डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

 प्रा. मधु दंडवते यांनी आपल्या भाषणात ‘नारायणीय’मधील काही लेखांचा परामर्श घेतला. युसूफ मेहेरअलीविषयीच्या लेखाबद्दल बोलताना त्यांनी नानासाहेबांच्या तुरुंगातील काही आठवणी सांगितल्या. नानासाहेबांनी शुभाला लिहिलेल्या पत्रांचाही उल्लेख केला. विशेष गौरवाने बोलले, ते पुस्तकाच्या प्रस्तावनेबद्दल. नानासाहेबांची संवेदनशीलता, त्यांचे पारदर्शित्व याचे फार सुंदर विवेचन दंडवत्यांनी केले.

'नारायणीय'  म्हणजे ना. ग. गोरे यांच्या निवडक लेखनाचा संग्रह असणारा ग्रंथ. नानासाहेब गोरे यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा ग्रंथ प्रथम सिद्ध करण्यात आला होता. 5 जानेवारी 2001 या दिवशी या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन लोकसत्ताचे संपादक डॉ. अरुण टिकेकर यांच्या हस्ते करण्यात आले. नानासाहेबांचे कुटुंबीय या समारंभाला मुद्दाम उपस्थित राहिले होते. त्यांची कन्या शुभा हिने आपल्या प्रास्ताविकात ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचा हेतू सांगितला. शुभाताई आपले मनोगत या निमित्ताने व्यक्त करताना म्हणाल्या, ‘‘सर्वस्वी नवीन स्वरूपात हा ग्रंथ सिद्ध करण्यासाठी साधना प्रकाशनाच्या सर्वच संबंधितांनी भरपूर मेहनत घेतली आणि म्हणून हा ग्रंथ देखण्या रूपात वाचकांना उपलब्ध होऊ शकला. आजची तरुण पिढी मराठीपेक्षा इंग्रजी अधिक वाचते, तेव्हा नानासाहेबांचे साहित्य त्यांच्यापर्यंत पोचवायचे असेल तर ‘नारायणीय’ चे सुंदर इंग्रजी भाषांतर व्हायला हवे.’’ 

ग्रंथाचे प्रकाशन करताना डॉ. अरुण टिकेकर म्हणाले – ‘‘या ग्रंथाचे प्रकाशन करायला मिळणे हा माझा फार मोठा बहुमान आहे. कारण अलीकडे असे ग्रंथ प्रकाशित करायला मिळत नाहीत. हे पुस्तक इतके सुंदर आहे की ते प्रत्येक सुसंस्कृत माणसाने, प्रत्येक पत्रकारानेही वाचलेच पाहिजे. आपण जे जे वाचन जाणीवपूर्वक केले, त्याच्या पुन:प्रत्ययाचा आनंद हे पुस्तक देते. नानासाहेब गोरे अतिशय संवेदनशील लेखक आहेत. भावनेपेक्षा विचार श्रेष्ठ पण विचारापेक्षाही कृती श्रेष्ठ असे नानासाहेब मानीत असत. या संदर्भात त्यांचे लेखन आपल्याला पाहावे लागेल. मनाला भिडणारे नानासाहेबांचे लेखन म्हणजे उत्कृष्ट साहित्यकृतीचा नमुना आहे. नानासाहेबांनी भावना आणि विचारांपेक्षा कृतीला महत्त्व दिले. आज मात्र याच्या अगदी उलट चित्र दिसते. आज कोणी कृती करीत नाही, विचारही करीत नाही. फक्त भावनाप्रक्षोभ मात्र सर्वत्र आढळतो. विचाराचे अधिष्ठान नसल्याने आजची स्थिती निर्माण झाली आहे का, या प्रश्नाचे उत्तर शोधताना डॉ. टिकेकरांनी एक महत्त्वाचा प्रश्नच उपस्थित केला. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे यांच्यासारख्यांच्या त्यागाबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल वाद नाही, पण त्यांची जागा आपण भरून काढू शकलो नाही, हे आपले दुर्दैव आहे. नानासाहेब दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांच्या विचारांकडेही उदारपणे पाह शकत होते. आज असे मनात येते की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, चळवळीतल्या काही प्रमुख नेत्यांनी सत्तेकडे पाठ फिरवली नसती तर राजकारणाचे चित्र बदलले असते का?’’

 प्रा. मधु दंडवते यांनी आपल्या भाषणात ‘नारायणीय’मधील काही लेखांचा परामर्श घेतला. युसूफ मेहेरअलीविषयीच्या लेखाबद्दल बोलताना त्यांनी नानासाहेबांच्या तुरुंगातील काही आठवणी सांगितल्या. नानासाहेबांनी शुभाला लिहिलेल्या पत्रांचाही उल्लेख केला. विशेष गौरवाने बोलले, ते पुस्तकाच्या प्रस्तावनेबद्दल. नानासाहेबांची संवेदनशीलता, त्यांचे पारदर्शित्व याचे फार सुंदर विवेचन दंडवत्यांनी केले. डॉ. टिकेकरांनी जो प्रश्न उपस्थित केला होता, त्या संदर्भात दंडवत्यांनी जयप्रकाशांची एक आठवण सांगितली. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात जयप्रकाशांना आपण केलेल्या चुका जाणवल्या होत्या आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अशा चुका तुम्ही करू नका, असेही सांगितले होते. दंडवते यांनीही अशा चुका त्या वेळी, सत्तेसाठी योग्य आणि अतिशय लायक असणा-या थोर नेत्यांकडून घडल्याचे मान्य केले. ते म्हणाले – ‘‘परिवर्तनासाठी भावना, विचार आणि कृतीही आवश्यक असते. म्हणूनच नानासाहेबांचे सर्व साहित्य पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते. अगदी घरगुती सोहळा असावा तसे या प्रकाशन सोहळ्याचे स्वरूप होते.

 या सोहळ्याचा समारोप कविवर्य वसंत बापटांनी आपल्या छोट्याशा पण चमकदार भाषणाने केला.
 

Tags: मधु दंडवते अरुण टिकेकर नानासाहेब गोरे नारायणीय madhu dandawate arun tikekar nanasaheb gore narayaneeya weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके