डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

या पुस्तकातला काळ, त्यावेळचे गाव, घरांची रचना, शेजारधर्म, पत्रावळी लावणे, लखंबाई ताक दे, डेरा फुटला मडके दे सारखा खेळ, हे सारे आजच्या काळात आढळणार नाही; पण त्यातली खुमारी आजच्या मुलांना का नाही समजणार? महागड्या वस्तूंनीच खेळता येते असे नाही, तर चार मुले आनंदाने जमली की कोणत्याही खेळाचा आनंद एकोप्याने लुटता येतो हे त्यांना उमगले तर त्यांचा फायदाच होणार नाही का? 'श्यामची आई' पुस्तकातून पुसट झालेल्या काळाच्या सांस्कृतिक खुणा पानोपानी विखुरल्या आहेत. आजच्या मुलांना ते वाचताना मौजही वाटेल. ती आगबोट, ते बैलगाडीतून प्रवास करणे, माधुकरी मागून शिकणे, शेजारणीला आईने प्रेमाने एखादा पदार्थ करून देणे अशा अनेक खुणा मुलांना खूप काही सांगून शिकवून जातील, श्यामच्या घरची मोरी गाय, तिचे त्याच्या आईवरचे प्रेम आणि तिच्या मृत्यूनंतर श्यामच्या आईने केलेला उपास भूतदयेपलीकडची माया शिकवून जाईल.

प्रत्येकाचे आपल्या आईशी एक आंतरिक नाते असते. प्रत्यक्ष रक्ताच्या नात्याची जोड त्याला असली तरी हे नाते केवळ तेवढ्यापुरते मर्यादित नसते. शरीरातून वाहणाऱ्या रक्तापेक्षा आईच्या सहवासातून उमललेले संस्कार आणि मन आई-मुलातले नाते दृढ करीत असतात. भारतीय संस्कृतीत मातेला फार मोठे स्थान आहे. कुटुंबाच्या चौकटीतही आई हा भरभक्कम आधार असतो. ज्या काळात स्त्रिया फारशा घराबाहेर पडत नव्हत्या, त्या काळातही घराला बांधून ठेवणारी आणि सर्व कुटुंबीयांना एकत्र राहण्याची प्रेरणा देणारी व्यक्ती ही घरातली कर्ती स्त्रीच असायची. का व मिळवत्या पुरुषाचे स्थान पुरुषप्रधान संस्कृतीच्या चौकटीत सरस मानले गेले तरी त्यामागे सत्तेची भावना होती. मानवी जीवनातला प्रेमाचा अंकुर ताजा ठेवण्याचे काम स्त्रीचेच - आईचेच असायचे. म्हणूनच घर पुरुषाने बांधले, तरी ते उभारण्याचे अधिक मोलाचे काम हे स्त्रीचेच असायचे.

आईचे प्रेम ही जगातली सर्वांत थोर आणि मंगल गोष्ट आहे, असे संस्कार भारतीय मानसावर प्राचीन काळापासून आले आहेत. भले इथे पुरुषसत्तेच्या वर्चस्वाची छाप असेल, पण स्त्रीमधले प्रेरक तत्त्व आणि विधायक सर्जकपण त्यातही टिकून राहिले. पुरुषी वर्चस्वाच्या काळातही आधीच्या मातृसंस्कृतीच्या खुणा शाबूत राहिल्या. आपल्याकडे आपण स्वदेशाला मातृभूमी म्हणतो, स्वभाषेला मातृभाषा म्हणतो. 'मातृदेवो भव' असे म्हणून आईला आयुष्यात पहिले पूजनीय स्थान देतो. आराध्य देवतेला 'आई', 'माऊली' म्हणून संबोधण्याची परंपरा या मातीत रुजली आहे, मग हे दैवत विठोबासारखे पुरुषदैवत असले, तरी लडिवाळ प्रेमाने भक्त त्याला 'विठू माऊली' म्हणतात. 'कुपुत्रो जायते, कचिदपि कुमाता न भवति' असे शंकराचार्यांनीही म्हणून ठेवले आहे.

भारतीय साहित्यातही मातेच्या प्रेमाची महती गणाऱ्या लेखनकृत्ती अनेक निर्माण झाल्या, परंपरेतून आलेल्या कथाकहाण्यांतूनही आईच्या अनेक प्रतिमा इथे लोकमानसावर ठसल्या. त्यात जन्मतः मुलाला पाण्यात सोडून देणारी कृती अखेरच्या वेळी, युद्ध काळात कर्णाची आठवण विसरत नाही; पण स्वतःपासून तोडलेल्या या मुलाचा मृत्यू तिला अटळपणे पाहावा लागतो. जशी कुंतीसारखी आई - महाभारताने दिली, तशी यशोदेसारखी पोटच्या मुलाहून अधिक प्रेम कृष्णाला देणारी माताही. कृष्ण-यशोदेचे प्रेम हे मायलेकांच्या प्रेमाचे प्रतीकच बनले. देवकीने जन्म दिला, तरी आईचे प्रेम कृष्णाला यशोदेने दिले. मातृप्रेम, स्त्रीच्या हृदयातली ममता ही केवळ रक्ताच्या नव्हे, तर प्रेमाच्या नात्यावर अवलंबून असते हा संदेश कृष्ण आणि यशोदा यांच्या नात्याने दिला. विसाव्या शतकातही अशीच एक यशोदा होऊन गेली. आपल्या मुलांवर अतोनात प्रेम करणारी आणि तरीही त्यांना करडेपणाने शिस्त लावणारी. केवळ घरातल्या नव्हे, तर आसपासच्या सर्वावर प्रेम करणारी आणि तसे प्रेम आपल्या मुलांनाही करायला शिकवणारी. ही यशोदा म्हणजे 'श्यामची आई'. आपल्या साने गुरुजींच्या लेखणीने अमर केलेली 'श्यामची आई!

गुरुजींनी तुरुंगात असताना 'श्यामची आई' हे पुस्तक लिहिले आणि आपल्या तेथील मित्रांना वाचून दाखवले. अतिशय भावपूर्ण अशा वातावरणाचा स्पर्श मग त्या गजाआडच्या अवकाशाला झाला. उत्कटता आणि सहदयता यांनी ओतप्रोत भरलेल्या आपल्या आईच्या आठवणींना गुरुजींनी अमर केले. 1933 साली लिहिलेल्या या पुस्तकाची टवटवी आजही टिकून आहे. आता या पुस्तकाची सत्तरी जवळ आली आहे. पण उद्या शतकाची सीमारेषा पार करतानाही 'श्यामची आई'मधला गोडवा तेवढाच असेल यात शंकाच नाही. रात्रीच्या शांत वेळी गुरुजी बालपणातल्या श्यामबद्दल, त्याच्या हूड, तापट, घाबरट स्वभावाच्या पैलूंबद्दल आणि आईने श्यामच्या जीवनात सातत्याने जागवलेल्या प्रकाशाबद्दल सांगत आहेत, असे या पुस्तकाचे स्वरूप. बेचाळीस रात्रींमध्ये या आठवणी किंवा घटना विभागल्या आहेत. अतिशय रम्य, साध्यासरळ आयुष्याचे चित्रण तितक्याच सहजसुंदर भाषेत गुरुजींनी केले. एखाददुसरा प्रसंग यात काल्पनिकही आहे, पण तरीही जे काही या पुस्तकात आहे ते अद्भुत वाटावे असे वास्तव आहे. म्हणूनच सुरस व चमत्कारिक अरेबियन नाइट्सपेक्षा या पुस्तकातल्या रात्री मनाला चकित करून सोडणाऱ्या आहेत.

गुरुजींचे आपल्या आईवर निस्सीम प्रेम होते. त्यांच्या बालमनावर आईने विविध संस्कार केले त्यांची जडणघडण या संस्कारांतूनच झाली. आयुष्याकडे पाहण्याची एक आंतरिक दृष्टी गुरुजींना आईनेच दिली. त्यांचा मानसिक विकास मानवी प्रेमाच्या पातळीवर जाऊन पोचला तो बालपणातील या शिदोरीच्या बळावरच. कोकणातल्या पालगड या गावात ते लहानाचे मोठे झाले. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 था. बालपणीचा हा काळ आईच्या सहवासामुळे फुलारला, आकारला. वडील खोत असले, तरी त्यांच्या काळात आर्थिक स्थिती घसरत गेली होती. पुढे घरदार जप्तीत गेले, इतकी परिस्थिती बिघडली. गुरुजी आपल्या घरातल्या -वैभवाबद्दल तटस्थ अशा निर्मळ व स्वच्छ मनाने लिहितात -

"ते आमचे वैभव नसून आमचे पाप होते! पाप क्षणभर हसते व कायमचे रडत बसते..." - "माझे वडील स्वभावाने दुष्ट होते अशातला भाग नाही; परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली. खोताच्या अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे."

गरिबांना नाडून मिळालेले वैभव गेल्यानंतरचे दारिद्याचे दिवस अधिक आनंदाचे होते. या दिवसांच्याच आठवणी गुरुजींनी सांगितल्या आहेत. बालपणीच्या या गोष्टी वाचताना कृष्णलीलांची आठवण होते. गुरुजी अत्यंत भावनाप्रधान होते, त्यामुळे 'श्यामची आई' पुस्तकावर भावुकतेचा, हळवेपणाचा ठसा आहे. आईत गुंतलेल्या श्यामचे मन पुस्तकभर झिरपले आहे. आईचे प्रेम, त्याची जरब आणि माया यांचा अनोखा संगम या पुस्तकात आहे. म्हणूनच ते आजच्या काळातही ताजे वाटते. छोट्या-मोठ्या प्रसंगांतून आणि आठवणीतून गुरुजी आईच्या मनाचा मोठेपणा, प्रेमळपणा आणि नकळत धडा शिकवून श्यामला शहाणे करण्याची तिची वृत्ती फार सुंदर शब्दांत कथन करतात..

श्यामच्या आईने वडाला 108 प्रदक्षिणा घालण्याचे व्रत घेतले, पण तब्येतीच्या कारणामुळे आपल्याऐवजी श्यामने त्या घालाव्या, असे तिने सुचवले. देवाला डोळे आहेत, आई आजारी आहे हे त्याला कळते. श्याम तर आईच्या पोटचा गोळा, मग त्याने घातलेल्या प्रदक्षिणा आईच्याच होणार, असे आईने समजावले, तरी श्यामला इतर बायका आपल्याला हसतील याची लाज वाटली. तेव्हा आई त्याला म्हणाली, "श्याम, आईचे काम करावयास कसली रे लाज? हे देवाचे काम. ते करीत असता तुला कोणी हसले तर तेव वेडे ठरतील. देवाचे काम करावयास लाजू नये, पाप करावयास माणसाने लाजावे."
बालपणी श्यामने ओल्या पायाला धूळ लागेल म्हणून आईच्या पातळाने ओली पावले टिपण्याचा हट्ट धरला, तेव्हा आईने तो पुरवला. पण सोज्ज्वळ शब्दांमध्ये त्या वेळी तिने जी समज दिली, ती त्याने आयुष्यभर जपली. आई श्यामला म्हणाली होती, "श्याम! पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस! तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून."

एकदा तर श्यामने मुक्या कळ्याच तोडून आणल्या आणि ताम्हणात पाणी घालून त्यात ठेवल्या. त्या काही नीट फुलल्या नाहीत. तेव्हा मुकी फुले तोडू नये, फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे, कारण झाडांवर ती चांगल्या रीतीने उमलतात. अशी शिकवण आईने दिली.

श्यामच्या बालपणीच्या अशा कित्येक आठवणी पुस्तकभर विखुरल्या आहेत. श्यामच्या हट्टी, संतापी स्वभावाला प्रसंगी कडक वागणुकीने आळा घालणारी, पण त्याच्यावर मनातून फक्त प्रेमच करणारी आई पानोपानी भेटते. आज बालमानसशास्त्राथी आणि बालसंगोपनाची भाषा जाणकार मंडळी करत असतात. पण श्यामची आईसुद्धा बालमानसशास्त्रज्ञच होती. मुलाच्या मनाच्या खाचाखोचा तिला माहीत होत्या. त्याच्या गुणांचे कौतुक करतानाच, दोषांचे निराकरण कसे करावे यासाठी तिला दुसऱ्या कोणाचा सल्ला घेण्याची मुळी गरजच नव्हती.

'श्यामची आई' हे अगदी भावुक, रडके पुस्तक आहे, अशी टीका करण्याची फॅशनच हल्ली आहे. शिवाय मुलांना कमजोर, मानसिकदृष्ट्या कमकुवत, पडेल बनवणारे हे पुस्तक आहे. दरिद्री घराबद्दलच्या आठवणी सांगून आजच्या मुलांना काय उपयोग होणार? त्यांच्यासमोर अल्पसंतुष्टतेचा आदर्श का ठेवायचा? त्या ऐवजी अधिक चांगले मिळवण्याची प्रेरणा जागवणे आज महत्त्वाचे आहे. अशा त-हेची भावना मनात घेऊन 'श्यामची आई पुस्तकाकडे बघितले जाते. शिवाय, सुमारे शतकभरापूर्वीचा काळ, त्यावेळचे जीवन, मागास जीवनशैली यांचा आजच्या मुलांशी काय संबंध अशा पद्धतीनेही काही जण 
सवाल करतात. थोडक्यात, 'श्यामची आई' हे कालबाह्य झालेले पुस्तक आहे आणि ते वाचून आजच्या मुलांचा काहीच फायदा नाही अशी दृष्टी काहीजण बाळगतात.

पण डोळसपणे जर पाहिले, विचार केला आणि मग हे पुस्तक वाचले तर हे विरोधी विचार साफ चुकीचे आहेत हे कळून चुकेल. आजच्या हिशेबी, स्वार्याचा पाठपुरावा करण्याच्या जगात उलट मुलांना 'श्यामची आई' वाचण्याची अधिक गरज आहे. त्यांची प्रत्यक्षातील आई जी शिकवण देईल ती त्यांना 'श्यामची आई' देईल. मुलांवर संस्कार कशा पद्धतीने करायचे, त्यांना कधी गोंजारायचे आणि कधी व किती फटकारायचे हे पालकांना न कळल्यामुळे आज मुलांबाबतचे अनेक प्रश्न निर्माण होताना दिसतात. आज वास्तव बदलले असले, तरी मुलांना वाढवताना येणारे प्रश्न तेच आहेत. म्हणून अशा प्रसंगांमध्ये कसे वागावे, याचा संदेश या पुस्तकातून मिळू शकतो. मुलांशी आईवडिलांचे जवळिकीचे तरीही जरबेचे नाते कसे असावे याचे आदर्श उदाहरण म्हणजे 'श्यामची आई' हल्ली मुलांशी मैत्री असावी अशी भाषा केली जाते. पण मैत्री असणे म्हणजे आपण सारासार विचार विसरून पोरकट होणे किंवा मुलांना विरोध न करता अनिर्बंध स्वातंत्र्य देणे असा चुकीचा अर्थ लावला जातो. त्यामुळे होणारे परिणामही मग भोगावे लागतात. त्या ऐवजी मुलांना नेमकी गोष्ट योग्य रीतीने कशी समजवावी चाची अनेक उदाहरणे "श्यामची आई' मध्ये सापडतात. म्हणून ते आजच्या मुलांइतकेच पालकांनाही उपयोगी पडणारे, मार्गदर्शक ठरणारे पुस्तक आहे.

श्याम शाळेत असताना दापोलीला शिकत होता तेव्हाची गोष्ट, त्याने शेंडी ठेवण्याऐवजी केस राखले होते. सुटीत घरी आल्यावर वडील रागावले. तेव्हा तो आईजवळ तणतणू लागला. तेव्हा आई त्याला म्हणाली, की त्यांनी तुमच्यासाठी एवढ्या खस्त्या खाल्ल्या आहेत, तेव्हा त्यांच्या धर्मभावना दुखावू नयेत. म्हणून एवढे तरी तुला करायला हवे. त्यावर श्याम म्हणाला, "केसांत ग कसला धर्म?" आई त्यावर त्याला म्हणाली, "केस तू का ठेवतोस? मोह म्हणूनच ना? मग मोह सोडणे म्हणजेच धर्म!" या छोट्याशा प्रसंगातून लहान मुलाला त्याच्या प्रश्नांची उत्तरे सडेतोडपणे देऊन आपला मुद्दा पटवण्याचा प्रयत्न करणारी आई दिसते. आई-वडील सांगतात ती गोष्ट मुलांनी ऐकली पाहिजे, कारण त्यांनी आपल्या प्रेमाने हा अधिकार मिळवलेला असतो हा सुंदर संदेशही त्यात आहे.

आजच्या बालमनांना आणि त्यांच्या बालसुलभ वृत्तीला सशक्त बनवणारा संदेशच हे पुस्तक देते. अलीकडे मुलाला एक भावंड असणे हेही दुर्मिळ होत चालले आहे. फारतर दोन मुले एका घरात असतात. तिथेही एकमेकाशी सतत स्पर्धा, तुला-मला असे चालू असते. एकट्या मुलांचे तर फाजील लाडच अधिक होतात. त्यामुळे बरेचदा ती शेफारून जातात. दुसऱ्याला मदत करावी, त्यासाठी प्रसंगी कष्ट उपसावेत. दुसऱ्याच्या सुखासाठी थोडा त्याग करण्यास तयार असावे, आनंद एकट्यासाठी नव्हे, तर सर्वांसाठी असतो अशी शिकवण मुलांच्या मनातून रुजणे आवश्यक असते. त्यांना आयुष्यातल्या वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जाता यावे, अशी त्यांची तयारी होणेही गरजेचे असते. त्यासाठी गरीबच असायला हवे असे नाही. सधन घरातही ही शिकवण प्रस्तुत ठरते. श्यामने मोठ्या भावाच्या पायावर पाय देताना टंगळमंगळ केली, तेव्हा त्याच्या आईने दुर्वांच्या आजीला 'भरजरी ग पीतांबर दिला फाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण' हे गाणे म्हणायला सांगून श्यामला लाजवले. त्याच्या मनात भावाबद्दल प्रेम, आस्था या भावना जागृत केल्या. असे अनेक प्रसंग आजच्या मुलांना कमकुवत बनवणार की खंबीर? श्याम पोहायला घाबरत होता तेव्हा त्याला विहिरीत ढकलून देण्यासाठी मुलांच्या हवाली करणारी आई हीसुद्धा आदर्श आईच आहे. गरिबीत समाधान मानायला शिकवणारी, खरे तर आहे त्या परिस्थितीत आनंद मानायला शिकवणारी 'श्यामची आई' आजच्या मुलांसाठी जास्तच महत्त्वाची आहे.

या पुस्तकातला काळ, त्यावेळचे गाव, घरांची रचना, शेजारधर्म, पत्रावळी लावणे, लखंबाई ताक दे, डेरा फुटला मडके दे सारखा खेळ, हे सारे आजच्या काळात आढळणार नाही; पण त्यातली खुमारी आजच्या मुलांना का नाही समजणार? महागड्या वस्तूंनीच खेळता येते असे नाही, तर चार मुले आनंदाने जमली की कोणत्याही खेळाचा आनंद एकोप्याने लुटता येतो हे त्यांना उमगले तर त्यांचा फायदाच होणार नाही का? 'श्यामची आई' पुस्तकातून पुसट झालेल्या काळाच्या सांस्कृतिक खुणा पानोपानी विखुरल्या आहेत. आजच्या मुलांना ते वाचताना मौजही वाटेल. ती आगबोट, ते बैलगाडीतून प्रवास करणे, माधुकरी मागून शिकणे, शेजारणीला आईने प्रेमाने एखादा पदार्थ करून देणे अशा अनेक खुणा मुलांना खूप काही सांगून शिकवून जातील, श्यामच्या घरची मोरी गाय, तिचे त्याच्या आईवरचे प्रेम आणि तिच्या मृत्यूनंतर श्यामच्या आईने केलेला उपास भूतदयेपलीकडची माया शिकवून जाईल. गायीप्रमाणे मधी नाथाची मांजरी श्यामच्या आईची लाडकी होती. आईच्या आजारपणात मथीनेही खाणेपिणे जवळजवळ बंद केले. आई गेल्यानंतर ती म्यांव म्यांव करीत राहिली. -आईने जिये प्राण सोडले तिथेच तिसऱ्या दिवशी मयीनेही प्राण सोडले अशी विलक्षण हकीकत कुणालाही चकित व भावविभोर करून सोडणारी आहे.

आज मुलांना कितीही मिळाले तरी कमी वाटते. त्यांना आणखी हवे असते. अशा मुलांनी तर 'श्यामची आई. पुस्तकाची पारायणे केली पाहिजेत. त्यांना त्यातून बरेच काही शिकायला मिळेल, याचा अर्थ आज मुलांनी माधुकरी मागून शिकावे किंवा परिस्थिती चांगली असली तरी दोनच कपडे वापरावेत असा होत नाही. तर प्रत्येकानेच आपली जी प्रस्वाभाविक परिस्थिती असेल तिला अनुसरून सुखसुविधांची अपेक्षा घरावी हा त्याचा अर्थ आहे. वस्तूंमधून आनंद मिळत नाही. आनंद खरे तर मनातच असतो हे मुलांना उमगणे महत्त्वाचे आहे. खूपदा मुले आपल्या आईवडिलांपेक्षा दुसन्यांचे चटकन ऐकतात, पटवून घेतात. 'श्यामची आई' त्यासाठीच तर आहे. हे पुस्तक वाचून मुले मनाने दुबळी अजिबात होणार नाहीत. उलट निरोगी मन त्यांना मिळेल. भावनाशीलता हा दोष नाही. आजच्या व्यवहारी जगात उलट, भावनेचीच अधिक गरज आहे. लहान मुले क्रूर बनताना, खून करतानाही आपण बघतो. आजच्या जगात अशा घटना घडत असतात. अशा वेळी 'श्यामची आई' पुस्तकातला हळुवारपणा, मायेची पाखर महत्त्वाची, मोलाची ठरते. नाहीतरी हल्ली 1.2. (बुध्यांक) पेक्षा 6.2. (भावनांक) महत्त्वाचा मानण्याचा विचार पुढे आला आहे.

श्यामला त्याची आई फक्त काही वर्षेच लाभली. तरी तेवढ्या अल्पकालीन सहवासानेही त्याच्या मनात आईची मूर्ती आणि शिकवण सजली. शेवटी सहवास किती काळाचा हे महत्त्वाचे नाही, त्यातली उत्कटता, निष्ठा महत्त्वाची. 'श्यामची आई' पुस्तकरूपात अमर झाली त्यामागे साने गुरुजींच्या मनातली आईवरची श्रद्धाच उभी आहे. निखळ नजरेने आणि निर्मळ मनाने हे पुस्तक एकदा जो जो हाती घरील, त्याच्या मनात 'श्यामची आई' कायमची वसती करेल; मग एकविसावे शतक येवो की बाविसावे. श्यामची आई म्हणजे जणू आपलीच आई, असेच प्रत्येकाला वाटेल!

Tags: matri culture nandini atmasiddha मातृसंस्कृती Aa (shya) machi aich नंदिनी आत्मसिद्ध आ(श्या)मची आईच weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नंदिनी आत्मसिद्ध

पत्रकार, स्त्री-प्रश्नांच्या अभ्यासक, अनुवादक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके