डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नांदेड शहरातील लोकांचे प्रश्न महापालिकेसमोर धसाला लावण्याच्या दृष्टीने जागृत नागरिकांचे सक्रिय गट तयार करणे, या उद्देशाने शहर विकास समितीची स्थापना झाली. महानगरपालिकेचे अधिकारी, जिल्हाधिकारी यांना लोकांचे प्रश्न टाळता येणार नाहीत, अशी जरब नांदेड शहर विकास समितीने बसवली आहे. तिचे अनुकरण शहराशहरांत झाले तर शहरांचा बकालीपणा संपुष्टात येण्याचा संभव आहे.

माणूस म्हणून जगण्याचा हक्क हिरावून घेण्याचा अनुभव आज अनेकांच्या नशिबी येतो. मतिमंद मुलांचा वर्ग अशा अभागी गटात मोडतो. एकतर मतिमंदता म्हणजे नेमकं काय, हे सर्वसामान्य माणसाला कळत नाही; ते समजून घ्यायची तयारीही त्याच्याकडे नसतेच. अनेक जण तर अशा मुलांची गणना ‘वेड्या’ मुलांमध्येही करतात. शारीरिक आणि मानसिक विकलांगतेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आपल्याकडे आहेत आणि तरीही आस्थेने हे काम करणाऱ्या अनेक हातांची आणि मनांची तीव्र गरज आहे. गेली जवळजवळ वीस वर्षे मतिमंद मुलांसाठी संस्था चालवणाऱ्या सांगलीच्या रेवती हातकणंगलेकर मनात एक ध्यास घेऊन आपलं काम करीत आहेत. या मुलांसाठी काम करताना त्यांच्या पालकांचं, कुटुंबियांचं आणि अवतीभवतीच्या समाजाचंही प्रबोधन करावं लागतं, याचा अनुभव रेवती यांना सुरुवातीपासूनच येत आहे. इतक्या वर्षांनी या संदर्भात मनाची दारं किंचित किलकिली होऊ लागली आहेत, असं त्यांना वाटतं. पण अजूनही बरीच जागृती व्हायला हवी, आणि त्यासाठी सर्वांनीच आपली मानसिकता व समजूत बदलण्याची तयारी ठेवायला हवी, असं त्या सांगतात. आपल्या ‘नवजीवन’ या संस्थेच्या माध्यमातून त्या यासाठी अगदी मनापासून प्रयत्न करीत आहेत.

रेवती हातकणंगलेकर यांना प्रथमपासूनच आपण समाजासाठी काही वेगळं करावं असं वाटत होतं. अकरावीत ‘मानसशास्त्र’ विषयाची ओळख झाली होती. पुढे त्यांनी याच विषयांचा अभ्यास करायचं ठरवलं. एम.ए.ला क्लिनिकल सायकॉलॉजी विषयाचं अध्ययन करण्यासाठी त्यांना सांगलीहून कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजात जावं लागलं. मानसिक विकलांगता हा त्यांचा अभ्यासाचा विशेष विषय होता. त्यानंतर सांगलीत परतल्यावर मतिमंद मुलांसाठी शाळा काढावी, असा विचार त्यांच्या मनात आला. तेथील डॉ. देवसिकदर यांच्याकडे अशा मुलांना औषधोपचारासाठी आणलं जाई. पण त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नव्हती. वेगळ्या वाटेने जायचं असं ठरवलं असल्याने शाळा किंवा संस्था सुरू करण्यापूर्वी प्रशिक्षण घ्यावं, असा विचार करून रेवती यांनी पुण्यात ‘कामायनी’मध्ये एक वर्षाचा डिप्लोमा केला. त्यानंतर सांगलीला येऊन स्थानिक वर्तमानपत्रांतून जाहिरात देऊन शाळा सुरू केली. प्रारंभी तेथील डॉ. आखाडे यांच्या जागेत, लहान खोलीत शाळा सुरू केली. संस्था सुरू केली. तेव्हा पुढे काय अडचणी येणार आहेत, याची कल्पना अर्थातच नव्हती. अनुभवातून बरंच काही त्यांना शिकायला मिळालं. मतिमंद मुलांइतकीच त्यांच्या पालकांना आणि एकूणच समाजाला प्रशिक्षणाची गरज आहे, याची जाणीव त्यांना झाली.

शाळेची सुरुवात केल्यावर लोकांचा प्रतिसाद मिळू लागला. वर्षभरात 10 मुलं झाली. मतिमंद मुलांसाठी स्वतंत्र अशी कोणतीच शाळा किंवा संस्था सांगलीच्या परिसरात नसल्याने रेवती यांची ‘नवजीवन’ ही संस्था हा अनेकांना आधारच ठरला. मुळात रेवती त्यांच्या मते अशा वेगळ्या संस्थांपेक्षा नेहमीच्या ठिकाणीच अशा मुलांना जाण्याची वावरण्याची संधी मिळाली, तर त्यांचा विकास चांगल्या रीतीने होऊ शकेल; समाजालाही नवी दृष्टी मिळेल. पण हे होण्याची वाट पाहत बसण्यात काहीच अर्थ नाही, याचीही जाणीव असल्याने तर त्यांनी ‘नवजीवन’चा पाया घातला. 

रेवती यांच्याशी बोलताना जाणवतं की, त्यांना मानसिक विकलांग मुलांबद्दल नुसतीच सहानुभूती किंवा प्रेम नाही; तर त्यांची मनोवस्था, मानसिकता आस्थेने समजून घेण्याची शक्ती आणि इच्छाही त्यांच्याजवळ आहे. मतिमंद मुलांच्या समस्या त्यांना समजतात, तशा त्यांच्या जाणीवा आणि आकांक्षाही त्या जाणतात. घरात असं एक मूल असलं तरी ते असल्यामुळे कुटुंबाचं स्वास्थ्यच नष्ट होतं, कारण अशा मुला-मुलींचा सांभाळ करणं हे सोपं काम नाही. नेहमीचे व्यवहार पार पाडून ते करणं हेही आजच्या बदलत्या जगात कठीण होत चाललं आहे. अशा मुलांसाठी सदैव कोणीतरी माणूस लागतो, ज्याच्या अंगी सेवाभावी वृत्ती आहे; पण अशी माणसं मिळणं कठीण आहे. 

‘नवजीवन’साठी कामाला माणसं मिळणंही त्यांना फारच जड गेलं. काही पालक मदतीला आले, पण ते तेवढ्यापुरतंच. पहिली पाच वर्षे तर कोणीच काम करायला मिळालं नव्हतं. 1986 साली ‘नवजीवन’ची सुरुवात झाली. या वीस वर्षांमध्ये संस्था बऱ्यापैकी वाढली. या काळात रेवती यांना हरतऱ्हेचा अनुभव आला. समाजात आणि कुटुंबातही या प्रश्नाकडे कशा रीतीने बघितलं जातं, तेही त्यांना दिसून आलं. एक प्रकारचा नकारात्मक दृष्टिकोन त्यांना आढळला. माणुसकीला धरून नसलेले विचार आणि अभिप्राय ऐकायला मिळाले. एक गोष्ट त्यांना प्रकर्षाने जाणवली, ती ही की, ‘असं मूल’ हे नेहमी फक्त ‘आईचंच’ असतं! बरेचदा वडील त्याच्याशी तुटकपणे वागतात. पितृप्रेम न मिळाल्याने त्याचा विपरित परिणाम अधिकच होतो. शनिवार-रविवार दोन दिवस शाळा बंद ठेवली जात होती. तेव्हा पालकांना ते नको होतं. ‘दोन दिवस या मुलांचं काय करायचं ते समजत नाही!’ अशी प्रतिक्रिया होती. माणूस म्हणून जगण्याचा त्यांचा हक्क डावलला जातोय, हे त्यांच्या मनात कुठे उमटत असेल का, असा प्रश्न उभा राहतो. अर्थात सर्वच मुलांची अशी अवस्था नाही. पालकही समंजस होऊ लागले आहेत. बदलू लागले आहेत. ‘नवजीवन’च्या परिणामामुळे मुलात होणारे बदल त्यांना दिलासादायक वाटू लागले आहेत. आशादायी वाटू लागले आहेत.

ही मुलं सुधारली, त्यांची समज वाढली तरी याही गोष्टीला मर्यादा असते. पण मुळातच मतिमंद मुलाला काहीच कळत नाही, त्यांच्या अंगी काहीच गुण नाहीत, ही समजूत चुकीची आहे असं रेवती म्हणतात. त्यांच्या क्षमता विकसित केल्या तर त्यांच्या जीवनातही आनंद फुलू शकतो; पण ‘मतिमंद’ असा शिक्का मारला की, त्यांच्या आयुष्याच्या उपयुक्ततेवरच फुली बसते. आज अशी सात-आठ मुलं आहेत, जी काही प्रमाणात अर्थार्जनही करत आहेत. एखादाच किराणा दुकान चालवतो. कॅल्क्युलेटर वापरतो. भाजी- बाजार, हॉटेल येथेही काही काम करतात. एकजण मेणबत्त्या विकतो. किराणा दुकानवाला ‘पुढे माझा व्यवसाय मी करणार आहे!’ असं ठामपणे सांगतो. अशा मुलांना आत्मविश्वास मिळाला आहे आणि त्यांना बघून इतरांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. अर्थातच सर्वच मुलं अशी प्रगती करतीलच, याची खात्री नसते.

मानसिक अपंगत्वाप्रमाणे शारीरिक अपंगत्वही काही मुलांमध्ये असतं. अशा लहान मुलांना भरवावंही लागतं. अशा मुलांना बालपणीच स्वीकारणं सोपं पडतं. कारण त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून घडवता येतं.

‘नवजीवन’ ही या परिसरातील पहिलीच स्वतंत्र संस्था आहे. सांगली आणि आसपासच्या परिसरातून आता इथे 70 मुलं येतात. शिरगाव, विटा, कवठेमहंकाळ अशा ठिकाणाहून ही मुलं आपल्या आयांबरोबर येतात. रोज आया मुलांना घेऊन येतात आणि संध्याकाळी त्यांना घेऊन जातात. मुलांची शारीरिक आणि मानसिक वयं ही वेगवेगळी असल्याने प्रत्येकाची हाताळणी स्वतंत्र पद्धतीने करावी लागते. काही चाचण्या व निरीक्षण याआधारे मुलांचं मानसिक वय ठरवलं जातं. त्यांच्यातील उणिवा आणि बलस्थानं जोखली जातात. शिवाय घरी त्यांना कसं हाताळलं जावं, त्यांना काय शिकवावं यांचा ‘गृहपाठ’ पालकांसाठी लिहून दिला जातो. हाता-पायाच्या हालचाली करण्यापासून अनेक गोष्टींचं प्रशिक्षण मुलांना दिलं जातं. कवायत घेतली जाते. आता संस्थेत 12 मदतनीस असल्याने रेवती यांचं काम जरा सुकर बनलं आहे.

सकाळी साडेअकरा ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत साधारणतः शाळेची वेळ असते. रविवार वगळता दोन मोठया सुट्ट्या मिळतात, ज्या पालकांना काय, मुलांनाही नको असतात. कारण ती शाळेतच जास्त रमतात. पण या मुलांना घरचं प्रेम, कौटुंबिक वातावरण अनुभवायला मिळालं पाहिजे, हा रेवती यांचा आग्रह आहे. कारण शेवटी ती या संपूर्ण समाजाचाच एक भाग आहेत. त्यांना समाजापासून तोडता कामा नये, असं त्यांना वाटतं. ही शाळा 18 वर्षे वयापर्यंतच आहे. पुढे या मुलांची वेगळी समस्या उद्भवते, म्हणूनच व्यवसाय केंद्रही संस्थेत सुरू केलं आहे. बागकाम किंवा अन्य तऱ्हेचं कौशल्य शिकवलं, तर अशी मुलं काहीतरी काम करू शकतात. यात पैसे कमावण्यापेक्षा अर्थातच मुलांचा जो मानसिक विकास होतो, तो महत्त्वाचा.

गेल्या काही वर्षांमध्ये या मुलांच्या वागणुकीला वळण कसं लावायचं, त्यांच्या समस्यांची हाताळणी कशी करायची, हे रेवती यांना आलेल्या अनुभवातूनच ठरवता येऊ लागलंय. त्या म्हणतात, ‘या मुलांच्या वर्तणुकीतील अडचणी, प्रश्न शोधावे लागतात. त्यावर आम्ही शनिवारच्या दिवशी चर्चा करतो. एखादा मुलगा किंवा मुलगी काही वेगळं विचित्र वागत असेल, तर त्याच्याशी संपूर्ण शाळेने कसं वागायचं ते ठरवलं जातं. पालकांनाही सूचना दिल्या जातात. मुलींची वेगळी काळजी घ्यावी लागते. तरुण वयात त्यांच्याकडे लक्ष ठेवावं लागतं. 18 वर्षांच्या, गरीब घरातील एका मुलीवर एकदा बलात्काराचा प्रसंग ओढवला. या संदर्भात केसच उभी राहिली नाही, कारण घरातल्यांनी पुढे येण्यास नकार दिला.’ या प्रकरणी वेगळे कायदेही अस्तित्वात नाहीत. अशा घटनांवरून मतिमंदांच्या प्रश्नांचे निरनिराळे पदर कळून येतात. बलात्कार झालेल्या मुलीसाठी रेवती यांनी झगडा दिला, पण त्यास पाठिंबा मिळू शकला नाही. अठरा वर्षे वयानंतर शाळेतून नाव काढून घेतलं जातं. वास्तविक नंतरच काळजीची अधिक गरज असते.

या मुलांना प्रेमाचा अर्थ कळतो. भावनिक गुंतवणूक समजते, ती प्रामाणिकही असतात, असा रेवती यांचा अनुभव आणि निरीक्षण आहे. शाळा तर कुणीच चुकवत नाही. आपण ‘वेगळे’ आहोत, हे त्यांना समजतं. लोक आपल्याला निराळ्या पद्धतीने वागवतात हेही कळतं. म्हणूनच ‘नवजीवन’ला भेट देणाऱ्या लोकांना टाळावं, असं रेवती यांना वाटतं; कारण भेट द्यायला येणारी मंडळी निरीक्षण केल्याप्रमाणे वागतात. त्यांनी मुलांमध्ये मिसळून वागायला हवं असं त्यांना वाटतं. एकदा या मुलांमधलाच संवाद ऐकून रेवती याचं मन दुःखी झालं. एकाने दुसऱ्याला विचारलं, ‘लोक शाळा बघायला का येतात?’ त्यावर दुसऱ्याने उत्तर दिलं, ‘आपण मतिमंद आहोत ना, म्हणून.’ या मुलांच्या पालकांची संघटना बांधण्याचा प्रयत्नही रेवतीने केला, पण ते जमलं नाही. या सर्वांचं दुःख एक आहे, संघटना केल्यास ते वाटून घेता येईल; असं त्यांना वाटत होतं. मात्र ते शक्य झालं नाही, कारण इथेही सामाजिक आणि आर्थिक स्तरांमधील भेद आडवा आला. त्यामुळे त्यातही तसे गट पडले. त्यातल्या त्यात स्त्रीपालक होत्या, त्या एकत्र येऊ म्हणाल्या, पण त्यातही सातत्य राहिलं नाही.

समाजात मतिमंदांची संख्या साधारणतः 3 टक्के असते. पण बालपणापासून योग्य पद्धतीने त्यांना प्रशिक्षण न मिळाल्याने पुढे त्यांचं आयुष्य यातनामय बनतं. अशा तऱ्हेचं जीवन आपल्याच वाट्याला का यावं, या अशा मुलांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रश्नाला उत्तर नाही. या मुलांना चांगलं प्रशिक्षण मिळणं आणि त्यांच्याशी इतरांनी प्रेमाने वागणं हाच मार्ग आहे. ‘नवजीवन’मधील मुलांच्या सहली नेण्यात येतात. खेळांच्या स्पर्धा घेतल्या जातात. बाहेरच्या शहरांतूनही त्यांना स्पर्धांसाठी नेलं जातं. शिक्षक त्यांच्यासोबत जातात. ‘जिज्ञासा’तर्फे घेण्यात आलेली नाट्यस्पर्धा, क्रीडा, ऑलिम्पिक अशा उपक्रमांतून मतिमंदांच्या अंगच्या गुणांना वाव दिला जातो. मतिमंदासाठी राज्यात 52 संस्था आहे.

‘‘कामायनी’पेक्षा माझा दृष्टिकोन वेगळा आहे’, असं रेवती हातकणंगलेकर म्हणतात. मतिमंदांसाठी वेगळी प्रशिक्षण केंद्रे, उद्योगकेंद्रे ‘कामायनी’ने उभारली. पण नेहमीच्या ठिकाणी या मुलांना सामावलं गेलं, तर ती समाजाचा खऱ्या अर्थाने हिस्सा बनतील, अशी रेवतीची भूमिका आहे. आपल्या पद्धतीने रेवतीची वाटचाल सुरू आहे. संस्थेचा व्याप आता वाढल्याने नवी इमारत बांधण्याचं काम हाती घ्यायचं आहे... निधीची अडचण आहेच. पण आस्थेचा दुष्काळही अनेक वेळा अनुभवास येतो. एका गृहस्थांनी तिला ‘तू आयुष्य फुकट घालवते आहेस’, असा सल्ला आर्थिक मदत देऊ करताना दिला, तेव्हा सरळ उठून येणं हीच प्रतिक्रिया रेवतीने दिली. ‘तुम्ही वेड्या मुलांबरोबर कसं काय राहता?’ असा प्रश्नही करणारे भेटतात, तेव्हा मनाला क्लेश होतात. या मुलांना बाहेरच्या जगाची ओळख व्हावी म्हणून त्यांना बँका, वृद्धाश्रम, एलआयसी कार्यालय अशा ठिकाणी नेलं जातं. अशामुळे मुलांना आत्मविश्वास मिळतो, तसा समाजालाही या मुलांचा नेमका ‘चेहरा’ समजू शकतो. समाजात मतिमंदांविषयी जागरूकता वाढली पाहिजे, हा ध्यास घेऊन रेवतीचे काम चालू आहे. ‘अशा मुलांचं आयुष्य किती असतं हो?’ अशी क्लेशकारक, धक्कादायक विचारणा त्यांच्या नातलगांकडूनही होत असताना ऐकावं लागतं, तर एखाद्या घरात दुर्दैवाने दोन-तीन मुलं अशी निपजली तर शेजारीपाजारी त्यांच्याशी संबंधही ठेवत नाहीत, असं आढळून येतं. अनेकदा या मुलांची जास्त काळजी घ्यावी लागते, तेव्हा त्यांचे जास्त लाड होतात असं भावंडांना वाटू लागतं. अशा वेळी त्यांना नीट समजावून सांगावं लागतं.

विविध तन्हेचे अनुभव घेत ‘नवजीवन’चा विकास करण्याचं रेवतीचं काम सुरू आहे. नव्या इमारतीसाठी जागेची मदत सरकारकडून झाली नाही. आता जागा घेतली असून तिथे वैद्यकीय केंद्र, व्यवसाय केंद्र, वसतिगृहही शाळेच्या जोडीला उभारायचं आहे. कारण लांबून येणाऱ्या मुलांसाठी त्याची गरज आहे. ‘नवजीवन’मुळे सांगलीच्या परिसरात मतिमंदत्वाविषयीची जागरूकता थोडीफार वाढली आहे. पण अजून खूप काही व्हायला हवंय. मतिमंदांच्या संस्थांसाठी वेगळे कायदे नाहीत. शारीरिक अपंगांना नोकरीत राखीव जागा असतात. तशा काही ठिकाणी याही मुलांना ठेवता येतील, असं रेवतीला वाटतं. खरं तर अशा शाळांची गरज पडू नये, असं तिचं मत आहे, पण सध्या तरी ‘नवजीवन’ची वाढ हेच समोरचं ध्येय आहे. या मुलांना इतकं सक्षम करायला हवं की, त्यांना इतरांवर अवलंबून राहायची वेळ येऊ नये, असं रेवती सांगतात.

या क्षेत्रातील कामगिरीबद्दल रेवती यांना 1995मध्ये सर्वोत्कृष्ट समाजसेविकेचा पुरस्कार कोलकाता येथील ‘अलकेन्दु बोध निकेतन’तर्फे देण्यात आला होता. त्याशिवाय ‘वसंतराव नाईक ग्रामीण विकास प्रतिष्ठान’कडून सन्मानचिन्ह आणि ‘वंदे मातरम् कृतज्ञता’ पुरस्कार, प्रमाणपत्रही मिळालं आहे. ‘पु.ल.देशपांडे ट्रस्ट, महाराष्ट्र फाऊंडेशन अशा व अनेक दानशूर व्यक्तींनी दिलेल्या देणग्यांतून ‘नवजीवन’चं काम चालतं. संस्थेसाठी पैसा कमी पडू नये म्हणून रेवती एका स्थानिक महाविद्यालयात अध्यापनही करतात. त्यांचा रोजचा दिवस याच कामाशी बांधलेला असतो. ‘नवजीवन’मुळे मतिमंदांच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हायला मदत व्हावी हीच रेवतीच्या जगण्याची प्रेरणा आहे.

‘नवजीवन’, निर्वेद, कुपवाड रोड, विश्रामबाग, सांगली-416 415.

Tags: मतिमंद नवजीवन रेवती हातकणंगलेकर Revati Hatkanangalekar NAVJEEVAN weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नंदिनी आत्मसिद्ध

पत्रकार, स्त्री-प्रश्नांच्या अभ्यासक, अनुवादक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके