेही महत्त्वाचं आहे. जर तुम्ही तुमच्या मातृभाषेवर खरं प्रेम करत असाल, तर तुम्ही दुसऱ्या कुठल्या भाषेचा द्वेष कधीच करणार नाही. दुसऱ्या भाषेतील घडामोडींबद्दल, साहित्यनिर्मितीबद्दल आणि त्या भाषेतील प्रश्नांबद्दलही तुम्ही तितकेच जागरूक असाल पण आपण अशा रीतीने डोळे उघडे ठेवून वागतो का, हा खरा प्रश्न आहे.

या प्रश्नाला सकारात्मक उत्तर नाही, असंच काही म्हणता येणार नाही. इतकी निराशेची परिस्थिती अजिबातच नाही. मात्र आज गाफील राहून चालणार नाही, अशी वेळ निश्चितच आली आहे. भाषेच्या प्रश्नाला राजकीय हेतूंसाठी आणि त्या अनुषंगाने व्यक्तिगत लाभासाठी वेठीला धरणाऱ्यांमुळे हे घडत आहे. म्हणूनच भाषेच्या सर्वांगीण विचारात अन्य मुद्दे टाळले पाहिजेत. भाषा हे संवादाचं साधन आहे; माध्यम आहे. तिचं हत्यार होता कामा नये, या दृष्टीने भाषेविषयी सजग असणाऱ्यांनी प्रयत्नशील राहायला हवं. भाषा हे माणसामाणसांतील संवादाचं माध्यम आहे; तर अनुवाद हे भाषा-भाषांमधील परस्परसंवादाचं आणि देवघेवीचं साधन आहे. अंतिमतः विविधभाषी मानवसमूहांच्या परस्परसंवादाला प्रेरक आणि योजक ठरणारी ही भाषाच असते. पण एकूण भाषिक व्यवहारात, आपल्याकडे विविध भारतीय भाषांचा एकमेकींशी येणारा संपर्क हा हवा तेवढा निकटचा व सततचा नसतो. या क्षेत्रात खूप व्यक्ती आणि संस्था कार्यरत आहेत, तरीही आणखी खूप काही करण्यास वाव आहे. जेवढे हात यात गुंततील तेवढं हे कार्य पुढे जाईल. साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, ज्ञानपीठ, बिर्ला फाऊंडेशन, भारतीय भाषा परिषद अशा आणि इतर अनेक संस्था या दृष्टीने कार्य करतच आहेत. याव्यतिरिक्त, प्रांतीय साहित्य अकादमीच्या संस्था, राज्य मराठी विकास संस्था, हिंदी भाषा प्रचार सभा अशांसारख्या विशिष्ट भाषांसाठी, त्यांच्या विकासार्थ काम करणाऱ्या संस्थाही परस्परसंवादाच्या क्षेत्रातही कार्यरत असतातच. खाजगी पातळीवरही अनेक संस्था आणि प्रकाशनगृहं अनुवाद प्रसिद्ध करून किंवा अन्य तऱ्हेचे पुस्तकसंबंधित उपक्रम राबवून 'आंतरभारती'चं साने गुरुजींचं स्वप्न साकार करण्याच्या कामास हातभार लावत असतात.

पुण्यामध्ये 1 ते 9 मे 2004 या काळात आयोजण्यात आलेला 'राष्ट्रीय ग्रंथोत्सव' हाही याच वाटेवरून जाणारा आहे. हा लेख प्रसिद्ध होईल तेव्हा हा ग्रंथोत्सव समाप्त होत आला असेल. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे हा महोत्सव पार पडत आहे. पुण्यातील 'रसिक साहित्य' या नामवंत संस्थेच्या पुढाकाराने त्याचं आयोजन करण्यात आलंय. 'रसिक साहित्य’ ला आता चाळीस वर्ष पूर्ण होत आहेत. पुस्तक क्षेत्रातील वितरणाच्या आणि अनमोल प्रकाशनाच्या निमित्ताने प्रकाशन व्यवहाराचाही अनुभव गाठीशी असलेल्या या संस्थेनं आंतरभारतीच्या क्षेत्रातही आपलं योगदान देण्याचा संकल्प केला आहे. विविधभाषक भारतीयांचं एकमेकांशी असलेलं नातं दृढ करण्यासाठी साने गुरुजींनी आंतरभारतीची संकल्पना मांडली. हेच सूत्र उचलून 'रसिक साहित्य’ ने ‘रसिक आंतरभारती' या नावाने एक व्यासपीठ निर्माण केलं आहे. वेगवेगळ्या भाषांतून होणारी साहित्यनिर्मिती ही सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्त्वाची व मोलाची घटना आहे. या साहित्याचा परस्परसमन्वय व्हावा, विविधभाषकांचा परस्परांशी परिचय व्हावा व त्यातून चिरकाल संवादाची सुरुवात व्हावी यासाठी अशा तऱ्हेचे प्रयत्न होणं हे आवश्यकच असतं. 'रसिक आंतरभारती'तर्फे आयोजित होणाऱ्या या ग्रंथोत्सवास म्हणूनच महाराष्ट्रातील व बाहेरील कित्येक प्रकाशकांचा सहकार्याचा हात मिळाला आहे. 'रसिक साहित्य'चे नांदुरकर बंधू, पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ, लेखक रवींद्र पिंगे यांच्यासह अनेक मान्यवर या ग्रंथोत्सवाच्या समन्वयनिर्मितीत आहेत. या ग्रंथोत्सवाच्या जोडीला रसिक आंतरभारतीतर्फे इतरही अनेक कार्यक्रम व उपक्रम होणार आहेत. भविष्यातही अनेक योजना राबवण्याचा या मंडळींचा संकल्प आहे.

अनमोल राष्ट्रीय ग्रंथोत्सव हा 1 मे ते 9 मे 2004 या काळात न्यू इंग्लिश स्कूल, रमणबागच्या पटांगणात भरत आहे. देशातील 28 भाषांच्या पुस्तकाची विक्री या पुस्तक प्रदर्शनात होईल. विविध भाषांमधील प्रकाशक यात सहभागी होणार असून, महाराष्ट्रा-बाहेरूनही अर्थातच अनेक प्रकाशक यात सामील होतील. पुस्तकविक्री तर इथे होईलच, पण तिथे येणाऱ्यांना भाषिक व्यवहारांची, प्रश्नांची जाणही महत्त्वाची वाटावी, यासाठी काही उपक्रम राबवले जातील. विशेषतः लहान मुलांमध्ये इतर भाषांबद्दलचं भान जागावं यासाठी काही वेळ, स्पर्धा यांचं आयोजन करण्यात येईल. परस्परसंवाद वाढावा यासाठी हे उपक्रम असतील. कथेचं सूत्र मुलांना देऊन त्यांना कथा लिहायला लावणारी लेखनस्पर्धा अशा उपक्रमांमुळे भाषेबद्दलची आस्था त्यांच्यात वाढेल, अशी अपेक्षा यामागे आहे. 'ओवी ते हायकू' हा मनीषा दीक्षित यांचा कार्यक्रम, 'नक्षत्रांचे देणे' हा अल्फा टीव्हीवरील कवितांचा एकत्रित स्वरूपातील कार्यक्रम, मंटोच्या कथांवर आधारित सादरीकरण, याबरोबरच साहित्यविषयक चर्चा- संवादही या ग्रंथोत्सवात होणार आहेत. साहित्य हे अखेर जीवनाशी संबंधित असते, हे सूत्र धरून, 'साहित्य व इतर क्षेत्रे' अशा विषयाच्या अनुषंगाने परिसंवादही होईल. यात उदाहरणार्थ, अध्यात्म आणि साहित्य यांवर साखरे महाराज बोलतील तर चित्रपट आणि साहित्य यांवर जब्बार पटेल आपले विचार मांडतील. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते या राष्ट्रीय ग्रंथोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. यात विशेष भर हा युवावर्ग व बालवर्गावर ठेवून त्यांना आकर्षित करणारे अनेक कार्यक्रमही रोज होणार आहेत.

स्वतंत्र बालमंडप उभारून त्यात मुलांना वाव देणारे उपक्रम होतील. स्पर्धाबरोबरच भाषाविषयक जाणीव वाढवणारे उपक्रम तर मुलांइतकेच मोठ्यांनाही अभिनव वाटतील. विविध भाषांचे जाणकार व प्रेमी शिक्षणाच्या भूमिकेत शिरून येथे आपल्या भाषेची ओळख करून देतील. या भाषांची लिपी, उच्चार, नाद अशा सर्व अंगांची ओळख उपस्थितांना घडेल. एखादी भाषा कशी बोलली जाते. त्यातली पुस्तकं कशी असतात; अशा तऱ्हेची जाणीव यामुळे रुजेल. सुमारे दीडशे स्टॉल्समधून विविध भाषांमधील ग्रंथसंपदा बघायला, हाताळायला मिळेल. त्या त्या प्रांतातील खाद्यसंस्कृतीची झलकही येथे अनुभवायला मिळणार आहेच.

पुण्यासारख्या मराठमोळ्या चेहऱ्याच्या शहरात गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. मराठी चेहऱ्या-मोहऱ्याचं शहर म्हणून असलेली पुण्याची ओळख आज काहीशी बदलू पाहतेय. अनेक परप्रांतीय पुण्यात वस्ती करून आहेत. म्हणूनच पुण्यासारख्या (मराठी) शहरात आंतरभारती राष्ट्रीय ग्रंथोत्सव कसा काय बुवा, हा प्रश्न गैरलागू ठरतो. 'रसिक साहित्य’चे योगेश नांदुरकर यांच्याशी बातचीत केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की, हे पाऊल उचलण्यापूर्वी बराच शोध घेण्यात आला आणि अशा तऱ्हेचं बहुभाषी पुस्तक प्रदर्शन ही आजच्या पुण्याची गरज आहे हे त्यावेळी लक्षात आलं. पुण्यात हिंदी, बंगाली, कन्नड, तेलगु, गुजराती, सिंधी, पंजाबी अशा भाषा बोलणारे लोक मोठ्या संख्येने आहेतच, पण या भाषांमधील लेखक व अनुवादकही पुण्यात वास्तव्यास आहेत.

न.म.जोशींसारखा सिंधीचा जाणकार, इंदिरा पूनावाला या सिंधीतील लेखिका, मालती शर्मा या हिंदी लेखिका, पद्माकर जोशी, दामोदर खडसे असे हिंदी मराठी अनुवादक पुण्यातच राहतात. वासंतिका पुणतांबेकर या मराठीतून हिंदीत अनेक पुस्तकं अनुवादित करणाऱ्या भाषाप्रेमी गेल्या महिन्यापर्यंत पुण्यातच होत्या. धनश्री हळबे घेट मल्याळम् भाषेतून मराठीत अनुवाद करतात. उमा कुलकर्णी कन्नड-मराठीमधील संवादपूलच बनल्या आहेत. बंगाली लेखिका चित्रितादेवी पुण्यातच राहत आल्या आहेत. हिंदी समीक्षक मराठी आणि तौलनिक साहित्याभ्यासाचे जाणकार डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर अलीकडे पुण्यातच राहतात. गुजरातीचे अनुवादक असलेले, अलीकडेच दिवंगत झालेले मोहन वेल्हाळ पुण्यातच राहणारे. ही तशी खूपच छोटी यादी झाली. पुण्यात राहणाऱ्या विविध भाषी साहित्यप्रेमींची आणि लेखकांची संख्या यापलीकडे जाणारी आहे.

योगेश नांदुरकर यांनी तर सांगितलं की, 40-50 लाख वस्तीच्या पुणे शहरात 8 ते 10 लाख लोक हिंदीतर भाषक आहेत. हिंदी भाषकांची संख्याही मोठीच आहे. आज अन्य भाषकांच्या 9 संस्था पुण्यात कार्यरत आहेत. बंगाली भद्रलोकांची दुर्गापूजा येथे घाटात साजरी होते. या मंडळींची मदत घेऊनच या ग्रंथोत्सवाने आकार घेतला आहे. नॅशनल बुक ट्रस्ट या ग्रंथोत्सवात आहे. कोट्टायमहून डी.सी. बुक्स हे पुस्तक विक्रेते मोठा स्टॉल यात लावणार आहेत. तर मुंबईच्या गिरी बुक्सचाही लक्षणीय सहभाग यात आहे. मेहता प्रकाशनासारखी अनुवादाच्या क्षेत्रात भरीव काम करणारी संस्थाही प्रदर्शनात सहभागी होणार आहे. त्या त्या भाषांतील मंडळींचा राबता या ग्रंथोत्सवात असेल. त्यांच्या वावरण्यामुळे पुण्याच्या पटांगणात संपूर्ण भारताचं प्रतिबिंबच एकवटल्याचा प्रत्यय येणार आहे.

रसिक आंतरभारतीला असं वाटतं की, सर्व प्रांतातील वाचकांना आणि भाषांना एकत्र आणणं हे केवळ साहित्याच्याच नव्हे, तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये विकास घडवून आणणारं पाऊल ठरेल. परस्पर संवाद, भाषिक देवघेव, साहित्यिक आदानप्रदान आणि योगदान यांस यामुळे चालना मिळेलच. पण विविधभाषक समाजांना जोडणारा दुवाही यामुळे निर्माण होईल. संघटितपणाची भावना वाढीस लागेल; आणि उभ्या देशाला ते लाभदायी ठरेल.

सदर राष्ट्रीय ग्रंथोत्सव ही या प्रक्रियेची एक सुरुवात आहे. रसिक आंतरभारतीच्या भावी संकल्पांमध्ये व आयोजनांमध्ये परस्परसहकार्य व संवाद वाढवणारे अनेक उपक्रम आहेत. त्यात संगणकाचा वापर हा महत्त्वाचा दुवा राहील. संगणकाच्या मदतीने दोन भाषांना जोडण्याचं, दोन लिप्यांचाही समन्वय घडवण्याचं काम कसं केलं जातं हे या क्षेत्रातील लोकांना माहीतच आहे. ग्रंथोत्सव दरवर्षी आयोजित करण्याबरोबरच, साहित्यिक मेळावे, युवा पिढीच्या साहित्यक्षेत्रातील सहभागासाठी कार्यक्रम, साक्षरताप्रसारात सहभाग, हिंदी भाषेसाठी विशेष प्रयत्न, अनुवादाच्या संदर्भात समन्वयाचे काम करणाऱ्या व्यासपीठाची स्थापना अशा अनेक गोष्टी भावी वाटचालीसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय सर्वभाषिक पुस्तकांसाठी विक्रीव्यवस्था, संदर्भ ग्रंथालय, बहुभाषिक संपादन विभाग, जागतिक पातळीवरील भारतीय साहित्याच्या प्रतिनिधित्वासाठी कार्यक्रम अशा भावी योजनाही रसिक आंतरभारतीच्या विचाराधीन आहेत.

अर्थातच हे सर्व करण्यासाठी योग्य ती माणसं, संस्था यांचा सहकार्याचा हात मोलाचा ठरणार आहे. विविध भाषांतील साहित्यक्षेत्रामधील घडामोडींची माहिती देणारी मासिक पत्रिका काढण्याचा विचारही आपल्या मनात असल्याचं योगेश नांदुरकर यांनी सांगितलं. अर्थातच याकरिता या क्षेत्राविषयी आस्था असलेल्या व्यक्तींची व संस्थांची मदत आवश्यक आहे, याचीही जाणीव त्यांना आहे. एकाच पद्धतीचं काम परत परत होऊ नये, पुनरुक्ती टाळली जावी, म्हणजे आंतरभारतीचं काम आणखी लवकर पुढे जाईल असा दृष्टिकोन ठेवून, इतरांचं सहकार्य ते घेत आहेत.

साहित्यप्रसाराच्या आणि भाषिक संवादाच्या या उपक्रमाचं महत्त्व 'अनमोल', 'रसिक' आहेच; पण लोकांमध्ये भाषाविषयक जाणीव निर्माण करणं, भाषा हा आयुष्यातला महत्त्वाचा घटक आहे, हे भान जागवणं आणि भाषेचा प्रसार साहित्यसंस्कृतीच्या पलीकडेही रुजवणं यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न होणं गरजेचं आहे..

Tags: रामदास भटकळ रसिक साहित्य राष्ट्रीय ग्रंथोत्सव साने गुरुजी आंतरभारती बिर्ला फाऊंडेशन ज्ञानपीठ नॅशनल बुक ट्रस्ट साहित्य अकादमी इंग्रजी हिंदी साहित्य प्रांत भाषा Ramdas Bhatkal Rasik Sahitya National Book Festival Sane Guruji Antarbharati Birla Foundation Dnyanpith National Book Trust English Hindi Sahitya Akadami Area Language weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नंदिनी आत्मसिद्ध

पत्रकार, स्त्री-प्रश्नांच्या अभ्यासक, अनुवादक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके