डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणेच्या पुढचे-मागचे संदर्भ जागवत डॉ. जब्बार पटेल यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' हा चित्रपट तयार केला आहे. डॉ. आंबेडकरांची अनेक रूपे मनावर ठसवणारा हा चित्रपट आहे. ‘महाविद्यालयीन विद्यार्थी ते लाखोंना दिशा दाखवणारा नेता’ या प्रवासातील आंबेडकरांच्या आयुष्याचा कायापालट साकारणारा हा चित्रपट म्हणजे एका महान व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे उलगडून दाखवणारा चरित्रपट आहे. त्याच्या निर्मितीचा हा वृत्तान्त.

‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ही घोषणा केली 13 ऑक्टोबर 1935 या दिवशी. नाशिकमध्ये येवले या गावी त्यांनी आपला धर्मांतराचा मनोदय असल्याचे जाहीर केले. हिंदू धर्मात राहून समाजातील अस्पृश्य आणि बहिष्कृत घटकांना कधीही न्याय मिळणार नाही, याची खात्री मनाला पटल्यामुळेच डॉ. आंबेडकरांनी हा निर्णय घेतला होता. अस्पृश्यता आणि जातिव्यवस्था यांच्या विळख्यातून हिंदू धर्माची सुटका होण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्यामुळे, बहिष्कृत समाजाच्या कपाळीचे दुर्दैव कधी पुसले जाईल, असे त्यांना वाटत नव्हते. अशा परिस्थितीत, स्वतःचा अभ्युदय साधायचा असेल आणि सन्मानाने जगण्याचा हक्क प्राप्त करून घ्यायचा असेल तर विषमतेची बीजे समाजात पेरणारा हिंदू धर्मच नाकारला पाहिजे, अशा भूमिकेप्रत डॉ. आंबेडकर आले होते. यातूनच त्यांनी धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला होता. धर्मांतराचा निर्णय ही अनुभवसिद्ध अशा विचारांतून आलेली कृती होती.

आयुष्यभर दिलेल्या लढ्याची आणि संघर्षाची अपरिहार्य अशी परिणती होती. समाजातील बहिष्कृत वर्गाला समतेची आणि प्रतिष्ठेची वागणूक मिळण्यासाठी या वर्गाला अन्याय्य अशा हिंदू धर्माचा त्याग केल्यावाचून गत्यंतर नाही हे डॉ. आंबेडकरांना प्रकर्षाने जाणवू लागल्यानंतरच त्यांनी हा निर्णय घेण्याचे ठरवले. मनाशी घेतलेला निर्णय जाहीर केल्यानंतरही तो प्रत्यक्षात उतरेपर्यंत अकरा वर्षांचा काळ मध्ये गेला. 1956 साली ऑक्टोबर महिन्यात सुमारे पाच लाख अनुयायांसह डॉ. आंबेडकरांनी नागपूरला बौद्ध धम्मात प्रवेश केला. ही  एक ऐतिहासिक महत्त्वाची घटना होती. धर्मांतराच्या निर्णयाचे पाऊल उचलण्यामागे एक विशिष्ट हेतू डॉ. आंबेडकरांनी मनात ठेवला होता. त्यामागची सबळ कारणे आणि भूमिका त्यांच्या मनात परकी होती. या भूमिकेत येतानाचा त्यांचा जीवनप्रवास हा त्यांचे आयुष्य व्यापून राहिला होता. पदोपदी येणाऱ्या अनुभवांनीच त्यांना हा निर्णय घेण्याची प्रेरणा दिली होती. एक सुनिश्चित अशी वैचारिक बैठक ठेवूनच डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराचा निर्णय घेतला होता.

धर्मांतराची घटना घडली आणि दोन-अडीच महिन्यांतच डॉ. आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. आपल्या दलित बांधवांना मुक्तीच्या मार्गाची दिशा दाखवूनच डॉ. आंबेडकर या जगातून निघून गेले. हिंदू धर्माचा त्याग हे डॉ. आंबेडकरांच्या आयुष्याचे ध्येयच बनले होते. हा त्यांचा स्वतःचा निर्णय असला, तरी तो त्यांच्या स्वतःपुरताच नव्हता; एका समाजासाठी त्यांनी तो घेतला होता. हे तर या निर्णयाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. धर्मांतर ही नुसतीच एक घटना नव्हती. ते संक्रमण होते. हे संक्रमण डॉ. आंबेडकरांना अनेक स्तरांवर अपेक्षित होते. यांतील मुख्य स्तर हा राजकीय स्वरूपाचा होता. म्हणूनच संघटित संघर्षाचा पवित्रा घेऊन, अस्पृश्यतेचा प्रश्न हा मूलतः राजकीय प्रश्न आहे, अशी भूमिका डॉ. आंबेडकरांनी सातत्याने घेतली.

अस्पृश्यतेचा प्रश्न

आंबेडकरी चळवळीतला राजकीय गाभा ही समाजाला ढवळून काढणारी प्रेरणा होती आणि आहे. अस्पृश्यतेचा प्रश्न प्रथम राजकीय प्रश्न आहे, नंतर सामाजिक; म्हणूनच तो सोडवताना राजकीय दृष्टी ठेवूनच पुढे जायला हवे, अशी भूमिका घेऊन डॉ. आंबेडकरांनी आयुष्यभर तिचा पाठपुरावा केला. या मार्गाने जाताना सतत संघर्षाचे वातावरण त्यांच्या अवतीभोवती उभे होते. पण कोणत्याही परिस्थितीत आपली भूमिका न सोडण्याचा खंबीरपणा त्यांनी दाखवला. डॉ. आंबेडकर काही एका दिवसात या भूमिकेपर्यंत आले नव्हते. अनुभव, चिंतन आणि वैचारिक सुस्पष्टता यांतून त्यांची ही भूमिका बनत गेली होती. त्यांनी दिलेला लढा म्हणूनच महत्त्वाचा होता. डॉ. आंबेडकरांचा हा वैचारिक प्रवास आणि या प्रवासातील निर्धारामागची पार्श्वभूमी या दोन गोष्टी अत्यंत मोलाच्या होत्या. आपल्या बांधवांनी आपले विचार समजून घ्यावेत अशी कळकळ त्यांना होती. म्हणूनच धर्मांतराचा निर्णय प्रत्यक्षात उतरवण्यापूर्वी त्यांनी वेळोवेळी त्या विषयीचा ऊहापोह करणारे भाष्य केलेले आढळून येते.

31 मे 1936 रोजी झालेल्या मुंबई इलाखा महार परिषदेत केलेल्या 'मुक्ती कोन पथे' या भाषणात त्यांनी आपली भूमिका सविस्तरपणे मांडली. धर्मांतरामागची विविध कारणे, त्याचे ऐतिहासिक, सामाजिक, ऐहिक पैलू तपशिलांत सांगून ते त्यात म्हणतात : ‘‘सारा हिंदू धर्म वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंनी, वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंच्या संवर्धनाकरिता रचलेला आहे, ही गोष्ट अगदी निर्विवाद आहे. ज्याला ते धर्म म्हणतात, त्या धर्मात तुम्हांला गुलामांची भूमिका दिलेली आहे. इतकेच नव्हे, तर या गुलामगिरीतून तुमची कधी सुटका होऊ नये, अशा प्रकारची व्यवस्थाही त्या धर्मात केलेली आहे. म्हणून हिंदू धर्मातील ह्या बौद्धिक गुलामगिरीतून सुटका करून घेण्याची तुम्हांला जितकी जरुरी आहे, तितकी हिंदूंना नाही. अशा रीतीने विचार केला असता, हा हिंदुधर्म तुम्हांला दोन्ही तऱ्हेने मारक झाला आहे. या धर्माने तुमचे मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेऊन तुम्हांला गुलाम केले आहे व याच धर्माने तुम्हांला व्यवहारात गुलामगिरीच्या दशेत आणून टाकले आहे. तुम्हांला जर स्वातंत्र्य हवे असेल तर तुम्हांला धर्मांतरच केले पाहिजे. माणूस धर्माकरिता नाही, तर धर्म माणसाकरिता आहे. माणुसकी प्राप्त करून घ्यावयाची असेल, तर धर्मांतर करा.’’ असे आवाहन करून डॉ. आंबेडकर याच भाषणात एके ठिकाणी आपल्या बांधवांना परखडपणे विचारतात : ‘‘जो धर्म तुमच्या माणुसकीला काही किंमत देत नाही, त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुम्हांला देवळात जाऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुम्हांला पाणी मिळू देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता?... जो धर्म तुमची पदोपदी मानहानी करतो, त्या धर्मात तुम्ही का राहता?’’

मानवतेची शिकवण देणारा आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रयीला पायाभूत तत्त्वे समजणारा बुद्धाचा धम्म डॉ. आंबेडकरांना स्वीकारावा वाटला तो याच दृष्टिकोनातून. त्यांच्या दृष्टीने हे धर्मांतर केवळ प्रतीकात्मक नव्हते. ते समग्रतेने केलेले धर्मांतर होते. त्यात हेतू होता, आवेश होता तसेच शतकानुशतकांचे ओझे डोक्यावरून फेकून देण्याचे बंडही होते. भविष्याशी एक वेगळे नाते जोडण्याची उमेद त्यात होती. दलितांना मुक्तीच्या महामार्गाकडे नेणारे हे धर्मांतर म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या वैचारिक प्रवासाची परिणती होती. आंबेडकरांच्या चळवळीचा विचार करताना या विचाराचा जोर आणि प्रभाव जाणवत राहतो. त्यांचे चरित्र या एका विचाराने झपाटले असल्याचे जाणवते. ‘मी हिंदू म्हणून जन्माला आली असली तरी हिंदू म्हणून मरणार नाही’, या डॉ. आंबेडकरांच्या घोषणेच्या पुढचे-मागचे संदर्भ जागवत त्यांच्या चरित्रावर स्पष्ट प्रकाश टाकणारा डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' हा चित्रपट नुकताच प्रकाशात आला आहे. यंदाच्या वर्षी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट इंग्रजी चित्रपट म्हणून गौरवण्यात आले, तर डॉ. आंबेडकरांची भूमिका साकार करणाऱ्या माम्मुटी या अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार विभागून मिळाला. सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शनाचे बक्षीसही या चित्रपटाने पटकावले. भारताबरोबरच न्यूयॉर्क, लंडन येथेही चित्रीकरण करून तयार करण्यात आलेला हा चित्रपट खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तराच्या दर्जाचा चित्रपट बनावा, अशा जिद्दीने आणि कळकळीने बनवण्यात आला आहे. अशोक मेहता (छायाचित्रण), नितीन देसाई (कलादिग्दर्शन), अमर हळदीपूर (संगीत), भानू अथैया (वेषभूषा), सूनी तारापोरवाला (पटकथा-संवाद लेखन) अशा मान्यवरांचा सहभाग असलेला हा चित्रपट गेली अनेक वर्षे चर्चेत होता.  

चरित्रपट ही कसरत 

मुळात कोणताही चरित्रपट काढणे ही कसरत करण्यासारखी गोष्ट आहे. त्यातही एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे चित्रीकरण करणे ही तर अधिकच कठीण अशी बाब आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे व्यक्तिमत्त्व म्हणजे तर मोठेच आव्हान. देशभरात ज्या व्यक्तीबद्दल आदराची भावना आहे, ज्या व्यक्तीकडे लोक आपला एक उद्धारकर्ता म्हणून बघतात, ज्या व्यक्तीमध्ये लोकांच्या भावना गुंतलेल्या आहेत, महात्मा गांधींसारख्या लोकोत्तर नेत्याशी असलेले मतभेद ज्या व्यक्तीने आयुष्यभर जाहीरपणे जपले-जोपासले होते, अशा डॉ. आंबेडकरांवर चित्रपट बनवणे ही सोपी गोष्ट नव्हती. पण डॉ. जब्बार पटेल यांच्यासारख्या अनुभवी दिग्दर्शकाने हे आव्हान पेलले आणि हा चित्रपट बरेच संशोधन, परिश्रम, वैचारिक देवाणघेवाण, अभ्यास अशा अनेक गोष्टींच्या आधारावर पूर्ण केला.

चित्रपट हे लोकांच्या मनाचा ठाव घेणारे एक माध्यम आहे. चरित्रपट म्हटला म्हणजे संबंधित व्यक्तीबरोबरच तिचा भोवताल, काळाचा पट, सामाजिक वातावरण, ऐतिहासिक सत्यता अशा अनेक गोष्टींची विश्वासार्हता जपावी लागते. कितीही संशोधन केले, अचूकता आणण्याचा प्रयत्न केला, तरी मतभेद हे राहतातच. त्यामुळे वादग्रस्तता कमी करता आली तरी टाळता येतच नाही. लोकांच्या भावनाही लक्षात घ्याव्या लागतातच. अनेक कसोट्यांमधून पार पडावे लागते. सर्व काही सांभाळून परत विश्वासार्हता टिकवून धरावी लागते. डॉ. आंबेडकरांवरील चित्रपट हे असे अनेक दृष्टींनी आव्हानच होते. सर रिचर्ड अँटेनबरो यांनी दिग्दर्शित केलेला 'गांधी' हा महात्मा गांधींवरचा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला, त्या वेळीही अनेक अंगांनी वाद झडले, चर्चा घडली. पण या चित्रपटाच्या निमित्ताने जगातले एक महान आणि लक्षणीय व्यक्तित्व लोकांसमोर आले. महात्मा गांधींच्या विचारांविषयी, तत्त्वज्ञानाविषयी आणि एकूणच भूमिकेविषयी नव्याने एक कुतूहल जागे झाले. गांधीविचार परत एकदा वेगळ्याच अशा माध्यमातून जगाच्या समोर आला. ज्या मंडळींना महात्मा गांधींविषयी फारसे माहीत नव्हते, त्यांना त्यांच्या आयुष्याविषयी, कार्याविषयी समजले. महात्मा गांधी एक व्यक्ती म्हणून काय होते, याची एक झलक त्यांना बेन किंग्जले यांच्या अभिनयातून बघायला मिळाली. 

चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमातून डॉ. आंबेडकरांचे व्यक्तित्व लोकांपुढे आले, तर त्यांच्या वैचारिक भूमिकेबद्दल आणि कार्याबद्दल लोकांना अधिक माहिती होईल, आंबेडकरी चळवळीमागे नेमकी कोणती पार्श्वभूमी होती हे समजून येईल असा हेतू दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या मनात होता. तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉ. आंबेडकरांची खरी ओळख जाऊन पोचेल आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय व्यापक स्तरावर होईल अशी भूमिका हा चित्रपट इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांतून काढण्यामागे होती. आंबेडकरांवरील चित्रपटाची कल्पना एकदम सुचली आणि लगेच त्याचे काम सुरू झाले, असे मात्र घडले नाही. या चित्रपटाची जन्मकहाणी आणि एकूण निर्मितिप्रक्रिया या मागे मुख्य जोर होता तो दिग्दर्शक जब्बार पटेल यांचाच. पण अनेकांचा हातभार या चित्रपटाला लागला; अनेक जणांचा प्रत्यक्ष सहभाग चित्रपटाच्या निर्मितीत राहिला. या साऱ्याबद्दल जब्बार पटेल एक प्रमुख साक्षीदार म्हणून जेव्हा  तपशिलात सांगतात, तेव्हा एका व्यापक चरित्रपटाची कहाणीच उलगडत जाते.

डॉ. आंबेडकरांवर चित्रपट बनवण्याची कल्पना जब्बार पटेल यांचीच. त्यांना ही प्रेरणा मिळाली, ते फिल्म्स डिव्हिजनसाठी डॉ. आंबेडकरांवर माहितीपट करत होते त्या वेळच्या अनुभवांवरून. माहितीपट ते चरित्रपट असलेला चिवपट असा डॉ. आंबेडकर यांच्यावरील चित्रपटाच्या कल्पनेचा प्रवास घडला. जब्बार पटेल या विषयाच्या सहवासात दहा तरी वर्षे होते. हा अनुभव त्यांना समृद्ध करणारा वाटला. एका महान व्यक्तिमत्त्वाच्या सहवासातच जणू त्यांनी हा काळ घालवला होता!  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मशताब्दी 1991 मध्ये साजरी झाली. या निमित्ताने फिल्म डिव्हिजन ने त्यांच्यावर माहितीपट तयार करण्याचा निर्णय घेतला, हा 1988-89 चा सुमार असेल. फिल्म्स डिव्हिजनच्या माहितीपट विभागाचे प्रमुख विजयचंद्र यांच्या कारकिर्दीत हा माहितीपट बनला. डॉ. जब्बार पटेल याचे दिग्दर्शन करत होते. तज्ज्ञ सल्लागार म्हणून अरुण साधू आणि दया पवार मार्गदर्शन करत होते. डॉ. आंबेडकरांबइलचे संशोधन सुरू झाले, तेव्हा या विषयाचा आवाका भलताच मोठा असल्याचे सर्वांनाच जाणवू लागले.

दया पवार तर डॉ. पटेलांना एकसारखे म्हणत होते की, 'तुम्ही हा चित्रपट कराच, नक्की करा. पैशाची अडचण येणार नाही, आपल्याला यासाठी घराघरांतून पैसे मिळतील.' डॉ. पटेलांच्या मनात तर विषय केव्हाच रुजला होता, पण प्रथम माहितीपट तर पूर्ण व्हायला हवा होता. माहितीपट बनवताना मुख्य अडचण अशी होती की फिल्म्स डिव्हिजनकडे डॉ. आंबेडकरांवर झालेले प्रत्यक्ष छायाचित्रण फक्त दोन मिनिटांपुरते होते. त्याच्या पलीकडे त्यांचे प्रत्यक्ष चित्रीकरणच उपलब्ध नव्हते. माहितीपटासाठी मग रेखाचित्रांचा वापर करण्याचा निर्णय घेतला गेला. संजय पवार यांनी ही बाजू सांभाळली. माहितीपट मुळात 40 मिनिटांचा बनवायचा होता, पण तो 1 तासाचा झाला. यासाठी डॉ. आंबेडकर जिये जिथे वावरले, तेथील चित्रीकरण करण्यावर भर देण्यात आला. आंबेडकरांनी वापरलेल्या वस्तू, त्यांची अभ्यासाची खुर्ची, त्यांच्याबद्दलची कात्रणे, त्यांची छायाचित्रे यांचा समावेश या माहितीपटात झाला. डॉ. आंबेडकरांचे लेखन वाचणाऱ्यांना, ते प्रत्यक्ष वावरले तो परिसर, ते जिये शिकले ती परदेशी विद्यापीठे हे सारे प्रत्यक्ष बघायला मिळावे अशा हेतूने ते प्रथम जिये शिकायला गेले त्या कोलंबिया विद्यापीठात जाऊन काही स्थळांचे प्रत्यक्ष चित्रीकरण करावे अशा हेतूने आठ जणांची टीम घेऊन डॉ. जब्बार पटेल अमेरिकेला गेले.

कोलंबिया विद्यापीठात अशा प्रकारचे चित्रीकरण करण्यासाठी परवानगी मिळणे तसे सोपे नव्हते, पण तेये यू.एस.आय.एस. मध्ये काम करणारा अमान मोमीन हा मूळचा कोल्हापूरचा एकजण भेटला. त्याच्या प्रयत्नांमुळे परवानगी मिळाली, तीही निःशुल्क. एरवी यासाठी भरपूर पैसे पडले असते. पण विद्यापीठाच्या एका माजी विद्यार्थ्यावरील माहितीपटासाठी चित्रीकरण करायचे आहे ही मात्रा लागू पडली. हा विद्यार्थीही कोणी साधासुधा नव्हता, भारतासारख्या एका मोठ्या लोकशाही देशाची घटना लिहिणारा होता! कोलंबिया विद्यापीठाच्या प्राच्यविद्या विभागातर्फे मदतनीस म्हणून एक मुलगा या सर्वाबरोबर फिरला. तेथे ठेवलेले रेकॉर्ड त्याने दाखवले. डॉ. आंबेडकर 1915 16 साली विद्यापीठात शिकत होते. तेथील प्रा. एम्ब्री आणि एलिनॉर झिलिपट या दोघांनी डॉ. आंबेडकरांविषयी बरीच चर्चा केली. कोलंबिया विद्यापीठातला हॅमिल्टन हॉल, फिलॉसफी हॉल या ठिकाणांचे चित्रीकरण मिळाले. डॉ. आंबेडकरांच्या जीवनातील अनेक संदर्भ मिळतात ते त्यांच्या पत्रांमधून. कोलंबिया विद्यापीठात शिकत असतानाही त्यांनी अनेकांना पत्रे लिहिली. या पत्रांमधून 154 हा नंबर वारंवार येतो. डॉ. आंबेडकर जिथे राहत असत, त्या कॉस्मॉपॉलिटन क्लबचा हा नंबर होता. बरेच भारतीय विद्यार्थी तिथे राहत असत. या भागात हिंडताना या मंडळींच्या लक्षात आले की तो पूर्णपणे ब्लॅक एरिया होता. कृष्णवर्णीयांची गजबजलेली बस्ती असलेला भाग. ब्रॉडवेचा उच्चभ्रू, गोऱ्या लोकांचा भाग एका बाजूला आणि काळ्या लोकांच्या वस्तीचा भाग दुसऱ्या बाजूला; अशी सरळ सरळ विभागणी 1990 च्या आसपासही तिये होती. तिथे फिरताना कोणाचेही मन उद्विग्न व्हावे, असेच वातावरण. दोन वस्त्यांमध्ये इतका फरक? 

काळ्यांच्या वस्तीत

काळ्यांची बस्ती म्हणजे दारिय, बकालपणा, काळी माणसे, स्त्रिया आणि मुले. अमेरिकेच्या आधुनिक आणि विकसित वातावरणापेक्षा इथला माहोलच बेगळा. डॉ. आंबेडकर साधारपणपणे 1915 ते 1917 या काळात इथल्या ब्लॅक एरियामध्ये राहिले होते. त्या वेळची परिस्थिती काय असेल? त्यांना त्या दिवसांत बरेच काही सोसावे लागले असणार! असा विचार या विभागातून फिरताना डॉ. जब्बार पटेल यांच्या मनात चमकून गेला. काळ्या लोकांच्या सहवासातले आंबेडकरांचे दिवस आणि अमेरिकेतील वर्णभेदी संस्कृतीच्या वातावरणात त्यांचे झालेले तेथील विद्यापीठातले वास्तव्य यांच्या संदर्भात फारसे कुठे वाचायला-ऐकायला मिळाले नव्हते. आंबेडकर चरित्रातले नवे संदर्भ प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उलगडत गेल्यासारखे डॉ. पटेल यांना वाटले. माहितीपटाच्या दृष्टीने या साऱ्यांचा फारसा उपयोग नव्हता; पण त्यांच्या मनात डॉ. आंबेडकर यांच्यावरील चित्रपटाचेच विचार एव्हाना घोळू लागले होते. 1914 मध्ये अमेरिकेत काळे आणि गोरे यांच्यातील समानतेची पहिली सुधारणा कायद्याने केली होती. प्रत्यक्षात मात्र वर्णभेदाचे वातावरण तेथे होते. डॉ. आंबेडकर हे भारताच्या घटनेचे भावी शिल्पकार. अमेरिकेतील घटना दुरुस्ती झाली, त्याच्या अगदी नजीकच्या काळात तेथे राहिले, हा योगायोग विलक्षणच म्हटला पाहिजे. अमेरिकेत कायदा झाला तरी समानता प्रत्यक्ष उतरली नव्हती, त्यासाठी झगडा करणारा मार्टिन ल्यूथर किंग अजून जन्माला यायचा होता, अशा काळात डॉ. आंबेडकरांनी तिथल्या विषमतेचा दारुण अनुभव घेतला होता. भारतीय हे त्या अर्थाने कृष्णवर्णीय नसले, तरी त्यांनाही फार सन्मानाची वागणूक मिळत नव्हतीच. डॉ. आंबेडकर शिकत असतानाच्या काळात कोलंबिया विद्यापीठात काळ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नव्हता. मुलीही तिथे नव्हत्या. काही भारतीय विद्यार्थी मात्र तिथे शिकत होते. त्यांच्यापैकी फक्त डॉ. आंबेडकर यांचे तैलचित्र आजही कोलंबिया विद्यापीठाच्या प्राच्य विद्या विभागात आहे.

कोलंबिया विद्यापीठातील एलिनॉर झिलियट या अभ्यासक विदुषी आणि प्रा. एम्ब्री यांच्या मुलाखतींचा समावेश आंबेडकरांवरील माहितीपटात झाला. या दोघांशी झालेल्या बातचितीतून अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा लळा आणि डॉ. आंबेडकरांनी दलितांच्या प्रश्नावर केलेला भारतातील संघर्ष यांच्यातील साम्यस्थळे स्पष्ट होत गेली. समाजातील एक विशिष्ट वर्ग आपल्यावरील अन्यायाविरुद्ध उभा राहतो तेव्हा त्याला वैश्विक परिमाणच प्राप्त होते, या अर्थाने डॉ. आंबेडकर हा साऱ्या जगाला स्पर्श करून जाणारा चित्रपटविषय ठरू शकतो; हे डॉ. जब्बार पटेल यांना प्रकर्षाने जाणवले. मार्टिन ल्यूथर किंगनेही अमेरिकेतील वर्णविद्वेषाच्या विरोधात लढा दिला. दोन धर्मांमधील संघर्ष जगाने अनेकदा पाहिले. एका धर्मातले सर्व जण एकत्र असतात, असा युक्तिवाद केला जातो. पण वर्णभेदाच्या जोरावर अमेरिकेत दोन मानवसमाजांमध्ये दरी पाडण्यात आली. भारतातील परिस्थितीही अशाच प्रकारची होती. डॉ. आंबेडकरांना स्वधर्मातील लोकांशीच लढा द्यावा लागला. झगडा करावा लागला. भारतातील जातिभेदाचे आणि अस्पृश्यतेचे राजकीय स्वरूप अमेरिका आणि इंग्लंडमधील वास्तव्यामुळे डॉ. आंबेडकरांच्या मनात ठळक होत गेले. अशा प्रगत देशांमधली परिस्थिती बघून, आपल्या आजूबाजूला पसरलेले विषमतेचे जीवन बघून भारतात आपल्यापुढे असलेले काम केवढे कठीण आहे याचीही कल्पना त्यांना कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्याच्या काळात येत गेली. अशा तऱ्हेचे भेदभाव संपवायचे असतील, तर शेवटी अखिल मानवजात ही एक आहे; सर्व माणसे समान आहेत, या भूमिकेला पर्याय नाही हे त्यांनी ताडले. पण आपला हा विचार बुरसटलेल्या परंपरांना कवटाळून बसणाऱ्या भारतीयांच्या गळी उतरवणे किती दुष्कर आहे याचीही त्यांना कल्पना होती. डॉ. आंबेडकरांच्या एकूण सत्याविषयीचे आणि त्यांच्या सामाजिक-राजकीय भूमिकेविषयीचे संदर्भ एका नव्या जाणिवेने मनात ठेवूनच फिल्म्स डिव्हिजनचा माहितीपट डॉ. जब्बार पटेल यांनी पूर्ण केला. आंबेडकरांच्या जन्मशताब्दीच्या दिवशी, 14 एप्रिल 1991 रोजी हा माहितीपट भारतात दूरदर्शनवरून दाखवण्यातही आला. पण दरम्यानच्या काळात, हा चित्रपटाचा विषय आहे, ही कल्पना डॉ. जब्बार पटेलांच्या मनात रुतून बसलेलीच होती. तिला साकार करण्याची इच्छा आणि उत्सुकता त्यांना अस्वस्थ करीत होती. 

एक दिवस डॉ. आंबेडकरांवरील चित्रपटाचा विषय अगदी अचानकपणे समोर आला आणि हा चित्रपट बनणार हे निश्चित झाले.

आंतरराष्ट्रीय स्तरावरचा चित्रपट जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रम हाती घेण्यात आले. त्याचीच पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्र सरकारतर्फे एक समिती स्थापन झाली होती. या समितीची बैठक बोलावण्यात आली. या पहिल्याच बैठकीच्या वेळी मृणाल गोरे यांची गाठ पडली तेव्हा डॉ. जब्बार पटेलांनी बनवलेल्या माहितीपटाविषयी त्यांनी उत्सुकता प्रकट केली. या वेळी त्यांच्याशी झालेल्या संभाषणाच्या वेळी, डॉ. आंबेडकरांवर खरे तर चित्रपट करायला हवा अशी आपली कल्पना डॉ. पटेलांनी बोलून दाखवली. मृणाल गोरे यांना ही कल्पना फारच पसंत पडली. चित्रपट बनवला, तर आंबेडकरांचा विचार आणि कार्य व्यापक स्तरावर जाईल, म्हणून या चित्रपटाच्या निर्मितीला पाठिंबा द्यायला हवा हा आपला विचार त्यांनी बैठकीच्या वेळी केलेल्या भाषणात जोरदारपणे मांडला. या कल्पनेचे स्वागत सर्वांनीच केले आणि डॉ. आंबेडकरांवर चित्रपट काढण्याची कल्पना उचलून धरली गेली.

तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी बैठकीतच, या चित्रपटासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे 1 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शक असतील, असेही ठरवण्यात आले. एवढा निधी अपुरा पडेल, कारण ‘गांधी’ सारखा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा चित्रपट बनवायचा झाल्यास मोठ्या प्रमाणावर खर्चाची जरूर भासेल, असेही त्यांनी या बैठकीपुढे सांगितले. निदान सहा-सात कोटी तरी लागतील असा अंदाज होता. पण प्रत्यक्षात आज हा खर्च 9 कोटींवर गेला आहे. चित्रपटासाठी राज्याराज्यांतून निधी उभा करता येईल; देशभरातून त्यास पाठिंबा मिळेल, याची खात्री मनात ठेवूनच प्रारंभिक काम सुरू झाले. महाराष्ट्र सरकारने प्राथमिक मदत म्हणून तसा भरघोस निधी दिलाच होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तयार होणाऱ्या चित्रपटाच्या व्यावहारिक बाबींचा आवाकाही व्यापक, त्यामुळे ‘एनएफडीसी’ (नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) कडे निर्मितीची जबाबदारी सोपवण्यात आली. एनएफडीसीचे संचालक रवी गुप्ता यांना महाराष्ट्र सरकारने चित्रपटाचे कार्यकारी निर्माता केले. मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला अशा जागतिक कीर्तीच्या नेत्यांइतकीच डॉ. आंबेडकरांची कामगिरी अजोड आहे, तेव्हा तिचा प्रसार जागतिक स्तरावर होणे आवश्यक ठरेल, या विचाराने हा चित्रपट इंग्रजीतून आणि

हिंदीतून काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचा आंतरराष्ट्रीय दर्जा राखण्यासाठी तशाच समर्थ 
पटकथा-लेखकाची गरज होती. याकरिता पहिले नाव पुढे आले ते गिरीश कर्नाड यांचे. पण त्यांनी सांगितले की, हे काम करायला मला आवडले असते, पण माझी पाटी कोरी आहे. त्यामुळे बराच वेळ यावर घालवावा लागेल. त्यांच्या इतर व्यग्रतेमुळे त्यांना ते जमणे कठीण बनले होते. रवी गुप्ता यांनी मग या कामासाठी सूनी तारापोरवाला यांचे नाव सुचवले. सूनी तारापोरवाला यांना जागतिक दर्जाच्या चित्रपटलेखनाचा अनुभव होता. 'सलाम बॉम्बे', 'मिसिसिपी मसाला' अशा अनेक चित्रपटांचे लेखन त्यांनी केले होते. अतिशय कुशल आणि दर्जेदार पटकथा-लेखक म्हणून त्यांचे नाव आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तीकडे हे काम सोपवल्यास विषयाला न्याय मिळेल अशी खात्रीही होतीच. हा विश्वास अनाठायी ठरला नाही. डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल बरेच वाचून, तयारी करूनच त्या भेटायला आल्या. या चित्रपटाचे पटकथा-लेखन हे अत्यंत अवघड काम होते. त्यासाठी कुशल पटकथा लेखकाबरोबर येथील सामाजिक-राजकीय वास्तवाचे भान असलेल्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाचीही गरज होती. तेव्हा हे काम अरुण साधू आणि दया पवार करतील असे ठरले. भारतातील तत्कालीन वातावरणाचे भान विश्वासार्ह पद्धतीने जपले जाणे आवश्यकच होते.

चित्रपटाची ही पायाभूत बाजू या दोघांनी अप्रतिमपणे सांभाळली. विशेषतः गांधी-आंबेडकर नात्याचे चित्रीकरण करणे ही नाजूक, महत्त्वाची आणि आव्हानात्मक बाब होती. डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या विद्वान, पंडित अशा दलित समाजातील नेत्याला काँग्रेसच्या प्रवाहात आल्यावर जो संघर्ष करावा लागला, त्याचे चित्रण योग्य रीतीने होणे महत्त्वाचे होते. चित्रपटाची ही बाजू या द्वयीने चोखपणे हाताळली. तर चित्रपटातील घटनांची आणि संदर्भाची ऐतिहासिकता पडताळून पाहण्यासाठी डॉ. य. दि. फडके यांचा सल्ला घेण्यात आला. त्यांनी अगदी काटेकोरपणे हे काम केले आणि त्याचे पालन होते की नाही हेही बारकाईने तपासले. सूनी तारापोरवाला तर या चित्रपट-लेखनामध्ये साफ बुडून गेल्या. जहाल आंबेडकरवाद त्या कोळून प्यायल्या आणि मगच या कामाला त्यांनी हात घातला. डॉ. आंबेडकरांना समजून घेण्यासाठी इथले दलित कवी माहीत हवेत, त्यांच्या जाणिवा समजून घ्यायला हव्यात, अशा भावनेने ही लेखिका त्यांना भेटली. दया पवारांबरोबर सर्वत्र हिंडून तिने दलित जीवनाचे अंतरंग पाहिले, समजून घेतले. डॉ. आंबेडकरांबरोबर ज्यांनी काम केले, त्यांच्या सहवासात जे आले त्या सर्वांना ती भेटली.

डॉ. आंबेडकरांचा ज्यांच्याशी पत्रव्यवहार होता अशा एस. एस. रेगे यांच्यासारख्या व्यक्ती, पीपल्स एज्युकेशन सोसायटीशी संबंधित लोक, बौद्ध भिक्खू अशा वेगवेगळ्या माणसांकडून आंबेडकरांविषयीच्या आठवणी सूनी तारापोरवाला यांनी गोळा केल्या, या सर्व माहितीची आणि संदर्भाची विश्वासार्हता निश्चित करण्याबाबत मात्र य. दि. फडके यांचा सल्ला मानण्यात आला. त्यांनी ज्या गोष्टींच्या संदर्भात पुराव्याअभावी संशय व्यक्त केला, त्या संदर्भांना वगळण्यात आले. डॉ. आंबेडकरांच्या भव्य आणि संघर्षशील जीवनपटाचे चित्रण सिनेमास्कोपमध्ये पडद्यावर साकारण्याचा निर्णय दिग्दर्शकाने घेतला होता. एक व्यापकतेचे सूत्र यातून प्रतीत होत होते. एकीकडे ही तयारी चालती असताना, या प्रयत्नाला सर्व बाजूंनी बळकटी यावी आणि जास्तीतजास्त अचूकता राहावी यासाठी, तसेच कोणताही वादग्रस्त मुद्दा पुढे काढला जाऊ नये याही हेतूने माता प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पटकथा समिती स्थापन करण्यात आली. दादासाहेब रूपवते, रा. सु. गवई, माई आंबेडकर, प्रकाश आंबेडकर, सोनकर शाली, बाबा आढाव, श्याम बेनेगल यांचा, तसेच सूनी तारापोरवाला, अरुण साधू, दया पवार, रवी गुप्ता आणि दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांचा समावेश या समितीत करण्यात आला. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या चित्रपटाच्या पटकथा-लेखनाला तसेच इतर आवश्यक बाबींना समितीने हिरवा सिग्नल दाखवल्यानंतरच पुढचे काम सुरू झाले. हे संशोधनाचे कामच सुमारे तीन वर्षे चालले. दरम्यानच्या काळात केंद्र सरकारनेही डॉ. आंबेडकरांची जन्मशताब्दी साजरी करण्याची मोहीम आखली होती. केन्द्रातर्फे आंबेडकरांवरील चित्रपटासाठी हालचाल सुरू असल्याचे शरद पवार यांच्याकडून डॉ. जब्बार पटेल यांना समजले. 

त्या काळात चंद्रशेखर पंतप्रधान होते. आंबेडकरांचे जन्मशताब्दी वर्ष चालूच होते. महाराष्ट्र सरकारही आंबेडकरांवर चित्रपट बनवत आहे असे कळल्यावर त्यांनी शरद पवारांना या संदर्भात पत्र लिहिले. दोन चित्रपट बनण्यापेक्षा एकच चित्रपट बनावा अशी खुद्द चंद्रशेखर यांची कल्पना होती. महाराष्ट्र सरकारच्या चित्रपटालाच निधी पुरवण्याकडेही त्यांचा कल वाटत होता. ही एक आनंदाचीच गोष्ट होती. या संदर्भात मग दादासाहेब रूपवते वगैरे मंडळींसह डॉ. जब्बार पटेल यांनी चंद्रशेखर यांची भेट घेतली. या चित्रपटासाठी राखून ठेवलेला पाच कोटी रुपयांचा निधी देण्यास त्यांची अनुकूलता होती. त्यांनी लगेच पैसे देऊ केले. दिग्दर्शकाच्या हाती हा निधी सोपवण्याची त्यांची तयारी होती. 'गांधी' चित्रपटालाही केंद्राकडून आर्थिक मदत देण्यात आली, त्या वेळी सर रिचर्ड अॅटेनबरो यांना ही रक्कम देण्यात आली होती. या चित्रपटासाठीचे पैसे मात्र एनएफडीसीला देण्यात यावेत; कारण या संस्थेतर्फेच निर्मितीचा व्यवहार हाताळला जाणार आहे, असे त्यांना स्पष्ट करून सांगण्यात आले, तेव्हा मग हा निधी एनएफडीसीच्या हाती सुपूर्द करण्यात आला.

केंद्र सरकारचा निधी या चित्रपटाला मिळाल्यावर चित्रच बदलले. जागतिक दर्जाचा चित्रपट निघण्याची कल्पना आता प्रत्यक्षात येणार, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना एक छोटेसे वादळ येऊन गेले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनणाऱ्या चित्रपटाचा दिग्दर्शक एखादी ज्येष्ठ व्यक्ती असावी, म्हणजे चित्रपटाला उत्तम प्रकारे न्याय मिळू शकेल अशी भूमिका घेऊन डॉ. आंबेडकरांच्या पत्नी माई आंबेडकर यांनी डॉ. जब्बार पटेल यांच्याऐवजी अन्य कोणी दिग्दर्शन करावे असा पवित्रा घेतला. चित्रपटाला अनपेक्षित असे वळण मिळू पाहत होते. या संदर्भात वाद-चर्चा होऊन चित्रपटनिर्मिती लांबण्यापलीकडे यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही. माई आंबेडकरांच्या मनात श्याम बेनेगल यांचे नाव होते. पण खुद्द श्याम बेनेगल यांनी या कामात फारशी उत्सुकता दाखवली नाही. रवी गुप्ता वगैरे मंडळींनी माई आंबेडकरांना समजावून सांगितले. मुळात हा चित्रपट करण्याची कल्पना डॉ. जब्बार पटेल यांची होती. त्यांनी एनएफडीसीकडे हा प्रस्ताव दिला होता, तेव्हा त्यांनाच या चित्रपटातून वगळणे अप्रस्तुत आणि अन्याय्यही ठरणार आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले. माई आंबेडकरांनी मग काही अटींसह आपला आग्रह मागे घेतला. श्याम बेनेगल यांना चित्रपटाचे सल्लागार म्हणून राहू देण्याची शर्त त्यांनी पुढे ठेवली. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ चित्रपटाला मिळावा अशी कल्पना होती. मात्र बेनेगल यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनात अजिबात ढवळाढवळ केली नाही, किंवा कधी काही शंकाही विचारल्या नाहीत, हा त्यांचा मोठेपणाच आहे, असे डॉ. जब्बार पटेल यांना वाटते.  

प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात 

चित्रीकरणाला सुरुवात करण्यापूर्वीची तयारी हीसुद्धा तितकीच महत्त्वाची होती. एका मोठ्या ऐतिहासिक मूल्याच्या चित्रपटाला हात घालणे म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती. जरी माहितीपटाच्या निमित्ताने परदेशांतील स्थळांविषयी अंदाज आला असला, तरी तो पुरेसा नव्हता. कारण माहितीपटात कोलंबिया विद्यापीठ किंवा लंडनमधील रस्ते आजच्या स्वरूपात दाखवून भागणार होते, तसे चित्रपटात करता आले नसते. डॉ. आंबेडकर 1915 ते 1917 या काळात कोलंबिया विद्यापीठात शिकले. 1920 मध्ये ते पुढील अभ्यासाकरिता लंडनला गेले, ते 1924 पर्यंत तेथेच होते. लंडन विद्यापीठ, ग्रेज इन अशा अनेक ठिकाणांचा चित्रीकरणात समावेश होणे आवश्यक होते. तसेच दुसऱ्या गोलमेज परिषदेस ते हजर राहिले, तीही लंडनमधील एक महत्त्वाची घटना चित्रपटात असणार होती. पण या सर्वच ठिकाणी प्रत्यक्षात चित्रीकरण करणे कठीण होते, कारण ही सर्व स्थळे चित्रीकरणाला उपलब्ध होणे अशक्य होते. जी उपलब्ध होऊ शकली असती, तिथे चित्रीकरणाच्या दृष्टीने अडचणी येण्याची शक्यता होती. तरीपण या स्थळांना भेटी देणे हे आवश्यकच होते. कारण त्याशिवाय सेट उभारायची वेळ आल्यास ते उभारताही आले नसते.

या दृष्टीने मग प्रथम डॉ. जब्बार पटेल आपले कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्यासह न्यूयॉर्क आणि लंडनला गेले. व्हिडिओ कॅमेरा बरोबर होताच. लंडनमधील स्थळांची आणि इतर संदर्भांची माहिती जमविलेली होतीच. शिवाय तिथल्या काही व्यक्तींशीही आधीच संपर्क साधण्यात आला होता. पुढील काम सोपे व्हावे म्हणून चित्रपटाविषयी, त्याच्या काळाविषयी आणि अपेक्षित संदर्भांविषयी त्यांना आधीच कळविण्यात आले होते. जॉइस नोक्स आणि प्रिसिला जॉन यांची या कामात अमूल्य अशी मदत झाली. डॉ. आंबेडकर विद्यार्थी म्हणून जिथे जिथे वावरले त्या ठिकाणांची माहिती जॉइस नोक्सने काढूनच ठेवली होती. या स्थळांना भेटी देण्यासाठी आवश्यक ती पूर्वपरवानगी काढणे, त्यासाठी ओळखी काढणे ही कामेही जॉइसने करून ठेवली होती.

याशिवाय, तत्कालीन रस्ते, फर्निचर, कपडेपट, समूह-दृश्यांसाठी लागणारे नट-नट्या, इतर आवश्यक सामग्री यांच्याविषयी माहितीही तिने तयार ठेवली होती. विशिष्ट कालखंडाचा संदर्भ असल्याने या चित्रपटाच्या अनेक गोष्टींचा तपशील सांभाळणे फार आवश्यक होऊन बसले होते. तिकडे या गोष्टींचे वर्गीकरण करून तशी सामग्री पुरवणारी केंद्रे उपलब्ध आहेत. विशिष्टकालीन कपडे, फर्निचर, घरे यांबरोबरच जुन्या गाड्या, लंडनमधील त्या वेळचे रस्ते अशा अनेक गोष्टींसाठी या मंडळींची मदत फार झाली. तेथील कॉश्चूम शॉप्स तर उत्तम प्रकारे सजवण्यात आली आहेत. तुम्हांला कोणत्या काळासाठीचे आणि कोणत्या स्तरातील व्यक्तींचे कपडे हवेत, हे नुसते सांगितले तरी तुमच्यापुढे सर्व हजर होऊ शकते, इतके चांगले वर्गीकरण करून ठेवलेले असते. तेथील स्टुडिओही अद्ययावत आहेतच. तसेच, तुम्हांला विशिष्ट प्रकारची वस्ती, गाव इत्यादी हवे असेल, तर तशी ठिकाणेही चांगल्या प्रकारे राखलेली आहेत. त्यामुळे पूर्वीच्या काळातील लंडनमधले रस्ते, वाहतुकीची व्यवस्था, वाहने हे सर्व उपलब्ध होणे कठीण नव्हते. जुन्या गाड्याही तिथे अगणित मिळू शकतात. सर्व प्रकारच्या गाड्या बघायला मिळतात. पण त्यासाठी येणारा खर्चही तेवढाच भारी असतो. अशा परिस्थितीत 4-5 गाड्यांच्या पलीकडे जुन्या गाड्या भाड्याने घेण्याची ताकद या चित्रपटाजवळ नव्हती.

भावनात्मक साद

तीच गोष्ट वेगवेगळ्या ठिकाणी लागणाऱ्या शुल्कांची. तेथील ब्रिटिश म्युझियममध्ये असलेल्या ग्रंथालयात बसून डॉ. आंबेडकर अभ्यास करत. तिथे त्यांचा वावर असे. ते ज्या खुर्चीवर बसत ती विशिष्ट खुर्ची आजही तिथे आहे. जॉइस नोक्सने ब्रिटिश म्युझियमच्या संदर्भात सर्व चौकशी करून ठेवली होती. जॉइस नोक्स मूळ भारतीय असल्याने तिला या प्रकल्पाविषयी आस्था असणे स्वाभाविकच होते. या ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी प्रथम परवानगी मिळत नव्हती, पण इथल्या एका विद्यार्थ्यावर होत असलेला हा चित्रपट आहे अशी भावनात्मक साद घालून परवानगी मिळवण्यात आली. याच तत्त्वावर इतरही अनेक ठिकाणी सहकार्य प्राप्त करणे शक्य होत गेले. या चित्रीकरणासाठी ब्रिटिश म्युझियम बंद ठेवता येणे शक्य नाही, हे मात्र आधीच स्पष्ट करण्यात आले होते. रविवारी दोन वाजेपर्यंत फक्त ते बंद असते, तर रविवारी सकाळच्या वेळात चित्रीकरणास परवानगी मिळाली. ही फार महत्त्वाची गोष्ट होती, कारण चित्रपटात प्रत्यक्ष ब्रिटिश म्युझियम दाखवता आल्याने त्यातील काळ उभा राहण्यास मदत होणार होती. तसेच  डॉ. आंबेडकर जिथे प्रत्यक्ष वावरले तो परिसर त्यांच्या चाहत्यांना बघायला मिळणे ही पर्वणीच होती.

पण अशी सर्वच ठिकाणे तशीच्या तशी वापरता येण्यासारखी नव्हती. कारण इतक्या वर्षांमध्ये अनेक बदल घडले होते. डॉ. आंबेडकर जेव्हा गोलमेज परिषदेसाठी बोटीने लंडनला आले, तेव्हा ते लिव्हरपूलला उत्तरले होते. पण आजच्या आणि त्या वेळच्या लिव्हरपूलमध्ये जमीन-अस्मानाचे अंतर पडले आहे. शिवाय त्या काळची बोट कुठून पैदा करायची हादेखील एक प्रश्नच होता. पण ही अडचण दूर केली ग्लॉस्तर येथे असलेल्या मरीन म्युझियमने. तिथे लिव्हरपूलसारखे स्थळही सापडले आणि जुन्या बांधणीची बोटही. डॉ. आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये होते 1922-24 मध्ये. त्या वेळची जुनी इमारत आजही आहे, पण आणखी एक नवी इमारतही आता उभी राहिली आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आय. जी. पटेल हे तेथे माहितीपटाचे चित्रीकरण झाले त्या काळात, तिथले संचालक होते. त्यांच्यामुळे तिथल्या जुन्या इमारतीत चित्रीकरण करता आले. आतील भाग काही बदलला नव्हता, त्यामुळे डॉ. आंबेडकर जिथे शिकले तो भाग चित्रपटात चित्रित करता आला. अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठाच्या परिसराचा अंदाज घेण्यासाठी परत जावे लागले. विशेषतः तिथला क्रॅक एरिया, ब्लॅक चर्चेस, रस्ते यांचा समावेश चित्रपटात होणार असल्याने त्याबद्दलची कला दिग्दर्शकाची मतेही आवश्यक होती. सेट उभारणी करण्यासाठीही या विभागाची माहिती असणे आवश्यकच होते. या संदर्भात अमेरिकेतील त्रिलोक मलिक यांची खूप मदत झाली, तिथे स्थायिक झालेले हे अभिनेता निर्माता. त्यांनी काढलेला आणि अभिनित केलेला ‘लोनली इन अमेरिका’ हा चित्रपट प्रसिद्ध आहे. डॉ. आंबेडकरांचा पत्रव्यवहार खूपच मोठा होता. पत्रावर राहत्या जागेचा पूर्ण पत्ता लिहिण्याची त्यांची सवय असल्याने, त्यांच्या वास्तव्याची अनेक ठिकाणे आणि इतर संदर्भ आपोआपच हाती येत गेले. हे पत्ते हुडकून काढता येणे त्यामुळे सहज शक्य होते.

कोलंबियातला कॉस्मॉपॉलिटन क्लब जसा सापडला, तसेच लंडनमधील किंग हेन्री स्ट्रीटवरचे डॉ. आंबेडकर राहत असलेले घरही. या घरावर आज डॉ. आंबेडकर तेथे राहिले असे सांगणारी पाटी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरही लंडनला ज्या घरात राहत होते त्या घरावर अशीच पाटी लावण्यात आली आहे. अलीकडेच तळेगाव येथील घरावर पडलेल्या दरोड्याच्या वेळी ज्यांचा अंत झाला त्या मुकुंद सोनपाटकी यांनी लंडनमध्ये अशा पाट्या लावण्याच्या कामी पुढाकार घेतला होता. चित्रीकरणाच्या बऱ्याच जागा ठरल्या. पण डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी ज्या दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी एकत्र हजर होते, त्याचे चित्रीकरण कोठे करायचे हा प्रश्न होता. कारण ही परिषद ज्या सेंट जेम्स पॅलेसमध्ये झाली, तो राजवाडा आता प्रिन्स चार्ल्स यांचे अधिकृत निवासस्थान आहे. माहितीपटाच्या वेळीही ही अडचण आलीच होती, पण तेव्हा या राजवाड्याचे बाहेरून चित्रीकरण करता आले होते. तेथील ज्या हॉलमध्ये हो परिषद झाली तो हॉल बघण्याची परवानगीही मिळाली नाही. आयर्लंडमधील उद्रेकामुळे तेथे सुरक्षेच्या संदर्भात फारच दक्षता बाळगली जात होती. हा हॉल जर पाहिलाच नाही, तर त्याचा सेट तरी कसा बनवणार, असा प्रश्न होता.

कला दिग्दर्शकासह डॉ. पटेल लंडनला गेले तेव्हा ही परवानगी मिळाली नाही, पण पुढे कॅमेरामन अशोक मेहता यांच्यासह दुसरी फेरी झाली त्या वेळी या राजवाड्याची देखरेख करणाऱ्या लॉर्ड चेंबरलेन यांच्या कार्यालयातून सेंट जेम्स पॅलेस बघण्यापुरती परवानगी अखेर प्राप्त झाली. हे सभागृह पाहिले तेव्हा असे ठिकाण कुठेतरी पाहण्यात आले असल्याचे डॉ. पटेल यांना जाणवले. पण नेमके काहीच आठवेना. पर्यायी हॉलसाठी बरीच शोधाशोधही करण्यात आली. पण अशासारखे स्थळ सापडत नव्हते. अखेरीस हे ठिकाण मिळाले भारतातच. डॉ. आंबेडकर सायमन कमिशनपुढे गेले होते. हे कमिशन होते तत्कालीन गव्हर्नर हाउसमध्ये - सध्याच्या पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत. सायमन कमिशनच्या चित्रीकरणासंबंधी तपास करण्याच्या दृष्टीने डॉ. पटेल जेव्हा तिथे गेले, तेव्हा त्यांच्या एकदम लक्षात आले की तिथला शिवाजी हॉल हा गोलमेज परिषदेचा हॉल बनू शकतो - इतके साम्य त्यात होते. तिथल्या खिडक्या, छत, भिंती तशाच पद्धतीच्या आहेत. विद्यापीठाच्या अर्काइव्ह्जमधून जुनी पेन्टिंग्ज मिळाली. त्यामुळे तो काळ उभा राहण्यास फारच मदत झाली. याशिवाय, भारतातील चित्रीकरणाच्या वेळीही अनेक अडचणी होत्याच. जुनी मुंबई आज पडद्यावर उभी करणे ही किती कठीण गोष्ट आहे, हे दर दोन-चार वर्षांनी मुंबईत झपाट्याने होणारे बदल जे नित्य पाहतात त्यांना चांगलेच ठाऊक असेल. जुने रस्ते, त्यावर धावणारी गाड्यांची जुनी मॉडेल्स, त्याशिवाय पूर्वीच्या काळी मुंबईत धावणारी ट्राम अशा अनेक गोष्टींची व्यवस्था करण्याची गरज होती. सुदैवाने इतर गोष्टींबरोबर एक ट्रामही येथे मिळाली. केवळ मुंबईतच नव्हे, तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी अनेक बदल झाले होते.

विजेचे खांब, टी.व्ही. अँटेना आणि एअर कंडिशनरची खोकी यांचा तर सुळसुळाटच सर्वत्र आज झाला आहे. प्रत्येक वेळी याचे भान ठेवूनच काम करावे लागत होते. नाशिकच्या काळ्या रामाच्या मंदिरप्रवेशाचा सत्याग्रह चितारताना 200 तरी अँटेना मध्ये येत होत्या. त्या झाकणे, एअर कंडिशनरची खोकी हार्डबोर्डचे तुकडे लावून लपवणे असे अनेक प्रकार करावे लागले. नाशिकच्या राममंदिराच्या ठिकाणी निदान चित्रीकरण तरी करायला मिळाले. पण अनेक ठिकाणी इतके बदल झाले होते की पर्यायी स्थळांचा किंवा सेटचाच विचार  करावा लागला. बडोदा येथे आंबेडकर पारसी सॅनेटोरियममध्ये पारसी या नावाने राहत होते. ते सॅनेटोरियम आजही असले, तरी चित्रीकरणाच्या दृष्टीने तेथे सोय नसल्याने या जागेचाही सेटच उभारावा लागला. डॉ. आंबेडकर बडोदा संस्थान येथील महाराजांच्या सेवेत होते, त्या वेळी त्यांना राहण्यासाठी घर मिळण्याची पंचाईत झाली होती. त्यांची जात माहीत असल्याने त्यांना कोणी जागा द्यायलाच तयार होत नसे. त्या काळात पारसी सॅनेटोरियममध्ये ते बनावट पारसी या नावाने काही काळ राहिले होते.

अर्थातच सत्य उघड होताच त्यांना ती जागा सोडावी लागली. या सॅनेटोरियममध्ये फक्त पारसी धर्मीयांनाच राहण्याची परवानगी होती. संस्थानच्या कचेरीतही त्यांचा जातीवरून पाणउतारा केला जात असे. त्यांना शिपाई पाणी आणून देत नसे. हाताखालचा कारकून दुरून फाईल त्यांच्या टेबलावर फेकत असे. बडोदा महाराजांनीही, एकदम सगळी सुधारणा करणे आपल्या हाताबाहेर असल्याचे त्यांना सांगितले होते. तेथील वास्तव्यात अपमानाचा कडेलोट झाला त्या वेळी आपल्या वाट्याला अशा प्रकारचे अपमानित जगणे निष्कारण यावे, याचा डॉ. आंबेडकरांच्या मनावर मोठाच परिणाम झाला. त्या वेळी आवारात असलेल्या एका झाडाखाली उभे राहून मोकळ्या आकाशाच्या साक्षीने आपण गदगदून रडलो, असे डॉ. आंबेडकरांनी स्वतःच लिहून ठेवले आहे. त्यांच्या आयुष्यातील हा अत्यंत हेलावून टाकणारा प्रसंग. अंतर्मनात ठिणगी पेटली असतानाही त्यांना डोळ्यांतील अश्रूंवाटे ही आग विझवावी लागली होती. या प्रसंगाचे चित्रीकरण बडोद्यातील विद्यापीठाच्या आवारातील एका वृक्षाखालीच करण्यात आले.

बडोदा, कोल्हापूर अशा दोन्ही ठिकाणच्या राजवाड्यांमध्ये मात्र हवे तसे चित्रीकरण करता आले. भारतातील चित्रीकरणाच्या वेळीही जुन्या मोटारी, पूर्वीच्या पद्धतीच्या घोडागाड्या, यांची गरज होतीच. यासाठीही मोठाच खर्च येणार होता. केवळ स्थळेच नव्हे, तर ठिकठिकाणी अनेक ज्युनिअर आर्टिस्टही लागत. मुंबई, पुणे, नाशिक किंवा इतर ठिकाणचे चित्रीकरण करताना तेच तेच चेहरे दाखवून भागणार नव्हते. तसे केलेही नाही. यात सगळीकडे नवीन चेहरे दिसतात. डॉ. आंबेडकरांवरील चित्रपटासाठी लोक आवर्जून येत. परदेशांतूनही भारतीयांचा प्रतिसाद उदंड मिळाला. तेथे चित्रीकरण करतानाही भारतीय चेहऱ्यांची गरज होतीच, तर त्या बाबत अडचण कधीच आली नाही. लंडनमध्ये उत्तर भारतातील अनेक दलित राहतात. तिथल्या आंबेडकर फाउंडेशनकडून चित्रपटाच्या वेळी खूपच मदत झाली. तिकडे तीसेक हजार तरी दलित समाजातील लोक आहेत. आंबेडकरांवरील श्रद्धेने आणि आदराने त्यांनी चित्रपटाच्या युनिटला सर्वतोपरी सहकार्य केले.

सर्व सोयीसुविधा बघितल्या आणि रात्रीचे जेवणही दररोज पुरवले. भारतातही गुजरातपासून उत्तरेकडच्या मंडळींनी आस्था दाखवली. डॉ. आंबेडकरांबद्दल प्रचंड भावना लोकांमध्ये आढळते. पंजाब, उत्तर प्रदेश, सर्वत्र आंबेडकरी चळवळ खऱ्या अर्थाने जाऊन पोचली आहे. डॉ. आंबेडकर दलितांचे नेते आणि विचारवंत म्हणून नावारूपाला आल्यानंतर त्यांची ओळख उत्तरेतील समाजाला झाली. त्यामुळे डॉ. आंबेडकर हे तेथील मंडळींना एक महान व्यक्तिमत्त्व या रूपातच माहीत झाले. त्यांच्याबद्दल त्या भागात प्रचंड आदर, कृतज्ञता आहे. जहाल आंबेडकरवादाचे पुरस्कर्ते तिथे आढळतात. अलीकडच्या काळात आधी मंडल आणि नंतर बहुजन समाज पार्टी यांच्यामुळे आंबेडकरी चळवळीचा नव्याने जोर तिकडे वाढला असला, तरी डॉ. आंबेडकर या मंडळींना त्या आधीपासूनच जवळून माहीत आहेत. महाराष्ट्रात त्यांचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने राहिले असले, तरी उत्तरेतही त्यांचे कट्टर अनुयायी अनेक होते आणि आहेत.

डॉ. आंबेडकरांविषयीच्या लोकांच्या भावनांचे आणि आदराचे दर्शन या चित्रपटाच्या वेळी जागोजागी घडत गेले. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि नागपूरला दीक्षाभूमीवर झालेला धर्मांतराचा प्रसंग या दोहोंच्या चित्रीकरणाच्या वेळी हजारोंच्या संख्येने जमावाची गरज होती. पण माणसांची उणीव कधीच भासली नाही. लोक उत्स्कूर्तपणे या कामात सहभागी होत होते. दलित नेते मंडळींनीही उत्साहाने  आणि जाणिवेने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला शक्य तेवढी मदत केली. नागपूरला दीक्षा घेण्याचा प्रसंग चित्रित केला तेव्हा जवळजवळ दीड लाख माणसे जमली होती. चंद्रपूर, भंडारा येथूनही अनेक जण आले होते. 35-40 हजार लोक तर आदल्या रात्री मुक्कामालाच हजर होते. जोगेन्द्र कवाडे यांच्यासारख्या नेत्याने मनापासून सहकार्य केले आणि प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळची जबाबदारी सांभाळली. एवढ्या मोठया जमावावर नियंत्रण ठेवणे हे सोपे नव्हते. पण हे काम चोखपणे पार पाडण्यात आले. शपथ घेताना सर्वांची हालचाल, हाताची क्रिया सारखी राहावी, शूटिंग करण्यासाठी वर असलेल्या हेलिकॉप्टरकडे कोणी मान वर करून बघू नये, अशा सूचनांचे तंतोतंत पालन सर्वांनी केले. स्त्री-पुरुष-मुले, सर्व वयोगटांतील मंडळी या मैदानावर हजर होती. खऱ्या अर्थाने एक भव्य दृश्य चित्रित झाले.

आंबेडकरांच्या रूपातील माम्मुटीकडे सर्व जण आदराने पाहत होते. वामनराव गुरूंसारख्या व्यक्तीनेही, 'त्यांना हात लावून पाहू का', असे विचारत माम्मुटीला स्पर्श करून बघितला. त्याच्यासह आपला फोटो काढून घेतला. 1956 साली बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेल्यांपैकीही काही जण हजर होते. त्या वेळचे तरुण या वेळी म्हातारे झालेले होते. खूपच स्वाभाविकपणे या प्रसंगाचे चित्रण करता आले. लोकांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाचा आणि आदराच्या भावनेचा एक वेगळाच अनुभव दिग्दर्शकाला आला. मात्र महाडचे तळे आणि नागपूरची दीक्षाभूमी ही दोन्ही ठिकाणे प्रत्यक्षात आज फारच बदलली आहेत. त्यामुळे तिथे चित्रीकरण करणे शक्यच नव्हते. दोन्ही प्रसंग पर्यायी जागांवर चित्रित करावे लागले. महाडपासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या दासगाव येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह चित्रित झाला, तर दीक्षाभूमीचे चित्रण नागपूरच्या अंबाझरी मैदानावर करण्यात आले. पुण्यातील येरवडा जेलमध्ये झालेली महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांची सुप्रसिद्ध भेट चित्रित करण्याच्या वेळी असे लक्षात आले. की गांधींना तुरुंगात ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते, तो भाग आता बराच बदलला आहे. प्रत्यक्ष ठिकाण उपलब्ध असूनही अन्यत्र सेट लावून चित्रीकरण करण्याची वेळ आली होती. पण हा कक्ष पूर्वीसारखा करण्यात आला आणि तो तशाच स्वरूपात जतन करण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला. एक ऐतिहासिक क्षण पुन्हा त्याच ठिकाणी टिपण्याची संधी यामुळे प्राप्त झाली. जेलच्या आवारातील ज्या झाडाखाली या भेटीच्या वेळी गांधी बसले होते, ते आंब्याचे झाडही आज तिथे आहे. आता फक्त त्याच्या बुंध्याचा विस्तार झाला आहे. 

आंबेडकरांच्या व्यक्तिरेखेचा अभ्यास 

हा सर्व शोध चालू असतानाच एका मुख्य गोष्टीचा शोधही जारीच होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचा शोध. लंडनमधल्या प्रिसिला जॉन हिला आंबेडकरांचे फोटो आधीच पाठवण्यात आले होते. ती तिथली एक मोठी कास्टिंग डायरेक्टर आहे. डॉमिनिक लापिएच्या 'सिटी ऑफ जॉय' वर चित्रपट करण्यात आला तेव्हा ती भारतात आली होती. तिने एक मिशन समजूनच हे काम केले. कास्टिंग डायरेक्टरची संकल्पना परदेशांतून महत्त्वाची मानली जाते. अचूक आणि उचित पात्ररचना करण्याच्या दृष्टीने कास्टिंग डायरेक्टरची भूमिका महत्त्वाची ठरते. वेगवेगळ्या भूमिकांकरिता योग्य ठरणाऱ्या चेहऱ्यांचे अल्बमच तिथे तपशिलासह तयार असतात. अशी अनेक पुस्तके पाहण्यात आली. प्रिसिला जॉन यांनी स्वतः 600 ते 700 जणांची माहिती साठवून ठेवली होती. ही सर्व छायाचित्रे इत्यादी बघण्यातच दोन दिवस गेले. पण हवा तसा चेहरा यांत सापडला नाही. पुढे अमेरिकेतही बराच शोध घेण्यात आला.

नसीरुद्दीन शहाची भाची जेबा रहमान तिथे असते. तिने या संदर्भात खूपच मदत केली. अनेक अमेरिकन, कॅनेडियन, क्यूबन नटांची छायाचित्रे तिने डॉ. पटेलांना दाखवली. पण इथेही त्यांना हवा तो चेहरा मिळेना. चेहऱ्यातील साम्य, शरीराची एकूण चण, वजन इत्यादी, असे अनेक तपशील जुळण्याची गरज होती. सारे काही ठीक वाटले, तर या अभिनेत्याची आर्थिक अपेक्षाही पुरी करण्याचा प्रश्न होताच. तरीपण, एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या भूमिकेसाठी तोलाचा नट निवडताना आपण कुठे कमी पडू नये, भूमिकेला पूर्ण न्याय देऊ शकणारी व्यक्तीच निवडावी, अशी अपेक्षा ठेवण्यात आली होती. डॉ. जब्बार पटेल यांच्या मनात एका अभिनेत्याचे नाव ठसले होते, तो होता ‘द गॉडफादर’(II) आणि 'द अनटचेबल्स' सारख्या अनेक चित्रपटांतून गाजलेला नट रॉबर्ट डी निरो. त्याच्याशी या संदर्भात संपर्कही साधण्यात आला होता. त्याला हे मोठेच आव्हान वाटले होते. पण आपण नॉन-अमेरिकन अशी कोणतीच भूमिका आजवर न केल्याने ही भूमिका कितपत करू शकू याबद्दल त्याच्या मनात शंका होती. विशेषतः शब्दफेक आणि उच्चार यांबाबत अडचण येण्याची शक्यता वाटत होती. हेही नाव मग मागेच पडले.

आंबेडकरांची भूमिका जगातील कोणीही नट करू शकतो, या हेतूने आशियाई, अमेरिकन, ब्रिटिश या अनेक देशांतील नटांचा विचार केला गेला. पण अखेरीस आंबेडकर सापडले ते भारतातच. प्रसिद्ध केरळीय दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांनी डॉ. जब्बार पटेलांना मल्याळीतील नामवंत अभिनेता माम्मुटी याचे नाव सुचवले. माम्मुटी हा मल्याळी चित्रपटांचा सुपरस्टारच. त्याने तमीळ भाषेतील चित्रपटांमधूनही कामे केली आहेत. हिंदीमध्येही 'धरतीपुत्र' या साफ पडलेल्या चित्रपटातून तो चमकला होता. पण हिंदी चित्रपटांना चांगल्या अभिनेत्यांचे वावडे असल्यानेच नंतर माम्मुटीला हिंदीत शिरकाव मिळाला नाही. माम्मुटी हा गंभीर, चिंतनशील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. अदूर गोपालकृष्णन यांच्यासारख्या प्रख्यात दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळत आहे म्हणून त्याने त्यांच्या 'अनंतरम्'मध्ये दुय्यम भूमिकाही स्वीकारली होती. अदूरच्या 'विधेयन्' आणि 'माथिलुकल' या दोन चित्रपटांमध्ये त्याने मध्यवर्ती भूमिका केल्या. ‘माथिलुकल’मध्ये तर त्याने प्रसिद्ध मल्याळी साहित्यिक 'वैकोन मोहम्मद बशीर' यांची भूमिका केली. एक ताकदीचा आणि लोकप्रिय नट म्हणून माम्मुटीचे नाव होते. अदूर यांनी हे नाव सुचवल्यानंतर डॉ. जब्बार पटेल यांनी फिल्मफेअरमध्ये छापून आलेल्या त्याच्या छायाचित्राचा अभ्यास केला.

पुण्याच्या सी-डॅककडून त्यावर संगणकीय संस्कार करून डॉ. आंबेडकर यांचा चेहरा माम्मुटीच्या चेहऱ्यात कसा दिसेल याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आंबेडकरांचा चेहरा माम्मुटीच्या चेहऱ्यात बदल केल्यास अगदी हुबेहूब सापडत होता, ही एक सुखद आश्चर्याची गोष्ट होती. आता दुसरा चेहरा शोधण्याची गरज नाही याची दिग्दर्शकाला तरी खात्री वाटत होती. माम्मुटीकडे या भूमिकेविषयी विचारणा करण्यात आली आणि संगणकावर विकसित केलेली त्याची डॉ. आंबेडकरांच्या रूपातली छायाचित्रेही त्याच्याकडे पाठवण्यात आली. आपलेच हे रूप पाहून माम्मुटीला धक्काच बसला. तो अगदी हैराण होऊन गेला. फोनवरून त्याने डॉ. पटेल यांच्याशी बातचीत केली आणि सूचकपणे होकार देऊन निश्चित निर्णय लवकरच कळवत असल्याचे सांगितले. आपल्याला डॉ. आंबेडकरांबद्दलची अधिक माहिती, इतर तपशील, तसेच त्यांचे प्रत्यक्ष उपलब्ध छायाचित्रणही बघायला मिळावे म्हणजे त्यांची भूमिका कशा प्रकारे करायची हे समजू शकेल असे त्याने कळवले. डॉ. आंबेडकरांचे फक्त दोन मिनिटांचे कॅमेराबद्ध छायाचित्रण उपलब्ध आहे ही गोष्ट त्यालाही धक्का देऊन गेली. डॉ. आंबेडकराची भूमिका साकार करणे हे मोठेच आव्हान असणार, हे त्याने ओळखले.

भारतातील प्रत्येकालाच डॉ. आंबेडकरांचे नाव माहीत असते. असायला हवे. माम्मुटीलाही त्यांच्याबद्दलची मोजकी माहिती होती. त्यांच्या विचारांबद्दल आणि कार्याबद्दल त्याला आदरही होता. तो स्वतः व्यवसायाने आता नट असला तरी पूर्वी वकील होता. कायद्याचा अभ्यास केलेल्या प्रत्येकाला घटना समितीचे अध्यक्ष असलेल्या डॉ. आंबेडकरांचे महत्त्व वेगळ्या संदर्भात ठाऊक असते. माम्मुटीच्या व्यक्तिमत्त्वात कायद्याचा अभ्यास केलेला असल्याने हेही परिमाण होतेच. त्याने ही भूमिका करण्यास अर्थातच होकार दिला. त्याची मग मेकअप टेस्ट घेण्यात आली. डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेत त्याला त्यांच्या वयाच्या तेवीस-चोविसाव्या वर्षापासून अखेरपर्यंत म्हणजे 65 व्या वर्षापर्यंत राहायचे होते. या भूमिकेचे प्रत्येक टप्प्यातील बेअरिंग माम्मुटीने चांगल्या प्रकारे राखले. आंबेडकरांचा अभ्यास त्याने केला. त्यांचे बाह्य रंगरूप आत्मसात करतानाच आंतरिक प्रवासही समजून घेतला. चांगदेवराव खैरमोडे यांच्या चरित्रातून आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाविषयीचे तपशील घेतले आणि त्यांच्या भूमिकेत शिरण्यासाठी अत्यंत परिश्रम घेतले. आंबेडकरांचे वेगवेगळ्या वयांतील रूप माम्मुटीच्या व्यक्तिमत्त्वातून आणि अभिनयातून दमदारपणे साकारले.

डॉ. आंबेडकरांच्या इंग्रजी उच्चारांमध्ये अचूकता आणि तत्कालीन लहेजा येण्यासाठी माम्मुटीला इंग्लिश कोच म्हणून गुजरातमधील धनगदराचे प्रिन्स बाबाजी यांनी मार्गदर्शन केले. त्या वेळचे इंग्रजी उच्चार, शब्दफेक या दृष्टीने त्यांनी केलेले मार्गदर्शन मोलाचे ठरले यात शंकाच नाही. डबिंग करताना या बाबाजींनी कडक मास्तरासारखे माम्मुटीला धारेवर धरले आणि स्वतःचे समाधान झाल्याखेरीज डबिंगला हिरवा सिग्नल कधीच दिला नाही. त्यामुळे हैराण झालेल्या माम्मुटीला आपण कशाला या फंदात पडलो, असे वाटत असे; तशी तक्रारही तो आपल्या मुक्त स्वगताद्वारे करत असे. पण त्याने चिकाटीने डबिंग पार पाडले. सगळे काम पूर्ण झाल्यावरही काही दोष राहिल्याचे त्याला बाबाजींनी  सांगितले, तेव्हा मद्रासहून येऊन त्याने परत डबिंग केले. चित्रपटातील सर्व प्रमुख व्यक्तिरेखांचेही कलाकार निश्चित झाले होते. प्रश्न उरला होता तो फक्त मोठ्या कलाकारांचा. चित्रपटासाठी मोठ्या प्रमाणावर गोरे नट आवश्यक होते. काही भूमिका विशेष महत्त्वाच्या होत्या, त्याशिवाय इतर लहानसहान भूमिकांसाठी आणि मॉबसाठी गोऱ्या लोकांची गरज होती. एवढी गोरी माणसे कुठून मिळवायची हा एक प्रश्नच होता. या चित्रपटात महात्मा गांधींची भूमिका केलेल्या मोहन गोखलेने या संदर्भात पुण्यातील ओशो आश्रमाची मदत घेण्याचे सुचवले. ओशो कम्यूनमध्ये असलेला रंगकर्मीचा विभाग खूपच उपयोगी पडू शकेल, असे त्याने सुचवले. ओशो कम्यूनमधल्या मां अमृतसाधना या मूळ मराठीच आहेत. त्या नागपूरच्या. त्यांनी या संदर्भात सहकार्य केले.

पण तेथील लोक असे बाहेर जाऊन काम करतील का, याबद्दल त्या साशंक होत्या. तेथील नाट्यविभागाच्या प्रमुख मां जीवन मेरी यांच्याशी त्यांनी डॉ. जब्बार पटेल प्रभृतींची गाठ घालून दिली. डॉ. आंबेडकरांवरचा चित्रपट म्हणजे तितकाच महत्त्वाचा असणार, हे त्यांनी जाणले. त्यांच्याबद्दल या बाईंना माहितीही होती. (त्या मूळच्या ब्रिटिश आहेत.) रजनीशांच्या लेखना-भाषणांमध्येही अनेकदा डॉ. आंबेडकरांचे उल्लेख येत असल्याने त्यांची थोडीफार ओळख तेथील मंडळींना होतीच.

मां जीवन मेरी यांनीही डॉ. पटेल यांना हेच सांगितले की ही मंडळी काही व्यावसायिक कलाकार नाहीतच, शिवाय तेथील अनेक जण काही विशिष्ट हेतूने आलेले असतात. त्यांना साधना करायची असते. अशा परिस्थितीत बाहेरच्या एका चित्रपटासाठी ते आपला वेळ देतील का, हे सांगता येत नाही. पण आपण त्यांच्याशी बोलू, असे सांगून त्यांनी आठ दिवसांनी येण्यास सांगितले. या वेळपर्यंत चित्रपटाचे लंडनमधील चित्रीकरण पूर्ण झाले होते. त्याची रश प्रिंट तेथील लोकांना दाखवण्यात आली. 50-60 जणांनी ती पाहिली. चित्रपटाचा हा भाग सर्वांनाच आवडला. टाळ्या वाजवून त्यांनी स्वागत केले. नंतर त्यांची आपसांत बैठक झाली आणि त्यांनी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. ओशो कम्यूनला डोनेशन देण्याचे चालले होते, पण अखेरीस त्यांनी काहीच घेतले नाही. या सर्व कलाकारांचे जेवण वेगळे द्यावे लागेल, एवढीच अट पुढे आली. प्रत्यक्षात गोलमेज परिषदेचे चित्रीकरण झाले तेव्हा पहिला दिवस सोडता त्यांनी जेवणही इतरांबरोबरच घेतले. एकूणच खूप चांगले सहकार्य ओशो कम्यूनच्या परदेशी मंडळींनी केले. सायमन, अॅटली, कलेक्टर अशा प्रमुख भूमिका याच लोकांनी केल्या. पूर्वी भारतात बरेच गोरे पत्रकार होते. डॉ. आंबेडकरांच्या चळवळीला पाठिंबा असणारेही अनेक होते.

चित्रपटातही एक स्त्री-पत्रकार डॉ. आंबेडकर, म. गांधी अशांना भेटते असे प्रसंग आहेत. ही वयस्क, स्त्री-पत्रकार धर्माने ज्यू आहे आणि जर्मनीतून हद्दपार होऊन जगभर विखुरलेल्यांची प्रतिनिधी आहे. धार्मिक कारणाने होणारा अन्याय आणि अत्याचार तिला जवळून माहीत आहे. म. गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्या वादातील एक दुवा ती बनू शकते. ती स्त्री असल्याने एक वेगळेच ममत्वाचे परिमाण या भूमिकेला लाभते. ओशो कम्यूनमधील मां जीवन मेरी यांना पाहताक्षणीच त्यांनी ही भूमिका करावी असा विचार दिग्दर्शकाच्या मनात आला. त्यांनी ही भूमिका अतिशय ताकदीने केलीही. ओशो कम्यूनच्या या सहकार्यामुळेच चित्रपटातले गोलमेज परिषदेसारखे अनेक प्रसंगही उठावदार झाले. एकूणच या ऐतिहासिक महत्त्वाच्या चित्रपटाला सर्व ठिकाणी सहकार्य लाभत गेले. चित्रपट बनत असताना येणाऱ्या अडचणींतून मार्ग निघत गेला. डॉ. आंबेडकरांच्या आयुष्याचा वेध घेताना आलेला अनुभव, चित्रपटाशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक आनंद देऊन गेला.

डॉ. आंबेडकरांना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले होते त्यांना या चित्रपटाच्या रूपाने त्यांचा भूतकाळ परत भेटला. दीक्षाभूमीवरच्या चित्रीकरणाला जो प्रतिसाद सामान्यातल्या सामान्य माणसाकडून मिळाला, तो अगदी हेलावून टाकणारा होता. असे मनाला स्पर्शून जाणारे अनेक प्रसंग हा चित्रपट बनत असताना संबंधितांनी अनुभवले. अनेकांचे हात लागतच हा चित्रपट पूर्ण झाला. दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या मनात या सर्वांबद्दलच कृतज्ञतेची भावना आहे. चित्रपटाच्या अगदी सुरुवातीला, भारतीय परंपरेतील चातुर्वर्ण्याची संकल्पना स्पष्ट करण्यात आली आहे. चित्रपटातील काळाच्या पार्श्वभूमीवर असणारी परिस्थिती विशद करून लगेच मुख्य चित्रपटाला प्रारंभ होतो. यात डॉ. आंबेडकर विद्यार्थी म्हणून समोर येतात. कोलंबिया विद्यापीठात ते शिकत असताना त्यांना तेथे येणारे भेदभावाचे अनुभव भारतातील बालपणापासूनच्या अनुभवांची आठवण करून देतात. अमेरिका आणि लंडन या दोन्ही ठिकाणी डॉ. आंबेडकरांना आपल्या शिक्षणाच्या वाटचालीत केलेल्या मतप्रदर्शनाबद्दलही सातत्याने वाद घालावे लागतात. प्रबंध सादर करताना त्यांना आपली वैचारिक बाजू जोरदारपणे लढवावी लागते, हा सारा भाग चित्रपटात वेधकपणे चित्रित झाला आहे. डॉ. आंबेडकरांच्या एका वेगळ्या पैलूचे दर्शन या निमित्ताने घडले आहे. 

डॉ. आंबेडकर हे अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते, पण त्यापलीकडे जाऊन, रूढ शिक्षणाच्या कक्षा त्यांनी ओलांडल्या होत्या. सामाजिक प्रश्नांना असणारी आर्थिक बाजू त्यांनी नेहमीच अभ्यासली आणि म्हणूनच त्यांनी केलेले या संदर्भातील विश्लेषण वेगळे व महत्त्वाचे ठरले. 'द प्रॉब्लेम ऑफ द रुपी' हा त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये असताना डॉक्टर ऑफ सायन्स (डीएससी) पदवीसाठी लिहिलेला प्रबंध गाजला होता. भारतीय अर्थव्यवस्थेचे अनेक पैलू उलगडून दाखवणारे मौलिक लेखन त्यांनी केले.

कोलंबिया विद्यापीठात असताना नामवंत विचारवंत जॉन ड्युई हे त्यांचे गुरू होते. सामाजिक आणि राजकीय सुधारणांचे पुरस्कर्ते असलेल्या जॉन ड्युई यांचे विचार डॉ. आंबेडकरांच्या चिंतनाला एक निराळीच दिशा देणारे ठरले. 'नो रेस इज पुअर', हे ड्युई यांचे वचन सुप्रसिद्ध आहे. पुढे वेळोवेळी आपल्या हक्कांसाठी लढताना डॉ. आंबेडकरांना आपल्या या गुरूची नक्कीच आठवण होत असणार. भारतीय सामाजिक वास्तवातील जातिव्यवस्था, अस्पृश्यता यांचा येथील अर्थव्यवस्थेशी असणारा संबंध त्यांच्या मनात नेहमीच जागा राहिला. चळवळीमुळे त्यांना अमेरिकेतील कृष्णवर्णीयांची, समाजातील शोषित आणि दबलेल्या घटकांच्या अवस्थेमागची राजकीय बाजू जवळून पाहता आली. भारतातील अस्पृश्यतेचा प्रश्न हा राजकीय प्रश्न आहे, असे त्यांनी वारंवार ठासून म्हटले, त्यामागे त्यांची जी विशिष्ट भूमिका होती, तिची बीजे त्यांच्या अमेरिकेतील वास्तव्यातच रुजली होती. त्याचबरोबर, केवळ राजकीय समानता उपयोगाची नाही; जोवर आर्थिक आणि सामाजिक समानतेची जोड मिळत नाही, तोवर राजकीय समानतेला काही अर्थ नाही अशीही डॉ. आंबेडकरांची भूमिका होती. ते ज्या समाजासाठी लढत होते त्यासाठी या तीनही स्तरांवरील समान हक्कांची लढाई एकाच वेळेला त्यांना लढावी लागत होती. पुढे, स्वातंत्र्यानंतर घटनात्मक तरतुदीच्या संदर्भातही त्यांनी हाच दृष्टिकोन बाळगला. आपल्या मतांचा पाठपुरावा करताना त्यांनी लोकशाहीचे मूल्यही नेहमीच महत्त्वाचे मानले. डॉ. आंबेडकरांची ही वैचारिक मनोभूमिका लक्षात घेतल्यावर महात्मा गांधींशी त्यांनी केलेला वैचारिक संघर्ष किती अटळ होता हे समजून येते.

नाजूक आणि महत्त्वाचे

गांधी आणि आंबेडकर यांच्यातील वादाचे चित्रण हा नाजूक आणि महत्त्वाचा मुद्दा या चित्रपटात शक्य तितक्या तटस्थतेने हाताळण्यात आला आहे. डॉ. आंबेडकर हे या चित्रपटाचे नायक असल्याने त्यांची बाजू अधिक जोरदारपणे, त्यांच्या मनोभूमिकेतून येत असल्याप्रमाणे चित्रित करण्यात आली आहे. डॉ. आंबेडकरांचे विचार, त्यांची एकूण राजकीय-सामाजिक भूमिका यांची मांडणी करण्याचा चित्रपटाचा हेतू असल्याने हे होणे स्वाभाविकच आहे. एक मात्र खरे की, ज्या गोष्टी घडल्या, त्यांच्या कक्षेतच गांधी-आंबेडकर यांच्या संदर्भातील दृश्यांची विश्वासार्हता राखण्यावर दिग्दर्शकाचा कटाक्ष राहिला आहे. काटेकोर संशोधन, डॉ. आंबेडकरांचे लेखन आणि भाषणांतील मुद्दे, त्यांच्या पत्रांमधील आठवणी व विचार यांचा वापर चित्रपटात करण्यात आला आहे. परंतु संदर्भ माहीत नसले, तर काही घटना काल्पनिक वाटण्याचा संभव आहे. या चित्रपटावर आजवर प्रसिद्धिमाध्यमांतून जे लिहून आले, त्यातही असे काही आक्षेप घेतले गेल्याचे दिसूनही येते. एके ठिकाणी गांधीजींच्या तोंडी असे वाक्य आहे. 'डॉ. आंबेडकर जातीने महार आहेत, हे मला कोणीच कसे सांगितले नाही? मला वाटत होते, की ते बहुधा पुण्याचे सुधारणावादी ब्राह्मण असतील.' गांधीजींच्या तोंडचे हे वाक्य त्यांचे आंबेडकरांविषयी असलेले अज्ञानच स्पष्ट करते.

गांधीजींना आंबेडकरांचा जन्म अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार जातीत झाला आहे हे माहीत नसणे हे विचित्र वाटले तरी ते सत्य होते. महादेवभाई देसाई यांनी आपल्या दैनंदिनीत हा उल्लेख केला आहे. 1932 साली ते जेव्हा येरवडा जेलमध्ये होते तेव्हा डॉ. आंबेडकरांबद्दल बोलताना ते 1 एप्रिल 1932 रोजी महादेवभाईंना म्हणाले, ‘‘मी इंग्लंडला जाईपर्यंत आंबेडकर हे हरिजन आहेत हे मला माहीत नव्हते. हरिजनांच्या प्रश्नांबाबत विलक्षण आस्था असलेले ते एक ब्राह्मण आहेत आणि म्हणून ते असे अतिरेकी बोलतात, अशी माझी समजूत होती.’’ वास्तविक 1927 मध्ये महाडचा सत्याग्रह आणि 1930-31 मध्ये झालेला नाशिकमधला काळाराम मंदिराचा सत्याग्रह यांमुळे डॉ. आंबेडकरांवर वर्तमानपत्रांतून नेहमीच टीका प्रसृत होत होती. तरीही गांधीजींना त्यांच्या हरिजन असण्याबद्दल माहिती नव्हती, हे आश्चर्यकारकच आहे. आंबेडकर आणि गांधीजींची पहिली भेटही 1931 सालच्या 14 ऑगस्टला मुंबईत मणिभवनमध्ये झाली होती. अस्पृश्यांविषयी तावातावाने बोलणारे ब्राह्मण अधिक भड़क भाषा वापरतात अशी गांधीजींची समजूत होती, म्हणूनच त्यांना आंबेडकर हे ब्राह्मण वाटले असावेत अशी मीमांसा डॉ. य. दि. फडके यांनी याविषयी लिहिताना केली आहे, ती योग्यच आहे.

या संदर्भात त्यांनी गांधीजींनी महादेवभाईंना सांगितलेल्या ह. ना. आपटे यांच्याविषयीच्या आठवणींचा उल्लेख केला आहे. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या भारत सेवक समाजातील गोपाळराव देवधर यांनी तयार केलेल्या अस्पृश्यता निवारणासंबंधाच्या टिपणाबद्दल गांधीजी म्हणाले होते, ‘‘मी तुम्हांला भाकरी मागितली तर तुम्ही धोंडा देता आहात. अशा रीतीने आपल्याला हरिजनांची सेवा करता येणार नाही. ही सेवा नसून त्यांच्यावर सरळसरळ केलेला अनुग्रह आहे. अस्पृश्यांचा उद्धार करणारे आपण कोण? आपल्याला फक्त आपल्या पापाचे परिमार्जन करता येईल. भाषणे करून ते साधणार नाही.’’ यावर ह. ना. आपटे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली, तेव्हा गांधीजी त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही हरिजनांना हिंदू समाजाविरुद्ध बंड करावयास प्रवृत्त कराल अशी मला भीती वाटते.’’  ह. ना. आपटे यांनी तेव्हा गांधीजींना उत्तर दिले, ‘‘होय, करू दे त्यांना बंड, मला तेच हवे आहे.’’ अशा पद्धतीची जहाल भाषा बोलणान्या हरिभाऊंप्रमाणेच डॉ. आंबेडकर हेही ब्राह्मण आहेत असा गांधीजींचा समज झाला असावा. ते काहीही असले तरी गांधीजींना हे सत्य माहीत नसणे, हे क्षम्य नव्हते, असेच म्हणावेसे वाटते. एकाच धर्मातील एका विशिष्ट समाजाने बंड करून उठण्याबद्दल गांधीजींना असणारा आक्षेप हे त्यांच्या सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याच्या भूमिकेचे चिन्ह होते. सान्या सुधारणा एकाच वेळी होत नसतात, त्यासाठी धीर धरला पाहिजे. अतिरेकीपणा करता कामा नये; असे मवाळ धोरण बाळगणाऱ्या गांधीजींचे विचार डॉ. आंबेडकरांसारख्या राजकीय हक्काचे धागे सामाजिक प्रश्नांशी जोडणाऱ्या नेत्याशी जुळण्यासारखे नव्हतेच. त्यामुळे दुसऱ्या गोलमेज परिषदेत पुढे आलेला अस्पृश्यांना वेगळे मतदारसंघ देण्याचा प्रश्न असो, अस्पृश्यता निवारणाच्या कार्यक्रमाचे स्वरूप असो की मंदिरप्रवेशासारखे आंदोलन असो; गांधीजींचे धोरण समाजाला न दुखवता पुढे जाण्याचे होते. ही भूमिका बुद्धिवादाला, वैज्ञानिक दृष्टिकोनाला आणि हक्काची भाषा बोलण्याला महत्त्व देणाऱ्या डॉ.

आंबेडकरांना मान्य असणे शक्यच नव्हते. गांधीजींनी डॉ. आंबेकरांची प्रशंसाही अनेकदा केली, ‘‘आंबेडकरांनी आपल्याला जोड्यांनी मारले तरी आपण ते सहन केले पाहिजे, पण त्यांना घाबरता कामा नये,’’ असे गांधीजींनी एके ठिकाणी म्हटले होते. राखीव मतदारसंघांबाबत मात्र गांधीजींनी निकराने विरोध केला. 1932 मध्ये जेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान रॅम्से मॅकडोनल्ड यांनी अस्पृश्यांना राखीव मतदारसंघ देण्याची तात्पुरती योजना जाहीर केली, तेव्हा गांधीजींनी येरवडा तुरुंगातून प्राणांतिक उपोषण सुरू केले. जातीय निवाडा म्हणून प्रसिद्ध असलेला हा निर्णय गांधीजींना मान्य नव्हता. पाच राखीव जागांच्या प्रश्नाबाबत सार्वमत घेण्याच्या निर्णयाचा आग्रह आंबेडकरांनी सोडला आणि गांधीजींचे प्राण वाचवले. ‘पुणे करार’ म्हणून हा करार प्रसिद्ध आहे. याच येरवडा जेलमध्ये पडलेल्या प्रसंगाचे चित्रण चित्रपटात करण्यात आले आहे. गांधी आणि आंबेडकर यांच्यात अनेक मतभेद असले तरी डॉ. आंबेडकरांमधील गुणवत्तेची जाण असलेल्या गांधीजींनी त्यांना घटना समितीचे अध्यक्ष करण्याबाबत तसेच मध्यवर्ती मंत्रिमंडळात घेण्याबाबत आग्रह घरला होता. धर्मांतराची भूमिका गांधींना पसंत नव्हती, कारण कपड्याप्रमाणे धर्म बदलता येत नाही अशी त्यांची भूमिका होती.

अस्पृश्यतेची समस्या धर्मांतरामुळे संपणार नाही असेही त्यांचे मत होते. गांधीजींच्या विचारांची डॉ. आंबेडकरांना कल्पना होती. त्यांनी या संदर्भात प्रत्यक्ष धर्मांतर झाले त्या आधीच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते की, मी गांधीजींना असे आश्वासन दिले होते की, कमीतकमी हानिकारक मार्ग मी स्वीकारीन, तदनुसार आता बौद्ध धर्म स्वीकारून हिंदू समाजाच्या दृष्टीने एक उपकारक कृत्यच करीत आहे. कारण बौद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचेच एक अंग आहे. डॉ. आंबेडकर आणि म. गांधी यांच्यातील वैचारिक संघर्ष हा प्रामुख्याने दोन विभिन्न धारणांमधल्र संघर्ष होता. गांधीजींची भूमिका ही भूतदयावादी अशा संताची, तर डॉ. आंबेडकरांचा भर हक्कांसाठी लढण्यावर होता. गांधीजी जी सामंजस्याची आणि मवाळपणाची, सबुरीची भूमिका घेत होते, ती भूमिका डॉ. आंबेडकरांना तर मानवणारी नव्हतीच. गांधीजींबद्दल कठोर टीकेचा दृष्टिकोन त्यांनी बाळगला तो याचमुळे. "Don't call him a saint. He is a seasoned politician. When everything else fails, Gandhi will resort to intrique;" हे डॉ. आंबेडकरांच्या तोंडचे चित्रपटातील वाक्य हा संघर्ष स्पष्ट करणारे आहे. पुणे करारावर स्वाक्षरी करण्याच्या प्रसंगातही डॉ. आंबेडकर गांधीजींना स्पष्टपणे सांगतात : "Our solution lies in political power, not pilgrimages and facts. Do not use the weapon of fast so often. Your life is precious and the country needs you." डॉ. आंबेडकरांची अनेक रूपे मनावर ठसवणारा हा चित्रपट आहे.

आक्रमक रूपात आपली मते आणि विचार व्यक्त करणारे डॉ. आंबेडकर यांतून भेटतात; तसेच आपल्या पत्नी रमाबाईबद्दल मनात प्रेम बाळगणारे, तिच्या निधनानंतर व्याकूळ  होणारे आंबेडकरही. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाला संघर्षाची दिशा देणारे आंबेडकर, पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेण्यापेक्षा आपण आपले पंढरपूर निर्माण करू, असे रमाबाईंना सांगताना दिसतात. स्वतःची प्रकृती ठीक नसतानाही हिंदू कोड बिलाचा प्रश्न आग्रहाने ते लावून धरतात. धर्मांतराचा आपला निग्रह तडीला नेणारे आणि दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार करणारे डॉ. आंबेडकरही चित्रपटातून भेटतात. ‘महाविद्यालयीन विद्यार्थी ते लाखोंना दिशा दाखवणारा नेता,’ या प्रवासातील आंबेडकरांच्या आयुष्याचा कालपट साकारणारा हा चित्रपट, म्हणजे एका महान व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे उलगडून दाखवणारा चरित्रपट आहे. कोलंबिया विद्यापीठात शिकत असलेले आंबेडकर, परदेशातील उच्च शिक्षणाच्या पदव्या उत्तम श्रेणीत संपादन करणारे आंबेडकर, भारतात परतल्यावर बडोदा संस्थानच्या पहिल्याच नोकरीत हाताखालच्या लोकांकडून ज्यांना अस्पृश्य असल्याबद्दल अपमानास्पद वागणूक सहन करावी लागली ते आंबेडकर, एका विशिष्ट टप्प्यानंतर आक्रमक होतात आणि ज्या धर्माने हे अपमानाचे जिणे देऊ केले, त्या धर्मालाच नाकारण्याच्या भूमिकेप्रत येतात! डॉ. आंबेडकरांचा हा वैचारिक-भावनिक प्रवास त्यांच्या दृष्टिकोनातून समर्थपणे टिपणारा हा चित्रपट हिंदुधर्म, आधुनिक भारताची वाटचाल आणि भारतीय परंपरेतले पूर्वग्रह यांवर नेमके बोट ठेवतो. आजचे दलितांचे जे प्रश्न आहेत, त्यांचे नेमके भान देणारा हा चित्रपट आहे. आजच्या तरुण पिढीला डॉ. आंबेडकर यांनी पाहिलेला काळ, त्यांचे विचार, राजकीय-सामाजिक भूमिका यांबद्दल बरेच काही सांगणारा हा चित्रपट ठरावा. दलितांसाठीचे संसदेतील आरक्षण, नोकऱ्यांमधील राखीव जागांचा मुद्दा, अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात सध्या चालू असलेल्या वादाबाबत नवी दृष्टीही यातून मिळावी. डॉ. आंबेडकरांची वैचारिक भूमिका आजच्या समाजासमोर परत एकदा मांडणारा चित्रपट म्हणून याचे महत्त्व आहेच. डॉ. आंबेडकरांशी आणि त्यांच्या विचारांशी पुनर्भेट घालून देणाऱ्या या चित्रपटाचे म्हणूनच स्वागत!! 

Tags: प्रेरणादायी वैचारिक-भावनिक प्रवास चरित्रपट प्रमुख भूमिका माम्मुटी दिग्दर्शक जब्बार पटेल ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर inspirational टॅग - चित्रपट समीक्षा ideological & emotional journey charactor actor - mammuti director jabbar patel 'dr. babasaheb ambedkar' cine critics weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नंदिनी आत्मसिद्ध

पत्रकार, स्त्री-प्रश्नांच्या अभ्यासक, अनुवादक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके