डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वली पोशीदा और काफ़िर बखुला मिर्जा गालिब

आपली दुःखं स्वीकारण्याइतपत तटस्थपणाही त्याच्यात आला होता असंही त्याच्या काव्यातून दिसून येतं. मूलतः गालिबचा ईश्वराच्या सर्वव्यापकतेवर आणि मानवाच्या वैश्वीकतेवर विश्वास होता. भोवती जे चराचर जग दिसत आहे त्याच्या कणाकणात 'त्याचा अंश आहे ही त्याची श्रद्धा कवितेतून अनेकदा व्यक्त होताना दिसते.

यह मसाइल-ए-तसव्वुफ, यह तिरा बयान गालिब 
तुझे हम वली समझते, जो न बादःस्वार होता

उत्तुंग प्रतिभा लाभलेला कवी ‘गालिब' याच्या या ओळी त्याच्या ठायी असलेल्या आध्यात्मिक उंचीची जाणीव अभिमानाने व्यक्त करतात आणि जोडीला त्याच्या मद्यासक्तीची कबुलीही देतात. अध्यात्म्यासारखा विषय आणि त्यावर तुझं विवरण गालिब, अरे, तू जर मद्यपी नसतास तर तुला आम्ही संतच मानलं असतं. गालिबच्या कवितेतील एक महत्त्वाचा पैलू म्हणून त्यातील तत्त्वचिंतनाच्या स्पर्शावर आणि ईश्वरविषयक विचारांवर नजर टाकली असता असं जाणवतं की, त्याच्याजवळ निश्चित व प्रगल्भ असा अध्यात्मविषयक दृष्टिकोन होता. स्वतःशी त्याने काही खूणगाठी बांधल्या होत्या आणि त्यांच्याशी तो प्रामाणिक होता. कवितेतही आणि व्यक्तिगत आयुष्यातही त्याच्या कवितेतील चिंतनाची डूब आणि तत्त्वज्ञानाचा स्पर्श या गोष्टीची साक्ष देतात. तो कोणी मोठा तत्त्ववेत्ता होता असे नाही, पण त्याच्या विचारांचा गहिरेपणा आणि झेप यांची जातकुळी तात्त्विक पातळीवरची होती. 

त्याच्या कवितेमध्ये या जाणिवांचे दर्शन प्रतिबिंबित झालं आहे. वेळोवेळी त्याने आपल्या मनातील चिंतनाला कवितेतून वाट करून दिली आहे. कधी तो स्वतःलाच प्रश्न विचारतो, तर कधी ईश्वराला.  कधी तो नेमके भाष्य करत जातो, तर कधी मनातील गोंधळ शब्दांतून व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. स्वतःच्या ठायी असलेल्या काव्यशक्तीचा आणि निश्चित अशा तात्त्विक भूमिकेचा अभिमान बाळगणारा गालिब स्वतःच्या दुखऱ्या जागाही ओळखून होता. म्हणूनच 'तुझे हम वली समझते’ च्या पुढे 'जो न बादःख्वार होता’ हे जोडायला तो विसरला नाही. स्वतःच्या मद्यप्रेमाबाबत त्याने कधी लपवालपवी केली नसली, तरी आपण ही चांगली गोष्ट करतोय असंही त्याने कधी मानले नाही. पण आपलं जे श्रेय आहे. कर्तृत्व आहे. त्याला या गोष्टीची बाधा होऊ नये अशी त्याची इच्छा होती. लौकिक अर्थाने बघितलं तर, धर्मासंबंधी रीतिरिवाज व कर्मकांडांचे पालनही गालिबने कधी केले नाही. जन्माने तो मुसलमान होता, पण ना त्याने कधी धर्माजेनुसार नमाज़ पढली, ना रमजान महिन्यात रोजे (उपवास) पाळले. 

मद्यपान हे इस्लामने निषिद्ध मानलं होतं. ते मात्र गालिबला प्रिय होतं. अर्थात ज्या प्रकारे गालिबचे चित्र एक दारुड्या म्हणून रंगवलं गेलं व खरं मानण्यात आलं त्या प्रकारचा पियक्कड तो नव्हता. त्याचं मद्यपान मर्यादित असे व ते तसंच राहावं याकडे त्याचा कटाक्ष असे. वरवर बघायला गेले, तर या तऱ्हेचं आचरण असणारा मनुष्य स्वतःला साधुपुरुष म्हणवून घेतो हे विचित्रच वाटतं, पण गालिबच्या स्वतःच्या मते ते तसं नव्हतं. कारण त्याचा कर्मकांडांना महत्त्व देणाऱ्या धर्मावर विश्वास नव्हता, बाह्य अवडंबराला अकारण महत्त्व देणं त्याच्या तत्त्वात बसणारं नव्हतं. उपवास करणं आणि दिवसातून पाच वेळा नमाज़ पढणं म्हणजे परमेश्वराची आराधना करणं, हेही त्याला मंजूर नव्हतं. पण त्याची ईश्वरावर श्रद्धा होती आणि माणसातलं माणूसपणही त्याला महत्त्वाचं वाटत होतं. आजच्या काळात ज्या अर्थाने धर्म ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब  आहे आणि प्रत्येकाने आपल्या मताप्रमाणे धर्माचरण करावं असं मानण्यात येतं. 

नेमका तोच अर्थ ग़ालिबला सुमारे दोनशे वर्षापूर्वी अभिप्रेत होता. त्याच्या जाणिवा स्वतःशी स्पष्ट होत्या. पण म्हणूनच इतरांना तो 'धर्मभ्रष्ट' वाटत होता. धार्मिक संकेतांनुसार आचरण नसल्याने त्यांच्या दृष्टीने तो 'काफिर' होता. अशा लोकांना उद्देशून ग़ालिब एके ठिकाणी म्हणतो :  
देखियो, 'गालिब' से गर उलझा कोई 
है वली पोशीदा और काफिर खुला 
(ग़ालिबच्या वाटेला कोणी न आलेलंच बरं कारण वरून तो जरी नास्तिक दिसला, तरी तो आतून साधुपुरुषच आहे.) गालिबवर सूफी तत्त्वज्ञानाचा मोठा प्रभाव होता यात शंकाच नाही. पण त्याच्यात निवृत्तीची वृत्ती नव्हती. जीवनातील छोट्या मोठ्या ऐहिक सुखांमध्ये त्याला रस होता. त्यांची प्राप्ती त्याला नेहमीच झाली असं नाही. किंबहुना त्यांचा अभावच त्याला बहुतांशी जाणवला. मात्र त्याच्या ठायी लालसा नव्हती आणि स्वतःच्या इच्छांची पूर्ती कोणत्याही मार्गाने करण्याचाही त्याचा स्वभाव नव्हता. 

आपली दुःखं स्वीकारण्याइतपत तटस्थपणाही त्याच्यात आला होता असंही त्याच्या काव्यातून दिसून येतं. मूलतः गालिबचा ईश्वराच्या सर्वव्यापकतेवर आणि मानवाच्या वैश्वीकतेवर विश्वास होता. भोवती जे चराचर जग दिसत आहे त्याच्या कणाकणात 'त्याचा अंश आहे ही त्याची श्रद्धा कवितेतून अनेकदा व्यक्त होताना दिसते. तरीसुद्धा या जगाच्या पसाऱ्याचा नेमका अर्थ काय, हा प्रश्न त्याला पडल्याचंही दिसून येतं: 
जब कि तुझ बिन नहीं कोई मौजूद 
फिर यह हंगामा अय ख़ुदा क्या है   
सब्ज-ओ-गुल कहाँ से आये हैं 
अब्र क्या चीज है, हवा क्या है  

आपल्या मनातली श्रद्धा व्यक्त करताना तो पुढे म्हणतो : 
जान तुम पर निसार करता हूँ 
मैं नहीं जानता दुआ क्या है   
(तुला मी प्राणच अर्पण केले आहेत. मात्र प्रार्थना कशाला म्हणतात ते मला माहीत नाही.) गालिबला ईश्वराची प्रार्थना करण्याची कधी गरजच वाटली नाही. कारण त्याचा या कर्मकांडावर विश्वास नव्हता. जगात एकच ईश्वर आहे आणि धर्मसंप्रदायांची बंधनं झुगारून दिल्यानेच 'त्याच्यावरील अदा खऱ्या अर्थाने साकारेल असा गालिबचा अभिप्राय होता. धर्माची बंधनं, संप्रदायांचे अडसर आणि कर्मकांडाच अवडंबर यांच्यापासून खऱ्या श्रद्धेची सुटका करायला हवी असं सांगताना तो म्हणतो :
हम मुलहिद हैं, हमारा केश है, तर्क-ए-रुसूम
मिल्लतें जब मिट गयीं अजा-ए-ईमाँ हो गयीं
(आम्ही अनीश्वरयादी आहोत. स्त्रीचा त्याग करणं हाच आमचा धर्म. विविध संप्रदाय जेव्हा नष्ट होतात तेव्हाच ते व्यापक अशा धर्माचा हिस्सा बनतात.) 

रुढींमधली निरर्थकता मनाला पटल्यावर त्याच रुढींचं पालन करत राहणं गालिबला साफ नामंजूर होतं. आपलं हे मत तो कवितेद्वारे व्यक्त करत असे; तसंच प्रत्यक्ष जीवनातही त्याचं वर्तन याच मतानुसार असे. गालिबच्या कवितेप्रमाणेच त्याने लिहिलेली पत्र आणि त्याचा शिष्य अलताफ हुसेन हाली याने लिहिलेले गालिब -चरित्र - "यादगार-ए-गालिब' यातूनही त्याच्या जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश पडतो. गालिबचा काळ एकोणिसाव्या शतकाचा काळ, ज्या कालखंडामध्ये भारतावर प्रथम ईस्ट इंडिया कंपनीची आणि नंतर ब्रिटिश सरकारची पकड़ मजबूत होत गेली. गालिबचा जन्म 1797 साली झाला आणि 1869 मध्ये तो मरण पावला. तेरा-चौदाव्या वर्षापासून तो दिल्लीत स्थायिक झाला व तिथेच त्याने शेवटचा श्वास घेतला. त्यापूर्वीची त्याच्या आयुष्यातली वर्ष आग्र्याला व्यतीत झाली होती. गालिबचे पूर्वज इराणच्या बादशहाशी संबंध राखून होते आणि त्याचे आजोबा तुर्क घराण्यातील अनेक लढवय्या सरदारांप्रमाणे समरकंदहून भारतात आपलं नशीब अजमावण्यासाठी 1750 मध्ये आले होते. 

त्याचे वडील व काकाही लष्करी अधिकाऱ्याच्या पदावरच होते. या पार्श्वभूमीवर गालिबच्या आयुष्याला लागलेलं विद्वत्ता, शायरी आणि तत्वचितनाच वळण हे काहीसे आश्चर्याचंच म्हणावं लागेल. वडील व नंतर काका गालिब लहान असतानाच मृत्युमुखी पडले आणि गालिबवरच जबाबदारी घेऊन पडली. गालिबचा कलही साहित्य, तत्वज्ञान या विषयांकडे असल्याने आयुष्याची त्याची वाट या दिशेने जाणार हे आपोआपच ठरून गेलं. गालिब साधारणपणे 1810-12 च्या सुमारास दिल्लीत स्थायिक झाला. या काळात दिल्ली  मोगल साम्राज्य उतरती कळा लागलेली होती. अकबरशहा (दुसरा) आणि बहादुरशहा जफर यांच्या राजवटीतील दिल्ली शहर गालिबने पाहिलं. दिल्ली दरबाराशी त्याचा संपर्क आल्यानंतर त्याचं मित्रवर्तुळही विस्तारतं आणि त्याच्या जडणघडणीवर त्याचा परिणामही झाला. 

दिल्ली हे तसं मोठं आणि संमित्र वस्ती असलेले शहर होतं. बादशहाच्या दरबारातही विविध धर्माचे लोक होते आणि प्रज्ञा तर वेगवेगळ्या धर्मीयांचीच बनलेली होती. दिल्ली शहरावर, विशेषतः अकबराच्या काळापासून संमित्र अशा संस्कृतीचा प्रभाव पड़त गेला. त्याच्या काळापर्यंत मोगल साम्राज्याने आपली पकड भारतावर घट्ट केली होती. अकबराने आणलेली नवी राज्यव्यवस्था सर्व नागरिकांना समान लेखणारी आणि सर्वाच हित चिंतणारी होती. त्याच्याच काळात जिझिया कर रद्द करण्यात आला. सार्वजनिक औदार्याच्या अनेक योजना त्याने सुरू केल्या आणि प्राचीन भारतीय परंपरांना महत्त्व मिळेल असे प्रयत्नही केले. सर्व धर्माच्या विद्वानांना, कलाकारांना त्याच्या दरबारी प्रोत्साहन व अर्थसाहाय्य मिळू लागलं. मशिदीबरोबर काही मंदिरांनाही आर्थिक मदत पुरवली जाऊ लागली. 

पुढच्या दोन पिढ्यांपर्यंत साधारणपणे हेच वातावरण टिकून होतं, पण औरंगजेबाने या साम्राज्याचं रूपांतर कडव्या मुस्लिम राज्यात करण्याचा विडाच उचलला आणि त्याने सारं स्वरूपच पालटून टाकले. अर्थात त्याच्यानंतर मोगल साम्राज्यालाच उतरती कळा लागली व अकबरशहा (दुसरा) याच्या वडिलांच्या वेळेस दिल्लीचा सम्राट इंग्रजांचा पेन्शनरही बनून गेला, या राजकीय घडामोडींचा परिणाम राज्यावर झालाच, पण दोन शतकांच्या सांस्कृतिक प्रभावाला मात्र यामुळे मोठा धक्का पोहोचू शकला नाही. मुसलमानांतील सूफी संप्रदाय व हिंदूंमधील भक्तिसंप्रदायाने निर्माण केलेले सौहार्दाचं वातावरण काही प्रमाणात का होईना आपलं अस्तित्व राखून होते. फारसी भाषेला राजदरबारी असलेले स्थान हिंदूंनीही स्वीकारले होतं आणि अनेक हिंदू फारसी पंडित राजदरबारी मान प्राप्त करून होते. पुढच्या काळात फारसी आणि पश्चिमी हिंदी बोलीच्या संयोगातून उर्दू भाषा निर्माण होऊन ती सर्वच जनसामान्यांमध्ये आणि कवींमध्ये रुजली. 

अकबराने सुरू केलेल्या समान शिक्षणपद्धतीमुळे सांस्कृतिक सामंजस्याला प्रोत्साहन मिळत होते. विदयेच्या व कलांच्या क्षेत्रांत सर्वच धर्मीयांना गुणवत्तेच्या निकषांवर महत्व मिळू लागलं होतं. अकबराच्या काळात, संस्कृतातील मौलिक ग्रंथांचे भाषांतर फारसीमध्ये करण्यास उत्तेजन मिळाले आणि पुढेही ही परंपरा टिकून राहिली. मुल्ला अब्दुल कादिर बदायूनी याने अथर्ववेद आणि रामायणाचे भाषांतर फारसीमध्ये केले. रामायणाचे तर अनेक अनुवाद फारसी फारसी गद्यातही झाले. महाभारताचाही अनुवाद फारसी भाषेत करण्याचे काम काही मंडळींनी केले. भास्कराचार्यकृत लीलावती हा गणितावरील ग्रंथही फारसीत नेण्यात आला. हा अनुवाद नामवंत कवी फैजीने केला होता. शहाजहानचा पुत्र दारा शिकोह हा विद्वान होता व त्याने भगवद्गीता आणि योगवासिष्टाची ओळख फारसी वाचकांना करून दिली होती. त्याने हिंदु-मुस्लिम गूढवादी तत्वज्ञानाचा परामर्श घेणारा ‘मजमारुल बहराइन' हा ग्रंथही लिहिला. 

अशा बहुरंगी वातावरणाचे संस्कार लाभलेलं दिल्ली शहर गालिबसारख्या समंजस आणि विशाल दृष्टिकोन बाळगणाऱ्या विद्वानाला आकर्षक वाटते यात नवल नाहीच. दिल्लीची संस्कृती एका टप्प्यावर येऊन स्थिरावली होती. तिथल्या रहिवाशांची संमिश्र जीवनशैली, मुद्दामहून ठरवण्यात आली नव्हती. तर काळाच्या ओघात घडत गेली होती. म्हणून दिल्लीचा राजकवी आणि गालिबचा प्रतिस्पर्धा जौक या शहराला उद्देशून लिहून गेला, "कौन जाये पर अब दिल्ली की गलियाँ छोड़कर, शेवटचा मोगल सम्राट बहादुरशहा जफर हाही दिल्ली शहर सोडावे लागल्याचे हे दुःख मनाल घेऊनच इंग्रजांच्या कैदेत रंगूनला रवाना झाला.
इतना बदनसीब है जफर दफ्न के लिए 
दो गज जमीन भी न मिली ए-यार में
गालिबच्याही काव्यात आणि पत्रांमध्ये दिली शहराबद्दलचे अनेक संदर्भ सापडतात. दिल्ली शहराच्या थाटाचे वर्णन एके ठिकाणी करताना तो या हरपलेल्या वैभवाबद्दल खंत व्यक्त करतो. हे त्याचं पत्र आहे 1859 सालातलं. म्हणजे 1857 च्या स्वातंत्र्य युद्धानंतरच्या पडझडीत दिल्लीची रया गेलेल्या काळातले. आपला मित्र मीर मेहदी हुसेन 'मजरुह' याला ग़ालिब लिहितो: 'क्या पूछते हो ? क्या लिखू ? दिल्ली की हस्ती मुन्हसिर कई हंगामों पर थी-किला, चाँदनी चौक, हर रोजा बाजार मस्जिदे जामा का, हर हफ्ते सैर जमना के पुल को । हर साल मेला फूलवालों का । ये पाँचों बातें अब नहीं । फिर कहो - दिल्ली कहाँ ? नहीं, कोई शहर कलम-ए-हिन्द में इस नाम का था । 

गालिबच्या या पत्रातून त्याचं दिल्लीवरचं प्रेम दिसून येतं, त्या काळात दिल्लीमध्ये मुस्लिम बादशहा असला, तरी सर्व सण व उत्सव मोठ्या उत्साहाने दरबारातर्फे साजरे होत. रक्षाबंधन, दसरा, होळी, दिवाळी, शिवरात्र, वसंतपंचमी असे उत्सवाचे दिवस राजदरबारीही तेवढ्याच उत्साहाने साजरे होत. रक्षाबंधनाच्या संदर्भात पूर्वी एक घटनाही घडी होती. अकबरशहा (दुसरा) याचे आजोबा सम्राट आलमगीर (दुसरे) यांची हत्या झाली व त्यांचं शव राजमणी गौड या ब्राह्मण स्त्रीच्या दृष्टीला पडलं. राजाचे सैनिक येईपर्यंत तिने त्यावर पहारा केला. त्याच्या मुलाने - शहा आलमने या स्त्रीच्या हातून दर वर्षी राखी बांधून घेण्याचा पायंडा पाडला. ती प्रतिवर्षी येऊन त्याला राखी बांधत असे व तिला भेटवस्तू देऊन बादशहा तिचा सत्कार करत असे.  ही परंपरा पुढच्या पिढ़्यामध्येही कायम राहिली व राजमणीच्या कुटुंबातील स्त्रीया दर वर्षी बादशहाला राखी बांधू लागल्या.

गालिबच्या काळात दिल्लीत हिंदू-मुस्लिमांचे जातीय दंगेही झाले नाहीत. फक्त एक प्रसंग असा घडला जेव्हा शहरात थोड तणावाचं वातावरण निर्माण झालं. ही गोष्ट आहे 1854 सालातली.  त्या वर्षी बकरी ईदच्या कुर्बानीसाठी गोहत्या करण्यास परवानगी दिल्याचे, दिल्लीचा तत्कालीन ब्रिटिश अधिकारी थॉमस मेटकाफ याने घोषित केले. हिंदू समाजाची भावना लक्षात घेऊन त्या काळी मोगल राजे ईदच्या दिवशी उंटाचा बळी देत असत. तशी परंपराच होती. पण ब्रिटिशांनी गोहत्येवरील ही बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा दिल्लीतील वातावरण तंग झाले. पण तरीही दंगे मात्र घडले नाहीत. याच चर्षी एका पत्रात गालिब या प्रसंगाबद्दल लिहितो : इथे ईदच्या (बकरीद) दिवशी काय झालं ते मी तुला सांगतोच आहे. पण त्या आधी, तिकडे अलीगढमध्ये काय झालं असेल याबद्दल इथे चर्चा चालली होती त्याबद्दल लिहितो. ईश्वर आपले रक्षण करो ! अलिगढमध्ये जणू युद्धच झालं आहे असं लोक भेटेल त्याला सांगत होते. 

हिंदू व मुस्लिम दोघांनी तलवारी उपसून एकमेकांवर हल्ले केले आणि त्यांत दोन्हीकडची दहा-वीस माणसं तरी ठार झाली, असं बोलले जात होतं. तुला पत्र लिहून याबद्दल विचारावं असं माझ्या मनात होतंच. तेवढ्यात तुझं पत्र आलं आणि खरी परिस्थिती मला समजली. मला वाटतं तिकडेही दिल्लीबद्दल अशाच बातम्या पसरल्या असतील - तलवारी उगारल्या गेल्या वगैरे, वगैरे. तर सभ्य गृहस्था, तलवारी वगैरे अजिबात उपसल्या गेल्या नाहीत आणि काही तंटाही झाला नाही. दोन दिवस हिंदू दुकानदारांनी आपली दुकान बंद ठेवली, त्यानंतर ब्रिटिश न्यायाधीश आणि शहरातील पोलीस प्रमुखांनी शहरभर दौरा केला. समजावणी करत मनधरणी करत, आग्रह करत आणि दरडावणी करत त्यांनी दुकानं उघडायला लावली आणि अखेरीस बकरे व गाई दोघांचीही कुर्बानी देण्यात आली.

गालिबच्या या पत्रावरून हिंदू-मुसलमान लोकांमध्ये जातीय हिंसाचार होऊ शकतो ही कल्पनाच त्याला काहीशी अविश्वासार्ह वाटत असल्याचे दिसून येते. अलीगढमधल्या ज्या परिस्थितीचे ज्ञान झाल्यावर त्याला वाटलेला दिलासाही त्यातून स्पष्ट होतो आणि दिल्लीबद्दलही अशाच अफवा उठल्या असणार या अंदाजाने तो तिथल्या वास्तव परिस्थितीबद्दल आपल्या मित्राला लिहिताना दिसतो. अर्थात जातीय तणावाचे प्रसंग या काळात कधी आलेच नाहीत असे नाही. एकदा जैन व हिंदू धर्मीयांमध्येही रथयात्रेवरून काही तरी कुरापत निघाली होती आणि शिया व सुन्नी पंथांच्या मुस्लिमांमध्येही अधूनमधून वादाचे प्रसंग हातघाईवर येत असत. ईद आणि रामलीलेच्या मिरवणुकांच्या वेळी काही गडबड होऊ नये याकरिता ब्रिटिश फौजा सज्ज असत. पण त्यांच्यावर काही कारवाई करण्याची वेळ आल्याचे आढळत नाही. उलट रामलीलेची मिरवणूक आपल्याला महालातून पाहता यावी म्हणून तिचा पूर्वीचा मार्ग बहादुरशहा जफरने बदलल्याचे संदर्भ सापडतात. अरबी भाषेतील बायबलची प्रत कोणी तरी बादशहाला दिल्यावर त्याला आनंदच वाटतो.

बहादुरशहा जफर हा स्वतः कवी होता आणि त्याला गुणी कलवंतांची कदरही होती. तो गादीवर आला तेव्हा त्याचा शायरीतील उस्ताद इब्राहीम महंमद जौक हा राजकवी झाला. गालिबला हे स्थान जौकच्या निधनानंतरच (1854) मिळू शकले. अर्थात त्यानंतर लवकरच 1857 चं युद्ध झाले आणि परिस्थिती बिघडतच गेली. गालिबचं दरबारी जाणं येणं मात्र यापूर्वीही प्रसंगवशात् होतच असे. त्या वेळी घडलेले काही किस्से त्याच्या धार्मिक दष्टिकोनावर प्रकाश टाकतात आणि त्याची मतं पटली नाहीत, तरी त्याला अपमानित न करता ती ऐकून घेण्याची व प्रसंगी त्याच्या विनोदबुद्धीला व उपहासाला दादही देण्याची बादशहाची व इतरांची वृत्ती दिसून येते. इतरही अनेक घटनांमधून गालिबच्या व्यक्तिगत धारणांची माहिती मिळू शकते. 

दिल्लीत त्या काळी पारंपरिक आणि सुधारणावादी मुस्लिम गटांमध्ये काही वाद चालला होता. तात्त्विक वाद, असंच याचं स्वरूप असले तरी वाद कडाक्याचा होता. सय्यद अहमद बरेलवी आणि शाह इस्माईल या परंपराविरोधी गटाला वहाबी असं संबोधण्यात येत असे. गालिबचा जवळचा मित्र फज़ले हक़ खैराबादी हा परंपरावाद्यांच्या बाजूने होता तो फारसीचा मोठा पंडित होता आणि गालिबवर त्याचा प्रभाव इतका होता की गालिबने पुढे त्याच्या सांगण्यावरून आपल्या कित्येक काव्यरचना प्रसिद्ध होऊ दिल्या नव्हत्या. कारण फज़ले हक़ याने त्यामध्ये काही दोष दाखवून दिले होते. प्रेषित महंमदाला शेवटचा प्रेषित मानण्याच्या संदर्भात जो वाद उत्पन्न झाला होता. त्या विषयावर फज़ले हक याने गालिबला फारसीमध्ये मस्नवी (काव्यरचना) रचण्यास सांगितले. वहाबींच्या म्हणण्याला विरोध करून महंमद हाच शेवटचा प्रेषित असल्याबद्दल गालिबने या कवितेत लिहावं अशी अपेक्षा होती. तेव्हा गालिबने मित्राखातर त्याच्या विचारांना अनुकूल अशी रचना केली होती. 

त्याचा चरित्रकार हाली लिहितो की, 'प्रथम, त्याने या संदर्भात शेवटी जे मत व्यक्त केलं होतं. ते फज़ले हक़ला पसंत पडले नव्हतं. त्याने गालिबला त्यात बदल करायला लावला व गालिबनेही त्याचें म्हणणं ऐकलं. ग़ालिब ना वहाबीच्या बाजूचा होता ना विरोधकांच्या. अशी टिप्पणीही हालीने केली आहे. हे खरं असेलही पण या संदर्मात गालिबने मित्राखातरच ही रचना केली होती आणि एरवी त्याने धार्मिक बाबतीत स्वतःला पटेल तसंच करण्याचे स्वातंत्र्य घेतलं असतं, असं त्याच्या एकूण आयुष्याकडे पाहून वाटतं. इस्लामच्या शिकवणीपैकी त्याने ठराविक गोष्टीच स्वीकारल्या होत्या त्या म्हणजे, ईश्वर एकच आहे आणि सर्वव्यापी आहे. तसंच, दुसरीकडे त्याचा 'ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या' या तत्त्वावरही विश्वास होता असं दिसतं. 

स्वतःच्या मनाशी गालिबचे विचार स्पष्ट आणि स्वच्छ असल्याने त्याचे आचरण इस्लामवर श्रद्धा असणाऱ्या  कोणत्याही इतर मनुष्याच्या दृष्टीने धर्मभ्रष्ट वाटावं असंच होतं. कारण प्रचलित धर्मनियमांनुसार तो काहीच बंधनं पाळत नसे. त्याच्या दृष्टीने अशा गोष्टींना काही अर्थच नव्हता. त्यामुळेच तो उघडपणे अशा गोष्टींची टिंगल करत असे. त्याचा स्वभावही खोचक व विनोदी असल्याने असे प्रसंग वारंवार येत असत. स्वतःच्या मद्यपानावरूनही तो बरेचदा स्वतःची व इतरांची थट्टा करत असे एक दिवस एकजण त्याच्याशी बोलताना मद्यपानाला नावं ठेवत होता. मद्यपान करणाऱ्यांच्या प्रार्थना फळास येत नाहीत असं तो या वेळी म्हणाला. तेव्हा गालिबने शेरा मारला को, 'एखाद्याजवळ जर मद्य असेल, तर मग अन्य कोणत्याही गोष्टीसाठी प्रार्थना करण्याची गरज तरी उरेल का ? तो रमजानच्या महिन्यात रोजेही पाळत नसे. 

एकदा एक सुन्नीपंथीय मौलवी त्याच्या घरी आला होता. दुपारची वेळ होती. बोलताना ग़ालिबने नोकराला हाक मारून त्याला पाणी घेऊन यायला सांगितलं. तेव्हा मौलवीला आश्चर्य वाटून तो म्हणाला 'हे काय  ? तुम्ही उपवास करत नाही का ? तेव्हा ग़ालिब गमतीने त्याला म्हणाला, 'मी सुन्नी आहे ना, त्यामुळे सूर्यास्ताच्या दोन तास आधीच उपवास सोडतो.' खरं तर सुन्नी व शिया दोन्ही पंथांमध्ये दिवसभर रमजानचा उपवास करण्याची प्रथा आहे. पण त्यातही काटेकोरपणे धार्मिक बंधन पाळण्याकडे शियांचा कल अधिक असतो असं सर्वसाधारणपणे मानण्यात येते. गालिबने याच गोष्टीचा आधार घेऊन हे उत्तर दिले होते. गालिब दिवसभर ज्या खोलीत वावरत असे तिच्या लगतच दुसरी एक छोटी खोली होती. काहीशी अंधारी. तिच्यात शिरताना वाकूनच शिरावं लागे, इतके तिचं दार बुटकं होतं. या खोलीत जमिनीवर गालिचा अंथरलेला असे; आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गालिब सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत या छोट्या खोलीत राहत असे. त्या जागेला थोडा थंडावा होता. 

एकदा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रमजान महिना आला असताना, गालिबचे एक स्नेही मौलाना आर्जुदा तिथं आले. हा गृहस्थ विद्वान होता आणि फारसीत काव्यरचनाही करीत असे. भर दुपारी मौलाना आले, तेव्हा गालिब या खोलीत बसून फाशाचा खेळ खेळत होता. हा प्रकार बघून ते म्हणाले, 'मी धर्मग्रंथांमध्ये असं वाचलंय की, रमजानच्या काळात सैतान कैदेत असतो म्हणून. पण आता तुझ्याकडे बघून मला या गोष्टीच्या सत्यतेबद्दल शंकाच वाटू लागली आहे.' त्यावर गालिबने उत्तर दिले, महाशय, धर्मग्रंथात जे दिलंय ते अर्थातच पूर्णपणे खरंच आहे. मात्र मला जरा स्पष्ट करून एवढच सांगायचं आहे की, सैतानाला जिथे ठेवलं ती तुरुंगाची जागा म्हणजे हीच खोली आहे !" गालिबची धार्मिक मत बहुतेकांना पटणारी नव्हतीच. पण तो उघडपणे ती बोलून दाखवत असल्याने त्याच्याबद्दल बऱ्याच जणांना काहीशी कौतुकाचीच भावना वाटत असे. शिवाय त्याच्या खोचक व नर्म विनोदाच्या आस्वादाचा लाभ अशा प्रकारच्या शेरेबाजीतून अधिक चांगल्या प्रकारे होत असे. 

प्रत्यक्ष बहादुरशहा जफर या दिल्ली नरेशालाही गालिबने एकदा असेच गमतीशीर उत्तर दिले होते. रमज़ानचा महिना नुकताच संपला होता, तेव्हा बादशहाने गालिबला विचारले 'मिर्जा, तुम्ही किती दिवस उपवास पाळलात ?' त्यावर गालिबने खुबीने उत्तर दिले. जहाँपनाह, मला एक दिवस उपवास पाळता आला नाही.' अशा प्रकारे, फक्त एक दिवस पाळता आला नाही. की एकही दिवस पाळता आला नाही यांपैकी कोणता अर्थ घ्यायचा ते त्याने बादशहावरच सोपवलं. धार्मिक अवडंबराच्या विरोधी असणारा गालिब सहदय आणि मानवतावादी होता. त्याच्या मित्रांमध्ये व शिष्यपरिवारातही हिंदू व अन्यधर्मीय लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. काही इंग्रज अधिकाऱ्यांशीही त्याची मैत्री होती. त्याने एका पत्रात मानवाला समान मानण्याच्या आपल्या वृत्तीचा उल्लेख केला आहे. तो म्हणतो.
'मैं बनी आदम को - मुसलमान हो, या हिंदू या नसरानी, अज़ीज़ रखता हूँ और अपना भाई गिनता हूँ । दूसरा माने या न माने । 

गालिबचा आवडता शिष्य व मित्र मुन्शी हरगोपाल ‘तफ़्ता’ हा धर्माने हिंदूच होता. तफ्ताशी त्याचा नित्याचा पत्रव्यवहार चालू असे. त्याची ही पत्रे जिव्हाळ्याने लिहिलेली आहेत. त्याच्या इतरही अनेक पत्रामधून त्याच्या मनातली मित्रांबाबतची आस्था वेळोवेळी प्रकट झालेली दिसते. एक माणूस म्हणून ग़ालिबचं जे दर्शन या पत्रांमधून होतं, ते खरोखरीच सौहार्दपूर्ण असं आहे. 1857 च्या वातावरणावर गालिबने 'दस्तंबू' हा ग्रंथ लिहिला होता. धर्माला फारसं महत्त्व न देणाऱ्या गालिबचा त्यातील एक किस्सा प्रसिद्ध आहे. 1857 च्या धामधूमीच्या काळात त्याला शिपायांनी कर्नल बर्न (ज्याचा उल्लेख गालिब ब्राउन असा करतो) या इंग्रज अधिकाऱ्यापुढे हजर केलं गालिबच्या डोक्यावरची तुर्की पद्धतीची उंच टोपी बघून कर्नलला मौज वाटली. त्याने त्याला मोडक्या-तोडक्या उर्दूत विचारले 'तुम मुसलमान ?' गालिब  म्हणाला, "आधा मुसलमान.  मग कर्नलने आधा मुसलमान कैसा ? असा प्रश्न विचारला. त्यावर गालिबने त्याला उत्तर दिले, शराब पिता हूँ, सूअर नहीं खाता. इसीलिए आधा कहा.' त्याच्या या उत्तरावर कर्नलला हसू आलं. 

गालिबच्या या विनोदबुद्धीची झलक त्याच्या कवितेत अनेक ठिकाणी मिळते. मार्मिक व आध्यात्मिक संदर्भातही तो उपहास करायला किंवा स्वतःचा मोठेपणा मिरवायला मागे-पुढे पाहत नसे. एका शेरमध्ये तो लिहून जातो की, मी इतका अभिमानी आहे की काव्याचं दर्शन घ्यायला गेलो व ते दार बंद असलं, तर मी परत येईन : 
उल्टे फिर आये 
दर-ए-कावा गर वा न हुआ
गालिबने गंभीरपणे अध्यात्मविषयावर लिहिलेली कविता खरोखरीच विचार करायला लावणारी आहे. त्याच्यावरचा एकेश्वरवादाचा अद्वैतवादाचा आणि जगन्मिथ्या तत्वाचा प्रभाव त्याच्या काव्यामध्ये पदोपदी आढळतो. मद्य, साकी आणि पेला यांच्या रूपकातून अध्यात्म विषयाच विवरण करण्याची रीतही त्याने अनेक ठिकाणी स्वीकारली आहे. ही रीत फारसी कवितेच्या परंपरेतूनच आली व सूफी तत्वज्ञानाचा प्रसार करताना तिचा सरळ वापर झालेला दिसतो. गालिबनेही या परंपरेचा वापर करून काव्यरचना केली. मद्य आणि मद्यपात्र यांच्या उल्लेखाशिवाय परमेश्वर दर्शनासारख्या विषयांबद्दल बोलताच येत नाही, असं तो या शेरमध्ये म्हणतो :
हरचन्द, हो मुशाहद-ए-हक़ की गुफ्तगू 
बनती नहीं हे, बादः ओ सागर कहे बिगैर 

या रूपकाच्या माध्यमातून अध्यात्मासारखा गहन विषयही समजावून सांगणं सोपं जातं असा इथे गालिब चा अभिप्राय आहे. त्याला असंही सुचवायचं असावं की, आपल्या कवितेतील मद्याचा उल्लेख हा बह्यंशी  अध्यात्माच्या संदर्भातच असतो. ईश्वर हा एकच एक आहे. द्वैतभाव ईश्वराबाबत संभवत नाही हा गालिब चा विश्वास अनेकदा कवितेतून प्रकटतो. 
उसे कौन देख सकता, कि यगानः हे  वह थकता 
जो दुई की भी होती, तो कहीं दुचार होता
(त्याला कोण पाहू शकेल, कारण तो अनुपम आणि अद्वितीय आहे. द्वैताची शक्यता असतीच, तर कुठे ना कुठे समोर आलाच असता.) 

सार्वकालिक, सर्वसाक्षी आणि सर्वव्यापी ईश्वराबद्दल गालिब एके ठिकाणी म्हणतो की, खुदा होता. आहे आणि राहीलही. मी मात्र जन्मलोच नसतो तर किती बरं झालं असतं, या जंजाळातून सुटलो असतो. 
न था कुछ तो खुदा था  
कुछ न होता तो खुदा होता 
डुबोया मुझको होने ने
न होता मैं तो क्या होता  
'तत्त्वमसि' किंवा ‘अहं ब्रह्मास्मि 'सारख्या उक्तींची आठवण करून देणाचा या ओळी गालिबच्या मनातील सर्वव्यापी ईश्वराबद्दलच्या श्रद्धेची जाणीव करून देतात. त्याच्या कवितेतून अनेकदा शंकराचार्याच्या मायावादाची छटाही दिसून येते. भोवतालचं जग त्याला मायावी वाटतं, भ्रमसदृष्य वाटतं अशा वेळी तो म्हणतो : 
हस्ती के फ़रेब में मत आजाइयो ‘असद’ 
आलम तमाम हल्काए-वामे खयाल है  
(असद, या जीवनाच्या मायाजालात तू सापडू नकोस. हे संपूर्ण विश्व म्हणजे कल्पनेचं एक जाळंच आहे.)
भोवती जो विश्वाचा पसारा दिसत आहे. ते काही खरं अस्तित्वात नाही, मग लोक काहीही म्हणोत, असंही तो एके ठिकाणी म्हणतो: 
हां, खाइयो मत फरेबे हस्ती 
हर चन्द कहें कि है, नहीं है  
हीच गोष्ट तो एके ठिकाणी अशी मांडतो :
जुज नाम, नहीं सूरत-ए-आलम मुझे मंजूर 
जुज़ यहम नहीं, हस्ति-ए-अशिया मेरे आगे 
(भोवतालच्या जगाचं रूप नाममात्रच आहे, त्यापलीकडे मला ते स्वीकारणीय नाही. माझ्या भोवतीच्या वस्तूंचं अस्तित्वही मला केवळ भ्रम या स्वरूपातच मान्य आहे.) एका शेरमध्ये ग़ालिब जगाची व जगातील सर्व वस्तूंची व घटनांची तुलना खेळाशी करतो. 

रात्रंदिन माझ्या डोळ्यादेखत काही ना काही खेळ चाललेला असतो. सारं जग म्हणजे लहान मुलांचा खेळच आहे. अर्थातच हा खेळ खेळणारा कोणी वेगळाच आहे, असं ग़ालिबला इथे अभिप्रेत आहे. तो म्हणतो : बाजीच-ए-अत्फाल है  दुनिया मेरे आगे 
होता है  शब-ओ-रोज़ तमाशा मेरे आगे
या जगात सर्वत्र 'तो’ च आहे. सर्व जीवांमधला प्राणही 'तो’ च आहे. ‘त्या’ ने दिलेले प्राण मी त्यालाच अर्पण केले. अशा परिस्थितीत, मी स्वतःचं कर्तव्य पार पाडलं असं म्हणता येणार नाही; असा एक सुंदर विचार गालिब व्यक्त करतो. ईश्वराने दिलेले प्राणही जरी त्याला अर्पण केले, तरी त्यात कर्तव्य पार पाडलं असे म्हणता येणार नाही : 
जान दी, दी हुई उसीकी थी 
हक तो यूं है कि हक अदा न हुआ 

धार्मिक रीतिरिवाजांवर गालिबचा विश्वास नव्हता. बाह्य कर्म किंवा कोणत्याही धर्माची बाह्यतः दिसणारी चिह्नं महत्वाची नाहीत. प्रत्येकाच्या मनात असणारी श्रद्धा तेवढी खरी असते, ही भावना गालिब एका शेरमध्ये अशी व्यक्त करतो : 
नहीं कुछ सुबह-ओ-जुन्नार के फन्दे में गीराई 
वफादारी में शैख-ओ-बर्हमन की आजमाइश है  
(जपमाळ किंवा जानवं धारण करण्यातून काहीच सिद्ध होत नाही. शेख असो वा ब्राह्मण, त्याची पारख श्रद्धेच्या कसोटीवरच होते.) स्वर्गनरकादी कल्पनांवरही ग़ालिबचा विश्वास नव्हता. अशा सगळ्या गोष्टी माणसाने स्वतःच्या मनाच्या समाधानासाठीच निर्माण केल्या आहेत असं त्याचं मत होतं. एका शेरमध्ये तसं तो स्पष्टपणे म्हणतो. तेही त्याच्या खास उपहासात्मक शैलीत :
हमको मालूम है जन्नत की हकीकत, लेकिन 
दिल के खुश रखने को ग़ालिब, यह खयाल अच्छा है  
ईश्वरप्रेमरूपी मद्य न पिण्याचा मी निश्चय केला पाय मागे घेतला, तरी ईश्वराने मला ते पिण्याचा आग्रह का केला नाही ? त्याला काय झालं होतं ? असा अभिप्राय गालिबने एके ठिकाणी मद्य व मधुबाला यांच्या रूपकातून व्यक्त केला आहे : 
मैं और बज्म-ए-मै से यूं तिश्नाकाम आऊँ 
गर मैंने की थी तौबा, साकी को क्या हुआ था 
मनुष्याची ऐहिक सुखांची आसक्ती एवती तीव्र असते की, त्याची ती एक विवशताच बनून जाते. अखेरच्या क्षणापर्यंत, आपण सुखोपभोग घेतला पाहिजे ही त्याची तृष्णा कमी होत नाही. गालिबने एका शेरमध्ये मद्याच्या रूपकाद्वारे मानवी तृष्णेचं रूप व्यक्त के आहे : 
गो हाथ को जुम्बिश नहीं, आँखों में तो दम है   
रहने दो अभी सागर-ओ-मीना मेरे आगे
(हात हलवण्याचीही शक्ती आता उरलेली नाही, पण माझ्या दृष्टीत तर अजून ताकद आहे. मद्याचा चषक व पेला माझ्या समोरच राहू द्या.) 

गालिब 1828 साली कलकत्त्याला त्याच्या पेन्शनच्या संदर्भातील कामाकरिता गेला होता. जाताना वाटेवर तो बनारसलाही गेला. तिथली गंगा नदी, संध्याकाळच्या वेळी पायात सोडण्यात येणारे दिवे, नदीकाठी वावरणारे साधुसंत असं वातावरण गालिबला फार आवडलं. त्याने त्यावर 'चराग-ए-दैर' या शीर्षकाची कविताही फारसीमध्ये लिहिली. 'मंदिरातील दिवा' असा या शीर्षकाचा अर्थ होतो. यात त्याने बनारसला 'हिंदुस्तानचा काबा’ असं म्हटलं होतं आपल्या एका मित्राला त्याने पत्र लिहून बनारसबद्दल आपल्याला आकर्षण का वाटले हे कळवले. या पत्रात तो पुढे लिहितो, 'मला असं वाटलं की, धर्मत्याग करावा आणि हातात जपमाळ घ्यावी, कपाळावर टिळा लावावा, जानवं अडकवावं आणि गंगेच्या काठावर जाऊन बसावं. म्हणजे माझ्या अस्तित्वात सगळं पाप धुवून निघेल आणि एखाद्या जलबिंदूप्रमाणे माझे अस्तित्व नदीला अर्पण होईल.

गालिबच्या या भावनांचा निर्मळपणा आणि प्रामाणिकपणा लक्षात येतो आणि मनाने तो केवळ्या उंचीवर पोहोचला होता ते जाणवते. संकुचितपणा, धर्माची तथाकथित बंधनं यांच्या तो पूर्ण पलीकडे गेला होता. म्हणूनच एके ठिकाणी तो म्हणू शकता : 
काबे में जा बजायेंगे नकूस 
(मी काब्याला जाऊन शंखाचा नाद करीन.) विशिष्ट धर्माच्या खुणाही त्याच्या दृष्टीने मानवतेच्याच खुणा होत्या. म्हणूनच मुन्शी हरगोपाल तफ़्तासारणा हिंदू त्याचा सर्वात आवडता शिष्य बनू शकला. तर शिवजी राम ब्राह्मण याला तो मुलासारखा मानत असे. बहादूरशहा जफरचा व्यक्तिगत वैद्यकीय अधिकारी म्हणून मूळचा हिंदू असलेल्या डॉ. चमनलाल याची नेमणूक झाली तेव्हा काहींना ते आवडलं नाही. कारण त्याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला होता. पण बादशहाने असं करण्याने काहीही बिघडत नाही असं सांगून सर्वांना वाटेला लावलं. गालिबने धर्ममार्तडांच्या ढोंगीपणावरही हल्ला चढवला. अगदी टिंगलही केली :
कहाँ मैखाने का दरवाजा गालिब, और कहाँ वाइज  
पर इतना जानते हैं, कल यह जाता था कि हम निकले 
अर्थात या ओळीमध्ये स्पष्ट अर्थ दिसतो को, मधुशालेचा दरवाजा आणि धर्मोपदेशक हे एकत्र येणं शक्य नाही. पण काल मात्र मी तिथून बाहेर येत होतो तेव्हा तो आत जात होता. म्हणजे दुसऱ्यांना दारू पिऊ नका असं सांगणारा स्वतः मात्र हा नियम पाळत नाही, ढोंग करत. याचा असाही अर्थ होऊ शकतो की धर्मोपदेशक मधुशालेत शिरला ते मी पाहिलं खरं, पण तो मयपानासाठी आत गेला की मध पिऊ नका असं सांगण्यासाठी गेला ते स्पष्ट नाही. किंवा गालिब चा अभिप्राय असाही असेल, की धर्मोपदेशक मधुशालेत शिरत असतानाच मी बाहेर पडलो. 

कारण याही ठिकाणी त्याची उपदेशाची कटकट ऐकायची त्यापेक्षा त्याच्या संगतीत न राहिलेलंच बरं... भले मग त्यासाठी मधुशालेचा त्याग करावा लागला तरी चालेल. अर्थाच्या अनेक वाटा खुल्या ठेवून लिहिलेला हा शेर गालिबच्या मिस्किलपणाची आणि धर्ममार्तंडांविषयी त्याला असलेल्या तिटकाऱ्याची झलकच दाखवतो. गालिबच्या काव्यामध्ये अध्यात्म, तत्त्वज्ञान, चिंतनाची डूब, विद्वत्ता, मौलिक विचार असे अनेक गुण आढळतात. प्रेम, विव्हलता, अगतिकता, मानवी दुःख यांचंही वर्णन गालिबने कवितेद्वारे सातत्याने केले. परंतु त्याच्या स्वतःच्या धार्मिक व सामाजिक मतांमुळे, त्याच्या राहणीमुळे आणि तिरकस विनोदी स्वभावामुळे त्याची बदनामीही खूप झाली. हयात असतानाही तो मद्यपी आहे, नास्तिक आहे अशी मतं प्रसृत होतच होती. त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या अवगुणांची चर्चा होतच राहिली. 

तो मद्यासक्त. सुखासीन व उथळ चंचल स्वभावाचा होता अशी प्रतिमा तयार करण्याचेही प्रयत्न कमी झाले नाहीत. तरीपण गालिबची कविता दोनशे वर्षे टिकून राहिली. जगातल्या विविध भाषांमध्ये तिचा अनुवाद झाला. आज गालिब हा जगातला एक महान कवी म्हणून ओळखला जातो. त्याला स्वतः आपल्या काव्यशक्तीबद्दल खात्री होतीच. म्हणूनच ‘कहते हैं कि गालिब का है अन्दाज-ए-बयाँ और' असे तो खात्रीने म्हणाला होता. त्याच्या हयातीतही त्याला प्रशंसक भेटलेच नाहीत, असं नाही. पण सर्वसाधारणपणे त्याची बदनामीच अधिक झाली. त्याच्या कवितेतील गांभीर्य, तत्त्वचिंतनाचा स्पर्श. उच्च कोटीची आध्यात्मिकता याकडे काहीसं दुर्लक्षच झालं. गालिबवर फारसी भाषेचा व काव्याचा प्रभाव असल्याने त्याची उर्दू कविता शैलीदृष्ट्या अनेकदा जटिल असे. त्याचा 'फारसी दीवान’ उर्दूतील संग्रहापेक्षा दुपटीने तरी मोठा असेल. 

फारसीच्या प्रभावामुळे आणि गालिबच्या गुंतागुंतीच्या रचनाकौशल्यामुळे त्याची शायरी समजणही जड असल्याने, तो निरर्थक लिहितो असाही प्रचार त्या काळात झालाच. 'काफिर' म्हणून तो 'कुख्यात' होताच. इंग्रज सरकारकडून पेन्शनची कामं व्हावी म्हणून त्याने वेळोवेळी रचलेल्या स्तुतिकाव्याच्या संदर्भात त्याला इंग्रजांचा खुशमस्कऱ्याही संबोधण्यात येत असे. गालिबला स्वतःला या परिस्थितीची कल्पना होती. म्हणूनच त्याने एके ठिकाणी म्हटले होते :
होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने 
शायर तो यह अच्छा है. पै बदनाम बहुत है  

मात्र या सगळ्या विरोधी वातावरणावर मात करून गालिबची कविता कीर्तिमान झाली. त्याच्या विरोधकांची धारही बोथट झाली. उत्तरायुष्यात तर त्याला राजकवी होण्याचा मानही मिळाला. त्याची कविता काळाच्याही पुढची होती. त्याला मरणानंतर अधिक चाहते मिळाले, पुढच्या शतकामध्ये त्याची कविता उत्तरोत्तर लोकप्रिय होत गेली. भविष्यातही तिचा प्रभाव टिकून राहणार आहे, यात शंकाच नाही
गालिबने आपल्या काळातील जाणिवा आणि मानवी भावनांचे चित्रण अशा पद्धतीने केले, की पुढच्या काळातही ते ताजंच वाटावं, त्याचं जीवनावरील एकूणच भाष्य आज एकविसाव्या शतकाकडे जातानाही रसिकांना बांधून ठेवत, आपलंसं वाटतं. कारण गालिब हा द्रष्टा कवी होता, मानवी आयुष्याबद्दलची त्याची समज अपूर्व अशी होती. त्याच्या या ज्ञानाचं आणि जाणिवांचे सारथ त्याने शब्दांच्या माध्यमातून ओतलं. तो खऱ्या अर्थाने 'शब्दसृष्टीचा ईश्वर' होता.

गालिबची 'पाखंडी' म्हणून निंदा झाली. ती करणाऱ्यांना त्याच्या विशाल श्रद्धेची आणि उदार अंत:करणाची कल्पनाच येऊ शकली नाही. अर्थात त्याला या गोष्टीबद्दल खेद वगैरे पाटण्याचा संभवही नव्हता. तो अशा संकुचित मताना काहीच किंमत देत नसे, तो त्याच्या मनातील ईश्वराच्या संकल्पनेशी एकनिष्ठ होता मानवाने निर्माण केलेल्या धर्माशी आणि धार्मिक कर्मकांडांशी त्याला काहीच घेणं नव्हतं. आपल्या अखेरच्या दिवसांत मात्र त्याचे नेत्र खरोखरीच पैलतीरी लागले होते. त्या एकतत्वात मिसळून जाऊन एकरूप होण्याची त्याला ओढ लागली होती. मरणाच्या वाटेवर असताना त्याच्या तोंडी वारंवार या ओळी येत : 
दमे वापसी बरसरे राह हे 
अजीजो अब आल्लाह ही आल्लाह है   
(परतण्याचा समय आता निकट येऊन ठेपला आहे. मित्रानो, आता ईश्वरच ईश्वर आहे.)

गालिबला 15 फेब्रुवारी 1869 या दिवशी मृत्यू आला. हजरत निजामुद्दीन येथील दफनभूमीत त्याच्या सासऱ्याच्या थडग्याशेजारीच त्याच दफन करण्यात आलं. त्याचा चरित्रकार हाली याने लिहिलं आहे की, त्याच्या दफनाच्या वेळी म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थना शियांच्या प्रथेनुसार म्हणाव्या की सुन्नींच्या प्रथेनुसार, यावरून काहीसा वाद झाला, नवाब जियाउद्दीन अहमद खान यांना एकाने अशी विनंती केली की मिर्जा साहिब (गालिब) शिया होते. तुम्ही परवानगी दिलीत, तर आमच्या पद्धतीनुसार दफनविधी करू.' पण नवाबसाहेब या गोष्टीला तयार झाले नाहीत. मग सर्व विधी सुन्नीच्या प्रथेनुसार पार पडले. हाली पुढे लिहितो, मला स्वतःला मात्र वाटत होतं की शिया व सुन्नी दोघांनी आपल्या पद्धतीने एकत्र किंवा स्वतंत्रपणे प्रार्थना म्हणायला पाहिजे होत्या. गालिबने आपल्या हयातीत शिया व सुन्नी दोघांनाही समानच लेखलं असल्याने, त्यांच्या मृत्यूनंतर दोघांनीही त्यांना अखेरची श्रद्धांजली वाहणं योग्य ठरलं असतं 
वफादारी बशर्त-ए-उस्तुचारी, अस्ल-ए-ईमां है  
मरे बुतखाने में, तो काबे में गाडो बिरहमन को 
(दृढ व अविचल ईश्वरभक्तीतच खरा धर्म दडलेला आहे. ईश्वरनिष्ठ असा ब्राह्मण जर मंदिरात मरण पावला, तर त्याला काब्याला नेऊन दफन करणं गैर होणार नाही.)

अशा प्रकारे निवेदन करून धार्मिक समानतेचा उद्घोष करणाऱ्या गालिबच्या वाट्याला त्याच्याच धर्मातल्या दोन भिन्न पंथांची श्रद्धांजली येऊ नये, ही दुर्दैवाचीच बाब होती. विश्वाच्या कणाकणात ईश्वर आहे असं मानणारा गालिब अनेक विसंगतीमुळे त्याच्या काळातल्या समाजाला भावला नाही, पचनीही पडला नाही. नंतरच्या काळात मात्र त्याची कविता अधिक उकलली गेली. जणू या काळाच्या युगधर्माचीच स्पंदन या कवितेच्या अंतरंगात दडलेली होती.. विसंगती. श्रद्धा-अश्रद्धा यांच्या पुसट सीमारेखा, आयुष्याकडे बघण्याचा एक उदार व आधुनिक दृष्टिकोन यांमुळे गालिबची कविता नव्या जगाला जवळची वाटती, यात नवल नाही. आपल्या कवितेची आठवण चिरकाल राहील, आपण वारंवार उच्चारलेले विचार आणि विचारलेले प्रश्न केही लोकांचा पाठपुरावा करतील, अशी पक्की खात्री गालिबने या शेरमध्ये फार नेमकेपणाने व्यक्त केली आहे. 
हुई मुद्दत कि गालिब मर गया फिर भी याद आता है  
वह हर इक बात पर कहना, कि यूँ होता तो क्या होता
 

Tags: इब्राहीम महंमद जौक मुन्शी हरगोपाल ‘तफ़्ता’ कलकत्ता काशी दिल्ली बहादूरशहा जफर डॉ. चमनलाल नवाब जियाउद्दीन अहमद खान सुन्नी शिया मुस्लीम हिंदू मद्य मिर्जा गालिब नंदिनी आत्मसिद्ध Ibrahim Mahamad jouk Munshi hargopal Tafta Calcutta Kashi Delhi Bahadurshaha Jafar Dr. Chamanlal Nawab Jiyauddin Ahamad Khan Sunni Shiya Muslim Hindu Alcohol Mirja Galib Nandini Aatmsidhi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नंदिनी आत्मसिद्ध

पत्रकार, स्त्री-प्रश्नांच्या अभ्यासक, अनुवादक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके