डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अमेरिकेतील वाढता वर्णद्वेष

न्यूयॉर्क शहरात एका निरपराधी आफ्रिकन काळ्या तरुणाला मादक द्रव्ये बाळगल्याच्या संशयावरून गोऱ्या पोलिसांनी 41 गोळ्या घालून तत्काळ ठार केले. असा प्रकार गोऱ्यांच्या बाबतीत कसा होत नाही याचे उत्तर पोलिसांजवळ नाही. अमेरिकेच्या अनेक राज्यांत अशा घटना अधूनमधून घडतच असतात. आपल्या भारतात जसा दलितविरोधी द्वेष उच्चवर्णीयांमध्ये नेहमीच पाहावयास मिळतो तसाच प्रकार येथेही आहे.

डॉ. मार्टिन ल्यूथर किंग हे एकदा आपल्या भाषणात म्हणाले होते, ‘‘माणसाची किंमत त्याच्या त्वचेच्या रंगावरून नव्हे तर त्याच्या चारित्र्यावरूनच ठरविली गेली पाहिजे.’’ आज डॉ. किंगच्या हत्येला ह्या एप्रिलला 30 वर्षे पूर्ण होतील, पण अजूनही के.के.के.सारख्या व त्यांची विचारसरणी उचलून धरणाऱ्या एरियन (म्हणजे आपल्या धमनीत हिटलरसारखे शुद्ध आर्यन रक्तच वाहत आहे असा सोईस्करपणे गैरसमज असणारे लोक) वर्णद्वेषी जमातीवर अजून तरी काहीएक परिणाम झालेला दिसत नाही. 1920 पासून के.के.के.सारख्या गटांनी दक्षिणेत जवळजवळ 5,000 निग्रोंची उघडपणे हत्या करूनही त्यांच्यावर कायदेशीर इलाज होत नसे. अन् जर झालाच तर सर्व ज्युरीच गौरवर्णीय असल्याने ते सहजपणे निर्दोषपणे सुटून जात; पण ह्या गोष्टीला 40-50 वर्षे होऊन गेली. अमेरिकन सरकारने सर्वांच्या नागरी हक्कांच्या संरक्षणासाठी कायदा करूनही हा निग्रोविरोधी वर्णद्वेष सारखा कसा वाढतच जात आहे हे खालील दोन घटनांवरून स्पष्ट होईल. 

गेल्या महिन्यात टेक्सास राज्यातील जॅसपर गावातील जेम्स बर्ड नावाच्या एका अपंग तरुण काळ्या माणसाला जॉन किंग नावाच्या 24 वर्षांच्या गोऱ्या माणसाने घरात घुसून, त्याला साखळीने भकम बांधून त्याच्या ट्रकच्या मागे तीन मैल खेचून रक्तबंबाळ होऊन त्याचे हातपाय व डोके फुटेपर्यंत फरफटत नेऊन त्याचा प्राण घेतला! जेम्सने त्याचा काय गुन्हा केला होता? बरं म्हणजे जॉन किंगने पूर्वी जेम्सला कधी पाहिलेही नव्हते. मग त्याने अशा प्रकारे जेम्सची क्रूर हत्या करण्याचे कारण काय? जॉन हा एरियन (आर्य) ‘ब्रदरहूड ऑफ टेक्सास’ ह्या काळ्या ज्यू, रोमन कॅथॉलिक व परदेशवासी लोकांच्या द्वेषावर वाढलेल्या के.के. के. सारख्याच एक समाजविरोधी संस्थेचा सभासद आहे. ह्या संस्थेचे सभासद होण्याची एक अट म्हणजे एका काळ्या अथवा वर निर्देश केलेल्या माणसांचा खून करणे!

अशा दुष्ट संस्थेचे सभासदत्व मिळविण्याची घाई जॉनला झाल्याने त्याने जेम्ससारख्या अपंग अन् काळ्या माणसाची अत्यंत निर्दयपणे हत्या करून आपले शौर्य (का क्रौर्य?) प्रकट करून सभासदत्व मिळविले. ह्या भयंकर हत्येने फक्त जॅसपर गावच नव्हे तर सारी अमेरिका खवळून उठली व ह्याची कसून चौकशी होऊन त्याला कायद्याने भक्कम शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी अनेक नेत्यांनी व वृत्तपत्रांनी केली. ह्याचा परिणाम म्हणजे गेल्या आठवड्यात दक्षिणेतील ह्या लहानशा गावातील 11 गोऱ्या व 1 काळ्या ज्युरीने एकमताने जॉन किंगला दोषी ठरवून मृत्युदंडाची शिक्षा दिली. ह्याचे सर्वत्र स्वागत झाले. ह्याचा एक परिणाम म्हणजे के. के.के. व एरियनसारख्या वर्णद्वेषी संस्थांना चांगलीच चपराक बसली आहे. पण ह्याचा अर्थ असा नव्हे की आता येथे वर्णद्वेषाबाबत लोक संपूर्णपणे बदलून गेले आहेत. ह्याची साक्ष म्हणजे खालील घटना.

वरील घटनेच्या एकच महिना आधी न्यूयॉर्क शहरात एका निरपराधी आफ्रिकन काळ्या तरुण माणसाला मादक द्रव्ये बाळगल्याच्या फक्त संशयावरून गोऱ्या पोलिसांनी 41 गोळ्या घालून तत्काळ यमसदनाला पाठविले. असा प्रकार गोऱ्यांच्या बाबतीत कसा होत नाही ह्याचे उत्तर पोलिसांजवळ नाही. अशीच घटना गेल्या वर्षी लॉस एंजलीसमध्ये घडली होती. तेथे 4 गोऱ्या तरुणांनी 7 काळ्या मुलांवर भर दिवसा हल्ला करून त्यांना कायमचे अपंग केले. कोर्टात त्यातील फक्त एकालाच 3 वर्षे शिक्षा व बाकीच्या तिघांना 1 वर्षांची शिक्षा मिळाली! अमेरिकन न्याय नेहमी गुन्हेगारांनाच कसा मदत करतो ह्याचे हे एक उदाहरण नाही का ? पण अशा प्रकारचे काळ्या व ज्यूंच्याविरोधी प्रसंग फक्त आमच्या दक्षिणेतच घडतात असे नव्हे. तर अमेरिकेच्या अनेक राज्यांत अशा घटना मधूनमधून घडतच असतात. आपल्या भारतात जसा दलितविरोधी द्वेष उच्चवर्णीय वर्गात नेहमीच पाहावयास मिळतो तसाच प्रकार येथेही आहे.

येथील वर्णद्वेषी लोकांना अमेरिकन प्रसारमाध्यमाची नाडी नीट समजते. ते त्यांचा भरपूर फायदा घेऊन आपले गलिच्छ कार्यक्रम पुढे ढकलत असतात. पण अशा समाजविरोधी घटनांना वृत्तपत्रे व टी.व्ही. मंडळींनी किती प्रसिद्धी द्यावयाची याचा विचार प्रसारमाध्यमातील लोक केव्हा करतील? ह्या लोकांवर काही नैतिक जबाबदारी आहे का नाही? ‘मागणी तसा पुरवठा’ अशी सोईस्कर पळवाट पकडून त्यांना आता चालणार नाही. भारतात मी ह्या वेळी चार महिने असताना माझी मराठी, गुजराती व इंग्रजी वर्तमानपत्रे वाचण्याची व टी.व्ही. बघण्याची इच्छाही मरून गेली. कारण सर्वत्र त्याच त्याच सनसनाटी, सेक्सी, बलात्कार, जाळपोळीच्या व इतर हिंसात्मक बातम्या.

समाजात कितीतरी लोक मूकसेवा करीत असतात. भल्या पहाटे उठून अनेक मातांना मी आपल्या बालकांना कपडे करून, त्याच्या बुटांच्या नाड्यांचे बंद लावून त्यांना पापा देऊन रिक्षापर्यंत पोचविताना हजारदा पाहिलेले आहे. अशी समाजसेवा व कौटुंबिक सेवा करणारे सेवक आमच्या वृत्तपत्रांना कधी दिसत नाहीत का? पण ह्या बातम्या सनसनाटी कुठे आहेत? 50 वर्षे सुखेनैव संसार केलेल्या जोडप्याचे अभिनंदन करून त्याचा फोटो वर्तमानपत्रांत छापून येण्याची शक्यता नसतेच. पण ह्याच नवऱ्याने आपल्या बायकोच्या मुस्कटात भडकवून कमरेत जर लाथ मारली तर त्याचा फोटो पेपरात पहिल्या पानावर छापला जाऊन त्या वर्तमानपत्राचा त्या दिवसाचा वाढण्याची शक्यता चांगली राहते.

पण‌ अमेरिकन जनता आता अशा सनसनाटी बातम्यांना काही प्रमाणात कंटाळून गेली आहे. त्यामुळेच त्यांना राष्ट्रपती क्लिंटन ह्यांच्या व मोनिकाच्या खाजगी व लैंगिक जीवनात रस वाटेनासा झाला आहे. येथील काही चर्चेसनी एका टी.व्ही.च्या अश्लील बातम्यांना कंटाळून एका चॅनलबर बहिष्कार पुकारला होता. अशा प्रकारच्या हिंसात्मक भड़क बातम्या देऊन स्वतःची तुंबडी भरणाऱ्या वृत्तपत्रकार व त्यांच्या मालकांवर लगाम राखण्याचे कार्य जनतेलाच करावे लागणार आहे. आगीत तेल टाकून आग भडकावून त्यावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा हा धंदा जनतेनेच पुढाकार घेऊन बंद करण्याची आता वेळ आली आहे. पण जनता असे करेल का ?

Tags: वर्णद्वेषी संघटना प्रसारमाध्यमे गोरे व काळे वर्णद्वेष सामाजिक racist organizations social media whites & blacks racial hatred social weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके