डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मजूर चढले; हुजूर पडले!

दुपारी 3 वाजता हुजूर पक्षाचे नेते मेजर ह्यांनी तेथील घर खाली करून त्याच्या किल्ल्या ब्लेअर ह्यांना देऊन त्यांचा निरोप घेतला! तीन तासांत सत्तांतर शांतपणे पार पडले! भारतात लोकसभेचे पराभूत सदस्य महिने महिने आपली निवासस्थाने सोडत नाहीत. त्या महाभागांनी ब्रिटनपासून धडा शिकला पाहिजे.

1 मे हा आंतरराष्ट्रीय क्षेत्रात 'मजूर दिन' म्हणून सर्वत्र साजरा केला जात असतो. पण ह्या वर्षी ब्रिटनच्या मजूर पक्षाने तब्बल 18 वर्षे सत्ताधारी असलेल्या हुजूर पक्षाचा 1 मेच्या निवडणुकीत दणदणीत पराभव करून तो फार उत्साहाने साजरा केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या मजूर नेत्याने हा अभूतपूर्व पराक्रम करून दाखविला तो फक्त 42 वर्षांचा तरुण आहे. त्याचे नाव टोनी ब्लेअर! गेल्या 185 वर्षांत ब्रिटनने एवढा तरुण पुढारी पंतप्रधान म्हणून निवडून दिला नव्हता. मजूर पक्षाच्या ह्या घवघवीत यशात केअरचा वाटा सिंहाचा आहे ह्यात तिळमात्र शंकाच नाही. ह्या नेत्याने पक्ष निवडणुकीत दाखविलेली शिस्त, एकसूत्रता, जनतेपुढे मांडलेले 'नवीन मजूर पक्षाचे राजकीय, आर्थिक व सामाजिक कार्यक्रम व पक्षाच्या अंतर्गत मतभेदांवर लावलेला लगाम, त्या सर्वांचा अनुकूल परिणाम ब्रिटिश मतदारांवर होऊन त्यांनी फार मोठ्या प्रमाणात मजूर पक्षाला विजयी केले. ह्याच्या उलट हुजूर पक्षातील लाथाळी व राजकीय मतभेद यांची चर्चा उघडपणे होत होती. पक्षनेते मेजर व हुजूरपक्षाच्या एकवेळच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर ह्यांनी युरोपियन ऐक्य व चलनाबाबत व्यक्त केलेले विरोधी विचार ह्याचा परिणामसुद्धा ब्रिटिश जनतेवर झाला.

ब्रिटिश आणि अमेरिकन वृत्तपत्रे व टी.व्ही. परीक्षकांनी अनेकदा मजूरनेता टोनी ब्लेअर यांची तुलना अमेरिकेचे राष्ट्रपती बिल क्लिंटन ह्यांच्याशी केली होती. तिच्यात बरेच तथ्य होते. दोघेही राजकारणात अतिशय तरुण. दोघांच्याही पत्नी वकील, दोघेही ऑक्सफर्डचे पदवीधर जनसमुदायात चक्कपणे घुसून त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याची दोघांनाही आवड अन् विशेषतः ह्या दोन्ही नेत्यांनी आपल्या विरोधी पक्षांचे राजकीय कार्यक्रम चोरून आणून त्याला आपल्या पक्षाचा असा पक्का रंग देऊन टाकला की हे कार्यक्रम मूळचे त्यांचे नव्हतेच हे जनतेला कळणे कठीण होऊन गेले! 

निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी क्लिंटनने 1992 व 1996 मध्ये आपल्या पक्षधोरणाला डाव्या बाजूकडून खेचून सरळ 'मध्यस्थ' गती देऊन स्थिर केले. ब्लेअरने ब्रिटनच्या निवडणुकीत क्लिंटनचाच कित्ता गिरवल्याने त्यालाही क्लिंटनपेक्षा जास्त यश मिळाले! ब्रिटिश प्रजा 18 वर्षाच्या हुजूर पक्षाच्या सरकारला अगदी कंटाळून गेली होती. तिला नवा नेता, नवीन कार्यक्रम हवे होते. ती गरज ब्लेअरने भागविल्याने त्याच्या पक्षाला जास्त यश मिळाले, त्यात आश्चर्याची गोष्ट काहीच नाही. ब्रिटनच्या मजूर पक्षाने आपल्या 22 जणांच्या मंत्रिमंडळात 5 स्त्री-सभासदांना मंत्रिपदे दिल्याने तेथील स्त्री मतदार ब्लेअरवर खुष आहेत. पण या सरकारपुढे काही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्न ‘आ' वासून उभे आहेत. 

युरोपियन एकीकरण व चलनाबाबतचा प्रश्न, लंडनमध्ये वाढत जात असलेली आयरिश क्रांतिकारी दलाची (आय.आर.ए.) हिंसात्मक कृत्ये, ब्रिटनमधील मुख्य उद्योगधंद्यांचे खाजगीकरण राष्ट्रीय सरकारचे विकेंद्रीकरण व ब्रिटनमधील एशिया, कॅरेबियन व आफ्रिकेतून आलेल्या परदेशी नागरिकांच्या शिक्षणाचा प्रश्न, असे अनेक प्रश्न नवीन सरकारपुढे उभे आहेत. हे सर्व प्रश्न उकलून सोडविताना ब्लेअर यांना आपल्याच पक्षातील डाव्या गटातील मजूर नेत्यांचा व उजव्या गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उद्योगपतींचाही विचार करणे भाग आहे. आता ही तारेवरची कसरत ते कशी करणार, याकडे सर्वांचे डोळे लागून राहिले आहेत.

अमेरिकेत समाजवादी पक्ष फक्त कागदावरच आहे. साम्यवादी व समाजवादी पक्षाची मतप्रणाली ह्या देशांत कधीच रुजली नाही. या देशात फक्त एकच भांडवलदारी राजकीय मतप्रणाली व दोन पक्ष पक्के रुजून बसले आहेत. ह्याच्या उलट फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, स्पेन, पोर्तुगाल, नार्वेसारख्या देशांत समाजवादी गट सत्तेवर येऊन आता पराजित होऊन गेले आहेत. तेथेही आता अमेरिकेसारखे दोन पक्ष, मुक्त बाजारपेठा, संमिश्र अर्थव्यवस्था, उद्योगधंद्यांचे खाजगीकरण व जागतिकीकरण ह्यांचे नवीन वारे वाहू लागले आहे. युरोपमध्येच नव्हे तर पूर्वीच्या रशियन गटातील राज्यांत सुद्धा म्हणजे- पोलंड, हंगेरी, झेक, स्लाविया- देशांतही ह्या नवीन आर्थिक प्रणालीचा परिचय झाला आहे. ब्रिटनच्या मजूर पक्षाने आपला आर्थिक कार्यक्रम पार बदलून टाकून समाजवादाला मूठमाती जरी दिसली नसली तरी त्याला सध्या तरी गुंडाळून फळीवर बाजूला ठेवून दिले आहे हे खरे. समाजवादाची सर्वत्र पीछेहाट होत असल्याची चिन्हे भारतातसुद्धा पाहावयाला मिळतात. 

लाल चीनने आपले आर्थिक साम्यवादी धोरण बाजूला सारून दंगशा पेंगने 1978 मध्ये पुढे ठेवलेला कार्यक्रम स्वीकारून झपाट्याने चीनचा आर्थिक नकाशा बदलून टाकला. भारतात नरसिंह रावांनी तेच काम 91 साली केलेच ना? ब्रिटनच्या निवडणुकीबाबत काही गोष्टींचा विचार करणे भाग आहे. प्रथम म्हणजे ब्रिटनच्या निवडणुकीत जरी हुजूरपक्षाचा पराभव झाला असला तरी हुजूरपक्षाच्या एके काळच्या लोकप्रिय नेत्या- मार्गरेट थँचर- ह्यांच्या आर्थिक धोरणाचा बव्हंशी स्वीकार करून ब्लेअरने त्यांना आदरांजली वाहिली आहे. ही गोष्ट नाकबूल करून चालणार नाही. 'नवीन मजूर पक्षाचे’ आर्थिक धोरण म्हणजे थँचरबाईचाच विजय असे म्हटले जाणार नाही, याची दक्षता घेणे क्लेअरला जरुरीचे वाटते. त्यासाठीच समाजवादी आर्थिक कार्यक्रम पार बदलून जात असले तरी समाजवादाला मानवी स्वरूप देण्याची जबाबदारी मजूर पक्षावर येऊन ठेपली आहे. 

समाजकल्याण योजना, गरिबांचे शिक्षण (शिक्षणावर ब्लेअर ह्यांनी अतिशय भर दिला आहे) ह्या व अशा अनेक सामाजिक प्रश्नांकडे लक्ष देऊन मजूर पक्षाने समाजवादाला 'मानवी" मुखवटा लावून देणे अत्यंत आवश्यक आहे. किंबहुना ब्लेअर यांच्यापुढे ते एक जबरदस्त आव्हान आहे. शेवटी ब्रिटिश जनतेच्या नेत्यांपासून व निवडणूक प्रचार आदर्शापासून अमेरिका व भारतासारख्या देशांनी बोधपाठ घेणे हितकारक ठरेल. ब्रिटनचा निवडणूक प्रचार फक्त 6 आठवडे चालला. ह्याच्याविरुद्ध अमेरिकेत निवडणूक प्रचार 4 ते 6 महिने चालून त्याला जत्रेचे व शिमग्याचे स्वरूप येते. तेथे वृत्तपत्रांत व टी.व्ही.वर एवढा नकारात्मक प्रचार केला जातो की त्या वेळी जनता त्रस्त व असहाय होऊन जाते ह्याच्याविरुद्ध ब्रिटनमध्ये वृत्तपत्रे व टी.व्ही.वर बरीच बंधने असल्याने नकारात्मक प्रचाराला बाब मिळतच नाही. 

व्यक्तिगत हल्ले व चारित्र्यहननाला तेथे किंमत नाही. ब्रिटनचा आणखी एक आदर्श पाहा. 2 मेला मजूर पक्षाचा विजय जाहीर होताच मजूर नेते ब्लेअर हे सकाळी 11 वाजता राणीला भेटून पंतप्रधानांच्या ऐतिहासिक वसतिस्थळी (10 डाऊनिंग स्ट्रीटमध्ये) दाखल झाले, अन दुपारी 3 वाजता हुजूर पक्षाचे नेते मेजर ह्यांनी तेथील घर खाली करून त्याच्या किल्ल्या ब्लेअर ह्यांना देऊन त्यांचा निरोप घेतला! तीन तासांत सत्तांतर शांतपणे पार पडले! भारतात लोकसभेचे पराभूत सदस्य महिने महिने आपली निवासस्थाने सोडत नाहीत. त्या महाभागांनी ब्रिटनपासून धडा शिकला पाहिजे. त्याशिवाय भारतातील समाजवादी नेत्यांसाठी पुन्हा एकदा समाजवादाकडे नव्या दृष्टीने पाहून त्याची आलोचना करण्याची वेळ आता आली आहे.

Tags: मार्गारेट थॅचर  अमेरिका ब्रिटन बिल क्लिंटन टोनी ब्लेअर मजूर दिन नरेन् तांबे Margaret Thachar America Britan Bill Clinton Tony Blear Labor Day Naren Tambe weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके