डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्रभादेवीतलं सांस्कृतिक मंदिर

भोपाळचं ‘भारतभवन’, कलकत्त्यातील ‘नंदन कॉम्प्लेक्स’ आदी संस्थांप्रमाणे ‘पु. ल. देशपांडे कला अकादमी’चं नाव व्हायला हवं. देशभरातील कलाप्रकार, कलावंत आणि त्यांचे नवनवे उपक्रम यांचा एकमेकांस परिचय होण्याचं ते एक माध्यम बनायला हवं. दशावतार आणि लावणी महाराष्ट्राबाहेर रुजायला हवी. यक्षगान आणि कथकलीचा वावर आपल्याकडे व्हायला हवा. कलाजाणिवा रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. कला अकादमी हे करेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

संस्कृतीचा प्रवाह वाहता असतो. नवनव्या बदलांना सामोरं जात सांस्कृतिक वातावरण आकार घेत असतं. शेवटी संस्कृती म्हणजे नेमकं काय असतं? जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारं असं काहीतरी संस्कृतीत असतं. यात रोजच्या जगण्यापासून संगीत, साहित्य, नृत्य, क्रीडा, उद्योग अशा बहुविध बाबी मोडतात. संस्कृती हे अशा गोष्टींचं संचित रूप आहे; तरीही संस्कृती बदल पचवू शकते. मानवी आयुष्यात सौंदर्य, सुख आणि चिंतनशील अभिरुची आणणाऱ्या विविध कला हे संस्कृतीचं अविभाज्य अंग आहे. कलांचा विकास करायचा झाला, तर त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नही करण्याची गरज असते. शासन, समाज, विविध खाजगी संस्था असे प्रयत्न करतही असतात. चहुअंगांनी हातभार लागला तर कलांचा विकास आणि प्रभाव यांत निश्चितच भर पडते. कलांविषयी आस्था असणारी माणसं आणि कलाकार आपल्यापरीने या क्षेत्रात काम करतच असतात. तरीही अनेक कारणांनी त्यावर मर्यादा पडत असते. वेगवेगळ्या कलांचा परस्परसंबंध, विविध प्रदेशांतील कलांमधली आंतरिक सूत्रांची वीण, अशा बाबींचा उचित विचार प्रत्येक वेळी केला जातोच असं नाही. 

भारतातल्या विविध प्रांतांमधून आणि भाषांमधून पसरलेलं कलाविश्व एका घरात सामावलं गेलं, तर त्यातून एक व्यापक कलाजाणीव विकसित होण्यास मदत मिळू शकते. हाच विचार मनाशी धरून महाराष्ट्र सरकारने मुंबईला प्रभादेवी येथे ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’ स्थापन केली आहे. या कला अकादमीला भेट देऊन संस्थेच्या संचालकपदी अलीकडेच आलेले नामवंत दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्याशी बातचीत केली. त्यातून कला अकादमीचं नेमकं स्वरूप, भावी योजना आणि भूमिका यांची माहिती मिळाली... कलाविश्वाविषयीची एक व्यापक भूमिका निश्चित करून अकादमीची वाटचाली असा डॉ. पटेल यांचा मानस आहे.

कला अकादमीच्या एकूण स्वरूपाविषयी बोलताना डॉ. पटेल यांनी सांगितलं, “देशातल्या वेगवेगळ्या प्रांतांमधल्या सर्व तऱ्हेच्या कलांना इथे स्थान असेल. एका छत्राखाली आल्यामुळे कलाकारांना परस्परांची आणि परस्परांच्या कलांची उत्तम ओळखही होईल. स्थानिक कलाकारांना आणि कलेच्या विद्यार्थ्यांना परप्रांतांतील कलाप्रकार शिकण्याची, आत्मसात करण्याची संधी इथे मिळणार आहे. त्या त्या क्षेत्रातले दिग्गज या कला अकादमीच्या व्यासपीठावर भेटू शकणार आहेत.”

मोठा आवाका घेऊन साकार झालेली कला अकादमी गेली काही वर्षे वेगवेगळ्या कारणांसाठी गाजते आहे. प्रभादेवीचं रवीन्द्र नाट्य मंदिर नूतनीकरणासाठी बंद झालं आणि बरीच वर्षं काहीच हालचाल नव्हती. कला अकादमीची घोषणा करण्यासही राज्य सरकारने तसा विलंबच लावला. मग त्याचं संचालकपद कुणाकडे जाणार हा चर्चेचा विषय बनला. पण आता डॉ. जब्बार पटेल यांची निवड झाल्याने या सर्व वादविषयांवर पडदा पडला आहे. डॉ. पटेल यांचा नाट्य व चित्रपटक्षेत्रातला अनुभव आणि त्यांचं त्यांतील कर्तृत्व वादातीत आहे. कलांविषयी आस्था आणि त्याच्याच जोडीला सामाजिक भान असलेल्या डॉ. पटेल यांच्या निवडीचं बहुतेकांनी स्वागतच केलं आहे. वेगवेगळ्या कलांसाठी विद्यालयं आणि प्रशिक्षणसंस्था असल्या, तरी कला अकादमीचं स्थान हे त्यापलीकडचं आहे, ही जाणीव मनाशी धरून कला अकादमीची वाटचाल होणार आहे. मुंबईच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे कला अकादमीची वास्तू अनेक दृष्टींनी सोयीचीही आहे.

नूतनीकृत रवीन्द्र नाट्यमंदिराचं 911 आसनांचं भव्य नाट्यगृह; बाजूलाच असलेली कला अकादमीची वास्तू सहा मजल्यांची आहे. अलीकडेच या दोन्ही वास्तूंमध्ये लघुपटांचा महोत्सव पार पडला. इतक्या मोठ्या प्रमाणातला हा इथला बहुधा पहिलाच कार्यक्रम होता. रवीन्द्र नाट्यमंदिरातही सेमिनार हॉल, प्रायोगिक रंगभूमी, मोठं सभागृह अशा सुविधा आहेत. तर पु. ल. देशपांडे कला अकादमीची रचना योजनाबद्ध रीतीने करण्यात आली आहे. एकूण सहा मजल्यांची ही इमारत अनेक सोयी-सुविधांनी सुसज्ज अशी आहे. 

तळमजल्यावर स्वागतकक्ष, कलादालन आणि कॅफेटेरिया आहे. पहिल्या मजल्यावर प्रदर्शनगृह आणि संग्रहालय. दुसरा, तिसरा आणि चौथा मजला समर्पित आहे वेगवेगळ्या कलांसाठी. संगीताच्या हिंदुस्थानी, वाद्य, सुगम, लोकसंगीत आणि कर्नाटक संगीत या सर्व प्रकारांसाठी इथे खास जागा आहे. रियाजासाठी स्वतंत्र केंद्र, वेगवेगळ्या गायकांसाठी आणि वादकांसाठी विद्यादान करण्याच्या दालनवजा खोल्या, अशा सुविधांनी संगीताचा मजला सुसज्ज आहे. त्यावर असलेल्या तिसऱ्या मजल्यावर ग्रंथालय, टीव्ही व फिल्म अ‍ॅनिमेशन, मूर्तिकला, छायाचित्रणकला अशाकरिता दालनं आहेत. व्याख्यानांसाठी वेगळं सभागृह, 200 आसनांचं इथलं छोटेखानी नाट्यगृह - जे चित्रपट व इतर स्वरूपाच्या कामांसाठीही वापरता येईल असं आहे. शिवाय त्यात डिजिटल डॉल्बी म्युझिकसारख्या अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध आहेत. सध्याची ग्रंथालयाकरिता राखून ठेवलेली जागा अपुरी आहे, त्यामुळे पुढच्या काळात ग्रंथालय अधिक प्रशस्त जागेतही हलवलं जाण्याची शक्यता आहे. 

छायाचित्रणासाठी स्वतंत्र दालन, 6-7 फोटो स्टुडिओज, त्याशिवाय मूर्तिकलेसाठी आवश्यक अशा उंचीचे कक्ष, माती वगैरे धुण्यासाठी, सफाईसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. बारीक- सारीक गरजांचा विचार करून तशी सोय करण्याचा प्रयत्न दिसतो. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार बदल करण्याची तयारीही ठेवण्यात आली आहे. 

चौथ्या माळ्यावर कला अकादमीचं नियोजित प्रशासकीय कार्यालय असेल. त्याशिवाय लहान-मोठी सभागृहंही इथे आहेत. नृत्यकलेची जागा याच मजल्यावर आहे. देशातील वेगवेगळे नृत्यप्रकार इथे एकत्र येतील. लोकनृत्य, मोहिनीअट्टम, भरतनाट्यम, नाटक, रियाज अशी वेगवेगळी दालनं इथे निर्माण करण्यात आली आहेत. याचा अर्थ ओडिसी, कथ्थक यांना इथे प्रवेश नाही, असं नाही. जे नृत्यप्रकार शिकले-शिकवले जातील, त्या सर्वांनाच इथे स्थान राहणार आहे. भव्य अशा या संकुलात सर्व कलाप्रकारांना सामावून घेतलं जाणार आहे. साहित्याचाही त्याला अपवाद नाही. 

‘कलासंगम’ अशा स्वरूपात कला अकादमीची रचना करण्यात आली आहे. त्यासाठी उभारण्यात आलेल्या इमारतीत अभ्यागतांची राहण्याची सोयही सर्वांत वरच्या मजल्यावर करण्यात आली आहे. आधुनिक सोयींनी सुसज्ज अशा अतिथी कक्षांमध्ये विशेष पाहुण्यांना उतरता येईल. 

अर्थात ही सर्व बाह्य व्यवस्था झाली. ती उत्तम आहे यात शंकाच नाही. कला अकादमीच्या निमित्ताने कलाजगतासाठीचा मल्टिप्लेक्सच प्रभादेवीत उभा राहिला आहे. पण पु. ल. देशपांडे यांच्या नावाने स्थापन झालेली ही कला अकादमी नेमकं काय करणार आहे, हे महत्त्वाचं ठरणार आहे. कारण एका कलासक्त, संगीतप्रेमी उदार मनाच्या आणि सामाजिक दृष्टी असलेल्या अभिरुचिसंपन्न व्यक्तीचं नाव या संस्थेशी जोडलं गेलंय. बंगाली साहित्याच्या प्रेमापोटी स्वतःच थेट बंगालमधल्या शांतिनिकेतनात जाऊन मुक्काम ठोकणारे आणि कुमार गंधर्वांच्या देवासपासून बाबा आमट्यांच्या आनंदवनापर्यंत सर्वत्र संचार ठेवून कला आणि सामाजिकता यांची सांगड जागी राखणारे पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व. इथल्या कलाविश्वाची जपणूक व्हावी; इथलं नाट्यसंगीत आणि लोकसंगीत टिकून राहावं जुन्या मूल्यांचं आणि कलांचं जतन व्हावं यासाठी ते सदैव धडपडले. 

एनसीपीएमध्ये पुलंनी मोठं काम केलं आणि नाटक, संगीतादि कलांचा विकास व्हावा यासाठी जीव ओतून प्रयत्न केले. पु. ल. देशपांडे कला अकादमीतही त्यांची दृष्टी घेऊनच काम चालणार आहे. या ठिकाणी देशभरातून नामवंत कलावंत यावेत; आपल्या कलेचं प्रदर्शन त्यांनी करावं; इथे राहून इथल्या मंडळींना त्यांनी शिकवावं; इथून चांगल्या गोष्टी आत्मसात करून जावं, अशा पद्धतीने इथे काम होण्याची अपेक्षा डॉ. पटेलांना आहे. इथली सगळी दालनं जेव्हा गजबजून जातील, तेव्हा इथल्या सगळ्या वातावरणातच एक भारलेपण असेल. नृत्याची रुमझुम, रागदारीची आळवणी, डफावरची थाप आणि अभिनयाचा आविष्कार यांनी ही वास्तू वेढलेली राहील. मूर्तिकलेचे नमुने इथे तयार होतील आणि नामवंत कलावंतांचे हात त्यांना लागलेले असतील... आडगावातला एखादा लोककलावंत आपली अपूर्व कला इथे सादर करून जाईल.

जुन्या कलावंतांच्या अनुभवाचा लाभ नव्या पिढीला व्हावा, लोकांना त्यांच्याशी संवाद साधता यावा यासाठीही अशा कलावंतांच्या जाहीर भेटीचा कार्यक्रम, त्यांच्या मुलाखतींचं ध्वनिचित्रमुद्रण अशा तऱ्हेचे उपक्रमही इथे होणार आहेत. प्रख्यात कलाकार, साहित्यिक मुंबईत सर्वच प्रांतांमधून येत असतात. त्यांचं स्वागत इथे होईल आणि त्यांच्याशी वैचारिक देवघेव करण्यासाठी इथल्या मान्यवर मंडळींना निमंत्रित करण्यात येईल. सुसंवादाच्या एक ना दोन, अनेक वाटा आहेत. त्यांच्या माध्यमातून उभ्या भारतातील कलावंत आणि लेखकांमध्ये आदानप्रदान व्हावं अशी सुंदर कल्पना या कला अकादमीच्या व्यासपीठावर साकार होऊ शकेल, या निमित्ताने मुंबई आणि महाराष्ट्र येथील कलावंत मंडळीही देशाच्या पटावर जाऊन पोचतील. 

कला अकादमीच्या वतीने राज्यात विविध ठिकाणी कलाशिबिरांचं आयोजन करण्यात येईल. जागोजागच्या कलावंतांची उत्तम जडणघडण या माध्यमातून होईल. त्यांनाही ख्यातनाम कलावंतांचं मार्गदर्शन लाभू शकेल. अर्थात हे सर्व करताना सर्वसामान्यांचा विचारही होणं गरजेचं आहे. सामान्य माणसाची अभिरुची समृद्ध व्हावी, कलाप्रकारांची त्याची जाण वाढावी, यासाठी काही उपक्रम सुरू केल्यास कला अकादमीचं मोल जनसामान्यांनाही पटेल; अन्यथा मूठभरांसाठीची संस्था असंच तिचं स्वरूप राहील. कला अकादमीकडून रसिकांच्याही अपेक्षा आहेत. उत्तमोत्तम नाटक, चित्रपट, चित्रे इत्यादींचा ठेवा कला अकादमीने आपल्यालाही दाखवावा असं त्याला वाटत आहे. या संदर्भात केवळ लाभाचा विचार न होता कलेच्या प्रसारावर भर असायला हवा.

महाराष्ट्र सरकारने कला अकादमी स्थापन केली असली, तरी तिच्यावर सरकारचा अंकुश नसेल, स्वतःच्या मार्गाने तिचा विकास होईल, असा निर्वाळा सरकारने दिला आहे, असं डॉ. पटेल यांनी सूचित केलं. भोपाळचं ‘भारतभवन’, कलकत्त्यातील ‘नंदन कॉम्प्लेक्स’ आदी संस्थांप्रमाणे पु. ल. देशपांडे कला अकादमीचं नाव व्हायला हवं. देशभरातील कलाप्रकार, कलावंत आणि त्यांचे नवनवे उपक्रम यांचा एकमेकांस परिचय होण्याचं ते एक माध्यम बनायला हवं. दशावतार आणि लावणी महाराष्ट्राबाहेर रुजायला हवी. यक्षगान आणि कथकलीचा वावर आपल्याकडे व्हायला हवा. 

कोण बिरजू महाराज, कोण भीमसेन जोशी असे प्रश्न पडण्याचा प्रसंग येऊ नये. अलीकडेच मध्य प्रदेशचे सांस्कृतिक मंत्री, जे अटलबिहारी वाजपेयींचे नातलग आहेत, त्यांनी प्रख्यात संगीतविशारद उस्ताद अल्लाउद्दीन खाँ यांना ‘बांगलादेशी’ म्हणवून स्वतःचं अज्ञान प्रदर्शित केलं होतं. त्यांचं नाव मध्य प्रदेशच्या संगीत अकादमीला देण्याऐवजी ‘तानसेन’ यांचं नाव द्यायला हवं होतं, असे तारे त्यांनी तोडले होते. हे म्हणजे ‘कला’(ळा) ज्या लागल्या ‘जीवा’ असंच झालं!

वास्तविक एखाद्या नामवंत परदेशी कलाकाराचं नावही येथील संस्थेस देण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे, त्यास विरोध असता कामा नये. सदैव हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं गेलं, त्या अल्लाउद्दीन खाँ यांच्या भारतीय असण्याबद्दलच ज्यांचं अज्ञान आहे, त्यांना सांस्कृतिक मंत्री बनण्याचा हक्क तरी आहे का, हा प्रश्न खरं तर विचारायला हवा. आपल्याकडेही या पूर्वी प्रमोद नवलकर यांनी सांस्कृतिक मंत्री असताना, अली सरदार जाफरी यांना ‘संत ज्ञानेश्वर पुरस्कार’ देण्याबाबत विपरीत शेरेबाजी केलीच होती. अशा तऱ्हेचे दुर्दैवी प्रकार अज्ञानातून आणि कलाविषयक अनास्थेतून व अनादरातून घडत असतात. म्हणूनच कलाजाणिवा रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. कला अकादमी हे करेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

Tags: Natya पु. ल. देशपांडे रवीन्द्र नाट्य मंदिर जब्बार पटेल पु. ल. देशपांडे कला अकादमी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नंदिनी आत्मसिद्ध

पत्रकार, स्त्री-प्रश्नांच्या अभ्यासक, अनुवादक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके