डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

उर्दू भाषेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल 'सिराज औरंगाबादी राज्य पुरस्कार' जाहीर झालेल्या मैमुना दळवींकडे या भाषेविषयी एक आच आहे. उर्दूसारखी भाषा अभ्यासक्रमातून तरी फार मोठ्या प्रमाणावर अभ्यासली जात नसतानाही त्या भाषेचा व्यासंग करून तिच्या विकासास त्यांनी मदत केली हे त्यांचे मोठेच श्रेय म्हणावे लागेल. कोकणी मुसलमानांची लोकगीते संग्रहित करण्यासाठी त्यांनी अपरंपार मेहनत केली. त्याचप्रमाणे गरीब वस्त्यांत शिक्षणप्रसार व्हावा म्हणून स्वतःच्या पदराला खार लावून विद्यार्थ्यांना शिकवण्याचे व्रत त्यांनी घेतले. एक आस्थेवाईक भाषाप्रेमी आणि व्यापक सामाजिक दृष्टी असणारी व्यक्ती हीच त्यांची कायम ओळख आहे.

आयुष्यभर एखाद्या विषयाचा पाठपुरावा केल्यानंतर मिळालेला सन्मान हा त्या व्यक्तीला पुढेही काम करत राहण्याची प्रेरणा देत असतो. अलीकडेच महाराष्ट्र राज्य उर्दू अ‍ॅकॅडमीतर्फे उर्दू भाषेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल 'सिराज औरंगाबादी राज्य पुरस्कार' जाहीर झालेल्या उर्दू भाषेच्या अभ्यासक मैमुना दळवी यांच्याबाबतीत अगदी हेच म्हणता येईल. उर्दू अध्ययन आणि अध्यापन करणाऱ्या मैमुना दळवींकडे या भाषेविषयी एक आच आहे. आजकाल मुळात भाषांचा खोलात जाऊन अभ्यास करण्याची प्रवृत्ती कमी होत आहे आणि उर्दूसारखी भाषा अभ्यासक्रमातून तरी फार मोठ्या प्रमाणावर अभ्यासली जात नाही. अशा वेळी मैमुना दळवी यांच्यासारखी माणसं हा या क्षेत्रासाठी मोठाच दिलासा ठरतो.

मुंबई हीच मैमुना दळवींची जन्मभूमी आणि कर्मभूमी. त्यांचं कुटुंब मूळ कोकणातून आलेलं, त्यामुळे कोकणी आणि कोकणातील मुसलमानांची वैशिष्ट्यपूर्ण अशी उर्दू, या भाषांची त्यांना बालपणापासूनच चांगली ओळख आणि सराव आहे. घरात शिक्षणाचे संस्कार असल्याने त्यांचं शिक्षण उत्तमरीत्या पार पडलं आणि त्या अध्यापनाच्या क्षेत्रातच आल्या. बेलॅसिस रोडवरच्या अंजुमन इस्लामच्या मुलींच्या शाळेत त्या शिकल्या. नंतर जोगेश्वरीच्या इस्माईल यूसुफ कॉलेजातून त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं. उर्दू भाषेकडे ओढा असल्याने पदवी, पदव्युत्तर पदवीही त्याच भाषेत घेतली. 'मुंबईतील उर्दूचा विकास' या विषयावर प्रबंध लिहून पीएच.डी. केलं. इस्माईल यूसुफ कॉलेजमध्येच त्या शिकवू लागल्या आणि 1994 मध्ये 'रीडर' पदावरून निवृत्त झाल्या. उर्दू विभागप्रमुख म्हणून त्यांनी केलेली कामगिरीही महत्त्वाची आहे. उर्दू भाषेकडे आस्थेने बघण्याची आणि खोलात जाऊन या भाषेचा अभ्यास करण्याची प्रेरणा त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जागवलीच; पण इतरही विषयांच्या विद्यार्थ्यांवर तेवढीच माया केली. सर्वांशी अत्यंत आपलेपणाच्या भावनेने वागणं हे मैमुना दळवी यांचं वैशिष्ट्य आहे. अध्यापनाच्या क्षेत्रात या स्वभावामुळे त्यांची छाप पडली, यात नवल नाही.

भाषेच्या विषयातील त्यांची कामगिरी अतिशय मोलाची आहे. त्यांचा पीएच.डी.चा प्रबंध उर्दूच्या मुंबईतील विकासाचा वेध घेणारा होता. या संदर्भात फारशा नोंदी, कागदपत्रे वगैरे नसल्याने त्यांना खूप कष्ट घ्यावे लागले. 1793 ते 1914 या कालखंडाचा विचार त्यांनी या अध्ययनासाठी केला. उर्दू भाषेच्या मुंबईतील पाऊलखुणा दिसू लागल्या तेव्हापासूनचा हा काळ. सुरुवातीला त्यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या संदर्भातच अभ्यास करायचा होता; पण ही फारच मोठी उडी ठरेल आणि काम हाताबाहेर जाईल हे लक्षात आल्याने त्यांनी मुंबईवरच लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. या संपूर्ण कालखंडातील उर्दू भाषेचा सर्व क्षेत्रांमधील वावर हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. या भाषेतील कवी, लेखक, शिक्षणप्रसारक, संस्था, साहित्य, वर्तमानपत्रं, नाटक, लोकगीतं अशा विविध अंगांनी त्यांनी हा अभ्यास केला. विशेषतः या काळात उर्दूची वाढ आणि प्रसार उत्तम प्रकारे झाला, असं त्यांचं निरीक्षण आहे. मराठी आणि गुजराती भाषांतील लेखकांनीही या काळात उर्दूत लेखन केलं होतं. हा प्रबंध पुढे पुस्तकरूपाने प्रकाशित झाला. उर्दू भाषेच्या क्षेत्रातील तो एक संदर्भग्रंथ म्हणून आज ओळखला जातो.

मैमुना दळवींनी केलेलं आणखी एक मोलाचं योगदान म्हणजे कोकणी मुसलमानी लोकगीतांचा त्यांनी केलेला अभ्यास आणि संग्रह. अनेक वर्षांच्या अभ्यास-संशोधनानंतर त्यांनी हे लेखन केलं आणि 'कोकण और मुंबई के लोकगीत' हा ग्रंथ सिद्ध केला. तो फेब्रुवारी 2001 मध्ये प्रसिद्ध झाला. कोकणी मुसलमानांची जी लोकगीतांची परंपरा आहे, तिची त्यांना बालपणापासूनच ओळख होती. कारण लग्नसमारंभ, विवाहापूर्वीचे अनेक विधी, नामकरण, जावळ अशा अनेक प्रसंगी गाण्याची आणि नाचण्याची कोकणी परंपरा होती. आजही काही प्रमाणात ती जीवित आहे. अवतीभवती म्हटली जाणारी ही गाणी मैमुना यांच्या स्मरणात होतीच. ती सगळी एकत्र करावीत आणि त्यांचं अध्ययन करून लेखनही समोर ठेवावं हा विचार त्यांनी केला.

या लोकगीतांमधून समाजाचा एक इतिहासच पुढे आला आहे. त्यात येणारे कपड्यालत्त्यांचे, दागिन्यांचे संदर्भ, औजारांची, नातेसंबंधांची वर्णनं यावरून या रचनांचा काळ आणि त्या समाजाची रचना याबद्दल काही आडाखे बांधता येतात. शेतकरी, मजूर, घरात राबणाऱ्या स्त्रिया, गाडीवान, जात्यावर दळणाऱ्या महिला अशा अनेकांच्या तोंडी ही गीतं असत. कोकणी मुसलमानांच्या तोंडी कोकणी आणि उर्दू दोन्ही भाषांमधली गाणी येत. कधी दोन्हींचं एक निराळंच मिश्रण होत असे. कोकणातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये मुस्लिम मोठ्या संख्येने आहेत. स्थानिक मुसलमानांबरोबरच मेमन, कसाई, लेहरा, जुलाहे, दखनी, कच्छी, पठाण अशा बाहेरून इथे आलेल्या मुसलमानांची संख्याही मोठी आहे. 'जमाअती' म्हणजे कोकणी जमातीचे; आणि मासेमारी करणारे कोळी म्हणजे 'बाल्दी' अशा दोन मुख्य संप्रदायांनी कोकणी मुसलमान समाज बनला आहे. कोकणी मुसलमान मराठी आणि उर्दू दोन्ही भाषा बोलतात. याच भाषांतून शिकतात.

या मंडळींच्या लोकगीतामध्ये उर्दूप्रमाणे मराठी, कोकणी, फारसी असे शब्दही येतात. थोड्याफार फरकाने इतरत्रही इथली काही गीतं प्रचलित आहेत. मैमुना दळवींनी ही गीतं गोळा करण्यासाठी खूप भ्रमंती केली. एरवी आसपासच्या लोकांकडून, समारंभात गाणी म्हणणाऱ्या स्त्रियांकडून त्यांनी गाणी जमवलीच, पण कोकणातील अनेक गावांमधून हिंडून त्यांनी ही गाणी जाणून घेतली. स्वतः उतरवून घेतली. लोकगीतांचा हा खजिना कोळी लोकांपासून सर्वसामान्य गृहिणींपर्यंत अनेकांकडून मिळवला. पूर्वी स्पूलवर रेकॉर्ड करण्याची सोय होती. तर हा मोठा स्पूल घेऊन त्या सर्वत्र जात आणि गाण्यांचं ध्वनिमुद्रण करत. लोकांशी बातचीत करून त्यांना बोलतं करत. लग्नसमारंभात किंवा इतर कौटुंबिक कार्यक्रमांतून सहभागी होताना अथवा मुद्दाम जाऊन गाणी ध्वनिमुद्रित करण्याचं काम त्यांनी अनेकदा केलं. साखरपुड्याच्या वेळचं 'बेटी किस घर दिये जी बेटी किस घर दिये’ किंवा नावेतून मासेमारीवर समुद्रात गेलेल्या कोळ्यांचं 'अल्लामियां बन्दे तेरे, आएगी पवन जाएँगे किनारे' अशी ही लयदार, मधुर गीतं आहेत. शेकडो गीतांचा हा संग्रह हे मोठं काम आहे. सरोजिनी बाबर, शांताबाई शेळके, रा. भि. जोशी, सेतुमाधवराव पगडी अशा अनेक मान्यवरांनी त्यांच्या या कामाची प्रशंसा केली आहे. दुर्गा भागवतांनाही त्यांच्या या कामाचं कौतुक होतं. हे काम लवकर पूर्ण व्हावं असा आग्रह यापैकी सर्वांनीच धरला होता.

कोकणी मराठीप्रमाणे गुजराती भाषेचीही उर्दूशी जवळीक राहिली आहे. त्यातूनच गुजरी उर्दू ही थोडी निराळी उर्दू भाषा विकसित झाली. या गुजरी उर्दू भाषेत लिहिले गेलेले मर्सिये (मर्सिया म्हणजे विलापगीत) अत्यंत भावपूर्ण, आर्त आणि काळजाला भिडणारे आहेत. त्यांचाही एक संग्रह करून त्याबद्दलचं विवेचक लेखन करणारं काम मैमुना दळवींनी 1979 मध्ये केलं आहे. 'दुखदे' या नावाने हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. आपलं हे काम आपण आवड म्हणून केलं, अशी त्यांची भूमिका आहे. भाषेविषयीच्या प्रेमातून आणि आस्थेपोटी त्यांनी हे लेखन व संग्रह केला; इतकंच नव्हे, तर लोकगीतांच्या पुस्तकांचं प्रकाशन करायला कोणी तयार होईना, तेव्हा पदरचे पैसे घालून त्यांनी ते प्रसिद्ध केलं. त्यांच्या एल.आय.सी.च्या एका पॉलिसीच्या मुदतपूर्तीनंतर आलेले पैसे त्यांनी या कामात घातले. मैमुना दळवी यांचे पती डॉ. दळवी यांनी त्यांना नेहमीच पाठिंबा दिला. डॉ. दळवी स्वतः मुंबई विद्यापीठात उर्दू विभागप्रमुख राहिलेले. त्यांचं उर्दूच्या क्षेत्रातील संशोधनाचं उर्दू-मराठी अनुवादाचं काम खूप मोठं आहे. डॉ. दळवींचं काम हा स्वतंत्र लेखनाचा विषय आहे. मैमुना दळवी यांनीही आपलं काम एकीकडे चालू ठेवलं आणि उर्दू भाषेच्या विकासाला आपला हातभार लावला.

उर्दू भाषा आणि तिच्या अनेक अंगांचा अभ्यास करण्याबरोबरच, मैमुना दळवींना आस्था आहे शिक्षणाच्या प्रसाराची. विशेषतः जे घटक पिछाडीला आहेत, गरीब आहेत, त्यांच्यात शिक्षणाचं प्रेम जागवण्याचा त्यांना ध्यास आहे. आपल्या वाटचालीला हा सामाजिक पैलूही त्यांनी दिला आहे. कॉलेजमध्ये असताना त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. पण दहा वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यानंतर जवळच्या भागातल्या गरीब वस्त्यांमधून शाळेत येणाऱ्या आणि न येणाऱ्या मुलांसाठी त्यांनी काम सुरू केलं. त्या राहतात मुंबईतल्या बांद्रा रेक्लमेशन परिसरात. या जागेच्या जवळच असलेल्या बांद्रा बाजार, भारतनगर अशा वस्त्यांमधून काही महापालिका शाळा आहेत. उर्दू, हिंदी, तामिळ, मराठी अशा माध्यमांच्या या शाळांमधून मुलांच्या गळतीचं प्रमाण जास्त आहे. जी मुलं शिकतात, त्यांच्याही घरी शिक्षणाची पार्श्वभूमी नाही. अशा मुलांसाठी तिथे 1992 मध्ये ‘अवामी वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र’ ही संस्था सुरू झाली. मैमुना या संस्थेशी प्रथमपासूनच संबंधित आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी संस्थेच्या कामात अधिक लक्ष घालण्यास सुरुवात केली. आज त्या या संस्थेच्या महिला शाखेच्या अध्यक्ष आहेत. 

संस्थेने दोन वर्षांपूर्वी इथली एक व इतर ठिकाणच्या शाळाही दत्तक घेतल्या आहेत. या सर्व महापालिका शाळा आहेत. गरिबांमध्ये आजही शिक्षणाचा प्रसार होण्याची गरज मुंबईसारख्या शहरांतही भासते. शाळा गळतीच्या संदर्भातील 'महात्मा फुले योजना' राबवून या ठिकाणी काम चालू आहे. इथल्या मुलांसाठी जादा वर्ग घेतले जातात. त्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच जीवन व्यवहाराचं शिक्षण दिलं जातं. त्यांच्या चारित्र्याची घडण करणारं प्रबोधन केलं जातं. मैमुना दळवी म्हणतात की, “इथे मुलींपेक्षाही मुलांवर जास्त लक्ष ठेवावं लागतं. कारण मुलांना स्वातंत्र्य अधिक मिळतं आणि त्यांना अनेक गोष्टींचं आकर्षण फार असतं. गरीब वस्त्यांमधून अशी अनेक मुलं वाया जाण्याची भीती असते. मुली जास्त मन लावून अभ्यास करतात. पण याची वाच्यता जास्त केली, तर मुलांवर उलटा परिणाम होण्याची शक्यता असते. इथे काम करताना अशा अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.”

याच परिसरात असलेल्या विकलांग क्षेत्रातील संस्थेशी मैमुना यांचा जवळून संबंध आला. कारण त्यांच्या मुलीची मुलगी विकलांग आहे. या वेदनेशी थेट ओळख असल्याने त्यांना त्यातील अनेक प्रश्न आणि अडचणी माहीत आहेत. विकलांग मुलांसाठी एखादी संस्था काढण्याची इच्छा त्यांच्या मनात आहे. या दृष्टीने त्यांनी हालचालही सुरू केली आहे. इस्माईल युसूफ कॉलेजशी त्यांचा जुना ऋणानुबंध आहे. तेथील माजी विद्यार्थी संघाच्या त्या अध्यक्षही राहिल्या आहेत. 1953 पासून विद्यार्थी म्हणून त्या इथे आल्या आणि काही काळाचा अपवाद वगळता त्यांनी अध्यापनही इथेच केलं. 1990 मध्ये कॉलेजने हीरक महोत्सव साजरा केला. या कॉलेजच्या परिसरात मोठी जागा आहे. या जागेचा वापर शिक्षणासाठी व्हावा, यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. आज वेगवेगळ्या विषयांचं आणि क्षेत्रांचं अध्ययन करण्यासाठी मुलांना बाहेर जावं लागतं. मुंबईतली ही जागा यूसुफ परिवाराने सरकारला देणगीदाखल दिली ती शिक्षणाच्या प्रसारासाठी. पण आज बरीच जागा पडून आहे. वाया चालली आहे. सरकारने आणि लोकांनीही या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे, असं मैमुना दळवी अगदी कळकळीने सांगतात.

सत्तरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मैमुना आजही थकलेल्या नाहीत. विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या फेलोशिपचं त्यांचं काम अजून पूर्ण व्हायचं आहे. '19 व्या शतकापासूनची मुंबईतील उर्दू पत्रकारिता' या विषयावर त्या संशोधन करीत आहेत. मुंबईतली जुनी उर्दू वर्तमानपत्रं बघायला त्या पार हैद्राबादपर्यंत जाऊन आल्या आहेत. हे काम झालं की इतर नवे विषय त्यांच्या हातात येतीलच; कारण त्यांना सतत काही ना काही करत राहण्याची ओढ आहे. उर्दूचा अभ्यास आणि सामाजिक क्षेत्रातलं काम यांची सांगड घालून त्यांची वाटचाल सुरूच राहणार आहे. स्वतः प्रेरणा घेऊन काम करणाऱ्यांना दुसऱ्यालाही प्रेरणा द्यावीशी वाटते. मैमुना दळवी यांनाही वाटतं, नव्या पिढीने आता पुढे यायला हवं. दुसरी फळी तयार झाल्याखेरीज काही खरं नाही. याही दिशेने त्यांचं काम सुरूच आहे. मैमुना दळवींना भेटून खूप आनंद झाला. एका आस्थेवाईक भाषाप्रेमीला आणि सामाजिक दृष्टीच्या मैत्रिणीला भेटल्याप्रमाणे वाटले.

Tags: अवामी वेल्फेअर असोसिएशन संशोधक उर्दू भाषा मैमुना दळवी awami welfare association researcher urdu bhasha maimuna dalvi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नंदिनी आत्मसिद्ध

पत्रकार, स्त्री-प्रश्नांच्या अभ्यासक, अनुवादक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके