डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'स्वदेशी जत्रा' एक समृद्ध अनुभव देते; आणि वेगळं पाहिल्याचं, वेगळी खरेदी केल्याचं समाधानही. मुंबईकर ग्राहकांची पसंती मिळाल्यामुळे गावोगावचे उद्योजक खूप होतात आणि आपल्या परिश्रमाचं सार्थक झाल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. 'स्वदेशी जत्रे'मुळे दाक्षिणात्य आणि पारसी समाजातील ग्राहक 'अपना बाजार'कडे नव्यानेच वळला. स्वदेशीच्या पुरस्कर्त्यांना आणि स्थानिक उत्पादकांनाही एक दिलासा मिळाला.

मेरा जूता है जपानी,
यह पतलून इंग्लिस्तानी।
सर पे लाल टोपी रूसी,
फिर भी दिल है हिंदुस्तानी॥

हे गाणं एकेकाळी अत्यंत लोकप्रिय झालं होतं. आजही ते अनेकांचं आवडतं गीत आहे. वेगवेगळ्या देशांतून आलेले कपडे घालूनही अंतर्बाह्य भारतीयच राहिलेला राज कपूरचा ट्रॅम्प साध्याभोळ्या माणसाचं प्रतीक होतं. विविधतेतून एकता साधणारा संदेश हा नेहरूयुगाचा मंत्र होता आणि राज कपूरच्या चित्रपटांमधून त्याचेच सूर उमटत असत. एक प्रतिकात्मकता म्हणून या गाण्याकडे बघता येईल, त्यातील भावनेचा सच्चा सूर नाकारूनही चालणार नाही. 

पण प्रत्यक्षात असं विदेशी वस्तूंनी भारून गेलेलं आयुष्य भारतीय समाजाच्या मुळावरच येऊ लागलं, तर मग या गाण्याचे सूर आनंदाने आळवणं कठीण बनेल. मग 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' हे म्हणतानाही त्यातला फोलपणा जाणवेल. आजच्या बहुराष्ट्रीय कंपन्या, परदेशांतून आयात होणाऱ्या विविध वस्तू आणि पदार्थ यांमुळे भारतीय ग्राहकाच्या समोर खूप मोठा खजिना उलगडला असला तरी, या वस्तूंपुढे जेव्हा भारतीय उद्योगक्षेत्राला धोका पोचण्यास सुरुवात होते. तेव्हा या निवडीच्या स्वातंत्र्याचं खरं स्वरूप उघड व्हायला लागतं.

आज आपल्याकडच्या दुकानांमधून रोजच्या वापराच्या साबण, टूथपेस्टपासून कपड्या-खेळण्यांपर्यंत आणि प्रक्रियायुक्त खाधान्नापासून छोट्या-मोठ्या उपकरणांपर्यंत विदेशी बनावटीच्या किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादनं असलेल्या वस्तू मोठया प्रमाणावर उपलब्ध असतात. त्यांपैकी काहींचा वापर तर गेली कित्येक दशकं आपण सवयीने करीत आलो आहोत. जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये सापडल्यानंतर भारतातील अनेकांना त्याच्या विविध दुष्परिणामांचं भान आलं, देशी उद्योगांपुढे एक मोठंच आव्हान उभं असून त्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. ही जाणीवही प्रकर्षानं झाली. एके काळी लहान उद्योगांना सरकारी पातळीवरून काही सवलती देऊन एक तन्हेंचं संरक्षण मिळत असे. नवीन व्यवस्थेत हे बंद करण्याकडे कल वाढला. सरकारी क्षेत्रातील नोकयाही कमी झाल्या. संगणकाच्या वाढत्या वापरामुळे सर्व ठिकाणी मनुष्यबळाचा वापरही मर्यादित बनला. अशा स्थितीत स्वयंरोजगाराच्या किंवा स्वतंत्र उद्योगाच्या मार्गाने जावे, तर अनेक अडचणींच्या जोडीला मोठ्या कंपन्यांचं आव्हान समोर आलं. त्यांच्या प्रसारापुढे आणि प्रभावी जाहिराततंत्रापुढे टिकाव लागणं ही सोपी गोष्ट नाही याचं भान आलं. ग्राहकापर्यंत पोचणं हीच कठीण गोष्ट बनली. ग्राहकांच्या दृष्टीनेही, समोर येणाऱ्या वस्तू आणि आदळणाऱ्या जाहिराती यांच्या माऱ्यातूनच निवड करण्याचं स्वातंत्र्य त्यांच्या वाट्याला आलं. एखाद्याला संपूर्ण देशी बनावटीच्या वस्तू घ्यायच्या असतील, तरी त्या नेमक्या कोणत्या आणि त्या मिळणार तरी कुठे, हे प्रश्न समोर आले.

आता या तऱ्हेचे प्रश्न चुटकीसरशी सोडवणारा उपक्रम मुंबईत सुरू झाला आहे. 'अपना बाजार' या प्रसिद्ध संस्थेने आपल्या नायगावच्या वास्तूत 'स्वदेशी जत्रा' या नावाचं स्वतंत्र दालनच सुरू केलं आहे. अत्यंत आकर्षक सजावट करून, जत्रेचं वातावरण वाटेल अशा पद्धतीने मांडणी करून ग्राहकांसमोर आलेली ही 'स्वदेशी जत्रा' एक स्तुत्य असा उपक्रम आहे. आजवर 'अपना बाजार'ने अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत, सचोटीचा व्यवहार, चोख माल आणि ग्राहकहिताचं लक्ष्य यांच्या जोरावर 'अपना बाजार'ने आपली ब्रँड व्हॅल्यू मुंबईकरांमध्ये या आधीच निर्माण केली आहे. गेल्या काही वर्षामध्ये मुंबईबाहेरही 'अपना बाजार'च्या शाखा सुरू झाल्या आहेत. सहकाराच्या माध्यमातून ग्राहकहितापर्यंत पोचणारी ही संस्था लोकांमध्ये आदराचं स्थान प्राप्त करणारी ठरली आहे, यात शंकाच नाही. 

या स्वदेशी जत्रेची कल्पना सुचवली प्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ गजानन खातू यांनी. श्री. खातू यांनी एके काळी खाजगी कंपनीतील नोकरी सोडून 'अपना बाजार'च्या सरव्यवस्थापकपदाची धुरा सांभाळली होती. काही वर्षांपूर्वी त्यांनी स्वतंत्रपणे व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून काम सुरू केलं असलं, तरी अपना बाजार'शी असलेलं त्यांचं नातं तुटलं नाही. म्हणूनच 'अपना बाजार का काहीतरी नवीन करायचं आहे असं समजल्यावर त्यांनी ही कल्पना सुचवली आणि 'स्वदेशी जत्रे'च्या उभारणीतही साहाय्य केलं. कमीत कमी खर्चात 'स्वदेशी जत्रे'ची मांडणी करण्याचे उपायही त्यांनी सुचवले. जत्रेची वातावरणनिर्मिती व्हावी यासाठी नेपथ्यकार रघुवीर तळाशीकर यांनी मदत केली. 

ही 'स्वदेशी जत्रा' अपना बाजारची नायगाव शाखा असलेल्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर भरवण्यात आली आहे. मध्यंतरीच्या मंदीच्या काळात हा मजला ओसच पडला होता. पहिल्या दोन मजल्यांपर्यंतच 'अपना बाजार'चा सर्व माल होता. या रिकाम्या मजल्याची जागा या उपक्रमामुळे सत्कारणीही लागली. 

'अपना बाजार'च्या कार्याध्यक्षपदी असलेल्या श्री. विष्णू आंग्रे यांनी 'स्वदेशी जत्रे'च्या उपक्रमाबद्दल बोलताना सांगितलं की, "गजानन खातू यांनी अत्यंत चांगली कल्पना सुचवल्यामुळे एका चांगल्या कार्याचा शुभारंभ 'अपना बाजार ने केला आहे. ‘स्वदेशी जत्रा’ ही कल्पना संस्थेच्या ध्येयधोरणांशी अत्यंत सुसंगत असून ती आजची एक गरजही असल्यामुळे तिचं आम्ही स्वागतच केलं.' 'स्वदेशी' आणि इतर वस्तू यांच्यातला फरक एरवीच्या दालनांमधून स्पष्ट होत नसल्याने ग्राहकांची सोयही यात साधली गेली आहे. ज्याला फक्त स्वदेशी वस्तू घ्यायच्या आहेत, असा ग्राहक स्वदेशी जोत फिरून आपल्या आवडीनुसार मनसोक्त खरेदी करू शकतो. वस्तूंचं वैविध्यही असल्याने त्याला निवड करायलाही इथे भरपूर वाव आहे. उद्योजकांच्या दृष्टीनेही 'स्वदेशी जत्रा' म्हणजे एक पर्वणीच ठरली आहे.

इथॆ महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून आलेल्या उद्योजकांचा माल विक्रीस ठेवण्यात आला आहे. एरवी मुंबईसारख्या महानगरात आपला माल विकणं हे या मंडळींना स्वप्नवतच बाटलं असतं. त्यांना अगदी परवडेल अशा पद्धतीने एका मान्यवर संस्थेत जागा मिळाली आहे. या दालनात 40 विक्रेते आहेत. त्यांपैकी काही मोजके अपवाद वगळता इतरांना अत्यंत सवलतीचा दर लावून जागा देण्यात आली आहे. या मंडळींकडून कोणतंही भाई घेण्यात आलेलं नाही. त्याऐवजी त्यांच्या विक्रीच्या दहा टक्के रक्कम त्यांनी अपना बाजार ला द्यावी असं ठरवण्यात आलं आहे. प्रत्यक्ष विक्रीच्या प्रमाणावर भाडे अवलंबून असल्याने छोट्या उद्योजकांना ही सवलत पथ्यावरच पडली आहे. 'स्वदेशी जत्रे’मध्ये फिरताना मन प्रसन्न करणारं वातावरण अवतीभोवती आहे हे प्रकर्षाने जाणवतं. जत्रेसारखं मोकळंढाकळं वातावरण, कुठेही बंदिस्तपणा नाही. एका नजरेत जत्रेचा आवाका जाणवतो. स्वदेशीचा संदेश देणारे फलक जत्रेचा हेतूही स्पष्ट करतात आणि वातावरणातही भर टाकतात. विविध तऱ्हेची उत्पादने आणि वस्तू पाहून छोटे व्यावसायिकही किती हुन्नरी असतात, याचा पडताळा येतो. कल्पकता, उत्साह, कष्टाळूपणा अशा अनेक गुणांचं दर्शन ही 'स्वदेशी जत्रा' घडवते. काही उत्पादनं ओळखीची असतात, पण ती स्वदेशी आहेत, हा नवाच शोध आपल्याला लागतो, तर अनेक नव्या कल्पना, स्थानिक गोष्टींचा वापर करून बनवलेली उत्पादनही इथे दिसतात.

अगरबत्त्यांपासून टूथ पेस्टपर्यंत आणि साबणापासून खेळण्यांपर्यंत विविध गोष्टी इथे आहेत. सेंद्रीय खतं, बागकामाचं साहित्य, बिन साखरेची बिस्किटं, रसायनाचा वापर न करता उत्पादित केलेला शेतमाल इथे बघायला मिळतो. घरगुती उत्पादनांपासून महिला बचतगटांच्या जाळ्यातून निर्माण झालेल्या उत्पादनापर्यंत वेगवेगळ्या स्तरांवर बनलेली उत्पादनं स्वदेशी जत्रेत आहेत. कोकण, मराठवाडा, मुंबई परिसर इत्यादी विविध ठिकाणच्या वस्तू आहेत. युसुफ मेहेरअली सेंटर, मातृमंदिर, शांतिबन, सौराष्ट्र खादी, अशा सामाजिक क्षेत्रातील संस्था, उत्कर्ष बचत गट, आदिवासी सहशिक्षण केंद्र अशा संस्था, खाजगी उद्योजक असे सर्वजण या जत्रेत आहेत. लाकडी खेळणी, खादीचे कपडे आणि चादरी, मराठवाड्यातील तिखट-चमचमीत पदार्थ आणि कोकणातील कोकम, विविध सरबतं असलेले स्टॉल आहेत. एका स्टॉलवर फक्त आवळ्यापासून बनवलेले विविध पदार्थ आहेत तर एके ठिकाणी मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना देणारी शैक्षणिक खेळणीही आहेत. 

'स्वदेशी जत्रा' एक समृद्ध अनुभव देते; आणि वेगळं पाहिल्याचं, वेगळी खरेदी केल्याचं समाधानही. मुंबईकर ग्राहकांची पसंती मिळाल्यामुळे गावोगावचे उद्योजक खूष होतात आणि आपल्या परिश्रमाचं सार्थक झाल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. गेल्या 17 ऑगस्टला ही जत्रा सुरु झाली आणि महिन्याच्या आतच तिये साडेचार लाखांची विक्री झाली, असं सांगताना श्री. विष्णू आंग्रे यांनी अशीही माहिती दिली की 'स्वदेशी जत्रे'मुळे दाक्षिणात्य आणि पारसी समाजातील ग्राहक 'अपना बाजार कडे नव्यानेच वळला. स्वदेशीच्या पुरस्कर्त्यांना आणि स्थानिक उत्पादकांनाही एक दिलासा मिळाला. 

स्वातंत्र्यपूर्व काळात स्वदेशीची चळवळ झाली, तशा पद्धतीची कल्पना ठेवून आज जाता येणार नाही. पण स्वदेशीची भावना पूर्णपणे हद्दपार करणंही चुकीचंच ठरेल. गांधीजींची स्वातंत्र्य चळवळ ही असहकाराच्या माध्यमातून पुढे आली आहे. 'एकमेका साह्य करू' हा मंत्र घेऊन ती 'स्वदेशी' तत्त्वाचा पुरस्कार करत आहे. या उपक्रमाला सहकार्य करणं सर्वांचंच कर्तव्य आहे. 
 

Tags: ' Apna Bazar Gajanan Khatu Nandini Atmasiddha 'अपना बाजार Swadeshi's' Apna 'Marg गजानन खातू नंदिनी आत्मसिद्ध स्वदेशीचा 'अपना' मार्ग weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नंदिनी आत्मसिद्ध

पत्रकार, स्त्री-प्रश्नांच्या अभ्यासक, अनुवादक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके